गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

कबूतर जा जा जा

मघाशी गॅलरीत उभी होते तर एक पांढरं कबुतर दृष्टीस पडलं आणि मागच्या वर्षीचा किस्सा आठवला. मनात विचार आला 'आता हे नक्की कोणाकडे जाऊन त्यांचा जीव खाणार आहे देव जाणे?' तेव्हा नाही का, आमच्या घरातले अर्धेच लाईट... का? अर्ध्या घरातले लाईट... जाऊदे मेलं, लाईट गेले, डोक्याला ताप झाला होता आणि मी लगे #ईतना_अंधेरा_क्यूँ_है_भाई पोस्ट लिहीली होती, तेव्हाची गोष्ट. 

त्या दिवशी लाईट आल्यामुळे मी On Cloud Nine वगैरे होते. जानेवारी महिना असल्यामुळे सूर्य साडेचार पाचलाच मावळत होता. नुकताच चहा झाला होता आणि मी लेकाच्या खोलीच्या खिडकीतून सूर्यास्त बघत होते, तेवढ्यात एक पांढरं कबूतर अचानक खिडकीच्या बाहेरच्या पळवटीवर येऊन बसलं. बाबो! ते आणि मी एकमेकांना पाहून दचकलो ना! मला लगेच वाटलं 'ह्या ब्रह्माण्डला नक्कीच मला काहीतरी संदेश द्यायचा आहे म्हणूनच हे पांढरं कबूतर माझ्या दारी..खिडकी आलं आहे. अब इसके आगे मेरा सब अच्छा होनेवाला है. वगैरे वगैरे.' हं बघा अजून रीळ!

मी लगे सगळ्या घरात दवंडी पिटली, ''आपल्या गॅलरीत पांढरं कबूतर आले हो...ज्यांना पाहायचं आहे त्यांनी लगेच येऊन पहावे हो...नाहीतर ते लगेच उडून जाईल हो...'' पण माझ्या ह्या दवंडीकडे, तेव्हा बारावीत असलेल्या लेकाने आणि मीटिंगमध्ये असलेल्या होमऑफिसवाल्याने असं दुर्लक्ष्य केलं की जसं काही मी त्या दोघांना 'माझ्याबरोबर लगेच खरेदीला चला' म्हणाले. मला सवय असल्यामुळे मी पण फणकऱ्याने 'हं' करून, त्या दोघांकडे दुर्लक्ष्य केलं. आपण पण दुर्लक्ष्य करण्यात माहीर आहोत. 

लगेच मी त्याला बघायला गॅलरीत गेले. मला वाटलं मला बघून आता उडतंय बिचारं, पण कसचं काय, मी जवळ गेले तरी ते तिथेच इकडेतिकडे करायला लागलं पण उडायचं नाव घेईना. तेव्हा लक्षात आलं की हे नक्कीच थकलं आहे आणि त्याच्यात उडायचं बळंच नाहीये. मला लगे त्याचा कळवळा आला. मी घरातल्या गुगलबाबाला म्हणजेच लेकाला विचारलं 'अरे त्या कबुतराच्या पायात हिरवा बँड आहे. कोणाचं असेल बरं हे?' आमच्या गुगलबाबाने लगेच माहिती दिली ''तो बँड म्हणजे ते कोणाचं तरी खाजगी कबूतर आहे, पाळलेलं, ज्याअर्थी ते थकूनभागून इथे बसलं त्याअर्थी ते नक्कीच रेसिंग पिजन असावं. थकल्यामुळे किंवा भरकटल्यामुळे ते इथे आलंय. त्याला खायला प्यायला दे, त्याला शक्ती आली की ते जाईल उडून.''

मी ''आणि नाही गेलं तर? त्याला काही झालं तर? त्याला खायला काय देऊ खायला? तुझ्या जर्मन मित्राला विचार काय करता येई ते? आपण इथल्या कोणत्या तरी पक्षी मदतकेंद्राला फोन करूया का? काय करावं? मला तर काही सुचतंच नाहीये.'' लेक ''आईईईईई दम खाती का जरा? माझा जर्मन मित्र काय पक्षीमित्र आहे का? त्याला कुठून माहिती असेल. काहीही असतं तुझं. आणि उद्या माझा गणिताचा पेपर आहे, मला अभ्यास करायचा आहे. तू आणि ते कबुतर बघा आता काय ते!'' ह्यांना विचारायला गेले तर, कानाचा हेडफोन थोडा बाजूला करून ह्यांनी फक्त ''गुगल कर'' एवढे दोन शब्द उच्चारले. 

मी आपलं गुगलला कामाला लावून त्याला तांदूळ टाकले आणि एका वाटीत पाणी ठेवलं, म्हणलं आपण दुसरं काहीतरी खायला द्यायचो आणि हे गचकलं बिचकलं तर उद्या जर्मन पोलीस येऊन... असो! कारण जर्मनीत तुम्ही तुमच्या घराच्या आवारातलं मधमाश्यांचं मोहोळही अधिकृत परवानगीशिवाय नष्ट करू शकत नाही. मधमाश्याना मारणे, इजा करणे किंवा मोहोळ हटवणे बेकायदेशीर आहे. मधमाश्यांचे मोहोळ तुम्ही बेकायदेशीरपणे नष्ट केल्यास किंवा मधमाश्यांना मारल्यास, संबंधित राज्यानुसार ५०,००० युरोपर्यंत दंड होऊ शकतो. म्हणलं असा काही नियम पांढऱ्या कबुतराविषयी असला आणि आपल्याकडून काही चुकलं तर संपलंच मग, घेणं ना देणं अन फुकटचं कंदील लावणं व्हायचं बसल्याबसल्या!

ते खात पीत होतं बिचारं. त्याच्या नादात मी संध्याकाळी काय स्वैपाक केला आणि आम्ही काय जेवलो, काय माहित.बरं तेव्हा प्रचंड थंडी होती.मला आपली काळजी की आता रात्र झालीये हे काही उडणार नाही. रात्रीच्या उणे तापमानात ह्याला काही झालं तर? जीवाची नुसती घालमेल चालली होती. काय करू? कसं करु? मी मग एक खोकं गॅलरीत नेलं. मला वाटलं रात्री थंडीचं त्याला त्यात ठेवू. त्याला पकडून त्या खोक्यात ठेवावं मी म्हणलं तर ते गाबड गॅलरीत इकडंतिकडं उडायला लागलं. शेवटी ते पुन्हा उडून खिडकीत बसलं तेव्हा मी त्याला देवाच्या हवाली केलं. रात्री सांभाळा त्याला. 

माझं सगळं लक्ष त्या गाबडयावर केंद्रित झालं होतं. लेक जेवणखाण झाल्यावर म्हणाला 'आई आज K-Drama नाही बघायचा का?' म्हणलं ''आपल्या गॅलरीतल्या कबूतर ड्राम्याने झोप उडवलीये माझी, त्यात दुसरं काही बघायचं सुचत नाहीये!'' लेक म्हणाला 'काळजी करू नको, ही कबुतरं उणे तापमानात जिवंत राहू शकतात. काही नाही होणार त्याला.'' पण रात्रभर शांत झोप नाही लागली मला, सारखी जाग येत होती. एकदा तर स्वप्नंच पडलं की ते गाबड उडून गेलं म्हणून. रात्री दोनदा मी लेकाच्या खोलीत गेले त्याला बघायला. लेक वैतागला होता, झोपू दे म्हणून. 

शेवटी एकदाची सकाळ झाली. पण लवकर उजाडेल तर शपथ. जरा फट्फटलं की मी पुन्हा जॅकेट टोपी चढवून गॅलरीत गेले आणि..... ''वक्त बदल गया, हालात बदल गये, जज्बात बदल गये'' असं झालं माझं! ज्याच्याविषयी काल कळवळा वाटत होता, प्रेम दाटून आलं होतं, त्यानी केलेला प्रताप पाहून डोक्यात तिडीक गेली अक्षरशः. त्या गाबड्याने खिडकीत इतकी घाण, इतकी घाण करून ठेवली होती की बस्स! म्हणलं आता बास, तू ऊड बाबा इथून, जा तुझ्या मालकाकडे एकदाचा. नाहीतर पुन्हा ते एक नवीन काम डोक्याला यायचं. ते जर्मन कबूतर संस्थेशी संपर्क साधा, त्यांना सगळं जर्मनमधे समजावून सांगा.. एक ना हजार गोष्टी. 

आता मी फक्त त्याची उडायची वाट पाहायला लागले. त्याला म्हणाले ''जा ना भाऊ, काऊन जीव खातो? माझे कामं का वाढवतोस बाबा? सुखाने ऊडून जा ना. ही खिडकी काय तुझा बाप येऊन स्वच्छ करणार आहे का? ए, ऊड की.'' ते नुसतं  टुकूटुकू माझ्याकडे बघत होतं, उडायचं नाव घेत नव्हतं. माझी अवस्था पाहून घरातल्या दोघांचं चांगलंच मनोरंजन होत होतं. हे म्हणाले ''गाणं गाऊन बघ, कबूतर जा, म्हणजे जाईल ते''  म्हणलं ''हो, त्याच्या पायाला चिठ्ठी लावूनच पाठवते त्याला की, काहीही झालं तरी आता ह्याला आमच्याकडे पाठवू नका पुन्हा:'' अरे इथे प्रसंग काय्ये? माझी

लेक म्हणाला ''जरा सूर्यप्रकाश दिसू तर दे त्याला मग उडेल ते."' आणि खरोखर, थोड्या वेळाने जेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश पडला तेव्हा ते उडून गेलं! माझा रात्रीपासून टांगणीला लागलेला जीव गॅलरीत आला आणि खिडकीकडे पाहून डोकं उठलं! 

पुढचे दोन तास, मी उणे तापमानात, हातात रबरी हातोमोजे चढवून, नाकाला मास्क लावून ती सगळी घाण स्वच्छ करत होते, त्यापायी स्वतःची अर्धशिशी ( मराठीत मायग्रेन ) वाढवत होते आणि ब्रह्माण्डला सांगत होते ''हे असले काही संदेश मला पाठवू नको बाबा यापुढे, म्हणजे झालं!'' 


#माझी_म्युनिक_डायरी






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही