शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

Winter is coming..

  आता उद्या सकाळी उठलं कि घरातलं अनालॉग घड्याळ मोबाईल मधील घड्याळाच्या एक तास पुढे असेल आणि तेव्हाच जाणीव होईल कि डेलाईट सेविंग टाईम संपलाय. सगळी घड्याळं एक तास मागे होतात. विचित्रच वाटतं काहीतरी. बॉडीक्लॉक अड्जस्ट होतच नाही पटकन. रोजच्यासारखं सकाळी सहाला उठायची सवय असल्यामुळे पाचलाच जाग येईल. चित्रविचित्र वेळांना भूक लागेल. चित्रविचीत्र म्हणजे स्वयंपाकही झालेला नसताना भूक लागेल.

  हळूहळू दिवस इतका लहान होत जाईल की ५ वाजता सूर्य मावळेल आणि सकाळी ८ ला उजाडेल. संध्याकाळी  ६ वाजता मिट्ट काळोख होतो. त्यात सतत आभाळ, प्रचंड थंडी, डिसेंबर पर्यंत पाऊस त्याच्यासोबत धुकं आणि त्यानंतर बर्फ पडत राहील. दिवसभर आभाळ असल्यामुळे सूर्यदर्शन फार कमी वेळेला होतं. इतकं उदास वातावरण असतं कि बास! सूर्यप्रकाश असला तरी जास्तीत जास्त ४ तास असतो आणि थंडी इतकी असते कि सूर्य दिसला काय किंवा न दिसला काय काही फरक पडत नाही.

   सगळ्या झाडांची पाने गळून ते ओकेबोके दिसतील. त्यामुळे तर अजून उदास वाटेल. त्यात इथले लोक उदास रंगाचेच कपडे घालतात आणि उदासच वाटतात. आपल्या भारतीयांसारखे रंगीबेरंगी लोक फार कमी किंवा नाहीतच. गच्च भरलेल्या ट्रेन्स मधेही काडीचाही आवाज नसतो लोकांचा. कमाल आहे बुआ! आम्ही दोन भारतीय मैत्रिणी ट्रेनमध्ये गप्पा मारत असलो तर आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भावच फार बोलके असतात. असो.

   नोव्हेंबर ते मार्च असच वातावरण. डिसेंबर-जानेवारी मध्ये थंडी तर जीव घेते अगदी! मागच्या वर्षी सगळ्यात कमी -२० डिग्री तापमान गेले होते. इतक्या कमी तापमानात आपण जगू शकतो याची अनुभुती आली. बर्फ पडायला लागला कि मस्त वाटायला लागतं पण. मऊशार, कापसासारखा स्वच्छ पांढरा. लहानपणी म्हातारीला पकडायला धावायचो तसं बर्फ हातावर झेलायला फार मस्त वाटतं! बर्फ फार जिव्हाळ्याचा विषय आहे इथल्या लोकांसाठी. आपल्याकडे कसं पाऊस कमी झाला एखाद्या वर्षी तर सगळ्यांच्या जीवाला घोर लागतो तसाच काहीसं. एखाद्या वर्षी बर्फवर्षाव कमी झाला तर इथल्या लोकांना वाईट वाटतं.

 तर असा हा युरोपिअन हिवाळा.. नकोसा वाटत असला तरी हवाहवासा!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                            #munichdiaries

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

सहज सुचलेले

  • मस्त गुलाबी थंडी...

          त्यात थोडाथोडा पाऊस...
          हिलस्टेशनवर असल्यासारखं मेट्रोचं स्टेशन...
          ट्रेन वीस मिनिट लेट...
          अशा मस्त वातावरणात...
          एखादा....
         .
         .
         .
         .
         .
         .
         .
         .
         गरमगरम अमृततुल्य चहा आणि झणझणीत वडापाव मिळाला तर...
         बस ईतनासा ख्याब है!

  • मी - (अतिउत्साही स्वरात) अरे आज दुपारी मी योगामॅटचं उदघाटन केलं बरं!!
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    तो - (मोबाईल मधुन शांतपणे डोकं वर काढुन) अरे वा! वामकुक्षी घेतली वाटतं..
    सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #munichdiaries



सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

पडु आजारी..मौज न वाटे भारी..

म्युनिचला आल्यापासून आलेल्या अनुभवांवरून मी आता मनाशी खालील गोष्टींची पक्की खूणगाठ बांधलीये

- आजारी पडायचं असेल तर फक्त सोमवार ते शुक्रवार १२ च्या आत; कारण शुक्रवारी दुपारपासून ते सोमवारी सकाळपर्यंत फक्त मरणासन्न लोकांना तात्काळ ट्रीटमेंट मिळते. आणि बाकी आपल्यासारख्या लोकांना तापात फणफणत शासकीय दवाखान्यात ३-४ तास वाट पाहावी लागते.
- पुढील आठवड्यात आपण आजारी पडणार हे समजण्याची कोणती तरी व्यवस्था करणे किंवा "गट फीलिंग (अंतरात्म्याचा आवाज वगैरे)" साठी ध्यानधारणा करणे; कारण आपण नेहमी जात असतो त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट नेहमीच पुढील आठवड्याची मिळते इथे.
- येनकेनप्रकारे तुम्ही लकीली वीकडेज मध्ये आजारी पडलात तर बिना अपॉइंटमेंट क्लीनिक मध्ये गेल्यामुळे सगळ्यात शेवटी तुमचा नंबर लागतो आणि रिसेप्शनिस्ट विचारतेच "अपॉइंटमेंट का नाही घेतली?"  तेव्हा खरंच म्हणावं वाटतं "उठाले रे बाबा"! असो.
- साधे सर्दीपडसे किंवा ताप कोणत्याही औषधाविना आणि डॉक्टरविना पूर्णपणे बरे होऊ शकतात यावर माझी पूर्ण श्रद्धा बसलीये कारण तसेही इथे सर्दीपडशाला वाफ घेणे आणि संत्र्याचे, अननसाचे ज्युस पिणे हे उपाय डॉक्टर सांगतात. आणि घसा खराब होऊन ताप असेल तर पॅरासिटामोल देऊन पुन्हा २ दिवसांनी या असे सांगतात. दोन दिवसांनी जेव्हा तापाने तुमची पूर्ण वाट लागते तेव्हा ब्लड, युरीन चेक करूनच तुम्हाला अँटिबायोटिक्स देतात, नसता नाही देत. अँटिबायोटिक्सचा वापर फारच कमी आहे(हि गोष्ट वाखाणण्याजोगी आहे) आणि प्रिस्क्रिप्शन शिवाय एकही औषध मिळत नाही. 
- स्त्रियांना प्रेग्नन्सी सोडून कोणताही दुसरा प्रॉब्लेम असेल तर त्यांना स्त्रीरोगतज्ञाची अपॉइंटमेंट ४-५ महिन्यानंतरची मिळते आणि फारच तातडीची परिस्थिती असेल तर शासकीय दवाखान्यात ३-४ तास वाट पाहावी आणि जे काय होतं आहे ते जर्मन मध्ये पाठ करून ठेवावे. जर्मन भाषा येत नाही म्हटले कि इथल्या ९०% लोकांच्या डोक्यात तिडीक जाते आणि ते आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतात.
- मेडिकल इन्शुरन्स कार्ड नसेल तर आजारी पडायचा आणि दवाखान्यात पाऊल टाकायचा कोणताही हक्क तुम्हाला नाहीये. म्हणजे आपल्यासारख्या फॉरेनर्सला तरी!
- नवीन पेशन्टला कोणत्याही क्लीनिकची अपॉइंटमेंट कमीतकमी ३ महिन्यांनंतरची मिळते त्यामुळे कोणताही आजार नसताना सगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टर्सकडे उगीचच अपॉइंटमेंट घेऊन ठेवाव्यात न जाणो कधी काय बिघडेल तुमचं.
- तुम्ही शाकाहारी का आहेत ह्याविषयीचे विचार डॉक्टरच्या मनावर ठसवणे तुम्हाला जमलेच पाहिजे.
- सहनशक्ती तर वाढलीच आहे आता रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे म्हणजे असे कोणतेही प्रकार करायची वेळच येणार नाही.
- आई म्हणते तसे "शरीर रक्षितो धर्म:" हे सूत्र पालन करायचे. कारण दोन वेळा माझे दुखणे आपोआप बरे झाले कारण मला अपॉइंटमेंट पटकन मिळालीच नाही आणि ज्या दिवशीची अपॉइंटमेंट होती त्या दिवशी मी ठणठणीत बरी होते. 

एकंदर काय तर आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात तसे मी इथे शहाण्या माणसाने दवाखान्याची पायरी चढू नये असं म्हणेन!!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                  #munichdiaries 

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

व्यसन.... सीरीजचे

आज सकाळपासून मन सैरभैर झालाय नुसतं. एक अनामिक हुरहूर लागली आहे. आता पुढच्या रविवारपासून काय? राहून राहून हा प्रश्न डोक्यात येतोय.. 
असं कसं करू शकतात ते. आता थेट पुढच्या वर्षी म्हणे. का 2019? नकोच तो विचार.. फार त्रास होतो.. पुढच्या वर्षी तरी लवकर या म्हणावं.. 
असं वाटतं आहे कि ते FB आणि WA वर येणारे मेसेजेस फॉरवर्ड आणि शेअर करावेत.. ते नसतात का "इस फोटो को एक मिनिट के अंदर लाईक या शेअर किजीये आपकी मनोकामना पुरी हो जाएगी", किंवा "इस मेसेज को १० लोगोकों भेजा तो आपके सारे काम १० मिनिट मी पुरे हो जाएंगे". असे काहीबाही उपाय डोक्यात येत आहेत. असो. 
आता तर हद्दच झाली.. इतकं व्यसनाधीन (मराठीत ऍडिक्ट) असल्यासारखं वागू नये माणसाने.. कोणी पाणी म्हंटलं तर "डॅनी", फोन म्हंटलं तर "जॉन" ऐकू येतंय, लेक डायनोसॉर म्हणाला तर मला "ड्रॅगन" वाटले. उगीचच वाटतंय कि नवरा "वाईट वॉकर्स " विषयी बोलतोय आणि मीही तावातावाने त्या "सिंहासन तलवारी (Throne)" वर कोण बसेल यावर चर्चा करतेय. तर तो माझ्याकडे "तु बरी आहेस ना?" नजरेने पाहतोय आज. पुढच्या सिजनला स्कायचं subscription घेतो कि नाही देव जाणे... 
काही नाही आपलं ते Game of Thrones च्या सीजन 7 चा आज last episode आहे... म्हटलं हा सीजन संपलाय त्या दुःखाला वाट मोकळी करून द्यावी... इतकंच...


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                                                #GOTdiaries

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

ऑक्टोबर फेस्ट

   म्यूनिच मधील ऑक्टोबर फेस्ट जगातील सर्वात मोठा लोकोत्सव आहे. बऱ्याच परदेशी लोकांना ऑक्टोबर फेस्ट जर्मनीची संस्कृती वाटतो. वास्तविक, ऑक्टोबर फेस्ट बायर्नची संस्कृती प्रतिबिंबित करतो, संपूर्ण जर्मनीची नाही. स्थानिक लोक या उत्सवाला "Wisen " म्हणतात. बायर्न हे एक जर्मनी मधील राज्य आहे.
    ह्या उत्सवाचा इतिहास पार १८१० मध्ये आहे. म्यूनिचमधील पहिला ऑक्टोबर फेस्ट १२ ऑक्टोबर १८१० रोजी तेव्हाचा राजकुमार प्रिन्स लुडविग (नंतर तो राजा लुडविग बनला) आणि सॅक्सनी-हिल्डबर्गहौसेनची राजकुमारी थेरेसे यांच्या लग्नात साजरा करण्यात आला. त्यावेळी हा उत्सव घोड्यांच्या शर्यतीसह संपुष्टात आला आणि पुढील वर्षी ही शर्यत पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. एका शेती विषयक शो व्यतिरिक्त , बियर स्टॉल, आनंदोत्सव आणि इतर करमणुकीच्या गोष्टीचा येणाऱ्या वर्षांमध्ये या महोत्सवात समावेश होत गेला. आता घोड्यांची शर्यत बंद झालीये पण ऑक्टोबर फेस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
    तुम्हाला असं वाटेल की नाव तर ऑक्टोबर फेस्ट आहे आणि सप्टेंबर मध्ये कसा? तर हवामान हे मुख्य कारण. सप्टेंबर सहसा थोडा उबदार असतो. त्यामुळे साधारण १६-१७ सप्टेंबरला सुरु होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो किंवा ३ ऑक्टोबरला संपतो. ३ ऑक्टोबर हा जर्मन री-युनिफिकेशन डे असतो. मागच्या वर्षी साधारण ५ ते ७ लाख लोकांनी या उत्सवाला भेट दिली.
    मुख्यतः ऑक्टोबर फेस्ट हा बियर फेस्टिवल आहे असं म्हणूयात. म्युनिच मधल्या ब्रुअरीज मध्ये बनलेली खास बियरच इथे सर्व्ह केली जाते. फक्त म्युनिच मधलीच बियर बरंका. दुसऱ्या कोणत्याच शहरातील नाही. फक्त ६ म्यूनिच ब्रुअरीजला - Augustiner, Hacker-Pschorr, Hofbräu, Löwenbräu, Paulaner, आणि Spaten - या उत्सवामध्ये बियर सर्व्ह करण्याची परवानगी आहे. १४ मोठे आणि अनेक लहान बियर टेन्ट्स आणि बियर गार्डन्स एकाच वेळी ९८००० पर्यटकांना सामावून घेतात. बियरच्या मगला "Maß" म्हणतात. साधारण एक लिटरचा मग ९ ते १० युरो दरम्यान पडतो. बियर मेड्स आणि वेटर्स एका वेळी १० बियरने भरलेले मग सर्व्ह करतात.
    ह्या फेस्ट दरम्यान सरासरी ६० लाख लिटर बिअर फस्त होते. २०१३ मध्ये साधारण ७७ लाख लिटर बिअर ह्या फेस्टमध्ये संपली होत असे विकिपिडीया सांगतोय. हा आकडा वाचून माझे तर डोळेच पांढरे झाले आणि खाण्यासाठी लागणाऱ्या गायी, बैल, डुकरे, मेंढ्या आणि कोंबड्यांची शिरगणती केली तर अक्षरशः भोवळ येईल. असो.
    ३१ हेक्टर वर पसरलेल्या मोठ्या मैदानावर (जे फक्त ह्या फेस्ट साठी आहे) वेगवेगळ्या फन राईड्स, बिअर कंपनीजचे मोठमोठे टेन्ट्स (ह्यात फक्त १८ वर्षांवरील लोकांना प्रवेश असतो), शेकडो खाण्याचे स्टॉल्स , वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स, मस्त सजलेला परिसर असतो. लहानपणी आनंदनगरीला गेल्याचं आठवतं मला पण ती खूपच छोट्या जागेत असायची. हा फेस्ट म्हणजे भव्यदिव्य आहे.
    ह्या उत्सवाची सुरुवात साधारण १६-१७ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता दिमाखदार मिरवणुकीने होते. त्यात मुख्यतः ब्रुअरीजचे ब्रासबँड पथके असतात. मिरवणूक एकदम शिस्तीत जाते. प्रत्येक ब्रुअरीचे मानाप्रमाणे मिरवणूकीत स्थान असते. सगळ्यात आधी त्याचं बॅनर त्यानंतर ब्रासबँड, मग येतो घोड्यांचा रथ ज्यामध्ये बिअरचे ड्रम्स असतात आणि त्यानंतर एका ट्र्कमध्ये त्या ब्रुअरीचे लोक. असा सगळा लवाजमा असतो.
   स्त्रिया "Drindle" ड्रेस आणि पुरुष "Lederhose" असा खास पारंपरिक बव्हेरिअन पोशाख परिधान करतात. म्यूनिचचे महापौर मिरवणुकीच्या प्रारंभी असतात आणि तेच पहिला बिअर ड्रमचा नळ उघडून ह्या उत्सवाचे उदघाटन करतात. आजूबाजूचे लोक "O'zapft is (It's tapped)" अशी घोषणा करतात आणि एका महाबियर उत्सवाला सुरुवात होते. प्रथम बियरचा मान बवेरियाच्या मंत्री अध्यक्षांना मिळतो.त्यानंतर फेस्ट सामान्य लोकांसाठी खुला होतो.
   तर असा हा फेस्ट याची देही याची डोळा बघता आला आणि कळलं की दारूचाही म्हणजे बियरचाही उत्सव आणि मिरवणूक वगैरे होऊ शकतो. कोणाचं काय तर कोणाचं काय. पुन्हा मी तेच म्हणेन की " जावे त्यांच्या देशा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!" हो ना?

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक           #munichdiaries

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

थांबला तो संपला

   मागील आठवड्यातील मुंबईची घटना वाचून मन विषण्ण झालं अगदी. त्या सगळ्या निरपराध लोकांची काहीही चूक नसताना त्याना हकनाक जीव गमवावा लागला. त्यांच्या आप्तस्वकीयांना ह्या दुःखाशी लढण्याचे बळ मिळो.  

   मुंबई!  ह्या शहराबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात सुप्त आकर्षण असतंच बहुतेक. म्हणूनच मायानगरी म्हणत असतील कदाचित. बॉलीवूड, क्रिकेट, स्टॉक मार्केट,लोकल,पाऊस,आणि अजुनही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे मुंबई सतत चर्चेत असते. लोकल वरून माझ्या आयुष्यातले दोन खूपच थरारक (माझ्यासाठी तरी) अनुभव आठवले. 


  मी ग्रॅजुएशनला असतानाची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये असताना आपण स्वतःला फारच पराक्रमी समजत असतो. ओव्हरकॉन्फिडन्स कशाशी खातात हेही चांगलच माहिती असतं. प्रत्येक गोष्टीत आपल्यालाच कसं कळतं आणि आपलंच कसं बरोबर आहे हेच वाटत असतं. पार आकाशाला गवसणी घालायची असते. हो ना! पण लग्न झाल्यावर आकाशाला गवसणी घालायला निघालेलं आपलं विमान बरोबर जमिनीवर येतं. 

   
   तर तेव्हा माझा दादा बोरिवलीला रहात होता. मी आणि आई माझ्या सुट्यांमध्ये पहिल्यांदाच मुंबईला गेलो. मुंबईमध्ये फिरायचं म्हटल्यावर लोकलमध्ये जाणं अनिवार्य आहे. दादा आणि वहिनी दोघेही जॉब करत असल्यामुळे मी आणि आईच सगळीकडे फिरत होतो. त्यादिवशी खरेदीला दादरला जायचा ठरवलं आम्ही. दादाने गर्दीच्या वेळा टाळून जा असं सांगून ठेवलं होतं. आम्ही दोघी दुपारी जेवण करून निघालो. तेव्हा फारशी गर्दी नव्हती लोकलला. दादरला शॉपिंग केलं आणि बरच फिरलो. त्यामुळे वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि जेव्हा परत जाण्यासाठी दादर स्टेशनला आलो तेव्हा तिथली गर्दी पाहुन घाबरायलाच झालं. गर्दीमुळे एक लोकल आम्ही सोडून दिली, पुढच्या लोकलमध्ये जाऊ असा विचार केला. पण कशाचं काय गर्दी तशीच.मग धीर करून पुढच्या लोकलमधल्या लेडीज डब्यात मी चढले. चढले म्हणजे गर्दीनेच मला चढवले. तशी मी दाराजवळच होते, मागे वळून पाहिलं तर आई दिसलीच नाही मला. एकदम पोटात गोळा आला, मला वाटलं आई चढताना पडली कि काय. गर्दीतून बाहेर डोकवायचा प्रयत्न केला तर बाहेरही आई कुठे दिसत नव्हती. एव्हाना लोकल हळुहळु निघत होती. लोकलने वेग घ्यायला सुरुवात केली आणि मी मागचापुढचा कोणताही विचार न करता बाहेर उडी मारली. लोकल वेग घेत असल्यामुळे मी जोरात प्लॅटफॉर्मवर पडले. आजुबाजूचे लोक धावत आले. आई पण तिथेच होती. तिला गर्दीमुळे चढताच आलं नव्हतं. खूप लागलं होतं पण आई सुरक्षित असल्याचं पाहुन बरं वाटलं. पण तिथले लोक खूपच रागवले मला. साहजिकच आहे, प्लॅटफॉर्मवर न पडता मी लोकलखाली गेले असते तर!! बापरे विचार करूनच जीवाचा थरकाप उडतो. नशीब बलवत्तर म्हणून ह्या मंदपणे केलेल्या चुकीतून वाचले मी. घरी गेल्यावर दादा वहिनीचे पण बोलणे खाल्ले. दादा म्हणाला उद्यापासून एकटीच फिर आता लोकलने म्हणजे जरा अक्कल येईल. नंतरही बरेच दिवस ह्या विषयावर सगळ्यांनी खूपच बोलुबोलू घेतलं मला. आणि मीही गपगुमान ऐकून घेतलं. 

  ह्या भयानक अनुभवाच्या २ वर्षानंतरची गोष्ट आहे. तेव्हा दादा US ला गेलेला होता. माझ्या एका मैत्रिणीची मावशी मुंबईत असते. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी जीवाची मुंबई करायला औरंगाबादहून प्रस्थान केलं. गर्दीच्या वेळा टाळूनच आम्ही फिरत होतो आणि बरोबर मैत्रिणीचे मावस भाऊ होते त्यामुळे फार त्रास झाला नाही कुठे. पण एकदा संध्याकाळी थोडा उशीरच झाला दादरला. तिथून आम्हाला विरार ट्रेन पकडायची होती. काय प्रचंड गर्दी असते त्या ट्रेनला. आधीच मला असलेल्या गर्दीच्या अनुभवाने मी थोडी घाबरलेलीच होते. मला लोकलमध्ये जायचीच इच्छा होत नव्हती पण दुसरा पर्यायही नव्हता. आम्ही सगळे ७-८ जणं होतो. एक ट्रेन आली. आम्ही सगळे आत जायचा प्रयत्न करत होतो. माझ्या मागच्या अनुभवामुळे मी भीत होते आणि त्यामुळे मी जरा मागे पडले तोवर सगळे आत गेले. मला जागाच मिळेना. त्यात आजुबाजूचे काही फालतू लोक गर्दीचा फायदा घेऊन गलिच्छ स्पर्श करत होते म्हणून मी थांबायचं ठरवलं. मला सोडून सगळेजण आत चढले आणि ट्रेन सुरु झाली. माझी एक जिवलग मैत्रीण लोकलच्या दाराजवळच होती आणि तिने मागे वळून पहिले. तिला मी प्लॅटफॉर्मवर एकटीच राहिले हे कळलं आणि लोकल वेग घेत असतानाच त्या पठ्ठीने कोणताही विचार न करता माझ्यासाठी लोकलमधून ऊडी मारली. माझा काळजात चर्रर्र झालं. खरंच आमच्या दोघींचं नशीब चांगलं म्हणून तीही प्लॅटफॉर्मवरच पडली. दुसरा विचार स्वप्नातही करू शकत नाही मी. तिलाही खूप लागलं. आजूबाजूचे लोक खूप रागवले आम्हाला. पण आम्ही मात्र एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होतो. काहीच सुचत नव्हतं. मी तिला म्हणाले अगं मी आले असते ग पुढच्या ट्रेननी. तर ती म्हणते तुला एकटी कशी सोडून जाऊ गं इथे. बाकी सगळे पुढे निघून गेलेले, तेव्हा काही मोबाइल पण नव्हता आमच्याकडे. आम्ही आपल्या बावळटसारख्या तिथेच थाम्बलो कारण काही सुचतच नव्हतं. मग मैत्रिणीचा मावसभाऊ पुढच्या स्टेशनला उतरून आम्हाला घ्यायला आला. त्याने शांतपणे आम्हाला लेडीज डब्यात चढवलं आणि आम्ही एकदाच्या घरी पोहोचलो. माझ्या मैत्रिणीचा पराक्रम ऐकून पुन्हा आम्ही खूप बोलणे खाल्ले. पण मैत्री खरंच काय असते ना! आयुष्य समृद्ध करणारी गोष्ट.


   मुंबईत राहून दोन गोष्टी चांगल्याच कळाल्या, एक म्हणजे  "थांबला तो संपला" आणि दुसरी आपल्या प्रिय गब्बरसिंगने सांगितलेली " जो डर गया समझो वो मर गया."


ता. क. : हे वाचून मुंबईचे लोक मला वेड्यात काढतील हे माहित असूनही लिहायचं धाडस केलं!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                   #mumbaidiaries


भोगा कर्माची फळं


   आज खूप दिवसांनी लख्ख सूर्यप्रकाश असावा. आपण विंडो शॉपिंगसाठी बाहेर पडावं. मूड एकदम छान असावा. ट्राम स्टॉपवर पोहोचल्यावर एकाच मिनिटात ट्राम यावी. गर्दीने भरलेल्या त्या ट्राम मध्ये फक्त माझ्यासाठी रिकामी ठेवल्यासारखी एक जागा दिसावी आणि आपण पटकन जाऊन तिथे बसावं. अहाहा!
     आणि इतक्या झकास मूड मध्ये आपलं लक्ष पायाशी जावं. बाजूला बसलेल्या काकूंच्या पायाशी बसलेल्या छोट्या श्वानाने आपल्याकडेच पाहावं. जन्मजात श्वान भयाने पछाडलेल्या किंवा मागच्या जन्मीचे श्वानभय असलेल्या माणसासारखी अवस्था होऊन आपण एका डोळयाने कुठे जागा दिसतेय का पहावे आणि एक डोळा श्वानावर ठेवावा. इतक्यात त्या श्वानाने तुम्हाला पदस्पर्श करावा. त्यामुळे अतीव भयाने आपण पटकन उभे राहावे. तरीही पुन्हा त्या श्वानाने पदस्पर्श करावा आणि जर्मनीमध्ये असल्याचा विसर पडून तुम्ही त्या श्वानाला "हाड" म्हणावे आणि श्वानाच्या काकूंनी मराठी कळत असल्यासारखं खाऊ की गिळू नजरेने आपल्याकडे पहावे.
    तेवढ्यात पुढच्या स्टॉपला एका रिकाम्या झालेल्या जागेत आपण शांतपणे स्थानापन्न व्हावे आणि छोटे श्वान आणि काकू पण त्याच स्टॉपला उतरून जाव्यात. हायसं वाटून समाधानाने तुम्ही डोळे मिटावेत. पण त्या छोट्या श्वानाला "हाड" म्हटल्याचे कर्मफळ तुम्हाला लगेच मिळावे ह्या हेतूने एक काका त्यांच्या तीनपट धिप्पाड श्वानाला घेऊन आपल्याच बाजूला येऊन बसावेत. आणि पुढचा पूर्ण प्रवास आपण जीव मुठीत धरून करावा.
    झकास मुडचा बट्टयाबोळ...कुचंबणा...प्रचंड कुचंबणा...

ता. क. : श्वानप्रेमींना दुखवण्याचा कोणताही हेतू वरील पोस्टमध्ये नाहीये.
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #munichdiaries

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

ऍमस्टरडॅम

    हॉलंड मधील ऍमस्टरडॅम हे पण युरोपच्या चारधाम मधील एक आहे असं म्हणणे अजिबात वावगं ठरणार नाही. कर्मधर्मसंयोगाने जर्मनी मध्ये आल्यामुळे युरोप मधील चारधाम करायचे असे आम्ही ठरवलं आहे. कारण पुन्हा येणं होईल न होईल. ऍमस्टरडॅमला जायचं तर ट्युलिप्सचा हंगाम बघूनच जाणं सगळ्यात योग्य. त्याविषयी पूर्ण माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. साधारण मार्च ते मे असा सिझन असतो ट्युलिप्सचा. ट्युलिप गार्डन पाहायला एक दिवस आणि विंडमिल्स पाहायला एक दिवस असा दोन दिवसांचा प्लॅन करून आम्ही रात्रीच्या ट्रेननी म्युनिचहुन ऍमस्टरडॅमला प्रयाण केलं.


    पण मी म्हणाल्याप्रमाणे कोणताही प्रवास अडचणींशिवाय पूर्ण झाला तर त्याला प्रवास म्हणताच नाही येणार माझ्या आयुष्यात. रात्रीच्या १० च्या ट्रेनने आम्ही सकाळी ९ वाजता ऍमस्टरडॅमला पोहोचणे अपेक्षित होते. साधारण ११ वाजता आम्ही आमच्या कोच मधे निवांत झोपलो. डोळ्यात ट्युलिप्सचे स्वप्न असताना पहाटे ५. ३० ला मला जाग आली. ट्रेन कोणत्या तरी स्टेशनला थांबलेली होती. मी तिथल्या कॉरिडॉर मध्ये येऊन खिडकीतून बाहेर पाहिलं कि कुठे स्टेशनचे नाव दिसते आहे का. आणि नाव वाचून धक्का बसला. ते होतं औसबुर्ग, म्युनिच पासून फक्त २ तासाच्या अंतरावर असलेलं एक गाव. आमची ट्रेन रात्री १ वाजेपासून त्याच स्टेशनला उभी होती आणि आम्ही घोडे विकून झोपलो होतो. काय तर म्हणे की ट्रॅक्सवर काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून अजून १ तास तरी ट्रेन निघणार नाहीये.

    मनात म्हटलं ये मेरे साथ हि क्यू होता है. म्हणजे आम्हाला पोहोचायला दुपार होणार. पुन्हा आत येऊन झोपायचा अयशस्वी प्रयत्न केला. आता पुढचे विचार यायला लागले. दुपारी पोहचून कसं आणि काय करायचं वगैरे वगैरे. शेवटी पुन्हा बाहेर कॉरिडॉर मध्ये आले. ट्रेन थोड्या वेळेपूर्वीच निघाली होती आणि बाहेर सूर्योदय होत होता. ट्रेन आत्ता एका नदीला समांतर प्रवास करत होती. मस्त डोंगर त्याच्या बाजूने वाहणारी स्वच्छ आणि नितळ नदी. नदीच्या काठावर असलेलं एक छोटं आणि सुबक युरोपिअन धाटणीचे घरं असलेलं गाव. आणि डोंगराच्या मागून वर येणारा सकाळचा केशरी सूर्य. अहाहा... वेळ तिथेच थांबावा असं वाटलं. मी किती वेळ हे सगळं न्याहळत होते मला पत्ताच लागला नाही.

     "आई किती वेळ लागेल अजून ऍमस्टरडॅमला पोहोचायला?", "बाबा आलं कारे ऍमस्टरडॅम?", मला मॅप दाखव अजून किती स्टेशन्स ते?" हे आणि असेच इतर वाक्यांचे पारायण ऐकत ऐकत आमचा प्रवास चालू होता. ट्रेन नाईटलायनर असल्यामुळे त्यात खानपान सुविधा नव्हती. सकाळी चहा न पिल्यामुळे सकाळ झालीय असं आम्हा दोघांनाही पटतच नव्हतं. जवळ असलेले स्नॅक्स खाऊन लेक वैतागला. नवऱ्याला चांगलं म्हणाले होते कि धपाटे घेते थोडे बरोबर तर म्हणतो कसा "तुझ्या त्या धपाट्यांचा वास अक्ख्या ट्रेनला येईल आणि लोक तुटून पडतील त्यांच्यावर.. अजिबात घ्यायचे नाही." किती तो उपरोधिकपणा. खरंतर दशम्या आणि धपाटे प्रवासात घेऊन जाण्याची किती मोठी परंपरा आहे मराठी माणसाची! पण परंपरेला छेद न देईल तो मराठी माणूस कुठला? असो.

    शेवटी आम्ही दुपारी १ वाजता ऍमस्टरडॅमच्या भूमीवर पाय ठेवले. दीड दिवसाच्या प्रवासाने अंग आंबले होते. म्हणून हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन फिरण्याचा निर्णय घेतला. इथला लोकल ट्रान्सपोर्ट पॅरिस सारखा भुलभुलैय्या नसला तरी म्युनिचच्या लोकल ट्रान्स्पोर्टच्या थोडाही जवळ जाणारा नाहीये याची प्रचिती आली. पुन्हा नकाशा पाहून हॉटेलसाठी कोणती ट्राम पकडायची, येताना कसं यायचं, विंडमिल्स साठीची बस कुठून आहे इत्यादी चौकशा करूनच हॉटेलवर गेलो. ह्या सगळ्या घोळात २-३ तास गेलेच.
     विंडमिल्सला जाणे येणे जरा वेळखाऊ होते आणि आधीच आमचा अर्ध्याच्या वर दिवस वाया गेला होता म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला आणि सिटी टूर घेतला. ऍमस्टरडॅम व्हेनिस सारखे पूर्णपणे पाण्यावर नसले तरी ७०% पाण्यावर आहे. इथेही कॅनाल्स आहेत. आणि आम्ही त्यातूनच बोट टूर घेतली. शहरातील महत्वाची ठिकाणे बघत बघत मस्तपैकी बोटीच्या चालकाचे जर्मन आणि इंग्लिश माहितीपर भाषण ऐकत आम्ही "ऍन फ्रॅंक" च्या घराजवळ पोहोचलो. ते बघायची माझी खुप इच्छा होती पण तिथली तिकिटासाठीची रांग बघून लेक म्हणाला " आई प्लिज.. मी नाही येणार... तुम्ही दोघे जा." आता काय बोलणार मी. दिला विचार सोडून.

     सिटी सेन्टरला येऊन तिथून फेरी बोटीतून प्रवास केला. दुसऱ्या किनाऱ्यावर असलेले अमेझिंग सायन्स अँड फिल्म मुजिअम पहिले. लेक सगळ्यात जास्त इथे रमला. तिथेच बाहेर "I am Amsterdam" च्या जवळ फोटो काढले. इथे फोटो नाही काढले तर लोक तुम्हाला वाळीत टाकू शकतात कि ऍमस्टरडॅमला जाऊन इथे फोटो काढले नाहीत म्हणून. त्यामुळे आम्ही शिरस्ता मोडला नाही. एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागले होते. आणि आमचे हे त्या " सरवण भुवन (युरोपमधील दक्षिण भारतीय रेस्टॉरंटची चेन )" च्या प्रेमात असल्यासारखे नकाशावर त्याचा रस्ता शोधात होते.

     नेहमीप्रमाणे लेकाची सहनशक्ती संपली होती, त्याला भयंकर भूक लागली होती आणि तो वैतागला होता. मुलांची सहनशक्ती नेहमीच आपल्या सहनशक्तीच्या व्यस्त प्रमाणात असते. त्यामुळे सरवण भुवनचा नाद सोडून आम्ही जवळच्या उत्तर भारतीय रेस्टारंटचा आधार घेतला. तिथली दाल माखनी खाऊन आणि तिथल्या सरदार काकांशी हिंदीमध्ये गप्पा मारून मन अगदी तृप्त झालं. त्यांनी लेकाला तर आग्रह करून जेऊ घातलं. ट्युलिप्सच्या स्वप्नामध्ये रात्र सरली.

    सकाळी लवकर उठून ट्युलिप गार्डन ची तिकिटे मिळण्याचं जवळचं ठिकाण शोधून तिथे निघालो. तिकिटे मिळाली पटकन. मला वाटलं आता बस मध्ये बसायचं आणि अर्ध्या तासात गार्डन. इतकं मनासारखं होत असतं का कधी? नाहीच मुळी. बस साठी आम्ही रांगेत उभे राहिलो. ती रांग पाहून लहानपणी पंढरपूरला गेल्याचं आठवलं मला. माझ्या आई वडीलांची काय परिस्थिती झाली असेल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या रांगेत माझ्यामुळे ह्याची पुरेपूर कल्पना आली त्या रांगेत मला. लेकाने जीव नकोसा केला अक्षरशः."जगातले मधले सगळे लोक आजच आले आहेत का ऍमस्टरडॅमला? आपण आजच जाणार ना म्युनिचला?, त्या गार्डन मध्ये खेळता येईल का? तुला नुसते फुलं बघण्यात काय इंटरेस्ट आहे एवढा? तिथून लगेच निघणार आहेस ना? "... वगैरे वगैरे... डिजनीलँडला जायला तो जितका खुश होता त्याच्या अगदी उलट परिस्थिती.

    २ तासांनी कशीबशी एका बस मध्ये जागा मिळाली आम्हाला. आता वाटलं झालं जाऊच पटकन ट्युलिप गार्डनला. पण नाही. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे, अर्ध्या तासाचं अंतर २ तासात कापत आमची बस ट्युलिप गार्डनला पोहोचली एकदाची. तर प्रचंड मोठ्या लोकसंख्येने आमचं स्वागत केलं तिथे. खरंच वाटलं कि जगातले सगळे लोक आजच आले आहेत का इथे?

    ३२ हेक्टर वर पसरलेले कोकेनहॉफ ट्युलिप गार्डन, ७० लाखाच्या आसपास फुले आणि एकूण ८०० टूलिपचे प्रकार इथे वसंत ऋतू मध्ये बघायला मिळतात. खरंच अद्वितीय! एका दिवसात एवढं बघणं शक्य होतच नाही खरंतर. पृथ्वीवर स्वर्ग अवतरतो तिथे. इतके सुंदर ट्युलिप्स आणि वेगवेगळी फुले मी पहिल्यांदाच पहिली. मन हरखून गेलं एकदम. नजर जाईल तिथे ट्युलिप्स. मन फुलपाखराप्रमाणे वेगवेगळ्या फुलांच्या ताटव्यांवर फिरत होतं. किती थोडं बघून झालय आणि कितीतरी बघायचं राहिलय असंच वाटत राहिलं मला. हजारो ट्युलिप्स कॅमेरामधे आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त मनामधे साठवले. संध्याकाळचे ५.३० वाजत आले होते. हवेतला गारवा वाढायला लागला. तरी हवामानाने कृपाच केली म्हणायची. दिवसभर सूर्यप्रकाश होता लख्ख. एव्हाना लेक कंटाळून गेला होता. जड अंतःकरणाने मी ट्युलिप गार्डनचा निरोप घेतला.

    पुन्हा वाहतूक कोंडीमुळे स्टेशनला पोहोचायला जरा उशीरच झाला. आम्ही आणि आमच्या सोबत अजून एक भारतीय कुटुम्ब यांची पळणारी वरात स्टेशनवरुन निघाली होती कारण ट्रेन निघायला फक्त ५ मिनिट बाकी होते आणि आम्हाला २ फ्लॅटफॉर्म्स ओलांडून जायचे होते. दुसऱ्या कुटुंबातील साठीच्या काकूंनी जिद्द व इच्छाशक्तीचे अतुलनीय प्रदर्शन करत त्यांचा अवाढव्य देह घेऊन ट्रेन पकडली. हि ट्रेन कोणताही उशीर न करता म्युनिचला पोहोचली.

एक अविस्मरणीय आणि रंगीबेरंगी आठवणींचे मोरपीस मी मनाच्या पुस्तकात ठेवलं!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #amsterdamdiaries




















रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

चिठ्ठी आई है

त्यादिवशी लेकाला शाळेतून आणायला निघाले होते आणि दार उघडलं तर खाली एक चिठ्ठी दिसली. FB आणि WA चा जमान्यात दारात चिठ्ठी म्हणजे एकतर कोणाला तरी तुमच्याविषयी खरंच फार मोठा प्रॉब्लेम आहे किंवा कोणाला तरी तुम्हाला फारच मोठं सरप्राईज द्यायचं आहे, एवढे दोनच अर्थ असू शकतात असं मला वाटतं. वाढदिवस असल्यामुळे प्रॉब्लेमचा विचार मनाला शिवलाच नाही. एकदम भारी वाटायला लागलं. म्हटलं नवऱ्याने सकाळीच ऑफिसला जाताना चक्क सरप्राईज ठेवलं होतं दारात आणि मी आत्ता पाहतेय. वाटलं बिचाऱ्याने लंच वगैरे प्लॅन केलं असेल तर? किंवा काहीतरी छानसं लिहिलेलं असेल पत्रात.


मनमोराचा पिसारा अतीच फुलवून मी चिठ्ठी उघडली आणि मॅगी काकूंची सही पाहून मनमोराच्या पिसाऱ्यातले पिसं टपटप पडून गेले. "अब मैने क्या गुनाह किया भगवान जिसकी सजा मुझे मेरे जनमदिन पर भुगतनी पड रही है?" ह्या टाईपचे तद्दन फिल्मी विचार करत मी चिठ्ठी वाचत होते. तर विषय पुन्हा तोच कि त्यांना रात्री काहीतरी विचित्र आवाजाने जाग आली, तुमच्या घरातील दारे चेक करा आणि बिजागऱ्यांना तेलाची गरज आहे इत्यादी. पटकन घरात येऊन २ मिनिटात सगळी दारं चेक केली आणि जीव भांड्यात पडला. एकही दार वाजत नव्हतं. चला म्हटलं यावेळी संक्रात बिल्डिंग मधल्या दुसऱ्या कुणावर तरी आहे .


घरी आल्यावर काकूंच दार वाजवलं म्हटलं सरळ त्यांना सांगावं की तुम्ही मागच्या वेळी सांगितल्यापासून पंचप्राण दारावर केंद्रीत असतात माझे. पण काकू घरात असूनही दार उघडेनात. मग मीही मनाचा हिय्या करून त्यांना चिठ्ठी लिहिली कि आमचं एकही दार वाजत नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही चेक करू शकता. तुमचं आमच्या घरात स्वागत आहे वगैरे वगैरे. आणि चिठ्ठी त्याच्या दाराला लावून दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खालच्या नोटीसबोर्डवर नोटीस होती की "ज्यांच्या कोणाच्या घरातून असे विचित्र आवाज येत असतील त्यांनी तात्काळ त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल."


दुसरीकडे मोठा अपेक्षाभंग झाल्याचं प्रचंड वाईट वाटत होतं की ती चिठ्ठी नवऱ्याने ठेवली नाहीये. खरंतर मागच्या १०-११ वर्षात एकमेकांना फक्त संसारीकच मेसेजेस केले. म्हणजे मी - आज येताना अमुकतमुक आण, तो - आज रात्री यायला उशीर होईल, मिटिंग आहे, मी - अरे ते अमुक तमुक बिल भर ना रे, तो - जेवायला अमुकतमुक आहे का? इत्यादी.



    पण खरंच असं एखादं छानसं पत्र वाढदिवसाला हातात पडलं तर कित्ती मस्त वाटेल! अगदी कोणत्याही जवळच्या माणसाने लिहिलेले. सगळ्यात सुंदर गिफ्ट असेल ते! पूर्वी कसं लोक पोस्टमनच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असायचे. कोणाला नोकरी लागल्याचे पत्र, कोणा विरहिणीला आलेले प्रेमळ पत्र, कोणा आईबाबांना सासुरवाशीण लेकीचे पत्र किंवा दूरवर नोकरीला असलेल्या लेकाचे पत्र, कोणा लेकीला आईबाबांचे पत्र. किती आनंद देऊन जात असतील ते चार शब्द! असो.



     इथे आल्यापासून पत्राचा धसकाच घेतलाय पण मी. इथल्या बऱ्याच गोष्टी अजूनही पत्रव्यवहारावर चालतात. म्हणजे बँकेला किंवा कोणत्याही शासकीय ऑफिसला काही गोष्टींसाठी फक्त पत्र टाकावे लागते. इमेल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र! मला आलेले ते दोन पत्र म्हणजे इजा आणि बिजा अनुभव आहेत. आता तिजा अनुभव काय असेल देव जाणे?



    तर अनुभव इजा - इथे एक फंडा आहे रेडिओ चार्जेस नावाचा. तुम्ही रेडिओ ऐका अथवा नका ऐकू, तुम्हाला ते चार्जेस भरावेच लागतात. प्रत्येक घरासाठी हे चार्जेस असतात. मी इथे आल्यावर मला त्यांचे पत्र आले कि असे चार्जेस तुम्ही भरा. नवरा आधीच हे चार्जेस भरत असल्यामुळे मी त्या पत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्याबद्दलची माहितीही नवऱ्याला दिली नाही (त्यासाठी बोलणे खाल्ले ते वेगळेच). ७-८ महिन्यांनी अजून एक पत्र माझा नावावर आलं. त्यातला मजकूर वाचून धक्काच बसला. ती कायदेशीर नोटीस होती आणि त्यात लिहिलं होतं की तुम्हाला पत्र पाठवूनही तुम्ही रेडिओ चार्जेस भरले नाहीयेत त्यामुळे कोर्टात हजर राहा. पुन्हा तेच "ये मेरे साथही क्यु होता है?" भयंकर टेन्शन आलं होतं. मला वाटलं आता किती दंड भरावा लागतो काय माहित. दिलेल्या तारखेला प्रचंड थंडीत आम्ही सगळे कागदपत्र घेऊन त्या कार्यालयात गेलो. तर तिथला वकील कुल होता, म्हणाला "हे नेहमीचंच आहे ह्या लोकांचं, व्यवस्थित रेकॉर्ड ठेवत नाहीत आणि लोकांना नोटीस पाठवत बसतात". मनात म्हटलं "मंडळ आपलं आभारी आहे". शांत मनाने घरी आले.



    अनुभव बिजा - आपण शांतपणे आपलं आयुष्य जगत असतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांवर येणारी संकटं म्हणजे चहाच्या पेल्यातील वादळंच असतात खरंतर, पण जेव्हा अशी संकटं येतात तेव्हा पार वाट लागते. नवऱ्याला एका महत्वाच्या कामासाठी एक आठवडा भारतात जावं लागणार होतं. त्याची निघायची तयारी चालू होती. आम्ही उगीचच एकमेकांना चिडवत होतो की बरं आहे आठ दिवस तरी शांतता आता, तू तिथे शांत राहा मी इथे वगैरे वगैरे. त्याचा निघायचा दिवस उजाडला. त्याला मेट्रो स्टेशनला सोडून मी घरी आले. त्याने पण फ्लाईट बोर्ड केल्यावर फोन केला.



    मी आपलं नेहमीप्रमाणे लेकाला घेऊन येताना पोस्टबॉक्स चेक केला तर पुन्हा माझा नावावर एक पत्र. धस्सच झालं मला. घरात जाऊन पत्र फोडलं आणि पायाखालची जमीनच सरकली. मेडिकल इन्शुरन्स वाल्यांचे पत्र होते आणि लिहले होते की "-- ह्या तारखेपासूनचे तुमचे बिल "अमुकतमुक" युरो आहे आणि ते पुढील आठ दिवसात तुम्हाला भरावे लागतील. न भरल्यास दंडाच्या रकमेसहीत "अमुकतमुक" युरो भरावे लागतील." "अमुकतमुक" युरो अजून बँक अकाउंटला सुद्धा कधीच न बघितलेली मी. बेशुद्ध होण्याचंच बाकी राहिलं होतं फक्त. काहीच सुधरेना. कस आणि काय करावं. कारण नवऱ्याला यायला अजून एक आठवडा होता. WA कॉल केला, मला वाटलं तो कनेक्टिंग एअरपोर्टला पोहोचला असेल पण कॉल लागेल तर शपथ. शेवटी त्याला इमेल आणि मेसेजेस केले. बिचारा नवरा, एअरपोर्टला उतरल्यावर माझे मेसेजेस आणि मेल बघून तोही जरा घाबरला.



   रोज सकाळी उठून आज काय वाढुन ठेवलंय अजून असं चाललं होतं. त्यात नेमकी नवऱ्याच्या ऑफिस मधली HR वाली गावाला गेलेली. त्या इन्शुरन्स वाल्यांचे दर एक दिवसाआड नवीन पत्र येत होतं. पाहिलं पत्र बिल भरा. दुसरं पत्र बिलासोबत दंड भरा. तिसरं पत्र तर मी उघडणारच नव्हते पण नवरा आर्जवं करत होत कि बाई उघड आणि बघ काय ते आणि मला कळव. त्यात नविन कार्ड पाठवलं होतं त्यांनी. एकीकडे दण्ड भरा म्हणत होते आणि दुसरीकडे नवीन कार्ड पाठवत होते. मंद लोक कुठचे. वैताग नुसता. एकंदर ते आठ दिवस फोनवर प्रचंड मनःस्ताप, बरेच इमेल, कॉल्स, ऑफिसच्या लोकांशी संपर्क वगैरे करून प्रकरणावर पडदा पडला.



    खरंतर फॅमिली इन्शुरन्स असल्यामुळे मला एकटीला असं काही पत्र येईल हि अपेक्षाच नव्हती. पण इन्शुरन्स कम्पनीचे रेकॉर्डस् अपडेटेड नसल्याचा फालतू फटका आम्हाला बसला. सरतेशेवटी मेडिकल इन्शुरन्स वाल्यांचे पत्र आले की झाल्या गोष्टीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. डोंबल माझं. जीव काढला त्या पत्राने अक्षरशः.



आता जर माझ्या नावावर एखादं पत्र आलं तर मी सुषमा स्वराज ह्यांनाच कळवावे म्हणते. त्या खूप मदत करतात म्हणे!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                        #rajashrismunichdiaries

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

मोबाइलपुराण

    
 आजचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरु होतो. ठरलेल्या रुटीन प्रमाणे ती तिचं आवरुन शाळेत पोहोचते. शाळा नुकतीच सुरु झालेली असते त्यामुळे तिच्यावर कामाचा जरा जास्त ताण असतो.
नवीन सुरु झालेल्या शाळेचं एडमिन सांभाळणे म्हणजे काही चेष्टा नाहीये. नवीन ऍडमिशन्स, नवीन शिक्षक, वर्षाचे टाईमटेबल वगैरे वगैरे. एक नाही दहा. एकमागुन एक काम ती हातावेगळी करते.
एव्हाना शाळेची वेळ संपत आलेली असते. तितक्यात हाताखालच्या मावशीनी तिला सांगितले की तिला बाहेर बोलवलं आहे.
बाहेर मुलांना घरी सोडणारी ओमनी वॅन उभी असते. एका नवीन मुलाचे नाव त्या वॅन च्या लिस्ट मधे नसल्यामुळे चालक तिची वाट पाहत असतो.ती गडबडीत ओमनीच्या खिडकीच्या काचेवरच कागद ठेवुन त्या मुलाचं नाव लिस्ट मधे टाकते आणि ओमनी तिच्या प्रवासला निघते.

     ती पुन्हा ऑफिस मधे येऊन तिच्या कामाला लागते. आणि तिला आठवतं की तिला एका पब्लिशर ला फोन करायचा आहे. म्हणुन ती तिचा मोबाइल शोधयला लागते. जो तिला तिच्या आत्ताच झालेल्या वाढदिवसाला तिच्या ह्यांनी भेट दिलेला असतो.
पर्स शोधुन होते, टेबल बघितला जातो, शाळेतील सगळ्या सहकाऱ्याना विचारून झालेले असते पण फोन कुठेही सापडत नाही. आता तिला हेही आठवत नसतं की शेवटी आपण फोन ठेवला कुठे?

      तिला तिच्या ह्यांना कॉल करायचा असतो तर तिच्या लक्षात येतं की फक्त एक नंबर सोडुन कोणताही नंबर तिला पाठ नाहीये आणि तो फोन नंबर हयांचा नसुन लहाणपणी घोकलेला माहेरच्या घरचा आहे. म्हणजेच औरंगाबादचा आहे. "काय चाललय यार..डोक्याचा भुगा झालाय विचार करून पण ह्यांचा नंबर आठवत नाहीये. त्याला कळलं तर.." नकोच तो विचार. आणि प्रचंड तणावात एका कलिगच्या फोनवरुन घरी कॉल लावते.
वडील फोन उचलतात. ती " बाबा मला जरा ह्यांचा नंबर देता का? माझा फोन हरवला आहे."
बाबा तिच्यावर प्रश्नंचा भडीमार करतात. "असा कसा हरवला फोन? तुला साधा नवऱ्याचा नंबर पाठ नाही? कसं होणार तुम्हा मुलींचं." ती सगळ गपगुमान ऐकून घेते. ते नंबर देतात.
एव्हाना शाळेतील सहकारी आणि तिचे आई वडील तिच्या फोनवर सतत कॉल करत असतात. पण नुसती रिंग वाजत असते.
आता तिला खूप टेंशन येतं. "एवढा महागाचा मोबाइल. गेला आता. 15 दिवसांपूर्वीच सिनेमाला गेलो होतो तेव्हा थिएटर मधे विसरला होता.. बरं झालं ह्याने पटकन जाऊन शोधला तर सापडला. आज जर नाही सापडला तर काही धडगत नाही माझी. इतकी कशी वेंधळयासारखी वागते मी!" असो.

ती जरा घाबरतच ह्यांना कॉल करते "अरे माझा फोन सापडत नाहीये." समोरून 1 मिनिट काहीच रिप्लाय येत नाही. ती "मला काहीच सुचत नाहीये. प्लीज सांग ना मी काय करु? " आवाज शक्य तितका शांत ठेवत तो "पोलिस कंप्लेन्ट करावी लागेल आणि तुझे दोन्ही नंबर्स ब्लॉक करावे लागतील. असं कसं करतेस तु? मागच्या महिन्यातच घेतला आहे ना फोन."
तिला माहित असतं ही वादळापुर्विची शांतता आहे. ती ओके म्हणुन फोन ठेवते आणि पोलिस स्टेशनला जाण्यासाठी निघणार तोच एका कलिग चा आवाज येतो "अहो मॅडम तुमचा फोन सापडला!" तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही. "अहो तुमचा फोन वॅनच्या ड्रायव्हर कडे आहे." तिचा जिवात जीव येतो.
आणि तिच्या लक्षात येतं की त्या मुलाचं नाव लिहिताना तिने फोन ओमनी च्या टपावर ठेवलेला असतो आणि ते ती पार विसरून गेलेली असते. एव्हाना औरंगाबादला पण कळालेलं असतं की फोन सापडला आहे कारण तेही तिच्या फोनवर सतत कॉल करत असतात.

तर असा हा चमत्कारी फोन बाणेर-बालेवाडी-पिम्पळे निलख-औन्ध-बाणेर (पुणे शहरातील एरिया)असा प्रवास ओमनीच्या टपावरच करतो. एवढे सगळे खड्डे, स्पीड ब्रेकर्स, आणि कोणत्याही सिग्नलला कोणाच्याही नजरेला न पडता शांतपणे टपावर बसुन असतो. जेव्हा कोणीतरी ड्रायव्हरला फोन करून सांगतं की मोबाईल ओमनी मधे आहे का बघ तेव्हा हा चमत्कारी फोन त्याला निवांतपणे टपावर पहुडलेला दिसतो.
अशा रीतीने "देव तारी त्याचा नविन मोबाईल कोणी न चोरी किंवा कुठेही ना हारवे" ह्या नविन म्हणीचा प्रत्यय तिला येतो.
त्या दिवसा नंतर हा चमत्कारी मोबाईल कोणाच्याही दृष्टिसही पडलेला नाहीये कारण तो आता तिच्या खास मोबाईल साठी घेतलेल्या पर्समधे विराजमान असतो आणि फक्त कामापुरताच बाहेर येतो.

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #punediaries

पॅरीस

          मला असं वाटतं की युरोप टूर करायची आणि पॅरिसला जायचच नाही हे म्हणजे चार धाम यात्रेला जाऊन द्वारकेला न जाण्यासारखं आहे. तर ऑक्टोबर मधे आम्ही पॅरिस ला जायची तयारी करत होतो. नोव्हेंबर मधील एक दिवसही निश्चित केला. सगळी बुकिंग वगैरे करणार तर असं कळालं की ह्यांना नेमके तेच दोन दिवस महत्वाच्या मीटिंग्स आहेत त्यामुळे प्लान रद्द करावा लागला. माझं मन खूप खट्टू झालं. कारण डिसेम्बर पासुन पुढे एकतर भयंकर थंडी असते आणि त्यात पुन्हा बर्फ. सगळा प्लान एप्रिलच्या पुढे ढकलवा लागला. राहून राहून वाईट वाटत होतं पण...
आणि थोड्याच दिवसात ती बातमी आली की पॅरिस मधे दहशतवादी हल्ला झालाय. मन सुन्न करणारी बातमी. आत्ता आम्ही पॅरिस मधेच असतो...विचार करुनच अंगावर सरसरुन काटा आला. असो.
शेवटी एकदाचा पॅरिसला जाण्याचा योग जुळून आला. लेकाच्या शाळेला सुटया होत्या त्या दरम्यान आम्ही 3 दिवसांचा दौरा ठरवला.
        निघायचा दिवस उजाडला. विमानतळावर जाण्यासाठी आम्ही मेट्रो मधे बसलो होतो आणि लेकाने हळूच माझ्या कानात विचारले "आई टेररीस्ट अटॅक(दहशतवादी हल्ला) नाही होणार ना गं आपण पॅरिसला गेल्यावर?" आपण एखादं गोड स्वप्न पाहत असावं आणि कोणीतरी तो जोरात वाजणारा अलार्म आपल्या कानाशी लावून आपल्याला उठवावं. अगदी तशीच झाली माझी अवस्था लेकाचा प्रश्न ऐकून. खरतर असले काही विचार करून घाबरायलाच होतं पण मुलांसमोर आपण खुप शूर आहोत हेच दाखवावं लागतं. मी धीर करून म्हणाले " नाही रे. असं कहीही होणार नाही बघ. तु रिलॅक्स रहा." माझा उत्तराने त्याचं फारसं समाधान जरी झालं नसलं तरी तो थोडा रिलॅक्स झाला. पण माझा डोक्यात आता नाही नाही ते विचार सुरु झाले. अशा रीतीने आमचा प्रवास सुरु झाला.
       विमान पॅरिसच्या जवळ आल्याचं वैमानिकाने संगितल्यावर मी आणि नवरा खिडकीतुन आयफेल टॉवर दिसतोय का ह्यावर जोरजोरात चर्चा करायला लागलो. कारण आयफेल टॉवर पॅरिस मधे नक्की कठेु आहे हे आम्ही आधीच नकशावर पाहून ठेवल होतंं
"अगं दिसेल कदाचित."
"अरे ती नदी दिसते आहे की...तिच्या जवळच आहे ना!"
"हो खरं.. दिसायला हवा."
आमचा असा संवाद चालू असताना लेक म्हणाला " तुम्ही दोघे जरा हळू बोलताल का? आजुबाजुचे लोक तुमच्याकडे बघत आहेत. आणि आई आता पॅरिसला गेल्यावर दिसेलच ना तुला आयफेल टॉवर.. so just chill." आमचा आवाज बंद एकदम. आमचं विमान सरळ खाली आलं.
        दुपारची वेळ होती त्यामुळे खुपच भुक लागली होती म्हणुन आधी काहीतरी खाऊन मगच हॉटेलवर जायचं ठरवलं. ह्यांनी आधीच मला सांगून ठेवलं होतं की "सरवण भवन (साउथ इंडियन रेस्टॉरंट ची चेन आहे यूरोप मधील)" ला जायचच आहे. भारतीय लोकांनी पॅरिसला जाऊन तिथे गेलं नाही तर पाप लागतं म्हणे. तर हे सरवण भवन एका टोकाला, आयफेल टॉवर दुसऱ्या टोकाला आणि आमचं हॉटेल तिसऱ्या टोकला असं काहीतरी नकाशा दाखवत होता.मजल दरमजल करत आम्ही निघालो.
         म्युनिच मधील अप्रतिम लोकल ट्रांसपोर्टची सवय असलेले आम्ही पॅरिसच्या लोकल ट्रांसपोर्टला इतक्या शिव्या घालत होतो की काय सांगु. एकतर भुलभूलैय्या सारखे स्टेशन्स. बरं तो भुलभूलैय्या तरी एकाच लेवल वर असावा ना. पण नाही. चित्रविचित्र बोळवजा रस्ते. मधेमधे खाली नाहीतर वर जाणाऱ्या पायऱ्या. भयंकर कनफ्युजिंग स्टेशन्सची नावं. ह्या सगळ्या मधे भर म्हणुन प्रचंड गर्दी. लेक तर पहिल्याच प्रवासात वैतागला. "काय तुम्हाला त्या सरवण भवनला जायचय. किती वेळ लागतोय. मला भुक लागली आहे. चांगलं मॅकडोनाल्ड्ला गेलो असतो. वगैरे वगैरे."
       कसतरी त्या स्टेशनला पोहोचलो. तर तिथूनही 10 मिनट चालावं लागलं. तर ही जी गल्ली होती ना ती म्हणजे भारतातील एखाद्या शहरातील बाजारपेठ वाटली अक्षरश:.साड्या आणि पंजाबी ड्रेसेसचे दुकाने, किराणा मालाची दुकाने, भारतीय रेस्टॉरंटस्. मस्तच वाटलं एकदम. सरवण भवनचे चवदार दाक्षिणात्य पदार्थ खाऊन पोट तर भरलं पण मन नाहीच.
पुन्हा त्या भूलभुलैय्या स्टेशन्स आणि विचित्र अशा मेट्रोज मधून प्रवास करून हॉटेलवर फ्रेश होऊन आम्ही आयफेल टॉवर खालील स्टेशनला पोहोचलो.
       आणि तो क्षण आला. आम्ही आयफेल टॉवरला आलो. खरतर लोखंडी टॉवर आहे तो. जवळून फार आकर्षक वगैरे वाटत नाही. पण तिथला परिसर, ते टॉवरचं प्रचंड धूड, ती बाजूने वाहणारी नदी, खुप उत्साही लोक, नवीन लग्न झालेली 1-2 युरोपिअन कपल्स, त्यांची तिथे फोटो काढाण्यासाठी चाललेली लगबग, मराठी लोकांची केसरीची आलेली टुर. तिथल्या आनंद आणि उत्साहाची लागण आम्हालाही झालीच. प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे पळून गेला. मस्त टॉवरवर जाऊन सगळं पॅरिस शहर नजरेत साठवून घेतलं. खाली येऊन तिथल्या बागेत बराच वेळ बसुन राहिलो. किती वेळ गेला कळलच नाही. एव्हाना थंडी वाढायला लागली होती. लेक इतका थकला होता की तिथेच पेंगायला लागला. त्याचं सुरु झालं. भुक लागली. झोप आली. आम्ही म्हणत होतो की थोडा वेळ थांब, रात्री टॉवरला मस्त लाइट्स लागतील. तेवढे बघु आणि जाऊ. पण आपलं लगेच ऐकतील ते मुलं कसली. त्याचं आपलं एकच, त्यात काय बघायचं. मला झोप येतीये आपण उदया येऊ लाइट्स बघायला. शेवटी आम्हाला निघावच लागलं.मला तर स्वप्नात पण आयफेल टॉवरच दिसत होता.
         दुसऱ्या दिवशी लेक खुपच खुश होता. त्याची आवडती डिजनीलँडची दिवसभराची सफर होती. पुन्हा त्याच भयंकर भूलभुलैय्या मधून आम्ही डिजनीलँडला पोहोचलो. तर बारीक पाऊस सुरु झाला आणि तो दिवसभर पडतच होता. तरीही आमचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही कारण परिकथा खरी वाटावी असं काहीसं फीलिंग होतंं ते. आम्ही दोघांनीही लहान होऊन सगळ्या राईड्सचा लेकाबरोबर आनंद घेतला, मिकी माउस सोबत फोटो काढला, डिजनीच्या वेगवेगळ्या सिनेमाच्या कॅरेक्टर्सला भेटलो, कार्सचा प्रचंड थरारक असा शो पाहिला, गोड बाहुल्यांचा डांस पहिला. दिवस कसा गेला कळलच नाही. मला तर तिथून निघायची ईच्छाच नव्हती. लहानपणी वाचलेल्या परीकथेमधे जाऊन आल्यासारखं वाटलं. म्युनिच मधे आल्यापासुन चालायची सवय लागली म्हणुन नाहीतर त्या दिवशी डिजनीलँडमधे आम्ही 15 किलोमीटर चालूच शकलो नसतो. इतकं चालुनहि आमचा बराचसा भाग बघयचा राहीलाच.दुसऱ्या दिवशी दुपारच विमान होतं म्हणुन मी आता सरळ आयफेल टॉवरला जायच हट्ट धरला. मला रात्रीची रोषणाई बघायचीच होती. म्हटलं पुन्हा योग येइल की नाही माहित नाही.
       खरतर दिवसभर चालून पायाचे तुकडे पडायचे बाकी होते तरीही मला जायचच होतं. रडतपडत लेक तयार झाला यायला.
आम्ही टॉवरच्या जवळ पोहोचलो छान लाइट्स दिसत होते आणि तेव्हढयात मुसळधार पाऊस सुरु झाला. आम्ही जवळच्या बस थांब्याचा आधार घेतला. जवळ छत्री पण नव्हती. तिथे तरी किती वेळ थांबणार म्हणुन जी बस आली त्यात चढलो. वेड्यासारखं पाऊस थाम्बेपर्यन्त बस जिथे जातेय तिकडे निघालो. तो टॉवर ती रोषणाई राहिले बाजूला अन आम्ही बसमधे. कसातरी थोड़ा पाऊस कमी झाला आणि आम्ही एका स्टॉपवर उतरून पुन्हा टॉवरकडे जाणारी बस पकडली. टॉवर जवळ आलो तर पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. कसंबसं एका दुकानातुन अव्वाच्या सव्वा भावाला छत्री घेतली. भयंकर भुक लागलेली. शाकाहारी लोकांचे खाण्याचे फार वांदे होतात इकडे. पटकन काहीही मिळेना. लेकाचा चेहरा बघुन मला उगीचच अपराधी वाटायला लागलं. शेवटी एक सबवे सापडलं आणि तिथे आमच्या नशिबाने शाकाहारी सॅंडविच होतं. आम्ही अक्षरश: तुटून पडलो सॅंडविचवर. 
       सकाळी लवकर आवरुन "लुवरे म्युज़िअमला" जायचं होतं. आतापर्यंत फक्त फोटो मधे पहिलेलं मोनालिसाचं चित्र प्रत्यक्ष पहायचं होतं. पण घोळ माझ्या पाचवीलाच पुजलेले आहेत बहुतेक. संध्याकाळी 5 वाजताचं विमान असल्यामुळे आम्हाला 3.30 वाजेपर्यंत विमानतळावर पोहचणे गरजेचे होते. सकाळी सगळं सामान घेऊनच निघालो. त्या भयंकर भुलभलैया स्टेशन्स मधून प्रवास करत असताना. एका स्टेशनला ट्रेन बदलावी लागणार होती म्हणुन आम्ही एका ट्रेनमधून ऊतरलो तर माझा लक्षात आलं की आत्ताच घेतलेली पाण्याची बाटलीआतच राहिली. ती ट्रेन तिथे 5 मिनिट थांबणार आहे अशी घोषणा आम्ही ऐकली होती म्हणुन मी नवऱ्याला सूचना(त्याच्या भाषेत आदेश) केली की पटकन जाऊन बाटली घेऊन ये ना. आणि जसं काही तो ट्रेन मधे चढायचीच वाट पाहत असल्यासारखी ट्रेन निघाली की. बाहेर लेकाने भोंगा पसरला "बाबाआआ..." मला काही सुधरेना. आजूबाजूचे लोक संशयाने माझ्याकडे बघत होते की पोरगं नक्की हीचच आहे ना. मीे कसंबसं लेकाला शांत केलं. तिकडे तो वैतागला. पुढच्या स्टेशनला उतरून पुन्हा भुलभुलैया पार करावा लागणार. आधीच उशीर होत होता. त्याच्याकडे तिकीट होतं आणि स्टेशनच नाव लक्षात होतं म्हणुन बरं नाहीतर तिथेच हरी हरी करायची वेळ आली असती. कसाबसा तो आमच्याकडे पोहोचला. तर लेक बिलगलाच त्याला. आणि ह्यांनी जो लुक दिला ना मला तो मी कधीच विसरणार नाही. ते नसतं का आपण मुलाना लोकांच्या घरी त्रास देत असले की म्हणतो आत्ता थांब तु, तुला घरी गेल्यावर बघते. अगदी तसा लुक होता तो.


       ह्या सगळ्या गोंधळात एक तास गेला. कसेतरी आम्ही म्युज़िअमला पोहोचलो तर तिथे प्रचंड गर्दी. तिथे विचारलं किती वेळ लागेल तर ते म्हणाले कमीत कमी चार तास लागतील मोनालिसा पर्यन्त पोहोचायला आणि आमच्याकडे दोनच तास होते. मग काय म्युज़िअमच्या बाहेर थोडा वेळ घालवुन आम्ही विमानतळाकडे निघालो. तर ठिकठिकाणी पोलिस दिसत होते. मनात शंकेची पाल चुकचुकली. पण नंतर कळालं की तिथे पोलिस दिसतात.
   विमानतळावर पोहोचल्यावर मोठा धक्काच बसला. त्यानंतरची सगळी विमानं रद्द केलेली होती कारण त्या दिवशी कोणाचा तरी संप होता. हाय रे कर्मा. एअरलाइन वाले म्हणाले की उद्या पहाटे 6 ची फ्लाइट देतो. नाहीतर पैसे देतो. पैसे परत घेऊन काय डोम्बल होणार होतं. गपगुमान सकाळच्या विमानाची तिकीटे घेतली. आता पुन्हा हॉटेल बघावं लागणार होतं. पुन्हा भूलभुलैय्यातुन शहरात जायच जीवावर आलं आणि पुन्हा पहाटे सहाच विमान म्हणजे चारलच इथे पोहोचावं लागणार त्यामुळे तिथेच एक हॉटेल घेतलं. तो दिवस पूर्णपणे वाया घालवुन आम्ही दुसऱ्या दिवशी म्यूनिचला परतलो.
   आणि पॅरिस नावाचा एक सुंदर स्वप्नवत अनुभव मी मनात साठवून ठेवला
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #parisdiaries

     







माझी खाद्ययात्रा


          आज एका मैत्रिणीशी बोलत होते कि म्युनिचला आल्यापासून आमचं हॉटेलिंगचं प्रमाण खूपच कमी झालं आहे. एकतर आम्ही शाकाहारी आणि त्यात इथले मुख्य अन्न ब्रेड, बटाटे आणि मांसाहार असल्यामुळे बाहेर खाण्याचे पर्याय खूपच कमी. तरीही आम्ही बरेच पर्याय शोधले कारण मुळातच खाण्याची आवड आणि आईच्या मते मला असणारा स्वयंपाकाचा कंटाळा. 
३०० पेक्षा अधिक प्रकारचे ब्रेड आणि १२०० पेक्षा अधिक प्रकारचे रोलस् आणि मिनी ब्रेड (Brötchen & Kleingebäck) जर्मनीत तयार केले जातात. आपल्याकडे कश्या पावलापावलावर चहाच्या टपऱ्या असतात तश्या इथे बेकऱ्या आहेत. अप्रतिम चव आहे ब्रेड्सची. ब्लॅक फॉरेस्ट केकचा जन्म इथलाच. खूपच चविष्ट आहे हा केक. बटाट्याचे फ्रेंच फ्राईज सुद्धा ठिकठिकाणी मिळतात. इथे आल्यापासून कळून चुकलंय कि मराठी माणूस नुसत्या बटाट्याचे कितीतरी विविध पदार्थ करू आणि खाऊ शकतो. काळी कॉफी पण खूपच आवडीची आहे ह्या लोकांची. आणि बिअर तर पाण्याला पर्याय असल्यासारखी पितात. इथली थंडी पाहुन कळतं ते. आता तर काय "ऑक्टोबर फेस्ट" येऊ घातलाय. लाखो लिटर बिअर फस्त होते म्हणे. म्युनिचला "ऑक्टोबर फेस्ट" ची पंढरी म्हणायला हरकत नाही. देशोदेशीचे लोक खास तेवढ्यासाठी येतात इथे.
        खाण्याच्या आवडीवरून सहजच आठवलं की साधारण दहावी बारावीला असल्यापासून पाणीपुरी खाण्याचे लागलेले व्यसन. कारण थोडेफार पैसे तेव्हाच असायचे जवळ. आमच्या औरंगाबादची पाणीपुरी म्हणजे नुसता जाळ आणि तेव्हा १ रुपयात ८ पुऱ्या मिळायच्या. चंगळच होती तेव्हा ती. प्रत्येक एरिया मधल्या बेस्ट पाणीपुरी माहित होत्या आम्हा मैत्रिणींना. भेळ खावी तर औरंगाबादचीच आणि ती सुद्धा औरंगपुऱ्यातील साईवाल्याकडची. अजूनही औरंगाबादला गेले तर ही भेळ खातेच. फक्त तेव्हा आणि आता मध्ये फरक फार मोठा आहे, तेव्हा जास्त बाहेर खाल्ल की वडील रागवायचे आणि आता स्वतः जाऊन माझ्यासाठी भेळ घेऊन येतात. आणि आईला म्हणतात खाऊ दे ग तिला.
      गायत्री चाट भांडारची कचोरी पण अगदी प्राणप्रिय. मूगवडे पण मस्तच असतात इथले. पण आताशा जुनी चव नाही राहिली कचोरीला. ही कचोरी ६० पैसे प्रति नग असल्यापासून खाल्ली आहे. माझं आजोळ औरंगाबादचं असल्यामुळे सुटीतील ठरलेला कार्यक्रम असायचा. लहानपणी आज्जीकडे खाल्लेल्या खारीची चव अजूनही जिभेवर तशीच आहे. मुस्लिमबहुल असल्यामुळे खारी खूप छान मिळते तिथे. आप्पा हलवाईचा पेढा. लहापणीपासून अगदी तीच चव अजिबात बदल नाहीये चवीत. ह्या पेढ्याशिवाय दहावी बारावी पास झाल्याचं सुख मिळत नाही. क्रांतिचौकातील पावभाजी खायला जाणे म्हणजे सोहळा असायचा. तारा पान सेंटरच्या पानाची चव अद्वितीय. अजूनतरी तसं पान कुठे खाल्ल्याचं आठवत नाही.
     नंतर जॉब साठी पुण्याला आल्यावर आमचं खाद्य अवकाश बऱ्यापैकी विस्तारलं. त्यात मिसळ आणि अमृततुल्य चहाची विशेष भर पडली. पुण्यात तसं सगळंच चवदार मिळतं. पण मला विशेष आवडलेले म्हणजे मस्तानी, मथुराची शेवभाजी आणि तांदळाची भाकरी, आशा डायनिंग, बादशाही, जनसेवा मधले सात्विक जेवण, मानकरचा कट डोसा, काटाकिर्रची मिसळ,पावसाळ्यात सिंहगडावर खाल्लेले पिठलं भाकरी, कांदा भजी. तसे अजून गावात बरेच खाण्याचे पर्याय असतील ज्यांना भेट दिली नाहीये. बाणेरला राहायला गेल्यापासून इड्लीशिअसच्या वाऱ्या ठरलेल्या होत्या. इड्लीशिअस नावाचं छोटंसं रेस्टॉरंट म्हणजे ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड. इथल्या रस्समला तोड नाही. बाकी औंध बाणेरचे बरेच हॉटेल पालथे घालून झाले आहेत.
     दादा मुंबईला होता तेव्हा बोरिवलीमध्ये खाल्लेले ठेल्यावरचे सँडविच आयुष्यात विसरणार नाही. विक्रोळीच्या स्टेशनवरची SPDP (शेव बटाटा दही पुरी). काय अप्रतिम चव होती म्हणून सांगू. मला नंतर कधीही तसं सँडविच आणि SPDP खायला मिळाली नाही. काहीकाही पदार्थ आणि त्यांची विशेष चव पुन्हा कधी खायला मिळतच नाही. जसं की आईच्या हातचे पदार्थ. जे की आईकडे गेल्याशिवाय खायला मिळतच नाहीत. असो.
    म्युनिचला आल्यावर पहिला बाहेरचा खाल्लेला पदार्थ म्हणजे मॅकडोनाल्डचे बर्गर. अर्रर्र भयंकर चव आहे. इथे बेचव खाण्याची प्रचंड आवड आहे लोकांना. ह्यांचं जेवण आपण भारतीयांना अळणी आणि बेचव असच वाटतं. आपल्याकडचे चायनीज रेस्टॉरंट, डॉमिनोज किंवा पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड हे सगळे व्यवस्थित भारतीय चवीप्रमाणे खायला घालतात. इथे कसलं काय. मग आम्ही एक्सप्लोर करायला सुरुवात केली.
    इथेही बऱ्याच देशांच्या खाद्यसंस्कृती एकत्र नांदतात. त्यात सगळ्यात जास्त तुर्किश रेस्टॉरंट्स आहेत. इथे तुर्की लोकांचा प्रमाण बरच आहे. ह्यांच्याकडे मिळणारे शाकाहारी पदार्थ म्हणजे फलाफल सँडविच(पावमधे भरपूर भाज्या आणि फलाफल ) किंवा फलाफल रोल(मैद्याच्या पोळीत भरपूर भाज्या आणि फलाफल) किंवा भात आणि फलाफल. फलाफल म्हणजे काबुली चण्याचे वडे. हे २-३ वडे, भरपूर भाज्या, दह्याची आणि चिंचेची चटणी एका मोठ्या पावात टाकतात. चव बरीच चांगली आहे. ह्यांचं "हम्मस(कबुली चणे भिजवुन केलेला पदार्थ)", "बकलावा" पण खूप प्रसिद्ध आहेत.
    तुर्किश खालोखाल इटालियन आणि एशिअन रेस्टॉरंटस आहेत इथे. इटालियन पास्ता आणि पिझ्झा अप्रतिम मिळतो. व्हेनिसला खाल्लेला पिझ्झा पण असाच नेहमीसाठी लक्षात राहीला. काय अफलातून चव होती तिथल्या चीझची. खरतर प्रत्येक देशात किंवा प्रांतात जाऊनच तिथले ऑथेंटिक पदार्थ खायला हवेत. ते म्हणतात ना "जावे त्यांच्या देशा " अगदी तसच.
इथल्या एशिअन रेस्टॉरंटस मधे नूडल्स आणि फ्राईड राईस मिळतो पण बेचव. इंडियन रेस्टॉरंट्सचे जेवण पण फार चवदार नसते. मधे एका इथिओपिअन रेस्टॉरंटला जाण्याचा योग आला. छानच होते पदार्थ. अजून बरेच ऑपशन्स शोधायचे आहेत इथेही आणि भारतातही. आपल्याकडे तर काय गाव बदललं कि पदार्थ करण्याची पद्धत आणि चव बदलते अगदी भाषेप्रमाणे. त्यामुळे भारतात प्रत्येक राज्यात जाऊन तिथल्या डेलिकसीज खायची इच्छा आहे. बघूया कसं आणि कधी जमत ते.
ता.क. : औरंगाबाद, पुणे आणि म्युनिच मधील लोकांनी चूकभूल द्यावी घ्यावी.
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #munichdiaries

किस्सा ए मॅगी काकू #२


  नोव्हेंबर महिन्यातली थंडगार सकाळ होती. आनंद आणि दु:खाच्या हिंदोळयावर मी सकाळची कामं उरकत होते. आनंद यासाठी की वर्षभरानंतर दादाची भेट झाली होती. त्याच्या बिझनेस मीटिंग साठी तो जर्मनी मधे आला होता. पण मिटिंग फ्रैंकफर्टला असल्यामुळे तो एकच दिवस मुनिचला येऊ शकला म्हणुन थोडं दु:ख. आणि तो आत्ताच फ्रैंकफर्टला रवाना झाला होता.

 अचानक बेल वाजली. यावेळी कोण असेल हा विचार करतच मी दार उघडलं तर दारात मॅगी काकु(माझी जर्मन शेजारीण). आता ह्यांच काय काम असेल बुआ माझ्याकडे.. मनात विचार आला. सकाळच्या आठच्या ठोक्याला मॅगी काकु बॉलीवुड मधील अभिनेत्री सारख्या दिसत होत्या आणि मी....असो.

       मला धक्के देण्याचा चंगच बांधला होता बहुतेक काकुंनि. मी म्हटलं "कशा आहात काकु?" आणि मनात म्हणाले "सकाळी सकाळी काय काम काढलत?" तर काकु म्हणाल्या "काय सांगु बाई तुला, रात्रभर डोळयाला डोळा नाही माझा." मला वाटलं त्याना बरं नाहीये. मी काळजीच्या स्वरात विचारलं "तब्येत बरी नाही का काकु?"
काकु "अगं नाही तसं काही नाही. काल रात्री मला जरा विचित्र (विअर्ड) आवाज आले त्यामुळे झोपच नाही लागली शांत." 
मी "अगं बाई हो का? कशाचा आवाज होता हो काकु?" 
काकु "आणि तो आवाज कदाचित तुमच्याच घरातुन आला."
आता माझी टरकली(सटकली नाही). उगीच गाणं मनात आलं ना. 
मी साळसुदपणे "अच्छा असं होय."
काकु "अगं खरच आणि मला खुपच त्रास झालाय त्या आवजाचा. खरतर मी कम्पलेंटच करणार होते पण म्हटलं तुला एकदा विचारू."

    आता मात्र माझी पाचावर धारण बसली. देवाचे आभार मानले की नशीब या बाईने कम्पलेंट नाही केली आणि मनात म्हटलं "काय घोडं मारलं देव जाणे या बाईच मी मागच्या जन्मी?" बापुडवाणा चेहरा करत मी म्हणाले " कम्पलेंट न केल्याबद्दल शतश: आभार. पण नक्की कसा आवाज येत होता हो?" आता मनात चित्रविचित्र आवाजांचे विचार यायला लागले. नारायण धारपांच्या भीतिदायक कथा वाचल्याचा परिणाम. एकतर आधीच इथे स्मशान शांतता म्हणतात ना तशी शांतता असते. आजूबाजूला लोकं राहतात ह्यावर विश्वासच बसत नाही जोपर्यंत ते लोक प्रत्यक्ष तुम्हाला दिसत नाहीत. काकु विचार करत होत्या नक्की आवाज कसा ते आणि मी आपली भयकथा मधले आवाजांचे विचार करत होते. त्या विचारांसोबत बाकीही बारीकसारीक तपशील आठवायला लागले. मानेवरचे केस ताठ उभे करणारा गारवा, हाडे गोठवणारी थंडी वगैरे वगैरे.

       न रहावुन मी विचारलं "काकु सांगा ना कसा आवाज?" काकु तंद्रीतुन जाग्या होत म्हणाल्या "अगं दाराचा आवाज. तो नाही का दारात तेल न घातल्यावर येतो तसा." हे ऐकून हसावं की रडावं हेच कळेना. माझ्या घरातल्या दाराच्या आवाजाने दुसऱ्या घरातील माणसाची झोपमोड होऊ शकते हया गोष्टीवर विश्वास ठेवायला माझं भारतीय मन अजिबात तयार होइना. असा आवाज माझ्या अख्या खानदानाला कधीही दुसऱ्याच्या घरातुन आला नसता आणि झोपेत तर या जन्मी नक्कीच नाही. मी अति आत्मविश्वासाने म्हणाले " पण माझ्या घरातल्या कोणत्याच दाराचा आवाज येत नाहीये." आणि काकुंची जरा गंमत करावी म्हणून म्हणाले की "तुम्हाला वेळ लक्षात आहे का कधी आवाज आला ते?" डोक्यात दिल चाहता है चा सीन आला..सैफ त्या सुबोधला विचारतो तुम्हे टाइम याद है? तो सुबोध म्हणतो ऑफकोर्स याद है आणि सैफ छातीत चाकू मारायची एक्शन करतो. भन्नाट आहे तो सीन.

  तर काकुंच्या उत्तराने माझी अवस्था त्या सीन मधल्या सैफ सारखीच झाली. काकु म्हणाल्या "ऑफकोर्स वेळा लक्षात आहेत. मी लिहुनच ठेवल्या आहेत. रात्री 2:10 आणि पहाटे 6.25." मी कसनुसं हसले. मी विचार करायला लागले. आदल्या दिवशी दादाबरोबर आम्ही सगळे मस्त फिरलो होतो त्यात माझा दादा आलाय म्हणल्यावर आमच्या ह्यांनी त्याची खास (मुनिच मधील अमृतपान वगैरे) बडदास्त ठेवली होती. असो. त्यामुळे सगळे रात्री घोडे विकुन झोपले होतो. त्यात दादाची पहाटेची ट्रेन असल्यामुळे लवकर उठायच होतं.मग मला आठवलं की 2 च्या आसपास मीच उठले होते आणि पहाटे तर दादाची आवरायची गडबड चालू होती.

  तर मुद्दा होता की दाराचा आवाज. काकु फुल्ल कॉनफिडंट होत्या की माझाच घरातल्या दाराचाच आवाज होता तो. त्या म्हणाल्या "जरा तु तुमचे दारं चेक करते का?" मी "हो हो करते आणि तुम्हाला सांगेन हो." काकु "लगेच माझासमोर कर." मी मनात "हे भगवान बचाले." मग मी मेन डोअर चेक केलं. त्याचा आवाज नव्हता. मग बाथरूमचं डोअर. त्याचाही आवाज नव्हता. हॉल आणि मेन डोअर ला जोडणाऱ्या पॅसेजचा दरवाजा हलवला तर त्याने कुँई... केलं. आणि मनात म्हणाले "अरे लबाडा तु आहेस होय." तर काकुंच्या चेहऱ्यावर विजयी हास्य आणि त्या चित्कारल्या " हाच तो आवाज. हयानेच मला जाग आली." मी पुन्हा बापुडवाणा चेहरा केला आणि त्यांची माफी मागितली.खरच या जन्मात हा आवाज मला झोपेत आला नसता आणि या बाईला तिच्या घरात आला. तसा जागेपणीही तो आवाज आम्हाला कोणालाच आला नव्हता ती गोष्ट वेगळी.

  मी लगेच खोबरेल तेलाची बाटली घेतली आणि दाराच्या बिजागऱ्यामधे तेल ओतलं. मी जे केलं त्याचा प्रचंड धक्का काकुना बसला असावा. त्या काय अडाणी आहे ही असे भाव चेहऱ्यावर आणून अविश्वासाने म्हणाल्या " अगं हे तेल नसतं गं. स्पेशल असतं ते. तुला आणव लागेल."
"अहो तुम्ही बघाच दरवाजा अजिबात वाजणार नाही ह्या तेलाने. आम्ही भारतीय लोक बऱ्याच गोष्टिना हेच तेल वापरतो." नाही तिथे भारतीय असल्याचा अभिमान दाखवत मी म्हणाले. आणि दरवाजा हलवुन दाखवला त्याना. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघुन मी सुटकेचा निश्वास सोडला.
काकुना म्हणाले की यापुढे कोणतेही आवाज आले किंवा काहीही प्रॉब्लेम आला तर कृपया मला आधी सांगा. लगेच कम्पलेंट करु नका हो. (गरीब की दुआ मिलेगी). आणि काकु मला बाय म्हणुन त्यांच्या घरात गेल्या.
ह्या प्रसंगानंतर आम्ही तिघेही डोळयात तेल घालुन आणि कानाला खडा लावून सगळ्या आवाजांवर लक्ष ठेवत असतो. आणि काकु दिसल्या की मी तिथून पटकन पळ काढते न जाणो अजुन काहीतरी काढून माझी वाट लावायच्या.

"तरी बरं काकुना मराठी कळत नाही. नाहीतर...."

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

वाचकांना आवडलेले काही