शेवटी एका आठवड्याने तो दिवस येतो. त्यादिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास इमेल येऊन धडकतो की ''उद्या सकाळी साडेनऊ वाजता तुमचा मुंबईला Visa Interview आहे''. इमेलनुसार तुम्हाला एका विशिष्ट रकमेचा, बँकेचा Demand Draft (UPI च्या जमान्यात हे लोक DD मागत आहेत. जर्मन लोक कधीच नाही सुधारणार )आणि तुमच्या कागदपत्रांच्या हजारो छापील प्रती जवळ बाळगणे क्रमप्राप्त असते. पण ही काय पद्धत झाली राव? उद्या सकाळी interview आणि तुम्ही आज ११ वाजता इमेल करता. कमाल आहे. गरजवंताला अक्कल नसते म्हणतात तेच खरं.
लगेचच वडिलांबरोबर बँकेत जाऊन तुम्ही DD काढता. DD जरा चुकीचा छापून येतो, हे तुम्ही तिथल्या ताईंना पटवून देण्याचा आटोकाट प्रयन्त करता पण ताई काही बधत नाहीत. इमेलबरहुकूम तुम्ही तुमच्या फोटोचे प्रिंट्स काढता आणि घरी येऊन पुण्याला कूच करायची तयारी करता. पुण्यात भाचा तुमच्या कागदपत्रांच्या प्रिंट्स काढायची जबाबदारी घेतो त्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास सोडता.
तेवढ्यात जर्मनीत बसून सेकंदासेकंदाचा हिशोब घेणाऱ्या जागरूक नागरिकाचा फोन येतो, "अगं बाई तू ती वास्तुशांतीच्या वेळी हातावर आणि बोटांवर मेंदी काढली होतीस ना? गेली का ती? तिथे तुला बायोमेट्रिक पण असेल, बोटांचे ठसे द्यावे लागतील ना!" आता तुमची अशी अवस्था झालेली असते की "भाईई मारो मुझे मारो". बोटांवर मेंदीचे अवशेष असतातच.
तुम्ही तुमच्या मारवाडी ताईला फोन लावता तर तिचं उत्तर असतं "मला अशी ऐनवेळी मेहंदी घालवायची कशी ते काही माहित नाही बघ!"आता काय ऍसिडमधे बोटं खुपसावे की काय?" देवा.... निघायच्या आधी तुम्ही अक्षरशः सात आठ वेळा साबणाने बोटं घासून घेता! पुन्हा जर्मनीतून फोन येतो, "जास्त बोटं घासू नको नाहीतर बायोमेट्रिकवर परिणाम होईल!" इतका झेंडूपणा आयुष्यात कधी झाला नव्हता.... च्यामारी!!
संभाजीनगर पुणे प्रवास म्हणजे अक्षरशः दुःस्वप्न आहे. ज्यांनी केला असेल त्यांना माहित आहे. जिथे पूर्वी चार पाच तास लागायचे तिथे आता वाहतुकीच्या वेळेत सात तास लागतात. तुमच्या डोक्यात " मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग ..." वाजत असतं. रात्री उशीरा पुण्यात पोहचून सगळ्या कागदपत्रांचा जामानिमा करता. दादा वहिनीनी दुसऱ्या दिवशी पहाटेची मुंबईची कॅब बुक करून ठेवलेलीच असते. वहिनी आणि तुम्ही पहाटे निघून नरिमन पॉइंटला पोहोचता.
जर्मन कॉन्सुलेटवाले वेळेच्या फक्त दहा मिनिट आधी तुम्हाला आत सोडतात. फोन वगैरे काही आत नेता येत नसतं. वर गेल्यावर तिथला अधिकारी तुमचे कागदपत्र तपासतो(??) आणि तुम्हाला प्रतिक्षाकक्षात पाठवतो. तिथे आधीच एक student visa साठी आलेली मुलगी बसलेली असते आणि ती प्रचंड तणावाखाली असते. तिचा DD बाहेरच्या अधिकाऱ्याने नाकारलेला असतो आणि तिचे बाबा तिथल्या बँकेत नवीन DD काढायला गेलेले असतात. अचानक तुमच्या लक्षात येतं की आपला DD पण व्यवस्थित नाहीये पण त्या अधिकाऱ्याने त्यावर काही आक्षेप घेतलेला नसतो त्यामुळे तुम्ही निर्धास्त(??) होता.
नेमकं त्याच दिवशी तिथल्या सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो आणि त्यामुळे Interview प्रक्रिया लांबलेली असते. त्या वेळात ती मुलगीही तुमच्या ''टेन्शन यादीत'' येते कारण तिला म्युनिकलाच शिकायला यायचे असते, म्हणून ती तुमचा नम्बर घेते आणि तुमची व्यथा तिला कळते.
कसंतरी तास दीड तासाने प्रक्रिया सुरु होते. तुम्हाला बोलावलं जातं आणि पहिल्याच झटक्यात तिथली ताई तुमचा DD, फोटोची प्रिंट नाकारते. त्या पोरीला सांगावंसं वाटतं की ‘’आता माझ्याकडे इतके पासपोर्ट साईझचे फोटोज झालेत की गळ्यात त्याची माळ बांधून अजून सगळ्या प्रकारचे दागिणेही होतील. अजून कुठे नवीन प्रिंट काढायला सांगते बाई!’’ अमुक प्रिंट नाहीये, तमुक कागद नाहीये. ''आता काय नवीन अँपॉईनमेंट घ्या म्हणते की काय?'' असा भयावह विचार तुमच्या मनात चमकून जातो. पण ती वेळ देते आणि सगळं घेऊन यायला सांगते.
तुमच्या नशिबाने वहिनीचे अकाउंट ज्या बँकेत असते तिची शाखा समोरच असते. तिथून तुम्ही पुन्हा DD काढता, फोटोच्या आणि नवीन कागदपत्रांच्या प्रिंट्स काढता आणि वर ऑफिसमध्ये पोहोचता तेव्हा तिथे फक्त तुम्ही एकट्या उरलेल्या असता. बाकी सगळ्यांची कामं झालेली असतात. आता सगळे कागदपत्र आणि नवीन DD पाहून ताईचा चेहरा खुलतो, ती सगळं स्वीकारते आणि सांगते की साधारणपणे ९० दिवसांनी तुमचा Visa येईल. हाय रे कर्मा!! तुमचं परतीचं तिकीट तर पंधरा दिवसांनीच असतं. आता पुन्हा वाट पाहण्याचा अगम्य खेळ सुरु होतो!
क्रमशः