शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

Visa_ची_कहाणी भाग २

संभाजीनगरला विमान उतरतं आणि तुमच्या फोनवर ह्यांचा मेसेज आलेला असतो. ''आधी FIR नोंदव''. झालं, आता पोलीस स्टेशनचा रस्ता धरावा लागतो का काय आधी? डोकं भन्न झालेलं असतं. मावसभावासोबत घरी पोहचून, आता ही बातमी आईवडिलांना कशी सांगावी ह्या विचारात तुम्ही असता. चहापाणी झाल्यावर तुम्ही आईवडिलांना सांगून टाकता. आता ''टेन्शन यादीत'' अजून लोकांची भर पडलेली असते. 

मावसभाऊ बिचारा त्याचे सगळे कामं सोडून तुमच्यासोबत जवळच्या पोलीस स्टेशनला येतो. तिथे गेल्यावर पोलिस मामाही शिकवायला लागतात, ''असं कसं हरवलं मॅडम कार्ड? लक्ष द्यायचं ना तुम्ही. आता झाली की नाही पंचाईत! तुम्हाला ऍफिडेव्हिट करावं लागेल FIR नोंदवायला.'' 

ऑनलाईन FIR करता येते हे जेव्हा गुगल बाबा तुम्हाला सांगतं तेव्हा तुम्ही सरळ मुंबईच्या जर्मन कॉन्सुलेटला फोन लावता. त्यांचा फोन लागणे म्हणजे जग जिंकण्याचा प्रकार आहे. दहा पंधरा वेळा कॉल केल्यावर एकदा कधीतरी तिथला बाप्या फोन उचलतो. 

तुम्ही त्या दादाला सगळी परिस्थिती समजावून सांगत असता की काय झालंय ते. ते सांगत असताना तुम्ही चुकून तुमचा Visa हरवला आहे असं सांगता तर तो दादाही उचकतो आणि म्हणतो ''मॅडम तुमचं जर्मन रेसिडेंट परमिट हरवलं आहे असं सांगा, Visa हरवला आहे असं नका सांगू. तुम्ही मला गोंधळात टाकताय. रेसिडेंट परमिट म्हणा रेसिडेंट परमिट!'' तुम्ही पुन्हा मनातच, ''हो बाबा आता तूच राहिला होतास माझ्यावर चिडायचा.'' मग तो सांगतो की ऑनलाईन FIR चालते, त्याची PDF आणि बाकी सगळ्या कागदपत्रांची PDF पाठवा, तुमची केस रजिस्टर करतो. इथं थोडा जीव भांड्यात पडतो. थोडी अंधुक आशा निर्माण होते की ''तात्पुरता Visa'' मिळेल लवकरच कारण तुम्ही परत जायचं तिकीट आधीच काढलेलं असतं.

आता तुम्हाला ''टेन्शन यादी'' वाढवायची असल्यामुळे, तुम्ही पुण्यात घरच्या सगळ्यांना फोन करून सद्यःपरिस्थतीची कल्पना देता. नंतर आईकडे असलेल्या कार्यक्रमात संभाजीनगरच्या सगळ्या नातेवाईक आणि मित्रपरिवारात ‘’राजश्रीचा Visa हरवला'' ही बातमी वाऱ्यासारखी पसरते.. अहं viral होते. सगळेजण काही ना काही उपाय सुचवतात. आता तुमच्या ''टेन्शन यादीत'' लोकांची भर पडतच असते. सगळे फोन करून धीर देत असतात. 

एक रागावलेला माणूस ''अमुक करून बघ, तमुक करून बघ, कॉन्सुलेटला रोज फोन लाव, त्यांना सांग अपॉइंटमेंट द्या लवकर, तरी मी तुला सांगत होतो ती पर्स घेऊन जाऊ नको.'' असं सांगत असतो. हे सगळं बघून तुम्हाला जाणीव होते की आपण आयुष्यातली फार मोठी माती खाल्लेली आहे. तुम्हाला कळून चुकलेलं असतं की निघायच्या आधी 'हे' सांगत होते ते बरोबर होतं. 'ही पर्स नेऊ नको, ह्यातून काहीही खाली पडायची शक्यता आहे'. पण नवऱ्याचं ऐकेल ती बायको कसची. ''विनाशकाले विपरीत बुद्धीला'' अनुसरून तुम्ही चुकीची पर्स घेता. त्यात पुन्हा कार्ड आतल्या कप्प्यात नीट ठेवत नाही, त्याची चेन नीट लावत नाही, घाईगडबडीत पर्स खाली पाडता, त्यातून कार्ड पडले असेल हा विचारही तुमच्या मनाला शिवत नाही! 

खरंतर जर्मन सरकारला सांगायला पाहिजे, असं डेबिट कार्डसारखं सुळसूळ कार्ड कुठे रेसिडेंट परमिट म्हणून देतात का? आधीसारखं पासपोर्टात छापून द्या की म्हणजे हरवायचा प्रश्नच नाही!

हे असे सगळे विचार करून आता काहीही उपयोग नसतो. आल्या परिस्थितीला तोंड देणं भाग असतं. आता सगळी भिस्त जर्मन कॉन्सुलेट आणि म्युनिकच्या फॉरेन ऑफिसवर असते. तुम्ही आणि तुमच्याबरोबर ''टेन्शन यादीतले'' सगळे आतुरतेने Visa Interview च्या अँपॉइन्टमेन्टची वाट पाहत असता. 


क्रमशः




Visa_ची_कहाणी भाग १

आईवडिलांनी संभाजीनगरात एक कार्यक्रम ठेवलेला असतो म्हणून तुम्ही "आनंद पोटात माझ्या माईना" म्हणत म्हणत, एकट्याच(हा शब्द फार महत्वाचा आहे ह्याठिकाणी) म्युनिकहून मुंबईला प्रस्थान करता. आता माहेरी जायचं म्हणलं सगळीकडे "आनंदी आनंद गडे" असतो, हो ना? 

एकीकडे मनात हुरहूर असते की आत्ताच लेकराची internship सुरू झालीये, त्याचं सगळं व्यवस्थित होईल की नाही? पण त्याच्या बाबांनी तुम्हाला ग्वाही दिलेली असते की तू निर्धास्त रहा, आम्ही बघतो. अशा सगळ्या विचारांमध्ये तुमचं आनंदी विमान मुंबईला उतरतं. रात्री बाराला तुम्ही विमानाच्या बाहेर येता आणि immigration counter चा रस्ता धरता. मुंबई विमानतळावर नेहमी भली मोठी रांग असते immigration साठी. 

पर्स सांभाळत तिथल्या अधिकाऱ्याला तुम्ही तुमचा पासपोर्ट आणि जर्मन रेसिडेंट परमिट कार्ड दाखवता. अधिकारी दादा गप्पा मारत मारत ते चेक करतात. ''किती वर्ष झाली तुम्हाला जर्मनीत? इकडे काय सुट्टीला आलात का? आता कोणत्या गावाला जाणार? इत्यादी इत्यादी. "एकतर रात्रीचे साडेबारा झाले आहेत त्यात माझ्या मागे एवढे लोकं आहेत रांगेत आवरा की पटापटा दादा, ही काय गप्पा मारायची वेळ आहे का?" हे शब्द मनातच बोलून तुम्ही त्यांनी परत केलेला पासपोर्ट आणि जर्मन रेसिडेंट परमिट कार्ड पर्समधे व्यवस्थित(??????) ठेवून तिथून बॅगा घ्यायला निघता.

बॅगाना ट्रॉली न घेता(अतीआत्मविश्वास अन दुसरं काय! ह्यापुढे एखादी चिंगरी बॅग जरी जवळ असेल तरी मी मोठ्ठीच्या मोठ्ठी ट्रॉली घेणार आहे!!)) दोन हातात दोन बॅगा घेऊन तुमची वरात डोमेस्टिक एअरपोर्टला जाणाऱ्या बसकडे निघते. त्यादरम्यान लिफ्टच्या जवळ पर्स कधीतरी खांद्यावरून पडते, मोठी बॅग आडवी होते. घामाने जीव नकोस केलेला असतो. कसंतरी तुम्ही बसजवळ पोहोचता, तिथले लोक तुमचा अवतार बघून विचारतातच, ''ताई ट्रॉली नाही घेतली का बॅगाना?'' कसनुसं हसून तुम्ही ''हो, राहिलीच घ्यायची'' म्हणून बसमध्ये जाऊन बसता. 

साधारण रात्री एकच्या आसपास बस डोमेस्टिक एअरपोर्टला पोहोचते. पोटात कावळे कोकलत असतात. पण सकाळी साडेपाचला संभाजीनगरचं विमान असल्यामुळे तुम्ही निर्धास्त असता. आता तिथे उतरून काहीतरी खाऊया असा विचार करून, तुम्ही बॅगा घेऊन इंडिगोच्या काउंटरवर जाता. तिथे बोर्डिंग पास दाखवल्यावर तुम्ही तुमचा पासपोर्ट दाखवण्यासाठी काढता. त्यात तुम्हाला तुमचं रेसिडेंट परमिट कार्ड दिसत नाही. पण तुम्ही पासपोर्ट दाखवता आणि मोठी बॅग चेकिन करता. 

तो सोपस्कार पार पडल्यावर आधी तुम्ही तुमच्या पर्सचा आतला कप्पा व्यवस्थित बघता आणि तिथे तुमचं जर्मन रेसिडेंट परमिट कार्ड नसतं. पोटात मोठ्ठा गोळा येतो. प्रचंड तणावाखाली तुम्ही तिथेच खाली बसकण मारता आणि भराभर पर्समधल्या सगळ्या वस्तू जमिनीवर टाकता. तरीही कार्ड कुठेच सापडत नाही. तुम्ही पॅन्टचे खिसे, बॅगेचे सगळे कप्पे, पुन्हा एकदा पर्स तपासता. पण कार्डचा कुठेच पत्ता नसतो. तिथे दारातल्या पोलिसांना सांगून आजूबाजूला शोधाशोध करता. एव्हाना पोटातला गोळा वाढत चाललेला असतो, काय करावं सुधरत नसतं. पायाखालची जमीन सरकणे म्हणजे नेमकं काय असतं, ह्याचा तुम्हाला प्रत्यय येतो. 

जर्मन रेसिडेंट परमिट हरवणे म्हणजे पुन्हा जर्मनीत ''नो एन्ट्री''!! ह्या विचारसरशी अंगावर सरसरून काटा येतो, दरदरून घाम फुटतो आणि मग तुम्ही घाबरत घाबरत ह्यांना फोन लावता. ''कार्ड सापडत नाहीये'' म्हणल्यावर तिकडून काय बोलणे बसणार आहेत हे माहित असतंच. पण दुसरं गत्यंतरही नसतं ना! बोलणे खाऊन झाल्यावर तुमच्या लक्षात येतं की आता पुन्हा शोधाशोध करायला आतंरराष्ट्रीय विमानतळावर तुम्हाला कोणीही आत जाऊ देणार नाहीयेत आणि जाऊ दिलं तर इकडचं संभाजीनगरचं विमान सुटेल. 

ह्या सगळ्या कश्मकश अवस्थेत तुम्ही विमानाच्या गेटवर येता. तेवढ्यात जर्मनीत असलेल्या भाचीचा उत्साहात फोन येतो. ''मावशी पोहोचलीस का? प्रवास कसा झाला? तुला एकटीला भारी वाटत असेल ना?'' तिच्या आनंदावर विरजण टाकणारं वाक्य तुम्ही तिला सांगता ''माझं रेसिडेंट परमिट सापडत नाहीये, मी बोलते तुझ्याशी नंतर''. ती बिचारी अविश्वासाने फोन ठेवते. माझ्याबरोबर आता अजून चार व्यक्ती माझ्या कार्ड हरवल्याच्या ''टेन्शन यादीत'' येतात. लेक, त्याचे वडील, भाची आणि जावई. 

थोडं डोकं शांत झाल्यावर, विमानतळाच्या लॉस्ट अँड फाउंडला तुम्ही तक्रार नोंदवता. जर्मनीत असलेले तीन लोक तुम्हाला धीर देत असतात, लेक, भाची आणि जावई पण चौथा माणूस तुमच्यावर रागावलेलाच असतो, अर्थात प्राणनाथ!! रागावलेले असले तरीही पुढे काय करता येईल ह्याचा शोध ते घेत असतात. आता तुम्ही शरीराने आणि मनाने पार कोलमडून गेलेल्या असता. शेवटी पहाटे साडेतीनला तुम्ही ह्यांना सांगता की कृपया आता झोपा. आपण, मी संभाजीनगरला पोहोचले की पुढे काय करायचं ते बघू. पहाटे चार वाजता तुम्ही कसाबसा एक चहा घशाखाली उतरवता आणि संभाजीनगरला जाणाऱ्या विमानाची वाट पाहत बसता!!

क्रमशः




बुधवार, १५ जुलै, २०२६

मी मज हरपून बसले ग

अडीच तीन महिन्यांपूर्वी माझ्या फोनला माझा इतका कंटाळा आला, इतका कंटाळा आला की एक दिवस अचानक त्याने असहकारच पुकारला! मैत्रिणीशी एक दोन तास व्हाट्सऍपवर गप्पा काय मारल्या, त्याची बॅटरीच फुगायला लागली.  नाही म्हणायला नऊ वर्ष साथ दिली बिचाऱ्याने! कसातरी त्यातला डेटा रिकव्हर केला आणि त्याला जड अंतःकरणाने रिसायकलिंग सेंटरला देऊन आले! 

आणि मी सोशल मीडियावरून गायबच झाले. त्याचं झालं असं की फेसबुकला माझ्या कामासाठी Two Factor Authentication ठेवलं होतं आणि हे मी पार विसरूनच गेले होते कारण ऍपवर आपण लॉगिन केलेलंच असत ना! पण फोन गेल्यावर झुक्याभाऊ काही केल्या मला लॅपटॉपवर लॉगिन करू देईना! बरं नवीन फोन कोणता घ्यायचा? ह्यावर ''चायपे चर्चा'' चालू होती त्यामुळे मी तेव्हा ना व्हाट्सऍपवर होते, ना फेबुवर, ना इन्स्टावर!!

म्युनिकला आल्यापासून भारतात सगळ्यांशी व्हाट्सऍपवरच गप्पागोष्टी चाललेल्या असतात. एकवेळ फेबु आणि इन्स्टा नसेल तरी काही वाटत नाही पण व्हाट्सऍप नाही म्हणलं की... असो. नवीन फोन घेण्याविषयी चर्चा आणि तो हातात येईपर्यंत बरेच दिवस गेले. त्यादरम्यान मुलाचा फोन महत्वाच्या कॉल्ससाठी वापरत होते. तोवर इकडे मैत्रिणींचे मेसेजेस, कॉल्स WA वर धडकत होते पण मला त्याचा गंध नव्हता. स्टेटस टाकणे नाही की डिपी बदलणे नाही. सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता ''ही बाई गेली कुठे?''

पहले दोन चार दिवस खरोखर ''मी मज हरपून बसले ग'' वाटायला लागलं होतं. संन्यास घेतलाय की काय आपण? असे नसते प्रश्न पडायला लागले होते. ''कोई किसीका नहीं, ये झुठे...'' असे दुःखी गाणे आठवायला लागले. खरंतर माणसाने इतकंही कोणत्या गोष्टीच्या आहारी जाऊ नये हे कळायचं वय आहे अजून माझं! पण कसं आहे ना... जाऊदे.  माझा फोन काय बंद पडला, घरात माझी नुसती फरपट चालू होती. आजकालच्या काळात साधा एक फोन नसला तुमच्या हातात तर लोक तुम्हाला हिंग लावूनही विचारत नाहीत, हे कळायला वेळ नाही लागला मला. 

मुलाचा फोन मागितला की त्याला त्याच्याकडच्या छुप्या खजिन्याचा नकाशा मागितल्यासारखं वाटायचं. ''हं, एक मिनिट आई, मी अनलॉक करून देतो, मी WA ला कॉल लावून देतो, तुला काय सर्च करायचं आहे? मी शोधून देतो, किती फोन येतात तुला? माझा नम्बर तू किती लोकांना दिला आहेस?'' अशा प्रकारची प्रश्नावली तो माझ्या समोर ठेवायचा. इकडच्या स्वारीला आपण म्हणावं ''फेबुवर काय चालू आहे ते बघू बरं जरा मला'' तर त्यांचं अजून तिसरंच काहीतरी असायचं, जसं की ''तुमच्या फेबूची मजा आमच्या फेबूमधे कुठे?'' आता बोलावं तरी काय माणसाने!

हे सगळं असं चालू होतं आणि झुक्याभाऊ काही केल्या मला माझ्याच फेसबुकला लॉगिन करू देत नव्हता. सहन तरी किती करायचं? नाही का? शेवटी मी झुक्याचा नाद सोडला आणि स्वतःच्या मनाची समजूत घातली की ''त्या फेसबुकला एवढं काय सोनं लागलं आहे? दे सोडून, त्याच्या बाहेर पण जग आहे, वगैरे.'' मग नवीन फोन आला एकदाचा. फोन आल्या आल्या मैत्रिणींना WA वर कळवलं ''अभी हम जिंदा है!'' मैत्रीणींचे काळजीचे मेसेजेस वाचून नवीन फोन घेतल्याचं सार्थक झालं! त्यात इथली एक गोड मैत्रीण ''जयश्री'' पण होती!

दोन महिन्याचा अवकाश आणि झुक्याभाऊंच्या लोकांना केलेल्या मेलामेली नंतर, कसंतरी माझं अकाउंट रिकव्हर झालं एकदाचं! इजारमध्ये घोडं नहालं. पण फेबूवर नव्हते तेव्हा मात्र ''कई दिनोसे शिकायत नहीं जमानेसे'' ह्या ओळीचा प्रत्यय आला. कारण उखाळ्यापाखाळ्या करता नाही आल्या आणि कोणाच्या वाचता ही नाही आल्या, काही विषय झाला असेल तर तिसऱ्याच कोणाच्या तरी अकाउंटवर जाऊन, अर्थार्थी संबंध नसलेल्या लोकांच्या कमेंट्स वाचता नाही आल्या, घेणं देणं नसताना फुकटचा  कंदील लावता नाही आला. आता लिहू तरी काय का? ही यादी न संपणारी आहे! 

ते सगळं जाऊदे,  तुम्ही सगळे कसे आहात?


#माझी_म्युनिक_डायरी







मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

एका देवमाश्याची गोष्ट

जगभरात युद्ध सुरु असताना, धुरंधर-२ आल्यावर भारतात जसा तो राष्ट्रीय मुद्दा बनला होता तसा सध्या जर्मनीत एक मोठाच राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाला आहे. तो आहे, जर्मनीच्या किनाऱ्यावर अडकलेला 'टीमी' नावाचा देवमासा! 

साधारण मार्चच्या सुरुवातीला टीमी चुकून बाल्टिक समुद्रात आला. देवमासाच (Humpback whale) तो, खोल महासागरातून तो उथळ किनाऱ्यावर आल्यामुळे अडकला. सगळ्यात आधी त्याला इथल्या कोळ्यांनी पहिले कारण तो त्यांच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर त्याच्या अडचणींमधे भर पडतच गेली, बाल्टिक समुद्राचं पाणी त्यामानाने कमी मीठ असलेलं आहे म्हणे आणि त्यामुळे त्याच्या त्वचेवर परिणाम झाला. त्याला बिचाऱ्याला अन्नाची कमतरता भासायला लागली, आणि सगळ्यांत महत्वाचं, त्याला परतीचा मार्गचं सापडत नव्हता. 

टीमीला वाचवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. बोटींच्या साहाय्याने त्याला खोल पाण्याकडे वळवण्याचा प्रयत्न झाला. तो जिथे अडकला होता तिथली वाळू काढून त्याला मार्ग करून देण्यात आला. तज्ञ  लोकांच्या मार्गदर्शनाखाली, मोठमोठे फुगे, दोर, टगबोट इत्यादी बऱ्याच गोष्टी वापरल्या गेला. जर्मन सरकारने त्यांच्या परीने बरेच प्रयत्न करून पहिले परंतु दुर्दैवाने सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. शेवटी १ एप्रिलला सरकारने ही बचाव मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. 

पण, इतके दिवस हे सगळं जर्मन जनता रोज टीव्हीवर लाईव्ह बघत होती. त्यातल्या खूप लोकांसाठी ''टीमी'' हा एक भावनिक मुद्दा बनला होता. सरकारने बचाव मोहीम थांबवल्याचे कळताच, काही लोकांनी टीमीला वाचवायला स्वतः समुद्रात उड्या मारल्या, तर इतरांनी खूप लवकर "हार मानल्याबद्दल" अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांवर जोरदार टीका केली. ह्या टीमीच्या घटनेमुळे जर्मनीमध्ये इतके तीव्र वाद निर्माण झाले आहेत की काही लोकांनी चक्क सरकारी अधिकारी, तज्ञ आणि बचाव मोहिमेतल्या लोकांना सोशल मीडिया पोस्ट्समधून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत! आणि कहर म्हणजे, ह्या सगळ्या घटनेचे पडसाद इथल्या संसदेत पडले आणि इथल्या पर्यावरण मंत्र्याला लोकांनी धारेवर धरले. बाबो, जर्मन लोकांचा नादच करायचा नाही. निस्त हाण की बडीव चाललंय, शाब्दिक!

पण तज्ञांच्या मते, टीमीची स्थिती इतकी गंभीर झाली होती की त्याला वाचवण्याची शक्यता खूपच कमी होती. अनेक प्रयत्नांनंतरही तो उथळ पाण्यातच राहिला  आणि त्याची शक्ती कमी होत गेली. काही तज्ञांनी तर स्पष्ट सांगितले की त्याला शांतपणे मरू देणेच योग्य ठरेल. खरंतर सध्या जर्मनीत ह्या टीमीबद्दल खूप सहानुभूती निर्माण झाली आहे आणि साहजिकच आहे म्हणा, कोणत्याही निष्पाप जीवाला मदत करणं योग्यच आहे. पण त्याबाबतीतही इथे मतमतांतरे वाचायला मिळत आहे. एका गटाचं म्हणणं आहे की ''आता बास, त्याला एकटं सोडा. अजून त्याची क्रूर चेष्टा करू नका. त्याचं जे होईल ते निसर्गावर सोडा!'' दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की ''त्याच्याविषयी करुणा बाळगा आणि त्याला इच्छामरण द्या!'' आणि तिसऱ्या गटाचं म्हणणं आहे की ''असं कस? बचावकार्य सुरूच राहिलं पाहिजे, ते आपलं नैतिक कर्तव्य आहे!''

हे सगळं असं सुरु असताना, त्यात दोन बड्या धेंडांनी उडी घेतली. इथल्या दोन मोठ्या उद्योगपतींनी टीमीच्या सुटकेसाठी लाखो युरोजची मदत दिली. त्यामुळे  बचावकार्याला पुन्हा वेग आला. आता ते खाजगी बचावकार्य झालंय, सरकारी यंत्रणेने हात आधीच वर केलेत. आजच्या माहितीनुसार, टीमी प्रयत्न करतो आहे परंतू तो दिवसेंदिवस थकत चालला आहे आणि ते लोक आता त्याला महासागराकडे नेण्याचा शेवटचा प्रयत्न करणार आहेत!

मी सुरुवातीला ही बातमी वाचली होती. पण त्या बातमीमुळे जर्मनीत राष्ट्रीय प्रश्न निर्माण झालाय हे मुलाकडून समजलं. म्हणून मग सगळ्या घटनेचा धांडोळा घेतला आणि त्या बातम्या रोज वाचत राहिले. नंतर मी ही टीमीसाठी आस लावून बसले होते. पण आजची परिस्थिती वाचून मी टीमीला आता देवाच्या हवाली केलंय ! ईश्वर त्याचं भलं करो हीच प्रार्थना!!

#माझी_म्युनिक_डायरी

#timmi_the_whale

#timmi

PC: Google






रविवार, १५ मार्च, २०२६

लहरीपणा

जर्मनीमध्ये एक म्हण आहे “Es gibt kein schlechtes Wetter, nur schlechte Kleidung“. म्हणजे “खराब हवामान वगैरे काही नसतं, तुम्ही घातलेले कपडे खराब(चुकीचे) असतात!“ ह्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की आपण हवामानाला साजेसे कपडेच घातलेले नसतात! 

खरंतर कितीही साजेसे किंवा योग्य कपडे घातले तरीही इथल्या लहरी हवामानात ते नेहमी अयोग्यच ठरतात. बरं नुसते कपडेच नाही,  तर खेटरं सुद्धा! खरंतर इतका लहरीपणा बायकाही करत नसतील कदाचित, म्हणजे “एकाच दिवसांत इतका लहरीपणा”, असं म्हणायचं आहे मला. बायका आणि लहरीपणा करणार नाहीत? ऐसा कैसे हो सकता है भला? हो ना मित्रांनो? (प्रतिक्रिया नाही दिलीत तरी चालेल!) 

तर, वरील जर्मन म्हणीचा प्रत्यय वेळोवेळी येतंच असतो इथे. आता कालचीच गोष्ट आहे. मी सकाळी व्हाट्सअपला स्टेटस टाकलं होतं की सध्या “चुकीचं जॅकेट" नावाचा ऋतू सुरु झालाय आणि कालच्या हवामानाने ते दाखवूनही दिलं. दुपारी बाराच्या आसपास १४ डिग्रीज असलेलं तापमान संध्याकाळी अक्षरशः उणे दोन डिग्रीजच्या रिअल फिलला आलं. म्हणजे “दुपारी छान आहे हवा” म्हणून दिवसभर कुठे तरी भटकायला बाहेर पडावं तर दोन चार तासात गारठून जीव जायची वेळ येते. 

