२०२६ सुरु झालं नाही तोच बर्लिन मधे बरेच दिवस चक्क लाईट गेले होते. तेव्हा तापमान शून्याच्या खाली होतं. असं म्हणतात की साधारणपणे चाळीस पंचेचाळीस हजार लोक त्यामुळे परेशान झाले होते. तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं.
बर्लिनचं हे प्रकरण एका मित्राला समजलं आणि त्याने मला असंच मेसेज केला की “म्युनिक मधे लाईट आहेत ना? का तिथे पण बर्लिनसारखं झालंय?” ह्या प्रश्नावर नुसतं “इथे लाईट नाही गेले” असं उत्तर मला देता आलं असतं! पण लैच श्यानपना करून मी “अरे म्युनिकमधे कधीच लाईट जात नाहीत 😎” असं उत्तर दिलं! लगे गॉगलवाली ईमोजी, जसं काही इथली वीजपुरवठा कंपनी माझ्या भावाचीच आहे!
आणि पुढच्या दोनच दिवसांत, लहानपणी शाळेत शिकलेले सगळे सुविचार, म्हणी माझ्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचायला लागल्या! अती शहाणा त्याचा बैल रिकामा, माणूस सवयीचा गुलाम आहे, गर्वाचे घर खाली, अती तेथे माती, देवाच्या काठीला आवाज नसतो! इत्यादी (ह्यात तुम्ही अजून भर घालू शकता). कारण आमच्या घरातल्या अर्ध्या भागातले लाईट्स अचानक फड्फडायला लागले. एक खोली आणि स्वयंपाकघरातला लाईट लावला की घरात भीतीचं वातावरण पसरत होतं. त्यात इथं सध्या अंधारही साडेचार पाचलाच पडतो आणि दिवस सकाळी आठला उजाडतो त्यामुळे तर अजूनच पंचाईत झाली होती.
माझ्या मनात भीतीदायक विचार यायला लागले. अती भयकथा वाचल्या आणि भयपट पहिले की असंच होतं! पण मग विचार आला, की ही कुठली विचित्र भुताटकी आहे बुआ? ये भूत आखिर चाहता क्या है? हॅंये! अर्ध्याच घरातले लाईट फडफड करत आहेत. लेकाला म्हणाले मी, तर त्याने light fluctuations ची वैज्ञानिक कारणे सांगून माझी बोलती बंद केली.
नेमका दुसऱ्या दिवशी शनिवार होता. त्यामुळे कोणीच दुरुस्त करायला येणार नाही हे माहीतच होतं. मी मागे म्हणल्याप्रमाणे वरून ब्रह्मदेव जरी झाले आले आणि त्यांनी इथल्या लोकांना शनिवार रविवारी काम करायला लावलं तर ते त्यांचंही नाही ऐकणार नाहीत (अपवाद वगळता)! आम्ही आमच्या घरमालकीण ताईंना सगळी हकीकत कळवली. तर त्या म्हणाल्या “ही काही इमर्जन्सी नाही त्यामुळे आज तर कोणीच येणार नाही दुरुस्त करायला. आता सोमवारीच येतील कोणीतरी.” आता आमच्यावर म्हणायची वेळ आली की “सेह लेंगे थोडा!”
कसचं सेह लेंगे!! सवयच नाही राहीली बिना लाईटचे कामं करायची. शनिवारी संध्याकाळी तर अर्ध घर अंधारात. अर्ध्या घरातल्या विजेने पूर्णपणे असहकार पुकारला होता! मनात म्हणलं कुठून मला दुर्बुद्धी झाली आणि गॉगलवाली ईमोजी पाठवत शहाणपणा केला, गेले ना लाईट आता. बस आता हरी हरी करत.
माझी नुसती तगमग तगमग चाललेली. स्वयंपाकघरात जाताना पटकन बोट खटक्यावर जायचं की लेक म्हणायचा ”आई, अगं लाईट गेलेत ना!“ मी लगेच जेन झी भाषेत “अरे मसल मेमरी रे, काय करू?“
स्वयंपाकघरात वीजपूरवठा नव्हता त्यामुळे काहीच सुचत नव्हतं. तरी मेणबत्त्या आणि मोबाईलचा फ्लॅश लाईट ह्यावर काम भागवलं कसबसं. नशीब इथले हिटर्स विजेवर चालत नाहीत. नाहीतर उणे तापमानात रात्री गारठायची वेळ आली असती.
सोमवारी एक दादा दुपारी आला अन त्याने काहीतरी तात्पुरता उपाय करून वीजपुरवठा सुरु करून दिला. जाताना म्हणाला सगळं नीट बघावं लागेल, मी माझ्या बॉसला घेऊन येतो गुरुवारी.
गुरुवारी दोघे आले. तो दादा इटालियन, आम्ही मराठी आणि ते बॉसकाका जर्मन. असे सगळे वेगवेगळ्या अक्सेंटमध्ये जर्मन बोलत होतो. हा सगळा जर्मन भाषेचा जांगडगुत्ता झालेला असताना, आम्ही सगळे कसंबसं समोरच्याला काय म्हणायचं आहे ते समजून घेत होतो.
त्या दोघांनी सगळं व्यवस्थित तपासून, वीजपुरवठा का खंडीत झाला? त्याचं कारण शोधून, नीट उपाययोजना केली. आम्हाला समजावून सांगितलं काळजी करू नका आता सगळं व्यवस्थित आहे आणि आमचा निरोप घेतला!
आणि अशा पद्धतीने “म्युनिकमध्ये कधीच लाईट जात नाहीत”, ह्या माझ्या वक्तव्याला खोटं ठरवण्यात माझ्या घरातले लाईट यशस्वी झाले!!
#माझी_म्युनिक_डायरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा