रविवार, १३ जुलै, २०२५

उचकी

किस्सा परवाचाच आहे, शाळेतल्या उन्हाळी जत्रेविषयी आधीच इमेल आला होता. त्यामुळे त्या दिवशी दुपारचं जागरण करून कार्यक्रमाला जायचं पक्क ठरवलं होतं. पण आमच्यासारख्या फ्रिलान्सर लोकांचं आयुष्य म्हणजे असं असतं ना की आम्ही असा एखादा कार्यक्रम ठरवला की  त्याच्या आदल्या दिवशी रात्री नेम धरून प्रोजेक्टवाले लोक दबा धरून बसल्यासारखे कामाचा इमेल पाठवतात! त्यामुळे पहाटे उठून, प्रोजेक्टवर हजेरी दाखवून, दुपारची थोडा वेळ सुट्टी काढून जावं लागलं. 

तर मुलाच्या सूचनेबरहुकूम तयार होऊन मी त्याच्या शाळेत निघाले! सूचना - अमुक वेळेला घरातून निघ, तमुक वेळेला पोहोंच, जास्त मेकप करू नको (त्याच्या मुंजीत एकदा मेकप काय केला तेव्हापासून त्याने धसकाच घेतलाय माझ्या मेकपचा. म्हणलं बेट्या थांब थोडे वर्ष, तुझी बायको येऊ दे मग बघते तिचा मेकप! ), इत्यादी. 

बसमध्ये बसले, तसे पधंरा वीस लोक असतील, पण स्मशानशांतता होती बसमधे. तशी इथे अशा शांततेची सवयच आहे म्हणा, पण बस नेमकी रेल्वे क्रॉसिंगला थांबली आणि अक्षरशः टाचणी पडल्यावर आवाज येईल अशी शांतता बसमधे पसरली. बरं, अशा वेळेस आपल्याबरोबर काहीतरी घडलंच पाहिजे, नाही का! मला जोरदार उचकी लागली. उचकीबरोबर ढेकरही येईल असं वाटायला लागलं! आता बसमधले सगळे माझ्याकडेच नजर लावून बसले. चालक काका पण आरशातून बघायला लागले की ”कोण बाई आहे ही!” 

त्यात ती ट्रेन पण उशिराने धावत होती वाटतं, यायचं नाव घेईना! मी मनात देवाचा धावा करायला लागले की उचकी तरी थांबव, ढेकर येऊ देऊ नको, नाहीतर ट्रेन तरी पटकन येउदे. पण आपले धावे देव बाप्पा जरा उशिराच ऐकतात आणि त्यात नवीन गंमत करतात. एकीकडे मी कसनुसा चेहरा करून उचकी थांबवायचा प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे माझा फोन वाजत होता. ये क्या हो रहा है भगवान? 

हाय रे कर्मा! लेकाचा फोन होता. “आई कुठे तू? कार्यक्रम सुरु होतोय, ये ना लवकर!“ मी आपली उचकी देऊ, ढेकर थांबवू, त्याच्याशी बोलू, की बसमधल्या लोकांच्या नजरेचा मारा सहन करू? ह्या पेचात होते. ह्या विचारांमध्ये, उचकी आणि ढेकर दाबत लेकाला सांगितलं कसबसं मी आलेच पाच मिनिटात आणि फोन ठेवला. म्हणजे जर्मन लोकांच्या दृष्टीने जेवढ्या काय असंस्कृत गोष्टी आहेत त्या सगळ्या मी त्या बसच्या १० मिनिटाच्या प्रवासात केल्या होत्या! ते नाही का गच्च भरलेल्या विमानात, अलाहाददायक वातावरणात भस्सकन कोणी तरी लसणाच्या चटणीचा डबा उघडावा आणि सगळ्यांनी त्या माणसाकडे पाहावे, तसं काहीसं. 

त्यात एक मन वाटलं बस थांबलेलीच आहे पातकं खाली उतरून जावं. पण इथे तेही शक्य नाही. बळजबरी बसचं दार उघडायला जावं तर पोलिसमामांचं दर्शन घ्यावं लागायचं. 

शेवटी म्हणलं धरणीमाते घे ग बाई पोटात मला! पण बसमधून ती तरी कशी घेईल ना पोटात? तिने ठरवलं जरी की ही बस फोडून ह्या बाईला घेऊ पोटात तरी माझी सुटका झालीच नसती. आगीतून फुफाट्यात, जगात वर्ल्डफेमस असलेल्या जर्मन ब्युरोक्रसीवाल्यांनी पाताळातही पत्र पाठवून बेजार केलं असतं मला, आमची नुकसान भरपाई द्या म्हणून! आता काय सांगू तुम्हाला जर्मन लोकांचं पत्रप्रेम. 

पण देवाने माझा धावा ऐकला आणि ट्रेन आली, बस सुटली एकदाची. पुढच्याच स्टॉपलाच उतरायचं असल्यामुळे कशीबशी उचकी दाबत मी त्या शांत बसमधून खाली उतरले!

शाळेजवळच्या त्या चौकात कधी नव्हे ते इतक्या गाड्या होत्या की रस्ता ओलांडायला पाच सात मिनिट लागले. त्यात लेकाचे दोनदा फोन, “किती हळू चालतीये, ये ना लवकर!” मनात म्हणलं हा तोच मुलगा आहे ना, जो मला शाळेत येऊ नको म्हणून सांगत होता. पण त्याला बिचाऱ्याला तरी काय माहिती होतं म्हणा की शाळेत येऊन मी त्याला मीम मटेरियल देणार आहे ते!


#माझी_म्युनिक_डायरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही