रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

वाळवण

तुम्ही फेबुवर वेगवेगळ्या पाकशास्त्रीय समूहांवर (बापरे मलाच अवघड जातंय शुद्ध मराठीत वाचायला! रेसिपी गृप्स हो) उन्हाळी वाळवणं बघून आणि वाचून दरवर्षी मनातल्या मनात हळहळत असता की मला बै म्युनिकमधे वाळवण घालताच येत नाही. पण तरीही तुम्ही म्यानिफेष्टेशनचे रिळं बघून बघून मनातल्या मनात त्या महाकाय युनिव्हर्सकडे वाळवणाचं साकडं घालत असता की ह्यावर्षी जरा खरपूस ऊन पडू दे, ते गॅलरीत येऊ दे आणि मला वाळवण करता येऊ दे. 

कसंतरी तुमचं म्यानिफेष्टेशन त्या युनिव्हर्सकडे पोहोचतं आणि जून मधे चक्क एक आठवडा युरोपमध्ये उष्णतेची लाट येते. तुम्ही एक दिवस गॅलरीत येणाऱ्या उन्हाचा अंदाज घेता आणि ठरवता की चाहे कुछ भी हो जाये उद्या मी साबुदाण्याच्या पापड्या घालणारच! पण कसं असतं ना की जगात म्यानिफेस्ट करणारे करोडो लोक असतात आणि त्यात तुमच्या वर राहणारी शेजारीणही असते जिने तिची गॅलरी धुण्याचं म्यानिफेस्ट केलेलं असतं बहुतेक, त्यामुळे ती नेम धरून तुम्हाला पापड्या घालायच्या दिवशी सक्काळीच तिची गॅलरी धुवून मोकळी होते! ते सगळं घाण पाणी तुमच्या गॅलरीत येतं आणि तुमच्या वाळवण म्यानिफेस्टेशनचा धुव्वा उडतो. रिळं बघून दुसरं काय होणार म्हणा!!

बरं पापड्या घातल्या आणि वरच्या बाईने पुन्हा पाणी टाकलं किंवा तिच्या घरातला गालिचा झटकला तर!! ह्या विचारसरशी तुम्ही तुमचं “चाहे कुछ भी हो जाये" बाजूला ठेवता. पण म्यानिफेष्टेशन तुम्हाला काही गप्प बसू देत नाही! 

मग तुम्हाला मॅगी काकूंची आठवण येते. त्या असत्या तर त्यांनी काय केलं असतं बरं अशा वेळी? त्यांनी शेजाऱ्यांना पत्र दिलं असतं!  मॅगी काकूंचा वाण नाही पण गुण तुम्हाला लागलेला असतो. तुम्ही मुलाकडून जर्मनमधे एक पत्र लिहून घेता की ”ते घाण पाणी आमच्या गॅलरीत येऊ देऊ नका वगैरे" आणि लगोलग ते पत्र तुम्ही वरच्यांच्या दाराला लावून येता! 

“आलेत मोठे गॅलऱ्या धुणारे! बघतेच आता! अरे जर्मनीत असे लोक?? अरे त्या मॅगी काकू तर माझ्या घरातल्या दाराच्या आवाजावरून पोलीस बोलवायला निघाल्या होत्या आणि मी? सोडते का काय! येऊच दे आता घाण पाणी माझ्या गॅलरीत, नाही पोलीस बोलवले तर शपथ! वाटलं काय तुम्हाला मॅगी काकूंची शिष्य आहे मी!“ असे दमदार विचार करून तुम्ही उष्णतेच्या लाटेचा अंदाज घेता. ती आठवडाभर असल्याची खात्री झाल्यावर दुसऱ्याच दिवशी पापड्या घालण्याचा बेत पक्का करता. 

एवढी चाळीशी उलटूनही आईला सगळी पाककृती विचारल्याशिवाय तुम्हाला चैनच पडत नाही. बरं टीचभर गॅलरीत, बोटभर उन्हात घालून घालून किती पापड्या घालणार! पण तरीही, उत्साह असा की जसं काही मोठ्या गच्चीवर शे दोनशे पापड्या घालायच्या आहेत.

तुम्ही कसंतरी बटर पेपरवर तीस पस्तीस पापड्या घालता. पण हाय रे कर्मा, बरोब्बर त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोरदार वावटळीसारखं वारं वाहत असतं. कागद उडू नये म्हणून ठेवलेले सगळे डब्बेडुब्बे, भांडेकुंडे सारखे दणादण खाली पडत असतात. पूर्ण  दिवस तुम्ही फक्त कागदं आणि पापड्या उडू नयेत म्हणून ४० डिग्री उन्हात, टोपी आणि गॉगल घालून राखण करत बसता आणि तुमचं हे ध्यान बघून घरातल्यांचं मनोरंजन होतं ते एक वेगळंच. आपलं म्यानिफेष्टेशन अन दुसरं काय, नाही का? 

पण दुसऱ्या दिवशी कडकडीत वाळलेल्या साबुदाण्याच्या पापड्या बघून,  केलेले सगळे उपद्व्याप विसरून तुम्ही पुन्हा नवीन वाळवण घालण्याचे स्वप्न बघायला लागता. आणि काय आश्चर्य त्यानंतर जे ऊन पावसाचा खेळ सुरु होतो तो आजतागायत थांबलेला नसतो!! 

आणि तुम्ही ठरवता की रिळं बघून म्यानिफेष्ट करायचं नाही म्हणजे नाही!


#माझी_म्यूनिक_डायरी






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही