अडीच तीन महिन्यांपूर्वी माझ्या फोनला माझा इतका कंटाळा आला, इतका कंटाळा आला की एक दिवस अचानक त्याने असहकारच पुकारला! मैत्रिणीशी एक दोन तास व्हाट्सऍपवर गप्पा काय मारल्या, त्याची बॅटरीच फुगायला लागली. नाही म्हणायला नऊ वर्ष साथ दिली बिचाऱ्याने! कसातरी त्यातला डेटा रिकव्हर केला आणि त्याला जड अंतःकरणाने रिसायकलिंग सेंटरला देऊन आले!
आणि मी सोशल मीडियावरून गायबच झाले. त्याचं झालं असं की फेसबुकला माझ्या कामासाठी Two Factor Authentication ठेवलं होतं आणि हे मी पार विसरूनच गेले होते कारण ऍपवर आपण लॉगिन केलेलंच असत ना! पण फोन गेल्यावर झुक्याभाऊ काही केल्या मला लॅपटॉपवर लॉगिन करू देईना! बरं नवीन फोन कोणता घ्यायचा? ह्यावर ''चायपे चर्चा'' चालू होती त्यामुळे मी तेव्हा ना व्हाट्सऍपवर होते, ना फेबुवर, ना इन्स्टावर!!
म्युनिकला आल्यापासून भारतात सगळ्यांशी व्हाट्सऍपवरच गप्पागोष्टी चाललेल्या असतात. एकवेळ फेबु आणि इन्स्टा नसेल तरी काही वाटत नाही पण व्हाट्सऍप नाही म्हणलं की... असो. नवीन फोन घेण्याविषयी चर्चा आणि तो हातात येईपर्यंत बरेच दिवस गेले. त्यादरम्यान मुलाचा फोन महत्वाच्या कॉल्ससाठी वापरत होते. तोवर इकडे मैत्रिणींचे मेसेजेस, कॉल्स WA वर धडकत होते पण मला त्याचा गंध नव्हता. स्टेटस टाकणे नाही की डिपी बदलणे नाही. सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता ''ही बाई गेली कुठे?''
पहले दोन चार दिवस खरोखर ''मी मज हरपून बसले ग'' वाटायला लागलं होतं. संन्यास घेतलाय की काय आपण? असे नसते प्रश्न पडायला लागले होते. ''कोई किसीका नहीं, ये झुठे...'' असे दुःखी गाणे आठवायला लागले. खरंतर माणसाने इतकंही कोणत्या गोष्टीच्या आहारी जाऊ नये हे कळायचं वय आहे अजून माझं! पण कसं आहे ना... जाऊदे. माझा फोन काय बंद पडला, घरात माझी नुसती फरपट चालू होती. आजकालच्या काळात साधा एक फोन नसला तुमच्या हातात तर लोक तुम्हाला हिंग लावूनही विचारत नाहीत, हे कळायला वेळ नाही लागला मला.
मुलाचा फोन मागितला की त्याला त्याच्याकडच्या छुप्या खजिन्याचा नकाशा मागितल्यासारखं वाटायचं. ''हं, एक मिनिट आई, मी अनलॉक करून देतो, मी WA ला कॉल लावून देतो, तुला काय सर्च करायचं आहे? मी शोधून देतो, किती फोन येतात तुला? माझा नम्बर तू किती लोकांना दिला आहेस?'' अशा प्रकारची प्रश्नावली तो माझ्या समोर ठेवायचा. इकडच्या स्वारीला आपण म्हणावं ''फेबुवर काय चालू आहे ते बघू बरं जरा मला'' तर त्यांचं अजून तिसरंच काहीतरी असायचं, जसं की ''तुमच्या फेबूची मजा आमच्या फेबूमधे कुठे?'' आता बोलावं तरी काय माणसाने!
हे सगळं असं चालू होतं आणि झुक्याभाऊ काही केल्या मला माझ्याच फेसबुकला लॉगिन करू देत नव्हता. सहन तरी किती करायचं? नाही का? शेवटी मी झुक्याचा नाद सोडला आणि स्वतःच्या मनाची समजूत घातली की ''त्या फेसबुकला एवढं काय सोनं लागलं आहे? दे सोडून, त्याच्या बाहेर पण जग आहे, वगैरे.'' मग नवीन फोन आला एकदाचा. फोन आल्या आल्या मैत्रिणींना WA वर कळवलं ''अभी हम जिंदा है!'' मैत्रीणींचे काळजीचे मेसेजेस वाचून नवीन फोन घेतल्याचं सार्थक झालं! त्यात इथली एक गोड मैत्रीण ''जयश्री'' पण होती!
दोन महिन्याचा अवकाश आणि झुक्याभाऊंच्या लोकांना केलेल्या मेलामेली नंतर, कसंतरी माझं अकाउंट रिकव्हर झालं एकदाचं! इजारमध्ये घोडं नहालं. पण फेबूवर नव्हते तेव्हा मात्र ''कई दिनोसे शिकायत नहीं जमानेसे'' ह्या ओळीचा प्रत्यय आला. कारण उखाळ्यापाखाळ्या करता नाही आल्या आणि कोणाच्या वाचता ही नाही आल्या, काही विषय झाला असेल तर तिसऱ्याच कोणाच्या तरी अकाउंटवर जाऊन, अर्थार्थी संबंध नसलेल्या लोकांच्या कमेंट्स वाचता नाही आल्या, घेणं देणं नसताना फुकटचा कंदील लावता नाही आला. आता लिहू तरी काय का? ही यादी न संपणारी आहे!
ते सगळं जाऊदे, तुम्ही सगळे कसे आहात?
#माझी_म्युनिक_डायरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा