शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

बकरा

सर्दी झाली म्हणून तुम्ही जवळच असलेल्या नेहमीच्या क्लीनिकमध्ये जाण्याचं ठरवता. तुम्हाला चक्क दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट मिळते, चमत्कारच म्हणायचा!!

अपॉइंटमेंट रात्री ५:४५ ची असते. हो ह्या दिवसात इथे ५ वाजताच गुडूप अंधार पडतो. तर, तुम्ही भयानक थंडीत कुडकुडत क्लीनिकमध्ये पोहोचता. तिथे पोहोचताच तुमच्या लक्षात येतं की ह्या लोकांची क्लीनिक बंद करायची तयारी चालु आहे. पेंगुळलेली रिसेप्शनिस्ट तुम्हाला बघातच आनंदी होते! तिचा आनंद बघून तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते! हो ना, गेल्या कित्येक वर्षात तिच्या चेहऱ्यावर तुम्ही साधं स्मितहास्यही पाहिलेलं नसतं! 

ती तुमच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात करते..  कोरोना लस घेतली आहे का? कधी घेतलीये? दुसरा डोस कधी घेतला होता? तुम्ही मनातच “अगं जरा दम खा की बया!!” तुम्ही तिला सगळं व्यवस्थीत सांगता की लसीकरण झालंय, दुसरा डोस जूनमध्ये कधीतरी घेतलाय वगैरे वगैरे!

तुमची उत्तरं ऐकताच तिचे डोळे चमकतात जसं काही तिला बकरा सापडलाय आणि ते बघून तुमची खात्री पटते की दाल में कुछ काला है! ती तुम्हाला चमकत्या डोळ्यांनी विचारते “बुस्टर डोस घेणार का? तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. आपण लगेच देऊ!“ 

“अगं लबाड, असं आहे तर! किती गोड गोड वागतेस गं. अर्रे काय खवा आहे का? बूस्टर घेते का म्हणे? काय मनाची तयारी असते का नाही? आलं क्लीनिकमध्ये की घ्या लस, असं असतंय का कुठं? आणि काय गं सटवे, ६-८ महिन्यांपूर्वी पहिल्या डोससाठी मी जेव्हा तुमच्या क्लीनिकचे उंबरे झिजवत होते तेव्हा तु मला हिंग लावुन विचारत नव्हतीस ते, हं! बुस्टर घे म्हणे, हरबरी मेली!” मनातच हं!!

तेवढ्यात डॉक्टर ताई येऊन तुम्हाला केबिनमध्ये घेऊन जातात. हो, इथे डॉक्टर स्वतः बाहेर येऊन पेशंटला बोलवतात! केबिनमध्ये गेल्यावर नुसती सर्दी झालीये तरी डॉक्टर ताई तुम्हाला अमुक  तपासणी करून घे, तमुक तपासणी करून घे सांगतात आणि लगोलग त्या तपासण्यांसाठी तुमच्या हातातून भसाभसा तीन ट्यूब रक्त काढतात! यन्टमसारखं प्रत्येक तपासणीसाठी भसकन वेगळं रक्त! उद्या १०-१५ तपासण्यांसाठी बाटलीभर रक्त काढतील!!

मग डॉक्टर ताई तुम्हाला रिग्ग्यात घेतात. पुन्हा तेच सवाल जवाब. 

डॉ: कोरोना लस घेतली का? 

मी: हो 

डॉ: किती डोस झाले?

मी: दोन 

डॉ: दुसरा कधी झाला?

मी: जूनमध्ये कधीतरी!

डॉ: आता आलीच आहेस तर बूस्टर डोस घेऊनच टाक. 

मी: (अर्रे काय संक्रांतीचं हळदीकुंकू आणि वाण आहे का ते की आलीच आहेस तर घेऊन जा!) आज नको, मी येते ना नंतर!

डॉ: आता कुठे नंतर येते, पुन्हा क्रिसमसच्या सुट्या सुरु होतील. आता घेऊनच टाक. 

मी: (मुझे बक्ष दो आज) नाही पण मी ते वॅक्सीन पासबुक नाही आणलं!

डॉ: पुढच्या वेळी आलीस की अपडेट करू ते, काही होत नसतंय!

मी: (नका हो नका डॉक्टर असा आग्रह करू.. लस आहे ती.. पाणिपुरीची प्लेट नाही!)  मला माझ्या दुसऱ्या डोसची नक्की तारीखच आठवत नाहीये ना. 

डॉ: अगं पाच महिन्यानंतर चालतंय बूस्टर घ्यायला, काही होत नसतंय!

मी: (हे भगवान..) मी मागचे दोन डोस ऍस्ट्राचे घेतले आहेत ना, आता हे बियॉंटेक कसं चालेल?

डॉ: अगं चालतंय चालतंय, काही होत नसतंय!

मी: (नहीं ये नहीं हो सकता!) पण मी येते ना नंतर.

डॉ: अगं घेऊनच जा आता, मी बाहेर रिसेप्शनला सांगते. जरा हात दुखेल, ताप येईल, थकवा येईल, बरं का!! 

मी: (अन म्हणे काही होत नसतंय) हं!

तुम्हाला वाटतं आता बाहेरून ३-४ लोक येऊन तुम्हाला उचलुन नेतील आणि बळजबरी लस देतील कारण आता तेव्हढंच बाकी राहिलेलं असतं! साधी अपॉइंटमेंट मिळायला मारामार असलेल्या ह्या क्लीनिकमध्ये चक्क तुम्हाला लस घेण्यासाठी आग्रह होतोय! बस यही दिन देखना बाकी था! 

शेवटी तुम्ही विचार करता की आज ना उद्या बूस्टर डोस घ्यावा लागणारच आहे तर ह्यांच्या आग्रहाला मान देऊन घेऊनच टाकु. हाय काय अन नाय काय! तुम्ही “हो” म्हणताच डॉक्टर ताई आणि रिसेप्शनिस्ट ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. त्यांनी तुम्हांला बकरा बनवलेलंच असतं! 

पटापटा तिथली एक नर्स तुमच्या भसाभसा रक्त काढलेल्या हाताच्या दंडाला लस टोचते आणि हसतमुख चेहऱ्याने तुम्हाला सही करायला एक फॉर्म आणून देते ज्यावर लिहिलेलं असतं की “मी माझ्या इच्छेने लस घेत आहे!” 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्युनिक_डायरी 


बुधवार, १ डिसेंबर, २०२१

भयकथा

गेले आठ दिवस मला फक्त कोल्हेकुई, दारांचं करकरणे,कोणाच्या तरी चालण्याचा आवाज, कोणाच्या तरी भयव्याकुळ किंकाळ्या, कुठेतरी कोणीतरी खुसफूस करतंय, हे आणि असेच भयानक आवाज येत आहेत. घरात सतत कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेऊन आहे असं वाटतंय. 

रात्री डोळ्याला डोळा नाही. चित्रविचित्र स्वप्न पडत आहेत. अचानक घाबरून उठतेय मी. लहानपणापासून पाहिलेल्या प्रत्येक भयपटाची आठवण येते आहे. सतत भयंकर पार्श्वसंगीत ऐकू येतंय. 

बरेच वर्ष झाले हे असे आवाज आले नव्हते खरं. पण गेल्या आठ दिवसांपासून अक्षरशः रोज संध्याकाळपासून सुरु होणारे हे भयपटाचं पार्श्वसंगीत रात्री झोपेपर्यंत माझ्या मागावर असल्यासारखं सतत चालू आहे. 

रामसे बंधू पासून राम गोपाल वर्मा पर्यंतच्या आणि “रात” सिनेमातल्या रेवती पासून ते तात्या विंचू पर्यंत प्रत्येकाची आठवण काढून झाली. बाबो, पण “रात” बघून खरंच यन्टमसारखी फाटली होती तेव्हा, काहीही म्हणा! नारायण धारप व रत्नाकर मतकरींची आतापर्यंत वाचलेली प्रत्येक कादंबरी डोळ्यासमोर आली आणि डोळ्यांसमोर काजवे चमकले!! 

मग म्हणलं फार झालं च्यामारी.. झोपेचं खोबरं झालंय.. डोक्याला शांतता म्हणुन नाहीये.. काय लावलीये सतत कोल्हेकुई, दारं करकरणे, पायांचा आवाज!! 

शेवटी नवटीनेजरला विचारलंच मी.. अरे मेरे लाल, कधी सबमीट करायचा आहे तुझा हॉरर म्युझिक पीसचा प्रोजेक्ट तुला?? इथं माझी भीतीने गाळण उडतीये रोजची. तर म्हणाला “ आई चिल, करतोय मी उद्या प्रेझेंट!” चिल म्हणे, ईथे थंडीने जीव घेतलाय आणि अजुन कुठे चिल करू?  नाही नाही.. #सापळा नाही आलाय परत खिडकीत. 

तर पॉईंटचा मुद्दा असा आहे की चिरंजीवांना त्यांच्या संगीत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिलाय की भयपटातील एखादा प्रसंग लिहुन  त्यासाठी स्वतः म्युझिक पीस तयार करून ते वर्गात प्रेझेंट करा! 

बरं, सारखं आपलं “आई, हे कसं वाटतंय? ऐक, ते कसं वाटतंय? ऐक!” त्याला म्हणलं “अरे बाबाला घाबरव की थोडं!“ पण त्याला चांगलंच माहीत आहे की हे होम ऑफिसवाले त्यांच्या कामामुळेच ईतके वैतागलेले असतात की भुतंखेतं आले तरी ते त्यांना मीटिंगला बसवतील त्यामुळे तेही टरकून असतील! 

पोरगं शाळेतून आलं की जे जोरजोरात हॉरर म्युझिक वाजवत बसतंय की बस्स! तरी बरं हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे दारं खिडक्या गच्च बंद असतात नाहीतर आठ दिवसांपासून चाललेलं हे भयसंगीत मॅगी काकूंनी ऐकलं असतं तर आम्हाला आजच घर सोडावं लागलं असतं! 

कारण माझ्यासाठी मॅगी काकू म्हणजे नेहमीच “भय इथले संपत नाही!“ 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्युनिक_डायरी

वाचकांना आवडलेले काही