महिना झाला नविन घरात येऊन, आता जरा सामानसुमान लागलंय, सरकारी दरबारी पत्ता बदलुन बाकी हजारो ठिकाणचे पत्ते बदलुन झाले आहेत, बारीकसारीक गोष्टी घेऊन आलो आहोत; तरीही बऱ्याच गोष्टी घ्यायच्या बाकी आहेत!
तर, मी मॅगी काकुंचा शेजार सोडुन एका नविन घरात आलेय. मॅगी काकुंना सोडुन आल्यामुळे पोस्टसाठी काही म्हणजे काही सुचत नव्हतं बघा!
त्याचं झालं असं की आमच्या घरमालक काकांनी आम्हाला सांगितलं की “माझ्या नातीला म्युनिकमध्ये शिक्षणासाठी रहायचं असल्यामुळे तुम्ही नविन घर बघा.” त्यांनी आम्हाला असं सांगितल्यवर आमचं धाबंच दणाणलं! म्युनिकमध्ये भाड्याने घर शोधायचं म्हणजे धाबं दणाणणेच आहे! आम्ही काकांना विचारलं की किती दिवसांची मुदत देताय? त्यावर ते म्हणाले असं काही नाही तुम्हाला घर मिळालं की कळवा! हे ऐकुन जीवात जीव आला एकदाचा. घरमालक काका नक्कीच मॅगी काकुंचे दूरचेहि नातेवाईक नसावेत बहुदा!
ही गोष्ट आहे मागच्या वर्षीची. त्यानंतर आम्ही लगेचच ईथल्या एका वेबपोर्टलवर आमच्या कुटुंबाची अख्खी कुंडली टाकली. हो, ईथे प्रत्येक घरमालकाला तुमच्याविषयी प्रत्येक बारीक गोष्ट समजुन घेण्यात रस असतो. त्यांचं घर नक्की कश्या माणसाला ते भाड्याने देत आहेत ते त्यांना आधीच तुमच्या प्रोफाईलवरून समजलं पाहिजे. तुमची आर्थिक परिस्थिती म्हणजेच महिन्याचा पगार, तुम्ही दोघे कुठे आणि कोणत्या प्रकारची नोकरी करता? तुम्ही महिन्याच्या महिन्याला भाडं भरू शकता की नाही? कुटुंब म्हणुन तुम्ही कसे वागता, वावरता? जर्मनीत आल्यापासुन किती वेळा घरं बदलली आणि का? इत्यादी इत्यादी गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रोफाइलमध्ये लिहाव्याच लागतात आणि त्याही जर्मन भाषेत! इंगजीचा विचारही तुम्ही करू शकत नाही कारण इथल्या लोकांना इंग्रजीचा खुप राग येतो.
बरं इतकं करूनही तुम्हाला घर बघायला बोलावणं येईल की नाही ह्याची खात्रीच नाही! मग तुम्हाला पैसे भरून त्या वेबपोर्टलचं सदस्यत्व घ्यावं लागतं कारण तुमची कुंडली जास्त लोकांपर्यंत पोहोचणार म्हणुन.
तर, सदस्यत्व घेतल्यावर आम्ही साधारणपणे १०० घरांच्या घरमालकांना आमची कुंडली पाठवली! त्यातल्या फक्त ७-८ घरमालकांना आमची कुंडली थोडीफार पसंत पडली आणि त्यांनी आम्हाला घर बघायला यायचं आमंत्रण दिलं. पण हाय रे कर्मा प्रत्येक वेळी आमच्या सोबतच आमंत्रण मिळालेला कोणीतरी युरोपिअन घराची बाजी घेऊन जायचा!
त्यातले एक काका म्हणाले तुम्हा भारतीय लोकांच्या स्वैपाकातल्या मसाल्यांचा वास शेजाऱ्यांना सहन होत नाही ( आणि इथले लोक डुकरं, गायी, घोडे खातात त्याचा फारच सुगंध दरवळतो ना काका!)
दुसर्या ताई म्हणाल्या भारतीय लोक नियम अजिबात पाळत नाहीत. कचरा टाकायचं व्यवस्थापन कळतच नाही त्यांना. घरात मोठमोठ्याने बोलतात. मुलं घरात खेळतात. त्याचा खालच्या लोकांना त्रास होतो. त्यांना आम्ही म्हणालो प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात हो. (अरे कुठे नेऊन ठेवलाय भारतीय आमचा?)
एकतर मुलाला शाळेला जाणं येणं थोडं का होईना सोपं पडावं ह्या दृष्टीने मी घरांना कुंडली पाठवत होते. त्यामुळे म्युनिकच्या एका विशिष्ट भागातच घर मिळणं गरजेचं होतं, त्यात पुन्हा सात वर्ष ज्या भागात राहीले होते तो सोडावं वाटत नव्हतं.
असे ५-७ घरं हातचे गेल्यानंतर तर ताण यायला लागला की घर मिळतं की नाही? कारण एव्हाना आम्हाला विशिष्ट भागाची अटही शिथिल करावीच लागली कारण ८०-९० घरांना कुंडल्या पाठवुनही कुणाशीही आमची कुंडली जुळ्तच नव्हती.
शेवटी न राहवुन आम्ही त्या वेबपोर्टलचे साधं सदस्यत्व ठेवुन फोडणीचं म्हणजेच पैसे भरून घेतलेलं सदस्यत्व रद्द केलं! यन्टमपणा नुसता पैश्याचा.
पाच सात महिन्याच्या शोधमोहिमेत एक गोष्ट शिकलो की पेशन्स महत्वाचे आहेत आणि म्युनिकमध्ये घर मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट! तर निराश न होता मी आपलं दिसेल त्या चांगल्या घरांना कुंडल्या पाठवायचा धडाकाच लावला! आणि काय आश्चर्य, आमचं साधं सदस्यत्व असुनही “ह्यांना” घर बघायला या म्हणुन जर्मन भाषेत एका एजंट ताईंचा फोन आला.
ह्यांना जर्मन फारसं येत नसल्यामुळे हे ताईंशी इंग्रजीमध्ये बोलायला लागले आणि ताईचं डोकं सरकलं आणि त्यांनी फोन ठेऊन दिला! नहीं$$$$$ ये नहीं हो सकता. असा विचार करून ह्यांनी ताईंना लगेच फोन लावला आणि कसबसं सांगितलं की ताई माझ्या बायकोला थोडं आणि मुलाला खुप जर्मन येतं. आम्हाला घर तर पाहु द्या की! तर ताईंना काय वाटलं कोण जाणे त्या चक्क हो म्हणाल्या.
मग आम्ही आमच्या टीनएजरची खुप शाळा घेतली की राजा आता सगळी मदार तुझ्या छान छान जर्मन बोलण्यावर आहे. बच्चे संभाल ले. स्वतःच्या पोरांना लोणी लावावं लागतं राव आजकाल. हे टिनेजर्स म्हणजे ना...तुम्हाला सांगते... असो.
तर, आम्ही शुचिर्भुत होऊन घर बघायला गेलो. इथे आपल्याला घर आवडो न आवडो, त्या घरमालकांना आणि एंजट लोकांना आपण आवडणं फार म्हणजे फार महत्वाचं आहे. एखाद्या नोकरीच्या मुलाखतीला जातो तस जावं लागतं!
घर तर आम्हाला आवडलंच. मग ताईंनी आम्हाला पार्किंग, कचऱ्याचं व्यवस्थापन, इत्यादी गोष्टी दाखवल्या. पुन्हा २-३ वेळा शालजोडीतुन हाणले की “बऱ्याच आधी एका भारतीय कुटुंबाला घर दिलं होतं तर त्यांनी घराची कशी वाट लावुन ठेवली होती पण तुम्ही तिघे स्वच्छ आणि टापटीप दिसताय!!” (मनात म्हणलं म्हणजे काय गबाळं दिसायला पाहिजे का? इतकाच अपमान करायचा होता तर बोलावलं कशाला गो? म्हणे स्वच्छ दिसताय! आम्ही काय गोठ्यात राहतो का?अगं ताई आम्ही शुचिर्भुत झाल्याशिवाय घराबाहेरही पडत नाही ग!!)
पुन्हा स्वैपाकघरातल्या गोष्टी किती नाजुकपणे हाताळायच्या ह्याविषयी शाळा घेतली. (आता काय स्वैपाक करायचाच नाही का काय? नुसतं सगळ्या उपकरणांकडे बघत बसायचं का? अरे काय चाललंय काय?)
पण म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते तसं म्युनिकमध्ये घर शोधणाऱ्याला अक्कल तर नसतेच पण स्वाभिमान वगैरे गुंडाळुन ठेवावा लागतो! आम्ही कसनुस हसलो. ताईंनी त्याचा इमेल वगैरे दिला पण एवढं सगळं ऐकुन आम्हाला वाटलं की हेही घर काही मिळत नाही आपल्याला. कारण ताईंनी भारतीय लोकांचं जे गुणगान केलं त्यामुळे पार आशा मावळली. तरी बरं आमचे घरमालक काका आमच्या डोक्यावर बसले नव्हते नाहीतर इकडे आड आणि तिकडे विहीर झालं असतं.
घर बघुन आल्यावर सगळ्या आशा मावळल्या होत्या त्यामुळे मी लगेच दुसऱ्या घराना कुंडल्या पाठवायला सुरुवात केली. आणि दोन दिवसांनी चक्क चक्क त्या ताईंचा ईमेल आला की घरमालकांना तुमची कुंडली आवडली आहे आणि तुम्हाला घर मिळालं आहे!!
खरंतर हा मेल वाचुन आम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता पण मनात उगीच शंकेची पाल चुकचुकली. वेबपोर्टलच्या साध्या सदस्यत्वाच्या जोरावर कसं काय घर मिळालं बुआ? काही फ्रॉड तर नाही ना? कारण आमच्या एका मित्राला मागच्या वर्षी अश्याच एका ताईंची तीन हजार युरोचा चुना लावला होता. घर तर मिळालंच नाही आणि वर पैसे गेले. त्यामुळे घर ताब्यात मिळेपर्यंत टेन्शनच होतं.
म्हणुन मग आम्ही ताईंची कुंडली शोधायला घेतली. त्यांनी एजन्सी खरोखर अस्तित्वात आहे की नाही? पत्ता जो दिलाय तिथे एकदा उगीचच चक्कर मारून आलो. घरमालकीण बाई खऱ्याच आहेत ना? वगैरे वगैरे. जर्मनीत आल्यापासुन ताकही फुंकुन प्यायची सवय लागली आहे! ह्या सगळ्या गोष्टींची खातरजमा केल्यावरच आम्ही ताईंच्या इमेलला उत्तर दिले तर म्हणतात कश्या “ किती उशिर केला तुम्ही उत्तर द्यायला! मी घरमालकीण बाईकडे तुमच्यासाठी शब्द टाकला होता. आता लवकरात लवकर अग्रीमेंटवर सह्या करा आणि पाठवुन द्या नाही तर घर मिळणं अवघड आहे!"
इकडे चिरंजीवांचं वेगळंच “मिळालं का घर? मला वाटलं नाही मिळणार! मला हे घर सोडायचं नाहीये." त्याचं बालपण तिथे गेल्यामुळे त्याला तसं वाटणं साहजिकच होतं म्हणा. मलाही नविन ठिकाणी जायचं म्हणल्यावर वाईट वाटतच होतं.
मग आम्ही आमच्या घरमालकांना रीतसर कळवलं आणि घर बदलायला, जुने घर रंगवायला आणि स्वच्छ करायला, फर्निचरची जुळवाजुळव करायला माणसं शोधायच्या मोहिमेवर निघालो. ईथे घर आणि परिसराच्या स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व आहे! घर सोडतांना आरशासारखं लखलखीत करून द्यावं लागतं नाहीतर डिपॉझिटवर पाणी सोडावं लागतं. आमच्याच मित्रमैत्रीणींकडुन एकल्याप्रमाणे घरमालक घराचा ताबा घेताना क्लीनिंग एक्सपर्टला घेऊन येतात आणि त्या एक्सपर्टच्या मते तुम्ही जर घर खराब केलेलं असेल तर विसराच भरलेलं डिपॉझिट. त्यामुळे तो एक वेगळाच ताण होता.
आणि तो दिवस आला, ज्या दिवशी एजन्ट ताई घराच्या किल्ल्या देणार होत्या. काळजात नुसती लकलक लकलक(संदर्भ वर्हाड निघालंय लंडनला)! घर ताब्यात देतांना एजन्ट ताई दोन इंग्रजी शब्द घोकुन आल्या होत्या “ Very Clean!” आम्हाला किल्ल्या देण्याच्या आधी ताई घराचा कोपरानकोपरा दाखवतांना हात जोडुन “Very clean, very clean” एव्हढंच बोलत होत्या. मी पण मग हात जोडुन "yes yes yes " म्हणत होते. मनात आलं “अहो ताई का देताय मग घर भाड्याने? घर रिकामं ठेवलंत तरच very clean राहील ना!”
प्रत्येक नळाला लावलेले पाण्याचे मीटर्स, घरातल्या हिटर्सच्या घेतलेल्या रीडींग्ज, नळ स्वच्छ कसे करायचे, कचरा कसा वेगवेगळा करायचा, घराला हवा देणे कसे गरजेचे आहे आणि त्याविषयीच्या लिहिलेल्या सुचना आम्हाला दिल्या, ह्या आणि अश्या बऱ्याच गोष्टींचे सोपस्कार पार पाडुन ताईंनी एकदाचा किल्ल्यांचा जुडगा आमच्या सुपुर्त केला! किल्ल्या मिळाल्याच्या पुढच्या आठवड्यात सामान घेऊन आम्ही नविन घरात दाखल झालो आणि जीव भांड्यात पडला!
इथे घराला हवा देणे हि एक फार महत्वाची गोष्ट आपल्यासारख्या भारतीय लोकांना कटाक्षाने लक्षात ठेवावी लागते. हिवाळ्यात तर अगदी न विसरता रोज सकाळ संध्याकाळ १५-२० मिनिटे पुर्ण घराच्या खिडक्या दारं उघडे ठेवुन हवा खेळती ठेवावी लागते नाही तर "शिमेल" म्हणजेच एक प्रकारची बुरशी लागते भिंतींना आणि तो प्रकार इतका वैताग आणणारा असतो की ज्याचं नाव ते. ती बुरशी एकदा यायला लागली कि इतक्या झपाट्याने पसरते ना घरात. ती स्वच्छ करणे म्हणजे जीवखाऊ प्रकार असतो एकदम. असो.
तर, इथे मनुष्यबळ कमी असल्यामुळे घरातलं एक ना एक फर्निचर तुकड्यातुकड्यांमध्ये मिळतं, त्यामुळे त्याची जुळवाजुळव करायलाही कोणीतरी मदतीला लागतंच. Ikea नामक दुकानाची कृपा. आधीचं घर फर्निश्ड असल्यामुळे आम्ही ह्या भानगडीत कधी पडलोच नव्हतो. पण नविन घरात फक्त इक्विप्ड किचन आणि बाकी घर अनफर्निश्ड असल्यामुळे सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करावी लागली. बेड, कपाटं, टीव्हीस्टॅन्ड, डायनिंग टेबल, अभ्यासाचा टेबल वगैरे समजु शकतो पण खुर्चीचे सुद्धा तुकडे!! ह्यांनी आणि लेकाने मिळुन तर चक्क खुर्ची सुद्धा जोडलीये मागच्या काही दिवसांत, आता बोला!
तिकडुन निघतांना इमारतीतल्या सगळ्या कुटुंबांचा निरोप घेतला. नाही म्हणलं तरी सात वर्षांची ओळख होती ना! ह्यात सगळ्यात जास्त मजेशीर किस्सा अर्थातच मॅगी काकुंचा निरोप घेतानांचा आहे! त्याविषयी लवकरच लिहिते.
त्यांनतर इकडे सामानसुमान लावणे आणि जुन्या घरातली स्वच्छता आणि रंगरंगोटी असे सगळे कामं चालु होते. दोन्ही थडीवर हात ठेवुन चालणे म्हणजे काय ह्याचा मस्त अनुभव आला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकडच्या घरमालक काकांनी किंवा एजन्ट ताईंनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता शांतपणे किल्ल्या ताब्यात घेतल्या आणि निरोप दिला!
तिकडचं घर म्हणजे कोकण असेल तर इकडचं घर म्हणजे महाबळेश्वर आहे! म्युनिकमध्ये हाय राईज बिल्डिंग्ज जास्त नाहीत पण आम्हाला एका इमारतीत आठव्या मजल्यावर घर मिळालं आहे आणि इथल्या बाल्कनीतुन दक्षिण क्षितिजावर आल्प्सचं रमणीय नित्य दर्शन आहे. घराच्या दोन्ही बाजुंनी अर्धं म्युनिकदर्शन होत आहे. रोजच्या सूर्यास्ताचे रंग बघण्यात इकडे हळुहळु करमतय. फरक एव्हढाच की सदाशिव पेठेतुन उठुन सरळ सरळ चंदननगरला आल्यासारखं वाटतंय किंवा औरंगाबादेतलं बोलायचं तर समर्थनगर मधुन सरळ चिकलठाण्याला गेल्यासारखं!! बस्स!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
#माझी_म्युनिक_डायरी
1 टिप्पणी:
एकूण काय तर हे क्रमशः म्हणजे कटप्पा ने बाहुबली को क्यु मारा असं हो
टिप्पणी पोस्ट करा