रविवार, २२ नोव्हेंबर, २०२६

शिशिर

सुरुवातीला झाडांच्या पानांचे बदलणारे सुंदर रंग, कुठे सोनेरी पिवळा, तर कुठे लालसर केशरी आणि लालसर तपकिरी, तर कुठे गडद तपकीरी. सगळी झाडं मनमुराद रंग खेळत असतात. पानांचे हे मनमोहक रंग पाहण्यात वेळ कसा निघून जातो ते कळतंच नाही. हा रंगांचा सोहळा बघत असतानाच थंडी सुरू होते. 

त्यानंतर होणारी पानगळ, वादळी कोरडे वारे, अधूनमधून पडणारा पाऊस आणि बोचरी थंडी म्हणजे शिशिर. आता हाच  ऋतू निरोप घेण्याच्या तयारीत आहे.

​सभोवतालच्या झाडांकडे पाहिलं, तर एखाददुसरं झाड वगळता, जवळपास प्रत्येकानेच आपला पर्णभार उतरवून ठेवलाय. पानं गळल्यामुळे फांद्या अगदीच मोकळ्या दिसायला लागल्या आहेत. जमिनीवर पडलेला पानांचा सडा आणि रित्या झालेल्या फांद्यां दिसल्या की उगीचच मन भरून येतं. पण या सगळ्या पानगळीत एखाददुसरं झाड मात्र अजूनही सोनपिवळ्या पानांना उराशी घट्ट कवटाळून उभं आहे. 

निरोपाच्या घडीला शिशिर धुक्याची चादर घेऊन येतो. सकाळच्या वेळी जेव्हा धुक्याची हलकीशी चादर सभोवताली पसरते, तेव्हा सभोवतालचं जग स्वप्नाळू भासायला लागतं. त्यावेळी हातात गरम चहाचा कप घेऊन खिडकीतून धुकं न्याहाळत बसायचं! 

पण कधीकधी हेच स्वप्नाळू धुकं, निष्पर्ण झाडं, ढगाळ हवामानातला उदासवाणा दिवस, मनावर मळभ घेऊन येतो. मन सैरभैर होऊन जातं. 

तेव्हा अचानक एक दिवस हिवाळ्याची चाहूल घेऊन तो येतो आणि मनाचा ठाव घेतो. मऊसूत, कापसासारखा, पांढराशुभ्र... बर्फ!

#माझी_म्युनिक_डायरी 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही