बुधवार, ११ मार्च, २०२०

गो कोरोना गो

जर्मनीत #कोरोना विषाणूच्या केसेस १४००-१५०० झाल्या असताना, सगळे मीडियावाले लोकांमध्ये जास्त मिसळू नका, असं करू नका, तसं करा वगैरे वगैरे कोकलत असताना, व्हाट्सऍपवर या विषाणूबाबतीत येणारे ज्ञानकण वेचताना नेमकं महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायची वेळ तुमच्यावर येते. 

तर, अंडरग्राउंड मेट्रोमध्ये सकाळच्या वेळी बऱ्यापैकी गर्दी असते. मला महत्वाच्या कामासाठी बाहेर पडावंच लागलं आज. सगळी कामं आटपून घरी येण्यासाठी स्टेशनवर आले तर आजूबाजूच्या बऱ्याच लोकांनी मास्क घातलेले. मी मास्क न घातल्यामुळे सगळे माझ्याचकडे बघत आहेत की काय? असं उगीचच वाटलं. कधी एकदा मेट्रो येतेय असं झालं. आली एकदाची मेट्रो आणि मी आत गेले. 

मेट्रोतल्या छोट्या टीव्हीवर #कोरोना विषयी जनजागरणाचा व्हिडियो नुकताच सुरु झाला होता. त्यात सांगत होते की हात नाकाला लावू नका आणि मला नाकाला खाज आली, मी नाक खाजवलं. दोन तीन टाळक्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. व्हिडीयोत सांगितलं डोळ्यांना हात लावू नका आणि माझ्या डोळ्याला खाज आली, मी डोळे चोळले. आता सात आठ टाळक्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. 

मनात फिल्मी विचार "ये हो क्या रहा है यार? अगर ये ऐसाही चलता रहा तो मेरा क्या होगा भगवान? ये जर्मन दुनिया मुझे जिने नही देगी."

व्हिडियोमध्ये सांगत होते कि शिंका आली तर असं शिंका, तसं शिंका आणि मला सट्टक्कन शिंका आली. आता पूर्ण डब्यातल्या टाळक्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर खाऊ की गिळू भाव. जसकाही तो विषाणू मीच घेऊन फिरतीये. तरी मी अगदी जर्मन पद्धतीने शिंकले बरं!  पण डब्यातल्या लोकांच्या रोखलेल्या नजरा जश्याच्या तश्याच. वाटलं हे लोक मला पुढच्या स्टेशनला बाहेर ढकलतील. तरी बरं अंडरग्राउंड मेट्रो आहे नाहीतर मधेच दिलं असतं ढकलून. 

"नहीं.. ये मेरे साथ नहीं हो सकता. मैने किसीका क्या बिगाडा है भगवान जो मुझे ये दिन दिखा रहे हो?"

जेव्हा मला दुसरी शिंका आली तेव्हा मात्र माझी खात्रीच झाली की नक्कीच डब्यातल्या कोणीतरी पोलिसांना बोलवलं असेल आणि पुढच्या स्टेशनवर "पुलिस मेरा इंतजार कर रही होगी". च्या## त्या विषाणूच्या तर. ५-७  मिनिटांचा प्रवास ५०० मिनिटांचा वाटायला लागला. कधी एकदा माझं स्टेशन येतं आणि मी ह्या लोकांच्या तावडीतून सुटते असं झालं. 

आणि अचानक मला उपाय सुचला.. आजच व्हाट्सऍप वर आलेला #गो_करुणा चा व्हिडियो ह्या लोकांना दाखवूया आणि सांगूया मी हा उपाय केलाय हो. मला अजिबात कोणताच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही पण सगळ्या लोकांना एकत्र करा आणि ह्या व्हिडीयोमध्ये म्हणत आहेत तस म्हणा. बघा कसा विषाणू धुम ठोकून पळून जाईल ते. पण माझ्या शिंकेमुळे सगळे माझ्याकडे मीच #कोरोना असल्यासारखं बघत होते. त्यामुळे व्हिडियो दाखवायाचं रद्द केलं. 

मनात देवाचा धावा करत होते की एकतर लवकर स्टेशन तरी येऊदे नाहीतर "उठालेरे बाबा... मेरेकु नहीं रे.. ईस कोरोनाको!" दुसरीकडे #गो_करुणा चा मंत्रजप चालू होता बरं. शेवटी पाचशेव्या मिनिटाला आलं एकदाचं माझं स्टेशन आणि डब्यातल्या टाळक्यांनी आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#माझी_जर्मनी_डायरी 

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

तिकीट

आज सकाळपासूनच तिला हुरहूर लागून राहिली होती. तरी ती स्वतःला तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यग्र ठेवत वाटलं. बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, कपडे भरायचे होते, सगळे कागदपत्र बघायचे होते, बरोबर न्यायला खाण्यापिण्याच्या गोष्टी आणायच्या होत्या. आज रात्रीचं विमान होतं ना तिचं. परदेशी जायचं म्हणजे पासपोर्ट, व्हिजा वगैरे सगळं चोख पाहिजे. 

सगळे कागदपत्र शोधत असताना तिची नजर सहा महिन्यांपुर्वीच्या "त्या" तिकिटावर गेली. तिने "ते" अगदी जपुन ठेवलं होतं. आयुष्यातला तो प्रवास आणि ते तिकीट तिच्यासाठी पुस्तकात ठेवलेल्या मोरपिसासारखे आठवणीत राहिले होते.

 सहा महिन्यांपूर्वीचा विमानप्रवास आणि बाजुच्या खुर्चीवरचा तो! सोनेरी कुरळे केस, गोरापान रंग, बोलके निळे डोळे! त्याची आणि तिची फार पुर्वीपासुन ओळख असल्यासारखे वाटले तिला. परदेशी असुनही भारतीय संगीतातला त्याचा व्यासंग पाहुन ती त्याच्या प्रेमात कधी पडली हे तिचं तिलाच कळलं नाही. 

दोघांच्या गप्पांच्या ओघात एवढा मोठा प्रवास कसा आणि कधी सम्पला तेही कळले नाही. पण प्रवासच तो, कधीतरी संपणार आणि आपण इच्छित स्थळी पोहोचणार! पण हा प्रवास कधी संपुच नये असं राहुन राहून वाटत होतं तिला. निघताना, निरोप घेताना खुप बोलायचं राहुन गेलंय असं वाटत होतं.

मागच्या सहा महिन्यातला तिचा एकही दिवस त्याच्या आठवणीशिवाय गेला नव्हता! तिने फेसबुकवर त्याचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला होता पण तो काही तिला सापडला नाही. "असा कसा फेसबुकवर नाहीये हा? कमालच आहे! मी दिला होता माझा ना इमेल ऍड्रेस. सहा महिन्यात एकदाही त्याला मला इमेल करावा वाटला नसेल का?" तिला रागच आला. "आता मी त्याला संपर्क करू तरी कसा? ना फोन ना पत्ता."  त्याची पुन्हा एकदा तरी भेट व्हावी, त्याच्याशी बोलता यावं असं तिला मनोमन वाटलं..  तोच.. तिच्या फोनमध्ये नोटिफिकेशनची किणकिण झाली. 

तिला "त्याचा" इमेल आला होता!!

"त्या दिवशी आपण विमानात भेटलो! काय गमंत आहे बघ, एवढ्या गप्पा मारल्या आपण आणि साधा एकमेकांचा फोन नंबरही घेतला नाही. मी तर अजुनच हुशार, तु सांगितलेला तुझा इमेल ऍड्रेस माझ्या तिकिटावर लिहुन घेतला खरा, पण वेंधळ्यासारख "ते" तिकीट मी हरवलं. रोज तुझी आठवण येत होती, तुझ्याशी संपर्क कसा करावा कळत नव्हतं आणि आज प्रवासाला निघताना सगळ्या कागदपत्रांमध्ये "ते" तिकीट सापडलं आणि लगेच तुला इमेल केला!!"

इमेल वाचुन ती खुदकन हसली आणि ते टेलीपथी कि काय असतं ना त्यावर तिचा अगदी गाढ विश्वास बसला. तिला नाचावं, बागडावं वाटत होतं पण तिने लगेच त्याच्या इमेलला उत्तर लिहायला सुरुवात केली!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

मोह

आम्ही म्यूनिकमधे सध्या जिथे राहतोय तिथे रहायला येऊन आम्हाला साधारण ५ वर्ष होतील. इथल्या सगळ्या बिल्डिंग्जला तळघरं नव्हे तळमजले आहेत. त्याच तळमजल्यातल्या एका खोलीत छोटी स्टोअररूम प्रत्येक रहिवाश्याला मिळते आणि तिथेच एका वेगळ्या मोठ्या खोलीत एक वॉशिंगमशीन, ड्रायर, कपडे वाळत घालायला दोऱ्या आणि स्टॅण्डची व्यवस्था असते. वॉशिंगमशीन आणि ड्रायर वापरायला अर्थातच पैसे लागतात.
तर सांगायचा मुद्दा असा आहे कि गेले ५ वर्ष आमच्या इथल्या वॉशिंगमशीनच्या खोलीत हे ५० सेंटचे नाणे ह्याच रॅकवर ह्याच ठिकाणी पडुन आहे. मी इथे रहायला यायच्या किती दिवस आधीपासून हे ह्या रॅकवर असेल ते देवच जाणे. गेल्या ५ वर्षात बरेचश्या लोकांचे ह्या ठिकाणी कपडे धुण्याच्या निमित्ताने येणेजाणे नक्कीच झाले असणार. पण मागच्या ५ वर्षात हे नाणं जिथे आहे तिथेच आहे. त्याची जागा सुद्धा बदललेली नाहीये.
खरंतर ड्रायर वापरायला ५० सेंटचे नाणेच लागते पण कोणीही ह्या नाण्याला अजिबात हात लावला नाहीये. ह्या खोलीत बिल्डिंग मधील लोकांव्यतिरिक्त साफसफाई करणारे लोक नेहमीच येतजात असतात. पण नाणं आहे तिथेच आहे.
मला दरवेळी कपडे मशीनला लावायला नेल्यावर ह्या चमत्कारी
नाण्याचं दर्शन होतं आणि त्याच्याविषयी मनात करुणा दाटुन येते. बिचाऱ्यावर काय परिस्थिती आलीये.. ह्याचा मालक नक्कीच सोडुन गेला असणार आणि ह्याला बेवारस करून गेला असणार.
सगळ्यात जास्त आश्चर्य इथल्या पराकोटीच्या प्रामाणिक आणि मोहावर विजय मिळवलेल्या लोकांचं वाटतं. आपल्याकडे म्हण आहे “शीतावरून भाताची परीक्षा” तसंच मलाही म्हणावं वाटतंय की “नाण्यावरून लोकांची परीक्षा!” विकसित देशातील लोक असेच असतील कदाचित! त्यांना त्यांच्या कष्टाचा पैसा सोडुन एका सेंटचाही मोह नसावा?

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक


बुधवार, २२ जानेवारी, २०२०

द लेक हाऊस

कीआनु रिव्ह्ज आणि सॅन्ड्रा बुलक ह्यांच्या नितांतसुंदर अभिनयाने नटलेली एक तरल प्रेमकथा असलेला चित्रपट. एकमेकांपासून खुप लांब असणारे दोन जीव. म्हणलं तर खूप लांब नाहीतर खूप जवळ. एक रहस्यमयी पत्रपेटी, जी तर्कशास्त्राच्या तत्वांवरचा आपला विश्वास उडवते. दोन वेगळ्या प्रतलांवरचे नाते.
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पहिला. अप्रतिम रहस्यमयी प्रेमकथा. एका तळ्यात बांधलेले छोटेसे टुमदार घर. तिच्या नवीन नोकरीमुळे, तिला हे अत्यंत आवडलेले घर तिच्या मनाविरुद्ध सोडावे लागतेय. जड अंतःकरणाने ती सगळं आवरुन घराबाहेर पडते, पण तिचा कुत्रा तिथून निघायलाच तयार नाहीये. निघताना तिथल्या पत्रपेटीत ती एक पत्र ठेवते आणि त्या सुंदर घराला अखेरचं नजरेत साठवुन तिथून निघून जाते. ती जाते तेव्हा शिशिर ऋतू असतो. तो हिवाळ्यात त्याच तळ्यातल्या घरी रहायला येतो. ती डॉक्टर असल्यामुळे तिला शिकागोला एके मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळालीये. तो आर्किटेक्ट आहे आणि तो सुद्धा शिकागोमध्येच त्याच्या एका मोठ्या प्रकल्पावर काम करतोय. तो रात्री घरी येतो आणि त्याला पत्रपेटीत तिचं पत्र सापडतं. तिने लिहिलंय की "ह्या सुंदर घरात नविन भाडेकरूचे स्वागत. मला हे घर जितकं आवडलं तितकंच तुलाही आवडेल अशी आशा करते. कृपया मला आलेले कोणतेही पत्र खालील पत्त्यावर पाठवणे. आणि हो दारातल्या कुत्र्याच्या पंजाबद्दल क्षमस्व. वरच्या छोट्या खोलीत एक बॉक्स आहे तोही मी यायच्याआधीपासून तिथे होता. धन्यवाद." ते पत्र वाचून तो दारात कुत्र्याचे पंजे दिसत आहेत का बघतो आणि वरच्या खोलीत बॉक्स आहे की नाही ह्याचाही शोध घेतो. पण त्याला कुठेच ती म्हणतेय तसं काही सापडत नाही. तो दुसऱ्या दिवशी घराची स्वच्छता करताना एक कुत्रा तिथे येतो जो की तिचाच आहे. पहिला आश्चर्याचा धक्का आपल्याला इथे बसतो. एका भयंकर अपघातामुळे ती खूप अस्वस्थ आहे कारण तिच्या डोळ्यांदेखत एका व्यक्तीचा जीव जातो पण डॉक्टर असुनही ती त्याला वाचवु शकत नाही. ह्या मानसिक धक्क्यामुळे ती सगळ्या कोलाहलापासुन दूर जाण्यासाठी पुन्हा त्या तळ्यातल्या घरापाशी येते. तिच्यासोबत तिचा कुत्रा आहे. जो कि त्याचाही कुत्रा आहे. घर अजुनही रिकामं आहे हे पाहुन तिला आश्चर्य वाटतं. निघताना ती पत्रपेटी उघडते आणि तिला त्याचं पत्र मिळतं. त्याने लिहिलंय की "हे घर बऱ्याच वर्षांपासून रिकामं आहे, इथे कोणीही रहात नव्हतं त्यामुळे तुम्ही नक्की कोणत्या बॉक्सविषयी म्हणत आहात मला समजलं नाही. कदाचित तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी लेक हाऊस मध्ये राहिला असाल आणि तुमचा त्यामुळे गैरसमज झाला असेल. कुत्र्याचे पंजे म्हणत असाल तर त्याबाबत मलाही कुतूहल वाटतं आहे." ती लगेच त्याला उत्तर लिहिते "मी ह्याच लेक हाऊस मध्ये राहिली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे कि तिथे एक बॉक्स आहे. आणि हो, हे २००६ आहे." स्वतःचा पत्ताही त्यात लिहिते. ती ते पत्र पत्रपेटीत ठेऊन निघून जाते. रात्री तिचे पत्र पाहुन तो बुचकळ्यात पडतो आणि विचार करतो की " २००६ कसं काय म्हणतेय ती?" शिकागोला गेल्यावर तो तिचा पत्ता शोधून तिच्याशी बोलायचं ठरवतो. तो तिने दिलेल्या पत्त्यावर जातो तेव्हा तिथे त्या इमारतीचे बांधकाम सुरु असतं. त्याच्यासाठीही हि गोष्ट धक्कादायक असते. तो लगेच तिच्यासाठी पत्र लिहितो की मी तूम्ही दिलेल्या पत्त्यावर जाऊन आलो आणि तिथे बांधकाम चालू आहे जे कि पुढच्या दोन वर्षात पूर्ण होईल आणि तुम्ही मला तारीख चूक सांगता आहात कारण हे २००४ साल आहे. २००६ नाही." हा दुसरा आश्चर्याचा धक्का आपल्याला बसतो.

असा त्यांचा वेगळ्या प्रतलांवरचा पत्रांचा सिलसिला सुरु होतो. आपण पूर्णपणे त्यात गुंतत जातो. त्यांची शिकागोमधली एकत्र भ्रमंति, तिने झाडं आवडतात लिहील्यावर त्याने तिच्यासाठी लावलेले झाड, तो खरंच अस्तित्वात आहे कि नाही हे पाहण्यासाठी तिने भूतकाळातल्या एका तारखेला त्याला तिच्यासाठी करायला सांगितलेली एक गोष्ट, तिच्या नकळत आणि त्याला माहित असताना त्यांची झालेली अवचित भेट, त्या दोघांना जेव्हा जाणीव होते की ते दोघे वेगळ्या प्रतलांवर आहेत आणि प्रेमात पडले आहेत, एकमेकांना भेटायची उत्कटता, भविष्यातल्या एका तारखेला भेटायचे ठरवून न झालेली त्यांची भेट, पत्राद्वारे होणाऱ्या त्यांच्या गप्पा, काळाच्या अनिश्चिततेमुळे तिचं त्याला नाही म्हणणे, ती पत्रपेटी आणि तो कुत्रा. एक एक अप्रतिम प्रसंग आहेत जे आपल्याला खिळवून ठेवतात. हळुहळु आपल्या लक्षात येत जाणारे संदर्भ, हे सगळं शब्दात मांडणं कठीणच. किआनू आणि सॅन्ड्राने ज्या उत्कटतेने हे प्रसंग रंगवले आहेत त्याला तोड नाही.

दोन्ही कलाकारांचा अभिनय उत्तम. ह्या ना त्या कारणाने ती पत्रपेटी आपल्याला सम्पूर्ण चित्रपटात दिसत राहते आणि आपण अस्वस्थ होत राहतोआणि शेवटच्या क्षणापर्यंत ताणलेली उत्सुकता एखाद्या थ्रिलर चित्रपटाचा अनुभव देते. मरगळलेल्या, प्रेमावरचा विश्वास उडालेल्या मनाला उभारी देणारा एक अविस्मरणीय अनुभव. ते म्हणतात ना कुठेतरी एक समांतर विश्व अस्तित्वात आहे आणि तिथे तुमच्या सगळ्या इच्छाआकांक्षा पूर्ण झालेल्या आहेत. असाच काहीसा अनुभव ह्या चित्रपटाने दिला.
शांत आणि तरल चित्रपट पाहण्याची आवड असेल तर नेटफ्लिक्सवर जरूर पहा "द लेक हाऊस". सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #Netflix #thelakehaouse

Pic Credit Google

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

चुना

गुलाबी थंडी, मस्त हवा आणि सुट्टी, और क्या चाहिये? तुम्ही अगदी उत्साहात घरच्यांबरोबर दिवस कसा मस्त घालवता येईल याची योजना आखता. चक्क सगळेजण या योजनेला पसंती दर्शवतात त्यामुळे तुमचा उत्साह दुणावतो. ठरल्याप्रमाणे पटापट आवरुन तुम्ही योजनेबरहुकूम शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता. लेकाने आताच "पानिपत" पाहिल्यामुळे, शनिवारवाडा पाहायचा हट्ट धरलेला असतो आणि तुम्ही सुट्टीचा मुहूर्त साधुन तो हट्ट पूर्ण करायचा असं ठरवलेलं असतं.  

तर, प्रवेशद्वारी पोहोचताच तुम्ही अजूनच उत्साहाने जाहीर करता की "तुम्ही सगळे थांबा. मीच तिकीट काढणार." तरी तुमचे हे म्हणतात "अगं तू थांब इथे आईसोबत, मी काढतो तिकीट." पण नाही, तुमचा उत्साह आज तुम्हाला "आज मैं ऊपर" सुचवत असतो त्यामुळे तुम्ही "आसमाँ नीचे"  म्हणत तिकीट काढायला प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश करता. 

आत गेल्यागेल्या "इतना अंधेरा क्यूँ है भाई?" असं तुम्हाला समोरच्या सद्गृहस्थाला विचारावं वाटतं. पण तुमच्या लक्षात येत की अति उत्साहाच्या भरात तुम्ही गॉगल काढलेलाच नाहीये. म्हणून तुम्ही गॉगल काढता आणि पर्समध्ये ठेवता. तेवढ्यात समोरचे सद?गृहस्थ हातावर तंबाखू घेऊन चुन्याच्या पुडीतुन चुना हातावर घेण्याचा प्रयत्न करत असतात. चुना काही पटकन त्यांच्या तंबाखुवर पडत नसतो म्हणून ते चुन्याच्या पुडीला जोरदार हिसका देतात आणि चुन्याचा एक चुकार मोठ्ठा थेंब उत्साहाने भरलेल्या तुमच्या डोळ्यात जातो. 

हा अनपेक्षित धक्का तुम्हाला सहन न झाल्याने तुम्ही डोळा चोळायला लागता आणि एक सणसणीत शिवी तुमच्या डोळ्यातुन ओठांवर येते, तीच द्यायला तुमची चुनाभरली नजर त्या तंबाखूगृहस्थाला शोधायला लागते. त्याला त्याच्या चुन्यानी केलेली चुक लक्षात आल्यामुळे तो गायब झालेला असतो. त्याच्या चुन्याला माफी नाही! चुकीला, चुकीला. आता तुम्ही, तुमचा डोळा आणि चुना. हेच काय ते राहिलेलं असतं. उत्साहाची जागा केव्हाच चुन्याने काबीज केलेली असते. 

ह्या सगळ्या गोंधळात रांग पुढे सरकलेली असते आणि तिकीटखिडकीवरचे काका तुम्ही बोलण्याची वाट पहात असतात. तुम्ही इतक्या चुनामय झालेला असता की काकांना म्हणता " ५ चुना द्या." हे ऐकुन त्यांचा चेहरा चुन्यासारखा पांढरा पडलाय असं तुम्हाला वाटतं पण तसं काही नसुन तुमची नजरच चुनामय झालीये हे तुम्हाला कळतं. 

कसं तरी तिकीट घेऊन तुम्ही बाहेर येता आणि जेव्हा ह्यांना सांगता की तुमच्या डोळ्यांत चुना गेलाय तेव्हा त्यांनी म्हणलेलं "काय?चुना? असा कसा तुझ्याच डोळ्यांत गेला? " ह्यावर फक्त "गेलाय ना चुना आता!" एवढंच उत्तर देऊन तुम्ही डोळा चोळता. आता हात लावला की डोळ्यांतून चुना येत असतो आणि भयंकर आग होत असते. एव्हाना सगळे उत्साहात शनिवारवाडा बघण्यात दंग झालेले असतात आणि तुम्ही त्या तंबाखू चुनावाल्याच्या खानदानाचा उद्धार करून, त्याचाच चुना त्याच्याच डोळ्यांत घालु म्हणून त्याला शोधत असता. पण तो काही सापडत नाही आणि त्याचा चुना तुमची मात्र वाट लावतो. सगळ्या दिवस चुन्यात जातो. 

पुढचे तीन दिवस हे चुना प्रकरण तुमच्या डोळ्याला पुरतं आणि पुन्हा "चुना डोळ्यांत जाईल अश्या ठिकाणी तू कशाला गेली होतीस?" अश्या प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार तुमच्यावर होतो तो वेगळाच. गॉगल काढल्यामुळे इतका मोठा चुना तुम्हाला लागलेला असतो. 

एकंदर काय तर व्यसन हे वाईटच, स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठीही! त्यामुळे कधीही तंबाखु खाणाऱ्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकु नका बरं!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#myfriends_experince 

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

शांतता

इथला मेट्रोचा प्रवास कधी कधी फारच थरारक होतो. खरंतर थरारक शब्द आपल्यासाठी म्हणजेच भारतीयांसाठी योग्य ठरणार नाही कारण असे प्रसंग आपल्यासाठी नवीन नाहीत पण जर्मन लोकांच्या दृष्टीकोणातुन हा प्रसंग थरारकच म्हणावा लागेल कारण जर्मन लोक (आताशा) स्वभावतः फारच शांत आहेत. 

तर एकदम शांत असा मेट्रोचा डबा. कोणत्याही प्रवाश्याचा आवाज नाही. प्रत्येकजण एकतर फोनमध्ये व्यस्त नाहीतर शांततेचा आवाज ऐकण्यात गुंग आणि तुम्ही "आता नक्की काय बोलावं?" असा विचार करण्यात दंग. अचानक पुढच्या स्टेशनवर ह्या असह्य शांततेला तडा जातो. चार पाच टिनेजर मुलांचा घोळका डब्यात शिरतो. 

वयानुसार त्यांचा गलका चालू असतो. त्यांना बघुन तुम्हाला मस्त वाटतं. त्या डब्यात चैतन्य आल्याचा भास होतो. त्यांचे जोरजोरात बोलण्याचे आवाज, एकमेकांची खिल्ली उडवल्यावर होणारा हास्यकल्लोळ हे सगळं बघून तुमचं भारी मनोरंजन होतं, तुम्ही गालातल्या गालात हसता आणि तेव्हाच तुमचं लक्ष्य आजूबाजूच्या जर्मन्स कडे जातं. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघुन तुम्हाला वाटतं कि ते तुमच्याकडे बघुन "कौन है ये लोग? कहाँ से आते है लोग?" विचार करत आहेत कि काय? बऱ्याच लोकांना ह्या मुलांच्या गोंधळाची चीड येते. एक जर्मन काका तर त्या मुलांना शांतपणे जाऊन सांगतात कि आवाज करू नका वगैरे. पण मुलंच ती, त्यांना काडीचाही फरक पडत नाही. 

पुढच्या स्टेशनवर एक आज्जी डब्यात शिरतात. आजी तुमच्या समोरच्या सीटवर बसतात. मुलांचा गलका आता वाढलेला असतो. त्यात भर म्हणून एका मुलाकडे काहीतरी अशी गोष्ट असते कि तिचा आवाज त्या शांत डब्याध्ये अचानक घुमत असतो. त्या गलक्याला कंटाळून आजी त्या मुलांना जाऊन सांगतात कि आवाज करू नका. पण याही वेळी मुलांच्या गलक्यात एक टक्काही फरक पडत नाही. 

आता आजींची जरा चलबिचल व्हायला लागते. ते बघून तुम्हाला उगाचच आजींची काळजी वाटायला लागते. त्या पुन्हा मुलांना सांगतात कि गप्प बसा रे. पण काहीही उपयोग होत नाही. आता मुलांचा गलका प्रचंड वाढलेला असतो आणि ते काहीतरी वाजवत असतात. आणि अचानक फुगा फुटल्या सारखा आवाज येतो. तो ऐकून तुमच्यासहित सगळेच दचकतात, ते बघून मुलांचा घोळका पुढच्या स्टेशनवर पसार होतो. 

मुलं निघून गेले म्हणून डब्यातले सगळेच सुटकेचा निश्वास टाकतात. तुमचं आणि आजींच्या बाजूला बसलेल्या ताईचे लक्ष आजींकडे जातं, त्या आवाजामुळे आजी जास्त सैरभैर झालेल्या दिसतात. खूपच अस्वस्थ आहेत असं दिसतं. तुम्ही आणि ती ताई आजींना विचारता "काय होतंय?" पण आजी उत्तर द्यायच्या अवस्थेतच नसतात. त्यांना काहीच सुचत नसतं. त्या फक्त अस्वस्थ हालचाली करत असतात. कोणालाच कळत नसतं त्यांना काय होतंय ते. 

ते बघून कदाचित डब्यातले कोणीतरी MVG(म्युनिच ट्रान्सपोर्ट) किंवा इमर्जन्सीला कॉल करतं आणि पुढच्याच स्टेशनला एक-दोन MVGचे अधिकारी बरोबर  तुमच्याच डब्याच्या समोरच्या दारात हजर असतात आणि ती ताई तत्परतेने त्या आजींना घेऊन त्यांच्या बरोबर जाते. आजींना वेळेत मदत मिळलेली असते. ते बघून तुमच्यासहित सगळ्यांना हायसं वाटतं. 

फोन केल्याकेल्या दोन ते तीन मिनिटांत, बरोब्बर ज्या डब्यात आजी आहेत त्याच डब्याच्या समोर येऊन, एक नाहीतर दोन लोकांनी थांबणे म्हणजे फारच झालं. 
मी जर माझ्या ह्यांना आत्ता म्हणाले की "कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यावर, तेव्हढा गॅस बंद करा" तर हे उद्या मला विचारतील "तु काल काहीतरी म्हणत होतीस ना?" हे ऐकुन त्यांना अंदाज अपना अपना स्टाईलने सांगावंसं वाटतं की "चाय में शक्कर डालनेका टाईम कल था, आज नहीं" आणि त्यावरही ते म्हणतील "अच्छा चहातच साखर टाकायची होती ना? मग ठीक आहे." 

पण त्या आजींना पाहुन राहुन राहुन एक प्रश्न मनात येतोय, "ह्या आजी मॅगी काकुंच्या नातेवाईक तर नाहीत ना?" नाही म्हणलं, आजींनाही आवाजाचं वावडं, मॅगी काकूंनाही कुरकुरणाऱ्या दारांचं वावडं!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

माझं कुंकू

काल देवापुढे दिवा लावत होते अन तेवढ्यात लेकाचा फोन आला की मी मागच्या गेटवर आलोय पण इथे कुलूप आहे, तू मला घ्यायला ये. म्हणून पटकन दिवा लावुन झटकन जॅकेट अंगावर चढवुन त्याला घेऊन आले. आम्ही लिफ्टमधून बाहेर पडतच होतो की समोर दत्त म्हणून मॅगी काकू उभ्या. घाबरलो ना आम्ही!

काकूंनी मला काय कशी आहेस विचारलं. खूप दिवस झाले भेट नाही म्हणाल्या. लेकाचीही प्रेमाने चौकशी केली. मला वाटलं आता आमचा निरोप घेऊन निघतील काकु, पण नाही. इतका वेळ आमच्याशी बोलत असताना काकु एकटक माझ्याकडे पहात होत्या. त्यांच्याशी बोलताबोलता मी आपलं माझं जॅकेट नीट आहे ना? माझे शूज व्यवस्थित आहेत ना? असा माझा अवतार नीट आहे कि नाही ते बघत होते. 

न राहवुन काकूंनी मला विचारलंच "तुझ्या कपाळावर हे काय आहे?" मी मनातल्या मनात "काय आहे बुआ माझ्या कपाळावर?" लेकाच्या लक्षात आलं कि आपल्या धन्य मातेच्या लक्षातच नाहीये तिच्या कपाळावर कुंकू आहे ते. त्यामुळे तो वैतागून म्हणाला " अगं आई तू कुंकू लावलं आहेस ना त्याच्या बद्दल विचारत आहेत त्या." आणि मग माझी ट्यूब पेटली कि मी दिवा लावताना हळदी कुंकवाचे जे ठसठशीत बोट लावलं होतं तेच काकु बघत होत्या एकटक आणि मी कपाळावर हात मारून म्हटलं "अच्छा ते होय!"

आता आली का पंचाईत? ह्यांना हे हळदीकुंकू आहे हे कसं सांगायचं? लेकाने पटकन मला प्रॉम्प्ट केलं आई हळद म्हणजे kurkuma." मग मी जरा सावरुन माझ्या जर्मन मिश्रित इंग्रजीमध्ये सांगितलं "काकु es ist called कुंकू und kurkuma (हे कुंकू आणि हळद आहे), the holy powder we apply." काकूंचे काही समाधान झाले नाही माझ्या उत्तराने. त्यांनी पुन्हा विचारलं "तुम्ही कुरकुमा(हळद) पण लावता? का लावता तुम्ही ते?" हळदीला जर्मनमध्ये kurkuma म्हणतात. काकु पार बुचकळ्यात पडल्या होत्या. त्यांना वाटत होतं खायची गोष्ट(हळद) हि बाई कपाळाला लावून फिरतेय. मनात म्हटलं हळदीचे उपयोग तुम्हाला सांगत बसले तर इथेच सकाळ होईल. 

मनात वेगवेगळे सिनेमातले विचार चमकून गेलेच, जसं की “एक चुटकी सिंदूर की किमत, ये मेरे सुहाग की निशानी है, कुंकू म्हणजे नवराच की हो माझा! वगैरे वगैरे." सिनेमातून बाहेर येऊन स्वतःला सावरत मी म्हणाले "Das ist unsere kultur (ही आमची संस्कृती आहे)." तर काकूंचा पुन्हा प्रश्न " तू आत्ता का लावलं आहेस पण?"  मला उत्तर देताना वऱ्हाड निघालंय लंडनला मधला बबन्या आठवला (जान डसली डायलॉग) आणि मी फस्सकन हसले. "अहो I lit दिवा in front ऑफ God while praying so I applied हो."  काकुंना कळेना, ही बाई हसतेय काय बोलतेय काय. तरी त्यांनी पुन्हा प्रश्न टाकला "अस्स होय? तुम्ही हिंदु आहे म्हणुन हे लावता? बरोबर ना?" मी आनंदुन म्हणाले "हो काकु du bist rechts, म्हणजे तुमचं बरोबर आहे."  

काकूंचं शेवटी समाधान झालं आणि त्या आम्हाला बाय करून निघून गेल्या. हे जर्मन लोक फार प्रश्न विचारतात बुआ! आता कुंकवाचा समानार्थी शब्द जर्मन किंवा इंग्रजीमध्ये शोधायची कधी वेळ येईल असं मला वाटलं नव्हतं. शोधतेच आता, नाहीतर नवीन शब्द बनवते. कसं?



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

एका लॅपटॉपची कहाणी

ऐका लॅपटॉपा तुमची कहाणी.

एक राजश्री नावाची स्त्री म्यूनिचमध्ये रहात असते जिला भारतात जाऊन २-३ वर्ष झालेले असतात म्हणून ती ठरवते की सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देऊ पण तिलाच नंतर एक प्रचंड धक्का बसतो. वाचा हि कहाणी तिच्याच शब्दात.

"आम्हाला अजिबात जमणार नाही कार्यक्रमाला यायला, काय करणार लेकाच्या शाळेला सुट्या नाही मिळत ना अधेमधे." असं सारखं सारखं सांगुन, तुम्ही सगळ्यांना अंधारात ठेवलेलं असतं. ऐन कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सकाळीच म्युनिचहुन उड्डाण करुन तुम्ही संध्याकाळी पुण्यात घराच्या दारात उभे राहून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का देता आणि तेव्हा तुम्हाला कळतं की "सुख म्हणजे नक्की काय असतं?"

सगळ्या जिवलगांसोबत घालवलेले पंधरा दिवस पंधरा मिनीटांसारखे भासतात, दिवस कापरासारखे भुर्रकन उडून जातात आणि तुमची परत निघायची वेळ येते. जड मनानी तुम्ही बॅगा भरता आणि सगळ्यांचा निरोप घेऊन,जड पावलांनी मुंबईला जाणाऱ्या टॅक्सित बसता. विमानतळावर पोहोचेपर्यंत अधूनमधून डोळ्यात अश्रु येतच राहतात. विमानतळावर यथावकाश उतरून सगळ्या बॅगा चेक करून तुमची स्वारी चेकइनच्या दिशेने निघते. लेक मोठा झालाय असं तुम्हाला वाटत असल्यामुळे त्याची बॅग त्यालाच सांभाळायला दिलेली असते आणि तुमच्याकडे एक बॅग, तुमची पर्स आणि अधुनमधून लॅपटॉप नामक लेकराची बॅग असते. ते लेकरू तुमची एक अमूल्य गोष्ट सांभाळत असतं, काय सांगा बरं? तुमचा डेटा हो. डेटा ही जगातली सगळ्यांत अमूल्य गोष्ट आहे आजघडीला.

तुमची पुणे ट्रिप खुप छान झालेली असल्यामुळे तुम्ही आनंदाच्या हिंदोळ्यावरच तुमच्या बॅगा, पर्स, लेकरं सांभाळत विमानात बसता. लेकाच्या बडबडीत, अबुधाबी येतं. तुम्हाला आधीच ताकीद मिळालेली असते की आपल्याकडे ट्रान्झिट मध्ये फक्त एक तास आहे, मंडळी पाय उचला. एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानात बसण्यासाठी तुम्हाला आधी सिक्युरिटी चेक करून मग साधारणपणे १-२ किलोमीटरचा पल्ला बॅगा आणि लेकरं घेऊन पळत पार पाडायचा असतो.

अबूधाबीचे सिक्युरिटी चेक म्हणजे आपल्याकडची जत्रा असते अक्षरशः. बराचश्या देशांचे ट्रान्झिट इथे आहेत. त्यामुळे सिक्युरिटी चेक साठी एका वेळी नक्की पाचशे ते हजार लोक रांगेत उभे असतात. नेमके सिक्युरिटी चेकला तुम्ही, लेक आणि हे वेगवेगळ्या रांगेत जातात त्यामुळे तुमचं लक्ष लेक एकटाच ज्या रांगेत गेलाय तिथे असतं. त्यात तिथला अधिकारी तुम्हाला तुमच्या सोन्याच्या बांगड्या सुद्धा ट्रे मध्ये ठेवायला सांगतात.

आता तुमच्या जीवाची घालमेल सुरु होते, पुढच्या विमानाला फक्त अर्धा तास उरलेले असतो, लेक एकटाच वेगळ्या रांगेत असतो, तुमच्या सोन्याच्या बांगड्या नीट आहेत कि नाही? तुमच्या पर्समध्ये चुकून एखादी औषधी गोळी तर राहिली नाहीये ना? अश्या असंख्य चिंता तुम्हाला सतावत असतात. कसंतरी सिक्युरिटी चेक पार पाडुन, सगळं सामान घेऊन तुम्ही सगळे म्युनिचच्या विमानाच्या गेटकडे पळत सुटता. कारण विमान निघायला आता फक्त २० मिनिट उरलेले असतात.

म्यूनिचमध्ये ट्रेन, बस किंवा ट्राम पकडायला पळण्याचं सार्थक झालेलं असतं कारण तुम्ही अबुधाबीला लेक आणि ह्यांच्या बरोबरीने त्या गेटवर पोहोचता. सगळे सोपस्कार पार पाडुन, गर्दीतुन वाट काढत, बॅगा बोडख्यावरच्या कप्प्यात ठेवून तुम्ही एकदाचं स्थानापन्न होता. टांगणीला लागलेला जीव विमानात पडलेला असतो. तुमच्या बाजूला एक धिप्पाड जर्मन काकू असतात आणि कमी लेगस्पेसमुळे बिचाऱ्या अवघडुन बसलेल्या असतात. तुम्हाला त्यांच्याविषयी करुणा दाटुन येते आणि एअरलाईन वाल्यांचा राग येतो. काही दिवसांनी लेगस्पेस इतकी कमी होईल की उड्या मारूनच सीटवर बसावं लागेल. असे काहीबाही विचार करत तुम्हाला झोप लागते.

म्युनिचला विमान उतरतं, तुम्ही सामान घेऊन इमिग्रेशनच्या रांगेत उभे राहता, तुम्ही सगळे खूप खुश असता, तुमच्या छान गप्पा चालू असतात आणि लेक तूम्हाला विचारतो "आई लॅपटॉपची बॅग कुठे?" तुम्ही मनात "लॅपटॉपची बॅग? हे काय नवीन? अशी कोणती बॅग माझ्याजवळ होती का? अर्रर्रर्रर्रर्र लॅपटॉपची बॅग... हो.. ती माझ्याजवळच होती. कधी होती? मुंबईला? की अबूधाबीला? ते लेकरू. तो अमूल्य डेटा.. बाबो कुठे हरवली मी? विमानातच ठेवली कि काय?" तुमचा चेहरा हसरा ते रडवेला होतो. तुम्ही लॅपटॉप हरवला आहे ह्याची तुम्हाला तीव्र जाणीव होते आणि तुमच्या पोटात खड्डा पडतो. तुमच्या सगळ्या प्रोजेक्ट्सचा डेटा, तुमचे नवीन प्रोजेक्ट्स आणि सगळा पर्सनल डेटा घेऊन हे लेकरू हरवलेलं असतं.

इतका वेळ हास्यविनोद करणारे तुमचे कुटुंब अचानक तणावग्रस्त होते. आजूबाजूचे लोक संशयाने तुमच्याकडे पहायला लागतात. शक्य तितका शान्त चेहरा ठेवून तुम्ही इमिग्रेशनच्या चौकशीला सामोरे जाता. तिथून बाहेर पडल्यावर तुमच्यावर लेक आणि हे मिळून प्रश्नांचा भडीमार करतात आणि तुम्हाला लक्षात येतं कि अबूधाबीला लेकाच्या आणि सोन्याच्या बांगड्यांच्या नादात तुम्ही लॅपटॉप नामक लेकराकडे साफ दुर्लक्ष्य केलेलं असतं त्यामुळे ते लेकरू तिथल्या सिक्युरिटी चेकच्या ट्रे मधुन बाहेरच येत नाही. तिथेच रुसुन बसतं.

अश्या प्रकारे एका अत्यंत सुखद प्रवासाचा अंत, तुमच्याच चुकीमुळे दुःखद झालेला असतो. पंधरा दिवसांचा आनन्द एका क्षणात नाहीसा झालेला असतो. त्यानंतर घरी येऊन आधी तुम्ही वेगवेगळे पर्याय शोधता कि लॅपटॉपचा शोध नक्की कसा घ्यायचा? अबूधाबीलाच आहे कि अजून कुठे? वेगवेगळे प्रयत्न, फोन, इमेल्स करुन तुम्हाला कळत कि लॅपटॉप अबूधाबीच्या एअरपोर्टवरच आहे आणि सुरक्षित आहे. थोडी जीवाला शांतता मिळते. मग त्या लेकराला घरी कसं आणायचे, ह्याचे प्रयत्न सुरु होतात. पण यश काही येत नाही.

खूप प्रयत्न, बरेचसे पैसे आणि प्रचंड मनस्तापानंतर तो लॅपटॉप सहा महिन्यांनी म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्हाला मिळतो.

उतु नका मातु नका, घेतला लॅपटॉप विसरू नका. ही साठा उत्तराची लॅपटॉपची कहाणी पाचा उत्तरी सुफळ सम्पुर्ण. 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

त्यांचं सध्या काय चालु आहे?

मागे एकदा म्युनिक मधल्या भारतीय ब्युटी पार्लर मध्ये गेले होते. म्युनिक मधलं भारतीय ब्युटी पार्लर असल्यामुळे तिथे समस्त भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधल्या लेडीज बायका भेटतात. तेलगू, तमिळ, बंगाली, पंजाबी, हिंदी, गुजराती अश्या अनेक भाषा बोलणाऱ्या भरपूर जणी त्या निमित्ताने ओळखीच्या झाल्या आहेत. तसं आपल्याला सगळे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय सारखेच वाटतात. कारण आपण पडलो महाराष्ट्रीयन. त्यांना बिचाऱ्यांना मी नक्की कोणत्या राज्यातली आहे हे कळत नसावं बहुतेक कारण माझ्या रंगावरून उत्तर भारतीय बायका मला दक्षिण भारतीय समजतात आणि जिथे तिथे हिंदी बोलल्यामुळे दक्षिण भारतीय बायका मला उत्तर भारतीय समजतात.  

तर दिवाळी जवळ आल्यामुळे पार्लर मध्ये लेडीज बायकांची गर्दी होती. पार्लरवाल्या ताई हिंदी भाषिक असल्यामुळे मी त्यांच्याशी हिंदीत बोलले आणि बाकी दोघी तिघी नक्की कोणत्या भाषेत बोलत होत्या ते त्यांच्या बोलण्यात "प्रभास" चा उल्लेख आल्यामुळे माझ्या टवकारलेल्या कानांनी माझ्या मेंदूला "तेलगू" अशी सूचना केल्यामुळे मला कळले. आता "प्रभास" कोण, कुठला हे जर आपल्या सारख्या लेडीज बायकांना माहित नसेल तर धुत्त अपनी जिंदगानी पे. तो बाहुबली सिनेमा काय बघितला आणि... 

तर विषय एकंदर मी, पार्लर आणि लेडीज बायका होता. आधी तिथे हिंदी भाषिक ताई त्यांचं काम करण्यात मग्न असाव्यात आणि ह्या तेलगू ताया त्यांच्या भाषेत गॉसिप करण्यात. पण माझी तिथे एंट्री होताच हिंदी भाषिक ताईंना जरा बरं वाटलं कारण त्यांच्या बरोबर गॉसिप करायला कोणीतरी आलं होतं. हा सगळं तेलगू, हिंदी किलबिलाट तिथे चालु असताना, अजून एका दक्षिण भारतीय भाषेवाल्या ताई तिथे अवतरल्या. त्यांची आणि माझी आधीपासून ओळख असल्यामुळे आम्ही इंग्रजी मध्ये बोलायला लागलो. त्यामुळे पुढे तिथे जो काही भाषिक जांगडगुत्ता चालू होता ह्याची तुम्ही नक्कीच कल्पना करु शकता. 

मी आपली मेरा नम्बर कब आयेगा? असा विचार मराठीत करत एकीकडे इंग्रजी आणि हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि अचानक तिथे तेलगू भाषिक तायांमध्ये "बिग बॉस" नामक एका भारतीय टीव्हीवर चालू असलेल्या शोचा विषय निघाला. ते ऐकून हिंदी, तेलगू आणि तमिळ ताया लगेच इंग्रजीमध्ये, चक्क एकमेकींशी बोलायला लागल्या. 

हा विवक्षित "बिग बॉस" नावाचा शो मराठी मध्ये पण असतो हे तुम्हाला कितीही माहित नाही असे वाटत असले तरी फेसबुकवर असल्यामुळे लोकांच्या त्याविषयीच्या रंजक पोस्ट वाचून, न बघताही त्याची खडानखडा माहिती तुम्हाला असते. त्यामुळे आता मीही अगदी मन लावुन समस्त भारतीय भाषिक लेडीज बायकांच्या इंग्रजी संवादाकडे लक्ष देत होते. प्रत्येकजण स्वतःच्या प्रातांतील "बिग बॉस" वषयी सांगत होती. 

एकंदर सूर असा होता कि तद्दन भिकार शो आहे, लोकं फालतू भांडत बसतात, सगळं स्क्रिप्टेड असतं, नुसता शो ऑफ असतो, प्रचंड लफडे असतात, हिचं त्याच्याशी, तिचं ह्याच्याशी, काहीजणी खूप अंगप्रदर्शन करतात वगैरे वगैरे. प्रत्येक जण आपापलं मत नोंदवत होती आणि हिंदी भाषिक ताई बऱ्याच वर्षांपासुन म्युनिकमध्ये असल्यामुळे म्हणाल्या की जर्मनीच्या टीव्ही वर पण असतंय बरं बिग बॉस आणि ते खूपच ओपन असतंय, त्यात तर लोक एकमेकांसमोर कपडेही बदलतात. इतका वेळ श्रोत्याची भूमिका घेतलेली मी तिच्या ह्या वाक्यावर म्हणाले की "That`s what people want to watch, right? They are providing you the content." 

तिथे एकच हश्या पिकला आणि सगळ्या एकदम शांतच झाल्या. भयाण शांतता पसरली. मी तिथून निघेपर्यंत एकीचाही पुन्हा आवाज नाही आला. प्रत्येकीच्या हातात फोन होता आणि त्या सगळ्या फेसबुकवर रमल्या. Which is different kind of Big Boss. मी आपलं निघताना सगळ्यांना शुभ दीपावली म्हटलं तर "कोण आहे हि बाई?" अश्या नजरेने सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी पटकन तिथून सटकले; न जाणो त्या सगळ्या मला बिग बॉसचा एखादा एपिसोड दाखवायच्या आणि माझाच गेम व्हायचा. 

मागे एकदा असच माझ्या मराठी मैत्रिणीने विचारलं होतं कि कोणती मराठी सिरीयल बघतेस आजकाल? तर मी बापुडवाणा चेहरा करत कोणतीच नाही म्हटल्यावर तिने जो कटाक्ष माझ्यावर टाकला ना तो मी कधीच नाही विसरणार आणि तिच्या धाकापायी मी परत एकदा युट्युबवर "एका लग्नाची दुसरी गोष्ट" सिरियलचं पारायण केलं होतं. सध्या कोणती मराठी सिरीयल बघतेय असं कोणी विचारलं तर आता माझं उत्तर तयार असतं. पण प्रचंड पिअर प्रेशर आहे हे!!
आता मला कळलं कि मला इथे जास्त मैत्रिणी का नाहीयेत ते. 

बरं ते जाऊद्या, सध्या बिग बॉस मध्ये काय चालु आहे?



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

Deja vu


मागच्या महिन्यात स्लोवेनियातल्या लुबुयाना नावाच्या शहराला भेट देण्याचा योग आला. छोटंसं टुमदार शहर. अवघ्या ५ किलोमीटर परिघात शहराचा मध्यवर्ती भाग, जिथे हजारो पर्यटकांची गर्दी. इकडे उन्हाळ्यात साधारण सगळ्याच युरोपच्या शहरांमध्ये दिसणारे दृश्य. 

तिथेच एका आईसक्रीम च्या दुकानाबाहेर लागलेली रांग. एवढी मोठी रांग, तेही आईसक्रीम साठी, नक्कीच काहीतरी भारी असणार; असा विचार करून तुम्ही पण त्या रांगेचा एक भाग होता. रांगेत उभे असताना, दुकानाबाहेरील पाटी वाचताना, त्या दुकानाचे मेनूकार्ड बघताना तुम्हाला अचानक "देजावू" फिलिंग यायला लागतं. पण त्या देजावू भावनेला कोणत्याही प्रकारचा भाव न देता तुम्ही आईसक्रीमची नक्की कोणती वेगळी चव चाखावी हा विचार करायला लागता. वेगवेगळ्या चवींविषयी वाचताना पुन्हा तेच देजावू. त्या देजावू भावनेच्या भरातच तुम्ही तिथल्या मुलीला ऑर्डर देता. पण तुमच्या चेहऱ्यावरचे देजावू भाव बघून ती बुचकळ्यात पडते आणि पुन्हा तुम्हाला ऑर्डर विचारते. यथावकाश सगळ्यांचे आईसक्रीम घेऊन तुम्ही त्या मुलीला पैसे देऊन तिथून निघता. तरी बरं त्या मुलीला पाहून देजावू नाही वाटलं. ह्यांना विचारायला पाहिजे?

अरे काय प्रकार आहे हा? कोण कुठला स्लोव्हेनिया देश, त्यातले लुबुयाना आणि तिथले हे "ककाओ Cacao" नावाचं आईसक्रीमचं दुकान. असा देश नकाशावर आहे आणि तिथे काहीतरी खास प्रेक्षणीय स्थळं आहेत हे इथे आल्यावर कळलं. तरीही सारखसारखं इथे आधी येऊन गेलोय हि भावना पिच्छा सोडत नसते. म्हणजे "कुछ पिछले जनम का रिश्ता" वगैरे आहे कि काय? असे फिल्मी विचार करतच तुम्ही अवीट गोडीचे आईसक्रीम सम्पवता. 

लेकाला अजून एक आईसक्रीम पाहिजे म्हणून तुम्ही पुन्हा मेनूकार्ड पाहता आणि तिथे खाली दिलेले वाक्य वाचल्यावर तुम्हाला तुमच्या देजावू चा उलगडा होतो. तिथं लिहिलेलं असतं "आमची शाखा कुठेही नाही (एक दोन अपवाद वगळता)". हे वाचून तुम्ही मनाने २०१०-११ सालातल्या पुण्यात पोहोचलेले असता. (नाही नाही, चितळेंची शाखा नाहीये स्लोव्हेनिया मध्ये. कुठेही शाखा नाही म्हटलं कि तेच नाव येतं डोक्यात). तेव्हा पेपरमध्ये एका खास आईसक्रिमच्या दुकानाविषयी लेख आलेला असतो(त्या लेखात त्या दुकानाचे फोटोज पण असतात). कोण्या एका युरोपिअन देशात खास चवींचे आईस्क्रीम्स मिळतात. वगैरे वगैरे. ते वाचताना तुम्ही विचार केलेला असतो "बघू कधी आयुष्यात तिथे गेलो तर नक्कीच हे आईसक्रीम खाऊ." तुम्हाला तेव्हा स्वप्नही पडतं कि तुम्ही तिथे जाऊन आईसक्रीमचा यथेच्छ आस्वाद घेताय. 

असा तो देजावू आणि स्वप्नाचा धागा अवचितपणे जुळलेला असतो. तुम्ही मनोमन आनंदी होता की "सपने कभी कभी सच भी होते है!" आणि लुबुयाना मधल्या २-३ दिवसांच्या वास्तव्यात खरोखर त्या आईस्क्रीमच्या वेगवेगळ्या चवींचा यथेच्छ आस्वाद घेता. 

म्युनिक मध्ये आल्यावर तुम्हाला पुन्हा स्वप्न पडतं की तुम्ही या आईसक्रीमच्या दुकानाची फ्रँचायझी घेतलीये! 

सपने देखने चाहिये! क्यों? 

PS: Déjà vu is the feeling that one has lived through the present situation before. The phrase translates literally as "already seen". 

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 





वाचकांना आवडलेले काही