बुधवार, ८ जानेवारी, २०२०

चुना

गुलाबी थंडी, मस्त हवा आणि सुट्टी, और क्या चाहिये? तुम्ही अगदी उत्साहात घरच्यांबरोबर दिवस कसा मस्त घालवता येईल याची योजना आखता. चक्क सगळेजण या योजनेला पसंती दर्शवतात त्यामुळे तुमचा उत्साह दुणावतो. ठरल्याप्रमाणे पटापट आवरुन तुम्ही योजनेबरहुकूम शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता. लेकाने आताच "पानिपत" पाहिल्यामुळे, शनिवारवाडा पाहायचा हट्ट धरलेला असतो आणि तुम्ही सुट्टीचा मुहूर्त साधुन तो हट्ट पूर्ण करायचा असं ठरवलेलं असतं.  

तर, प्रवेशद्वारी पोहोचताच तुम्ही अजूनच उत्साहाने जाहीर करता की "तुम्ही सगळे थांबा. मीच तिकीट काढणार." तरी तुमचे हे म्हणतात "अगं तू थांब इथे आईसोबत, मी काढतो तिकीट." पण नाही, तुमचा उत्साह आज तुम्हाला "आज मैं ऊपर" सुचवत असतो त्यामुळे तुम्ही "आसमाँ नीचे"  म्हणत तिकीट काढायला प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश करता. 

आत गेल्यागेल्या "इतना अंधेरा क्यूँ है भाई?" असं तुम्हाला समोरच्या सद्गृहस्थाला विचारावं वाटतं. पण तुमच्या लक्षात येत की अति उत्साहाच्या भरात तुम्ही गॉगल काढलेलाच नाहीये. म्हणून तुम्ही गॉगल काढता आणि पर्समध्ये ठेवता. तेवढ्यात समोरचे सद?गृहस्थ हातावर तंबाखू घेऊन चुन्याच्या पुडीतुन चुना हातावर घेण्याचा प्रयत्न करत असतात. चुना काही पटकन त्यांच्या तंबाखुवर पडत नसतो म्हणून ते चुन्याच्या पुडीला जोरदार हिसका देतात आणि चुन्याचा एक चुकार मोठ्ठा थेंब उत्साहाने भरलेल्या तुमच्या डोळ्यात जातो. 

हा अनपेक्षित धक्का तुम्हाला सहन न झाल्याने तुम्ही डोळा चोळायला लागता आणि एक सणसणीत शिवी तुमच्या डोळ्यातुन ओठांवर येते, तीच द्यायला तुमची चुनाभरली नजर त्या तंबाखूगृहस्थाला शोधायला लागते. त्याला त्याच्या चुन्यानी केलेली चुक लक्षात आल्यामुळे तो गायब झालेला असतो. त्याच्या चुन्याला माफी नाही! चुकीला, चुकीला. आता तुम्ही, तुमचा डोळा आणि चुना. हेच काय ते राहिलेलं असतं. उत्साहाची जागा केव्हाच चुन्याने काबीज केलेली असते. 

ह्या सगळ्या गोंधळात रांग पुढे सरकलेली असते आणि तिकीटखिडकीवरचे काका तुम्ही बोलण्याची वाट पहात असतात. तुम्ही इतक्या चुनामय झालेला असता की काकांना म्हणता " ५ चुना द्या." हे ऐकुन त्यांचा चेहरा चुन्यासारखा पांढरा पडलाय असं तुम्हाला वाटतं पण तसं काही नसुन तुमची नजरच चुनामय झालीये हे तुम्हाला कळतं. 

कसं तरी तिकीट घेऊन तुम्ही बाहेर येता आणि जेव्हा ह्यांना सांगता की तुमच्या डोळ्यांत चुना गेलाय तेव्हा त्यांनी म्हणलेलं "काय?चुना? असा कसा तुझ्याच डोळ्यांत गेला? " ह्यावर फक्त "गेलाय ना चुना आता!" एवढंच उत्तर देऊन तुम्ही डोळा चोळता. आता हात लावला की डोळ्यांतून चुना येत असतो आणि भयंकर आग होत असते. एव्हाना सगळे उत्साहात शनिवारवाडा बघण्यात दंग झालेले असतात आणि तुम्ही त्या तंबाखू चुनावाल्याच्या खानदानाचा उद्धार करून, त्याचाच चुना त्याच्याच डोळ्यांत घालु म्हणून त्याला शोधत असता. पण तो काही सापडत नाही आणि त्याचा चुना तुमची मात्र वाट लावतो. सगळ्या दिवस चुन्यात जातो. 

पुढचे तीन दिवस हे चुना प्रकरण तुमच्या डोळ्याला पुरतं आणि पुन्हा "चुना डोळ्यांत जाईल अश्या ठिकाणी तू कशाला गेली होतीस?" अश्या प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार तुमच्यावर होतो तो वेगळाच. गॉगल काढल्यामुळे इतका मोठा चुना तुम्हाला लागलेला असतो. 

एकंदर काय तर व्यसन हे वाईटच, स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठीही! त्यामुळे कधीही तंबाखु खाणाऱ्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकु नका बरं!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

#myfriends_experince 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही