शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

खरच मोठा झालास रे राजा

 सकाळी 8-8.30 ची वेळ असते. तुमचे हे ऑफिस ला आणि लेक शाळेत पोहोचलेले असतात. तुम्ही निवांत FB आणि WA वर पडीक असता.अचानक तो इमेल येतो. जे काम मिळवण्यासाठी तुम्ही जीवाच रान केलेल असत. ज्या साठी तुम्ही सलग 12 तास ऑनलाइन काम करण्याचे त्या प्रोजेक्ट मॅनेजरला कबुल केलेले असते. त्याच कामाचा ईमेल असतो आणि तुमच्या डोळ्यांसमोर लेकाचा चेहरा येतो. आता याला शाळेतुन कोण आणणार?
तुम्ही लगेच "ह्यांना" कॉल करायला फोन हातात घेता आणि त्यांचं ते वाक्य तुम्हाला आठवतं "आज मला लंच नंतर सलग 4 वजेपर्यंत मीटिंग्स् आहेत". तरीही तुम्ही ह्यांना कॉल करता.
"तु प्लीज़ आण ना रे त्याला"
"अग आज शक्यच नाहीये.मी तुला सकाळीच संगितलं होता ना. तु शाळेत फोन करुन त्याला सांग आज एकटयाला घरी यायला. मोठा झाला तो आता. चल मला खुप काम आहे मी फोन ठेवतो. तो घरी आला की कळव."
"अरे पण..."
फोन कट.
मग तुम्ही विचार करता की बघु पुढचे पुढे आणि कामाला लागता.
कामाच्या नादात 3 कधी वाजतात ते कळतही नाही.आता खरी धाकधुक सुरू होते. त्याला घ्यायला जायचं म्हणजे आत्ता घरातुन निघणे गरजेचे असते कारण 2 ट्रेन्स बदलुन जावं लागत असत शाळेत. आधी मेट्रो ने 1 स्टेशन आणि नंतर त्या स्टेशन वरुन 2 मजले खाली येऊन अंडरग्राउण्ड मेट्रो ने 2 स्टेशन्स.
आणि ह्याच गोष्टिमुळे तुम्ही त्याला एकटयाला येऊ द्यायला घाबरत असता.
पण काम सोडणही शक्य नसत. शेवटी तुम्ही मनाचा निर्धार करता की लेकाला एकट येऊ द्यायच. तरीही मन थाऱ्यावर नसतच. मग तुम्ही मैत्रिणीला फोन करता. ती रोज शाळेत येत असते मुलीला घ्यायला.
तिच्या फोनवरुन लेकाशी बोलता. त्याला सगळ्या सूचना देता."आंटी कडून पैसे घे. व्यवस्थित टिकीट काढ. ट्रेन पकडण्यासाठी पळु नको. एस्कलेटर वर(सरकता जिना) गडबड करु नको. ट्रेनचा दरवाजा लागत असेल तर थांब. वगैरे वगैरे."
"अग आई माहित आहे ग मला सगळ आणि मला तुझापेक्षा चांगल जर्मन पण येत. मी फोन ठेवतो नाहीतर माझी ट्रेन जाईल."
"नीट ये रे राजा."
आणि मग वाट पाहण्याचा अजब खेळ सुरु होतो. तुमच लक्ष ना धड कामात असत ना धड कशात. जीव टांगणीला लागलेला असतो. आणि बरोबर अश्या वेळेसच घड्याळ इतक हळु चालत असत की बास.
आत्ता 4 वाजलेले असतात. तुम्ही लॅपटॉप घेऊन सरळ बाल्कनी मधे बसता की लेक आला की लगेच दिसेल.
आणि तुमच्या लक्षात येत की ढग जमलेले आहेत, वारा जोरात वाहतोय, वादळाची चिन्ह दिसत आहेत. अरे आज आपण हवामानाचा अंदाजच बघितलाच नाहीये (इथे अंदाज 95% बरोबर असतात). पिल्लूला छत्री पण दिलेली नाहीये.
आत्ता 4 वाजुन 10 मिनिटे झालेली असतात. एव्हाना लेक घराजवळच्या स्टेशन वर पोहोचला असेल. डोक्यात नुसते विचार चालु असतात. ट्रेन्स वेळेवर असतील ना? त्याला मिळाली असेल ना? नकोच होत मी त्याला एकटयाला येऊ द्यायला... म्हणतात ना मन चिंती ते वैरी ना चिंती. असो.
तुम्ही तडक पायात चपला सरकवता आणि घराच्या बाहेर पडता. वादळाचा जोर एव्हाना वाढलेला असतो. तुम्ही गेटच्या बाहेर पडुन स्टेशन कडे जायला वळता. मनात विचारांचे काहुर माजलेले असते.
आणि स्टेशन जवळ आल्यावर समोर तुम्हाला तुमच लेकरु दिसत आणि तो तुम्हाला बघुन पटकन बिलगतो आणि म्हणतो "अग आई मी मोठा झालोय ग. I am 9 years old, I can manage. पण तु हे असे कपड़े का घालुन आलीस? " आणि टांगणीला लागलेला तुमचा जीव भांड्यात पडतो.
ह्या आनंदाला तोड नाही जगात. हो ना?


ता.क. : हे असे कपड़े म्हणजे पंजाबी सुट... जस काही मी मुनिच मधे नउवारीच घालुन फिरते रोज. मनात म्हटले खरच मोठा झालास रे राजा.

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही