मला असं वाटतं की युरोप टूर करायची आणि पॅरिसला जायचच नाही हे म्हणजे चार धाम यात्रेला जाऊन द्वारकेला न जाण्यासारखं आहे. तर ऑक्टोबर मधे आम्ही पॅरिस ला जायची तयारी करत होतो. नोव्हेंबर मधील एक दिवसही निश्चित केला. सगळी बुकिंग वगैरे करणार तर असं कळालं की ह्यांना नेमके तेच दोन दिवस महत्वाच्या मीटिंग्स आहेत त्यामुळे प्लान रद्द करावा लागला. माझं मन खूप खट्टू झालं. कारण डिसेम्बर पासुन पुढे एकतर भयंकर थंडी असते आणि त्यात पुन्हा बर्फ. सगळा प्लान एप्रिलच्या पुढे ढकलवा लागला. राहून राहून वाईट वाटत होतं पण...
आणि थोड्याच दिवसात ती बातमी आली की पॅरिस मधे दहशतवादी हल्ला झालाय. मन सुन्न करणारी बातमी. आत्ता आम्ही पॅरिस मधेच असतो...विचार करुनच अंगावर सरसरुन काटा आला. असो.
शेवटी एकदाचा पॅरिसला जाण्याचा योग जुळून आला. लेकाच्या शाळेला सुटया होत्या त्या दरम्यान आम्ही 3 दिवसांचा दौरा ठरवला.
निघायचा दिवस उजाडला. विमानतळावर जाण्यासाठी आम्ही मेट्रो मधे बसलो होतो आणि लेकाने हळूच माझ्या कानात विचारले "आई टेररीस्ट अटॅक(दहशतवादी हल्ला) नाही होणार ना गं आपण पॅरिसला गेल्यावर?" आपण एखादं गोड स्वप्न पाहत असावं आणि कोणीतरी तो जोरात वाजणारा अलार्म आपल्या कानाशी लावून आपल्याला उठवावं. अगदी तशीच झाली माझी अवस्था लेकाचा प्रश्न ऐकून. खरतर असले काही विचार करून घाबरायलाच होतं पण मुलांसमोर आपण खुप शूर आहोत हेच दाखवावं लागतं. मी धीर करून म्हणाले " नाही रे. असं कहीही होणार नाही बघ. तु रिलॅक्स रहा." माझा उत्तराने त्याचं फारसं समाधान जरी झालं नसलं तरी तो थोडा रिलॅक्स झाला. पण माझा डोक्यात आता नाही नाही ते विचार सुरु झाले. अशा रीतीने आमचा प्रवास सुरु झाला.
विमान पॅरिसच्या जवळ आल्याचं वैमानिकाने संगितल्यावर मी आणि नवरा खिडकीतुन आयफेल टॉवर दिसतोय का ह्यावर जोरजोरात चर्चा करायला लागलो. कारण आयफेल टॉवर पॅरिस मधे नक्की कठेु आहे हे आम्ही आधीच नकशावर पाहून ठेवल होतंं
"अगं दिसेल कदाचित."
"अरे ती नदी दिसते आहे की...तिच्या जवळच आहे ना!"
"हो खरं.. दिसायला हवा."
आमचा असा संवाद चालू असताना लेक म्हणाला " तुम्ही दोघे जरा हळू बोलताल का? आजुबाजुचे लोक तुमच्याकडे बघत आहेत. आणि आई आता पॅरिसला गेल्यावर दिसेलच ना तुला आयफेल टॉवर.. so just chill." आमचा आवाज बंद एकदम. आमचं विमान सरळ खाली आलं.
दुपारची वेळ होती त्यामुळे खुपच भुक लागली होती म्हणुन आधी काहीतरी खाऊन मगच हॉटेलवर जायचं ठरवलं. ह्यांनी आधीच मला सांगून ठेवलं होतं की "सरवण भवन (साउथ इंडियन रेस्टॉरंट ची चेन आहे यूरोप मधील)" ला जायचच आहे. भारतीय लोकांनी पॅरिसला जाऊन तिथे गेलं नाही तर पाप लागतं म्हणे. तर हे सरवण भवन एका टोकाला, आयफेल टॉवर दुसऱ्या टोकाला आणि आमचं हॉटेल तिसऱ्या टोकला असं काहीतरी नकाशा दाखवत होता.मजल दरमजल करत आम्ही निघालो.
म्युनिच मधील अप्रतिम लोकल ट्रांसपोर्टची सवय असलेले आम्ही पॅरिसच्या लोकल ट्रांसपोर्टला इतक्या शिव्या घालत होतो की काय सांगु. एकतर भुलभूलैय्या सारखे स्टेशन्स. बरं तो भुलभूलैय्या तरी एकाच लेवल वर असावा ना. पण नाही. चित्रविचित्र बोळवजा रस्ते. मधेमधे खाली नाहीतर वर जाणाऱ्या पायऱ्या. भयंकर कनफ्युजिंग स्टेशन्सची नावं. ह्या सगळ्या मधे भर म्हणुन प्रचंड गर्दी. लेक तर पहिल्याच प्रवासात वैतागला. "काय तुम्हाला त्या सरवण भवनला जायचय. किती वेळ लागतोय. मला भुक लागली आहे. चांगलं मॅकडोनाल्ड्ला गेलो असतो. वगैरे वगैरे."
कसतरी त्या स्टेशनला पोहोचलो. तर तिथूनही 10 मिनट चालावं लागलं. तर ही जी गल्ली होती ना ती म्हणजे भारतातील एखाद्या शहरातील बाजारपेठ वाटली अक्षरश:.साड्या आणि पंजाबी ड्रेसेसचे दुकाने, किराणा मालाची दुकाने, भारतीय रेस्टॉरंटस्. मस्तच वाटलं एकदम. सरवण भवनचे चवदार दाक्षिणात्य पदार्थ खाऊन पोट तर भरलं पण मन नाहीच.
पुन्हा त्या भूलभुलैय्या स्टेशन्स आणि विचित्र अशा मेट्रोज मधून प्रवास करून हॉटेलवर फ्रेश होऊन आम्ही आयफेल टॉवर खालील स्टेशनला पोहोचलो.
आणि तो क्षण आला. आम्ही आयफेल टॉवरला आलो. खरतर लोखंडी टॉवर आहे तो. जवळून फार आकर्षक वगैरे वाटत नाही. पण तिथला परिसर, ते टॉवरचं प्रचंड धूड, ती बाजूने वाहणारी नदी, खुप उत्साही लोक, नवीन लग्न झालेली 1-2 युरोपिअन कपल्स, त्यांची तिथे फोटो काढाण्यासाठी चाललेली लगबग, मराठी लोकांची केसरीची आलेली टुर. तिथल्या आनंद आणि उत्साहाची लागण आम्हालाही झालीच. प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे पळून गेला. मस्त टॉवरवर जाऊन सगळं पॅरिस शहर नजरेत साठवून घेतलं. खाली येऊन तिथल्या बागेत बराच वेळ बसुन राहिलो. किती वेळ गेला कळलच नाही. एव्हाना थंडी वाढायला लागली होती. लेक इतका थकला होता की तिथेच पेंगायला लागला. त्याचं सुरु झालं. भुक लागली. झोप आली. आम्ही म्हणत होतो की थोडा वेळ थांब, रात्री टॉवरला मस्त लाइट्स लागतील. तेवढे बघु आणि जाऊ. पण आपलं लगेच ऐकतील ते मुलं कसली. त्याचं आपलं एकच, त्यात काय बघायचं. मला झोप येतीये आपण उदया येऊ लाइट्स बघायला. शेवटी आम्हाला निघावच लागलं.मला तर स्वप्नात पण आयफेल टॉवरच दिसत होता.
दुसऱ्या दिवशी लेक खुपच खुश होता. त्याची आवडती डिजनीलँडची दिवसभराची सफर होती. पुन्हा त्याच भयंकर भूलभुलैय्या मधून आम्ही डिजनीलँडला पोहोचलो. तर बारीक पाऊस सुरु झाला आणि तो दिवसभर पडतच होता. तरीही आमचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही कारण परिकथा खरी वाटावी असं काहीसं फीलिंग होतंं ते. आम्ही दोघांनीही लहान होऊन सगळ्या राईड्सचा लेकाबरोबर आनंद घेतला, मिकी माउस सोबत फोटो काढला, डिजनीच्या वेगवेगळ्या सिनेमाच्या कॅरेक्टर्सला भेटलो, कार्सचा प्रचंड थरारक असा शो पाहिला, गोड बाहुल्यांचा डांस पहिला. दिवस कसा गेला कळलच नाही. मला तर तिथून निघायची ईच्छाच नव्हती. लहानपणी वाचलेल्या परीकथेमधे जाऊन आल्यासारखं वाटलं. म्युनिच मधे आल्यापासुन चालायची सवय लागली म्हणुन नाहीतर त्या दिवशी डिजनीलँडमधे आम्ही 15 किलोमीटर चालूच शकलो नसतो. इतकं चालुनहि आमचा बराचसा भाग बघयचा राहीलाच.दुसऱ्या दिवशी दुपारच विमान होतं म्हणुन मी आता सरळ आयफेल टॉवरला जायच हट्ट धरला. मला रात्रीची रोषणाई बघायचीच होती. म्हटलं पुन्हा योग येइल की नाही माहित नाही.
खरतर दिवसभर चालून पायाचे तुकडे पडायचे बाकी होते तरीही मला जायचच होतं. रडतपडत लेक तयार झाला यायला.
आम्ही टॉवरच्या जवळ पोहोचलो छान लाइट्स दिसत होते आणि तेव्हढयात मुसळधार पाऊस सुरु झाला. आम्ही जवळच्या बस थांब्याचा आधार घेतला. जवळ छत्री पण नव्हती. तिथे तरी किती वेळ थांबणार म्हणुन जी बस आली त्यात चढलो. वेड्यासारखं पाऊस थाम्बेपर्यन्त बस जिथे जातेय तिकडे निघालो. तो टॉवर ती रोषणाई राहिले बाजूला अन आम्ही बसमधे. कसातरी थोड़ा पाऊस कमी झाला आणि आम्ही एका स्टॉपवर उतरून पुन्हा टॉवरकडे जाणारी बस पकडली. टॉवर जवळ आलो तर पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. कसंबसं एका दुकानातुन अव्वाच्या सव्वा भावाला छत्री घेतली. भयंकर भुक लागलेली. शाकाहारी लोकांचे खाण्याचे फार वांदे होतात इकडे. पटकन काहीही मिळेना. लेकाचा चेहरा बघुन मला उगीचच अपराधी वाटायला लागलं. शेवटी एक सबवे सापडलं आणि तिथे आमच्या नशिबाने शाकाहारी सॅंडविच होतं. आम्ही अक्षरश: तुटून पडलो सॅंडविचवर.
सकाळी लवकर आवरुन "लुवरे म्युज़िअमला" जायचं होतं. आतापर्यंत फक्त फोटो मधे पहिलेलं मोनालिसाचं चित्र प्रत्यक्ष पहायचं होतं. पण घोळ माझ्या पाचवीलाच पुजलेले आहेत बहुतेक. संध्याकाळी 5 वाजताचं विमान असल्यामुळे आम्हाला 3.30 वाजेपर्यंत विमानतळावर पोहचणे गरजेचे होते. सकाळी सगळं सामान घेऊनच निघालो. त्या भयंकर भुलभलैया स्टेशन्स मधून प्रवास करत असताना. एका स्टेशनला ट्रेन बदलावी लागणार होती म्हणुन आम्ही एका ट्रेनमधून ऊतरलो तर माझा लक्षात आलं की आत्ताच घेतलेली पाण्याची बाटलीआतच राहिली. ती ट्रेन तिथे 5 मिनिट थांबणार आहे अशी घोषणा आम्ही ऐकली होती म्हणुन मी नवऱ्याला सूचना(त्याच्या भाषेत आदेश) केली की पटकन जाऊन बाटली घेऊन ये ना. आणि जसं काही तो ट्रेन मधे चढायचीच वाट पाहत असल्यासारखी ट्रेन निघाली की. बाहेर लेकाने भोंगा पसरला "बाबाआआ..." मला काही सुधरेना. आजूबाजूचे लोक संशयाने माझ्याकडे बघत होते की पोरगं नक्की हीचच आहे ना. मीे कसंबसं लेकाला शांत केलं. तिकडे तो वैतागला. पुढच्या स्टेशनला उतरून पुन्हा भुलभुलैया पार करावा लागणार. आधीच उशीर होत होता. त्याच्याकडे तिकीट होतं आणि स्टेशनच नाव लक्षात होतं म्हणुन बरं नाहीतर तिथेच हरी हरी करायची वेळ आली असती. कसाबसा तो आमच्याकडे पोहोचला. तर लेक बिलगलाच त्याला. आणि ह्यांनी जो लुक दिला ना मला तो मी कधीच विसरणार नाही. ते नसतं का आपण मुलाना लोकांच्या घरी त्रास देत असले की म्हणतो आत्ता थांब तु, तुला घरी गेल्यावर बघते. अगदी तसा लुक होता तो.
ह्या सगळ्या गोंधळात एक तास गेला. कसेतरी आम्ही म्युज़िअमला पोहोचलो तर तिथे प्रचंड गर्दी. तिथे विचारलं किती वेळ लागेल तर ते म्हणाले कमीत कमी चार तास लागतील मोनालिसा पर्यन्त पोहोचायला आणि आमच्याकडे दोनच तास होते. मग काय म्युज़िअमच्या बाहेर थोडा वेळ घालवुन आम्ही विमानतळाकडे निघालो. तर ठिकठिकाणी पोलिस दिसत होते. मनात शंकेची पाल चुकचुकली. पण नंतर कळालं की तिथे पोलिस दिसतात.
विमानतळावर पोहोचल्यावर मोठा धक्काच बसला. त्यानंतरची सगळी विमानं रद्द केलेली होती कारण त्या दिवशी कोणाचा तरी संप होता. हाय रे कर्मा. एअरलाइन वाले म्हणाले की उद्या पहाटे 6 ची फ्लाइट देतो. नाहीतर पैसे देतो. पैसे परत घेऊन काय डोम्बल होणार होतं. गपगुमान सकाळच्या विमानाची तिकीटे घेतली. आता पुन्हा हॉटेल बघावं लागणार होतं. पुन्हा भूलभुलैय्यातुन शहरात जायच जीवावर आलं आणि पुन्हा पहाटे सहाच विमान म्हणजे चारलच इथे पोहोचावं लागणार त्यामुळे तिथेच एक हॉटेल घेतलं. तो दिवस पूर्णपणे वाया घालवुन आम्ही दुसऱ्या दिवशी म्यूनिचला परतलो.
आणि पॅरिस नावाचा एक सुंदर स्वप्नवत अनुभव मी मनात साठवून ठेवला
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #parisdiaries