बुधवार, ३१ जुलै, २०१९

वृत्ती

युरोप मध्ये प्रवास करताना फारच परस्पर विरोधी अनुभव येतात.

बुडापेस्टची ट्रिप महिना दोन महिने आधी अगदी दहा वेळा हवामानाचा अंदाज घेऊन बुक केली होती. पण इथले हवामानाचे अंदाज कितीही अचूक असले तरी पाऊस हमखास तुम्हाला गाठतोच. ज्या दिवशी आम्ही तिथे पोहोचलो त्या रात्रभर पाऊस कोसळत होता. वाटलं आता दुसरा दिवस वाया जातोय कि काय? पण सकाळीच पाऊस थांबला आणि जिवात जीव आला कारण त्या अख्ख्या दिवसाची आम्ही सिटी टूर बुक केली होती.

सकाळी लवकर आवरुन त्या हॉटेल मध्ये जरा घाबरतच नाश्ता केला. घाबरत यासाठी की आदल्या रात्रीच "बाली" चा व्हिडीओ पाहिल्यामुळे उगीचच असं वाटत होतं की त्या ब्रेकफास्ट रुम मधल्या सगळ्या लोकांनी तो व्हीडीओ पहिला आहे आणि ते संशयी नजरेने तुमच्याकडे पाहत आहेत. चहा घ्यायचीही चोरी वाटायला लागली. कारण कॉफी मशीनमध्ये गरम पाणी शोधणे, मग ४-५ प्रकारच्या टी-बॅग्ज मधून आपल्याला हवी ती टी -बॅग शोधणे, दुधाची किटली शोधणे, साखर किंवा मध शोधणे, हे सगळं आजुबाजूला असलेल्या लोकांच्या आणि ह्यांच्या नजरेचा सामना करत शोधणे म्हणजे फार कठीण काम असत बघा. ह्यांना वाटत असतं कि बायकोने स्वतःचं किचन असल्यासारखं पटकन चहा करावा. असो.

तर कटू अनुभव

स्वच्छ ऊन पडलं असल्यामुळे दुपारपर्यंत बरेचसे महत्वाचे पॉईंट्स पाहुन झाले होते आणि हळुहळु आभाळ दाटुन आलं म्हणून मग आम्ही जेवणासाठी एका ठिकाणी बसमधून उतरलो. वाटलं कि पाऊस सुरु झाला तर पंचाईत व्हायची. आणि पंचाईत झालीच, आम्ही रेस्टॉरंट शोधेपर्यंत मुसळधार पाऊस सुरु झालाच. पटकन आडोश्याला थांबुन आम्ही रेनकोट्स अंगावर चढवले आणि तश्या पावसात पुन्हा रेस्टॉरंट शोध मोहीम सुरु केली. पोटात कावळे कोकलत होते अक्षरशः. कसंतरी एक इटालियन रेस्टॉरंट सापडलं. आम्ही त्या रेस्टॉरंटच्या दारात कुठे रेनकोट्स अडकवायला जागा आहे का ते बघत होतो. कारण म्युनिच मध्ये बऱ्याचश्या रेस्टॉरंटच्या दारातच रेनकोट आणि छत्री ठेवायला जागा असते. तिथे तशी कोणतीच व्यवस्था दिसली नाही म्हणून आम्ही रेनकोट्स काढून आत जाणार तेवढ्यात तिथला वेटर काचेचं दार उघडून बाहेर येऊन आम्हाला म्हणाला की रेस्टॉरंट बंद आहे. तुम्ही आत नाही येऊ शकत. अरे ये क्या बात हुई?

आतमध्ये लोकं बसुन जेवत होते, बाहेरून लोक आत जात होते पण त्यांनी आम्हाला येऊ दिलं नाही. इतका संताप आला होता ना, वाटलं तसंच आत जावं आणि ओल्या रेनकोटचं पाणी पूर्ण रेस्टॉरंट भर झटकून यावं.  त्याला नक्की काय अडचण होती देव जाणे, आम्ही रेनकोट घालूनच आत येऊ असं वाटलं कि अजून काही त्यालाच माहित. पण आमच्या सकाळपासूनच्या आनंदावर विरजण पडलं. म्हटलं ह्याने "बाली" चा व्हिडीओ पहिला की काय? पण म्हणतात ना गरजवंतांला अक्कल नसते. आम्हाला कडाडून भूक लागली होती, पाऊस मी म्हणत होता आणि आम्ही परक्या देशात होतो त्यामुळे आम्ही पुन्हा रेस्टॉरंट शोध सुरु केला. कसबसं थोड्या अंतरावर एक तुर्किश रेस्टॉरंट दिसलं, तिथल्या लोकांनी कोणतेही आढेवेढे न घेता आम्हाला आतही घेतलं आणि व्यवस्थित खायला दिलं.

ह्या विचित्र अनुभवामुळे मन खट्टू झालं होतं. पण आम्ही ते सगळं सोडून देऊन पाऊस थांबल्यावर पुन्हा आमचा सिटी टूर सुरु ठेवला. 

चांगला अनुभव

संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरु झाला आणि आम्ही पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जेवणासाठी रेस्टॉरंट शोधत होतो. पुन्हा आम्हाला एक इटालियनच रेस्टॉरंट सापडलं. हे तर दुपारच्या रेस्टॉरंट पेक्षा हाय फन्डू होतं. दुधाने तोंड पोळलं कि माणुस ताकही फुंकुन पितो. त्यामुळे पुन्हा आम्हाला वाटलं हे लोकही कदाचित आम्हाला आत घेणार नाहीत, आपण आपलं मॅकडी वगैरे शोधू. तर काय आश्चर्य! आम्ही त्या रेस्टॉरंटच्या जवळ जातो न जातो तोच आतल्या वेटर ने हसुन आम्हाला आतमध्ये जागा आहे असं सांगितलं. आम्ही व्यवस्थित रेनकोट्स बाहेर काढून आत गेलो. त्याने त्याच अदबीने आमची ऑर्डर घेतली. अगदी आपुलकीने पास्ता स्पायसी करू ना विचारलं. आम्ही अगदी पोटभर जेऊन खुश झालो. बिल देताना तो वेटर आमच्याशी मस्त गप्पा मारत होता. "तुम्ही भारतीय ना? मला तुम्हाला पाहुनच समजलं. म्हणूनच मी पास्ता स्पायसी बनवू ना म्हणालो. कारण आमच्याकडे भारतीय लोक आले कि आधी जेवण स्पायसी बनवा सांगतात. पुढच्या वेळी बुडापेस्टला आलात कि या नक्की." किती छान वाटलं म्हणून सांगू, दुपारपासून मनावर पसरलेलं मळभ क्षणात दूर झालं.

आई मला लहानपणापासुन सांगते की जिभेला नेहमी गुळ खाऊ घालावा, म्हणजे माणसं जोडली जातात.  तेच खरं!! एक मात्र खरं आहे. जगात कुठेही जा माणसाची वृत्ती सगळीकडे सारखीच!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

वाचकांना आवडलेले काही