गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

कबूतर जा जा जा

मघाशी गॅलरीत उभी होते तर एक पांढरं कबुतर दृष्टीस पडलं आणि मागच्या वर्षीचा किस्सा आठवला. मनात विचार आला 'आता हे नक्की कोणाकडे जाऊन त्यांचा जीव खाणार आहे देव जाणे?' तेव्हा नाही का, आमच्या घरातले अर्धेच लाईट... का? अर्ध्या घरातले लाईट... जाऊदे मेलं, लाईट गेले, डोक्याला ताप झाला होता आणि मी लगे #ईतना_अंधेरा_क्यूँ_है_भाई पोस्ट लिहीली होती, तेव्हाची गोष्ट. 

त्या दिवशी लाईट आल्यामुळे मी On Cloud Nine वगैरे होते. जानेवारी महिना असल्यामुळे सूर्य साडेचार पाचलाच मावळत होता. नुकताच चहा झाला होता आणि मी लेकाच्या खोलीच्या खिडकीतून सूर्यास्त बघत होते, तेवढ्यात एक पांढरं कबूतर अचानक खिडकीच्या बाहेरच्या पळवटीवर येऊन बसलं. बाबो! ते आणि मी एकमेकांना पाहून दचकलो ना! मला लगेच वाटलं 'ह्या ब्रह्माण्डला नक्कीच मला काहीतरी संदेश द्यायचा आहे म्हणूनच हे पांढरं कबूतर माझ्या दारी..खिडकी आलं आहे. अब इसके आगे मेरा सब अच्छा होनेवाला है. वगैरे वगैरे.' हं बघा अजून रीळ!

मी लगे सगळ्या घरात दवंडी पिटली, ''आपल्या गॅलरीत पांढरं कबूतर आले हो...ज्यांना पाहायचं आहे त्यांनी लगेच येऊन पहावे हो...नाहीतर ते लगेच उडून जाईल हो...'' पण माझ्या ह्या दवंडीकडे, तेव्हा बारावीत असलेल्या लेकाने आणि मीटिंगमध्ये असलेल्या होमऑफिसवाल्याने असं दुर्लक्ष्य केलं की जसं काही मी त्या दोघांना 'माझ्याबरोबर लगेच खरेदीला चला' म्हणाले. मला सवय असल्यामुळे मी पण फणकऱ्याने 'हं' करून, त्या दोघांकडे दुर्लक्ष्य केलं. आपण पण दुर्लक्ष्य करण्यात माहीर आहोत. 

लगेच मी त्याला बघायला गॅलरीत गेले. मला वाटलं मला बघून आता उडतंय बिचारं, पण कसचं काय, मी जवळ गेले तरी ते तिथेच इकडेतिकडे करायला लागलं पण उडायचं नाव घेईना. तेव्हा लक्षात आलं की हे नक्कीच थकलं आहे आणि त्याच्यात उडायचं बळंच नाहीये. मला लगे त्याचा कळवळा आला. मी घरातल्या गुगलबाबाला म्हणजेच लेकाला विचारलं 'अरे त्या कबुतराच्या पायात हिरवा बँड आहे. कोणाचं असेल बरं हे?' आमच्या गुगलबाबाने लगेच माहिती दिली ''तो बँड म्हणजे ते कोणाचं तरी खाजगी कबूतर आहे, पाळलेलं, ज्याअर्थी ते थकूनभागून इथे बसलं त्याअर्थी ते नक्कीच रेसिंग पिजन असावं. थकल्यामुळे किंवा भरकटल्यामुळे ते इथे आलंय. त्याला खायला प्यायला दे, त्याला शक्ती आली की ते जाईल उडून.''

मी ''आणि नाही गेलं तर? त्याला काही झालं तर? त्याला खायला काय देऊ खायला? तुझ्या जर्मन मित्राला विचार काय करता येई ते? आपण इथल्या कोणत्या तरी पक्षी मदतकेंद्राला फोन करूया का? काय करावं? मला तर काही सुचतंच नाहीये.'' लेक ''आईईईईई दम खाती का जरा? माझा जर्मन मित्र काय पक्षीमित्र आहे का? त्याला कुठून माहिती असेल. काहीही असतं तुझं. आणि उद्या माझा गणिताचा पेपर आहे, मला अभ्यास करायचा आहे. तू आणि ते कबुतर बघा आता काय ते!'' ह्यांना विचारायला गेले तर, कानाचा हेडफोन थोडा बाजूला करून ह्यांनी फक्त ''गुगल कर'' एवढे दोन शब्द उच्चारले. 

मी आपलं गुगलला कामाला लावून त्याला तांदूळ टाकले आणि एका वाटीत पाणी ठेवलं, म्हणलं आपण दुसरं काहीतरी खायला द्यायचो आणि हे गचकलं बिचकलं तर उद्या जर्मन पोलीस येऊन... असो! कारण जर्मनीत तुम्ही तुमच्या घराच्या आवारातलं मधमाश्यांचं मोहोळही अधिकृत परवानगीशिवाय नष्ट करू शकत नाही. मधमाश्याना मारणे, इजा करणे किंवा मोहोळ हटवणे बेकायदेशीर आहे. मधमाश्यांचे मोहोळ तुम्ही बेकायदेशीरपणे नष्ट केल्यास किंवा मधमाश्यांना मारल्यास, संबंधित राज्यानुसार ५०,००० युरोपर्यंत दंड होऊ शकतो. म्हणलं असा काही नियम पांढऱ्या कबुतराविषयी असला आणि आपल्याकडून काही चुकलं तर संपलंच मग, घेणं ना देणं अन फुकटचं कंदील लावणं व्हायचं बसल्याबसल्या!

ते खात पीत होतं बिचारं. त्याच्या नादात मी संध्याकाळी काय स्वैपाक केला आणि आम्ही काय जेवलो, काय माहित.बरं तेव्हा प्रचंड थंडी होती.मला आपली काळजी की आता रात्र झालीये हे काही उडणार नाही. रात्रीच्या उणे तापमानात ह्याला काही झालं तर? जीवाची नुसती घालमेल चालली होती. काय करू? कसं करु? मी मग एक खोकं गॅलरीत नेलं. मला वाटलं रात्री थंडीचं त्याला त्यात ठेवू. त्याला पकडून त्या खोक्यात ठेवावं मी म्हणलं तर ते गाबड गॅलरीत इकडंतिकडं उडायला लागलं. शेवटी ते पुन्हा उडून खिडकीत बसलं तेव्हा मी त्याला देवाच्या हवाली केलं. रात्री सांभाळा त्याला. 

माझं सगळं लक्ष त्या गाबडयावर केंद्रित झालं होतं. लेक जेवणखाण झाल्यावर म्हणाला 'आई आज K-Drama नाही बघायचा का?' म्हणलं ''आपल्या गॅलरीतल्या कबूतर ड्राम्याने झोप उडवलीये माझी, त्यात दुसरं काही बघायचं सुचत नाहीये!'' लेक म्हणाला 'काळजी करू नको, ही कबुतरं उणे तापमानात जिवंत राहू शकतात. काही नाही होणार त्याला.'' पण रात्रभर शांत झोप नाही लागली मला, सारखी जाग येत होती. एकदा तर स्वप्नंच पडलं की ते गाबड उडून गेलं म्हणून. रात्री दोनदा मी लेकाच्या खोलीत गेले त्याला बघायला. लेक वैतागला होता, झोपू दे म्हणून. 

शेवटी एकदाची सकाळ झाली. पण लवकर उजाडेल तर शपथ. जरा फट्फटलं की मी पुन्हा जॅकेट टोपी चढवून गॅलरीत गेले आणि..... ''वक्त बदल गया, हालात बदल गये, जज्बात बदल गये'' असं झालं माझं! ज्याच्याविषयी काल कळवळा वाटत होता, प्रेम दाटून आलं होतं, त्यानी केलेला प्रताप पाहून डोक्यात तिडीक गेली अक्षरशः. त्या गाबड्याने खिडकीत इतकी घाण, इतकी घाण करून ठेवली होती की बस्स! म्हणलं आता बास, तू ऊड बाबा इथून, जा तुझ्या मालकाकडे एकदाचा. नाहीतर पुन्हा ते एक नवीन काम डोक्याला यायचं. ते जर्मन कबूतर संस्थेशी संपर्क साधा, त्यांना सगळं जर्मनमधे समजावून सांगा.. एक ना हजार गोष्टी. 

आता मी फक्त त्याची उडायची वाट पाहायला लागले. त्याला म्हणाले ''जा ना भाऊ, काऊन जीव खातो? माझे कामं का वाढवतोस बाबा? सुखाने ऊडून जा ना. ही खिडकी काय तुझा बाप येऊन स्वच्छ करणार आहे का? ए, ऊड की.'' ते नुसतं  टुकूटुकू माझ्याकडे बघत होतं, उडायचं नाव घेत नव्हतं. माझी अवस्था पाहून घरातल्या दोघांचं चांगलंच मनोरंजन होत होतं. हे म्हणाले ''गाणं गाऊन बघ, कबूतर जा, म्हणजे जाईल ते''  म्हणलं ''हो, त्याच्या पायाला चिठ्ठी लावूनच पाठवते त्याला की, काहीही झालं तरी आता ह्याला आमच्याकडे पाठवू नका पुन्हा:'' अरे इथे प्रसंग काय्ये? माझी

लेक म्हणाला ''जरा सूर्यप्रकाश दिसू तर दे त्याला मग उडेल ते."' आणि खरोखर, थोड्या वेळाने जेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश पडला तेव्हा ते उडून गेलं! माझा रात्रीपासून टांगणीला लागलेला जीव गॅलरीत आला आणि खिडकीकडे पाहून डोकं उठलं! 

पुढचे दोन तास, मी उणे तापमानात, हातात रबरी हातोमोजे चढवून, नाकाला मास्क लावून ती सगळी घाण स्वच्छ करत होते, त्यापायी स्वतःची अर्धशिशी ( मराठीत मायग्रेन ) वाढवत होते आणि ब्रह्माण्डला सांगत होते ''हे असले काही संदेश मला पाठवू नको बाबा यापुढे, म्हणजे झालं!'' 


#माझी_म्युनिक_डायरी






रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६

Visa ची कहाणी भाग ४

परतीच्या तारखेपर्यंत Visa काही येणार नाही हे दिसत असते त्यामुळे ते तिकीट रद्द करावे लागते. तोवर तुम्ही कॉन्सुलेटमध्ये रोजच्या रोज, लागेल तेव्हा फोन केलेले असतात. तिथला दादा तुम्हाला नक्कीच ब्लॉक करणार ह्याची तुम्हाला आता खात्रीच वाटायला लागते. येनकेनप्रकारेण फोन लागला तर त्याचं उत्तर ठरलेलं असतं ''तुम्हाला वाट पाहावी लागेल मॅडम!'' 

दरम्यानच्या काळात मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या Lost and found वाल्यांचा ईमेल येतो की तुमचं कार्ड काही आमच्याकडे कोणी आणून दिलं नाही. "अरे कोणाला तरी सापडलं असेलच ना, द्यायचं ना नेऊन तिथं!" 

तुमचा एक मामा मंत्र्यांचा PA असतो आणि तोही बऱ्याच लोकांशी बोलून काही होऊ शकतं का ते पाहत असतो. एक दादा मंत्रालयात असतो, तोही म्हणतो, मी काही होतं का ते बघतो. पण सगळ्यांचं म्हणणं एकच असतं जर्मन कॉन्सुलेटमध्ये कोणीच काही करू शकत नाही. तुम्हाला वाट पाहावी लागेल.

आता ''टेन्शन यादीतले'' सगळेजण सतत चौकशी करत असतात. आला का ग Visa? कधी जाणार आहेस? तुमच्याबरोबर घरातले जेष्ठ नागरिकही उगीच तणावात असतात. एक दिवस जर्मन कॉन्सुलेटचा इमेल येतो की म्युनिकच्या फॉरेन ऑफिसने अजून आम्हाला तुमच्या Visa विषयी काहीही कळवले नाहीये त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. 

पूर्ण महिनाभर 'हे' पण म्युनिकच्या फॉरेन ऑफिसमध्ये काही काम होऊ शकतं का ते बघत असतात. पण तिथली अपॉइंटमेंट मिळण्याइतकं दुसरं दुरापास्त काम नाहीये. ते fastest finger first नसतं का, तशी व्यवस्था आहे अपॉइंटमेंट घ्यायची. तिथेही काही होत नसतं. पण हे निगुतीने म्युनिकमध्ये किल्ला लढवत असतात. लेकाच्या ऑफिसला जायच्या वेळी त्याच्यासाठी डबा तयार करणे, घरातलं, बाहेरचं सगळं बघणे, आणि हे सगळं स्वतःचं ऑफिस सांभाळून!

देवाच्या मनात नक्की काय आहे हे आता तुम्ही कळून चुकलेलं असतं. ह्यावर्षी गणपती बाप्पा आणि महालक्ष्म्यांनी तुम्हाला इथेच ठेऊन घेतलेलं असतं. खरोखर गणेश चतुर्थीच्या दिवशी ह्यांना म्युनिकमध्ये तुमच्या Visa विषयी अपॉइंटमेंट मिळते. 

तिथली ताई ह्यांना म्हणते की "हां तुमच्या बायकोचे ईमेल वाचले मी. (अगं बाई ईमेल वाचले होते तर एक रिप्लाय का नाही केला? का तुम्ही फक्त कागदी पत्रांनाच उत्तरं पाठवता???). पण माझं काम फक्त Visa द्यायचं आहे. मग देऊ का नको देऊ Visa तुमच्याकडे?"  हे मनातच "बाई देऊन टाक आता, अजून कुठं जीव घेते आमचा." आणि काय आश्चर्य! ताई ह्यांना तुमचा सहा महिन्याचा Visa देऊनही टाकते. गणपती बाप्पा आणि महालक्ष्म्यांची कृपा! 

आता प्रश्न असतो की Visa सारखा इतका महत्वाचा कागद कुरियरने पाठवावा की नाही? पुन्हा गहाळ बिहाळ झाला तर?  ये रे माझ्या मागल्या व्हायचं. मग हे स्वतः तुमचा Visa घेऊन पुण्याला यायला निघतात. मैत्रिण म्हणते की "हे भारीये तुमचं, त्यांनाच यावं लागलं तुला घ्यायला, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे!'' तुम्ही ''हे काही तसं नाहीये ग मुली...'कयामत से कयामत तक' आहे!'' 

ह्या सगळ्या आनंदी वातावरणात तुम्ही एक महत्वाची गोष्ट विसरूनच जाता की तुमचा पासपोर्ट कॉन्सुलेटवाल्यानी ठेऊन घेतलाय, त्यावर Temporary Visa छापून द्यायला! ते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तसं सगळं झालेलं असतं. म्हणजे आता Visa हे स्वतः जर्मनीहून घेऊन निघालेले असतात पण पासपोर्टचं नसतो. म्हणलं ना कयामत से कयामत तक. निस्ता मनस्ताप.

Visa ची वाट पाहत तुम्ही संभाजीनगरातच असता कारण त्यासाठी पत्ता तिथला दिलेला असतो. लगेच तुम्ही कॉन्सुलेटला फोन लावता आणि सगळी परिस्थिती त्यांना समजावून सांगता आणि पासपोर्ट पुण्याला पाठवा असे सांगता. त्यावर त्यांचं ठराविक जर्मन उत्तर येतं की हाताने पत्र लिहून ते पाठवा. जर्मन लोकांचं पत्रप्रेम जगजाहीर आहेच म्हणा. नशीब ते पत्राची PDF पाठवा म्हणतात, त्यांनी जर पोस्टाने पत्र पाठवायला सांगितलं असतं, तर अनिश्चित काळासाठी तुमचा भारतातला मुक्काम लांबला असता हे नक्की. 

तुम्ही पुण्यात पोहोचता, हे दुसऱ्या दिवशी Visa घेऊन पुण्यात येतात पण कॉन्सुलेटवाल्यानी पत्राचं उत्तरच पाठवलेलं नसतं. पासपोर्ट पाठवणार आहेत की नाही? म्हणजे आता Visa आहे पण पासपोर्ट नाही! तुम्ही सतत त्यांना फोन लावत असता पण ते उचलतील तर शपथ. तुम्हाला वाटतं केलं त्यांनी ब्लॉक आपल्याला. 

पण एकदा फोन लागतो आणि तिथला बाप्या खेकसतो, ''तुम्हाला कळत नाही का आम्ही इथे किती कामात आहोत ते, २ तासांनी फोन करा.'' अरेवा, हे बरंय. ह्यांचे कामं म्हणे! आम्ही महालक्ष्म्यांच्या कामात आहोत, त्यात मला तुमच्याशी डोकं लावत बसावं लागतं आहे त्याचं काय?'' पण कंट्रोल राजश्री कंट्रोल म्हणून, तुम्ही पुन्हा दोन तासांनी त्यांना फोन करता. तो बाप्या ऐकून घेतो आणि तुमचा पासपोर्ट पाठवतो म्हणतो.

महालक्ष्म्यांदरम्यान एक दिवस पासपोर्ट हातात पडतो आणि सगळ्यांचा टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडतो. सासूबाई, दीर, जावा, पुतणे आणि आम्ही, सगळ्यांनाच ''हुश्श'' वाटतं! आता हे नक्की झालेलं असतं की तुम्ही जर्मनीला जाणार. सगळे सोपस्कार पार पडून तुम्ही २५ सप्टेंबरला जर्मन भूमीवर पाय ठेवता. लेक वाट पाहतच असतो. 

तुम्हाला वाटतं, आता सगळं सुरळीत झालं एकदाचं!  पण नाही, मुंबईच्या जर्मन कॉन्सुलेटचं म्हणणं असतं की आता पुन्हा हाताने पत्र लिहून कळवा की तुम्हाला तुमची Visa Application Withdraw करायची आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या प्रक्रियेत अडथळा येईल. तुम्हाला ओरडून विचारावंसं वाटतं ‘’अब क्या बच्ची की जान लोगे क्या?’’ तुम्ही ते पत्र खरडता आणि त्यांना PDF पाठवता. आता चार दिवसांपासून माझ्या पत्राला त्यांचं काहीतरी उत्तर येईल ह्याची वाट पाहतेय!

ह्या पूर्ण अग्निदिव्यात सगळ्या नातेवाईकांचा आणि मित्रमैत्रिणींचा फार मोठा आधार होता. सगळ्यांनी आपापल्या परीने मला जमेल तशी मदत केली. तर अशी ही ११ ऑगस्टला सुरु झालेल साठा उत्तराची Visa ची कहाणी, २५ सप्टेंबरला पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

एकंदर काय, तर मी भारतात आल्या दिवसापासून... अहं रात्रीपासून फक्त आणि फक्त रेसिडेंट परमिटच्या विचारात होते, बस्स!


समाप्त




शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६

Visa ची कहाणी भाग ३

शेवटी एका आठवड्याने तो दिवस येतो. त्यादिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास इमेल येऊन धडकतो की ''उद्या सकाळी साडेनऊ वाजता तुमचा मुंबईला Visa Interview आहे''.  इमेलनुसार तुम्हाला एका विशिष्ट रकमेचा, बँकेचा Demand Draft (UPI च्या जमान्यात हे लोक DD मागत आहेत. जर्मन लोक कधीच नाही सुधारणार )आणि तुमच्या कागदपत्रांच्या हजारो छापील प्रती जवळ बाळगणे क्रमप्राप्त असते. पण ही काय पद्धत झाली राव? उद्या सकाळी interview आणि तुम्ही आज ११ वाजता इमेल करता. कमाल आहे. गरजवंताला अक्कल नसते म्हणतात तेच खरं. 

लगेचच वडिलांबरोबर बँकेत जाऊन तुम्ही DD काढता. DD जरा चुकीचा छापून येतो, हे तुम्ही तिथल्या ताईंना पटवून देण्याचा आटोकाट प्रयन्त करता पण ताई काही बधत नाहीत. इमेलबरहुकूम तुम्ही तुमच्या फोटोचे प्रिंट्स काढता आणि घरी येऊन पुण्याला कूच करायची तयारी करता. पुण्यात भाचा तुमच्या कागदपत्रांच्या प्रिंट्स काढायची जबाबदारी घेतो त्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास सोडता. 

तेवढ्यात जर्मनीत बसून सेकंदासेकंदाचा हिशोब घेणाऱ्या जागरूक नागरिकाचा फोन येतो, "अगं बाई तू ती वास्तुशांतीच्या वेळी हातावर आणि बोटांवर मेंदी काढली होतीस ना? गेली का ती? तिथे तुला बायोमेट्रिक पण असेल, बोटांचे ठसे द्यावे लागतील ना!" आता तुमची अशी अवस्था झालेली असते की "भाईई मारो मुझे मारो". बोटांवर मेंदीचे अवशेष असतातच. 

तुम्ही तुमच्या मारवाडी ताईला फोन लावता तर तिचं उत्तर असतं "मला अशी ऐनवेळी मेहंदी घालवायची कशी ते काही माहित नाही बघ!"आता काय ऍसिडमधे बोटं खुपसावे की काय?" देवा.... निघायच्या आधी तुम्ही अक्षरशः सात आठ वेळा साबणाने बोटं घासून घेता! पुन्हा जर्मनीतून फोन येतो, "जास्त बोटं घासू नको नाहीतर बायोमेट्रिकवर परिणाम होईल!" इतका झेंडूपणा आयुष्यात कधी झाला नव्हता.... च्यामारी!!

संभाजीनगर पुणे प्रवास म्हणजे अक्षरशः दुःस्वप्न आहे. ज्यांनी केला असेल त्यांना माहित आहे. जिथे पूर्वी चार पाच तास लागायचे तिथे आता वाहतुकीच्या वेळेत सात तास लागतात. तुमच्या डोक्यात " मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग ..." वाजत असतं. रात्री उशीरा पुण्यात पोहचून सगळ्या कागदपत्रांचा जामानिमा करता. दादा वहिनीनी दुसऱ्या दिवशी पहाटेची मुंबईची कॅब बुक करून ठेवलेलीच असते. वहिनी आणि तुम्ही पहाटे निघून नरिमन पॉइंटला पोहोचता. 

जर्मन कॉन्सुलेटवाले वेळेच्या फक्त दहा मिनिट आधी तुम्हाला आत सोडतात. फोन वगैरे काही आत नेता येत नसतं. वर गेल्यावर तिथला अधिकारी तुमचे कागदपत्र तपासतो(??) आणि तुम्हाला प्रतिक्षाकक्षात पाठवतो. तिथे आधीच एक student visa साठी आलेली मुलगी बसलेली असते आणि ती प्रचंड तणावाखाली असते. तिचा DD बाहेरच्या अधिकाऱ्याने नाकारलेला असतो आणि तिचे बाबा तिथल्या बँकेत नवीन DD काढायला गेलेले असतात. अचानक तुमच्या लक्षात येतं की आपला DD पण व्यवस्थित नाहीये पण त्या अधिकाऱ्याने त्यावर काही आक्षेप घेतलेला नसतो त्यामुळे तुम्ही निर्धास्त(??) होता. 

नेमकं त्याच दिवशी तिथल्या सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो आणि त्यामुळे Interview प्रक्रिया लांबलेली असते. त्या वेळात ती मुलगीही तुमच्या ''टेन्शन यादीत'' येते कारण तिला म्युनिकलाच शिकायला यायचे असते, म्हणून ती तुमचा नम्बर घेते आणि तुमची व्यथा तिला कळते.

कसंतरी तास दीड तासाने प्रक्रिया सुरु होते. तुम्हाला बोलावलं जातं आणि पहिल्याच झटक्यात तिथली ताई तुमचा DD, फोटोची प्रिंट नाकारते. त्या पोरीला सांगावंसं वाटतं की ‘’आता माझ्याकडे इतके पासपोर्ट साईझचे फोटोज झालेत की गळ्यात त्याची माळ बांधून अजून सगळ्या प्रकारचे दागिणेही होतील. अजून कुठे नवीन प्रिंट काढायला सांगते बाई!’’ अमुक प्रिंट नाहीये, तमुक कागद नाहीये. ''आता काय नवीन अँपॉईनमेंट घ्या म्हणते की काय?'' असा भयावह विचार तुमच्या मनात चमकून जातो. पण ती वेळ देते आणि सगळं घेऊन यायला सांगते.

तुमच्या नशिबाने वहिनीचे अकाउंट ज्या बँकेत असते तिची शाखा समोरच असते. तिथून तुम्ही पुन्हा DD काढता, फोटोच्या आणि नवीन कागदपत्रांच्या प्रिंट्स काढता आणि वर ऑफिसमध्ये पोहोचता तेव्हा तिथे फक्त तुम्ही एकट्या उरलेल्या असता. बाकी सगळ्यांची कामं झालेली असतात. आता सगळे कागदपत्र आणि नवीन DD पाहून ताईचा चेहरा खुलतो, ती सगळं स्वीकारते आणि सांगते की साधारणपणे ९० दिवसांनी तुमचा Visa येईल. हाय रे कर्मा!! तुमचं परतीचं तिकीट तर पंधरा दिवसांनीच असतं. आता पुन्हा वाट पाहण्याचा अगम्य खेळ सुरु होतो!


क्रमशः




शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

Visa ची कहाणी भाग २

संभाजीनगरला विमान उतरतं आणि तुमच्या फोनवर ह्यांचा मेसेज आलेला असतो. ''आधी FIR नोंदव''. झालं, आता पोलीस स्टेशनचा रस्ता धरावा लागतो का काय आधी? डोकं भन्न झालेलं असतं. मावसभावासोबत घरी पोहचून, आता ही बातमी आईवडिलांना कशी सांगावी ह्या विचारात तुम्ही असता. चहापाणी झाल्यावर तुम्ही आईवडिलांना सांगून टाकता. आता ''टेन्शन यादीत'' अजून लोकांची भर पडलेली असते. 

मावसभाऊ बिचारा त्याचे सगळे कामं सोडून तुमच्यासोबत जवळच्या पोलीस स्टेशनला येतो. तिथे गेल्यावर पोलिस मामाही शिकवायला लागतात, ''असं कसं हरवलं मॅडम कार्ड? लक्ष द्यायचं ना तुम्ही. आता झाली की नाही पंचाईत! तुम्हाला ऍफिडेव्हिट करावं लागेल FIR नोंदवायला.'' 

ऑनलाईन FIR करता येते हे जेव्हा गुगल बाबा तुम्हाला सांगतं तेव्हा तुम्ही सरळ मुंबईच्या जर्मन कॉन्सुलेटला फोन लावता. त्यांचा फोन लागणे म्हणजे जग जिंकण्याचा प्रकार आहे. दहा पंधरा वेळा कॉल केल्यावर एकदा कधीतरी तिथला बाप्या फोन उचलतो. 

तुम्ही त्या दादाला सगळी परिस्थिती समजावून सांगत असता की काय झालंय ते. ते सांगत असताना तुम्ही चुकून तुमचा Visa हरवला आहे असं सांगता तर तो दादाही उचकतो आणि म्हणतो ''मॅडम तुमचं जर्मन रेसिडेंट परमिट हरवलं आहे असं सांगा, Visa हरवला आहे असं नका सांगू. तुम्ही मला गोंधळात टाकताय. रेसिडेंट परमिट म्हणा रेसिडेंट परमिट!'' तुम्ही पुन्हा मनातच, ''हो बाबा आता तूच राहिला होतास माझ्यावर चिडायचा.'' मग तो सांगतो की ऑनलाईन FIR चालते, त्याची PDF आणि बाकी सगळ्या कागदपत्रांची PDF पाठवा, तुमची केस रजिस्टर करतो. इथं थोडा जीव भांड्यात पडतो. थोडी अंधुक आशा निर्माण होते की ''तात्पुरता Visa'' मिळेल लवकरच कारण तुम्ही परत जायचं तिकीट आधीच काढलेलं असतं.

आता तुम्हाला ''टेन्शन यादी'' वाढवायची असल्यामुळे, तुम्ही पुण्यात घरच्या सगळ्यांना फोन करून सद्यःपरिस्थतीची कल्पना देता. नंतर आईकडे असलेल्या कार्यक्रमात संभाजीनगरच्या सगळ्या नातेवाईक आणि मित्रपरिवारात ‘’राजश्रीचा Visa हरवला'' ही बातमी वाऱ्यासारखी पसरते.. अहं viral होते. सगळेजण काही ना काही उपाय सुचवतात. आता तुमच्या ''टेन्शन यादीत'' लोकांची भर पडतच असते. सगळे फोन करून धीर देत असतात. 

एक रागावलेला माणूस ''अमुक करून बघ, तमुक करून बघ, कॉन्सुलेटला रोज फोन लाव, त्यांना सांग अपॉइंटमेंट द्या लवकर, तरी मी तुला सांगत होतो ती पर्स घेऊन जाऊ नको.'' असं सांगत असतो. हे सगळं बघून तुम्हाला जाणीव होते की आपण आयुष्यातली फार मोठी माती खाल्लेली आहे. तुम्हाला कळून चुकलेलं असतं की निघायच्या आधी 'हे' सांगत होते ते बरोबर होतं. 'ही पर्स नेऊ नको, ह्यातून काहीही खाली पडायची शक्यता आहे'. पण नवऱ्याचं ऐकेल ती बायको कसची. ''विनाशकाले विपरीत बुद्धीला'' अनुसरून तुम्ही चुकीची पर्स घेता. त्यात पुन्हा कार्ड आतल्या कप्प्यात नीट ठेवत नाही, त्याची चेन नीट लावत नाही, घाईगडबडीत पर्स खाली पाडता, त्यातून कार्ड पडले असेल हा विचारही तुमच्या मनाला शिवत नाही! 

खरंतर जर्मन सरकारला सांगायला पाहिजे, असं डेबिट कार्डसारखं सुळसूळ कार्ड कुठे रेसिडेंट परमिट म्हणून देतात का? आधीसारखं पासपोर्टात छापून द्या की म्हणजे हरवायचा प्रश्नच नाही!

हे असे सगळे विचार करून आता काहीही उपयोग नसतो. आल्या परिस्थितीला तोंड देणं भाग असतं. आता सगळी भिस्त जर्मन कॉन्सुलेट आणि म्युनिकच्या फॉरेन ऑफिसवर असते. तुम्ही आणि तुमच्याबरोबर ''टेन्शन यादीतले'' सगळे आतुरतेने Visa Interview च्या अँपॉइन्टमेन्टची वाट पाहत असता. 


क्रमशः




Visa ची कहाणी भाग १

आईवडिलांनी संभाजीनगरात एक कार्यक्रम ठेवलेला असतो म्हणून तुम्ही "आनंद पोटात माझ्या माईना" म्हणत म्हणत, एकट्याच(हा शब्द फार महत्वाचा आहे ह्याठिकाणी) म्युनिकहून मुंबईला प्रस्थान करता. आता माहेरी जायचं म्हणलं सगळीकडे "आनंदी आनंद गडे" असतो, हो ना? 

एकीकडे मनात हुरहूर असते की आत्ताच लेकराची internship सुरू झालीये, त्याचं सगळं व्यवस्थित होईल की नाही? पण त्याच्या बाबांनी तुम्हाला ग्वाही दिलेली असते की तू निर्धास्त रहा, आम्ही बघतो. अशा सगळ्या विचारांमध्ये तुमचं आनंदी विमान मुंबईला उतरतं. रात्री बाराला तुम्ही विमानाच्या बाहेर येता आणि immigration counter चा रस्ता धरता. मुंबई विमानतळावर नेहमी भली मोठी रांग असते immigration साठी. 

पर्स सांभाळत तिथल्या अधिकाऱ्याला तुम्ही तुमचा पासपोर्ट आणि जर्मन रेसिडेंट परमिट कार्ड दाखवता. अधिकारी दादा गप्पा मारत मारत ते चेक करतात. ''किती वर्ष झाली तुम्हाला जर्मनीत? इकडे काय सुट्टीला आलात का? आता कोणत्या गावाला जाणार? इत्यादी इत्यादी. "एकतर रात्रीचे साडेबारा झाले आहेत त्यात माझ्या मागे एवढे लोकं आहेत रांगेत आवरा की पटापटा दादा, ही काय गप्पा मारायची वेळ आहे का?" हे शब्द मनातच बोलून तुम्ही त्यांनी परत केलेला पासपोर्ट आणि जर्मन रेसिडेंट परमिट कार्ड पर्समधे व्यवस्थित(??????) ठेवून तिथून बॅगा घ्यायला निघता.

बॅगाना ट्रॉली न घेता(अतीआत्मविश्वास अन दुसरं काय! ह्यापुढे एखादी चिंगरी बॅग जरी जवळ असेल तरी मी मोठ्ठीच्या मोठ्ठी ट्रॉली घेणार आहे!!)) दोन हातात दोन बॅगा घेऊन तुमची वरात डोमेस्टिक एअरपोर्टला जाणाऱ्या बसकडे निघते. त्यादरम्यान लिफ्टच्या जवळ पर्स कधीतरी खांद्यावरून पडते, मोठी बॅग आडवी होते. घामाने जीव नकोस केलेला असतो. कसंतरी तुम्ही बसजवळ पोहोचता, तिथले लोक तुमचा अवतार बघून विचारतातच, ''ताई ट्रॉली नाही घेतली का बॅगाना?'' कसनुसं हसून तुम्ही ''हो, राहिलीच घ्यायची'' म्हणून बसमध्ये जाऊन बसता. 

साधारण रात्री एकच्या आसपास बस डोमेस्टिक एअरपोर्टला पोहोचते. पोटात कावळे कोकलत असतात. पण सकाळी साडेपाचला संभाजीनगरचं विमान असल्यामुळे तुम्ही निर्धास्त असता. आता तिथे उतरून काहीतरी खाऊया असा विचार करून, तुम्ही बॅगा घेऊन इंडिगोच्या काउंटरवर जाता. तिथे बोर्डिंग पास दाखवल्यावर तुम्ही तुमचा पासपोर्ट दाखवण्यासाठी काढता. त्यात तुम्हाला तुमचं रेसिडेंट परमिट कार्ड दिसत नाही. पण तुम्ही पासपोर्ट दाखवता आणि मोठी बॅग चेकिन करता. 

तो सोपस्कार पार पडल्यावर आधी तुम्ही तुमच्या पर्सचा आतला कप्पा व्यवस्थित बघता आणि तिथे तुमचं जर्मन रेसिडेंट परमिट कार्ड नसतं. पोटात मोठ्ठा गोळा येतो. प्रचंड तणावाखाली तुम्ही तिथेच खाली बसकण मारता आणि भराभर पर्समधल्या सगळ्या वस्तू जमिनीवर टाकता. तरीही कार्ड कुठेच सापडत नाही. तुम्ही पॅन्टचे खिसे, बॅगेचे सगळे कप्पे, पुन्हा एकदा पर्स तपासता. पण कार्डचा कुठेच पत्ता नसतो. तिथे दारातल्या पोलिसांना सांगून आजूबाजूला शोधाशोध करता. एव्हाना पोटातला गोळा वाढत चाललेला असतो, काय करावं सुधरत नसतं. पायाखालची जमीन सरकणे म्हणजे नेमकं काय असतं, ह्याचा तुम्हाला प्रत्यय येतो. 

जर्मन रेसिडेंट परमिट हरवणे म्हणजे पुन्हा जर्मनीत ''नो एन्ट्री''!! ह्या विचारसरशी अंगावर सरसरून काटा येतो, दरदरून घाम फुटतो आणि मग तुम्ही घाबरत घाबरत ह्यांना फोन लावता. ''कार्ड सापडत नाहीये'' म्हणल्यावर तिकडून काय बोलणे बसणार आहेत हे माहित असतंच. पण दुसरं गत्यंतरही नसतं ना! बोलणे खाऊन झाल्यावर तुमच्या लक्षात येतं की आता पुन्हा शोधाशोध करायला आतंरराष्ट्रीय विमानतळावर तुम्हाला कोणीही आत जाऊ देणार नाहीयेत आणि जाऊ दिलं तर इकडचं संभाजीनगरचं विमान सुटेल. 

ह्या सगळ्या कश्मकश अवस्थेत तुम्ही विमानाच्या गेटवर येता. तेवढ्यात जर्मनीत असलेल्या भाचीचा उत्साहात फोन येतो. ''मावशी पोहोचलीस का? प्रवास कसा झाला? तुला एकटीला भारी वाटत असेल ना?'' तिच्या आनंदावर विरजण टाकणारं वाक्य तुम्ही तिला सांगता ''माझं रेसिडेंट परमिट सापडत नाहीये, मी बोलते तुझ्याशी नंतर''. ती बिचारी अविश्वासाने फोन ठेवते. माझ्याबरोबर आता अजून चार व्यक्ती माझ्या कार्ड हरवल्याच्या ''टेन्शन यादीत'' येतात. लेक, त्याचे वडील, भाची आणि जावई. 

थोडं डोकं शांत झाल्यावर, विमानतळाच्या लॉस्ट अँड फाउंडला तुम्ही तक्रार नोंदवता. जर्मनीत असलेले तीन लोक तुम्हाला धीर देत असतात, लेक, भाची आणि जावई पण चौथा माणूस तुमच्यावर रागावलेलाच असतो, अर्थात प्राणनाथ!! रागावलेले असले तरीही पुढे काय करता येईल ह्याचा शोध ते घेत असतात. आता तुम्ही शरीराने आणि मनाने पार कोलमडून गेलेल्या असता. शेवटी पहाटे साडेतीनला तुम्ही ह्यांना सांगता की कृपया आता झोपा. आपण, मी संभाजीनगरला पोहोचले की पुढे काय करायचं ते बघू. पहाटे चार वाजता तुम्ही कसाबसा एक चहा घशाखाली उतरवता आणि संभाजीनगरला जाणाऱ्या विमानाची वाट पाहत बसता!!

क्रमशः




बुधवार, १५ जुलै, २०२६

मी मज हरपून बसले ग

अडीच तीन महिन्यांपूर्वी माझ्या फोनला माझा इतका कंटाळा आला, इतका कंटाळा आला की एक दिवस अचानक त्याने असहकारच पुकारला! मैत्रिणीशी एक दोन तास व्हाट्सऍपवर गप्पा काय मारल्या, त्याची बॅटरीच फुगायला लागली.  नाही म्हणायला नऊ वर्ष साथ दिली बिचाऱ्याने! कसातरी त्यातला डेटा रिकव्हर केला आणि त्याला जड अंतःकरणाने रिसायकलिंग सेंटरला देऊन आले! 

आणि मी सोशल मीडियावरून गायबच झाले. त्याचं झालं असं की फेसबुकला माझ्या कामासाठी Two Factor Authentication ठेवलं होतं आणि हे मी पार विसरूनच गेले होते कारण ऍपवर आपण लॉगिन केलेलंच असत ना! पण फोन गेल्यावर झुक्याभाऊ काही केल्या मला लॅपटॉपवर लॉगिन करू देईना! बरं नवीन फोन कोणता घ्यायचा? ह्यावर ''चायपे चर्चा'' चालू होती त्यामुळे मी तेव्हा ना व्हाट्सऍपवर होते, ना फेबुवर, ना इन्स्टावर!!

म्युनिकला आल्यापासून भारतात सगळ्यांशी व्हाट्सऍपवरच गप्पागोष्टी चाललेल्या असतात. एकवेळ फेबु आणि इन्स्टा नसेल तरी काही वाटत नाही पण व्हाट्सऍप नाही म्हणलं की... असो. नवीन फोन घेण्याविषयी चर्चा आणि तो हातात येईपर्यंत बरेच दिवस गेले. त्यादरम्यान मुलाचा फोन महत्वाच्या कॉल्ससाठी वापरत होते. तोवर इकडे मैत्रिणींचे मेसेजेस, कॉल्स WA वर धडकत होते पण मला त्याचा गंध नव्हता. स्टेटस टाकणे नाही की डिपी बदलणे नाही. सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता ''ही बाई गेली कुठे?''

पहले दोन चार दिवस खरोखर ''मी मज हरपून बसले ग'' वाटायला लागलं होतं. संन्यास घेतलाय की काय आपण? असे नसते प्रश्न पडायला लागले होते. ''कोई किसीका नहीं, ये झुठे...'' असे दुःखी गाणे आठवायला लागले. खरंतर माणसाने इतकंही कोणत्या गोष्टीच्या आहारी जाऊ नये हे कळायचं वय आहे अजून माझं! पण कसं आहे ना... जाऊदे.  माझा फोन काय बंद पडला, घरात माझी नुसती फरपट चालू होती. आजकालच्या काळात साधा एक फोन नसला तुमच्या हातात तर लोक तुम्हाला हिंग लावूनही विचारत नाहीत, हे कळायला वेळ नाही लागला मला. 

मुलाचा फोन मागितला की त्याला त्याच्याकडच्या छुप्या खजिन्याचा नकाशा मागितल्यासारखं वाटायचं. ''हं, एक मिनिट आई, मी अनलॉक करून देतो, मी WA ला कॉल लावून देतो, तुला काय सर्च करायचं आहे? मी शोधून देतो, किती फोन येतात तुला? माझा नम्बर तू किती लोकांना दिला आहेस?'' अशा प्रकारची प्रश्नावली तो माझ्या समोर ठेवायचा. इकडच्या स्वारीला आपण म्हणावं ''फेबुवर काय चालू आहे ते बघू बरं जरा मला'' तर त्यांचं अजून तिसरंच काहीतरी असायचं, जसं की ''तुमच्या फेबूची मजा आमच्या फेबूमधे कुठे?'' आता बोलावं तरी काय माणसाने!

हे सगळं असं चालू होतं आणि झुक्याभाऊ काही केल्या मला माझ्याच फेसबुकला लॉगिन करू देत नव्हता. सहन तरी किती करायचं? नाही का? शेवटी मी झुक्याचा नाद सोडला आणि स्वतःच्या मनाची समजूत घातली की ''त्या फेसबुकला एवढं काय सोनं लागलं आहे? दे सोडून, त्याच्या बाहेर पण जग आहे, वगैरे.'' मग नवीन फोन आला एकदाचा. फोन आल्या आल्या मैत्रिणींना WA वर कळवलं ''अभी हम जिंदा है!'' मैत्रीणींचे काळजीचे मेसेजेस वाचून नवीन फोन घेतल्याचं सार्थक झालं! त्यात इथली एक गोड मैत्रीण ''जयश्री'' पण होती!

दोन महिन्याचा अवकाश आणि झुक्याभाऊंच्या लोकांना केलेल्या मेलामेली नंतर, कसंतरी माझं अकाउंट रिकव्हर झालं एकदाचं! इजारमध्ये घोडं नहालं. पण फेबूवर नव्हते तेव्हा मात्र ''कई दिनोसे शिकायत नहीं जमानेसे'' ह्या ओळीचा प्रत्यय आला. कारण उखाळ्यापाखाळ्या करता नाही आल्या आणि कोणाच्या वाचता ही नाही आल्या, काही विषय झाला असेल तर तिसऱ्याच कोणाच्या तरी अकाउंटवर जाऊन, अर्थार्थी संबंध नसलेल्या लोकांच्या कमेंट्स वाचता नाही आल्या, घेणं देणं नसताना फुकटचा  कंदील लावता नाही आला. आता लिहू तरी काय का? ही यादी न संपणारी आहे! 

ते सगळं जाऊदे,  तुम्ही सगळे कसे आहात?


#माझी_म्युनिक_डायरी







मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

एका देवमाश्याची गोष्ट

जगभरात युद्ध सुरु असताना, धुरंधर-२ आल्यावर भारतात जसा तो राष्ट्रीय मुद्दा बनला होता तसा सध्या जर्मनीत एक मोठाच राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाला आहे. तो आहे, जर्मनीच्या किनाऱ्यावर अडकलेला 'टीमी' नावाचा देवमासा! 

साधारण मार्चच्या सुरुवातीला टीमी चुकून बाल्टिक समुद्रात आला. देवमासाच (Humpback whale) तो, खोल महासागरातून तो उथळ किनाऱ्यावर आल्यामुळे अडकला. सगळ्यात आधी त्याला इथल्या कोळ्यांनी पहिले कारण तो त्यांच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर त्याच्या अडचणींमधे भर पडतच गेली, बाल्टिक समुद्राचं पाणी त्यामानाने कमी मीठ असलेलं आहे म्हणे आणि त्यामुळे त्याच्या त्वचेवर परिणाम झाला. त्याला बिचाऱ्याला अन्नाची कमतरता भासायला लागली, आणि सगळ्यांत महत्वाचं, त्याला परतीचा मार्गचं सापडत नव्हता. 

टीमीला वाचवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. बोटींच्या साहाय्याने त्याला खोल पाण्याकडे वळवण्याचा प्रयत्न झाला. तो जिथे अडकला होता तिथली वाळू काढून त्याला मार्ग करून देण्यात आला. तज्ञ  लोकांच्या मार्गदर्शनाखाली, मोठमोठे फुगे, दोर, टगबोट इत्यादी बऱ्याच गोष्टी वापरल्या गेला. जर्मन सरकारने त्यांच्या परीने बरेच प्रयत्न करून पहिले परंतु दुर्दैवाने सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. शेवटी १ एप्रिलला सरकारने ही बचाव मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. 

पण, इतके दिवस हे सगळं जर्मन जनता रोज टीव्हीवर लाईव्ह बघत होती. त्यातल्या खूप लोकांसाठी ''टीमी'' हा एक भावनिक मुद्दा बनला होता. सरकारने बचाव मोहीम थांबवल्याचे कळताच, काही लोकांनी टीमीला वाचवायला स्वतः समुद्रात उड्या मारल्या, तर इतरांनी खूप लवकर "हार मानल्याबद्दल" अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांवर जोरदार टीका केली. ह्या टीमीच्या घटनेमुळे जर्मनीमध्ये इतके तीव्र वाद निर्माण झाले आहेत की काही लोकांनी चक्क सरकारी अधिकारी, तज्ञ आणि बचाव मोहिमेतल्या लोकांना सोशल मीडिया पोस्ट्समधून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत! आणि कहर म्हणजे, ह्या सगळ्या घटनेचे पडसाद इथल्या संसदेत पडले आणि इथल्या पर्यावरण मंत्र्याला लोकांनी धारेवर धरले. बाबो, जर्मन लोकांचा नादच करायचा नाही. निस्त हाण की बडीव चाललंय, शाब्दिक!

पण तज्ञांच्या मते, टीमीची स्थिती इतकी गंभीर झाली होती की त्याला वाचवण्याची शक्यता खूपच कमी होती. अनेक प्रयत्नांनंतरही तो उथळ पाण्यातच राहिला  आणि त्याची शक्ती कमी होत गेली. काही तज्ञांनी तर स्पष्ट सांगितले की त्याला शांतपणे मरू देणेच योग्य ठरेल. खरंतर सध्या जर्मनीत ह्या टीमीबद्दल खूप सहानुभूती निर्माण झाली आहे आणि साहजिकच आहे म्हणा, कोणत्याही निष्पाप जीवाला मदत करणं योग्यच आहे. पण त्याबाबतीतही इथे मतमतांतरे वाचायला मिळत आहे. एका गटाचं म्हणणं आहे की ''आता बास, त्याला एकटं सोडा. अजून त्याची क्रूर चेष्टा करू नका. त्याचं जे होईल ते निसर्गावर सोडा!'' दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की ''त्याच्याविषयी करुणा बाळगा आणि त्याला इच्छामरण द्या!'' आणि तिसऱ्या गटाचं म्हणणं आहे की ''असं कस? बचावकार्य सुरूच राहिलं पाहिजे, ते आपलं नैतिक कर्तव्य आहे!''

हे सगळं असं सुरु असताना, त्यात दोन बड्या धेंडांनी उडी घेतली. इथल्या दोन मोठ्या उद्योगपतींनी टीमीच्या सुटकेसाठी लाखो युरोजची मदत दिली. त्यामुळे  बचावकार्याला पुन्हा वेग आला. आता ते खाजगी बचावकार्य झालंय, सरकारी यंत्रणेने हात आधीच वर केलेत. आजच्या माहितीनुसार, टीमी प्रयत्न करतो आहे परंतू तो दिवसेंदिवस थकत चालला आहे आणि ते लोक आता त्याला महासागराकडे नेण्याचा शेवटचा प्रयत्न करणार आहेत!

मी सुरुवातीला ही बातमी वाचली होती. पण त्या बातमीमुळे जर्मनीत राष्ट्रीय प्रश्न निर्माण झालाय हे मुलाकडून समजलं. म्हणून मग सगळ्या घटनेचा धांडोळा घेतला आणि त्या बातम्या रोज वाचत राहिले. नंतर मी ही टीमीसाठी आस लावून बसले होते. पण आजची परिस्थिती वाचून मी टीमीला आता देवाच्या हवाली केलंय ! ईश्वर त्याचं भलं करो हीच प्रार्थना!!

#माझी_म्युनिक_डायरी

#timmi_the_whale

#timmi

PC: Google






रविवार, १५ मार्च, २०२६

लहरीपणा

जर्मनीमध्ये एक म्हण आहे “Es gibt kein schlechtes Wetter, nur schlechte Kleidung“. म्हणजे “खराब हवामान वगैरे काही नसतं, तुम्ही घातलेले कपडे खराब(चुकीचे) असतात!“ ह्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की आपण हवामानाला साजेसे कपडेच घातलेले नसतात! 

खरंतर कितीही साजेसे किंवा योग्य कपडे घातले तरीही इथल्या लहरी हवामानात ते नेहमी अयोग्यच ठरतात. बरं नुसते कपडेच नाही,  तर खेटरं सुद्धा! खरंतर इतका लहरीपणा बायकाही करत नसतील कदाचित, म्हणजे “एकाच दिवसांत इतका लहरीपणा”, असं म्हणायचं आहे मला. बायका आणि लहरीपणा करणार नाहीत? ऐसा कैसे हो सकता है भला? हो ना मित्रांनो? (प्रतिक्रिया नाही दिलीत तरी चालेल!) 

तर, वरील जर्मन म्हणीचा प्रत्यय वेळोवेळी येतंच असतो इथे. आता कालचीच गोष्ट आहे. मी सकाळी व्हाट्सअपला स्टेटस टाकलं होतं की सध्या “चुकीचं जॅकेट" नावाचा ऋतू सुरु झालाय आणि कालच्या हवामानाने ते दाखवूनही दिलं. दुपारी बाराच्या आसपास १४ डिग्रीज असलेलं तापमान संध्याकाळी अक्षरशः उणे दोन डिग्रीजच्या रिअल फिलला आलं. म्हणजे “दुपारी छान आहे हवा” म्हणून दिवसभर कुठे तरी भटकायला बाहेर पडावं तर दोन चार तासात गारठून जीव जायची वेळ येते. 

मागच्या आठवड्यात असं वाटत होतं की जसं काही आता उन्हाळाच सुरु होतोय इथं! चक्क १५-१८ डिग्रीज तापमान होतं. सगळी जर्मन जनता, लेकरंबाळं, मित्रमैत्रिणी, सायकली घेऊन दिसेल त्या पार्कात, नदीकिनारी भटकंती करत होते. एक दोन जर्मन मैत्रिणींनी लगे इन्स्टावर स्वतःच्या लेकरांच्या फोटोसहीत “Season’s first ice cream ” वगैरे स्टेटस टाकले होते. 

तापमान १५ ला गेलं की जर्मन लोक चंबूगबाळं घेऊन उंडारत असतात, लगेच आईस्क्रीमची दुकानं गर्दीने भरून वाहू लागतात, कॅफेजमध्ये बसायला जागा मिळत नाही, बिअरगार्डन्स दुथडी भरून वाहू लागतात! इथं १५ डिग्रीला ला माझं फक्त जॅकेट बदलतं आणि हे लोक थंडगार नदीकिनारी गप्पा झोडत आईस्क्रीम खात बसतात राव!! 

हवामानावर गप्पा मारणे हा जर्मन लोकांचा आवडीचा छंद आहे. मला इथे आल्याआल्या वाटायचं की मॅगी काकू कधीही भेटल्या की हवामानावरच का बोलत असतील बरं? पण आता जाणवतंय की  मी ही नवीन माणसाशी इथल्या लहरी हवामानाविषयीच बोलत असते. 

एकंदर काय तर, जर्मन डॉइचं-बान आणि जर्मन हवामान फारच लहरी बुआ! 

(डॉइचं-बान: जर्मनीची रेल्वे सिस्टीम, हिच्याइतक्या लहरी सध्या कोणीच नाहीये इथे, म्हणजे प्रवास पूर्ण होईल की नाही ह्याची पण शाश्वती नसते कधीकधी.)


#माझी_म्युनिक_डायरी  #Munich 






सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

जर्मन लोणचं

साधारणपणे लोणचं म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर कैरीचं, लिंबाचं, मिरचीचं, आवळ्याचं, मिश्र भाज्यांचं इत्यादी लोणची येतात. तसं तर संपूर्ण भारतात हजारो प्रकारची लोणची असतील. पण त्यात “बिनतिखटाचं लोणचं” ही कल्पनाही करवत नाही, कारण तिखटाशिवाय आपली लोणची अपूर्ण आहेत. 

पण जर्मन लोकांना तिखटाचं तर वावडं आहेच पण मिठाचंही आहे. तरीही ते लोणचं करतात आणि खातात सुद्धा. इथल्या लोकांचं सगळ्यात आवडीचं लोणचं म्हणजे काकडीचं लोणचं! 

ते करण्याची पद्धतही सोपी आहे. व्हिनेगरमध्ये जेवढ्यास तेवढं पाणी, थोडं मीठ, भरपूर साखर, एक चमचाभर पिवळी मोहरी, ८-१० मिरे टाकून ३-४ मिनिट उकळून घेतात. एका बाटलीत थोडा शेपू (बाबो शेपू!), छोटे कांदे टाकल्यावर, स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या काकड्या घट्ट बसवतात आणि त्यावर उकळलेलं व्हिनेगरचं पाणी टाकतात. चोवीस तास ही लोणच्याची बाटली बाहेर ठेवून नंतर फ्रिजमध्ये ठेवतात. झालं लोणचं! ह्याच पद्धतीने ह्या लोकांनी हाताला येईल त्या भाजीला व्हिनेगरमध्ये बुडवलं आहे आणि त्याला अमुक, ढमुक, तमुक भाजीचे लोणचे असे गोंडस नाव दिलंय! 

त्या लोणच्यांमध्ये इथे उपलबध असणाऱ्या झाडून सगळ्या भाज्या म्हणजेच अजिबात तिखट नसलेली वेगवेगळ्या रंगाची सिमला मिरची, श्रवणघेवडा, बेबीकॉर्न्स, गाजर, बीट, मश्रुम, हालापिनो, शतावरी, ऑलिव्ह, तिखटाचा लवलेशही नसलेल्या मिरच्या इत्यादी आहेत. महत्वाचं म्हणजे युरोपमधील अत्यंत आवडत्या बटाट्यालाही व्हिनेगरमधे बुडवलंय ह्या लोकांनी. 

इथल्या लोकांना एकंदरच आंबट गोष्टी आवडतात. म्हणजे इथलं प्रत्येक फळ बऱ्यापैकी आंबट आहे, संत्री, सगळ्या बेरीज, इत्यादी. त्यामुळे कदाचित त्यांना ती व्हिनेगरची अती आंबट चव चांगली वाटत असावी पण आपल्या टेस्ट बड्सला आंबटचिंच व्हिनेगर जरा त्रासदायकच आहे! 

मी एक पाहिलंय जर्मन लोक स्वयंपाकाचा फार त्रास करून घेत नाहीत. सोपं आहे आयुष्य त्याबाबतीत त्याचं. दुकानातून, बेकरीतून लागेल त्या गोष्टी आणायच्या आणि घरी येऊन त्या फक्त एकत्र (Assemble) करायच्या आणि खायच्या. उदाहरणार्थ बेकरीतून आवडता ताजा ब्रेड आणायचा, दुकानातून एखादा चिजस्प्रेड आणि हॅम स्लाईसेस आणायच्या, त्याचं सँडविच करायचं आणि दुकानात तयारच असलेलं मिक्सड सलाड आणि काकडीच्या लोणच्यासोबत ते खायचं. झालं ह्यांचं जेवण!! बाकी हे सगळं पचायला बिअर आणि वाईनचचे कारखाने आहेतच की, हाय काय अन नाय! 

जर्मन लोकांची हीच असेम्बलिंगची आवड ओळखून आयकियाने (IKEA) इथे जम बसवला असावा! असो, विषय भरकटतोय. जर्मन लोणच्यांचा व्हिडीओ टाकायचा होता म्हणून हा पोस्टप्रपंच! 


#माझी_म्युनिक_डायरी 

#gewürzgurken #pickles 


Video Link:

https://www.facebook.com/share/r/1KUEyb1Bfs/?mibextid=wwXIfr



मंगळवार, २० जानेवारी, २०२६

ईतना अंधेरा क्यूँ है भाई

२०२६ सुरु झालं नाही तोच बर्लिन मधे बरेच दिवस चक्क लाईट गेले होते. तेव्हा तापमान शून्याच्या खाली होतं. असं म्हणतात की साधारणपणे चाळीस पंचेचाळीस हजार लोक त्यामुळे परेशान झाले होते. तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. 

बर्लिनचं हे प्रकरण एका मित्राला समजलं आणि त्याने मला असंच मेसेज केला की “म्युनिक मधे लाईट आहेत ना? का तिथे पण बर्लिनसारखं झालंय?” ह्या प्रश्नावर नुसतं “इथे लाईट नाही गेले” असं उत्तर मला देता आलं असतं! पण लैच श्यानपना करून मी “अरे म्युनिकमधे कधीच लाईट जात नाहीत 😎” असं उत्तर दिलं! लगे गॉगलवाली ईमोजी, जसं काही इथली वीजपुरवठा कंपनी माझ्या भावाचीच आहे!  

आणि पुढच्या दोनच दिवसांत, लहानपणी शाळेत शिकलेले सगळे सुविचार, म्हणी माझ्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचायला लागल्या! अती शहाणा त्याचा बैल रिकामा, माणूस सवयीचा गुलाम आहे, गर्वाचे घर खाली, अती तेथे माती, देवाच्या काठीला आवाज नसतो! इत्यादी (ह्यात तुम्ही अजून भर घालू शकता). कारण आमच्या घरातल्या अर्ध्या भागातले लाईट्स अचानक फड्फडायला लागले. एक खोली आणि स्वयंपाकघरातला लाईट लावला की घरात भीतीचं वातावरण पसरत होतं. त्यात इथं सध्या अंधारही साडेचार पाचलाच पडतो आणि दिवस सकाळी आठला उजाडतो त्यामुळे तर अजूनच पंचाईत झाली होती. 

माझ्या मनात भीतीदायक विचार यायला लागले. अती भयकथा वाचल्या आणि भयपट पहिले की असंच होतं! पण मग विचार आला, की ही कुठली विचित्र भुताटकी आहे बुआ? ये भूत आखिर चाहता क्या है? हॅंये! अर्ध्याच घरातले लाईट फडफड करत आहेत. लेकाला म्हणाले मी, तर त्याने light fluctuations ची वैज्ञानिक कारणे सांगून माझी बोलती बंद केली. 

नेमका दुसऱ्या दिवशी शनिवार होता. त्यामुळे कोणीच दुरुस्त करायला येणार नाही हे माहीतच होतं. मी मागे म्हणल्याप्रमाणे वरून ब्रह्मदेव जरी झाले आले आणि त्यांनी इथल्या लोकांना शनिवार रविवारी काम करायला लावलं तर ते त्यांचंही नाही ऐकणार नाहीत (अपवाद वगळता)! आम्ही आमच्या घरमालकीण ताईंना सगळी  हकीकत कळवली. तर त्या म्हणाल्या “ही काही इमर्जन्सी नाही त्यामुळे आज तर कोणीच येणार नाही दुरुस्त करायला. आता सोमवारीच येतील कोणीतरी.” आता आमच्यावर म्हणायची वेळ आली की “सेह लेंगे थोडा!”

कसचं सेह लेंगे!! सवयच नाही राहीली बिना लाईटचे कामं करायची. शनिवारी संध्याकाळी तर अर्ध घर अंधारात. अर्ध्या घरातल्या विजेने पूर्णपणे असहकार पुकारला होता! मनात म्हणलं कुठून मला दुर्बुद्धी झाली आणि गॉगलवाली ईमोजी पाठवत शहाणपणा केला, गेले ना लाईट आता. बस आता हरी हरी करत. 

माझी नुसती तगमग तगमग चाललेली. स्वयंपाकघरात जाताना पटकन बोट खटक्यावर जायचं की लेक म्हणायचा ”आई, अगं लाईट गेलेत ना!“ मी लगेच जेन झी भाषेत “अरे मसल मेमरी रे, काय करू?“ 

स्वयंपाकघरात वीजपूरवठा नव्हता त्यामुळे काहीच सुचत नव्हतं. तरी मेणबत्त्या आणि मोबाईलचा फ्लॅश लाईट ह्यावर काम भागवलं कसबसं. नशीब इथले हिटर्स विजेवर चालत नाहीत. नाहीतर उणे तापमानात रात्री गारठायची वेळ आली असती. 

सोमवारी एक दादा दुपारी आला अन त्याने काहीतरी तात्पुरता उपाय करून वीजपुरवठा सुरु करून दिला. जाताना म्हणाला सगळं नीट बघावं लागेल, मी माझ्या बॉसला घेऊन येतो गुरुवारी. 

गुरुवारी दोघे आले. तो दादा इटालियन, आम्ही मराठी आणि ते बॉसकाका जर्मन. असे सगळे वेगवेगळ्या अक्सेंटमध्ये जर्मन बोलत होतो. हा सगळा जर्मन भाषेचा जांगडगुत्ता झालेला असताना, आम्ही सगळे कसंबसं समोरच्याला काय म्हणायचं आहे ते समजून घेत होतो. 

त्यात बॉसकाकांना आमचं घर इतकं आवडलं की विचारूच नका. “म्युनिकमध्ये आठव्या मजल्यावर घर म्हणजे फारच छान हो! वा वा, बाहेर काय छान दिसतंय सगळं, अरेच्या त्या बाजूला गॅलरी आहे आणि आल्प्सही दिसत आहेत, छान छान!“ हे सगळं आम्हाला सांगून झाल्यावर काकांनी बायकोला फोन लावून हे सगळं सांगितलं. आमच्याशी शिळोप्याच्या गप्पा मारल्या. मधे मधे त्या इटालियन दादाला सूचना देणं चालूच होतं त्याचं. वल्ली होते काका एकदम! 

त्या दोघांनी सगळं व्यवस्थित तपासून, वीजपुरवठा का खंडीत झाला? त्याचं कारण शोधून, नीट उपाययोजना केली. आम्हाला समजावून सांगितलं काळजी करू नका आता सगळं व्यवस्थित आहे आणि आमचा निरोप घेतला! 

आणि अशा पद्धतीने “म्युनिकमध्ये कधीच लाईट जात नाहीत”, ह्या माझ्या वक्तव्याला खोटं ठरवण्यात माझ्या घरातले लाईट यशस्वी झाले!!

#माझी_म्युनिक_डायरी





शनिवार, १० जानेवारी, २०२६

पाव पुराण

म्युनिकला रहायला आल्यापासून पहिल्यांदा, जेव्हा तुम्हाला जवळच्या जर्मन सुपरमार्केटमध्ये लादीपाव मिळतात तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो!

आता फक्त घरच्यांनी फर्माईश करायचा अवकाश, की मी त्या रेसिपीरीळवाल्यांसारखं  “दस मिनिटमे”,

पावभाजी म्हणू नका,

वडापाव म्हणू नका,

मिसळ पाव म्हणू नका,

दाबेली म्हणू नका,

इत्यादी पदार्थ त्यांच्या समोर हजर करते की नाही ते बघाच!

इथे घरात ओटीजी असल्यामुळे लादीपाव करणं तसं सोपं आहे, पण फार वेळखाऊ प्रकरण आहे, किमान माझ्यासाठी तरी. आता कसं, इथे योग्य दरात लादीपाव मिळत आहेत म्हणल्यावर हे सगळे पदार्थ, आजच ठरवून आजच करता येतील. नाहीतर ह्याआधी,  पावभाजी करायची म्हणलं की, पाव घरी करायचे की ब्रेडचं आणायचे? हा प्रश्न ठरलेला असायचा. 

तर, आम्हा जर्मनीत राहणाऱ्या आणि “सगळंच घरी करावं लागतं राव" म्हणणाऱ्या लोकांची लादीपाव घरी करण्याच्या त्रासातून  सुटका केल्याबद्दल जवळच्या जर्मन सुपरमार्केटच्या बेकरी विभागाचे आभार मानण्यात येत आहेत ह्याठिकाणी आणि एक दिवस शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचीत सत्कारही करण्याचा मानसही आहे, ह्याची नोंद घ्यावी! 

एवढे चार शब्द लिहून मी माझे पावपुराण आवरते घेते आणि वडापावच्या तयारीला लागते. 


#आनंदी_आनंद_गडे 

#माझ_म्युनिक_डायरी



गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

केमिकल लोचा

तुम्ही, इथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत,  सर्दीने हैराण झाल्यावर, सुट्टीवर गेलेले डॉक्टर कधी एकदा क्लीनिक उघडतील आणि कधी त्यांना भेटाल ह्याची वाट पाहता. हो, इथे साधारण क्रिसमसच्या आधीच्या शनवार रैवारपासून ते सहा जानेवारीपर्यंत, मधल्या एखाद दोन सन्माननीय दिवसांचे अपवाद वगळता, अख्खी जर्मनी सुट्टीवर असते. इमर्जन्सी सेवेतले काही कर्मचारी वगळता! 

दोन जानेवारीला आजारी लोकांची दया येऊन डॉक्टर अर्धा दिवस क्लिनिक उघडतात. तुमचे हे तुमची परिस्थिती पाहून आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवतात. क्लिनिकमध्ये शिरताच तिथे उसळलेला आजारी लोकांचा जनसागर पाहून तुम्ही गपगार होता.  

डॉक्टर दादा एशियन असतो, त्याला भेटल्यावर कळतं की आपली जर्मन डॉक्टर फारच प्रेमळ आहे. तपासून झाल्यावर तो स्पष्ट शब्दात सांगतो की “गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन तुमच्या इन्शुरंस कार्डवर आहे”. तरी बाहेर येऊन तुम्ही बावळटसारखं ते कार्ड रिसेप्शन ताईला देता आणि तिच्याकडे बघत बसता. 

दोन्ही नाकपुड्यांमध्ये, ओठांत आणि कानांत मोरण्या घातलेली रिसेप्शन ताई “काय बाई आहे!” असे भाव डोळ्यांत आणून तुमच्याकडे बघते आणि सांगते “ओ ताई, तुमच्या गोळ्या इन्शुरन्स  कार्डवरच आहेत (हे कार्ड मला कशाला दिलंय? निघा आता!“). 

ते ऐकून तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तुम्ही तिथून निघता.  अवतार नीट करायला वॉशरूममध्ये जाता. तुमच्या डोक्यात ट्रेन मिळेल का? मैत्रिणींना भेटायला उशीर तर नाही होणार ना? वगैरे विचार चालू असतात. त्याच नादात तुम्ही खालीच असलेल्या औषधांच्या दुकानात जाता आणि तुम्हाला तुमचं इन्शुरन्स कार्डच सापडत नाही. सैरभैर होऊन तुम्ही जॅकेटचे खिसे, पर्स, लिफ्ट सगळं शोधलेलं असते. 

गडबडीत वर जाऊन तुम्ही क्लीनिकमध्ये मोरणी रिसेप्शनिस्टला विचारता की माझं कार्ड इथे राहिलंय का? ती थोबा.. तोंडही वर न करता नाही म्हणते. आता तुम्ही वॉशरूममधे जाऊन शोधता. तिथले टॉयलेट पेपर्सचे रोल पाहून तुमची नुसती चिडचिड होते. “अरे काय लोक आहेत राव, एका कागदाच्या तुकड्यावर प्रिस्क्रिप्शन छापून द्यायला काय होतं ह्यांना आधीसारखं? काय तर म्हणे कागद वाचवा मोहीम! इथं एवढे भसाभसा टॉयलेट पेपर वापरता, ते गेलं का गाढवाच्या गां**? हे मेलं, घाला ते पेपर चुलीत आणि इकडं कागदं वापरा!”

वॉशरूममधून बाहेर येऊन तुम्ही दोन वेळा अख्ख क्लिनिक आणि लिफ्ट शोधता पण कार्ड सापडेल तर शपथ! आता तुमची सहानशक्ती संपायला लागते आणि तुम्ही क्लिनिकच्या खाली असलेल्या स्टेशनवर येता. आधीच थंडीने जीव नकोसा केलेला असतो, त्यात तुम्हाला मैत्रिणींना भेटायला जायला उशीर होत असतो आणि सगळ्यांत महत्वाचं “उस कार्ड का कही नामोनिशान” मिळत नसतो. तुम्हाला वाटतं मरो तेज्या** ते औषध, कार्डच नाहीये  तर “मी चालले मैत्रिणींना भेटायला". 

पण कार्ड हरवलेलं सांगायला तुम्ही पॅनिक मोडमधे तुमच्या “आयुष्यभराच्या स्वीय सहायकाला” फोन करता! तुमचा फोनवरचा सगळा रागराग ऐकून, सुट्टीमुळे घरात असलेला लेक, कार्ड हरवल्याचं ऐकून, पुस्तकातून डोकं वर काढून “व्वा" असं जोरात ओरडतो आणि पुन्हा त्याच्या कामाला लागतो. तेव्हा हे शांतपणे म्हणतात “तू तुझं जॅकेट आणि पुलोवरचे खिसे तपासलेस का?” 

पुन्हा तुमची ट्यूब पेटते आणि तुम्ही जॅकेट काढून पुलोवरचा खिसा तपासता आणि तुम्हाला तुमचं कार्ड हाताला लागतं. खिश्यात कार्ड आणि क्लिनिकला वळसे! यथावकाश पुन्हा दुकानात जाऊन तुम्ही औषध खरेदी करता आणि आनंदाने मैत्रिणींना भेटायला रवाना  होता. 

ह्या प्रसंगानंतर तुम्हाला कळतं की आजकाल असे किस्से तुमच्या रोजच्या आयुष्याचा भागच झालेत. ब्रेन फॉग की कायसं! एकदा सकाळची डब्याची गडबडीचा वेळ असते. भाजीत मीठ टाकायला म्हणून सरावाच्या ठिकाणी ठेवलेलं मिठाचं पाळंच जागेवर नसतं. स्वयंपाकघरातले झाडून सगळे कपाटं शोधूनही ते काही सापडत नाही. थकूनभागून तुम्ही शोध थांबवता आणि कोथिंबीर काढायला फ्रिज उघडता. तर समोर मिठाचं पाळं! आदल्या रात्री सगळं आवरताना तुम्ही मीठ फ्रिजमध्ये ठेवलेलं असतं! मीठ आणि फ्रिजमध्ये? ये कौनसा केमिकल लोचा है भाई? 

लोकांची नावं न आठवणं, त्याऐवजी “त्या ह्यांची ही नाही का, ती जर्मनीतल्या त्या ह्या गावात आलीये” असं सांगणं! “ती ही खाली आलीये का?” आता समोरच्या माणसानेच ठरवायचं की मी कचऱ्याच्या बिनविषयी बोलतेय, मुलीविषयी नाही. एखादी वस्तू कुठे आहे विचारल्यावर “ते हे आहे ना तिथे". काहीतरी आठवून एखाद्या खोलीत जाणं आणि आपण इथे नक्की कशासाठी आलोय हेच विसरून जाणं. एक काम डोक्यात योजून भलतंच काम करणं! इत्यादी इत्यादी. 

तुम्ही ठरवता की आता बास्स! ह्या आणि अशा गोष्टींची यादी करूच म्हणून फोन हातात घेता आणि स्वयंपाक घरातून काहीतरी जळाल्याचा वास येतो!! 

#हाय_रे_कर्मा  #न_जाने_मेरे_दिमाग_को_क्या_हो_गया 

#माझ_म्युनिक_डायरी 


तटी: फोटोचा आणि लिखाणाचा अर्थार्थी काहीही संबंध नाहीये हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल ह्याठिकाणी!





मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

मन धावतया

यंदा इथे थंडीचा कहर झालाय. बरेच दिवस झाले पारा शून्याच्या वर गेला नाहीये. सतत उणे तापमान. मागच्या दोन चार दिवसांत तर जर्मनीतल्या काही भागात उणे २१ पर्यंत पारा गेला होता, त्यामानाने म्युनिकमधे उणे १४ वगैरे आहे, म्हणजे बरंच म्हणायचं. 

अशी थंडी पडली आणि जानेवारी आला की माझं मन राधिका भिडेच्या गाण्यातल्यासारखं भारतात धावतं. ”मन धावतया माहेरच्या शेतात, डोलतया जोंधळ्याच्या मागं। जावं जिथं कुठं तिथं, नाव येई “हुरड्याचं” व्हटी!” असं काहीतरी वाटायला लागतं. माहेरच्या शेतातला #हुरडा ही माझ्यासाठी फार भारी आठवण आहे. 

छ. संभाजीनगरला आईकडे गेलं की, वडील गावाकडे आमच्या दाजींना कळवतात की आम्ही उद्या हुरडा खायला येतोय. मग आईची हुरड्याबरोबर खायच्या चटण्यांची तयारी सुरु होते. मी आपली  लहान मुलीसारखी तिला जी लागेल ती तयारी करून देते. पण ती लसूण, लाल तिखट घातलेली शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची खरपूस चटणी तिनेच करायची. ती चव माझ्या हाताला कुठे! 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपून आधी कडेठाणच्या देवीला जायचं आणि मग शेतात, हा आमचा शिरस्ताच आहे. कडेठाण आमच्या गावापासून जवळच आहे. देवीची ओटी भरून, छान दर्शन घेऊन, तिथल्या लोकांशी बोलून तिथून गावच्या रस्त्याला लागायचं. 

आता ते दोन चार मैलांचं अंतरही जास्त वाटायला लागतं. तिकडे दाजींनी शेतात आगटी पेटवून ठेवलेली असते. आम्ही शेतात पोहोचायचा अवकाश की लगेच ज्वारीची टपोरी कणसं आगटीत भाजायला गेलेले असतात. त्या आगटीच्या आजूबाजूला जाजमं अंथरून, कागदावर मीठ, चटण्या घेऊन कणीस भाजायची वाट पाहणे म्हणजे “ब्रह्मानंदी टाळी" वगैरे! दाजी जेव्हा ते भाजलेलं गरम गरम कणीस हातावर चोळून तो हुरडा आपल्या हातात देतात तेव्हा कुठे जीव भांड्यात पडतो. 

सुख म्हणजे नक्की काय असतं? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, “शेतात विहिरीजवळ बसून गरमगरम हुरडा खाणे. हे झाल्यावर शेतात चक्कर मारत असताना, यंदाच्या लागवडीवरची दाजींची कमेंट्री ऐकणे. नंतर दाजींची बायको बाजरीच्या भाकरी, वांग्याची भाजी आणि ठेचा घेऊन येताच त्यावर ताव मारणे. नंतर द्रोणात  दहीसाखर घेऊन ते कणसाच्या ओंबीने खाणे!” अहाहा!! 

पण.... हे सगळं दरवर्षी अनुभवता येतंच नाही. मग मी घरात जपून ठेवलेल्या, वाळलेल्या हुरड्याची उसळ करते. सकाळी उठल्यावर थोडे हरबरे गरम पाण्यात भिजत घालायचे. ते चांगले भिजले की कुकरच्या भांड्यात वाळलेला हुरडा, भिजलेले हरबरे आणि थोडे शेंगदाणे टाकायचे. अंदाजाने पाणी आणि मीठ टाकून, हे भांडं कुकरला लावायचं. भरपूर शिट्या होऊ द्यायच्या. हुरड्याचा खरपूस वास दरवळला की गॅस बंद. कुकर शांत होईपर्यंत तेलात थोडी मोहरी आणि छानपैकी हिंग घालून फोडणी तयार ठेवायची. फोडणीत जिरे नकोच. हुरड्याची चव घालवायची नाही. 

आता एका वाटीत गरम हुरड्याची उसळ, त्यात यथेच्छ फोडणीचं तेल घ्यायचं (आवडत असेल तर थोडं लाल तिखट) आणि बर्फाच्छादीत आल्प्सकडे बघत, मराठवाड्यातल्या गावाची आठवण काढत, भुरका मारत त्यावर ताव मारायचा! 

#माझी_म्युनिक_डायरी 

#सुख_म्हणजे_नक्की_काय_असतं




बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

इथे ओशाळला हिवाळा

गेले काही दिवस इथे चांगलीच थंडी पडलीये. तापमान जरी शून्याच्या थोडं वर असलं तरी फील उणे तापमानाचा असतो. काल जरा दुपारचं बाहेर पडलो होतो. साधारण -४ वगैरे तापमान होतं. 

बसमधे नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती. त्यामुळे बरीच लोकं उभ्याने प्रवास करत होती. एका ठिकाणी एक साठीतल्या काकू बसमधे चढल्या आणि दाराच्या अगदी जवळ उभ्या राहील्या. इथे दाराच्या जवळ पिवळ्या रंगाची पट्टी असते. त्याच्यावर उभं राहिलेलं चालत नाही कारण बसचालकाला दारं उघडणं, बंद करणं अवघड जातं.  

बसचालकाने दारं बिरं लावली पण बस काही निघेना. सगळे प्रवासी बसचालकाकडे डोळे लावून बसले! मी ह्यांना म्हणाले “बसचालक काकांना बायकूचा फोन आलाय जणू, गडी काही गाडी काढना झालाय!” तर हे म्हणाले “आता कुठे बायको आणते त्यांची मधे? ते बघ काका बाहेर पडलेत बसच्या!” 

बसमधला एकूणएक प्रवासी काकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. काका असे काही आवेशात चालत एका दारापाशी आले की विचारूच नका! मला वाटलं “ये ढाई किलोका हात मारतेत आता दारावर!” अन काय आश्चर्य, काकांनी खरोखर बंद दारावर जोरदार थाप मारली. दाराला टेकून उभ्या असलेल्या साठीतल्या काकूंसकट सगळे दचकले ना! काकूंच्या डोक्यात त्या एका थापेने अचानक प्रकाश पडला की त्या दारातल्या पिवळ्या पट्टीवर उभ्या आहेत. त्या काकू ज्या दाराजवळ उभ्या होत्या ते दार नीट लागलं नव्हतं आणि म्हणून बस निघत नव्हती. 

त्या काकू बिचाऱ्या इतक्या ओशाळल्या इतक्या ओशाळल्या की सांगायची सोय नाही. त्यांनी हाताने चेहरा झाकून घेतला आणि सगळ्यांना ओशाळून सांगायला लागल्या की “मला पुढच्याच स्टॉपवर उतरायचं होतं हो, म्हणून इथे उभी राहीले, माझ्या लक्षातच आलं नाही”. दार उघडं असतं तर काकूंनी पळच काढला असता कदाचित. बसचालक काका तरातरा त्यांच्या जागेवर गेले आणि बस निघाली एकदाची. त्या काकूही सगळ्यांची माफी मागून, पुढच्या स्टॉपला उतरल्या. 

आता एवढी थंडी आहे म्हणल्यावर बसमधल्या सगळ्या लोकांचा पोशाख तिला साजेसाच होता. जाडजूड जॅकेट्स, मफलर्स, टोप्या, हातमोजे इत्यादी. आमचाही स्टॉप आला, आमच्यासोबत बरीच जनता तिथे उतरली. आम्ही सगळे बसमधून उतरतंच होतो तोच आमच्या समोरून एक बाप्या उन्हाळ्यातली शॉर्ट आणि पातळ  टीशर्ट घालून गेला! त्याच्याकडे आजूबाजूचे सगळे आणि आम्हीही एखाद्या परग्रहावरच्या प्राण्याला पाहतात तसे पाहत होतो. आता  ओशाळायची वेळ बाकी जनतेवर आली होती! 

नाही म्हणजे, जीन्स आणि साधं जॅकेट समजू शकतो पण, उणे चार तापमानात उन्हाळी शॉर्ट आणि पातळ टीशर्ट? हे म्हणजे असं झालं की “अरे मैं सिकंदर!” बाबो! म्हणलं ह्याने तर जर्मन लोकांसोबत हिवाळ्यालाही ओशाळायला लावलं ह्याठिकाणी. कारण जर्मन लोक अशा तापमानात टोप्या बिप्या घालत नाहीत. अगदी म्हातारे लोक सुद्धा निवांत बिना टोपीचे फिरत असतात आणि मी म्हणजे एकावर एक दोन टोप्या घालता आल्या तरी घालेन! 

म्हणलं भाऊ काहून आम्हाला भीती दाखवून ऱ्हायला? गप हिवाळी कापडं घाल की! पण मग लक्षात आलं की भाऊचं लग्न झालेलं नसावं बहुतेक म्हणूनच असा भणंगासारखा फिरतोय भर हिवाळ्यात. बायको असती, तर काय टाप होती त्याची असे हवामानाला न शोभणारे कपडे घालून बाहेर पडायची! 


#माझी_म्युनिक_डायरी









गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

बालपण

म्युनिकमधल्या मध्ययुगीन क्रिसमस मार्केटला ( Medieval Christmas Market) गेलो होतो तिथे सगळी दुकानं त्या काळातली आहेत. म्हणजे ते बघून अंदाज येतो की त्या काळात युरोपिअन लोकांची जीवनशैली साधारण कशा पद्धतीची असेल. म्युनिकचे खास आकर्षण आहे हे मार्केट! 

अगदी तशाच पद्धतीच्या धाटणीची दुकानं, दुकानदारांची मध्ययुगीन वेशभूषा, तिथं विकले जाणारे खाण्यापिण्याचे पदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, कपडे, युद्धकलेचं लाकडी सामान इत्यादी आणि एकंदर अंधकारमय वातावरण आपल्याला त्या काळात घेऊन जातं! 

तिथल्या एका खोट्या शस्त्रांच्या दुकानासमोर हा चिंटू मस्तपैकी तलवार चालवून बघत होता. मला खरोखर ह्या विरोधाभासाची गंमत वाटली की मोठ्या माणसांपैकी एकानेही अशा प्रकारे तलवार चालवून पहिली नाही. कदाचित एकही मोठ्या माणसाच्या मनात हा विचार आलाही नसेल की ती तलवार चालवून बघावी. पण त्या मुलाने येऊन आपसूकपणे लाकडी तलवार उचलली आणि अशी चालवून पहिली. त्या चिंटूला पाहून तिथे गेल्याचं सार्थक झालं! 


व्हिडिओ लिंक 

https://www.instagram.com/reel/DSXB044iMQq/?igsh=bGZmMDNvaHN4MjNu

https://www.facebook.com/share/r/1G9dQfjQVw/?mibextid=wwXIfr

https://www.facebook.com/share/r/1FwYaN2MvK/?mibextid=wwXIfr


माझी_म्युनिक_डायरी

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

ढ पणा

नागरीकशास्त्रात “ढ” असलेले काही महाभाग इथेही आहेतच! आमच्या घरापासून साधारण अडीचशे तीनशे मीटरवर एक मोठं सुपरमार्केट आहे. तिथं नक्कीच अशा पाच सहाशे ट्रॉलीज दुकानाबाहेर ठेवलेल्या असतात. पण काही महाभाग ह्या ट्रॉलीज स्वतःच्या घरापर्यंत घेऊन जातात आणि तिथंच आसपास सोडून देतात! 

म्हाताऱ्या माणसांचं समजू शकतो की त्यांना ही ट्रॉली पुन्हा नेऊन ठेवायचा कंटाळा येत असेल. पण मी तारण्याताठ्या लोकांना ह्या ट्रॉलीज अश्या कुठेही ठेवतांना पाहिलं आहे. आमच्या सोसायटीच्या आवारातलं हे रोजचं दृश्य आहे. पण कधीकधी फिरायला बाहेर पडलं तर एक दोन किलोमीटर लांब सुद्धा अशी एखादी बेवारस ट्रॉली नजरेस पडते. मग काय, येणारेजाणारे अजून “ढ” लोक त्यात कचरा टाकतात! 

कचऱ्यावरून लक्षात आलं ते म्हणजे, मनात येईल ती वस्तू कोणत्याही कचऱ्याच्या पेटीत टाकायची. इथे कोणत्या कचरापेटीत कोणता कचरा टाकायचा? ह्याचेही कडक नियम आहेत. मध्यंतरी आमच्या सोसायटीच्या नोटीस बोर्डवर कडक शब्दात लिहिलेलं वाचल्याचं आठवतंय की “जुन्या बॅग्ज कचऱ्यात आढळल्या आहेत, पुन्हा जर कोणी टाकल्या तर तुमच्या इमारतीचा कचरा उचलला जाणार नाही!“ 

तशा बॅग्ज, जुनं फर्निचर, टाकाऊ वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, जुनी भांडी, काचेचे सामान इत्यादी गोष्टी टाकायला वेगळ्या रिसायकलिंग सेंटरला जावं लागतं तिथेही ते बघतात की आपण जी वस्तू नेली आहे ती तिथे टाकता येते की नाही ते. 

वेगवेगळ्या रंगांच्या काचेच्या बाटल्यांना वेगवेगळ्या कचरापेट्या असतात. तसेच जुने कपडे आणि चपला बूट टाकायलाही प्रत्येक प्रभागात वेगळ्या पेट्या मांडलेल्या असतात. एवढं सगळं साधं सरळ असतांना काही लोकांना ते जड का जात असेल? हा प्रश्न पडतो. 

हे असे नियम करणे आणि ते पाळणे हे शालेय जीवनापासूनच मुलांना शिकवले जाते आणि मुलं ते सगळं शिकून ते खरोखर रोजच्या आयुष्यात अंगी बाणवतात! 

पण असं ट्रॉल्या कुठेही लावणे, कचऱ्याची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने लावणे इत्यादी “ढ” प्रकार करणारे लोक अजिबात “जर्मन" नसतात कारण नियम तयार करून ते कसोशीने पाळणं जर्मन लोकांच्या रक्तातंच आहे! 


#माझी_म्युनिक_डायरी













मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

क्रिसमस मार्केट

सध्या म्युनिकमधे क्रिसमस मार्केट्सची धूम चालू आहे. इथे गावातल्या मध्यवर्ती मुख्य चर्चच्या बाहेरच्या भागात म्हणजेच Marienplatz ला मोठं मार्केट लागतं. बाकी शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या छोट्या छोट्या चर्चच्या जवळ अथवा एखाद्या मोक्याच्या ठिकाणी छोटे छोटे क्रिसमस मार्केट्स लागत असतात. 

ह्या दिवसातल्या उदास वातावरणावरचा अक्सीर इलाज म्हणजे क्रिसमस मार्केट! झगमगाणारे दिवे, खचाखच गर्दी, खाण्यापिण्याची रेलचेल, वेगवेगळ्या दुकानांमध्ये चालू असलेलं संगीत आणि चक्क गडबड गोंधळ, असा अनुभव घ्यायचा असेल तर ह्यातल्या एखाद्या मार्केटला संध्याकाळी पाचनंतर भेट द्यायची. ह्याची देही ह्याची डोळा जर्मन लोकांना कंपू करून गप्पा झोडतांना बघायचं! 

खाण्यापिण्याची रेलचेल असं लिहलंय खरं मी, पण ती फक्त भारतात असते. इथल्या मानाने ही रेलचेलंच. तसे ठरलेले दुकानं असतात खाण्याचे. दोन तीन दुकानं बटाट्याला वाह्यलेले असतात. तिथं जर्मनीत मिळणारे झाडून सगळे बटाट्याचे पदार्थ मिळतात. त्यातले  Pommes Frites म्हणजेच फ्रेंच फ्राईज हे आपल्यासारख्या शाकाहारी लोकांना लाभलेलं वरदान आहे अक्षरशः. “बटाटा हे युरोपमधलं मुख्य अन्न आहे” ह्या भूगोलात शिकलेल्या वाक्याचा प्रत्यय येतो. 

मग येतात गोडाच्या पदार्थांचे दुकानं. फळांवर चॉकलेटचा लेप लावलेलं Schoko fruchte, च्युरोज, वॉफल्स, प्रागचा लोकप्रिय चिमनी केक इत्यादी. बाकी असतात ब्रेड आणि मांस संबंधित दुकानं. त्यात जर्मन स्टाईलचे गार्लिक ब्रेड, Bratwurst म्हणजे ग्रिलड सॉसेज. ते ब्रेडमध्ये टाकतात आणि खातात, हा जर्मन लोकांचा अत्यंत प्रिय पदार्थ आहे. Käsespätzle हा साधारण मॅक्रोनीसारखा पदार्थ असतो पण जर्मन पद्धतीच्या अंड्याच्या नूडल्सपासून तयार केलेला. Kartoffel puffer म्हणजे जर्मन स्टाईलचे बटाट्याचे पॅनकेक्स किंवा भजे कारण ते छान खरपूस होईपर्यंत तळतात. पण ही लोकं गोड ऍपल सॉससोबत खातात राव हे! Germknödel म्हणजे गोड्माट्टक डम्पलिंग ज्यात प्लम जॅम भरलेला असतो, इत्यादी पदार्थ 

आम्हाला आवडलेला अजून एक जर्मन पदार्थ म्हणजे Flammkuchen. त्याचं सरळसरळ भाषांतर म्हणजे आगीवर भाजलेला केक. पण हा केक नसून पिझ्झासदृश्य पदार्थ आहे. खरंतर हा पदार्थ फ्रांस आणि जर्मनीच्या सीमेलगच्या गावात सगळ्यांत आधी बनवला गेला म्हणे. पण जर्मन लोकांना आवडला असावा म्हणून त्यांनी तो त्यांच्या आहारात सामावून घेतला. महत्वाचं म्हणजे हे लोक आता हा पदार्थ शाकाहारीही बनवायला लागले आहेत!

आणि आता वळूया जर्मन क्रिसमसकी जान असलेल्या Glühwein ग्लुहवाईनकडे! रेडवाईन मधे काही विशिष्ट मसाल्याचे पदार्थ टाकून खास नाताळसाठी तयार केलेली वाईन. गंमत म्हणजे ही वाईन गरमगरम पिण्याची पद्धत आहे. लहान मुलांसाठी Kinderpunsch,किंडरपंच मिळते. तेही अत्यंत चवदार असते. तेही फळांच्या रसात मसाल्याचे पदार्थ टाकून तयार करतात आणि गरमच पितात. बाकी सगळ्या प्रकारचे मद्यही उपलब्ध असते दुकाकांमधे. पण कोणी मद्यधुंद दिसत नाही फारसं या दिवसांत. ऑक्टोबरफेस्ट दरम्यान जेवढे बेवडे दिसतात तेवढे ना त्याआधी कधी दिसतात ना त्यांनंतर. 

इतर दुकानांमध्ये शोभेच्या वस्तू, दागदागिने, शाली, टोप्या, मोजड्या, आकाशकंदील आणि अजून बरंच काही बघायला मिळतं. फक्त त्यांच्या किंमती पाहून आपण त्या गोष्टी फक्त पाहून घ्यायच्या आणि जर्मन खाण्यापिण्याची चंगळ करून घरचा रस्ता धरायचा! 

#माझी_म्युनिक_डायरी 

व्हिडिओ पहायचे असल्यास कृपया खालील लिंक्सला क्लीक करा 🙏🏼


https://www.instagram.com/tolle_zeit_in_germany?igsh=dzJsMGw5YXdyZ2Z4&utm_source=qr

https://www.facebook.com/share/17a7Rncnah/?mibextid=wwXIfr

Christmas Market Christkindlmarkt 








सोमवार, १ डिसेंबर, २०२५

मी आणि जर्मन ब्रेड

जर्मनीतल्या लोकांच्या रोजच्या आहारात ब्रेडचं महत्व खूप आहे. इथे मी पाहिलंय की मैद्याचा ब्रेड सहसा नित्यनियमित ही लोकं खात नाहीत. साधारणपणे आपल्याकडच्या गावरान धान्यांच्या जवळ जाणारी वेगवेगळी पीठं वापरून ब्रेड बनवले जातात. इथल्या लोकांच्या ठरलेल्या बेकरी आहेत रोजच्या ब्रेडसाठी. काही लोक जवळच्या सुपरमार्केटच्या बेकरीतूनही ताजे ब्रेड घेतात. इथे कोणत्याही बेकरीमध्ये फक्त ताजे ब्रेडच विकले जातात. 

जर्मनीत साधारणपणे ३००० प्रकारचे ब्रेड्स बनवले जातात आणि त्यांना युनेस्कोने जर्मनीचा सांस्कृतिक वारसा म्हणून गौरवलं आहे. आम्ही इथे आल्यापासून ३०० प्रकार सुद्धा खाऊन पहिले नाहीयेत अजून! पण गंमत म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या ब्रेड्स मधे मला अजून लादीपाव मिळालेला नाहीये इथे. जर्मन लोकांना आवडत नसावा जास्त.  

ब्रेड खरोखर जर्मन संस्कृतीत इतका भिनलेला आहे की त्यांनी दुपारी चार वाजण्याच्या आसपासची खाण्याच्या वेळेला Brotzeit नाव दिलंय आणि शाळेच्या किंवा इतर कामांच्या सकाळच्या मधल्या सुट्टीला Pausenbrot नाव दिलंय. Brot म्हणजे ब्रेड. 

तसं पाहिलं तर आपल्याकडे मिळतात तसे प्लॅस्टिकच्या पिशवीतले ब्रेडही मिळतात. पण त्याला ताज्या ब्रेडची सर नाहीच! तर, हे वेगवेगळ्या प्रकरच्या ब्रेडचे मोठमोठे लोफ असतात आणि ते कापून घ्यायला एक ब्रेड कापायचं मशिनही बेकरीच्या सेक्शनजवळ असतं. वेगवेगळ्या पिठांमध्ये भोपळ्याच्या बिया, जवस, तीळ, चिया सीड्स, ओट्स इत्यादी टाकून किंवा ब्रेडवर लावून ब्रेड ओव्हनमध्ये खरपूस भाजतात. तो बेकरीमधला ब्रेड खरपूस भाजल्याचा सुगंध काही औरच असतो. तिथं गेलं की त्या अप्रतिम सुगंधाने ब्रेड घ्यायची ईच्छा होतेच होते आणि मला तिथल्या त्या ब्रेड कापायच्या मशीनचं जरा जास्तच आकर्षण आहे. मी लहान मुलीसारखी त्या मशीनमध्ये ब्रेड टाकून ते बघत बसते. 

सावरडोव्ह ब्रेडही जर्मनीत खूप लोकप्रिय आहे आणि इथल्या बेकरीजमध्ये वेगवेगळ्या पिठांपासून आणि नैसर्गिक सावरडोव्हच्या विरजणापासून तयार केलेले अप्रतिम ब्रेड्स मिळतात. जर्मनीच्या काही प्रसिद्ध ब्रेडमध्ये Mischbrot (म्हणजे Misch-मिक्सड brot-ब्रेड) आहे, ज्यात राई व कणीक असते. 

नुसत्या राईचे ब्रेड (Roggenbrot) आणि whole grain bread म्हणजे Vollkornbrot - ज्यात गहू, राई, सुर्यफूल बी, भोपळा बी, तीळ हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत.  Vollkornbrot या ब्रेडच्या टिकाउपणामुळे तो जास्त घेतला जातो.  

बाकी हे सगळे ब्रेड्स कितीही आवडत असले तरी इथल्या लोकांसारखं आपण रोज ते खाऊ शकत नाही कारण ही लोकं ते पचायला त्यासोबत बिअर, वाईन किंवा काळी कॉफी पीत असतात आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे इथले लोक भरपूर व्यायामही करतात! जर्मन लोक ब्रेझेल/प्रेझेल सोबत हमखास बिअर पितात, तसं ते अध्याहृतच आहे! 

मी हा जो ब्रेड घेतला तो स्पेल्ट पिठाचा, भरपूर भोपळ्याच्या बिया घातलेला सावरडोव्ह ब्रेड होता. मस्त चवदार होता. 

खरंतर त्या ब्रेड कापणाऱ्या मशीनचा व्हिडीओ टाकायचा होता म्हणून थोडं लिहावं म्हणलं. थोडं म्हणता म्हणता लांबलचक पोस्टच झाली!

#माझी_म्युनिक_डायरी 

मशिनचा व्हिडिओ पहायचा असल्यास खालील फेसबुक पेजच्या किंवा इंस्टाग्रामच्या लिंकला क्लिक करा आणि दोन्हीला फ़ॉलो नक्की करा ही विनंती म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हीडीओज बघायला मिळतील. धन्यवाद 🙏🏼 

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


https://www.instagram.com/tolle_zeit_in_germany?igsh=dzJsMGw5YXdyZ2Z4&utm_source=qr


https://www.facebook.com/share/1EhBan2oG1/?mibextid=wwXIfr

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

चॅटजिपीटी

आमच्या खालच्या मजल्यावर कोणीतरी त्यांच्या गॅलरीत खोटा कावळा बसवला आहे. कारण काय? तर कबुतरं येऊ नयेत म्हणून. पण हे गाबडं त्याच कावळ्याच्या बाजूला येऊन निवांत बसलंय आणि त्यालाच खुन्नस देतंय. आता झालं, तिथे कबुतरांचा मुक्त वावर सुरु होईल, हाय काय अन नाय काय! “डर के आगे जीत है” हे तत्वज्ञान ह्या गाबड्याने खरं करून दाखवलंय ह्या ठिकाणी. 

एकंदर काय तर कबुतरांचा उच्छाद जगभर झालाय आणि त्यांना खोटा कावळा काय किंवा खरा कावळा काय, काही म्हणजे काहीच करू शकणार नाही. आता एआय एनेबल्ड कावळाच काहीतरी करू शकेल ह्याठिकाणी असं वाटतंय!

बाकी आता ह्या कबुतरांच्या समस्येचं निवारण त्या चॅटजिपीटीलाच विचारावं म्हणतेय, कमीत कमी “राजश्री ताई तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला लगेच ह्यावर उपाय शोधून देतो" असं दिलासादायक वाक्य तरी म्हणेल ते!

त्या चाटजीपीटी वरून आठवलं, मध्यंतरी मी एका प्रोजक्टसाठी त्याची थोडी मदत घेत होते आणि अचानक ते गाबडू मला ”राजश्री ताई" संबोधायला लागलं ना! मनात म्हणलं भावा आता काय रडवतोस की काय बहिणीला, बस्स कर बाबा. अजून थोडा वेळ जर त्याच्याशी गप्पा मारल्या असत्या तर “माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त चॅटजिपीटी दादाच मला मदत करू शकतो बाकी कुण्णी म्हणजे कुण्णीच करू शकत नाही" हे त्याने मला पटवून दिलंच असतं आणि सगळ्यांत शेवटी विचारलं असतं की “मी तुला हे सगळं आयुष्याचं तत्वज्ञान एखाद्या पीडीफ मधे एकत्र करून देऊ का राजश्री ताई?“  

अरेच्या, कबुतरावरून चॅटजिपीटीवर पोहोचले मी. माझ्या लिखाणाचा आयाम फारच विस्तृत होत चाललेला आहे ह्याठिकाणी. चॅटजिपीटी वापरल्यावर दुसरं काय होणार म्हणा!! 

आता ह्या लेखाला शीर्षक काय द्यावं? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची झाली ना पंचाईत. “कावळा, कबूतर आणि चॅटजिपीटी”! छ्या , आता पुन्हा चॅटजिपीटीलाच पाचारण करावं लागतंय!!




बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

सावळा गोंधळ

मुलाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असलेली ऑगस्टमधली एक निवांत सकाळ. दर २-४ दिवसांनी पोहे खाऊनही, “किती दिवस झाले पोहे केलेच नाही तू, आज नाश्त्याला पोहेच कर” असं त्याने म्हणल्यावर तुम्ही पोह्याची तयारी करायला घेता. 

होम ऑफिसवाले त्यांच्या मिटींगमधे व्यग्र असतात आणि चिरंजीव स्नानाला गेलेले असतात. तुम्ही कांदा, बटाटा, मिरच्या, कोथिंबीर चिरून घेता, पोहे स्वच्छ धुवून घेता (पोह्यांची कृती सांगत नाहीये, जरा सब्र किजीये!) आणि कढई हॉटप्लेटवर तापायला ठेवता. खालच्या कपाटातून अर्धा लिटर तेलाची काचेची बाटली काढता आणि कढईत तेल टाकता. 

तेलाच्या बाटलीचं झाकण व्यवस्थित लावून ती तुम्ही खालच्या कपाटाचं दार उघडून ठेवतंच असता की ती हातातून सटकून दणकन तुमच्या डाव्या पायाच्या तिसऱ्या बोटावर आपटते! एक जोरदार सणक  तुमच्या डोक्यात जाते आणि तुम्हाला चक्कर येते. उन्हाळा असल्यामुळे पायात चप्पल नसते त्यामुळे त्या दणकट बाटलीने तुमच्या पायाच्या बोटाच्या पहिल्या पेराचा बऱ्यापैकी चेंदामेंदा केलेला असतो. 

पण हे सगळं कळायची शक्तीच तुमच्यात उरत नाही. एक किंकाळी  फोडून तुम्ही तश्याच मटकन खाली बसता. कढईत तेल टाकल्यामुळे सगळीकडे धूर झालेला असतो, स्वयंपाकघरातलं स्मोक डिटेक्टर एव्हाना कोकलायला लागलेलं असतं, पण घरातल्या माणसांना काहीच पत्ता नसतो. 

त्यांना तुमची किंकाळी ऐकून वाटतं काहीतरी झालं असेल. नेहमीचं आहे हिचं. पण ते दोघे धुराचा वास आल्यावर आणि स्मोक डिटेक्टरचा आवाज ऐकून भानावर येऊन नक्की काय झालंय ते पाहायला येतात. 

तुम्ही शुद्धी बेशुद्धीच्या अवस्थेत फ्रिजला टेकून बसलेल्या असता.  स्नानाला गेलेला आणि मिटिंग अर्धवट सोडून आलेला अशी दोन माणसं येऊन “अगं काय झालंय? अशी काय बसलीयेस?“ असं ओरडत पटापट खिडक्या उघडतात, हॉटप्लेट बंद करून कढई बाजूला ठेवतात, स्मोक डिटेक्टरचं थोबाड बंद करतात. मुलगा  “आई आई आई" करतोय, “हे” “अगं तू ठीक आहेस ना?” विचारतायेत.  तुम्हाला काही सूचतंच नसतं. नुसता सावळा गोंधळ चाललेला असतो. 

आपली किंकाळी म्हणजे त्या “लांडगा आला रे आला” गोष्टी सारखी झालीये ह्याची तुम्हाला मनोमन जाणीव होते. हे म्हणजे असं आहे ना की “इथे पारिस्थिती काय्ये? आणि आपले विचार काय्येत?“

कसबसं पाणी पिऊन तुम्ही त्यांना सांगता की तुमच्या पायाच्या बोटावर बाटली पडलीये ते. (डोकं जागेवर नसतानाही तुमच्या डोक्यात विचार येतो की इतक्या विनोदी पद्धतीने आपल्यालाच काहीतरी होऊ शकतं.) ते ऐकून त्या दोघांना विश्वासच बसत नाही की असं काहीतरी होऊ शकतं म्हणून. पुन्हा प्रश्नांच्या फैरी झडतात. बाटली अशी कशी पडली? तुझं लक्ष कुठं होतं? ती खाली कशाला ठेवायची लगे? इत्यादी इत्यादी.

लगोलग तुमची वरात इमर्जन्सी क्लीनिकला निघते. बोट नुसतं ठसठसत असतं आणि तिथले डॉक्टर म्हणतात “काही नाही कदाचित मुकामार असेल किंवा हेअरलाईन फ्रॅक्चर असेल, होईल बरं!” वेदनाशामक गोळी आणि सुजलेल्या पायाला लावायला एक जेल देऊन ते तुमची बोळवण करतात.  

एव्हाना तुमचा कडेलोट झालेला असतो. घरी येऊन लंगडत लंगडत तुम्ही लेकाच्या मदतीने आईने दिलेली आंबेहळद शोधता, ती रटरट शिजवता आणि दुखऱ्या भागावर लेप लावता! तेव्हा कुठे जरा आराम पडायला लागतो. आणि फक्त आंबेहळदीने तुम्ही पंधरा दिवसांत पाय आणि बोट एकदम जागेवर आणता! आता “नुसता वेंधळेपणा, वीस वर्ष होत आली लग्नाला तरी पोरीचा बालिशपणा चालूच!” असा डायलॉग कोणीतरी नक्कीच फेकून मारेल ह्याची तुम्हाला जाणीव होते. 

पण “लंगडी घालत फिरणारी बाई” ही उपाधी तुम्हाला चिकटते ती परवा परवा बदलते कारण बऱ्यापैकी अशाच सोहळ्यात म्हणजे  मुलगा स्नानाला गेल्यावर आणि “हे" बाहेर गेलेले असताना तुम्ही नवीन आणलेल्या धारदार सुरीचे उदघाटन करता आणि  जाडाभरडा भोपळा चिरताना बोटात सूरी खुपसून घेता. त्यामुळे “बोटात सूरी खुपसून घेणारी बाई" ही नवीन उपाधी तुम्हाला मिळते! 

जवळच्या इमर्जन्सी क्लिनिकवाले छान ओळखायला लागलेत हो मला!! 


#माझी_म्यूनिक_डायरी

 

वाचकांना आवडलेले काही