मागच्या आठवड्यात असं वाटत होतं की जसं काही आता उन्हाळाच सुरु होतोय इथं! चक्क १५-१८ डिग्रीज तापमान होतं. सगळी जर्मन जनता, लेकरंबाळं, मित्रमैत्रिणी, सायकली घेऊन दिसेल त्या पार्कात, नदीकिनारी भटकंती करत होते. एक दोन जर्मन मैत्रिणींनी लगे इन्स्टावर स्वतःच्या लेकरांच्या फोटोसहीत “Season’s first ice cream ” वगैरे स्टेटस टाकले होते. 

तापमान १५ ला गेलं की जर्मन लोक चंबूगबाळं घेऊन उंडारत असतात, लगेच आईस्क्रीमची दुकानं गर्दीने भरून वाहू लागतात, कॅफेजमध्ये बसायला जागा मिळत नाही, बिअरगार्डन्स दुथडी भरून वाहू लागतात! इथं १५ डिग्रीला ला माझं फक्त जॅकेट बदलतं आणि हे लोक थंडगार नदीकिनारी गप्पा झोडत आईस्क्रीम खात बसतात राव!! 

हवामानावर गप्पा मारणे हा जर्मन लोकांचा आवडीचा छंद आहे. मला इथे आल्याआल्या वाटायचं की मॅगी काकू कधीही भेटल्या की हवामानावरच का बोलत असतील बरं? पण आता जाणवतंय की  मी ही नवीन माणसाशी इथल्या लहरी हवामानाविषयीच बोलत असते. 

एकंदर काय तर, जर्मन डॉइचं-बान आणि जर्मन हवामान फारच लहरी बुआ! 

(डॉइचं-बान: जर्मनीची रेल्वे सिस्टीम, हिच्याइतक्या लहरी सध्या कोणीच नाहीये इथे, म्हणजे प्रवास पूर्ण होईल की नाही ह्याची पण शाश्वती नसते कधीकधी.)


#माझी_म्युनिक_डायरी  #Munich 






सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

जर्मन लोणचं

साधारणपणे लोणचं म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर कैरीचं, लिंबाचं, मिरचीचं, आवळ्याचं, मिश्र भाज्यांचं इत्यादी लोणची येतात. तसं तर संपूर्ण भारतात हजारो प्रकारची लोणची असतील. पण त्यात “बिनतिखटाचं लोणचं” ही कल्पनाही करवत नाही, कारण तिखटाशिवाय आपली लोणची अपूर्ण आहेत. 

पण जर्मन लोकांना तिखटाचं तर वावडं आहेच पण मिठाचंही आहे. तरीही ते लोणचं करतात आणि खातात सुद्धा. इथल्या लोकांचं सगळ्यात आवडीचं लोणचं म्हणजे काकडीचं लोणचं! 

ते करण्याची पद्धतही सोपी आहे. व्हिनेगरमध्ये जेवढ्यास तेवढं पाणी, थोडं मीठ, भरपूर साखर, एक चमचाभर पिवळी मोहरी, ८-१० मिरे टाकून ३-४ मिनिट उकळून घेतात. एका बाटलीत थोडा शेपू (बाबो शेपू!), छोटे कांदे टाकल्यावर, स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या काकड्या घट्ट बसवतात आणि त्यावर उकळलेलं व्हिनेगरचं पाणी टाकतात. चोवीस तास ही लोणच्याची बाटली बाहेर ठेवून नंतर फ्रिजमध्ये ठेवतात. झालं लोणचं! ह्याच पद्धतीने ह्या लोकांनी हाताला येईल त्या भाजीला व्हिनेगरमध्ये बुडवलं आहे आणि त्याला अमुक, ढमुक, तमुक भाजीचे लोणचे असे गोंडस नाव दिलंय! 

त्या लोणच्यांमध्ये इथे उपलबध असणाऱ्या झाडून सगळ्या भाज्या म्हणजेच अजिबात तिखट नसलेली वेगवेगळ्या रंगाची सिमला मिरची, श्रवणघेवडा, बेबीकॉर्न्स, गाजर, बीट, मश्रुम, हालापिनो, शतावरी, ऑलिव्ह, तिखटाचा लवलेशही नसलेल्या मिरच्या इत्यादी आहेत. महत्वाचं म्हणजे युरोपमधील अत्यंत आवडत्या बटाट्यालाही व्हिनेगरमधे बुडवलंय ह्या लोकांनी. 

इथल्या लोकांना एकंदरच आंबट गोष्टी आवडतात. म्हणजे इथलं प्रत्येक फळ बऱ्यापैकी आंबट आहे, संत्री, सगळ्या बेरीज, इत्यादी. त्यामुळे कदाचित त्यांना ती व्हिनेगरची अती आंबट चव चांगली वाटत असावी पण आपल्या टेस्ट बड्सला आंबटचिंच व्हिनेगर जरा त्रासदायकच आहे! 

मी एक पाहिलंय जर्मन लोक स्वयंपाकाचा फार त्रास करून घेत नाहीत. सोपं आहे आयुष्य त्याबाबतीत त्याचं. दुकानातून, बेकरीतून लागेल त्या गोष्टी आणायच्या आणि घरी येऊन त्या फक्त एकत्र (Assemble) करायच्या आणि खायच्या. उदाहरणार्थ बेकरीतून आवडता ताजा ब्रेड आणायचा, दुकानातून एखादा चिजस्प्रेड आणि हॅम स्लाईसेस आणायच्या, त्याचं सँडविच करायचं आणि दुकानात तयारच असलेलं मिक्सड सलाड आणि काकडीच्या लोणच्यासोबत ते खायचं. झालं ह्यांचं जेवण!! बाकी हे सगळं पचायला बिअर आणि वाईनचचे कारखाने आहेतच की, हाय काय अन नाय! 

जर्मन लोकांची हीच असेम्बलिंगची आवड ओळखून आयकियाने (IKEA) इथे जम बसवला असावा! असो, विषय भरकटतोय. जर्मन लोणच्यांचा व्हिडीओ टाकायचा होता म्हणून हा पोस्टप्रपंच! 


#माझी_म्युनिक_डायरी 

#gewürzgurken #pickles 


Video Link:

https://www.facebook.com/share/r/1KUEyb1Bfs/?mibextid=wwXIfr



मंगळवार, २० जानेवारी, २०२६

ईतना अंधेरा क्यूँ है भाई

२०२६ सुरु झालं नाही तोच बर्लिन मधे बरेच दिवस चक्क लाईट गेले होते. तेव्हा तापमान शून्याच्या खाली होतं. असं म्हणतात की साधारणपणे चाळीस पंचेचाळीस हजार लोक त्यामुळे परेशान झाले होते. तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. 

बर्लिनचं हे प्रकरण एका मित्राला समजलं आणि त्याने मला असंच मेसेज केला की “म्युनिक मधे लाईट आहेत ना? का तिथे पण बर्लिनसारखं झालंय?” ह्या प्रश्नावर नुसतं “इथे लाईट नाही गेले” असं उत्तर मला देता आलं असतं! पण लैच श्यानपना करून मी “अरे म्युनिकमधे कधीच लाईट जात नाहीत 😎” असं उत्तर दिलं! लगे गॉगलवाली ईमोजी, जसं काही इथली वीजपुरवठा कंपनी माझ्या भावाचीच आहे!  

आणि पुढच्या दोनच दिवसांत, लहानपणी शाळेत शिकलेले सगळे सुविचार, म्हणी माझ्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचायला लागल्या! अती शहाणा त्याचा बैल रिकामा, माणूस सवयीचा गुलाम आहे, गर्वाचे घर खाली, अती तेथे माती, देवाच्या काठीला आवाज नसतो! इत्यादी (ह्यात तुम्ही अजून भर घालू शकता). कारण आमच्या घरातल्या अर्ध्या भागातले लाईट्स अचानक फड्फडायला लागले. एक खोली आणि स्वयंपाकघरातला लाईट लावला की घरात भीतीचं वातावरण पसरत होतं. त्यात इथं सध्या अंधारही साडेचार पाचलाच पडतो आणि दिवस सकाळी आठला उजाडतो त्यामुळे तर अजूनच पंचाईत झाली होती. 

माझ्या मनात भीतीदायक विचार यायला लागले. अती भयकथा वाचल्या आणि भयपट पहिले की असंच होतं! पण मग विचार आला, की ही कुठली विचित्र भुताटकी आहे बुआ? ये भूत आखिर चाहता क्या है? हॅंये! अर्ध्याच घरातले लाईट फडफड करत आहेत. लेकाला म्हणाले मी, तर त्याने light fluctuations ची वैज्ञानिक कारणे सांगून माझी बोलती बंद केली. 

नेमका दुसऱ्या दिवशी शनिवार होता. त्यामुळे कोणीच दुरुस्त करायला येणार नाही हे माहीतच होतं. मी मागे म्हणल्याप्रमाणे वरून ब्रह्मदेव जरी झाले आले आणि त्यांनी इथल्या लोकांना शनिवार रविवारी काम करायला लावलं तर ते त्यांचंही नाही ऐकणार नाहीत (अपवाद वगळता)! आम्ही आमच्या घरमालकीण ताईंना सगळी  हकीकत कळवली. तर त्या म्हणाल्या “ही काही इमर्जन्सी नाही त्यामुळे आज तर कोणीच येणार नाही दुरुस्त करायला. आता सोमवारीच येतील कोणीतरी.” आता आमच्यावर म्हणायची वेळ आली की “सेह लेंगे थोडा!”

कसचं सेह लेंगे!! सवयच नाही राहीली बिना लाईटचे कामं करायची. शनिवारी संध्याकाळी तर अर्ध घर अंधारात. अर्ध्या घरातल्या विजेने पूर्णपणे असहकार पुकारला होता! मनात म्हणलं कुठून मला दुर्बुद्धी झाली आणि गॉगलवाली ईमोजी पाठवत शहाणपणा केला, गेले ना लाईट आता. बस आता हरी हरी करत. 

माझी नुसती तगमग तगमग चाललेली. स्वयंपाकघरात जाताना पटकन बोट खटक्यावर जायचं की लेक म्हणायचा ”आई, अगं लाईट गेलेत ना!“ मी लगेच जेन झी भाषेत “अरे मसल मेमरी रे, काय करू?“ 

स्वयंपाकघरात वीजपूरवठा नव्हता त्यामुळे काहीच सुचत नव्हतं. तरी मेणबत्त्या आणि मोबाईलचा फ्लॅश लाईट ह्यावर काम भागवलं कसबसं. नशीब इथले हिटर्स विजेवर चालत नाहीत. नाहीतर उणे तापमानात रात्री गारठायची वेळ आली असती. 

सोमवारी एक दादा दुपारी आला अन त्याने काहीतरी तात्पुरता उपाय करून वीजपुरवठा सुरु करून दिला. जाताना म्हणाला सगळं नीट बघावं लागेल, मी माझ्या बॉसला घेऊन येतो गुरुवारी. 

गुरुवारी दोघे आले. तो दादा इटालियन, आम्ही मराठी आणि ते बॉसकाका जर्मन. असे सगळे वेगवेगळ्या अक्सेंटमध्ये जर्मन बोलत होतो. हा सगळा जर्मन भाषेचा जांगडगुत्ता झालेला असताना, आम्ही सगळे कसंबसं समोरच्याला काय म्हणायचं आहे ते समजून घेत होतो. 

त्यात बॉसकाकांना आमचं घर इतकं आवडलं की विचारूच नका. “म्युनिकमध्ये आठव्या मजल्यावर घर म्हणजे फारच छान हो! वा वा, बाहेर काय छान दिसतंय सगळं, अरेच्या त्या बाजूला गॅलरी आहे आणि आल्प्सही दिसत आहेत, छान छान!“ हे सगळं आम्हाला सांगून झाल्यावर काकांनी बायकोला फोन लावून हे सगळं सांगितलं. आमच्याशी शिळोप्याच्या गप्पा मारल्या. मधे मधे त्या इटालियन दादाला सूचना देणं चालूच होतं त्याचं. वल्ली होते काका एकदम! 

त्या दोघांनी सगळं व्यवस्थित तपासून, वीजपुरवठा का खंडीत झाला? त्याचं कारण शोधून, नीट उपाययोजना केली. आम्हाला समजावून सांगितलं काळजी करू नका आता सगळं व्यवस्थित आहे आणि आमचा निरोप घेतला! 

आणि अशा पद्धतीने “म्युनिकमध्ये कधीच लाईट जात नाहीत”, ह्या माझ्या वक्तव्याला खोटं ठरवण्यात माझ्या घरातले लाईट यशस्वी झाले!!

#माझी_म्युनिक_डायरी





शनिवार, १० जानेवारी, २०२६

पाव पुराण

म्युनिकला रहायला आल्यापासून पहिल्यांदा, जेव्हा तुम्हाला जवळच्या जर्मन सुपरमार्केटमध्ये लादीपाव मिळतात तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो!

आता फक्त घरच्यांनी फर्माईश करायचा अवकाश, की मी त्या रेसिपीरीळवाल्यांसारखं  “दस मिनिटमे”,

पावभाजी म्हणू नका,

वडापाव म्हणू नका,

मिसळ पाव म्हणू नका,

दाबेली म्हणू नका,

इत्यादी पदार्थ त्यांच्या समोर हजर करते की नाही ते बघाच!

इथे घरात ओटीजी असल्यामुळे लादीपाव करणं तसं सोपं आहे, पण फार वेळखाऊ प्रकरण आहे, किमान माझ्यासाठी तरी. आता कसं, इथे योग्य दरात लादीपाव मिळत आहेत म्हणल्यावर हे सगळे पदार्थ, आजच ठरवून आजच करता येतील. नाहीतर ह्याआधी,  पावभाजी करायची म्हणलं की, पाव घरी करायचे की ब्रेडचं आणायचे? हा प्रश्न ठरलेला असायचा. 

तर, आम्हा जर्मनीत राहणाऱ्या आणि “सगळंच घरी करावं लागतं राव" म्हणणाऱ्या लोकांची लादीपाव घरी करण्याच्या त्रासातून  सुटका केल्याबद्दल जवळच्या जर्मन सुपरमार्केटच्या बेकरी विभागाचे आभार मानण्यात येत आहेत ह्याठिकाणी आणि एक दिवस शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचीत सत्कारही करण्याचा मानसही आहे, ह्याची नोंद घ्यावी! 

एवढे चार शब्द लिहून मी माझे पावपुराण आवरते घेते आणि वडापावच्या तयारीला लागते. 


#आनंदी_आनंद_गडे 

#माझ_म्युनिक_डायरी



गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

केमिकल लोचा

तुम्ही, इथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत,  सर्दीने हैराण झाल्यावर, सुट्टीवर गेलेले डॉक्टर कधी एकदा क्लीनिक उघडतील आणि कधी त्यांना भेटाल ह्याची वाट पाहता. हो, इथे साधारण क्रिसमसच्या आधीच्या शनवार रैवारपासून ते सहा जानेवारीपर्यंत, मधल्या एखाद दोन सन्माननीय दिवसांचे अपवाद वगळता, अख्खी जर्मनी सुट्टीवर असते. इमर्जन्सी सेवेतले काही कर्मचारी वगळता! 

दोन जानेवारीला आजारी लोकांची दया येऊन डॉक्टर अर्धा दिवस क्लिनिक उघडतात. तुमचे हे तुमची परिस्थिती पाहून आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवतात. क्लिनिकमध्ये शिरताच तिथे उसळलेला आजारी लोकांचा जनसागर पाहून तुम्ही गपगार होता.  

डॉक्टर दादा एशियन असतो, त्याला भेटल्यावर कळतं की आपली जर्मन डॉक्टर फारच प्रेमळ आहे. तपासून झाल्यावर तो स्पष्ट शब्दात सांगतो की “गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन तुमच्या इन्शुरंस कार्डवर आहे”. तरी बाहेर येऊन तुम्ही बावळटसारखं ते कार्ड रिसेप्शन ताईला देता आणि तिच्याकडे बघत बसता. 

दोन्ही नाकपुड्यांमध्ये, ओठांत आणि कानांत मोरण्या घातलेली रिसेप्शन ताई “काय बाई आहे!” असे भाव डोळ्यांत आणून तुमच्याकडे बघते आणि सांगते “ओ ताई, तुमच्या गोळ्या इन्शुरन्स  कार्डवरच आहेत (हे कार्ड मला कशाला दिलंय? निघा आता!“). 

ते ऐकून तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तुम्ही तिथून निघता.  अवतार नीट करायला वॉशरूममध्ये जाता. तुमच्या डोक्यात ट्रेन मिळेल का? मैत्रिणींना भेटायला उशीर तर नाही होणार ना? वगैरे विचार चालू असतात. त्याच नादात तुम्ही खालीच असलेल्या औषधांच्या दुकानात जाता आणि तुम्हाला तुमचं इन्शुरन्स कार्डच सापडत नाही. सैरभैर होऊन तुम्ही जॅकेटचे खिसे, पर्स, लिफ्ट सगळं शोधलेलं असते. 

गडबडीत वर जाऊन तुम्ही क्लीनिकमध्ये मोरणी रिसेप्शनिस्टला विचारता की माझं कार्ड इथे राहिलंय का? ती थोबा.. तोंडही वर न करता नाही म्हणते. आता तुम्ही वॉशरूममधे जाऊन शोधता. तिथले टॉयलेट पेपर्सचे रोल पाहून तुमची नुसती चिडचिड होते. “अरे काय लोक आहेत राव, एका कागदाच्या तुकड्यावर प्रिस्क्रिप्शन छापून द्यायला काय होतं ह्यांना आधीसारखं? काय तर म्हणे कागद वाचवा मोहीम! इथं एवढे भसाभसा टॉयलेट पेपर वापरता, ते गेलं का गाढवाच्या गां**? हे मेलं, घाला ते पेपर चुलीत आणि इकडं कागदं वापरा!”

वॉशरूममधून बाहेर येऊन तुम्ही दोन वेळा अख्ख क्लिनिक आणि लिफ्ट शोधता पण कार्ड सापडेल तर शपथ! आता तुमची सहानशक्ती संपायला लागते आणि तुम्ही क्लिनिकच्या खाली असलेल्या स्टेशनवर येता. आधीच थंडीने जीव नकोसा केलेला असतो, त्यात तुम्हाला मैत्रिणींना भेटायला जायला उशीर होत असतो आणि सगळ्यांत महत्वाचं “उस कार्ड का कही नामोनिशान” मिळत नसतो. तुम्हाला वाटतं मरो तेज्या** ते औषध, कार्डच नाहीये  तर “मी चालले मैत्रिणींना भेटायला". 

पण कार्ड हरवलेलं सांगायला तुम्ही पॅनिक मोडमधे तुमच्या “आयुष्यभराच्या स्वीय सहायकाला” फोन करता! तुमचा फोनवरचा सगळा रागराग ऐकून, सुट्टीमुळे घरात असलेला लेक, कार्ड हरवल्याचं ऐकून, पुस्तकातून डोकं वर काढून “व्वा" असं जोरात ओरडतो आणि पुन्हा त्याच्या कामाला लागतो. तेव्हा हे शांतपणे म्हणतात “तू तुझं जॅकेट आणि पुलोवरचे खिसे तपासलेस का?” 

पुन्हा तुमची ट्यूब पेटते आणि तुम्ही जॅकेट काढून पुलोवरचा खिसा तपासता आणि तुम्हाला तुमचं कार्ड हाताला लागतं. खिश्यात कार्ड आणि क्लिनिकला वळसे! यथावकाश पुन्हा दुकानात जाऊन तुम्ही औषध खरेदी करता आणि आनंदाने मैत्रिणींना भेटायला रवाना  होता. 

ह्या प्रसंगानंतर तुम्हाला कळतं की आजकाल असे किस्से तुमच्या रोजच्या आयुष्याचा भागच झालेत. ब्रेन फॉग की कायसं! एकदा सकाळची डब्याची गडबडीचा वेळ असते. भाजीत मीठ टाकायला म्हणून सरावाच्या ठिकाणी ठेवलेलं मिठाचं पाळंच जागेवर नसतं. स्वयंपाकघरातले झाडून सगळे कपाटं शोधूनही ते काही सापडत नाही. थकूनभागून तुम्ही शोध थांबवता आणि कोथिंबीर काढायला फ्रिज उघडता. तर समोर मिठाचं पाळं! आदल्या रात्री सगळं आवरताना तुम्ही मीठ फ्रिजमध्ये ठेवलेलं असतं! मीठ आणि फ्रिजमध्ये? ये कौनसा केमिकल लोचा है भाई? 

लोकांची नावं न आठवणं, त्याऐवजी “त्या ह्यांची ही नाही का, ती जर्मनीतल्या त्या ह्या गावात आलीये” असं सांगणं! “ती ही खाली आलीये का?” आता समोरच्या माणसानेच ठरवायचं की मी कचऱ्याच्या बिनविषयी बोलतेय, मुलीविषयी नाही. एखादी वस्तू कुठे आहे विचारल्यावर “ते हे आहे ना तिथे". काहीतरी आठवून एखाद्या खोलीत जाणं आणि आपण इथे नक्की कशासाठी आलोय हेच विसरून जाणं. एक काम डोक्यात योजून भलतंच काम करणं! इत्यादी इत्यादी. 

तुम्ही ठरवता की आता बास्स! ह्या आणि अशा गोष्टींची यादी करूच म्हणून फोन हातात घेता आणि स्वयंपाक घरातून काहीतरी जळाल्याचा वास येतो!! 

#हाय_रे_कर्मा  #न_जाने_मेरे_दिमाग_को_क्या_हो_गया 

#माझ_म्युनिक_डायरी 


तटी: फोटोचा आणि लिखाणाचा अर्थार्थी काहीही संबंध नाहीये हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल ह्याठिकाणी!





मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

मन धावतया

यंदा इथे थंडीचा कहर झालाय. बरेच दिवस झाले पारा शून्याच्या वर गेला नाहीये. सतत उणे तापमान. मागच्या दोन चार दिवसांत तर जर्मनीतल्या काही भागात उणे २१ पर्यंत पारा गेला होता, त्यामानाने म्युनिकमधे उणे १४ वगैरे आहे, म्हणजे बरंच म्हणायचं. 

अशी थंडी पडली आणि जानेवारी आला की माझं मन राधिका भिडेच्या गाण्यातल्यासारखं भारतात धावतं. ”मन धावतया माहेरच्या शेतात, डोलतया जोंधळ्याच्या मागं। जावं जिथं कुठं तिथं, नाव येई “हुरड्याचं” व्हटी!” असं काहीतरी वाटायला लागतं. माहेरच्या शेतातला #हुरडा ही माझ्यासाठी फार भारी आठवण आहे. 

छ. संभाजीनगरला आईकडे गेलं की, वडील गावाकडे आमच्या दाजींना कळवतात की आम्ही उद्या हुरडा खायला येतोय. मग आईची हुरड्याबरोबर खायच्या चटण्यांची तयारी सुरु होते. मी आपली  लहान मुलीसारखी तिला जी लागेल ती तयारी करून देते. पण ती लसूण, लाल तिखट घातलेली शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची खरपूस चटणी तिनेच करायची. ती चव माझ्या हाताला कुठे! 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपून आधी कडेठाणच्या देवीला जायचं आणि मग शेतात, हा आमचा शिरस्ताच आहे. कडेठाण आमच्या गावापासून जवळच आहे. देवीची ओटी भरून, छान दर्शन घेऊन, तिथल्या लोकांशी बोलून तिथून गावच्या रस्त्याला लागायचं. 

आता ते दोन चार मैलांचं अंतरही जास्त वाटायला लागतं. तिकडे दाजींनी शेतात आगटी पेटवून ठेवलेली असते. आम्ही शेतात पोहोचायचा अवकाश की लगेच ज्वारीची टपोरी कणसं आगटीत भाजायला गेलेले असतात. त्या आगटीच्या आजूबाजूला जाजमं अंथरून, कागदावर मीठ, चटण्या घेऊन कणीस भाजायची वाट पाहणे म्हणजे “ब्रह्मानंदी टाळी" वगैरे! दाजी जेव्हा ते भाजलेलं गरम गरम कणीस हातावर चोळून तो हुरडा आपल्या हातात देतात तेव्हा कुठे जीव भांड्यात पडतो. 

सुख म्हणजे नक्की काय असतं? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, “शेतात विहिरीजवळ बसून गरमगरम हुरडा खाणे. हे झाल्यावर शेतात चक्कर मारत असताना, यंदाच्या लागवडीवरची दाजींची कमेंट्री ऐकणे. नंतर दाजींची बायको बाजरीच्या भाकरी, वांग्याची भाजी आणि ठेचा घेऊन येताच त्यावर ताव मारणे. नंतर द्रोणात  दहीसाखर घेऊन ते कणसाच्या ओंबीने खाणे!” अहाहा!! 

पण.... हे सगळं दरवर्षी अनुभवता येतंच नाही. मग मी घरात जपून ठेवलेल्या, वाळलेल्या हुरड्याची उसळ करते. सकाळी उठल्यावर थोडे हरबरे गरम पाण्यात भिजत घालायचे. ते चांगले भिजले की कुकरच्या भांड्यात वाळलेला हुरडा, भिजलेले हरबरे आणि थोडे शेंगदाणे टाकायचे. अंदाजाने पाणी आणि मीठ टाकून, हे भांडं कुकरला लावायचं. भरपूर शिट्या होऊ द्यायच्या. हुरड्याचा खरपूस वास दरवळला की गॅस बंद. कुकर शांत होईपर्यंत तेलात थोडी मोहरी आणि छानपैकी हिंग घालून फोडणी तयार ठेवायची. फोडणीत जिरे नकोच. हुरड्याची चव घालवायची नाही. 

आता एका वाटीत गरम हुरड्याची उसळ, त्यात यथेच्छ फोडणीचं तेल घ्यायचं (आवडत असेल तर थोडं लाल तिखट) आणि बर्फाच्छादीत आल्प्सकडे बघत, मराठवाड्यातल्या गावाची आठवण काढत, भुरका मारत त्यावर ताव मारायचा! 

#माझी_म्युनिक_डायरी 

#सुख_म्हणजे_नक्की_काय_असतं




वाचकांना आवडलेले काही