सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

ऍमस्टरडॅम

    हॉलंड मधील ऍमस्टरडॅम हे पण युरोपच्या चारधाम मधील एक आहे असं म्हणणे अजिबात वावगं ठरणार नाही. कर्मधर्मसंयोगाने जर्मनी मध्ये आल्यामुळे युरोप मधील चारधाम करायचे असे आम्ही ठरवलं आहे. कारण पुन्हा येणं होईल न होईल. ऍमस्टरडॅमला जायचं तर ट्युलिप्सचा हंगाम बघूनच जाणं सगळ्यात योग्य. त्याविषयी पूर्ण माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. साधारण मार्च ते मे असा सिझन असतो ट्युलिप्सचा. ट्युलिप गार्डन पाहायला एक दिवस आणि विंडमिल्स पाहायला एक दिवस असा दोन दिवसांचा प्लॅन करून आम्ही रात्रीच्या ट्रेननी म्युनिचहुन ऍमस्टरडॅमला प्रयाण केलं.


    पण मी म्हणाल्याप्रमाणे कोणताही प्रवास अडचणींशिवाय पूर्ण झाला तर त्याला प्रवास म्हणताच नाही येणार माझ्या आयुष्यात. रात्रीच्या १० च्या ट्रेनने आम्ही सकाळी ९ वाजता ऍमस्टरडॅमला पोहोचणे अपेक्षित होते. साधारण ११ वाजता आम्ही आमच्या कोच मधे निवांत झोपलो. डोळ्यात ट्युलिप्सचे स्वप्न असताना पहाटे ५. ३० ला मला जाग आली. ट्रेन कोणत्या तरी स्टेशनला थांबलेली होती. मी तिथल्या कॉरिडॉर मध्ये येऊन खिडकीतून बाहेर पाहिलं कि कुठे स्टेशनचे नाव दिसते आहे का. आणि नाव वाचून धक्का बसला. ते होतं औसबुर्ग, म्युनिच पासून फक्त २ तासाच्या अंतरावर असलेलं एक गाव. आमची ट्रेन रात्री १ वाजेपासून त्याच स्टेशनला उभी होती आणि आम्ही घोडे विकून झोपलो होतो. काय तर म्हणे की ट्रॅक्सवर काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून अजून १ तास तरी ट्रेन निघणार नाहीये.

    मनात म्हटलं ये मेरे साथ हि क्यू होता है. म्हणजे आम्हाला पोहोचायला दुपार होणार. पुन्हा आत येऊन झोपायचा अयशस्वी प्रयत्न केला. आता पुढचे विचार यायला लागले. दुपारी पोहचून कसं आणि काय करायचं वगैरे वगैरे. शेवटी पुन्हा बाहेर कॉरिडॉर मध्ये आले. ट्रेन थोड्या वेळेपूर्वीच निघाली होती आणि बाहेर सूर्योदय होत होता. ट्रेन आत्ता एका नदीला समांतर प्रवास करत होती. मस्त डोंगर त्याच्या बाजूने वाहणारी स्वच्छ आणि नितळ नदी. नदीच्या काठावर असलेलं एक छोटं आणि सुबक युरोपिअन धाटणीचे घरं असलेलं गाव. आणि डोंगराच्या मागून वर येणारा सकाळचा केशरी सूर्य. अहाहा... वेळ तिथेच थांबावा असं वाटलं. मी किती वेळ हे सगळं न्याहळत होते मला पत्ताच लागला नाही.

     "आई किती वेळ लागेल अजून ऍमस्टरडॅमला पोहोचायला?", "बाबा आलं कारे ऍमस्टरडॅम?", मला मॅप दाखव अजून किती स्टेशन्स ते?" हे आणि असेच इतर वाक्यांचे पारायण ऐकत ऐकत आमचा प्रवास चालू होता. ट्रेन नाईटलायनर असल्यामुळे त्यात खानपान सुविधा नव्हती. सकाळी चहा न पिल्यामुळे सकाळ झालीय असं आम्हा दोघांनाही पटतच नव्हतं. जवळ असलेले स्नॅक्स खाऊन लेक वैतागला. नवऱ्याला चांगलं म्हणाले होते कि धपाटे घेते थोडे बरोबर तर म्हणतो कसा "तुझ्या त्या धपाट्यांचा वास अक्ख्या ट्रेनला येईल आणि लोक तुटून पडतील त्यांच्यावर.. अजिबात घ्यायचे नाही." किती तो उपरोधिकपणा. खरंतर दशम्या आणि धपाटे प्रवासात घेऊन जाण्याची किती मोठी परंपरा आहे मराठी माणसाची! पण परंपरेला छेद न देईल तो मराठी माणूस कुठला? असो.

    शेवटी आम्ही दुपारी १ वाजता ऍमस्टरडॅमच्या भूमीवर पाय ठेवले. दीड दिवसाच्या प्रवासाने अंग आंबले होते. म्हणून हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन फिरण्याचा निर्णय घेतला. इथला लोकल ट्रान्सपोर्ट पॅरिस सारखा भुलभुलैय्या नसला तरी म्युनिचच्या लोकल ट्रान्स्पोर्टच्या थोडाही जवळ जाणारा नाहीये याची प्रचिती आली. पुन्हा नकाशा पाहून हॉटेलसाठी कोणती ट्राम पकडायची, येताना कसं यायचं, विंडमिल्स साठीची बस कुठून आहे इत्यादी चौकशा करूनच हॉटेलवर गेलो. ह्या सगळ्या घोळात २-३ तास गेलेच.
     विंडमिल्सला जाणे येणे जरा वेळखाऊ होते आणि आधीच आमचा अर्ध्याच्या वर दिवस वाया गेला होता म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला आणि सिटी टूर घेतला. ऍमस्टरडॅम व्हेनिस सारखे पूर्णपणे पाण्यावर नसले तरी ७०% पाण्यावर आहे. इथेही कॅनाल्स आहेत. आणि आम्ही त्यातूनच बोट टूर घेतली. शहरातील महत्वाची ठिकाणे बघत बघत मस्तपैकी बोटीच्या चालकाचे जर्मन आणि इंग्लिश माहितीपर भाषण ऐकत आम्ही "ऍन फ्रॅंक" च्या घराजवळ पोहोचलो. ते बघायची माझी खुप इच्छा होती पण तिथली तिकिटासाठीची रांग बघून लेक म्हणाला " आई प्लिज.. मी नाही येणार... तुम्ही दोघे जा." आता काय बोलणार मी. दिला विचार सोडून.

     सिटी सेन्टरला येऊन तिथून फेरी बोटीतून प्रवास केला. दुसऱ्या किनाऱ्यावर असलेले अमेझिंग सायन्स अँड फिल्म मुजिअम पहिले. लेक सगळ्यात जास्त इथे रमला. तिथेच बाहेर "I am Amsterdam" च्या जवळ फोटो काढले. इथे फोटो नाही काढले तर लोक तुम्हाला वाळीत टाकू शकतात कि ऍमस्टरडॅमला जाऊन इथे फोटो काढले नाहीत म्हणून. त्यामुळे आम्ही शिरस्ता मोडला नाही. एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागले होते. आणि आमचे हे त्या " सरवण भुवन (युरोपमधील दक्षिण भारतीय रेस्टॉरंटची चेन )" च्या प्रेमात असल्यासारखे नकाशावर त्याचा रस्ता शोधात होते.

     नेहमीप्रमाणे लेकाची सहनशक्ती संपली होती, त्याला भयंकर भूक लागली होती आणि तो वैतागला होता. मुलांची सहनशक्ती नेहमीच आपल्या सहनशक्तीच्या व्यस्त प्रमाणात असते. त्यामुळे सरवण भुवनचा नाद सोडून आम्ही जवळच्या उत्तर भारतीय रेस्टारंटचा आधार घेतला. तिथली दाल माखनी खाऊन आणि तिथल्या सरदार काकांशी हिंदीमध्ये गप्पा मारून मन अगदी तृप्त झालं. त्यांनी लेकाला तर आग्रह करून जेऊ घातलं. ट्युलिप्सच्या स्वप्नामध्ये रात्र सरली.

    सकाळी लवकर उठून ट्युलिप गार्डन ची तिकिटे मिळण्याचं जवळचं ठिकाण शोधून तिथे निघालो. तिकिटे मिळाली पटकन. मला वाटलं आता बस मध्ये बसायचं आणि अर्ध्या तासात गार्डन. इतकं मनासारखं होत असतं का कधी? नाहीच मुळी. बस साठी आम्ही रांगेत उभे राहिलो. ती रांग पाहून लहानपणी पंढरपूरला गेल्याचं आठवलं मला. माझ्या आई वडीलांची काय परिस्थिती झाली असेल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या रांगेत माझ्यामुळे ह्याची पुरेपूर कल्पना आली त्या रांगेत मला. लेकाने जीव नकोसा केला अक्षरशः."जगातले मधले सगळे लोक आजच आले आहेत का ऍमस्टरडॅमला? आपण आजच जाणार ना म्युनिचला?, त्या गार्डन मध्ये खेळता येईल का? तुला नुसते फुलं बघण्यात काय इंटरेस्ट आहे एवढा? तिथून लगेच निघणार आहेस ना? "... वगैरे वगैरे... डिजनीलँडला जायला तो जितका खुश होता त्याच्या अगदी उलट परिस्थिती.

    २ तासांनी कशीबशी एका बस मध्ये जागा मिळाली आम्हाला. आता वाटलं झालं जाऊच पटकन ट्युलिप गार्डनला. पण नाही. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे, अर्ध्या तासाचं अंतर २ तासात कापत आमची बस ट्युलिप गार्डनला पोहोचली एकदाची. तर प्रचंड मोठ्या लोकसंख्येने आमचं स्वागत केलं तिथे. खरंच वाटलं कि जगातले सगळे लोक आजच आले आहेत का इथे?

    ३२ हेक्टर वर पसरलेले कोकेनहॉफ ट्युलिप गार्डन, ७० लाखाच्या आसपास फुले आणि एकूण ८०० टूलिपचे प्रकार इथे वसंत ऋतू मध्ये बघायला मिळतात. खरंच अद्वितीय! एका दिवसात एवढं बघणं शक्य होतच नाही खरंतर. पृथ्वीवर स्वर्ग अवतरतो तिथे. इतके सुंदर ट्युलिप्स आणि वेगवेगळी फुले मी पहिल्यांदाच पहिली. मन हरखून गेलं एकदम. नजर जाईल तिथे ट्युलिप्स. मन फुलपाखराप्रमाणे वेगवेगळ्या फुलांच्या ताटव्यांवर फिरत होतं. किती थोडं बघून झालय आणि कितीतरी बघायचं राहिलय असंच वाटत राहिलं मला. हजारो ट्युलिप्स कॅमेरामधे आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त मनामधे साठवले. संध्याकाळचे ५.३० वाजत आले होते. हवेतला गारवा वाढायला लागला. तरी हवामानाने कृपाच केली म्हणायची. दिवसभर सूर्यप्रकाश होता लख्ख. एव्हाना लेक कंटाळून गेला होता. जड अंतःकरणाने मी ट्युलिप गार्डनचा निरोप घेतला.

    पुन्हा वाहतूक कोंडीमुळे स्टेशनला पोहोचायला जरा उशीरच झाला. आम्ही आणि आमच्या सोबत अजून एक भारतीय कुटुम्ब यांची पळणारी वरात स्टेशनवरुन निघाली होती कारण ट्रेन निघायला फक्त ५ मिनिट बाकी होते आणि आम्हाला २ फ्लॅटफॉर्म्स ओलांडून जायचे होते. दुसऱ्या कुटुंबातील साठीच्या काकूंनी जिद्द व इच्छाशक्तीचे अतुलनीय प्रदर्शन करत त्यांचा अवाढव्य देह घेऊन ट्रेन पकडली. हि ट्रेन कोणताही उशीर न करता म्युनिचला पोहोचली.

एक अविस्मरणीय आणि रंगीबेरंगी आठवणींचे मोरपीस मी मनाच्या पुस्तकात ठेवलं!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #amsterdamdiaries




















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही