शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

तिकीट

आज सकाळपासूनच तिला हुरहूर लागून राहिली होती. तरी ती स्वतःला तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यग्र ठेवत वाटलं. बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, कपडे भरायचे होते, सगळे कागदपत्र बघायचे होते, बरोबर न्यायला खाण्यापिण्याच्या गोष्टी आणायच्या होत्या. आज रात्रीचं विमान होतं ना तिचं. परदेशी जायचं म्हणजे पासपोर्ट, व्हिजा वगैरे सगळं चोख पाहिजे. 

सगळे कागदपत्र शोधत असताना तिची नजर सहा महिन्यांपुर्वीच्या "त्या" तिकिटावर गेली. तिने "ते" अगदी जपुन ठेवलं होतं. आयुष्यातला तो प्रवास आणि ते तिकीट तिच्यासाठी पुस्तकात ठेवलेल्या मोरपिसासारखे आठवणीत राहिले होते.

 सहा महिन्यांपूर्वीचा विमानप्रवास आणि बाजुच्या खुर्चीवरचा तो! सोनेरी कुरळे केस, गोरापान रंग, बोलके निळे डोळे! त्याची आणि तिची फार पुर्वीपासुन ओळख असल्यासारखे वाटले तिला. परदेशी असुनही भारतीय संगीतातला त्याचा व्यासंग पाहुन ती त्याच्या प्रेमात कधी पडली हे तिचं तिलाच कळलं नाही. 

दोघांच्या गप्पांच्या ओघात एवढा मोठा प्रवास कसा आणि कधी सम्पला तेही कळले नाही. पण प्रवासच तो, कधीतरी संपणार आणि आपण इच्छित स्थळी पोहोचणार! पण हा प्रवास कधी संपुच नये असं राहुन राहून वाटत होतं तिला. निघताना, निरोप घेताना खुप बोलायचं राहुन गेलंय असं वाटत होतं.

मागच्या सहा महिन्यातला तिचा एकही दिवस त्याच्या आठवणीशिवाय गेला नव्हता! तिने फेसबुकवर त्याचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला होता पण तो काही तिला सापडला नाही. "असा कसा फेसबुकवर नाहीये हा? कमालच आहे! मी दिला होता माझा ना इमेल ऍड्रेस. सहा महिन्यात एकदाही त्याला मला इमेल करावा वाटला नसेल का?" तिला रागच आला. "आता मी त्याला संपर्क करू तरी कसा? ना फोन ना पत्ता."  त्याची पुन्हा एकदा तरी भेट व्हावी, त्याच्याशी बोलता यावं असं तिला मनोमन वाटलं..  तोच.. तिच्या फोनमध्ये नोटिफिकेशनची किणकिण झाली. 

तिला "त्याचा" इमेल आला होता!!

"त्या दिवशी आपण विमानात भेटलो! काय गमंत आहे बघ, एवढ्या गप्पा मारल्या आपण आणि साधा एकमेकांचा फोन नंबरही घेतला नाही. मी तर अजुनच हुशार, तु सांगितलेला तुझा इमेल ऍड्रेस माझ्या तिकिटावर लिहुन घेतला खरा, पण वेंधळ्यासारख "ते" तिकीट मी हरवलं. रोज तुझी आठवण येत होती, तुझ्याशी संपर्क कसा करावा कळत नव्हतं आणि आज प्रवासाला निघताना सगळ्या कागदपत्रांमध्ये "ते" तिकीट सापडलं आणि लगेच तुला इमेल केला!!"

इमेल वाचुन ती खुदकन हसली आणि ते टेलीपथी कि काय असतं ना त्यावर तिचा अगदी गाढ विश्वास बसला. तिला नाचावं, बागडावं वाटत होतं पण तिने लगेच त्याच्या इमेलला उत्तर लिहायला सुरुवात केली!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

मोह

आम्ही म्यूनिकमधे सध्या जिथे राहतोय तिथे रहायला येऊन आम्हाला साधारण ५ वर्ष होतील. इथल्या सगळ्या बिल्डिंग्जला तळघरं नव्हे तळमजले आहेत. त्याच तळमजल्यातल्या एका खोलीत छोटी स्टोअररूम प्रत्येक रहिवाश्याला मिळते आणि तिथेच एका वेगळ्या मोठ्या खोलीत एक वॉशिंगमशीन, ड्रायर, कपडे वाळत घालायला दोऱ्या आणि स्टॅण्डची व्यवस्था असते. वॉशिंगमशीन आणि ड्रायर वापरायला अर्थातच पैसे लागतात.
तर सांगायचा मुद्दा असा आहे कि गेले ५ वर्ष आमच्या इथल्या वॉशिंगमशीनच्या खोलीत हे ५० सेंटचे नाणे ह्याच रॅकवर ह्याच ठिकाणी पडुन आहे. मी इथे रहायला यायच्या किती दिवस आधीपासून हे ह्या रॅकवर असेल ते देवच जाणे. गेल्या ५ वर्षात बरेचश्या लोकांचे ह्या ठिकाणी कपडे धुण्याच्या निमित्ताने येणेजाणे नक्कीच झाले असणार. पण मागच्या ५ वर्षात हे नाणं जिथे आहे तिथेच आहे. त्याची जागा सुद्धा बदललेली नाहीये.
खरंतर ड्रायर वापरायला ५० सेंटचे नाणेच लागते पण कोणीही ह्या नाण्याला अजिबात हात लावला नाहीये. ह्या खोलीत बिल्डिंग मधील लोकांव्यतिरिक्त साफसफाई करणारे लोक नेहमीच येतजात असतात. पण नाणं आहे तिथेच आहे.
मला दरवेळी कपडे मशीनला लावायला नेल्यावर ह्या चमत्कारी
नाण्याचं दर्शन होतं आणि त्याच्याविषयी मनात करुणा दाटुन येते. बिचाऱ्यावर काय परिस्थिती आलीये.. ह्याचा मालक नक्कीच सोडुन गेला असणार आणि ह्याला बेवारस करून गेला असणार.
सगळ्यात जास्त आश्चर्य इथल्या पराकोटीच्या प्रामाणिक आणि मोहावर विजय मिळवलेल्या लोकांचं वाटतं. आपल्याकडे म्हण आहे “शीतावरून भाताची परीक्षा” तसंच मलाही म्हणावं वाटतंय की “नाण्यावरून लोकांची परीक्षा!” विकसित देशातील लोक असेच असतील कदाचित! त्यांना त्यांच्या कष्टाचा पैसा सोडुन एका सेंटचाही मोह नसावा?

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक


वाचकांना आवडलेले काही