शुक्रवार, २३ मार्च, २०१८

स्वप्नातली "ती"

नविन वर्ष सुरु होताना इतकं छान वाटतंय म्हणून सांगु! उद्या "ती" येणार आहे. किती दिवस झाले खरंच. खरंतर २-४ वर्षच झाले आहेत पण असं वाटतंय की युगे लोटलीत भेट होऊन. कसं आणि काय करावं; काही म्हणून सुचत नाहीये. पाडवा आहे म्हणुन पुरण तर घालणार आहेच मी पण अजून काय विशेष करावं बरं? तसं आधी गुलाबजामूनच करायचा बेत होता. पण "ती" येणार आहे असं कळाल्यावर बिनधास्त पुरणाचा घाट घालणार आहे मी.

इथे आल्यापासून नुसती वाटच पाहणे चालू आहे "तिची". "ती" कधी इथे येईल असं वाटलंच नव्हतं; पण अगदी उद्या येतीये म्हणजे दुधात साखरच जणु! माझ्या आनंदाला तर पारावारच नाही उरला. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि "ती" येतेय असं झालंय. वेळ अगदी मुंगीच्या पावलाने पुढे सरकतोय असं वाटतं आहे. मनाला एक प्रकारची शांती मिळतेय "ती" येणार म्हटलं की. नाचावसं वाटतंय, पंख लावून उडावसं वाटतंय. अहाहा "ती" येतीये!

इतकं भारी वाटत आहे ना! मैत्रिणीला भारतात फोन करून ही आनंदाची बातमी सांगिलीच मी. तिला वाटलं मला हर्षवायुच झालाय. पण शेवटी तिलाही माझ्या भावना कळल्याच कारण तीही कधी ना कधी तरी अशा परिस्थितीतून गेलीये ना. आम्ही खूप गप्पा मारल्या मग तिच्याविषयी. हा तर नेहमीचा जिव्हाळ्याचा विषयच आहे म्हणा!

माझा एकंदर नुर पाहुन नवऱ्याला काळजी वाटतेय. पण त्याला काय कळणार; मला किती निवांत वाटतं आहे ते. तो सारखा म्हणतोय "तु बरी आहेस ना गं?"  मी सांगितलं त्याला "अरे "ती" येतीये ना त्यामुळे मला कीनई फार भारी वाटतंय रे." तर म्हणे " माझी पण इतकी वाट पाहत नाहीस कधी!" आता त्याला काय सांगणार फरक. असो. माझ्या मनात उकळ्या फुटत आहेत हे कसं समजवणार त्याला. कोणी काहीही म्हणो पण ती आली की फेसबुकवर पोस्टच टाकणार आहे मी "फिलिंग व्हेरी हॅप्पी किंवा फिलिंग रिलॅक्सड किंवा फिलिंग फेस्टिव्ह विथ ती. "

एकदाचा पाडव्याचा दिवस उजाडला. सगळं पटकन आवरून, पुरणावरणाचा स्वयंपाक करुन, मस्तपैकी जेवण उरकुन मी आपली तिची वाट पाहत बसले आणि कधी डुलकी लागली ते कळलंच नाही. आनंदाच्या भरात झोपेतही अचानक कुठून तरी मंद संगीताचे सूर ऐकू यायला लागले. पण हळुहळू आवाज खूपच वाढायला लागला, मला वाटलं दारावरची बेल वाजली. तीच आली असेल. धडपडत उठले, वाटलं पटकन दार उघडु आणि पाहते तर.....

आजूबाजूला सगळी शांतता होती आणि माझ्या फोनमधला अलार्म वाजत होता.
.
.
.
.

हाय रे कर्मा! म्हणजे ती स्वप्नात सुद्धा माझ्या इथल्या घरी आलीच नाही? म्हणजे सगळे पुरणाच्या स्वयंपाकाचे भांडे मलाच घासावे लागणार??



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                    

बुधवार, १४ मार्च, २०१८

अजबच आहे खरं!

काहीकाही लोकांचं खरंच फार आश्चर्य वाटतं कधीकधी! अजब प्रकार असतात एकंदर.

आता माझी शेजारीण मॅगी काकुचेच बघा ना; त्या कुठून बाहेरून येत असतील आणि मी बाहेर निघाले असेल आणि आमची जिन्यात अथवा लिफ्ट मध्ये भेट झाली तर इतकं हसून आणि प्रेमानी बोलतील की बास. जसं  काही जन्मल्यापासुन मी ह्यांच्याच शेजारी राहतेय! त्याच मॅगी काकु त्यांच्या घरातुन बाहेत पडायच्या तयारीत असतील आणि मी माझ्या घरातून बाहेर पडुन त्यांच्या घरात डोकावत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर चक्क तोंडावर दार लावतात. तू कोण अन मी कोण? असं कुठं असतय होय? इथे आपण आपल्या घराबाहेर शेजारी उभे असतील तर पटकन घरात बोलवतो. एक दिवस बळजबरी त्यांच्या घरात घुसावच  म्हणतेय. कळेल तरी काय खजिना दडवून ठेवलाय ते. 

