बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

ऑक्टोबर फेस्ट

   म्यूनिच मधील ऑक्टोबर फेस्ट जगातील सर्वात मोठा लोकोत्सव आहे. बऱ्याच परदेशी लोकांना ऑक्टोबर फेस्ट जर्मनीची संस्कृती वाटतो. वास्तविक, ऑक्टोबर फेस्ट बायर्नची संस्कृती प्रतिबिंबित करतो, संपूर्ण जर्मनीची नाही. स्थानिक लोक या उत्सवाला "Wisen " म्हणतात. बायर्न हे एक जर्मनी मधील राज्य आहे.
    ह्या उत्सवाचा इतिहास पार १८१० मध्ये आहे. म्यूनिचमधील पहिला ऑक्टोबर फेस्ट १२ ऑक्टोबर १८१० रोजी तेव्हाचा राजकुमार प्रिन्स लुडविग (नंतर तो राजा लुडविग बनला) आणि सॅक्सनी-हिल्डबर्गहौसेनची राजकुमारी थेरेसे यांच्या लग्नात साजरा करण्यात आला. त्यावेळी हा उत्सव घोड्यांच्या शर्यतीसह संपुष्टात आला आणि पुढील वर्षी ही शर्यत पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. एका शेती विषयक शो व्यतिरिक्त , बियर स्टॉल, आनंदोत्सव आणि इतर करमणुकीच्या गोष्टीचा येणाऱ्या वर्षांमध्ये या महोत्सवात समावेश होत गेला. आता घोड्यांची शर्यत बंद झालीये पण ऑक्टोबर फेस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
    तुम्हाला असं वाटेल की नाव तर ऑक्टोबर फेस्ट आहे आणि सप्टेंबर मध्ये कसा? तर हवामान हे मुख्य कारण. सप्टेंबर सहसा थोडा उबदार असतो. त्यामुळे साधारण १६-१७ सप्टेंबरला सुरु होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो किंवा ३ ऑक्टोबरला संपतो. ३ ऑक्टोबर हा जर्मन री-युनिफिकेशन डे असतो. मागच्या वर्षी साधारण ५ ते ७ लाख लोकांनी या उत्सवाला भेट दिली.
    मुख्यतः ऑक्टोबर फेस्ट हा बियर फेस्टिवल आहे असं म्हणूयात. म्युनिच मधल्या ब्रुअरीज मध्ये बनलेली खास बियरच इथे सर्व्ह केली जाते. फक्त म्युनिच मधलीच बियर बरंका. दुसऱ्या कोणत्याच शहरातील नाही. फक्त ६ म्यूनिच ब्रुअरीजला - Augustiner, Hacker-Pschorr, Hofbräu, Löwenbräu, Paulaner, आणि Spaten - या उत्सवामध्ये बियर सर्व्ह करण्याची परवानगी आहे. १४ मोठे आणि अनेक लहान बियर टेन्ट्स आणि बियर गार्डन्स एकाच वेळी ९८००० पर्यटकांना सामावून घेतात. बियरच्या मगला "Maß" म्हणतात. साधारण एक लिटरचा मग ९ ते १० युरो दरम्यान पडतो. बियर मेड्स आणि वेटर्स एका वेळी १० बियरने भरलेले मग सर्व्ह करतात.
    ह्या फेस्ट दरम्यान सरासरी ६० लाख लिटर बिअर फस्त होते. २०१३ मध्ये साधारण ७७ लाख लिटर बिअर ह्या फेस्टमध्ये संपली होत असे विकिपिडीया सांगतोय. हा आकडा वाचून माझे तर डोळेच पांढरे झाले आणि खाण्यासाठी लागणाऱ्या गायी, बैल, डुकरे, मेंढ्या आणि कोंबड्यांची शिरगणती केली तर अक्षरशः भोवळ येईल. असो.
    ३१ हेक्टर वर पसरलेल्या मोठ्या मैदानावर (जे फक्त ह्या फेस्ट साठी आहे) वेगवेगळ्या फन राईड्स, बिअर कंपनीजचे मोठमोठे टेन्ट्स (ह्यात फक्त १८ वर्षांवरील लोकांना प्रवेश असतो), शेकडो खाण्याचे स्टॉल्स , वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स, मस्त सजलेला परिसर असतो. लहानपणी आनंदनगरीला गेल्याचं आठवतं मला पण ती खूपच छोट्या जागेत असायची. हा फेस्ट म्हणजे भव्यदिव्य आहे.
    ह्या उत्सवाची सुरुवात साधारण १६-१७ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता दिमाखदार मिरवणुकीने होते. त्यात मुख्यतः ब्रुअरीजचे ब्रासबँड पथके असतात. मिरवणूक एकदम शिस्तीत जाते. प्रत्येक ब्रुअरीचे मानाप्रमाणे मिरवणूकीत स्थान असते. सगळ्यात आधी त्याचं बॅनर त्यानंतर ब्रासबँड, मग येतो घोड्यांचा रथ ज्यामध्ये बिअरचे ड्रम्स असतात आणि त्यानंतर एका ट्र्कमध्ये त्या ब्रुअरीचे लोक. असा सगळा लवाजमा असतो.
   स्त्रिया "Drindle" ड्रेस आणि पुरुष "Lederhose" असा खास पारंपरिक बव्हेरिअन पोशाख परिधान करतात. म्यूनिचचे महापौर मिरवणुकीच्या प्रारंभी असतात आणि तेच पहिला बिअर ड्रमचा नळ उघडून ह्या उत्सवाचे उदघाटन करतात. आजूबाजूचे लोक "O'zapft is (It's tapped)" अशी घोषणा करतात आणि एका महाबियर उत्सवाला सुरुवात होते. प्रथम बियरचा मान बवेरियाच्या मंत्री अध्यक्षांना मिळतो.त्यानंतर फेस्ट सामान्य लोकांसाठी खुला होतो.
   तर असा हा फेस्ट याची देही याची डोळा बघता आला आणि कळलं की दारूचाही म्हणजे बियरचाही उत्सव आणि मिरवणूक वगैरे होऊ शकतो. कोणाचं काय तर कोणाचं काय. पुन्हा मी तेच म्हणेन की " जावे त्यांच्या देशा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!" हो ना?

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक           #munichdiaries

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही