त्या दिवशी मोदक करायला घ्यायच्या आधी हात आपसूक फोनकडे गेला. आईला फोन लावला तर वडील म्हणाले ती गणपती मंदिरात गेलीय. मला सांग तुझं काय काम आहे तिच्याकडे. मी म्हट्लं " काही नाही मोदकासाठी किती रवा घ्यायचा ते विचारायचं होतं तिला." तर हसायला लागले आणि म्हणाले कि ती आल्यावर सांगतो तिला फोन करायला.
दरवर्षी मोदक केलेले असतात तरीही आईला विचारून केल्यावर एक वेगळाच आत्मविश्वास येतो कि अजिबात बिघडणार नाहीत. यथावकाश रवा भिजवला, सारण बनवलं, मोदक केले आणि आईचा फोन आला.
"झाले का ग मोदक? बरोबर घेतलास कि रवा, मोहन घातलस ना?" वगैरे वगैरे.
तिकडे म्हणजे पुण्यात होते तेव्हा प्रत्येक सणाला सासूबाई सोबत असायच्याच. एखाद्या विद्यार्थिनीप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच केलेली असायची त्यामुळे बिघडण्याचा कधी प्रश्नच आला नाही. पण इथे आल्यापासून सणावाराला आईला नाहीतर सासूबाईंना हमखास फोन होतोच. ४-५ लोकांसाठी पुरण किती घालायचं, पंचामृतामध्ये चिंच गुळाचं प्रमाण किती, एक नाही दहा. एकदा तर मी माझा मावशीला पुरणाला चटका देताना फोन करून हैराण केलं होतं आणि तिनेही तिच्याकडे गौरीजेवणाची गडबड असताना मला सगळ नीट समजावून सांगितलं. खरंतर सगळं प्रमाण माहित असतं, सगळे पदार्थ दरवर्षी बनवलेले असतात पण त्यांना विचारून केल्यावर खरंच आत्मविश्वास येतो.
लहानपणीपासून वाटायचं कि आशिर्वाद म्हणजे नेमकं काय? आता विचार केला कि वाटतं कि मोदकासाठी आईला फोन केल्यावर तिने दिलेला आत्मविश्वास आणि बिघडणार नाही ह्याची दिलेली शाश्वती, पुरण करताना सासुबाईंनी नीट समजावून सांगितलेलं प्रमाण आणि कृती, शेअर मार्केट मध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट वर वडलांनी दिलेले सल्ले आणि शेअर मार्केट संबंधी नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिलेली प्रेरणा, कार शिकत असताना सासऱ्यांनी दिलेले धडे आणि दिलेलं प्रोत्साहन, नवीनच लिहायला सुरुवात केल्यावर दादाने दिलेली शाबासकी आणि त्याचे "लिहीत रहा" म्हणणे, ह्यालाच मोठ्यांचे आशिर्वाद म्हणत असतील! हो ना?
PC Google
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा