गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

रंग दे

आज जर्मन टीव्हीवर एक जाहिरात पहिली आणि भुवयांचे केस उभे राहायचे बाकी राहिले होते!

म्हणलं चला आता मी डोळे मिटायला...

च्यामारी त्यासाठी आपण कशाला डोळे मिटायचे? 

मग म्हणलं चला आता मी फेसबुक सोडायला मोकळी... 

पण मग विचार केला कि लोकांनी भुवया रंगवायचा रंग बनवून, त्याची जाहिरात तयार करून, टीव्हीवर लोकांना दाखवली तर फेसबुकवर होणारं फुकटचं मनोरंजन कशाला सोडायचं? नाही का? 

हो, भुवयांना रंगवायचा रंग निघालाय म्हणे! आणि तो इथे आता सणावाराला लावतील म्हणे. अन मग त्यांचे चेहेरे कसे दिसतील म्हणे? 

पण मग भुवया आणि केसांचा रंग जुळलाच नाही तर? म्हणजे बघा हं, केसांना चुकून वेगळा रंग आणि भुवयांना वेगळा दिला गेला तर? कसं दिसल ते ध्यान? किंवा भुवयांना रंग देता देता तो गालाला लागला तर? करावं तरी काय माणसानं? अरे काय चाललंय काय? 

आता मी हे सगळं लिहिलं कि हे मंद फेबु मला अश्याच भयाण जाहिराती दाखवेल! आज भुवयांच्या रंग, उद्या पापण्यांचा रंग, परवा दाताचा रंग, तेरवा अजुन कशाचा तरी रंग... 

अर्रर्रर्र नकोच ते! फेबु सोडावंच कि काय? फेबुचं म्हणजे कसं आहे ना.. एखाद्या जाहिरातीवर चुकून एखाद दोन सेकंद रेंगाळलं तर जे भडीमार सुरु होतो कि बास. यंटमपणा नुसता. म्हणजे एखाद्याने बघितली चुकून रद्दीची जाहिरात तर त्याला काय सतत रद्दी  दाखवायची? किती तो झेंडुपणा! 

ह्या फेबुपायी एक दिवस ना.... 

एकंदर काय तर भुवया रंगवायचा रंग पाहून असे काहीबाही विचार येत आहेत. ते असो. बाकी अश्याच नवनविन जाहिरातींच्या माहितीसाठी वाचत रहा फेबु माझा! 

#फेबु_नको_पण_जाहिराती_आवरा 


#माझी_म्युनिक_डायरी

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

हक्काचा जुगाड

आज दुपारी पोळ्या करायच्या म्हणुन डब्यातून कणिक काढायला कपाटाचं दार उघडलं अन पोळ्या लाटायचा अमंळ कंटाळाच आला. किराणा सामानात मागवलेल्या हक्का नूडल्सकडे लक्ष गेलं अन आला पोळ्या लाटायचा कंटाळा! जे आहे ते असं आहे. 

इतके दिवस ते हक्का नूडल्स फारच कोरडे होतात म्हणुन त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं होत पण आज म्हणलं इनका कुछ ना कुछ तो कराना पडेगा. तसं आज सोपा सोपा पिठलं पोळीचा बेत करणार होते पण आता हक्का नुडल्सनी हक्काने हाक मारल्यावर मी माझा हक्क.. हट्ट सोडला! 

पण मग नूडल्स कोरडे तर खायचे नव्हते म्हणुन ह्यांना म्हणाले शेंगुळे करतात तशी पाण्याला फोडणी देते खमंग आणि त्यात नूडल्स टाकते तर "काय??" असा आश्चर्यमिश्रित प्रश्न आला. शेंगुळे म्हणजे नूडल्सच कि हो. पण नाही, माझ्या सर्जशीलतेवर विश्वासच नाही मुळी. कसा असेल विश्वास म्हणा;  इतक्या वर्षांपासुन माझ्या हातचं जेवतोय! ते असोच. 

इथं विषय नूडल्सचा चालु होता आणि उगीचच मला चिडवायला म्हणे आज तुझ्या त्या साऊथ कोरियाची फुटबॉल मॅच आहे. मी अधुनमधुन कोरियन सिरीज बघत असते म्हणुन माझं साऊथ कोरिया! कोरिया वरून कोरियन सिरीज आणि त्यावरुन त्या सिरीजमध्ये दिसणारे त्यांचे अन्नपदार्थ! माझी गाडी तिथपर्यंत कधी पोहोचली माझं मलाच कळलं नाही. खरोखर त्यांच्या सिरीजमध्ये दिसणारे त्यांचे अस्सल पारंपारिक पदार्थ पाहुन छान वाटतं; त्यांची खाद्यसंस्कृती ते चांगल्या प्रकारे जगासमोर आणत आहेत. विषय भरकटतोय. कोरियन सिरीजविषयी पुन्हा कधी तरी. 

तर, मी लगेच जाहीर केलं "आता ठरलं, मी हक्का नुडल्स वापरुन कोरियन पाककृती करणार!" असं म्हंटल खरं पण सगळं साहित्य आणणार कुठून आयत्या वेळेला? म्हणुन मग मी पुढची घोषणा केली कि "मी चायनीज जिन्नस वापरुन कोरियन नूडल्स करणार!" तर ह्यांचं लगेच "घरात जर्मन पदार्थांचं साहित्यही असेल, तेही वापर बरंका!!" टोमणे कळतात हो!! पुढे वाद वाढवायची खुमखुमी आली होती कि "जर्मन साहित्य ना.. वापरते ना.. म्हणजे काय वापरणारच .. किंबहुना वापरलेच म्हणून समज .." पण वेळेअभावी ती पुढे ढकलली. 

ह्या सगळ्या भारतीय, कोरियन, चायनीज आणि जर्मन साहित्य आणि पदार्थांमुळे भंजाळले ना मी! पण पोटात कावळे कोकलायला लागल्यावर पटकन घरत ज्या काही २-४ भाज्या होत्या; गाजर, ब्रोकोली, झुकिनी आणि कांदा, त्या मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या. तोपर्यंत पॅन छान तापलं होतं. त्यात थोड्या तेलावर ह्या सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर छान परतून घेतल्या. भाज्या अश्या परतायच्या कि त्यांचा करकरीतपण टिकुन राहिला पाहिजे. भाज्या बाजूला काढुन त्याच पॅनमध्ये थोड्या तेलात हिरवी मिरची आणि लसणाचा खर्डा, बारीक चिरलेलं आलं परतलं. त्यात पाणी, थोडा सोया आणि शेजवान सॉस घातला. मीठ चवीपुरतं. पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात हक्का नुडल्स टाकले. नुडल्स छान शिजत आले कि गॅस बंद. तर अश्या रितीने हा चारदेशीय साहित्यातला जुगाडू पदार्थ तयार झालेला असतो. 

त्यानंतर अजिबात वेळ न दवडता एका बोलमध्ये मस्त नुडल्स, भरपुर सुप आणि त्यावर परतलेल्या भाज्या घेऊन, खिडकीतुन बर्फाच्छादित आल्प्सकडे बघत गरम गरम ओरपायचे! बाकी त्याची चव नक्की कोणत्या देशातल्या पदार्थाची लागतीये ह्याचा फार विचार नाही करायचा. तसंही इथल्या कडाक्याच्या थंडीत असे हे झणझणीत गरम गरम पदार्थ चवदारच लागतात!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्युनिक_डायरी 







रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

मनोरंजन

ईथल्या मेट्रोमध्ये फिरताना माझं मनोरंजन झालं नाही असं क्वचितच होतं. आता आजचंच बघा ना!

ट्रेनमध्ये बसत नाही तोच धाड घालायला आल्यासारखं ७-८ लोकांचं टोळकं तिकीट चेक करायला आलं. माझ्या काटकोनातल्या सीटवर एक जोडपं त्यांच्या श्वानावर प्रेमाचा वर्षाव करत होतं. काकुंनी मास्क लावलेला नव्हता. 

एक तिकिटाचेकर काकु त्यांच्याजवळ आल्या आणि मानभावीपणे म्हणाल्या “तिकीट दाखवा, मास्क लावा आणि जरा तुमच्या कुत्र्याला आवरा!” 

कुत्र्याला आवरा!! जर्मन असुन हि भाषा? मी तर बुचकळ्यातच पडले. इथल्या लोकांचं श्वानप्रेम पुर्ण ब्रम्हांडात प्रसिद्ध आहे! 

ते वाक्य ऐकून मास्क न लावलेल्या काकुंच्या डोक्यात तिडीक गेली बहुदा. त्यांनी जे सुरु केलं “कुत्र्याला यावर काय? हं? अंगावर आला का तुमच्या कि चावा घेतला तुमचा? फिरतोय जरा इकडे तिकडे तर काय अडचण आहे तुम्हाला? आणि मास्कचं म्हणाल तर आताच आले मी ट्रेनमध्ये लावते ना. एवढी काय घाई आहे? मला कोरोना आहे का? हं? हे घ्या तिकीट. करा एकदाचं चेक!“

हे ऐकुन तिकीर चेकर काकुंचा पारा चढला, त्या तिरीमिरीत म्हणाल्या “तुमच्या नवऱ्याने मास्क लावलाय अन तुम्ही तश्याच फिरताय मेट्रोमध्ये. तुमच्या कुत्र्यामुळे लोकांना त्रास होतोय त्याचं काय? तिकीटही उद्या संपतय तुमचं! बेजाबदार नागरीक नुसते!“

माझं आपलं घेणं ना देणं अन फुकटचं कंदिल लावणं “हं असंच पाहिजे!“

तिकीट चेकर काकूंचं बोलणं ऐकुन श्वानप्रेमी काकु चवताळल्या “हि मेट्रो आहे तुमचं घर नाहीये. मला तुम्ही शिकवायची गरज नाहीये सांगुन त्ये ठेवते. माझं श्वान आहे ते, कुत्रं नाही! तिकिटं बघितले ना आमचे तुम्ही, निघा आता!“ 

तिकिटचेकर काकु रागाने थरथरत होत्या. त्या चिडुन म्हणाल्या “हो हो चालले आहे. तुमच्यासारख्या बेजबाबदार बाईशी बोलायची माझीही ईच्छा नाहीच्चे!” एव्हाना श्वानप्रेमी काकुंचं श्वानहि गुरगुरायला लागलं होतं. 

मला वाटलं आता बाचाबाची, हाणामारी, झिंज्या उपटणे इत्यादी ह्याची देही ह्याची डोळा म्युनिकमधल्या बायकांचं बघायला मिळेल पण.... 

श्वानप्रेमी काकुंच्या नवऱ्याने त्यांना आणि तिकिटाचेकर काकूंच्या टोळक्याने त्यांना आवरल्यामुळे पुढच्या मनोरंजनास मी मुकले!


#माझी_म्युनिक_डायरी

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

कोळी

इथले वर्तमानपत्र वाचल्यावर आपल्याकडचा संध्यानंद वाचल्यासारखा वाटतो कधी कधी. मागे #कोंबडा होता आणि आज काय तर म्हणे #कोळी! 

इथल्या लोकांना कुत्रे मांजरी सोडुन दुसरे प्राणी माहीतच नाहीयेत बहुतेक. आपल्याला जसं लहानपणापासुन घरात पाली, कोळी, लहानसहान किडे बघायची सवय आहे तसं इथं फक्त कुत्रे मांजरी बघुन मोठे होतात वाटतं मुलं!

तर बातमी अशी आहे कि एका काकुंनी म्हणे कारमध्ये कोळी घुसल्याच्या शंकेवरून पोलिसांना बोलावलं! इथे साधारणपणे  कोणी शेजाऱ्यांच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून, तर कोणी चोरांच्या भीतीने पोलिसांना बोलवतात, पण कोळी दिसला म्हणुन पोलिस? अरे कुठे नेऊन ठेवलीये पाल?

तर, त्या काकूंना  वाटलं कि एक मोठ्ठाच्या मोठ्ठा कोळी त्यांच्या कारमध्ये आलाय जेणेकरून त्यांना कार चालवणं शक्यच झालं नाही. का? तर त्यांना कोळी भयाने ग्रासलेलं होतं म्हणे! कोळीमाणुस नावाचा चित्रपट कसा बघितला असेल मग काकूंनी? स्पायडरमॅन हो!

पोलिसांनी पण डोक्यावर पडल्यागत मोठठया कोळ्याला पकडायला मोठ्ठ सर्च ऑपरेशन लॉंच केलं म्हणे. एवढं करून कोळी सापडला नाहीच. कोहळ्याचा नावाखाली आवळाही मिळाला नाही! मला प्रश्न पडायचाच कि इथले पोलिस नक्की काय काम करतात!

बरं अश्या टरकेश्वर लोकांची संख्या बरीच असावी कारण ह्यापुर्वीही घरात, बाथरूम मध्ये कोळी आहे म्हणुन लोकांनी पोलिसांना बोलावलं आहे म्हणे! उद्या ह्यांना पाल दिसली तर घरातल्या भिंतीवर मगर आहे म्हणुन पोलिसांना बोलावतील कदाचित. 

मलाही खिडकीच्या काचेवर मोठे डास दिसतात, मधमाशी, लेडीबग्ज, भुंगे, माश्या थेट घरात येतात तर पोलिसांना बोलावुन बघुच म्हणलं एकदा! हाय काय अन नाय काय. 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


#माझी_म्युनिक_डायरी 

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

आग्रह

आज काही कामानिमित्त शहरापासुन थोडं लांब जावं लागलं. तिथलं काम आटपुन परत जवळच्या बस थांब्यावर आले. शेवटचा बस थांबा असल्यामुळे बस उभीच होती. आत जाऊन बसले तर चिटपाखरू नव्हतं, ना बस मध्ये ना बाहेर!

मला वाटलं चालक दादा गेले सुट्टा मारायला. पण नाही.. दादा बस पुसत होते. बस निघायला साधारण ५-७ मिनिट बाकी होते, तेवढ्यात चालक दादांनी पटापट बस पुसली, आत येऊन झाडुन काढायला लागले. 

मी बसले होते तिथे येऊन म्हणाले “जरा पाय बाजुला घेता का? मी स्वच्छ करून घेतो.” मी म्हणलं माफ करा मी बाहेर जाते. तर म्हणाले “नाही हो बसा. फार काही कचरा नाहीये पण मी आपला स्वच्छ करत असतो ह्या थांब्यावर. जरा वेळ मिळतो!“ मला अश्या लोकांचं फार कौतुक वाटतं! 

तेवढ्यात एक सत्तरीतल्या काकु बसमध्ये चढल्या. रोजची ठरलेली बस असावी बहुदा त्यांची कारण चालक दादा आणि त्यांनी एकमेकांना नमस्कार वगैरे केला! इथे नमस्कार करत नाहीत पण तत्समच काहीतरी म्हणतात एकमेकांना. 

चालक दादाची झाडझुड झाली आणि ते काकुंना म्हणाले “आज पण मास्क घरीच विसरल्या वाटतं?” त्या कसनुसं हसत हो म्हणाल्या. दादानी पटकन केबिनमधुन मास्कचा बॉक्स आणला आणि एक मास्क काकुंना दिला. 

नंतर माझ्याजवळ बॉक्स आणुन म्हणाले “घ्या एक मास्क!” मी सर्जिकल मास्क लावला होता म्हणुन म्हणाले “नको, मी लावलाय कि मास्क!“

तर, दादा “अहो घ्या हो. काही होत नाही!”

मी “अहो पण दादा आहे कि मास्क मी लावलेला अजुन कशाला?”

दादा “अहो, हा N95 आहे. तुम्ही लावलाय तसा नाहीये. घ्या!”

मी मनातच “अरेच्या! बसमध्ये इन मिन तीन माणसं, त्यात कोरोना आहे कि नाही अशी शंका यावी, असं वातावरण! जर्मन सरकारने बस आणि मेट्रोमध्ये मास्कसक्ती लागु केलेली असली तरी मास्कचा आग्रह? तेही एक मास्क लावलेला असताना? भैय्या आप ठीक तो हो ना? मास्कचा आग्रह कुणी करतं का दादा?“

मागे ऑगस्टमध्ये छ. संभाजीनगरमध्ये जेव्हा पार सराफा, पानदरिब्यापासून ते गुलमंडी, औरंगपूरा ते समर्थनगर पर्यंत मी मास्क लावुन फिरत होते तेव्हा लोक माझ्याकडे मी परग्रहवासी असल्यासारखं बघत होते आणि इथे हा दादा मला मास्कचा आग्रह करतोय! डोळेच भरून आले हो. असो. 

तर, दादाने फारच आग्रह केल्यामुळे शेवटी घेतला एक मास्क मी!इतका आग्रह केल्यावर त्याच्या आग्रहाला मान द्यायला नको का? आधीच म्युनिकमध्ये कोणी कशाचा आग्रह करत नाही. दादा एवढा मास्कचा आग्रह करतोच आहे तर घ्यावा म्हणलं एक मास्क मा बा का जा?

मास्क बघितला तर बदकतोंड्या होता! मी पटकन म्हणाले अरे हा तर बदकतोंड्या मास्क.. अजितदादा वापरतात कि... अगदी तस्साच! पण दादाला मराठी कळत नसल्यामुळे ते काही न बोलता बस चालवायला निघुन गेले! 

आता अजितदादा कोण ते विचारू नका, आपलं लिखाण #अराजकीय असतंय बरं का! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


#माझी_म्युनिक_डायरी

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

कोंबडा

आज जी बातमी वाचली ती वाचुन बरेच लोक चक्रावुन जाऊ शकतात पण मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाहीये. कारण मी सात वर्ष मॅगी काकुंच्या शेजारी राहिलेली आहे!

तर बातमी अशी आहे कि एका बाईच्या तक्रारीमुळे, एका कोंबड्याला, कोर्टाच्या आदेशावरून साउंडप्रुफ (मराठीत ध्वनिरोधक) खोलीत कोंडणार आहेत म्हणे. 

रिपोर्ट असं सांगुन राह्यला म्हणे कि त्या काकु शांतता लाभावी म्हणुन खेडेगावात रहायला गेलत्या, पन त्यांच्या घरापासुन फकस्त २० मीटर अंतरावर ह्यो कोंबडा ठिवला होता म्हणे आणि त्याच्या आरवण्यापायी ह्यांची झोपमोड होऊन राह्यली होती म्हणे. मग  काकुंनी तो कोंबडा कोणकोणत्या येळाना आरवतो ते लिहुन ठिवलं होतं म्हणे! त्याच्या संध्याकाळपासूनच्या आरवण्याचा काकुंना लै त्रास झाला म्हणे. तर ह्या कोंबड्यापायी त्यांची मनःशांती ढळली म्हणे. आन मग त्यांनी त्या कोंबड्याला आणि त्याच्या मालकाला कोर्टात खेचलं म्हणे. आन तिथं लिहून ठिवलेल्या कोंबड्याच्या अरवण्याच्या येळा दाखिवल्या म्हणे. आन काकु कोर्टात केस जिंकल्या म्हणे. आन म्हनुन त्या कोंबड्याला बिचाऱ्याला कोंडुन ठिवणार हायेत म्हणे! 

आता कसं हुईल त्या कोंबड्याचं? माझ्या तर जिवाला लईच घोर लागुन राह्यला हाय! तरी बरं आपल्याकडं म्हणुन ठिवलं आहे की कोंबडं झाकलं तरी उजाडायचं रहात नाही, न्हायतर लईच पंचाईत झाली असती त्या लोकायची. 

आता हितं कुनी म्हनुन कुन्नी केकाटणार न्हाय कि हा कोंबड्यावर लैच अन्याय होतो हाय म्हनुन! ना ते प्राणीप्रेमी पेटा, ना थनबर्गची ग्रेटा! काय लाईफ हाय का नाय प्राण्यांचं म्हन्ते मी! विश्वास नसल तर, बातमीची लिंक कमेंटमध्ये लिवलीये, वाचा! 

