यंदा इथे थंडीचा कहर झालाय. बरेच दिवस झाले पारा शून्याच्या वर गेला नाहीये. सतत उणे तापमान. मागच्या दोन चार दिवसांत तर जर्मनीतल्या काही भागात उणे २१ पर्यंत पारा गेला होता, त्यामानाने म्युनिकमधे उणे १४ वगैरे आहे, म्हणजे बरंच म्हणायचं.
अशी थंडी पडली आणि जानेवारी आला की माझं मन राधिका भिडेच्या गाण्यातल्यासारखं भारतात धावतं. ”मन धावतया माहेरच्या शेतात, डोलतया जोंधळ्याच्या मागं। जावं जिथं कुठं तिथं, नाव येई “हुरड्याचं” व्हटी!” असं काहीतरी वाटायला लागतं. माहेरच्या शेतातला #हुरडा ही माझ्यासाठी फार भारी आठवण आहे.
छ. संभाजीनगरला आईकडे गेलं की, वडील गावाकडे आमच्या दाजींना कळवतात की आम्ही उद्या हुरडा खायला येतोय. मग आईची हुरड्याबरोबर खायच्या चटण्यांची तयारी सुरु होते. मी आपली लहान मुलीसारखी तिला जी लागेल ती तयारी करून देते. पण ती लसूण, लाल तिखट घातलेली शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची खरपूस चटणी तिनेच करायची. ती चव माझ्या हाताला कुठे!
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपून आधी कडेठाणच्या देवीला जायचं आणि मग शेतात, हा आमचा शिरस्ताच आहे. कडेठाण आमच्या गावापासून जवळच आहे. देवीची ओटी भरून, छान दर्शन घेऊन, तिथल्या लोकांशी बोलून तिथून गावच्या रस्त्याला लागायचं.
आता ते दोन चार मैलांचं अंतरही जास्त वाटायला लागतं. तिकडे दाजींनी शेतात आगटी पेटवून ठेवलेली असते. आम्ही शेतात पोहोचायचा अवकाश की लगेच ज्वारीची टपोरी कणसं आगटीत भाजायला गेलेले असतात. त्या आगटीच्या आजूबाजूला जाजमं अंथरून, कागदावर मीठ, चटण्या घेऊन कणीस भाजायची वाट पाहणे म्हणजे “ब्रह्मानंदी टाळी" वगैरे! दाजी जेव्हा ते भाजलेलं गरम गरम कणीस हातावर चोळून तो हुरडा आपल्या हातात देतात तेव्हा कुठे जीव भांड्यात पडतो.
सुख म्हणजे नक्की काय असतं? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे, “शेतात विहिरीजवळ बसून गरमगरम हुरडा खाणे. हे झाल्यावर शेतात चक्कर मारत असताना, यंदाच्या लागवडीवरची दाजींची कमेंट्री ऐकणे. नंतर दाजींची बायको बाजरीच्या भाकरी, वांग्याची भाजी आणि ठेचा घेऊन येताच त्यावर ताव मारणे. नंतर द्रोणात दहीसाखर घेऊन ते कणसाच्या ओंबीने खाणे!” अहाहा!!
पण.... हे सगळं दरवर्षी अनुभवता येतंच नाही. मग मी घरात जपून ठेवलेल्या, वाळलेल्या हुरड्याची उसळ करते. सकाळी उठल्यावर थोडे हरबरे गरम पाण्यात भिजत घालायचे. ते चांगले भिजले की कुकरच्या भांड्यात वाळलेला हुरडा, भिजलेले हरबरे आणि थोडे शेंगदाणे टाकायचे. अंदाजाने पाणी आणि मीठ टाकून, हे भांडं कुकरला लावायचं. भरपूर शिट्या होऊ द्यायच्या. हुरड्याचा खरपूस वास दरवळला की गॅस बंद. कुकर शांत होईपर्यंत तेलात थोडी मोहरी आणि छानपैकी हिंग घालून फोडणी तयार ठेवायची. फोडणीत जिरे नकोच. हुरड्याची चव घालवायची नाही.
आता एका वाटीत गरम हुरड्याची उसळ, त्यात यथेच्छ फोडणीचं तेल घ्यायचं (आवडत असेल तर थोडं लाल तिखट) आणि बर्फाच्छादीत आल्प्सकडे बघत, मराठवाड्यातल्या गावाची आठवण काढत, भुरका मारत त्यावर ताव मारायचा!
#माझी_म्युनिक_डायरी
#सुख_म्हणजे_नक्की_काय_असतं
२ टिप्पण्या:
😋
यातले फक्त दाजी नाव बदलले कि झाले, थोडयाफार फरकाने हाच अनुभव लहानपणी खेड्यात वर्षातून कितीतरी वेळा व शहरात आल्यावर निदान चारपाचदा घ्यायचो. गेले ते दिवस. आता हुरडा ८०० रू किलोने दारावर विकत घ्यायला नकोसे होते. कारण एकतर गोड, ताजा नसतो व वातावरण निर्मीती कुठुन करायची. ते ढेकळांवर जाजम टाकून लोळणं, नदीत, विहिरीत उड्या मारणं, सुरपारंब्या, कैरी, पेरू, बोर, जांभळं, चिकूची झाडं. अहाहा काय ते दिवस होते आजोळी.
टिप्पणी पोस्ट करा