मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

थांबला तो संपला

   मागील आठवड्यातील मुंबईची घटना वाचून मन विषण्ण झालं अगदी. त्या सगळ्या निरपराध लोकांची काहीही चूक नसताना त्याना हकनाक जीव गमवावा लागला. त्यांच्या आप्तस्वकीयांना ह्या दुःखाशी लढण्याचे बळ मिळो.  

   मुंबई!  ह्या शहराबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात सुप्त आकर्षण असतंच बहुतेक. म्हणूनच मायानगरी म्हणत असतील कदाचित. बॉलीवूड, क्रिकेट, स्टॉक मार्केट,लोकल,पाऊस,आणि अजुनही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे मुंबई सतत चर्चेत असते. लोकल वरून माझ्या आयुष्यातले दोन खूपच थरारक (माझ्यासाठी तरी) अनुभव आठवले. 


  मी ग्रॅजुएशनला असतानाची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये असताना आपण स्वतःला फारच पराक्रमी समजत असतो. ओव्हरकॉन्फिडन्स कशाशी खातात हेही चांगलच माहिती असतं. प्रत्येक गोष्टीत आपल्यालाच कसं कळतं आणि आपलंच कसं बरोबर आहे हेच वाटत असतं. पार आकाशाला गवसणी घालायची असते. हो ना! पण लग्न झाल्यावर आकाशाला गवसणी घालायला निघालेलं आपलं विमान बरोबर जमिनीवर येतं. 

   
   तर तेव्हा माझा दादा बोरिवलीला रहात होता. मी आणि आई माझ्या सुट्यांमध्ये पहिल्यांदाच मुंबईला गेलो. मुंबईमध्ये फिरायचं म्हटल्यावर लोकलमध्ये जाणं अनिवार्य आहे. दादा आणि वहिनी दोघेही जॉब करत असल्यामुळे मी आणि आईच सगळीकडे फिरत होतो. त्यादिवशी खरेदीला दादरला जायचा ठरवलं आम्ही. दादाने गर्दीच्या वेळा टाळून जा असं सांगून ठेवलं होतं. आम्ही दोघी दुपारी जेवण करून निघालो. तेव्हा फारशी गर्दी नव्हती लोकलला. दादरला शॉपिंग केलं आणि बरच फिरलो. त्यामुळे वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि जेव्हा परत जाण्यासाठी दादर स्टेशनला आलो तेव्हा तिथली गर्दी पाहुन घाबरायलाच झालं. गर्दीमुळे एक लोकल आम्ही सोडून दिली, पुढच्या लोकलमध्ये जाऊ असा विचार केला. पण कशाचं काय गर्दी तशीच.मग धीर करून पुढच्या लोकलमधल्या लेडीज डब्यात मी चढले. चढले म्हणजे गर्दीनेच मला चढवले. तशी मी दाराजवळच होते, मागे वळून पाहिलं तर आई दिसलीच नाही मला. एकदम पोटात गोळा आला, मला वाटलं आई चढताना पडली कि काय. गर्दीतून बाहेर डोकवायचा प्रयत्न केला तर बाहेरही आई कुठे दिसत नव्हती. एव्हाना लोकल हळुहळु निघत होती. लोकलने वेग घ्यायला सुरुवात केली आणि मी मागचापुढचा कोणताही विचार न करता बाहेर उडी मारली. लोकल वेग घेत असल्यामुळे मी जोरात प्लॅटफॉर्मवर पडले. आजुबाजूचे लोक धावत आले. आई पण तिथेच होती. तिला गर्दीमुळे चढताच आलं नव्हतं. खूप लागलं होतं पण आई सुरक्षित असल्याचं पाहुन बरं वाटलं. पण तिथले लोक खूपच रागवले मला. साहजिकच आहे, प्लॅटफॉर्मवर न पडता मी लोकलखाली गेले असते तर!! बापरे विचार करूनच जीवाचा थरकाप उडतो. नशीब बलवत्तर म्हणून ह्या मंदपणे केलेल्या चुकीतून वाचले मी. घरी गेल्यावर दादा वहिनीचे पण बोलणे खाल्ले. दादा म्हणाला उद्यापासून एकटीच फिर आता लोकलने म्हणजे जरा अक्कल येईल. नंतरही बरेच दिवस ह्या विषयावर सगळ्यांनी खूपच बोलुबोलू घेतलं मला. आणि मीही गपगुमान ऐकून घेतलं. 

  ह्या भयानक अनुभवाच्या २ वर्षानंतरची गोष्ट आहे. तेव्हा दादा US ला गेलेला होता. माझ्या एका मैत्रिणीची मावशी मुंबईत असते. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी जीवाची मुंबई करायला औरंगाबादहून प्रस्थान केलं. गर्दीच्या वेळा टाळूनच आम्ही फिरत होतो आणि बरोबर मैत्रिणीचे मावस भाऊ होते त्यामुळे फार त्रास झाला नाही कुठे. पण एकदा संध्याकाळी थोडा उशीरच झाला दादरला. तिथून आम्हाला विरार ट्रेन पकडायची होती. काय प्रचंड गर्दी असते त्या ट्रेनला. आधीच मला असलेल्या गर्दीच्या अनुभवाने मी थोडी घाबरलेलीच होते. मला लोकलमध्ये जायचीच इच्छा होत नव्हती पण दुसरा पर्यायही नव्हता. आम्ही सगळे ७-८ जणं होतो. एक ट्रेन आली. आम्ही सगळे आत जायचा प्रयत्न करत होतो. माझ्या मागच्या अनुभवामुळे मी भीत होते आणि त्यामुळे मी जरा मागे पडले तोवर सगळे आत गेले. मला जागाच मिळेना. त्यात आजुबाजूचे काही फालतू लोक गर्दीचा फायदा घेऊन गलिच्छ स्पर्श करत होते म्हणून मी थांबायचं ठरवलं. मला सोडून सगळेजण आत चढले आणि ट्रेन सुरु झाली. माझी एक जिवलग मैत्रीण लोकलच्या दाराजवळच होती आणि तिने मागे वळून पहिले. तिला मी प्लॅटफॉर्मवर एकटीच राहिले हे कळलं आणि लोकल वेग घेत असतानाच त्या पठ्ठीने कोणताही विचार न करता माझ्यासाठी लोकलमधून ऊडी मारली. माझा काळजात चर्रर्र झालं. खरंच आमच्या दोघींचं नशीब चांगलं म्हणून तीही प्लॅटफॉर्मवरच पडली. दुसरा विचार स्वप्नातही करू शकत नाही मी. तिलाही खूप लागलं. आजूबाजूचे लोक खूप रागवले आम्हाला. पण आम्ही मात्र एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होतो. काहीच सुचत नव्हतं. मी तिला म्हणाले अगं मी आले असते ग पुढच्या ट्रेननी. तर ती म्हणते तुला एकटी कशी सोडून जाऊ गं इथे. बाकी सगळे पुढे निघून गेलेले, तेव्हा काही मोबाइल पण नव्हता आमच्याकडे. आम्ही आपल्या बावळटसारख्या तिथेच थाम्बलो कारण काही सुचतच नव्हतं. मग मैत्रिणीचा मावसभाऊ पुढच्या स्टेशनला उतरून आम्हाला घ्यायला आला. त्याने शांतपणे आम्हाला लेडीज डब्यात चढवलं आणि आम्ही एकदाच्या घरी पोहोचलो. माझ्या मैत्रिणीचा पराक्रम ऐकून पुन्हा आम्ही खूप बोलणे खाल्ले. पण मैत्री खरंच काय असते ना! आयुष्य समृद्ध करणारी गोष्ट.


   मुंबईत राहून दोन गोष्टी चांगल्याच कळाल्या, एक म्हणजे  "थांबला तो संपला" आणि दुसरी आपल्या प्रिय गब्बरसिंगने सांगितलेली " जो डर गया समझो वो मर गया."


ता. क. : हे वाचून मुंबईचे लोक मला वेड्यात काढतील हे माहित असूनही लिहायचं धाडस केलं!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                   #mumbaidiaries


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही