शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

बकरा

सर्दी झाली म्हणून तुम्ही जवळच असलेल्या नेहमीच्या क्लीनिकमध्ये जाण्याचं ठरवता. तुम्हाला चक्क दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट मिळते, चमत्कारच म्हणायचा!!

अपॉइंटमेंट रात्री ५:४५ ची असते. हो ह्या दिवसात इथे ५ वाजताच गुडूप अंधार पडतो. तर, तुम्ही भयानक थंडीत कुडकुडत क्लीनिकमध्ये पोहोचता. तिथे पोहोचताच तुमच्या लक्षात येतं की ह्या लोकांची क्लीनिक बंद करायची तयारी चालु आहे. पेंगुळलेली रिसेप्शनिस्ट तुम्हाला बघातच आनंदी होते! तिचा आनंद बघून तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते! हो ना, गेल्या कित्येक वर्षात तिच्या चेहऱ्यावर तुम्ही साधं स्मितहास्यही पाहिलेलं नसतं! 

ती तुमच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात करते..  कोरोना लस घेतली आहे का? कधी घेतलीये? दुसरा डोस कधी घेतला होता? तुम्ही मनातच “अगं जरा दम खा की बया!!” तुम्ही तिला सगळं व्यवस्थीत सांगता की लसीकरण झालंय, दुसरा डोस जूनमध्ये कधीतरी घेतलाय वगैरे वगैरे!

तुमची उत्तरं ऐकताच तिचे डोळे चमकतात जसं काही तिला बकरा सापडलाय आणि ते बघून तुमची खात्री पटते की दाल में कुछ काला है! ती तुम्हाला चमकत्या डोळ्यांनी विचारते “बुस्टर डोस घेणार का? तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. आपण लगेच देऊ!“ 

“अगं लबाड, असं आहे तर! किती गोड गोड वागतेस गं. अर्रे काय खवा आहे का? बूस्टर घेते का म्हणे? काय मनाची तयारी असते का नाही? आलं क्लीनिकमध्ये की घ्या लस, असं असतंय का कुठं? आणि काय गं सटवे, ६-८ महिन्यांपूर्वी पहिल्या डोससाठी मी जेव्हा तुमच्या क्लीनिकचे उंबरे झिजवत होते तेव्हा तु मला हिंग लावुन विचारत नव्हतीस ते, हं! बुस्टर घे म्हणे, हरबरी मेली!” मनातच हं!!

तेवढ्यात डॉक्टर ताई येऊन तुम्हाला केबिनमध्ये घेऊन जातात. हो, इथे डॉक्टर स्वतः बाहेर येऊन पेशंटला बोलवतात! केबिनमध्ये गेल्यावर नुसती सर्दी झालीये तरी डॉक्टर ताई तुम्हाला अमुक  तपासणी करून घे, तमुक तपासणी करून घे सांगतात आणि लगोलग त्या तपासण्यांसाठी तुमच्या हातातून भसाभसा तीन ट्यूब रक्त काढतात! यन्टमसारखं प्रत्येक तपासणीसाठी भसकन वेगळं रक्त! उद्या १०-१५ तपासण्यांसाठी बाटलीभर रक्त काढतील!!

मग डॉक्टर ताई तुम्हाला रिग्ग्यात घेतात. पुन्हा तेच सवाल जवाब. 

डॉ: कोरोना लस घेतली का? 

मी: हो 

डॉ: किती डोस झाले?

मी: दोन 

डॉ: दुसरा कधी झाला?

मी: जूनमध्ये कधीतरी!

डॉ: आता आलीच आहेस तर बूस्टर डोस घेऊनच टाक. 

मी: (अर्रे काय संक्रांतीचं हळदीकुंकू आणि वाण आहे का ते की आलीच आहेस तर घेऊन जा!) आज नको, मी येते ना नंतर!

डॉ: आता कुठे नंतर येते, पुन्हा क्रिसमसच्या सुट्या सुरु होतील. आता घेऊनच टाक. 

मी: (मुझे बक्ष दो आज) नाही पण मी ते वॅक्सीन पासबुक नाही आणलं!

डॉ: पुढच्या वेळी आलीस की अपडेट करू ते, काही होत नसतंय!

मी: (नका हो नका डॉक्टर असा आग्रह करू.. लस आहे ती.. पाणिपुरीची प्लेट नाही!)  मला माझ्या दुसऱ्या डोसची नक्की तारीखच आठवत नाहीये ना. 

डॉ: अगं पाच महिन्यानंतर चालतंय बूस्टर घ्यायला, काही होत नसतंय!

मी: (हे भगवान..) मी मागचे दोन डोस ऍस्ट्राचे घेतले आहेत ना, आता हे बियॉंटेक कसं चालेल?

डॉ: अगं चालतंय चालतंय, काही होत नसतंय!

मी: (नहीं ये नहीं हो सकता!) पण मी येते ना नंतर.

डॉ: अगं घेऊनच जा आता, मी बाहेर रिसेप्शनला सांगते. जरा हात दुखेल, ताप येईल, थकवा येईल, बरं का!! 

मी: (अन म्हणे काही होत नसतंय) हं!

तुम्हाला वाटतं आता बाहेरून ३-४ लोक येऊन तुम्हाला उचलुन नेतील आणि बळजबरी लस देतील कारण आता तेव्हढंच बाकी राहिलेलं असतं! साधी अपॉइंटमेंट मिळायला मारामार असलेल्या ह्या क्लीनिकमध्ये चक्क तुम्हाला लस घेण्यासाठी आग्रह होतोय! बस यही दिन देखना बाकी था! 

शेवटी तुम्ही विचार करता की आज ना उद्या बूस्टर डोस घ्यावा लागणारच आहे तर ह्यांच्या आग्रहाला मान देऊन घेऊनच टाकु. हाय काय अन नाय काय! तुम्ही “हो” म्हणताच डॉक्टर ताई आणि रिसेप्शनिस्ट ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. त्यांनी तुम्हांला बकरा बनवलेलंच असतं! 

पटापटा तिथली एक नर्स तुमच्या भसाभसा रक्त काढलेल्या हाताच्या दंडाला लस टोचते आणि हसतमुख चेहऱ्याने तुम्हाला सही करायला एक फॉर्म आणून देते ज्यावर लिहिलेलं असतं की “मी माझ्या इच्छेने लस घेत आहे!” 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्युनिक_डायरी 


बुधवार, १ डिसेंबर, २०२१

भयकथा

गेले आठ दिवस मला फक्त कोल्हेकुई, दारांचं करकरणे,कोणाच्या तरी चालण्याचा आवाज, कोणाच्या तरी भयव्याकुळ किंकाळ्या, कुठेतरी कोणीतरी खुसफूस करतंय, हे आणि असेच भयानक आवाज येत आहेत. घरात सतत कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेऊन आहे असं वाटतंय. 

रात्री डोळ्याला डोळा नाही. चित्रविचित्र स्वप्न पडत आहेत. अचानक घाबरून उठतेय मी. लहानपणापासून पाहिलेल्या प्रत्येक भयपटाची आठवण येते आहे. सतत भयंकर पार्श्वसंगीत ऐकू येतंय. 

बरेच वर्ष झाले हे असे आवाज आले नव्हते खरं. पण गेल्या आठ दिवसांपासून अक्षरशः रोज संध्याकाळपासून सुरु होणारे हे भयपटाचं पार्श्वसंगीत रात्री झोपेपर्यंत माझ्या मागावर असल्यासारखं सतत चालू आहे. 

रामसे बंधू पासून राम गोपाल वर्मा पर्यंतच्या आणि “रात” सिनेमातल्या रेवती पासून ते तात्या विंचू पर्यंत प्रत्येकाची आठवण काढून झाली. बाबो, पण “रात” बघून खरंच यन्टमसारखी फाटली होती तेव्हा, काहीही म्हणा! नारायण धारप व रत्नाकर मतकरींची आतापर्यंत वाचलेली प्रत्येक कादंबरी डोळ्यासमोर आली आणि डोळ्यांसमोर काजवे चमकले!! 

मग म्हणलं फार झालं च्यामारी.. झोपेचं खोबरं झालंय.. डोक्याला शांतता म्हणुन नाहीये.. काय लावलीये सतत कोल्हेकुई, दारं करकरणे, पायांचा आवाज!! 

शेवटी नवटीनेजरला विचारलंच मी.. अरे मेरे लाल, कधी सबमीट करायचा आहे तुझा हॉरर म्युझिक पीसचा प्रोजेक्ट तुला?? इथं माझी भीतीने गाळण उडतीये रोजची. तर म्हणाला “ आई चिल, करतोय मी उद्या प्रेझेंट!” चिल म्हणे, ईथे थंडीने जीव घेतलाय आणि अजुन कुठे चिल करू?  नाही नाही.. #सापळा नाही आलाय परत खिडकीत. 

तर पॉईंटचा मुद्दा असा आहे की चिरंजीवांना त्यांच्या संगीत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिलाय की भयपटातील एखादा प्रसंग लिहुन  त्यासाठी स्वतः म्युझिक पीस तयार करून ते वर्गात प्रेझेंट करा! 

बरं, सारखं आपलं “आई, हे कसं वाटतंय? ऐक, ते कसं वाटतंय? ऐक!” त्याला म्हणलं “अरे बाबाला घाबरव की थोडं!“ पण त्याला चांगलंच माहीत आहे की हे होम ऑफिसवाले त्यांच्या कामामुळेच ईतके वैतागलेले असतात की भुतंखेतं आले तरी ते त्यांना मीटिंगला बसवतील त्यामुळे तेही टरकून असतील! 

पोरगं शाळेतून आलं की जे जोरजोरात हॉरर म्युझिक वाजवत बसतंय की बस्स! तरी बरं हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे दारं खिडक्या गच्च बंद असतात नाहीतर आठ दिवसांपासून चाललेलं हे भयसंगीत मॅगी काकूंनी ऐकलं असतं तर आम्हाला आजच घर सोडावं लागलं असतं! 

कारण माझ्यासाठी मॅगी काकू म्हणजे नेहमीच “भय इथले संपत नाही!“ 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्युनिक_डायरी

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

सर्जिकल स्ट्राईक

घरातून बाहेर पडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे नियम न वाचता, पटकन जो सापडला तो मास्क तोंडावर चढवलेला असतो आणि जेव्हा अख्ख्या होल ट्रेनमध्ये सगळ्यांनी ffp2 मास्कस घातलेले असतात आणि तुम्ही सर्जिकल मास्क, तेव्हा जाणीव होते की तुम्ही “मास्क दाखवुन अवलक्षण" सदरात मोडत आहात!

आता तुमचे डोळे फक्त आणि फक्त सर्जिकल मास्क लावलेल्या समदुःखी माणसाला शोधत असतात. कारण जर का एखाद्या तिकीट चेकरने ”सर्जिकल स्ट्राईक" केला तर तुम्हाला मास्क दाखवायलाही जागा उरणार नाही, हे तुम्ही जाणुन असता. तसंही आजकाल तोंड दिसतच नाही म्हणा मास्कमुळे!

तुम्ही प्रचंड तणावात असता त्यामुळे नेहमीप्रमाणे तुम्हाला काहीबाही डायलॉग सुचायला लागतात “ ह्ये साला... क्या ईस ट्रेन में एक भी माई का लाल/लाली नहीं हैं जिसने सर्जिकल मास्क पहना हो? हांय?” तिकीट चेकर येऊन तुम्हाला “ जाओ पहले उस आदमी  या औरत को ढुंढ के लाओ जिसने सर्जिकल मास्क पहना हो, तभी मैं तुम्हारी सजा माफ करुंगा!” म्हणेल असं तुम्हाला वाटायला लागतं!  

आणि अचानक एका स्टेशनला एक ललना तुम्हाला दिसते जिने सर्जिकल मास्क लावलेला असतो, पण हाय रे कर्मा, ती ललना तुम्ही बसलेल्या ट्रेनमध्ये चढतच नाही!

आता पुन्हा तुम्ही सर्जिकल मास्क लावलेली एखादी तरी व्यक्ती दिसेल म्हणुन या आशेने अख्खी ट्रेन पिंजुन काढता! तुमच्या ह्या ट्रेन पालथी घालायच्या उद्योगामुळे म्हणजे ट्रेनच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उगीचंच चक्कर टाकण्यामुळे, ट्रेनमधले लोक तुमच्याकडे त्याच नजरेने बघतात! त्याच त्या.. ”कौन है लोग? कहाँ से आते है लोग? वगैरे वगैरे!

शेवटी तुमचे इप्सित स्टेशन येते, तिथे तुम्ही मैत्रिणीला भेटता (जिने ffp2 मास्क घातला आहे). गप्पा वगैरे मारून, कामं धाम करून तुम्ही परतीचा प्रवास सुरु करता. पुन्हा ये रे माझ्या मास्कल्या! आता जर तिकीट चेकर आले तर त्यांना काय काय कारणं सांगता येतील त्याची तुम्ही मनोमन उजळणी आणि देवाचा धावा करायला लागता. 

शेवटी तुमचं स्टेशन येतं आणि तुमचा मास्कला टांगलेला जीव भांड्यात पडतो आणि अश्या रितीने जाऊन येऊन एक तास आणि चार ट्रेन्सचा प्रवास तुम्ही सर्जिकल मास्कमुळे न झालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या दहशतीत घालवलेला असतो. 

तुम्ही तुमच्या घराजवळच्या स्टेशनला उतरतंच असता की तेवढ्यात तुम्हाला समोर एक सर्जिकल मास्क लावलेल्या काकु दिसतात ज्या तुम्ही उतरताच ट्रेनमध्ये चढतात आणि एक वर्तुळ पूर्ण होतं!

घरी येता येता तुमच्या लक्षात येतं की कालच मॅगी काकु कोरोना आकड्यांविषयी उदबत्ती लावत होत्या तेव्हाच तुम्ही नवीन नियम वाचायचे ठरवलेले असतात पण वाचलेले नसतात! 

आता मॅगी काकुंच्या उदबत्ती विषयी उद्या!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक  

#माझी_म्युनिक_डायरी 

#मुडदा_बशिवला_त्या_कोरोनाचा


शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

इपितर

मी जेव्हा जेव्हा कुठे बाहेर जाते तेव्हा तेव्हा इथल्या मेट्रोमध्ये किंवा स्टेशनवर काहीतरी भन्नाट अनुभव येतात. 

मागच्या शनिवारी आम्ही दोघे कामानिमित्त बाहेर निघालो होतो. शनिवार असल्यामुळे स्टेशनवर जरा गर्दी होती. ट्रेनमध्येहि गर्दी असल्यामुळे आम्ही दाराजवळच उभे राहिलो कारण आम्हाला ३ स्टेशन्सनंतर उत्तरायचंच होतं. आमच्या स्टेशनच्या पुढचा स्टेशनवर एक ताई तिच्या लेकराला प्राममधे घेऊन दारातून आत आली रे आली की त्या दिवट्याने फटकन माझ्या हातावर फटका मारला ना! 

 अरेच्या! मला काही समजलंच नाही एक सेकंद. मागच्या जन्मी मी नक्कीच त्याचं काहीतरी घोडं मारलेलं असणार. कारण मी दिसले रे दिसले की त्या इपितरनं माझ्या हातावर फटका मारला!! एव्हाना मी सोडून आजूबाजूचे सगळे हसायला लागले होते.. हो हो, त्या हसणाऱ्यांमध्ये आमचे "हे" सुद्धा सामील होते बरं! मग काय? मी ही हसले, काय करणार? नक्की कोणते भाव चेहऱ्यावर दाखवावे हेच कळत नसल्यामुळे हसले मी. लेकिन ये मेरे साथ ही क्यूँ होता है? 

ती ताई बिचारी ओशाळली. त्या दिवट्याला जर्मनमध्ये रागवायला लागली, "अरे ती काही तुझी मावशी नाहीये, वेगळी बाई आहे! असं मारत असतात का? हं? घरी चल बघतेच तुला!" वगैरे वगैरे! तर ते इपितर माझ्याचकडे बघत होतं. मला वाटलं मारतय पुन्हा मला. मी त्या ताईचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत होते, नक्की काय म्हणतेय ती त्या लेकराला! तिला वाटायचं की ह्या बाईला जर्मन कळत नाही तर घ्या बोलुन.. पण नेमकं आम्हाला पुढच्या स्टेशनला उतरावं लागलं! ट्रेनच्या बाहेर पडलो तर हे म्हणाले "तु सोबत असलीस की वेळ मजेत जातो!!" अरे इनका ऑफिस शुरू करो रे जल्दी कोई!! वेळ मजेत जातो म्हणे! 

कालचा किस्सा तर कहर आहे! 

काल संध्याकाळी मैत्रिणीकडे गेले होते. येतांना वरच्या मेट्रोतुन उतरून, खाली अंडरग्राउंड मेट्रोच्या स्टेशनला आले. ट्रेन यायला ५ मिनिट होते. मी तिथल्या खुर्चीवर बसले. माझ्या बाजूला एक देसी बाबु पूर्णपणे मोबाईलमध्ये गुंग होता. नक्कीच गफ(गर्लफ्रेंड हो) बरोबर गप्पा चालू असणार किंवा फेबुवर किंवा इन्स्टावर.. जाऊदे आपल्याला काय करायचंय? उगी आपलं घेणं ना देणं अन फुकटचं कंदील लावणं! 

बरोब्बर ४ मिनिटांनी विरुद्ध दिशेला जाणारी ट्रेन मागच्या बाजूला आली. अचानक अंगात वारं शिरल्यागत देसी बाबु उठून त्या ट्रेनच्या दिशेने पळाला! मला वाटलं ह्या यन्टमला जायचं तिकडच्या ट्रेनमध्ये होतं आणि बसलं इकडच्या ट्रेनसमोर. तेव्हढ्यात माझीही ट्रेन आली म्हणुन मी आत गेले आणि बघते तर देसी बाबु तिकडच्या ट्रेनचं दार बंद होतांना त्या दाराच्या फटीतुन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. कसबसं त्याला बाहेर पडता आलं आणि तो ह्या ट्रेनच्या दिशेने धावत सुटला... मनात म्हंटलं, अरे काय डोकं बिकं फिरलंय का काय लका? असं काहून भंजाळल्यागत करून ह्रायला रे भाऊ? 

हसू आवारेचना मला! अगदी ख्या ख्या ख्या. तरी बरं मास्क होता तोंडावर. 

आता माझ्या ट्रेनचं दार लागायला लागलं. मला वाटलं आता हे येडं त्या काडी सिंघम सारखं करतं का काय? पण त्याच्या नशिबाने त्याला ह्या ट्रेनमध्ये घुसता आलं! मी दारातच उभी होते. देसी बाबु हपापत माझ्या समोरच येऊन उभा राहिला. माझं अगदी मास्कशी आलं होतं की त्याला म्हणावं "अरे ईधर उधर क्या देख रहे हो? उधर ईधर देखों, उधर इधर !" (अंदाज अपना अपना अगणित वेळा बघितल्याचा परिणाम!) पण त्याची परिस्थिती बघुन मी मास्क आवरला! 

तेवढ्यात देसी बाबुचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्याच्या लक्षात आलं की ह्या ताई पण देसीच असाव्यात. त्याच्या हेही लक्षात आलं की मला त्याचा हा "जाना था जापान पोहोंच गये चीन!" एपिसोड कळला आहे. मास्क आडून तो कसनुसं हसला असावा. एवढी स्वतःची फजिती होऊनही मला पाहिल्यावर त्याने ट्रेनच्या खिडकीच्या काचेत बघून स्वतःचे केस नीट केले आणि पुढच्या स्टेशनला मी उतरताना मला बाय सुद्धा म्हणाला.. #Men_will_be_men

काय इपितर लोक असतात राव एक एक!! 


#माझी_म्युनिक_डायरी 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

खुन्नस

आज जवळच्या दुकानात गेले होते. बिलिंगच्या रांगेत दोन पंचाहत्तरीचे काका माझ्या पुढे. मला वाटलं ते मित्रच आहेत पण अचानक सगळ्यांत पुढे उभे असलेले काका माझ्या पुढे उभ्या असलेल्या काकांवर उचकले ना! जर्मनमधे त्यांनी शाब्दिक बाण सोडायला सुरुवात केली. 

एकदम पुढचे काका “अहो काय तुम्ही? काही सोशल डिस्टंसिंग वगैरे आहे की नाही हं? कोरोना का मेलाय का? लांब उभे रहा ना जरा. लस घेतली, मास्क लावला की संपलं का सगळं? अजुनही आहे सोशल डिस्टंसिंगचा नियम लागू! हे हे खाली बघा. दिड दिड मीटरवर पट्ट्या लावलेल्या आहेत ना.. असे कसे तुम्ही इतके पुढे  आलात!”

माझ्या पुढचे बिचारे काका त्यानी जे सामान घेतलंय त्यासाठी होणाऱ्या रकमेचे नाणे मोजत होते आणि त्या नादात चुकून थोडे पुढे गेले. एक एक सेंट मोजुन द्यायचा म्हणजे केवढं जोखमीचं काम! तरी मला शंका आली बरं, जर्मनकाका, तेही समोरच्याला उत्तर न देणारे? ये कैसे हो सकता है? एवढे शाब्दिक बाण सोसुनही स्थितप्रज्ञ! कमाल आहे! मला वाटलं त्यांची वाचा बसली की काय? का त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केलं दुसऱ्या काकांकडे? 

वाटलं, त्या सगळ्यांत पुढच्या काकांना आपणच सांगावं की जाऊद्याना काका कशापायी ताप करून घेताय? झालं तुमचं बिलिंग होईलच की आता. तुम्हीच व्हा की पुढं. इथं मी एव्हढं जड बास्केट घेऊन उभी आहे, त्यात हे काका नाणे मोजण्यात मग्न! मला भाजीपाला काउंटरवर ठेवायचा आहे. सोडा की आता! अब क्या काकाकी जान लोगे क्या? काउन खुन्नस देऊन राहिले?   

तेवढ्यात नाणे मोजणी पूर्ण झाल्याझाल्या माझ्या पुढचे काका कडाडले! “काय हो? तुम्हाला चष्मा लावुनही दिसतही नाही वाटतं मी इथे नाणी मोजतोय ते? त्यामुळे चुकून थोडं पुढे आलो असेल. त्यांत इतकी काय अडचण तुम्हांला? आणि मी काय कोरोनाग्रस्त आहे की काय हं? खोकलो का काय मी तुमच्यावर? मी लसही घेतलीये आणि व्यवस्थित मास्कही लावला आहे. तुम्ही हला की पुढे जरा. त्या बाईचं बिलिंग झालंय केव्हाच! मी खोळंबलोय, आवरा लवकर! तुम्हाला काय वाटलं मी काही बोलणारच नाही कि काय? मला काय खालच्या पट्ट्या दिसत नाहीत कि काय हं?“

अरारा खतरनाक! फराफरा आणि टराटरा!! 

एकदम पुढचे काका “जातोय ना मी! तुमच्यासारखा थोडीच आहे कोणालाही जाऊन चिकटणारा!”

बिलिंग काकू हैराण, मी परेशान! 

नाणे काका “हं निघा आता!” 

एवढं बोलुन ते थोडं पुढे सरकतील आणि मला बास्केट काउंटरवर रिकामी करता येईल असं वाटलं. पण छे! सगळ्यांत पुढच्या काकांचं बिलिंग होइपर्यंत नाणे काका एक नाही आणि दोन नाही. 

बाजूच्या काउंटरवर जावं म्हणलं तर एव्हाना त्या काउंटरवर ४-५ लोकांचं बिलिंग होऊन ते काउंटर बंदही झालं. हम जिस लाईन में खडे होते है.. तिथं गडबड झालीच पाहीजे! एकदाचं नाणे काका पुढे सरकले, त्यांनी पुन्हा दहावेळा नाणे मोजुन पैसे दिले. बिलिंग काकूनी हुश्श केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भाव “कौन है ये लोग? कहांसे आते है ये लोग? और क्यूँ आते है ये लोग?”

मॅगी काकूंच्या वयाच्या आसपासची लोकं लैच डेंजर आहेत इथं...

ता.क. : कोणीतरी नाणेबंदी करा राव इथं! हे काका काकु लोक एक एक सेंट मोजुन पैसे देतात आणि आपण असे नाणे मोजुन पैसे द्यायचा विचार जरी केला तरी, रांगेतले आपल्या मागचे लोक खाऊ की गिळू नजरेने बघतात!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्युनिक_डायरी

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

काडी सिंघम

आज किराणा सामान आणायला भारतीय दुकानात निघाले होते. मेट्रोमध्ये दाराशीच उभी राहिले कारण पुढच्याच स्टेशनवर  उतरायचं होतं. मी आत गेले आणि मेट्रोचं दार लागायला सुरुवात झाली... 

तोच धाडकन एक पाय दोन्ही दारांच्या मध्ये आला.. (डरले ना मी) लगेच दोन हात दोन्ही दरवाजांना बाजूला सरकवत होते! “बाबो.. ये हो क्या रहा है भाई” असा विचार करून मी समोर बघितलं तर समोरच्या सीटवर बसलेल्या आजोबांचा चेहरा पांढरा फट्टक पडलेला! मनात विचार आला “आजोबा कानात फुंकर मारू का? घाबरू नका”. कानात फुंकर काय कानात फुंकर? तुझ्यासहीत आजूबाजूच्यांचे चेहरेही पांढरे फट्टक पडलेत! 

खरं सांगायचं तर लोकांना वाटलं कोणीतरी हल्लेखोर वगैरे दार बळजबरी उघडतोय! त्यात मी एकटीच दारात उभी होते त्यामुळे बाकीच्या लोकांना माझीच दया आली असणार. 

दरवाजांच्या वर लाल लाईट लकलक करत होता, दरवाजा लागतानाचा आवाज येत होता आणि त्यात जोरदार शक्ती लावून एक लेडी सिंघम ट्रेनमध्ये घुसायचा प्रयत्न करत होती!

वाटलं झालं आता अडकतीये सिंघम... बरं तिला आत ओढावं असा विचार केला पण तिचे दोन्ही हात दोन दरवाजांना शक्ती लावत होते! आजूबाजूचे सगळे लोक टरकले होते. शेवटी एक जोरदार हिसका देऊन लेडी सिंघमने दार उघडुन ट्रेनमध्ये प्रवेश केला! 

तिच्याकडे निरखून बघितलं तर कळलं की ही कसची लेडी सिंघम ही तर काडी सिंघमी! एकदम सुकडी, अगदी पाप्याचं पितर (हा शब्द कुठेतरी वापरायची फार इच्छा होती बघा!) नक्की काय खातेस ग बाई? असं विचारावं म्हटलं पण ती फारच भंजाळलेली होती. 

हं तर काडी सिंघम आत आली आणि दरवाजा लागला. मला वाटलं आता काडी सिंघम एखाद्या गुंडाला बुकलून काढेल किंवा तिला कोणीतरी आजुबाजुचे अद्वातद्वा बोलतील; गेलाबाजार ट्रेनचा ड्रायव्हर येऊन भांडेल; तेव्हढाच आपला टाईमपास! पण छ्या, तसं काहीच घडलं नाही आणि माझं स्टेशन आलं. 

नाईलाजास्तव काडी सिंघमकडे एक कटाक्ष टाकून मी जड पावलांनी तिथून निघाले तर ते पाप्याचं पितर बिडी वळत होतं! मनात म्हटलं पुढच्याच स्टेशनवर उतरायचं होतं त्यासाठी केवढा खटाटोप केला काडी सिंघमने! इथले लोक ट्रेनमध्ये #चैतन्यकांडी वळायला लागले की समजुन जायचं ”अगला स्टेशन इनका है!”


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्युनिक_डायरी 






मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

गजनी

“दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम” ही म्हण माझ्याबाबतीत तंतोतंत खरी ठरली आहे! 

तर त्याचं झालं असं की दीड दोन महिन्यापूर्वी भारतात जाणार हे नक्की केलं तेव्हा पुण्यातलं घर जरा राहतं करून घ्यावं असं ठरवलं! आता आम्ही म्युनिकमध्ये अन घर पुण्यात त्यामुळे घर राहतं करून घ्यायची जबाबदारी आपसूकच सासू सासरे आणि दीर जावांवर येऊन पडली. 

तिथे आमचं सगळं सामान आम्ही एका खोलीत ठेवलं होतं आणि बाकीच्या तीन खोल्या भाड्याने दिल्या होत्या खऱ्या पण भाडेकरूने करून ठेवलेल्या करामती कळल्या आणि दोन वर्षांपूर्वी त्या बाबाला म्हणलं सोड भाऊ घर! त्यानंतर घर बंदच.  

नमनालाच घडाभर तेल झालंय. तर, सहा सात वर्षांपुर्वी मी सगळं सामान बऱ्यापैकी व्यवस्थित बांधाबांध करून ठेवलं होतं.त्या दिवशी क्लिनींग सर्विसेसला बोलवलं म्हणुन आमची सपोर्ट सिस्टीम म्हणजेच सासू सासरे दीर आणि जावा हे सगळे त्या घरात बेसिक सामान काढुन घ्यायला गेले. 

स्वयंपाक घरात लागतील म्हणून सासूबाईंनी डबेडुबे काढायला सुरुवात केली. त्यांना एक डबा जरा जास्तच जड लागला पण त्यांना वाटलं आपल्या धन्य सुनेने डब्यात डबे ठेवलेले आहेत तर ह्या डब्यात पण डबे असतील. डबा उघडून बघतात तर तो डबा बासमती तांदळाने शिगोशीग भरलेला!

लगेच मला व्हिडीओ कॉल! एका डब्यात सहा सात वर्षांपूर्वीचे बासमती तांदुळ आहेत म्हणल्यावर माझ्या जीवाचा म्युनिकमध्ये “नुसता तांदुळ तांदुळ” झाला (जीवाचं पाणी पाणी होणे वगैरे!) आणि माझा गजनी!! आता ह्याबद्दल मला सगळे विचारायला लागले आणि इकडे मी ब्लँक! मला आठवायलाच तयार नाही मी असं काही केलंय. 

पण तुम्हाला सांगते मैत्रिणींनो आणि मित्रांनो (जे मित्र वर्षाचा तांदूळ भरून त्याचा जामानिमा करतात); तांदुळ जश्याला तस्सा होता बरं! एक म्हणुन कीडा लागला नाही!! आता तुम्हांला प्रश्न पडला असेल “हे कसं शक्य आहे?” हो ना? बाकी सगळ्यांना हाच प्रश्न पडला! मलाही तोच प्रश्न पडला ना! लॉन्ग टर्म मेमरी लॉसवाला गजनी झाला माझा. त्यात भंडावून सोडणारा प्रश्न चालूच होता ”असं कसं विसरलीस पण तु?” 

शेवटी अति हिंदी सिनेमे पहिल्याचा परिणाम म्हणुन माझी तांदुळ याददाश्त कशीतरी वापस आली आणि मला आठवलं की मी त्या तांदळाला एरंडेल तेल लावून ठेवलं होतं आणि म्हणूनच तो इतकी वर्ष टकाटक राहीला! खरं तर मला तो तेव्हाच म्युनिकला आणायचा होता पण सामानाची बांधाबांध करताना मी तो डबा तसाच कुठल्या तरी गोणीत बांधून टाकला! पण ह्यावेळी तो मी म्युनिकला घेऊनही आले आणि आत्ता त्याच अप्रतिम बासमतीचा भात केला होता. 

तर सांगायचं मुद्दा असा की साठवणीच्या धान्याला एरंडेल तेल लावलं तर कीड लागत नाही आणि सामानाची बांधाबांध करताना डबेडुबे नीट बघुन बांधा हो!! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_म्यूनिक_डायरी व्हाया पुणे

मंगळवार, १३ जुलै, २०२१

जाब

 पंधरा दिवस झाले वैताग आलाय नुसता! आज ठरवलंच काहीही झालं तरी मॅगी काकूंना जाब विचारायचाच. ह्याला काय अर्थ आहे  राव; त्यांना काय तर म्हणे माझ्या घरातल्या दाराच्या आवाजाने झोप नाही आली आणि आम्ही त्यांच्या घरात चाललेल्या आवाजाच्या प्रदुषणावर साधा निषेधही नाही नोंदवायचा! ये ना चॉलबे. 

तुम्हांला वाटेल मॅगी काकु आणि ध्वनी प्रदुषण, कसं शक्यय! आहे; सगळं शक्य आहे! गेले पंधरा वीस दिवस आमच्या घरातला संवाद म्हणजे-

अगं ए आज (टर्र्र्रर्र्र्र ठाक)!

काय म्हण (ठाक ठाक ठाक) लास?

आज भा (धाडधाडधाड) जी कशाची ते (टर्रर्रर्रर्रर्रर्र)!! 

का (धाड ठाक टर्रर्रर्रर्र ) य?

डोकं बंद झालंय अक्षरशः! कशामुळे विचारताय! मॅगी काकुंनी त्यांच्या घराच्या नुतनीकरणाचं काम काढलंय!!

तर आज मी त्यांना पॅसेजमध्ये गाठलंच! सोडते की काय मी! काकु निगुतीने त्यांच्या दारासमोरचं पायपुसणं वगैरे काढुन स्वच्छता करत होत्या. 

मी: काय कश्या आहात काकु? खूप दिवस झाले भेटुन!

का: अगं हो ग! मी ह्या घराच्या कामातच आहे सध्या! तुम्ही  सगळे बरे आहात ना? (कोविड सुरु झाल्यापासुन काकु हा प्रश्न हमखास विचारतात!)

मी: हो हो ठीक आहोत!

आता मी प्रश्नांच्या फैरी झाडायला सुरूच करणार होते की “काय ताप आहे हा? किती तो आवाज! वर्क फ्रॉम होम वाल्यांना किती त्रासदायक आहे हे सगळं! आमची शुद्ध हरपायची तेव्हढी राहिली आहे! इकडच्या स्वारीच्या ऑफिसच्या मीटिंग्ज काय कमी होत्या का म्हणुन तुमच्या घरातल्या ड्रिलिंग मशीनचा आणि तोडफोडीचा आवाज सहन करायचा मी! आम्ही एकमेकांशी काय बोलतोय तेच कळत नाहीये; त्यामुळे काहीका असेना भांडणं मात्र कमी झालेत! नुसतेच थोबा.. चेहरे बघतो एकमेकांचे!! बरं नैनोकी भाषा समजायचं वयही राहिलं नाही... त्यात घराचं दार उघडलं की ह्ये एवढा मोठा पसारा. करायचं तरी काय आम्ही, हं? तुम्ही काम सुरु व्हायच्या आधीच सोसायटीला कळवलं; आता मी कम्प्लेंट करू तरी कुणाकडे?“ वगैरे वगैरे.. 

त्याआधीच 

काकु: किती भयानक आवाज आहेत ना! फारच त्रासदायक आहे हे सगळं आणि तुम्ही तर दोघे घरून काम करताय. फारच त्रास होतोय अगं मला! आणि हे बघ त्या लोकांनी काहीच स्वच्छ केलं नाहीये; मलाच करावं लागतंय! कसं सहन करावं काही कळत नाहीये बघ. तुला सांगते...

हे सगळं ऐकुन मलाच अपराधी वाटायला लागलं आणि असं वाटलं माझ्याच घरात काम चालु आहे ज्याचा त्यांना त्रास होतोय!!  त्यामुळे मी लगेच “हो हो खरंय तुमचं!” 

मनात म्हणलं “अरे ये हो क्या रहा है यार! खरंय काय खरंय? झाप की त्यांना बये."

मी: नाही म्हणजे फार त्रास होतोय आम्हाला पण!! (त्यांचं वय पाहुन मवाळच भाषा वापरली जाते; संस्कार... अन दुसरं काय!!)

हे ऐकून काकूंनी विषय ३६० अंशातून बदलला की हो!

का: तुम्ही लस घेतली का ग? कोणती घेतली?

मी: (अरेच्या)हो घेतली ना, दोन्ही डोस झाले आमचे! “ऍस्ट्रा”घेतली. 

माझं बोलणं ऐकताच काकुंच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे ”तु जिवंत कशी अजून?” घाबरले ना मी!

काकु: अगं मी ऐकलंय भयंकर त्रास होतो त्याने. मी आपली बियॉंटेक घेतली बाई! आम्हाला आमच्या डॉक्टरने ऍस्ट्रा घेऊ नका म्हणुन सांगितलं. 

मी: (आता कल्टी मारलेलीच बरी, नाहीतर मी “ऍस्ट्रा” घेतलं म्हणुन मला गिल्ट यायचा!) बरं बरं! काळजी घ्या हं, भेटु पुन्हा. 

विचार अजून जाब मॅगी काकूंना.. विचार!!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


#माझी_म्युनिक_डायरी

रविवार, ६ जून, २०२१

कृतकृत्य

महिन्याचं किराणा सामान मागवायला म्हणुन चायनमसालाची वेबसाईट उघडावी आणि अक्षरशः समोर खजिना दिसावा तसं झालं! “तिला” नजरेसमोर पाहुन तुम्ही जागच्या जागी टुणकन ऊडी मारल्यामुळे सोफ्याचा दुसऱ्या बाजुला बसलेले “हे" पण टुणकन उडावेत! (असं काहीही झालं नव्हतं, मी आपलं ऊगाच अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केलं!). पटापट खजिन्यातल्या मिळतील तेव्हढ्या गोष्टी ऑर्डर केल्या आणि वाट पहात बसलो. 

आठवडाभर आतुरतेने वाट पाहिल्यावर, शेवटी काल आम्हाला “ती" मिळाली! खरं सांगायचं तर मला आणि लेकाला ईथे आल्यापासुन अगदी मनातुन ज्या गोष्टीची आस होती “ती”मिळालीच एकदाची. कुरिअर घरात आलं आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. तर त्याचं झालं असं की जर्मनीतल्या वास्त्यव्यात अगदी पहिल्यांदा “चितळ्यांची #आंबाबर्फी” मला मिळाली! तशी ही काजु #आंबाबर्फी आहे पण चालतंय की. चव महत्वाची. आपल्यासारख्या पामर, मर्त्य मानवासाठी कृतकृत्य वाटण्याचे हेच काही क्षण!

बाकीही बराच मालमसाला घेतलाय. त्या सगळ्याचा घरच्या ग्रुपवर फोटो टाकला. खरंतर ह्यावर लिहु की नको असं वाटत होतं पण मोठे दीर म्हणाले होऊन जाऊदे ब्लॉग लिखाण आणि सासरे म्हणाले की “तु या विषयावर लिहायला काहीच हरकत नाही. आपल्या जन्मभूमीतील तयार अन्नपदार्थ मिळणे हा किती परमानंद असतो ते लिहलं पाहिजे.” म्हणुन हा लेखनप्रपंच!

सहा वर्षांपुर्वी जिथे #चितळे_बाकरवडी मिळणेही दुरापास्त होते तिथे आज महाराष्ट्रातले बरेचसे पदार्थ विनासायास मिळत आहेत. राजेश ग्लोबलचे श्री व सौ बुकशेट ह्यांच्या प्रयत्नांमुळे  मागच्या १-२ महिन्यांत आम्हांला #हापुस आणि #केसर आंबाही खायला मिळाला. नाशिकचे द्राक्षही बऱ्याच वेळा ईथल्या दुकानांत मिळतात. ईतके दिवस कधीही न दिसलेली #कैरीही जवळच्या सुपरमार्केटमध्ये मिळतेय. 

आता एकदाचा आमच्या औरंगाबादचा आप्पा हलवाई ह्यांचा पेढा,आता एकदाचा आमच्या औरंगाबादचा आप्पा हलवाई ह्यांचा पेढा, गायत्रीची कचोरी- मुगवडे, क्रांती चौकातली पावभाजी, श्रीनाथवाल्याची भेळ, हॉटेल डार्लिंगजवळची पाणीपुरी, उत्तमची जिलबी इत्यादी पदार्थ म्युनिकमध्ये मिळाले की मी संन्यास घ्यायला


#माझी_म्युनिक_डायरी


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

बुधवार, २ जून, २०२१

कैरी

व्हेन जवळचं सुपरमार्केट गिव्हज यु ब्राझीलची #कैरी देन यु हॅव टू मेक.... 

तक्कु... 

कैरी म्हणलं की आधी तक्कूच.. असतंय ते! 

एक कैरी काय मिळाली मला; लगेच माझे “राजश्रीके हसीन सपने" सुरु झालं! 

मग मी कायरस(मेथ्याम्बा.. पण आमच्याकडे कायरस म्हणतात!) म्हणु नका,ऊन वाढलं की पन्हे म्हणु नका, चटकदार कांदा-कैरी चटणी म्हणु नका, मसालेदार सखुबद्धा म्हणु नका, कैरीचं चित्रान्न म्हणु नका आणि करकरीत कैऱ्या मिळाल्या की लोणचं घातलंच म्हणुन समजा! 

अरेच्या अजुन एक सगळ्यांत महत्वाचं राहिलंच की... 

भरपुर कैऱ्या आणुन, त्या पिकवुन, छानपैकी त्या आंब्यांचा रस करून मग कोयी आणि सालपट धुतलेल्या पाण्याचा फजिता बनवला की...

ईजारमध्ये बीएमडब्ल्यू नहाली! (म्युनिकमधल्या नदीचे नाव ईजार आहे आणि ईथे घोडे दिसलेच नाहीत कधी!)

महाराष्ट्रातल्या कैरी आणि आंब्याच्या रेशिप्या पाहून पाहून इतकं डिप्रेशन आलंय म्हणुन सांगू; एक दिवस फटाफटा सगळ्या पाककृती गृप्सवरून कल्टीच मारावी म्हणते! तरी बरं कैरी मिळाली नाहीतर.... असो!

तक्कु अगदी सोप्पाय. कैरी किसून घ्यायची, आवडीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि हळद टाकायची. तेलाच्या फोडणीत मोहरी, मेथ्या टाकायच्या. गॅस बंद करून जरा चढ हिंग टाकायचा. फोडणी थंड झाली की मिश्रणात टाकायची. तक्कु तयार. २-४ दिवसात संपवायचा. फ्रिजमधे ठेवु शकता! 

#ये_बेचारी_रेसिपीज_के_बोझकी_मारी 

#माझी_म्युनिक_डायरी





वाचकांना आवडलेले काही