हे जर्मन लोक त्यांच्या शांततेसाठी काय करतील ह्याचा नेम नाही! जे आहे ते असं आहे. त्या काकु नक्कीच मॅगी काकुंच्या नातेवाईक असाव्यात, अशी मला दाट शंका आहे!

असो आपल्याला काय! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

मी, मॅगी काकु आणि निरोप!

आज लेकाने शाळेत जाताना घराचं दार अंमळ जोरातच लावलं, तर अनावधानाने त्याला म्हणाले “अरे त्या मॅगी काकु रागावतील ना!“ मग लक्षात आलं कि आपल्याला आज ४ महिने होऊन गेले आहेत मॅगी काकुंचा शेजार सोडुन. 

पण खरंच तिकडे होतो तेव्हा, घराचं दार थोडं जरी जोरात लावलं तर हमखास मॅगी काकुंचा आवाज यायचा “अरे दरवाजा हळु लावत चला, मला त्रास होतो!“ काकुंना दुसऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासाची यादी करायला बसले तर दिवस जाईल सगळा. हो किनई?

अरेच्या.. काकुंचा निरोप घेण्याचा किस्सा सांगायचाच राहिला ना! तर, घर सोडायच्या ४-५ दिवस आधी मी त्यांचा दरवाजा वाजवला, मला वाटलं नेहमीप्रमाणे दार उघडणारच नाहीत! पण २ मिनिटांनी का होईना त्यांनी दार उघडलं! 

मी: काय म्हणताय कश्या आहात?

का: मी बरी आहे ग. तु ठीक आहेस ना?

मी: हो हो ठीक आहे. तुम्हाला माहित असावं म्हणुन सांगायला आले कि आम्ही पुढच्या आठवड्यात हे घर सोडतोय. 

का: अरे हो का? भारतात निघाले का तुम्ही?

मी: नाही हो, म्युनिक मधेच दुसरीकडे राहायला चाललोय! तो अमुक भाग नाही का तिथे आहे घर. 

का: (शंकास्पद चेहरा करून!) तिकडे!! मी अजिबातच गेले नाही कधी तिकडे. विचित्र भाग आहे असं ऐकलय!!

मी: (मनातल्या मनात कपाळावर हात मारून, झोपडपट्टी नाही ये ओ ती!) विचित्र वगैरे नाहीये ओ, आपल्यासारखेच लोक राहतात तिकडे आणि आठव्या मजल्यावर घर घेतलंय हो. 

का: कायकी बाई, मला फार काही माहित नाही त्या भागाविषयी!

मी: (अहो तुमचं पुर्ण आयुष्य गेलं ना म्युनिकमध्ये? माहित कसा नाही? हं? टेला ला राहता म्हणुन काय झालं?) बरं बरं. भेटु पुन्हा निघायच्या आधी मग. 

का: (चेहऱ्यावरचे भाव “आता कशाला पुन्हा भेटु? घेतलास ना निरोप!“) अगं तुम्ही गेल्यावर कोण येणार आहे रहायला ईथे? भारतीयच आहेत का? पोरंबाळं किती आहेत त्यांना? 

मी: (घ्या कोणाला कशाचं तर काकुंना भारतीय शेजाऱ्यांचं!!) मला काही कल्पना नाही हो. घरमालकांनी अजुन ठरवलं नाहीये बहुतेक. 

का: मला सांग हं नक्की तुला काही समजलं तर! पुन्हा भारतीयच येतात कि काय कोण जाणे? बाय. 

मी: (तेवढं वाक्य मनात बोलला असतात तर काही बिघडलं असतं का? जा अजुन निरोप घ्यायला!!) बाय. 

म्युनिकमधील जुने जाणते जे लोक आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे मॅगी काकु! त्यांनी त्यांच्या हयातीत महायुद्धानंतर राखेतुन उभा राहिलेला आणि त्यांनतर सतत विकसित होत गेलेला स्वतःचा देश पाहिलाय. परंतु गेल्या काही वर्षात जर्मनीच्या घसरत्या जन्मदरामुळे लाखोंच्या संख्येने येणारे इतर देशीय लोक बघुन, त्यांना वाईट वाटत असेल कदाचित आणि त्यामुळेच मला त्यांच्या  वागण्याचा राग येत नाही कधी.  

घर सोडतांना पुन्हा भेटल्या आवर्जुन!! माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता खरंतर. त्यांची बहीण आलेली होती. मी काकुंना विचारलं ”एक फोटो काढाल का माझ्याबरोबर? आठवण म्हणुन. ” काकु विचारात पडल्या आणि म्हणाल्या “कुठे शेअर तर नाही करणार ना ग तु?” अगा बाबोव .. म्हणलं ह्यांनी माझ्या फेबु आणि ब्लॉगला भेट दिली कि काय? सगळीकडे त्याच आहेत ना!! माझी भंबेरीच उडाली. 

म्हणलं “ नाही नाही, अजिबात नाही करणार कुठेच शेअर! काळजी करू नका." त्यांच्या बहिणीलाच दया आली माझी आणि ती म्हणाली “काय ग मॅगी! ती एवढी म्हणतीये तर काढ ना एक फोटो, घर सोडुन चालली आहे ती!” मग आढेवेढे घेत मॅगी काकु तयार झाल्या फोटो काढायला! फोटो काढल्यावर म्हणाल्या कि “छान शेजार होता बरं तुझा इतकी वर्ष! तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा!“ टचकन पाणीच आलं डोळ्यांत. 

डोळ्यातलं पाणी ओघळंलच असतं पण काकूंचं पुढचं वाक्य ऐकुन ते तिथंच थिजलं!! त्या म्हणाल्या “काही कळलं का तुला? कोण येतंय ग इथे राह्ययला? लहान मुलं वगैरे आहेत का त्यांना?“

हसावं कि रडावं हे न समजुन मी ”काहीच माहित नाही हो. चला मी निघते, या तुम्ही आमच्या घरी तिकडे आलात कि!” एवढं बोलुन त्यांचा निरोप घेतला!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


#माझी_म्युनिक_डायरी

रविवार, १९ जून, २०२२

घर पहावे शोधुन

महिना झाला नविन घरात येऊन, आता जरा सामानसुमान लागलंय, सरकारी दरबारी पत्ता बदलुन बाकी हजारो ठिकाणचे पत्ते बदलुन झाले आहेत, बारीकसारीक गोष्टी घेऊन आलो आहोत; तरीही बऱ्याच गोष्टी घ्यायच्या बाकी आहेत!

तर, मी मॅगी काकुंचा शेजार सोडुन एका नविन घरात आलेय. मॅगी काकुंना सोडुन आल्यामुळे पोस्टसाठी काही म्हणजे काही सुचत नव्हतं बघा! 

त्याचं झालं असं की आमच्या घरमालक काकांनी आम्हाला सांगितलं की “माझ्या नातीला म्युनिकमध्ये शिक्षणासाठी रहायचं असल्यामुळे तुम्ही नविन घर बघा.” त्यांनी आम्हाला असं सांगितल्यवर आमचं धाबंच दणाणलं! म्युनिकमध्ये भाड्याने घर शोधायचं म्हणजे धाबं दणाणणेच आहे! आम्ही काकांना विचारलं  की किती दिवसांची मुदत देताय? त्यावर ते म्हणाले असं काही नाही तुम्हाला घर मिळालं की कळवा! हे ऐकुन जीवात जीव आला एकदाचा. घरमालक काका नक्कीच मॅगी काकुंचे दूरचेहि नातेवाईक नसावेत बहुदा!

ही गोष्ट आहे मागच्या वर्षीची. त्यानंतर आम्ही लगेचच ईथल्या एका वेबपोर्टलवर आमच्या कुटुंबाची अख्खी कुंडली टाकली. हो, ईथे प्रत्येक घरमालकाला तुमच्याविषयी प्रत्येक बारीक गोष्ट समजुन घेण्यात रस असतो. त्यांचं घर नक्की कश्या माणसाला ते भाड्याने देत आहेत ते त्यांना आधीच तुमच्या प्रोफाईलवरून समजलं पाहिजे. तुमची आर्थिक परिस्थिती म्हणजेच महिन्याचा पगार, तुम्ही दोघे कुठे आणि कोणत्या प्रकारची नोकरी करता? तुम्ही महिन्याच्या महिन्याला भाडं भरू शकता की नाही? कुटुंब म्हणुन तुम्ही कसे वागता, वावरता? जर्मनीत आल्यापासुन किती वेळा घरं बदलली आणि का? इत्यादी इत्यादी गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रोफाइलमध्ये लिहाव्याच लागतात आणि त्याही जर्मन भाषेत! इंगजीचा विचारही तुम्ही करू शकत नाही कारण इथल्या लोकांना इंग्रजीचा खुप राग येतो. 

बरं इतकं करूनही तुम्हाला घर बघायला बोलावणं येईल की नाही ह्याची खात्रीच नाही! मग तुम्हाला पैसे भरून त्या वेबपोर्टलचं सदस्यत्व घ्यावं लागतं कारण तुमची कुंडली जास्त लोकांपर्यंत पोहोचणार म्हणुन. 

तर, सदस्यत्व घेतल्यावर आम्ही साधारणपणे १०० घरांच्या घरमालकांना आमची कुंडली पाठवली! त्यातल्या फक्त ७-८ घरमालकांना आमची कुंडली थोडीफार पसंत पडली आणि त्यांनी आम्हाला घर बघायला यायचं आमंत्रण दिलं. पण हाय रे कर्मा प्रत्येक वेळी आमच्या सोबतच आमंत्रण मिळालेला कोणीतरी युरोपिअन घराची बाजी घेऊन जायचा! 

त्यातले एक काका म्हणाले तुम्हा भारतीय लोकांच्या स्वैपाकातल्या मसाल्यांचा वास शेजाऱ्यांना सहन होत नाही ( आणि इथले लोक डुकरं, गायी, घोडे खातात त्याचा फारच सुगंध दरवळतो ना काका!) 

दुसर्या ताई म्हणाल्या भारतीय लोक नियम अजिबात पाळत नाहीत. कचरा टाकायचं व्यवस्थापन कळतच नाही त्यांना. घरात मोठमोठ्याने बोलतात. मुलं घरात खेळतात. त्याचा खालच्या लोकांना त्रास होतो. त्यांना आम्ही म्हणालो प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात हो.  (अरे कुठे नेऊन ठेवलाय भारतीय आमचा?)

एकतर मुलाला शाळेला जाणं येणं थोडं का होईना सोपं पडावं ह्या दृष्टीने मी घरांना कुंडली पाठवत होते. त्यामुळे म्युनिकच्या एका विशिष्ट भागातच घर मिळणं गरजेचं होतं, त्यात पुन्हा सात वर्ष ज्या भागात राहीले होते तो सोडावं वाटत नव्हतं. 

असे ५-७ घरं हातचे गेल्यानंतर तर ताण यायला लागला की घर मिळतं की नाही? कारण एव्हाना आम्हाला विशिष्ट भागाची अटही शिथिल करावीच लागली कारण ८०-९० घरांना कुंडल्या पाठवुनही कुणाशीही आमची कुंडली जुळ्तच नव्हती.

शेवटी न राहवुन आम्ही त्या वेबपोर्टलचे साधं सदस्यत्व ठेवुन फोडणीचं म्हणजेच पैसे भरून घेतलेलं सदस्यत्व रद्द केलं! यन्टमपणा नुसता पैश्याचा. 

पाच सात महिन्याच्या शोधमोहिमेत एक गोष्ट शिकलो की पेशन्स महत्वाचे आहेत आणि म्युनिकमध्ये घर मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट! तर निराश न होता मी आपलं दिसेल त्या चांगल्या घरांना कुंडल्या पाठवायचा धडाकाच लावला! आणि काय आश्चर्य, आमचं साधं सदस्यत्व असुनही “ह्यांना” घर बघायला या म्हणुन जर्मन भाषेत एका एजंट ताईंचा फोन आला. 

ह्यांना जर्मन फारसं येत नसल्यामुळे हे ताईंशी इंग्रजीमध्ये बोलायला लागले आणि ताईचं डोकं सरकलं आणि त्यांनी फोन ठेऊन दिला! नहीं$$$$$ ये नहीं हो सकता. असा विचार करून ह्यांनी ताईंना लगेच फोन लावला आणि कसबसं सांगितलं की ताई माझ्या बायकोला थोडं आणि मुलाला खुप जर्मन येतं. आम्हाला घर तर पाहु द्या की! तर ताईंना काय वाटलं कोण जाणे त्या चक्क हो म्हणाल्या. 

मग आम्ही आमच्या टीनएजरची खुप शाळा घेतली की राजा आता सगळी मदार तुझ्या छान छान जर्मन बोलण्यावर आहे. बच्चे संभाल ले. स्वतःच्या पोरांना लोणी लावावं लागतं राव आजकाल. हे टिनेजर्स म्हणजे ना...तुम्हाला सांगते... असो. 

तर, आम्ही शुचिर्भुत होऊन घर बघायला गेलो. इथे आपल्याला घर आवडो न आवडो, त्या घरमालकांना आणि एंजट लोकांना आपण आवडणं फार म्हणजे फार महत्वाचं आहे. एखाद्या नोकरीच्या मुलाखतीला जातो तस जावं लागतं! 

घर तर आम्हाला आवडलंच. मग ताईंनी आम्हाला पार्किंग, कचऱ्याचं व्यवस्थापन, इत्यादी गोष्टी दाखवल्या. पुन्हा २-३ वेळा शालजोडीतुन हाणले की “बऱ्याच आधी एका भारतीय कुटुंबाला घर दिलं होतं तर त्यांनी घराची कशी वाट लावुन ठेवली होती पण तुम्ही तिघे स्वच्छ आणि टापटीप दिसताय!!” (मनात म्हणलं म्हणजे काय गबाळं दिसायला पाहिजे का? इतकाच अपमान करायचा होता तर बोलावलं कशाला गो? म्हणे स्वच्छ दिसताय! आम्ही काय गोठ्यात राहतो का?अगं ताई आम्ही शुचिर्भुत झाल्याशिवाय घराबाहेरही पडत नाही ग!!) 

पुन्हा स्वैपाकघरातल्या गोष्टी किती नाजुकपणे हाताळायच्या ह्याविषयी शाळा घेतली. (आता काय स्वैपाक करायचाच नाही का काय? नुसतं सगळ्या उपकरणांकडे बघत बसायचं का? अरे काय चाललंय काय?) 

पण म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते तसं म्युनिकमध्ये घर शोधणाऱ्याला अक्कल तर नसतेच पण स्वाभिमान वगैरे गुंडाळुन ठेवावा लागतो! आम्ही कसनुस हसलो. ताईंनी त्याचा इमेल वगैरे दिला पण एवढं सगळं ऐकुन आम्हाला वाटलं की हेही घर काही मिळत नाही आपल्याला. कारण ताईंनी भारतीय लोकांचं जे गुणगान केलं त्यामुळे पार आशा मावळली. तरी बरं आमचे घरमालक काका आमच्या डोक्यावर बसले नव्हते नाहीतर इकडे आड आणि तिकडे विहीर झालं असतं. 

घर बघुन आल्यावर सगळ्या आशा मावळल्या होत्या त्यामुळे मी लगेच दुसऱ्या घराना कुंडल्या पाठवायला सुरुवात केली. आणि दोन दिवसांनी चक्क चक्क त्या ताईंचा ईमेल आला की घरमालकांना तुमची कुंडली आवडली आहे आणि तुम्हाला घर मिळालं आहे!! 

खरंतर हा मेल वाचुन आम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता पण मनात उगीच शंकेची पाल चुकचुकली. वेबपोर्टलच्या साध्या सदस्यत्वाच्या जोरावर कसं काय घर मिळालं बुआ? काही फ्रॉड तर नाही ना? कारण आमच्या एका मित्राला मागच्या वर्षी अश्याच एका ताईंची तीन हजार युरोचा चुना लावला होता. घर तर मिळालंच नाही आणि वर पैसे गेले. त्यामुळे घर ताब्यात मिळेपर्यंत टेन्शनच होतं. 

म्हणुन मग आम्ही ताईंची कुंडली शोधायला घेतली. त्यांनी एजन्सी खरोखर अस्तित्वात आहे की नाही? पत्ता जो दिलाय तिथे एकदा उगीचच चक्कर मारून आलो. घरमालकीण बाई खऱ्याच आहेत ना? वगैरे वगैरे. जर्मनीत आल्यापासुन ताकही फुंकुन प्यायची सवय लागली आहे! ह्या सगळ्या गोष्टींची खातरजमा केल्यावरच आम्ही ताईंच्या इमेलला उत्तर दिले तर म्हणतात कश्या “ किती उशिर केला तुम्ही उत्तर द्यायला! मी घरमालकीण बाईकडे तुमच्यासाठी शब्द टाकला होता. आता लवकरात लवकर अग्रीमेंटवर सह्या करा आणि पाठवुन द्या नाही तर घर मिळणं अवघड आहे!"

इकडे चिरंजीवांचं वेगळंच “मिळालं का घर? मला वाटलं नाही मिळणार! मला हे घर सोडायचं नाहीये." त्याचं बालपण तिथे गेल्यामुळे त्याला तसं वाटणं साहजिकच होतं म्हणा. मलाही नविन ठिकाणी जायचं म्हणल्यावर वाईट वाटतच होतं. 

मग आम्ही आमच्या घरमालकांना रीतसर कळवलं आणि घर बदलायला, जुने घर रंगवायला आणि स्वच्छ करायला, फर्निचरची जुळवाजुळव करायला माणसं शोधायच्या मोहिमेवर निघालो. ईथे घर आणि परिसराच्या स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व आहे! घर सोडतांना आरशासारखं लखलखीत करून द्यावं लागतं नाहीतर डिपॉझिटवर पाणी सोडावं लागतं. आमच्याच मित्रमैत्रीणींकडुन एकल्याप्रमाणे घरमालक घराचा ताबा घेताना क्लीनिंग एक्सपर्टला घेऊन येतात आणि त्या एक्सपर्टच्या मते तुम्ही जर घर खराब केलेलं असेल तर विसराच भरलेलं डिपॉझिट. त्यामुळे तो एक वेगळाच ताण होता. 

आणि तो दिवस आला, ज्या दिवशी एजन्ट ताई घराच्या किल्ल्या देणार होत्या. काळजात नुसती लकलक लकलक(संदर्भ वर्हाड निघालंय लंडनला)! घर ताब्यात देतांना एजन्ट ताई दोन इंग्रजी शब्द घोकुन आल्या होत्या “ Very Clean!” आम्हाला किल्ल्या देण्याच्या आधी ताई घराचा कोपरानकोपरा दाखवतांना हात जोडुन “Very clean, very clean” एव्हढंच बोलत होत्या. मी पण मग हात जोडुन "yes yes yes " म्हणत होते. मनात आलं “अहो ताई का देताय मग घर भाड्याने? घर रिकामं ठेवलंत तरच very clean राहील ना!” 

प्रत्येक नळाला लावलेले पाण्याचे मीटर्स, घरातल्या हिटर्सच्या घेतलेल्या रीडींग्ज, नळ स्वच्छ कसे करायचे, कचरा कसा वेगवेगळा करायचा, घराला हवा देणे कसे गरजेचे आहे आणि त्याविषयीच्या लिहिलेल्या सुचना आम्हाला दिल्या, ह्या आणि अश्या बऱ्याच गोष्टींचे सोपस्कार पार पाडुन ताईंनी एकदाचा किल्ल्यांचा जुडगा आमच्या सुपुर्त केला! किल्ल्या मिळाल्याच्या पुढच्या आठवड्यात सामान घेऊन आम्ही नविन घरात दाखल झालो आणि जीव भांड्यात पडला!

इथे घराला हवा देणे हि एक फार महत्वाची गोष्ट आपल्यासारख्या भारतीय लोकांना कटाक्षाने लक्षात ठेवावी लागते. हिवाळ्यात तर अगदी न विसरता रोज सकाळ संध्याकाळ १५-२० मिनिटे पुर्ण घराच्या खिडक्या दारं उघडे ठेवुन हवा खेळती ठेवावी लागते नाही तर "शिमेल" म्हणजेच एक प्रकारची बुरशी लागते भिंतींना आणि तो प्रकार इतका वैताग आणणारा असतो की ज्याचं नाव ते. ती बुरशी एकदा यायला लागली कि इतक्या झपाट्याने पसरते ना घरात. ती स्वच्छ करणे म्हणजे जीवखाऊ प्रकार असतो एकदम. असो. 

तर, इथे मनुष्यबळ कमी असल्यामुळे घरातलं एक ना एक फर्निचर तुकड्यातुकड्यांमध्ये मिळतं, त्यामुळे त्याची जुळवाजुळव करायलाही कोणीतरी मदतीला लागतंच. Ikea नामक दुकानाची कृपा. आधीचं घर फर्निश्ड असल्यामुळे आम्ही ह्या भानगडीत कधी पडलोच नव्हतो. पण नविन घरात फक्त इक्विप्ड किचन आणि बाकी घर अनफर्निश्ड असल्यामुळे सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करावी लागली. बेड, कपाटं, टीव्हीस्टॅन्ड, डायनिंग टेबल, अभ्यासाचा टेबल वगैरे समजु शकतो पण खुर्चीचे सुद्धा तुकडे!! ह्यांनी आणि लेकाने मिळुन तर चक्क खुर्ची सुद्धा जोडलीये मागच्या काही दिवसांत, आता बोला!

तिकडुन निघतांना इमारतीतल्या सगळ्या कुटुंबांचा निरोप घेतला. नाही म्हणलं तरी सात वर्षांची ओळख होती ना! ह्यात सगळ्यात जास्त मजेशीर किस्सा अर्थातच मॅगी काकुंचा निरोप घेतानांचा आहे! त्याविषयी लवकरच लिहिते. 

त्यांनतर इकडे सामानसुमान लावणे आणि जुन्या घरातली स्वच्छता आणि रंगरंगोटी असे सगळे कामं चालु होते. दोन्ही थडीवर हात ठेवुन चालणे म्हणजे काय ह्याचा मस्त अनुभव आला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडच्या घरमालक काकांनी किंवा एजन्ट ताईंनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता शांतपणे किल्ल्या ताब्यात घेतल्या आणि निरोप दिला!

तिकडचं घर म्हणजे कोकण असेल तर इकडचं घर म्हणजे महाबळेश्वर आहे! म्युनिकमध्ये हाय राईज बिल्डिंग्ज जास्त नाहीत पण आम्हाला एका इमारतीत आठव्या मजल्यावर घर मिळालं आहे आणि इथल्या बाल्कनीतुन दक्षिण क्षितिजावर आल्प्सचं रमणीय नित्य दर्शन आहे. घराच्या दोन्ही बाजुंनी अर्धं म्युनिकदर्शन होत आहे. रोजच्या सूर्यास्ताचे रंग बघण्यात इकडे हळुहळु करमतय. फरक एव्हढाच की सदाशिव पेठेतुन उठुन सरळ सरळ चंदननगरला आल्यासारखं वाटतंय किंवा औरंगाबादेतलं बोलायचं तर समर्थनगर मधुन सरळ चिकलठाण्याला गेल्यासारखं!! बस्स!



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्युनिक_डायरी 


शनिवार, १२ मार्च, २०२२

बेल

आज सकाळच्या पारी अचानक बेल वाजली. एकतर शनिवार आणि त्यात सकाळची गारठ्याची वेळ, डोक्यात विचार आलाच, की नक्की कोण ए बुआ? कारण आमचा बेल वाजवणारा घरातला निजलेला ज्वालामुखी अर्धवट झोपेत होता. आता तुम्ही म्हणाल ही बाई काय बोलतेय? अहो घरातलं पौगंडावस्थेतलं मूल, मराठीत टीनएजर, निजलेला ज्वालामुखीच असतंय; कधी फाटकन फुटेल काहीच सांगता येत नाही! 

हं तर बेल वाजली.. एकतर इथे कोणीही येत जात नाही म्हणजे सगळे एकमेकांकडे वेळ ठरवुन निवांत जातात. त्यात पुन्हा शनिवार म्हणजे बाहेरची कामं उरकण्याचा दिवस. कारण रविवारी इथे औषधालाही दुकान उघडं सापडणार नाही किंवा असंही म्हणु शकतो की औषधाचंही दुकान बंद असतं! त्यामुळे शक्यतोवर शनिवारी कोणी कोणाकडे जात नाही. 

मी बेल वाजल्या वाजल्या आधी खिडकीतून बाहेर मेनगेटला कोणी आहे का पाहिलं, तिथे कोणी दिसलं नाही. मग विचार केला आपण ऑनलाईन काही मागवलंही नाहीये, त्यामुळे ती ही शक्यता नाही. आता तुम्ही म्हणाल दाराची बेलच वाजली आहे ना तर उघडायचं दार त्यात काय एवढं? 

मीही हाच विचार करून आधी पीपहोल मधुन पाहिलं, हायला बाहेरही कोणी नाही. खालीच असणार कोणीतरी.. पण कोण? मग शेवटी बेलवाला फोन उचलला आणि “हॅलो" म्हणाले .. तर माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.. 

मॅगी काकु होत्या खाली आणि त्या म्हणाल्या “दार उघडतेस का प्लिज!” नक्की त्यांचाच आवाज आहे ना? 

“उघडते ना, उघडते बरं, का नाही उघडणार!” (मी काही तुमच्यासारखी नाहीये, तुम्ही कोणालाच दार उघडत नाहीत हे काय माहित नाही की काय मला!) 

मी बिल्डिंगचं दार उघडलं, आणि ह्या धक्क्यातून सावरायला थोडा वेळ गेला तोच मला जाणीव झाली की काकु घरातच किल्ली विसरल्या वाटतं, त्याशिवाय त्या काही माझ्या घराची बेल वाजवणार नाहीत! बाबो, असं झालं तर मला त्यांना किल्लीवाला येईपर्यंत घरात या म्हणावं लागेल, थोडं का होईना घर आवरव लागेल( खरंतर हीच सगळ्यांत मोठी चिंता)! कसं आणि काय काय करू? 

मी पटापट जी काही कोंबाकोंबी, झाकपाक, फेकाफेकी करायची आहे ती केली. माझ्या चाणाक्ष मैत्रिणींना लक्षात आलंच असेल, असं एक मिनिटात घर आवरणे काय असतं ते. 

तोवर काकू वर आल्या आणि मी घाबरतच दार उघडलं तर त्यांचा आणि माझा जीव एकदमच भांड्यात पडला! त्या त्यांच्या घराची #किल्ली दारालाच विसरल्या होत्या. आम्ही दोघीनीही एकमेकींना “My Goodness” एकदमच म्हणालो!

“अगं गडबडीत किल्ली इथेच विसरले मी. खाली गेल्यावर लक्षात आलं म्हणुन पटकन तुमच्या घराची बेल वाजवली. तुला त्रास दिला."

“त्रास कसला हो त्यात, बरं झालं तुम्ही किल्ली घरात नाही विसरलात (नाही तर मला माझं घर आवरावे लागलं असतं 😜).”

मेहमानोसे डर नहीं लगता साहब .. अचानक घर आवरणे से लगता है!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

नाम में क्या रखा है

गेले कित्येक दिवस एक नाव नुसतं डोक्यात घोळतंय! बरं आपलं डोकं म्हणजे यन्टमपणाचा कळस असतं! कितीही ठरवलं की “ते”नाव एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडुन द्यायचं तरी जमत नाहीच. “असं कसं नाव रे?” असं विचारावं का नाही? हा एकच प्रश्न सतावतोय. कारण “साला एक प्रश्न भांडण के लिए कारणीभुत हो सकता है!“ हिंदी मराठी घ्या समजून आता.. नावंच तसं आहे ते!

आधीच होम ऑफीस वाले बारा महिने अठरा काळच्या मीटिंग्जमुळे वैतागलेले असतात त्यात तुम्हाला त्यांच्या कलिग्जची नावं पाठ आहेत आणि त्यातल्या एकाचं नाव तुमच्या डोक्यात घोळतंय असं जर त्यांना कळलं तर काय होऊ शकतं ह्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल! असो. 

एकतर ते नाव पहिल्यांदा ऐकल्यावर हसून हसून वेड लागायची वेळ आली होती. त्यात पुन्हा सतत तेच नाव कानावर पडतंय! किती म्हणून आवरायचं स्वतःला? 

पण आता पाणी डोक्यावरून गेलंय! म्हणुन आज ठरवलंच की काहीही झालं तरी चालेल, कितीही भांडण झालं तरी नाव विचारायचं म्हणजे विचारायचंच! असं कुठं नाव असतंय होय? का तुच चुकीचं नाव घेतो आहेस? फ्लोरियन ठीक आहे, स्टेफानी बरंय, एकवेळ तातियाना पण चालेल... 

पण “माईका लाल”? हे कुठल्या देशातलं नाव आहे? सारखं सारखं काय “माईका लाल, माईका लाल”?

तर उत्तरादाखल “अगं ए यन्टम माईका लाल काय माईका लाल! मायकल अल असं नाव आहे ते! काय आहे? मायकल अ ल! म्हण बरं मायकल अल”.

मी “माईका लाल!” (गडगडाटी हास्य) “हैं साला, है कोई माईका लाल जो ये नाम ठिकसे बोल सके?”


#कानपुर_में_हड़ताल


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

मी, मॅगी काकु आणि गरम पाणी

बाकी काहीही म्हणा पण लेडीजबायकांचे वेगळेच फण्डे असतात. कोणाचं काय तर बायकांचं तिसरंच असतं काहीतरी. आता आजचच बघा ना!

कालपासून गरम पाणी येत नाहीये नळाला. आधीच हाडं गोठवणारी थंडी, -७ वगैरे; त्यात गरम पाण्याची वानवा म्हणजे बर्फात तेरावा महिना! अंघोळीची गोळी तरी किती दिवस घेणार? बरं अंघोळ एकवेळ विसरा पण भांडे घासायला, दिवसभर वापरायला पण थंडगार पाणी म्हणजे घरात बसल्या बसल्या फ्रॉस्टबाईट व्हायचे कामं. विचार करूनच अंगावर काटा येतो!

म्हणुन मॅगी काकूंना विचारावं म्हटलं. त्यांचं दार वाजवलं. मला वाटलं दार उघडतात की नाही देवच जाणे. त्यांच्या मूडवर असतंय! पण चक्क त्यांनी दार उघडलं. चेहऱ्यावर मास्क! मी लगेच “ एक मिनिट हं काकू, मी पण मास्क लावते!“ तर म्हणाल्या “असुदे ग." आज मूड भारीच दिसतोय काकूंचा! चला आज मदत करतील बहुदा. 

मी: आमच्यकडे कालपासून गरम पाणी नीट येत नाहीये. तुमच्याकडे येतंय का?

का: थांब हं मी बघते. येतं आहे ग, बाथरूम आणि किचन दोन्हीकडे.

मी: अरेच्या, आमच्याकडे कालपासून नाहीये बघा! मी खाली कम्प्लेंट लिहुन आले आताच."(मला वाटलं विचारतात कि काय अंघोळ झाली का म्हणुन!)

का: तुझ्या जॅकेटचं फर फारच सुंदर आहे ग!

मी: (ह्यां,चक्क कम्प्लेंटच्या ऐवजी कॉम्प्लिमेंट! ये सपना तो नहीं है ना? मन में लड्डू वगैरे) धन्यवाद!

का: पण हे फर खरं आहे का?

मी: (आता आली का पंचाईत? ईथं कोणाला कळतंय खरंय का खोटं आहे ते!)”मला नाही माहीत हो!”

का: कुठे घेतलंस जॅकेट? मी सांगु शकेल मग!

मी: ते तमुक नाही का.. तिथे!

(काकुंच्या चेहऱ्यावर तेच ते भाव... कौन है लोग इत्यादी)

का: अच्छा तमुक का! मग नाहीये खरं हे फर. पण छानच दिसतंय!

मी: (आता काय बोलावं ते न सुचून) हो का? अरेवा! तुमचेही हे दारात ठेवलेले शूज मस्त आहेत!

का: अगं हे त्या अमुक तमुक ब्रँडचे आहेत! ह्याला ना आतुन खरं फर आहे!

मी: (आयला पुन्हा खरं फर.. एकतर ते नाव ऐकून आणि त्याची किंमत आठवून माझे डोळेच पांढरे झाले.) अरेवा मस्त मस्त!

का: “तुला ना मी २-४ दुकानांचे नावं सांगते तिथे तुला खऱ्या फरचे जॅकेट्स मिळतील. फार सुंदर असतात बघ.

मी: सांगा ना आणि अजुन दुसरे शूज चे दुकानं पण सांगा!

का: तुला चष्मा लागला का ग?

मी: हो, झालं आता वर्ष, पण काम करतांनाच घालावा लागतो!

का: अच्छा. छान दिसतोय तुला. कुठे घेतलास?

मी: हे आपल्या इथलं जवळचं दुकान.

का: हं, ते छान आहे!

(अरेच्या ते दुकान आवडतं काकूंना..)

हे सगळं फर पुराण ऐकुन घरात असलेला होम ऑफीसवाला माणुस ओरडला ”गरम पाणी!! गरम पाणी!!!”

अरे हां गरम पाणी येत नाहीये ना, असं विसरायला होतं बघा!! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक


#माझी_म्युनिक_डायरी

वाचकांना आवडलेले काही