मी रोज ज्या वेळेला स्टेशनला जाते त्याच वेळेला तिथे तिकीट मशीनच्या आसपास एक इसम फिरत असतो. चांगला तरणाताठा आहे. पण तरीही लोकांना तिकिटासाठी पैसे मागत फिरत असतो. बरेच लोक पैसे देतात; त्या लोकांना ओरडून सांगावंसं वाटतं "अहो नका देऊ पैसे, बिअर पितंय ते येडं तुमच्या पैशात". कारण मी लेकाला घेऊन येताना पाहते तर स्टेशनवरच्याच दुकानात बिअर घेत असतो. त्याच स्टेशनवर एक आजोबा हातात पुस्तक उंचावून सलग उभे असतात कारण त्याचं पुस्तक विकलं जावं म्हणून. मी जातानाही ते उभेच असतात आणि येतानाही. किती हा विरोधाभास.

दुसऱ्या एका स्टेशनवर एक आज्जी, आज्जीच बरंका; एकदम सुकड्या, हवा आली तरी पडतील अश्या आणि अविर्भाव एखाद्या बॉडीबिल्डरचा. एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बिअरची बाटली घेऊन अक्षरशः झुलत असतात रोज. एवढ्या झुलतात तर गपगुमान लिफ्टने यावं ना स्टेशनवर; पण नाही त्या पायऱ्यांनींच येतात. दोन पायऱ्या चढतात एक उतरतात पुन्हा दोन चढतात एक उतरतात; वाटतं पडतेय आता ही बाई दाणकन पण नाही त्या असं करत वर पोहोचतात. बरं कोणी मदत करायला गेलं तर त्या माणसाला शिव्यांची लाखोली अगदी ठरलेली. मी खाल्या आहेत एकदा शिव्या. जर्मन भाषेतील बऱ्याच शिव्या कळायला त्यांच्यामुळे फार मदत झाली मला. सिगरेट पितच ट्रेनमध्ये चढतात आणि मग इतर प्रवाश्यांवर आरडाओरड करतात. मग ट्रेनचालक येऊन त्यांना समज देतो तेव्हा कुठे सिगरेट बाहेर फेकतात आणि मग एकदाची ट्रेन निघते.

जवळच्या सुपरमार्केटमध्ये एक आजोबा अधूनमधून दिसतात. "ह्या ह्या ह्या ह्या" हसत असतात; तेही जोरजोरात. बिलींच्या रांगेत त्यांच्या पुढे मागे असणाऱ्या लोकांचे सामान स्वतःचं म्हणून घेऊन टाकतात आणि पुन्हा " ह्या ह्या ह्या ह्या". आपण पुन्हा लेकाला पिटाळायचं सामान आणायला. आज आम्हाला विचारलं "तुम्ही इंडियन आहेत का? फारच छान देश आहे. मी इंग्लडला असताना गेलो होतो." पुन्हा " ह्या ह्या ह्या ह्या". भारताला गरीब न म्हणता चांगला म्हणणारा परदेशी माणुस; हा तर चमत्कारच म्हणायचा! मग लक्षात आलं की आजोबांच्या डोक्यावर  परिणाम झालाय.

मुलाला मस्त सरप्राईज देऊ वगैरे विचार डोक्यात ठेवुन, आई खूप दिवसांनी उत्साहाने शाळेत जाते त्याला घायला. आईला पाहुन "काय यार आई; तु कशाला आलीस मला घ्यायला? मी येतोय ना माझा माझा" असं म्हणणारा लेक! फार म्हणजे फारच गंमत वाटते बुआ.


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                         

गुरुवार, ८ मार्च, २०१८

महिलादिन वगैरे

आज घराबाहेर पडले आणि गेटच्या बाहेर गेले तर समोर एक इतकी गोंडस मुलगी प्रॅममध्ये होती जसं काही बाहुलीच आणि तिची आई पण एकदम गोड हसली माझ्याकडे पाहुन. त्या सुरेख बाहुलीला बाय करून सुपरमार्केटमध्ये गेले तर बिलिंग काउंटरला त्याच पिअर्सड काकु; मस्त स्माईल दिली त्यांनी निघताना.

कपड्यांच्या दुकानात गेले तर तिथल्या काकु एकदम टापटीप आणि वेल ड्रेस्ड. पुढे एका बेकरीत गेले तर तिथल्या दोघी जणी हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाला जे जे पाहिजे ते पटापट देत होत्या. अंडरग्राउंड ट्रेनमध्ये बसले आणि पुढच्या स्टेशनची अनाउन्समेंट ऐकली तर एका काकूंचा आवाज आला; अरेवा म्हणजे ट्रेन काकू चालवत होत्या.

काय मस्त योगायोग होतो ना कधीकधी! सगळीकडच्या ह्या स्त्रिया आणि त्यांचा आत्मविश्वास बघुन मलाही एक वेगळाच आत्मविश्वास आला. त्यात पुन्हा चिरंजीवांनी भेटल्याभेटल्या "अग आई तुला Happy Women's Day! मला शाळेत कळालं आज Women's Day आहे."  घरी आलो आणि फ्रिजमध्ये ठेवलेलं चॉकलेट दिलं मला; भेट म्हणुन. मी काहीच न सांगता स्वतःचं सगळं नीट आवरलं आणि मला प्रश्न विचारला..

.
.
.
.

"आई आज रात्री जेवायला काय करणार आहेस?"


#जागतिक_महिला_दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जरा उशीरच झालाय.. पण तरीही.



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                       

वाचकांना आवडलेले काही