म्युनिकला रहायला आल्यापासूनचे मला आलेले छोटे छोटे मजेशीर अनुभव, प्रवासात आलेले अनुभव आणि लिहिण्याच्या छंदामुळे खेळलेली माझी "फुगडी आयुष्याशी" तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल.
मंगळवार, ११ एप्रिल, २०२३
मेट्रो
मंगळवार, २८ मार्च, २०२३
शिंकेची शंका
त्या फालतू कोरोनाने आपलं आयुष्य बदलून टाकलंय खरं! तसं आता म्युनिकमधल्या मेट्रोमध्ये मास्क अत्यावश्यक नाहीये. त्यामुळे मेट्रोच्या डब्यात एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर बाकी लोक मास्कविना प्रवास करत आहेत. पण मास्क घातलेला नसला तरी ते सावट आहेच थोड्याफार प्रमाणात.
मघाशी गर्दीने खचाखच भरलेल्या मेट्रोच्या डब्यात आम्ही बसलो होतो तिथून ४-५ रांगा सोडून, लांब बसलेलं कोणीतरी शिंकलं! डब्यात इतकी शांतता असते कि विचारायची सोय नाही. तशी त्या बाप्याची पहिली शिंका कोण्याच्याही खिजगणतीतही नव्हती.
पण जसजसा तो सटासट शिंका द्यायला लागला तश्या लोकांच्या प्रतिक्रया बदलत गेल्या. त्याच्या दुसऱ्या शिंकेनंतर २-३ डोक्यांनी फोनमधून वर पाहिलं आणि कोण शिंकतय हे बघायचा प्रयत्न केला.
तिसऱ्या शिंकेनंतर अजून ५-७ लोकांनी नक्की कोण शिंकतय ते बघायचा प्रयत्न केला. चौथ्या शिंकेनंतर बऱ्याच लोकांनी एकमेकांकडे बघून सहेतुक कटाक्ष टाकले की काय बाप्या आहे! पाचव्या शिंकेनंतर माझ्यासारख्या शांतपणे जागेवर बसलेय लोकांनी उठून बघायचा प्रयत्न केला की कोण आहे? पण गर्दीमुळे कोणी दिसलंच नाही!
सहाव्या शिंकेनंतर मात्र अख्ख्या डब्याचं लक्ष “कौन है बे तू?” म्हणून त्या बाप्याकडे गेलं. एव्हाना तो नक्कीच ओशाळला असेल. सातव्या आणि शेवटच्या शिंकेनंतर मात्र सगळ्या लोकांचा बांध फुटला आणि डब्यात एकच हश्या पिकला! तो बाप्या नक्कीच पुढच्या स्टेशनला उतरून गेला असेल.. लोकलाजेस्तव! हां मात्र तो जर्मन असेल तर नसेल उतरला बरं!
तरी बरं त्याला सातच शिंका आल्या, त्याबरोबर खोकला वगैरे आला नाही, नाहीतर डब्यातल्या काही अतिशहाण्या लोकांनी इमर्जन्सीला फोन करायला कमी केलं नसतं!
मी त्या बाप्याच्या शिंका मोजल्या म्हणताय. मोजल्या म्हणजे काय? मोजल्याच! मॅगी काकूंची शेजारीण आहे मी पूर्वाश्रमीची त्यामुळे शिंकेची शंका मलाही आलीच ना!
#माझी_म्युनिक_डायरी
मंगळवार, ७ मार्च, २०२३
कुणाचं काय तर कुणाचं काय
परवा माझा एक मित्र मला विचारत होता की भारतातुन येतांना मी अश्या कुठल्या गोष्टी आणु, ज्या आवश्यक सदरात मोडतात?
मी आपलं त्याला कुकर, पोळपाट लाटणं, एखादं हलकं मिक्सर आण सांगत होते. कारण इथले मिक्सर म्हणजे निव्वळ टिनपाट, ना इडलीचं पीठ होतं ना बाकी काही. बाकी तिखट, मसाले, हळद इत्यादी गोष्टी ही सांगितल्या आणि आत्ता ही पोस्ट दिसली!
मित्राला सांगायला लागतंय, पोरा एखादी कार असल तर ती पण घेऊन ये भावा..
आता ह्यांच्यांशीही भांडायला लागतंय, चांगली कार होती तिकडे, का नाही आणली म्हणुन! सोशल मीडिया खरंच फार भारी आहे, भांडायला विषय देत राहतो लोकांना.
मला माहित आहे, टेक्निकली दुसऱ्या देशातून कार जर्मनीत आणणं शक्य आहे. फक्त त्या कारला जर्मन स्टँडर्ड नुसार बनवून घ्यावं लागतं. पण आपलं कसं आहे ना आपण वापरतो फेसबुक आणि तिथं कुणी साधा सरळ प्रश्न विचारला तरी लोक फक्त वाकड्यातच शिरतात असा शिरस्ता आहे ना! म्हणुन हा पोस्टप्रपंच.
भारतातून इथे येणाऱ्या लोकांना आल्याआल्या जामच आत्मविश्वास असतो. मी यंव करेल मी त्यंव करेल आणि त्याच प्रचंड आत्मविश्वासातूनच अश्या पोस्ट येतात. मागे एका महाभागाने विचारलं होतं की माझ्या भारतातल्या घरात डिशवॉशर, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह पडून आहे, मी इकडे घेऊन येऊ का? असे प्रश्न वाचले की मला माझा अख्खा संसार एका खोलीत बांधून ठेवलेला डोळ्यांसमोर येतो! असो.
अरे भावा! तू ते सगळं तिकडून आणण्याच्या खर्चाचा विचार केलास का? मग त्या सगळ्या वस्तू जर्मनीत व्यवस्थित चालण्यासाठी कराव्या लागणाऱ्या बदलांचा विचार केला आहेस का? त्या बदलांसाठी लोक मिळतील का? हा विचार केला आहेस का? कौन है ये लोग?
इथे साधं फ्लशचं बटन नीट करायला येणाऱ्या माणसाच्या दहा वेळा हातापाया पडावं लागतं अपॉइंटमेंट साठी (कारण त्याला इंग्लिश येत असतं). एवढं केल्यावर तो कसातरी तुमच्यावर उपकार केल्यासारखं एक वाक्य सांगतो ”मला पुढच्या आठवड्यात पुन्हा आठवण करा!” आपण आठवण करून दिली की तो तुमची दया येऊन तो एक महिन्यानंतरची अपॉइंटमेंट देतो. जे आहे ते असं आहे एकंदर.
पोस्टकर्तीच्या धाडसाला दाद द्यावी लागतेय ह्या ठिकाणी! जिथे मला माझे दिवाळीचे कुरिअर जर्मन कस्टममधून सोडवायला पन्नास युरो मोजावे लागले होते तिथे ह्या लोकांचे कार, वाशिंग मशीन इत्यादी गोष्टी पाहून माझ्या डोळ्यांसमोर काजवेच चमकले. बाकी चालुद्या म्हणावं!!
आता तिथं त्या ताईला लोक काय सल्ले देतात ते वाचते म्हणजे मग इजारमध्ये कार नहाली!! (म्युनिकमधून वाहणाऱ्या नितळ नदीचे नाव इजार आहे.)
#माझी_म्युनिक_डायरी
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३
भेटीत तुष्टता मोठी
मागे एकदा एका मित्राने एक किस्सा सांगितला होता. जो ऐकुन आम्ही आश्चर्यचकितच्या पुढे जे काही विशेषण असेल ते झालो होतो. पण त्यानंतर इथे मॅगी काकूंचं वागणं बघितलं आणि तो आणि तत्सम किस्से पटायला लागले.
त्याचं झालं असं की हा आमचा मित्र आमच्याकडे २-३ दिवस म्युनिक फिरायला आला होता. खरंतर आधी आम्ही राहायचो ते घर जरा लहानच होतं पण आम्हा तिघांना पुरेसं होतं. तो म्हणाला आपण भारतीय लोक किती पटकन इतरांना सामावून घेतो नाहीतर हे जर्मन लोक म्हणजे कहर आहेत.
तर हा आमचा मित्र आणि त्याचा एक जर्मन मित्र असे दोघे त्या जर्मन मित्राच्या “आईवडिलांच्या” घरी जाणार होते. मुद्दामच अवतरण चिन्हात लिहिलं आहे मी ते. ह्या दोघांना चार वाजताची वेळ दिलेली होती. पण हे वेळेच्या दहा मिनिट आधीच घराच्या जवळ पोहोचले. तर आमच्या मित्राला वाटलं हा जर्मन भाऊ दाराची बेल वाजवेल, पण कसचं काय. तो काही बेल वाजवायला तयार नव्हता. थंडीचे दिवस होते, प्रचंड थंडी होती, म्हणुन आमचा भारतीय भाऊ म्हणाला “वाजव की बेल लेका, थंडीत जीव जाईल आपला!“ तरीही जर्मन भाऊ बेल वाजवायला तयार नव्हता. शेवटी कंटाळून आमच्या भारतीय भावाने बेल वाजवायचा प्रयत्न केला तर जर्मन भाऊ म्हणाले “अरे त्यांनी आपल्याला चार वाजताची वेळ दिली आहे. अजुन चार वाजले नाहीयेत, थांब."
हे ऐकुन आमच्या भारतीय आणि त्यातल्या त्यात मराठी भावाला चक्कर यायची बाकी राहिली होती. तो जर्मन भाऊला म्हणाला “अरे तुझेच आईवडील आहे ना भावा! मग असा का वागतो आहेस?“ जर्मन दादाचं उत्तर ऐकुन तर आमचा मित्र आयुष्यभरासाठी चक्रावून गेलेला आहे. जर्मन भाऊ म्हणाला “अरे माझेच आईवडील आहेत पण त्यांनी जर सांगितलं आहे चारला या तर मी आधी जाऊन त्यांना त्रास नाही देऊ शकत. मी पाच मिनिट सुद्धा आधी नाही जाऊ शकत!“ हे ऐकुन आमच्या भारतीय भावाने त्या पोराचा नाद सोडला.
मागे एकदा भारतातून परत आलो तेव्हा विमानतळावर असाच एक भयचकित करणारा प्रसंग पहिला होता. एक मुलगा कदाचित बऱ्याच दिवसांनी म्युनिकला स्वतःच्या घरी परत आला असावा. त्याच्या स्वागताला आई, वडील आणि बहीण आले असावेत. मुलाने खूपच शांतपणे आधी आईची गळाभेट घेतली मग बहिणीची आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला जवळ घेतले. हा सगळा कौटुंबिक सोहळा अगदी शांततेत चालू होता.
नाहीतर मी, माझ्या जावांच्या, भावजयीच्या घरी, आश्चर्याचा धक्का देण्याच्या नावाखाली, न सांगता, मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन टपकते आणि एवढं करूनही त्या मला आनंदाने मिठीत घेतात!!!!
#माझी_म्युनिक_डायरी
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
चिया चिया जिया जिया
आज संध्याकाळी बऱ्याच दिवसांनी किराणा सामान आणायला गेले होते. आज शुक्रवार संध्याकाळ म्हणजे तिथे मरणाची गर्दी! हो इथे चक्क गर्दी वगैरे असते कारण जवळपासचे सगळे लोक ह्याच सुपरमार्केट्मधे येतात!
तर ह्या मोठ्याच्या मोठ्या दुकानात खरेदीसाठी कायम झुंबड उडालेली असते. खरंतर जर्मनीत आल्यापासुन खरेदीसाठी झुंबड उडालेली फार कमी वेळेस दिसते. तर ते असो.
मी आपली आधी भाज्या, फळं मग बाकीच्या एक एक गोष्टी घेत घेत दुकानाच्या सगळ्यात शेवटच्या भागात पोहोचले. आता फक्त चिया सीड्स घेतल्या कि पटापट वर जाऊन रांगेत लागालंच पाहिजे, कारण तिथे कमीत कमी २० मिनिटे जाणार हे पक्क माहित होतं. पुन्हा घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता! डोक्यात असे सगळे विचार घेऊन मी त्या सेक्शनला पोहोचले.
तर एका जोडीने मुसली घेण्यासाठी म्हणुन शॉपिंग ट्रॉलीसकट अख्खाच्या अख्खा सेक्शन स्वतःच व्यापला होता. चिया सीड्स मुसलीच्याच बाजुला ठेवलेली असल्यामुळे, मी आपली ती जोडी आणि त्यांची ट्रॉली हलण्याची वाट बघत उभी राहिले. पण त्या जोडीचा अविर्भाव बघुन जरा शंकाच आली.
जोडीतल्या ताईंनी मुसलीचं पॅकेट ट्रॉलीत टाकलं आणि ती मधाळ आवाजात, अगदी डोळ्यात डोळे घालून दादाला काहीतरी म्हणाली! दादाने पण एकदम प्रेमळ नजरेने तिच्याकडे बघितलं, हळुच तिची टोपी बाजुला केली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले! तेजामार, मुसलीला बघुनच एवढं प्रेम! घरी जाऊन खातील तेव्हा काय करतील!!
मला वाटलं आता झालं असेल दोघांचं, आता हलतील तिथुन तर त्यांचं प्रेम अजुन उत्कट पायरीवर पोहोचलं! दादाने हलकेच तिच्या गालावर ओठ टेकवले. ती लाजुन चुर, तरीही तिने त्याला पुन्हा मधाळ आवाजात काहीतरी प्रतिसाद दिला!
बरं त्यांच्या प्रेमात मला एक्सक्युजमी वगैरेही म्हणता येईना. मी एवढी तिथे उभी असुन त्यांना काडीचाही फरक पडला नव्हता तर माझ्या बोलण्याने काय होणार होतं म्हणा!
म्हणुन मग मी इकडून, तिकडून, कुठून चिया सीड्स दिसत आहेत का ते बघत होते. पण त्यांच्या ट्रॉलीमुळे अवघड होतं. बरं सगळ्यांत बावळटपणा म्हणजे मी आपली यन्टमसारखी त्यांच्या प्रेमाची साक्षीदार असल्यासारखी तिथल्या तिथेच फिरून वेगवेगळ्या बाजुंनी शोधाशोध करत होते, त्यामुळे चिया राहिल्या बाजुला आणि त्यांचं पायऱ्या चढत असलेलं प्रेमच दिसत होतं!
किराणा दुकानात, मुसलीच्या रॅकच्या बाजुला?? असा विचार मनात चमकुन गेलाच!!
आता इकडून तिकडे जाणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना माझीच शंका यायला लागली होती बहुतेक, ही बाई काय त्या प्रेमळ जोडप्याकडे बघत उभी आहे! लोकांना काय माहित माझं चिया चिया आणि त्यांचं जिया जिया चाललंय ते! तिथल्या लोकांना नक्कीच वाटलं असेल कि ये औरत हर अँगलसे देख राही है लव्ही डव्ही जोडपेको. शेवटी मी चिया सिड्सचा नाद सोडला आणि चडफडत तिथुन निघाले.
तसं अश्या प्रकारचे सांस्कृतिक धक्के इथे अधुनमधुन बसतच असतात, फक्त किराणा सामान घ्यायला गेल्यावर असा धक्का कधी बसेल असं वाटलं नव्हतं.
कुणाचं काय तर कुणाचं काय?
गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२
रंग दे
आज जर्मन टीव्हीवर एक जाहिरात पहिली आणि भुवयांचे केस उभे राहायचे बाकी राहिले होते!
म्हणलं चला आता मी डोळे मिटायला...
च्यामारी त्यासाठी आपण कशाला डोळे मिटायचे?
मग म्हणलं चला आता मी फेसबुक सोडायला मोकळी...
पण मग विचार केला कि लोकांनी भुवया रंगवायचा रंग बनवून, त्याची जाहिरात तयार करून, टीव्हीवर लोकांना दाखवली तर फेसबुकवर होणारं फुकटचं मनोरंजन कशाला सोडायचं? नाही का?
हो, भुवयांना रंगवायचा रंग निघालाय म्हणे! आणि तो इथे आता सणावाराला लावतील म्हणे. अन मग त्यांचे चेहेरे कसे दिसतील म्हणे?
पण मग भुवया आणि केसांचा रंग जुळलाच नाही तर? म्हणजे बघा हं, केसांना चुकून वेगळा रंग आणि भुवयांना वेगळा दिला गेला तर? कसं दिसल ते ध्यान? किंवा भुवयांना रंग देता देता तो गालाला लागला तर? करावं तरी काय माणसानं? अरे काय चाललंय काय?
आता मी हे सगळं लिहिलं कि हे मंद फेबु मला अश्याच भयाण जाहिराती दाखवेल! आज भुवयांच्या रंग, उद्या पापण्यांचा रंग, परवा दाताचा रंग, तेरवा अजुन कशाचा तरी रंग...
अर्रर्रर्र नकोच ते! फेबु सोडावंच कि काय? फेबुचं म्हणजे कसं आहे ना.. एखाद्या जाहिरातीवर चुकून एखाद दोन सेकंद रेंगाळलं तर जे भडीमार सुरु होतो कि बास. यंटमपणा नुसता. म्हणजे एखाद्याने बघितली चुकून रद्दीची जाहिरात तर त्याला काय सतत रद्दी दाखवायची? किती तो झेंडुपणा!
ह्या फेबुपायी एक दिवस ना....
एकंदर काय तर भुवया रंगवायचा रंग पाहून असे काहीबाही विचार येत आहेत. ते असो. बाकी अश्याच नवनविन जाहिरातींच्या माहितीसाठी वाचत रहा फेबु माझा!
#फेबु_नको_पण_जाहिराती_आवरा
#माझी_म्युनिक_डायरी
सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२
हक्काचा जुगाड
आज दुपारी पोळ्या करायच्या म्हणुन डब्यातून कणिक काढायला कपाटाचं दार उघडलं अन पोळ्या लाटायचा अमंळ कंटाळाच आला. किराणा सामानात मागवलेल्या हक्का नूडल्सकडे लक्ष गेलं अन आला पोळ्या लाटायचा कंटाळा! जे आहे ते असं आहे.
इतके दिवस ते हक्का नूडल्स फारच कोरडे होतात म्हणुन त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं होत पण आज म्हणलं इनका कुछ ना कुछ तो कराना पडेगा. तसं आज सोपा सोपा पिठलं पोळीचा बेत करणार होते पण आता हक्का नुडल्सनी हक्काने हाक मारल्यावर मी माझा हक्क.. हट्ट सोडला!
पण मग नूडल्स कोरडे तर खायचे नव्हते म्हणुन ह्यांना म्हणाले शेंगुळे करतात तशी पाण्याला फोडणी देते खमंग आणि त्यात नूडल्स टाकते तर "काय??" असा आश्चर्यमिश्रित प्रश्न आला. शेंगुळे म्हणजे नूडल्सच कि हो. पण नाही, माझ्या सर्जशीलतेवर विश्वासच नाही मुळी. कसा असेल विश्वास म्हणा; इतक्या वर्षांपासुन माझ्या हातचं जेवतोय! ते असोच.
इथं विषय नूडल्सचा चालु होता आणि उगीचच मला चिडवायला म्हणे आज तुझ्या त्या साऊथ कोरियाची फुटबॉल मॅच आहे. मी अधुनमधुन कोरियन सिरीज बघत असते म्हणुन माझं साऊथ कोरिया! कोरिया वरून कोरियन सिरीज आणि त्यावरुन त्या सिरीजमध्ये दिसणारे त्यांचे अन्नपदार्थ! माझी गाडी तिथपर्यंत कधी पोहोचली माझं मलाच कळलं नाही. खरोखर त्यांच्या सिरीजमध्ये दिसणारे त्यांचे अस्सल पारंपारिक पदार्थ पाहुन छान वाटतं; त्यांची खाद्यसंस्कृती ते चांगल्या प्रकारे जगासमोर आणत आहेत. विषय भरकटतोय. कोरियन सिरीजविषयी पुन्हा कधी तरी.
तर, मी लगेच जाहीर केलं "आता ठरलं, मी हक्का नुडल्स वापरुन कोरियन पाककृती करणार!" असं म्हंटल खरं पण सगळं साहित्य आणणार कुठून आयत्या वेळेला? म्हणुन मग मी पुढची घोषणा केली कि "मी चायनीज जिन्नस वापरुन कोरियन नूडल्स करणार!" तर ह्यांचं लगेच "घरात जर्मन पदार्थांचं साहित्यही असेल, तेही वापर बरंका!!" टोमणे कळतात हो!! पुढे वाद वाढवायची खुमखुमी आली होती कि "जर्मन साहित्य ना.. वापरते ना.. म्हणजे काय वापरणारच .. किंबहुना वापरलेच म्हणून समज .." पण वेळेअभावी ती पुढे ढकलली.
ह्या सगळ्या भारतीय, कोरियन, चायनीज आणि जर्मन साहित्य आणि पदार्थांमुळे भंजाळले ना मी! पण पोटात कावळे कोकलायला लागल्यावर पटकन घरत ज्या काही २-४ भाज्या होत्या; गाजर, ब्रोकोली, झुकिनी आणि कांदा, त्या मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या. तोपर्यंत पॅन छान तापलं होतं. त्यात थोड्या तेलावर ह्या सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर छान परतून घेतल्या. भाज्या अश्या परतायच्या कि त्यांचा करकरीतपण टिकुन राहिला पाहिजे. भाज्या बाजूला काढुन त्याच पॅनमध्ये थोड्या तेलात हिरवी मिरची आणि लसणाचा खर्डा, बारीक चिरलेलं आलं परतलं. त्यात पाणी, थोडा सोया आणि शेजवान सॉस घातला. मीठ चवीपुरतं. पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात हक्का नुडल्स टाकले. नुडल्स छान शिजत आले कि गॅस बंद. तर अश्या रितीने हा चारदेशीय साहित्यातला जुगाडू पदार्थ तयार झालेला असतो.
त्यानंतर अजिबात वेळ न दवडता एका बोलमध्ये मस्त नुडल्स, भरपुर सुप आणि त्यावर परतलेल्या भाज्या घेऊन, खिडकीतुन बर्फाच्छादित आल्प्सकडे बघत गरम गरम ओरपायचे! बाकी त्याची चव नक्की कोणत्या देशातल्या पदार्थाची लागतीये ह्याचा फार विचार नाही करायचा. तसंही इथल्या कडाक्याच्या थंडीत असे हे झणझणीत गरम गरम पदार्थ चवदारच लागतात!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
#माझी_म्युनिक_डायरी
रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२
मनोरंजन
ईथल्या मेट्रोमध्ये फिरताना माझं मनोरंजन झालं नाही असं क्वचितच होतं. आता आजचंच बघा ना!
ट्रेनमध्ये बसत नाही तोच धाड घालायला आल्यासारखं ७-८ लोकांचं टोळकं तिकीट चेक करायला आलं. माझ्या काटकोनातल्या सीटवर एक जोडपं त्यांच्या श्वानावर प्रेमाचा वर्षाव करत होतं. काकुंनी मास्क लावलेला नव्हता.
एक तिकिटाचेकर काकु त्यांच्याजवळ आल्या आणि मानभावीपणे म्हणाल्या “तिकीट दाखवा, मास्क लावा आणि जरा तुमच्या कुत्र्याला आवरा!”
कुत्र्याला आवरा!! जर्मन असुन हि भाषा? मी तर बुचकळ्यातच पडले. इथल्या लोकांचं श्वानप्रेम पुर्ण ब्रम्हांडात प्रसिद्ध आहे!
ते वाक्य ऐकून मास्क न लावलेल्या काकुंच्या डोक्यात तिडीक गेली बहुदा. त्यांनी जे सुरु केलं “कुत्र्याला यावर काय? हं? अंगावर आला का तुमच्या कि चावा घेतला तुमचा? फिरतोय जरा इकडे तिकडे तर काय अडचण आहे तुम्हाला? आणि मास्कचं म्हणाल तर आताच आले मी ट्रेनमध्ये लावते ना. एवढी काय घाई आहे? मला कोरोना आहे का? हं? हे घ्या तिकीट. करा एकदाचं चेक!“
हे ऐकुन तिकीर चेकर काकुंचा पारा चढला, त्या तिरीमिरीत म्हणाल्या “तुमच्या नवऱ्याने मास्क लावलाय अन तुम्ही तश्याच फिरताय मेट्रोमध्ये. तुमच्या कुत्र्यामुळे लोकांना त्रास होतोय त्याचं काय? तिकीटही उद्या संपतय तुमचं! बेजाबदार नागरीक नुसते!“
माझं आपलं घेणं ना देणं अन फुकटचं कंदिल लावणं “हं असंच पाहिजे!“
तिकीट चेकर काकूंचं बोलणं ऐकुन श्वानप्रेमी काकु चवताळल्या “हि मेट्रो आहे तुमचं घर नाहीये. मला तुम्ही शिकवायची गरज नाहीये सांगुन त्ये ठेवते. माझं श्वान आहे ते, कुत्रं नाही! तिकिटं बघितले ना आमचे तुम्ही, निघा आता!“
तिकिटचेकर काकु रागाने थरथरत होत्या. त्या चिडुन म्हणाल्या “हो हो चालले आहे. तुमच्यासारख्या बेजबाबदार बाईशी बोलायची माझीही ईच्छा नाहीच्चे!” एव्हाना श्वानप्रेमी काकुंचं श्वानहि गुरगुरायला लागलं होतं.
मला वाटलं आता बाचाबाची, हाणामारी, झिंज्या उपटणे इत्यादी ह्याची देही ह्याची डोळा म्युनिकमधल्या बायकांचं बघायला मिळेल पण....
श्वानप्रेमी काकुंच्या नवऱ्याने त्यांना आणि तिकिटाचेकर काकूंच्या टोळक्याने त्यांना आवरल्यामुळे पुढच्या मनोरंजनास मी मुकले!
#माझी_म्युनिक_डायरी
रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२
कोळी
इथले वर्तमानपत्र वाचल्यावर आपल्याकडचा संध्यानंद वाचल्यासारखा वाटतो कधी कधी. मागे #कोंबडा होता आणि आज काय तर म्हणे #कोळी!
इथल्या लोकांना कुत्रे मांजरी सोडुन दुसरे प्राणी माहीतच नाहीयेत बहुतेक. आपल्याला जसं लहानपणापासुन घरात पाली, कोळी, लहानसहान किडे बघायची सवय आहे तसं इथं फक्त कुत्रे मांजरी बघुन मोठे होतात वाटतं मुलं!
तर बातमी अशी आहे कि एका काकुंनी म्हणे कारमध्ये कोळी घुसल्याच्या शंकेवरून पोलिसांना बोलावलं! इथे साधारणपणे कोणी शेजाऱ्यांच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून, तर कोणी चोरांच्या भीतीने पोलिसांना बोलवतात, पण कोळी दिसला म्हणुन पोलिस? अरे कुठे नेऊन ठेवलीये पाल?
तर, त्या काकूंना वाटलं कि एक मोठ्ठाच्या मोठ्ठा कोळी त्यांच्या कारमध्ये आलाय जेणेकरून त्यांना कार चालवणं शक्यच झालं नाही. का? तर त्यांना कोळी भयाने ग्रासलेलं होतं म्हणे! कोळीमाणुस नावाचा चित्रपट कसा बघितला असेल मग काकूंनी? स्पायडरमॅन हो!
पोलिसांनी पण डोक्यावर पडल्यागत मोठठया कोळ्याला पकडायला मोठ्ठ सर्च ऑपरेशन लॉंच केलं म्हणे. एवढं करून कोळी सापडला नाहीच. कोहळ्याचा नावाखाली आवळाही मिळाला नाही! मला प्रश्न पडायचाच कि इथले पोलिस नक्की काय काम करतात!
बरं अश्या टरकेश्वर लोकांची संख्या बरीच असावी कारण ह्यापुर्वीही घरात, बाथरूम मध्ये कोळी आहे म्हणुन लोकांनी पोलिसांना बोलावलं आहे म्हणे! उद्या ह्यांना पाल दिसली तर घरातल्या भिंतीवर मगर आहे म्हणुन पोलिसांना बोलावतील कदाचित.
मलाही खिडकीच्या काचेवर मोठे डास दिसतात, मधमाशी, लेडीबग्ज, भुंगे, माश्या थेट घरात येतात तर पोलिसांना बोलावुन बघुच म्हणलं एकदा! हाय काय अन नाय काय.
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
#माझी_म्युनिक_डायरी
शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२
आग्रह
आज काही कामानिमित्त शहरापासुन थोडं लांब जावं लागलं. तिथलं काम आटपुन परत जवळच्या बस थांब्यावर आले. शेवटचा बस थांबा असल्यामुळे बस उभीच होती. आत जाऊन बसले तर चिटपाखरू नव्हतं, ना बस मध्ये ना बाहेर!
मला वाटलं चालक दादा गेले सुट्टा मारायला. पण नाही.. दादा बस पुसत होते. बस निघायला साधारण ५-७ मिनिट बाकी होते, तेवढ्यात चालक दादांनी पटापट बस पुसली, आत येऊन झाडुन काढायला लागले.
मी बसले होते तिथे येऊन म्हणाले “जरा पाय बाजुला घेता का? मी स्वच्छ करून घेतो.” मी म्हणलं माफ करा मी बाहेर जाते. तर म्हणाले “नाही हो बसा. फार काही कचरा नाहीये पण मी आपला स्वच्छ करत असतो ह्या थांब्यावर. जरा वेळ मिळतो!“ मला अश्या लोकांचं फार कौतुक वाटतं!
तेवढ्यात एक सत्तरीतल्या काकु बसमध्ये चढल्या. रोजची ठरलेली बस असावी बहुदा त्यांची कारण चालक दादा आणि त्यांनी एकमेकांना नमस्कार वगैरे केला! इथे नमस्कार करत नाहीत पण तत्समच काहीतरी म्हणतात एकमेकांना.
चालक दादाची झाडझुड झाली आणि ते काकुंना म्हणाले “आज पण मास्क घरीच विसरल्या वाटतं?” त्या कसनुसं हसत हो म्हणाल्या. दादानी पटकन केबिनमधुन मास्कचा बॉक्स आणला आणि एक मास्क काकुंना दिला.
नंतर माझ्याजवळ बॉक्स आणुन म्हणाले “घ्या एक मास्क!” मी सर्जिकल मास्क लावला होता म्हणुन म्हणाले “नको, मी लावलाय कि मास्क!“
तर, दादा “अहो घ्या हो. काही होत नाही!”
मी “अहो पण दादा आहे कि मास्क मी लावलेला अजुन कशाला?”
दादा “अहो, हा N95 आहे. तुम्ही लावलाय तसा नाहीये. घ्या!”
मी मनातच “अरेच्या! बसमध्ये इन मिन तीन माणसं, त्यात कोरोना आहे कि नाही अशी शंका यावी, असं वातावरण! जर्मन सरकारने बस आणि मेट्रोमध्ये मास्कसक्ती लागु केलेली असली तरी मास्कचा आग्रह? तेही एक मास्क लावलेला असताना? भैय्या आप ठीक तो हो ना? मास्कचा आग्रह कुणी करतं का दादा?“
मागे ऑगस्टमध्ये छ. संभाजीनगरमध्ये जेव्हा पार सराफा, पानदरिब्यापासून ते गुलमंडी, औरंगपूरा ते समर्थनगर पर्यंत मी मास्क लावुन फिरत होते तेव्हा लोक माझ्याकडे मी परग्रहवासी असल्यासारखं बघत होते आणि इथे हा दादा मला मास्कचा आग्रह करतोय! डोळेच भरून आले हो. असो.
तर, दादाने फारच आग्रह केल्यामुळे शेवटी घेतला एक मास्क मी!इतका आग्रह केल्यावर त्याच्या आग्रहाला मान द्यायला नको का? आधीच म्युनिकमध्ये कोणी कशाचा आग्रह करत नाही. दादा एवढा मास्कचा आग्रह करतोच आहे तर घ्यावा म्हणलं एक मास्क मा बा का जा?
मास्क बघितला तर बदकतोंड्या होता! मी पटकन म्हणाले अरे हा तर बदकतोंड्या मास्क.. अजितदादा वापरतात कि... अगदी तस्साच! पण दादाला मराठी कळत नसल्यामुळे ते काही न बोलता बस चालवायला निघुन गेले!
आता अजितदादा कोण ते विचारू नका, आपलं लिखाण #अराजकीय असतंय बरं का!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
#माझी_म्युनिक_डायरी
वाचकांना आवडलेले काही
-
त्यादिवशी लेकाला शाळेतून आणायला निघाले होते आणि दार उघडलं तर खाली एक चिठ्ठी दिसली. FB आणि WA चा जमान्यात दारात चिठ्ठी म्हणजे एकतर कोणाला ...
-
मागचे चार पाच महीने कसे गेले कळलंच नाही. दोन्ही आई बाबा सोबतचा वेळ कापरासारखा पटकन उडुन गेला. आमचे चिरंजीव तर "सातवे आसमान में" म...