सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

हक्काचा जुगाड

आज दुपारी पोळ्या करायच्या म्हणुन डब्यातून कणिक काढायला कपाटाचं दार उघडलं अन पोळ्या लाटायचा अमंळ कंटाळाच आला. किराणा सामानात मागवलेल्या हक्का नूडल्सकडे लक्ष गेलं अन आला पोळ्या लाटायचा कंटाळा! जे आहे ते असं आहे. 

इतके दिवस ते हक्का नूडल्स फारच कोरडे होतात म्हणुन त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं होत पण आज म्हणलं इनका कुछ ना कुछ तो कराना पडेगा. तसं आज सोपा सोपा पिठलं पोळीचा बेत करणार होते पण आता हक्का नुडल्सनी हक्काने हाक मारल्यावर मी माझा हक्क.. हट्ट सोडला! 

पण मग नूडल्स कोरडे तर खायचे नव्हते म्हणुन ह्यांना म्हणाले शेंगुळे करतात तशी पाण्याला फोडणी देते खमंग आणि त्यात नूडल्स टाकते तर "काय??" असा आश्चर्यमिश्रित प्रश्न आला. शेंगुळे म्हणजे नूडल्सच कि हो. पण नाही, माझ्या सर्जशीलतेवर विश्वासच नाही मुळी. कसा असेल विश्वास म्हणा;  इतक्या वर्षांपासुन माझ्या हातचं जेवतोय! ते असोच. 

इथं विषय नूडल्सचा चालु होता आणि उगीचच मला चिडवायला म्हणे आज तुझ्या त्या साऊथ कोरियाची फुटबॉल मॅच आहे. मी अधुनमधुन कोरियन सिरीज बघत असते म्हणुन माझं साऊथ कोरिया! कोरिया वरून कोरियन सिरीज आणि त्यावरुन त्या सिरीजमध्ये दिसणारे त्यांचे अन्नपदार्थ! माझी गाडी तिथपर्यंत कधी पोहोचली माझं मलाच कळलं नाही. खरोखर त्यांच्या सिरीजमध्ये दिसणारे त्यांचे अस्सल पारंपारिक पदार्थ पाहुन छान वाटतं; त्यांची खाद्यसंस्कृती ते चांगल्या प्रकारे जगासमोर आणत आहेत. विषय भरकटतोय. कोरियन सिरीजविषयी पुन्हा कधी तरी. 

तर, मी लगेच जाहीर केलं "आता ठरलं, मी हक्का नुडल्स वापरुन कोरियन पाककृती करणार!" असं म्हंटल खरं पण सगळं साहित्य आणणार कुठून आयत्या वेळेला? म्हणुन मग मी पुढची घोषणा केली कि "मी चायनीज जिन्नस वापरुन कोरियन नूडल्स करणार!" तर ह्यांचं लगेच "घरात जर्मन पदार्थांचं साहित्यही असेल, तेही वापर बरंका!!" टोमणे कळतात हो!! पुढे वाद वाढवायची खुमखुमी आली होती कि "जर्मन साहित्य ना.. वापरते ना.. म्हणजे काय वापरणारच .. किंबहुना वापरलेच म्हणून समज .." पण वेळेअभावी ती पुढे ढकलली. 

ह्या सगळ्या भारतीय, कोरियन, चायनीज आणि जर्मन साहित्य आणि पदार्थांमुळे भंजाळले ना मी! पण पोटात कावळे कोकलायला लागल्यावर पटकन घरत ज्या काही २-४ भाज्या होत्या; गाजर, ब्रोकोली, झुकिनी आणि कांदा, त्या मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या. तोपर्यंत पॅन छान तापलं होतं. त्यात थोड्या तेलावर ह्या सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर छान परतून घेतल्या. भाज्या अश्या परतायच्या कि त्यांचा करकरीतपण टिकुन राहिला पाहिजे. भाज्या बाजूला काढुन त्याच पॅनमध्ये थोड्या तेलात हिरवी मिरची आणि लसणाचा खर्डा, बारीक चिरलेलं आलं परतलं. त्यात पाणी, थोडा सोया आणि शेजवान सॉस घातला. मीठ चवीपुरतं. पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात हक्का नुडल्स टाकले. नुडल्स छान शिजत आले कि गॅस बंद. तर अश्या रितीने हा चारदेशीय साहित्यातला जुगाडू पदार्थ तयार झालेला असतो. 

त्यानंतर अजिबात वेळ न दवडता एका बोलमध्ये मस्त नुडल्स, भरपुर सुप आणि त्यावर परतलेल्या भाज्या घेऊन, खिडकीतुन बर्फाच्छादित आल्प्सकडे बघत गरम गरम ओरपायचे! बाकी त्याची चव नक्की कोणत्या देशातल्या पदार्थाची लागतीये ह्याचा फार विचार नाही करायचा. तसंही इथल्या कडाक्याच्या थंडीत असे हे झणझणीत गरम गरम पदार्थ चवदारच लागतात!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्युनिक_डायरी 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही