गुरुवार, २ जानेवारी, २०२०

शांतता

इथला मेट्रोचा प्रवास कधी कधी फारच थरारक होतो. खरंतर थरारक शब्द आपल्यासाठी म्हणजेच भारतीयांसाठी योग्य ठरणार नाही कारण असे प्रसंग आपल्यासाठी नवीन नाहीत पण जर्मन लोकांच्या दृष्टीकोणातुन हा प्रसंग थरारकच म्हणावा लागेल कारण जर्मन लोक (आताशा) स्वभावतः फारच शांत आहेत. 

तर एकदम शांत असा मेट्रोचा डबा. कोणत्याही प्रवाश्याचा आवाज नाही. प्रत्येकजण एकतर फोनमध्ये व्यस्त नाहीतर शांततेचा आवाज ऐकण्यात गुंग आणि तुम्ही "आता नक्की काय बोलावं?" असा विचार करण्यात दंग. अचानक पुढच्या स्टेशनवर ह्या असह्य शांततेला तडा जातो. चार पाच टिनेजर मुलांचा घोळका डब्यात शिरतो. 

वयानुसार त्यांचा गलका चालू असतो. त्यांना बघुन तुम्हाला मस्त वाटतं. त्या डब्यात चैतन्य आल्याचा भास होतो. त्यांचे जोरजोरात बोलण्याचे आवाज, एकमेकांची खिल्ली उडवल्यावर होणारा हास्यकल्लोळ हे सगळं बघून तुमचं भारी मनोरंजन होतं, तुम्ही गालातल्या गालात हसता आणि तेव्हाच तुमचं लक्ष्य आजूबाजूच्या जर्मन्स कडे जातं. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघुन तुम्हाला वाटतं कि ते तुमच्याकडे बघुन "कौन है ये लोग? कहाँ से आते है लोग?" विचार करत आहेत कि काय? बऱ्याच लोकांना ह्या मुलांच्या गोंधळाची चीड येते. एक जर्मन काका तर त्या मुलांना शांतपणे जाऊन सांगतात कि आवाज करू नका वगैरे. पण मुलंच ती, त्यांना काडीचाही फरक पडत नाही. 

पुढच्या स्टेशनवर एक आज्जी डब्यात शिरतात. आजी तुमच्या समोरच्या सीटवर बसतात. मुलांचा गलका आता वाढलेला असतो. त्यात भर म्हणून एका मुलाकडे काहीतरी अशी गोष्ट असते कि तिचा आवाज त्या शांत डब्याध्ये अचानक घुमत असतो. त्या गलक्याला कंटाळून आजी त्या मुलांना जाऊन सांगतात कि आवाज करू नका. पण याही वेळी मुलांच्या गलक्यात एक टक्काही फरक पडत नाही. 

आता आजींची जरा चलबिचल व्हायला लागते. ते बघून तुम्हाला उगाचच आजींची काळजी वाटायला लागते. त्या पुन्हा मुलांना सांगतात कि गप्प बसा रे. पण काहीही उपयोग होत नाही. आता मुलांचा गलका प्रचंड वाढलेला असतो आणि ते काहीतरी वाजवत असतात. आणि अचानक फुगा फुटल्या सारखा आवाज येतो. तो ऐकून तुमच्यासहित सगळेच दचकतात, ते बघून मुलांचा घोळका पुढच्या स्टेशनवर पसार होतो. 

मुलं निघून गेले म्हणून डब्यातले सगळेच सुटकेचा निश्वास टाकतात. तुमचं आणि आजींच्या बाजूला बसलेल्या ताईचे लक्ष आजींकडे जातं, त्या आवाजामुळे आजी जास्त सैरभैर झालेल्या दिसतात. खूपच अस्वस्थ आहेत असं दिसतं. तुम्ही आणि ती ताई आजींना विचारता "काय होतंय?" पण आजी उत्तर द्यायच्या अवस्थेतच नसतात. त्यांना काहीच सुचत नसतं. त्या फक्त अस्वस्थ हालचाली करत असतात. कोणालाच कळत नसतं त्यांना काय होतंय ते. 

ते बघून कदाचित डब्यातले कोणीतरी MVG(म्युनिच ट्रान्सपोर्ट) किंवा इमर्जन्सीला कॉल करतं आणि पुढच्याच स्टेशनला एक-दोन MVGचे अधिकारी बरोबर  तुमच्याच डब्याच्या समोरच्या दारात हजर असतात आणि ती ताई तत्परतेने त्या आजींना घेऊन त्यांच्या बरोबर जाते. आजींना वेळेत मदत मिळलेली असते. ते बघून तुमच्यासहित सगळ्यांना हायसं वाटतं. 

फोन केल्याकेल्या दोन ते तीन मिनिटांत, बरोब्बर ज्या डब्यात आजी आहेत त्याच डब्याच्या समोर येऊन, एक नाहीतर दोन लोकांनी थांबणे म्हणजे फारच झालं. 
मी जर माझ्या ह्यांना आत्ता म्हणाले की "कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यावर, तेव्हढा गॅस बंद करा" तर हे उद्या मला विचारतील "तु काल काहीतरी म्हणत होतीस ना?" हे ऐकुन त्यांना अंदाज अपना अपना स्टाईलने सांगावंसं वाटतं की "चाय में शक्कर डालनेका टाईम कल था, आज नहीं" आणि त्यावरही ते म्हणतील "अच्छा चहातच साखर टाकायची होती ना? मग ठीक आहे." 

पण त्या आजींना पाहुन राहुन राहुन एक प्रश्न मनात येतोय, "ह्या आजी मॅगी काकुंच्या नातेवाईक तर नाहीत ना?" नाही म्हणलं, आजींनाही आवाजाचं वावडं, मॅगी काकूंनाही कुरकुरणाऱ्या दारांचं वावडं!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही