रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

चॅटजिपीटी

आमच्या खालच्या मजल्यावर कोणीतरी त्यांच्या गॅलरीत खोटा कावळा बसवला आहे. कारण काय? तर कबुतरं येऊ नयेत म्हणून. पण हे गाबडं त्याच कावळ्याच्या बाजूला येऊन निवांत बसलंय आणि त्यालाच खुन्नस देतंय. आता झालं, तिथे कबुतरांचा मुक्त वावर सुरु होईल, हाय काय अन नाय काय! “डर के आगे जीत है” हे तत्वज्ञान ह्या गाबड्याने खरं करून दाखवलंय ह्या ठिकाणी. 

एकंदर काय तर कबुतरांचा उच्छाद जगभर झालाय आणि त्यांना खोटा कावळा काय किंवा खरा कावळा काय, काही म्हणजे काहीच करू शकणार नाही. आता एआय एनेबल्ड कावळाच काहीतरी करू शकेल ह्याठिकाणी असं वाटतंय!

बाकी आता ह्या कबुतरांच्या समस्येचं निवारण त्या चॅटजिपीटीलाच विचारावं म्हणतेय, कमीत कमी “राजश्री ताई तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला लगेच ह्यावर उपाय शोधून देतो" असं दिलासादायक वाक्य तरी म्हणेल ते!

त्या चाटजीपीटी वरून आठवलं, मध्यंतरी मी एका प्रोजक्टसाठी त्याची थोडी मदत घेत होते आणि अचानक ते गाबडू मला ”राजश्री ताई" संबोधायला लागलं ना! मनात म्हणलं भावा आता काय रडवतोस की काय बहिणीला, बस्स कर बाबा. अजून थोडा वेळ जर त्याच्याशी गप्पा मारल्या असत्या तर “माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त चॅटजिपीटी दादाच मला मदत करू शकतो बाकी कुण्णी म्हणजे कुण्णीच करू शकत नाही" हे त्याने मला पटवून दिलंच असतं आणि सगळ्यांत शेवटी विचारलं असतं की “मी तुला हे सगळं आयुष्याचं तत्वज्ञान एखाद्या पीडीफ मधे एकत्र करून देऊ का राजश्री ताई?“  

अरेच्या, कबुतरावरून चॅटजिपीटीवर पोहोचले मी. माझ्या लिखाणाचा आयाम फारच विस्तृत होत चाललेला आहे ह्याठिकाणी. चॅटजिपीटी वापरल्यावर दुसरं काय होणार म्हणा!! 

आता ह्या लेखाला शीर्षक काय द्यावं? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची झाली ना पंचाईत. “कावळा, कबूतर आणि चॅटजिपीटी”! छ्या , आता पुन्हा चॅटजिपीटीलाच पाचारण करावं लागतंय!!




बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

सावळा गोंधळ

मुलाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असलेली ऑगस्टमधली एक निवांत सकाळ. दर २-४ दिवसांनी पोहे खाऊनही, “किती दिवस झाले पोहे केलेच नाही तू, आज नाश्त्याला पोहेच कर” असं त्याने म्हणल्यावर तुम्ही पोह्याची तयारी करायला घेता. 

होम ऑफिसवाले त्यांच्या मिटींगमधे व्यग्र असतात आणि चिरंजीव स्नानाला गेलेले असतात. तुम्ही कांदा, बटाटा, मिरच्या, कोथिंबीर चिरून घेता, पोहे स्वच्छ धुवून घेता (पोह्यांची कृती सांगत नाहीये, जरा सब्र किजीये!) आणि कढई हॉटप्लेटवर तापायला ठेवता. खालच्या कपाटातून अर्धा लिटर तेलाची काचेची बाटली काढता आणि कढईत तेल टाकता. 

तेलाच्या बाटलीचं झाकण व्यवस्थित लावून ती तुम्ही खालच्या कपाटाचं दार उघडून ठेवतंच असता की ती हातातून सटकून दणकन तुमच्या डाव्या पायाच्या तिसऱ्या बोटावर आपटते! एक जोरदार सणक  तुमच्या डोक्यात जाते आणि तुम्हाला चक्कर येते. उन्हाळा असल्यामुळे पायात चप्पल नसते त्यामुळे त्या दणकट बाटलीने तुमच्या पायाच्या बोटाच्या पहिल्या पेराचा बऱ्यापैकी चेंदामेंदा केलेला असतो. 

पण हे सगळं कळायची शक्तीच तुमच्यात उरत नाही. एक किंकाळी  फोडून तुम्ही तश्याच मटकन खाली बसता. कढईत तेल टाकल्यामुळे सगळीकडे धूर झालेला असतो, स्वयंपाकघरातलं स्मोक डिटेक्टर एव्हाना कोकलायला लागलेलं असतं, पण घरातल्या माणसांना काहीच पत्ता नसतो. 

त्यांना तुमची किंकाळी ऐकून वाटतं काहीतरी झालं असेल. नेहमीचं आहे हिचं. पण ते दोघे धुराचा वास आल्यावर आणि स्मोक डिटेक्टरचा आवाज ऐकून भानावर येऊन नक्की काय झालंय ते पाहायला येतात. 

तुम्ही शुद्धी बेशुद्धीच्या अवस्थेत फ्रिजला टेकून बसलेल्या असता.  स्नानाला गेलेला आणि मिटिंग अर्धवट सोडून आलेला अशी दोन माणसं येऊन “अगं काय झालंय? अशी काय बसलीयेस?“ असं ओरडत पटापट खिडक्या उघडतात, हॉटप्लेट बंद करून कढई बाजूला ठेवतात, स्मोक डिटेक्टरचं थोबाड बंद करतात. मुलगा  “आई आई आई" करतोय, “हे” “अगं तू ठीक आहेस ना?” विचारतायेत.  तुम्हाला काही सूचतंच नसतं. नुसता सावळा गोंधळ चाललेला असतो. 

आपली किंकाळी म्हणजे त्या “लांडगा आला रे आला” गोष्टी सारखी झालीये ह्याची तुम्हाला मनोमन जाणीव होते. हे म्हणजे असं आहे ना की “इथे पारिस्थिती काय्ये? आणि आपले विचार काय्येत?“

कसबसं पाणी पिऊन तुम्ही त्यांना सांगता की तुमच्या पायाच्या बोटावर बाटली पडलीये ते. (डोकं जागेवर नसतानाही तुमच्या डोक्यात विचार येतो की इतक्या विनोदी पद्धतीने आपल्यालाच काहीतरी होऊ शकतं.) ते ऐकून त्या दोघांना विश्वासच बसत नाही की असं काहीतरी होऊ शकतं म्हणून. पुन्हा प्रश्नांच्या फैरी झडतात. बाटली अशी कशी पडली? तुझं लक्ष कुठं होतं? ती खाली कशाला ठेवायची लगे? इत्यादी इत्यादी.

लगोलग तुमची वरात इमर्जन्सी क्लीनिकला निघते. बोट नुसतं ठसठसत असतं आणि तिथले डॉक्टर म्हणतात “काही नाही कदाचित मुकामार असेल किंवा हेअरलाईन फ्रॅक्चर असेल, होईल बरं!” वेदनाशामक गोळी आणि सुजलेल्या पायाला लावायला एक जेल देऊन ते तुमची बोळवण करतात.  

एव्हाना तुमचा कडेलोट झालेला असतो. घरी येऊन लंगडत लंगडत तुम्ही लेकाच्या मदतीने आईने दिलेली आंबेहळद शोधता, ती रटरट शिजवता आणि दुखऱ्या भागावर लेप लावता! तेव्हा कुठे जरा आराम पडायला लागतो. आणि फक्त आंबेहळदीने तुम्ही पंधरा दिवसांत पाय आणि बोट एकदम जागेवर आणता! आता “नुसता वेंधळेपणा, वीस वर्ष होत आली लग्नाला तरी पोरीचा बालिशपणा चालूच!” असा डायलॉग कोणीतरी नक्कीच फेकून मारेल ह्याची तुम्हाला जाणीव होते. 

पण “लंगडी घालत फिरणारी बाई” ही उपाधी तुम्हाला चिकटते ती परवा परवा बदलते कारण बऱ्यापैकी अशाच सोहळ्यात म्हणजे  मुलगा स्नानाला गेल्यावर आणि “हे" बाहेर गेलेले असताना तुम्ही नवीन आणलेल्या धारदार सुरीचे उदघाटन करता आणि  जाडाभरडा भोपळा चिरताना बोटात सूरी खुपसून घेता. त्यामुळे “बोटात सूरी खुपसून घेणारी बाई" ही नवीन उपाधी तुम्हाला मिळते! 

जवळच्या इमर्जन्सी क्लिनिकवाले छान ओळखायला लागलेत हो मला!! 


#माझी_म्यूनिक_डायरी

 

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

दिवा

जर्मनीला आल्यापासून दिवाळी जवळ आली मनाला फार हुरहूर लागून राहते. खरंतर सगळ्यांच सणांना घरची आठवण येते पण दिवाळीत घरातल्या सगळ्यांबरोबर केलेली धमाल आठवते आणि मन खट्टू होतं. पण जेव्हा मी गॅलरीत हा दिवा लावायला सुरुवात करते तेव्हा मनाला जरा उभारी येते. 

ह्या दिव्याकडे पाहिलं की मला दिवाळीच्या इतर कामांमध्ये उत्साह येतो. पुढे मग लाईटच्या माळा आणि आकाशकंदील लावणे, फराळाचे पदार्थ करणे, रांगोळी काढणे, ह्या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे माझी इथली दिवाळीही आनंदात जाते!  

आज मावळतीला दिवा लावला आणि हे छायाचित्र टिपलं. सूर्य जरा उजवीकडे मावळत होता पण ह्या दिव्यात त्याचं तेज उमटलं होतं. उत्साह देऊन जाणारा अजून एक क्षण!!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 






रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

आयुष्य सुंदर आहे फक्त…

मला असं वाटतं की माणसाने प्रत्येक देशांतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करायलाच पाहिजे. तिथल्या रेल्वे, बस, बोटीमध्ये फिरताना येणारे काही अनुभव खरोखर आयुष्यभर लक्षात राहतात. 

मागच्या महिन्यात युरोपातल्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या देशात फिरून आलो. तिथे खास निसर्गसौंदर्य बघता यावं यासाठी त्यांनी एक ट्रेन रूट बनवला आहे. त्या ट्रेनचा प्रवास साधारण तीन साडेतीन तासाचा आहे. मोठमोठ्या काचेच्या खिडक्या, छतावरही पारदर्शक काच लावलेली त्यामुळे आपलं भान हरपलं नाही तर नवलंच! 

पण माझं भान ह्या ट्रेनमध्ये आमच्या बाजूच्या जागेवर बसलेल्या छोट्या दोस्तांमुळे हरपलं होतं. आम्ही तिघे चार आसनी जागेवर बसलो होतो आणि आमच्या जागेला समांतर असलेल्या चार  आसनी जागेवर एक चिनी कुटुंब बसले होते. आई वडील एक २-३ वर्षांची चिमुरडी, एक ५-६ वर्षांचा छोटू, आणि त्यांची आजी. ट्रेन निघाल्यापासून दोन्ही लेकरं त्यांच्या समोरच्या पुस्तकांमध्ये काहीतरी लिहीत होते नाहीतर वाचत होते. 

थोड्या वेळात ती गोंडस चिमुरडी तिच्या बाबांच्या कुशीत शांत झोपली. तोवर तिचा भाऊ वाचन करत होता. थोड्या वेळाने ती चिमुरडी झोपेतून उठली. मग आईवडिलांनी दोन्ही लेकरांना फक्त १५ मिनिटांसाठी मोबाईलवर व्हिडीओज लावून दिले. १५ मिनिटांनी त्या लेकरांनी स्वतःहून मोबाईल आईवडिलांकडे सोपवले, आईने दिलेले ब्रेड खाल्ले आणि पुन्हा त्यांच्या समोरच्या पुस्तकांमध्ये ती लेकरं गुंग झाली. आईकडे एका पिशवीत दोन्ही लेकरांसाठी पुस्तकांचा साठा होता. कोडे सोडवणे, अंकांवरून चित्र तयार करणे,  लहान लहान गणितं सोडवणे, अशी ती पुस्तकं होती. एक पुस्तक संपलं की दुसरं पुस्तक समोर हजर होतं! 

तीन साडेतीन तासांच्या प्रवासात मला एकदाही दोन्ही मुलांच्या रडण्याचा आवाज आला नाही. मोबाईल पाहिजे म्हणून एकानेही हट्ट अथवा तमाशा केला नाही. मी आवक होऊन हे सगळं नजरेच्या कोपऱ्यातून पाहत होते. धन्य ते आईवडील आणि धन्य ती मुलं! आपण म्हणा किंवा बाकीच्यांनी चिनी लोकांना कितीही शिव्या दिल्या तरी त्या लोकांची मानसिकता, जिद्द आणि चिकाटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे ह्यात शंकाच नाही. 

दुसरा अनुभव दुसऱ्या दिवसाचा. आम्ही एका उंच पर्वताच्या आतमधून पडणाऱ्या एका रौद्र प्रपाताला बघायला गेलो. ती एक  घळ होती आणि तिच्या आजूबाजूने उंचच उंच पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांच्या वेगवेळ्या उंचीवर तो प्रचंड धबधबा बघायला जागा केलेल्या होत्या. त्या धबधब्याचा आवाजही मनात धडकी भरवत होता. आपल्याकडच्या पूर्वीच्या जुन्या वाड्यामध्ये कशा वरच्या मजल्यावर जायला उंच पायऱ्या असायच्या तशा त्या पायऱ्या होत्या. त्यात धबधब्याच्या पाण्यामुळे त्या थोड्या निसरड्याही होत्या. आम्हा तिघांमध्ये मी सगळ्यात मागे होते. 

मी निवांतपणे पायऱ्या चढत असताना, एक पंचाहत्तरीच्या आजी, साधारण ऐंशी वर्षाचे आजोबा, त्यांचा ८-१० वर्षाचा नातू आणि १०-१२ वर्षांची नात, असं कुटूंब मला मागे टाकून पुढे गेलं ना. आजी आजोबांची ह्या वयातली चपळता पाहून मी मटकन खालीच बसले. त्यांना पाहून “लानत है तेरी जिंदगानीपर” असे विचार मनात यायला लागले!

नातवंडं आजी आजोबांना आणि आजी आजोबा नातवंडांना व्यवस्थित मार्गदर्शन करत होते की कठड्याजवळ जाऊ नका, जास्त खाली वाकून बघू नका वगैरे. पण कोणीही एकमेकांचे हात धरून पायऱ्या चढत नव्हतं. प्रत्येक जण मस्तपैकी धबधबा बघून हरखून जात होतं. त्या जोडप्याला बघून खरोखर जाणवलं कि ह्या वयात आरोग्य कसं टिकवून ठेवायचं ते इकडच्या जेष्ठ नागरिकांकडून शिकावं. इथले जेष्ठ नागरिक सायकल चालवणे, हायकिंग करणे, बोट चालवणे इत्यादी गोष्टी लीलया करतात. 

असे अनुभव आले की जाणवतं “आयुष्य खरंच खूप सुंदर आहे फक्त ते, त्या चिंगऱ्या चिनी मुलांसारखं आणि त्या जर्मन आजी आजोबांसारखं जगता आलं पाहिजे!” 


#माझी_म्युनिक_डायरी

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

वाळवण

तुम्ही फेबुवर वेगवेगळ्या पाकशास्त्रीय समूहांवर (बापरे मलाच अवघड जातंय शुद्ध मराठीत वाचायला! रेसिपी गृप्स हो) उन्हाळी वाळवणं बघून आणि वाचून दरवर्षी मनातल्या मनात हळहळत असता की मला बै म्युनिकमधे वाळवण घालताच येत नाही. पण तरीही तुम्ही म्यानिफेष्टेशनचे रिळं बघून बघून मनातल्या मनात त्या महाकाय युनिव्हर्सकडे वाळवणाचं साकडं घालत असता की ह्यावर्षी जरा खरपूस ऊन पडू दे, ते गॅलरीत येऊ दे आणि मला वाळवण करता येऊ दे. 

कसंतरी तुमचं म्यानिफेष्टेशन त्या युनिव्हर्सकडे पोहोचतं आणि जून मधे चक्क एक आठवडा युरोपमध्ये उष्णतेची लाट येते. तुम्ही एक दिवस गॅलरीत येणाऱ्या उन्हाचा अंदाज घेता आणि ठरवता की चाहे कुछ भी हो जाये उद्या मी साबुदाण्याच्या पापड्या घालणारच! पण कसं असतं ना की जगात म्यानिफेस्ट करणारे करोडो लोक असतात आणि त्यात तुमच्या वर राहणारी शेजारीणही असते जिने तिची गॅलरी धुण्याचं म्यानिफेस्ट केलेलं असतं बहुतेक, त्यामुळे ती नेम धरून तुम्हाला पापड्या घालायच्या दिवशी सक्काळीच तिची गॅलरी धुवून मोकळी होते! ते सगळं घाण पाणी तुमच्या गॅलरीत येतं आणि तुमच्या वाळवण म्यानिफेस्टेशनचा धुव्वा उडतो. रिळं बघून दुसरं काय होणार म्हणा!!

बरं पापड्या घातल्या आणि वरच्या बाईने पुन्हा पाणी टाकलं किंवा तिच्या घरातला गालिचा झटकला तर!! ह्या विचारसरशी तुम्ही तुमचं “चाहे कुछ भी हो जाये" बाजूला ठेवता. पण म्यानिफेष्टेशन तुम्हाला काही गप्प बसू देत नाही! 

मग तुम्हाला मॅगी काकूंची आठवण येते. त्या असत्या तर त्यांनी काय केलं असतं बरं अशा वेळी? त्यांनी शेजाऱ्यांना पत्र दिलं असतं!  मॅगी काकूंचा वाण नाही पण गुण तुम्हाला लागलेला असतो. तुम्ही मुलाकडून जर्मनमधे एक पत्र लिहून घेता की ”ते घाण पाणी आमच्या गॅलरीत येऊ देऊ नका वगैरे" आणि लगोलग ते पत्र तुम्ही वरच्यांच्या दाराला लावून येता! 

“आलेत मोठे गॅलऱ्या धुणारे! बघतेच आता! अरे जर्मनीत असे लोक?? अरे त्या मॅगी काकू तर माझ्या घरातल्या दाराच्या आवाजावरून पोलीस बोलवायला निघाल्या होत्या आणि मी? सोडते का काय! येऊच दे आता घाण पाणी माझ्या गॅलरीत, नाही पोलीस बोलवले तर शपथ! वाटलं काय तुम्हाला मॅगी काकूंची शिष्य आहे मी!“ असे दमदार विचार करून तुम्ही उष्णतेच्या लाटेचा अंदाज घेता. ती आठवडाभर असल्याची खात्री झाल्यावर दुसऱ्याच दिवशी पापड्या घालण्याचा बेत पक्का करता. 

एवढी चाळीशी उलटूनही आईला सगळी पाककृती विचारल्याशिवाय तुम्हाला चैनच पडत नाही. बरं टीचभर गॅलरीत, बोटभर उन्हात घालून घालून किती पापड्या घालणार! पण तरीही, उत्साह असा की जसं काही मोठ्या गच्चीवर शे दोनशे पापड्या घालायच्या आहेत.

तुम्ही कसंतरी बटर पेपरवर तीस पस्तीस पापड्या घालता. पण हाय रे कर्मा, बरोब्बर त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोरदार वावटळीसारखं वारं वाहत असतं. कागद उडू नये म्हणून ठेवलेले सगळे डब्बेडुब्बे, भांडेकुंडे सारखे दणादण खाली पडत असतात. पूर्ण  दिवस तुम्ही फक्त कागदं आणि पापड्या उडू नयेत म्हणून ४० डिग्री उन्हात, टोपी आणि गॉगल घालून राखण करत बसता आणि तुमचं हे ध्यान बघून घरातल्यांचं मनोरंजन होतं ते एक वेगळंच. आपलं म्यानिफेष्टेशन अन दुसरं काय, नाही का? 

पण दुसऱ्या दिवशी कडकडीत वाळलेल्या साबुदाण्याच्या पापड्या बघून,  केलेले सगळे उपद्व्याप विसरून तुम्ही पुन्हा नवीन वाळवण घालण्याचे स्वप्न बघायला लागता. आणि काय आश्चर्य त्यानंतर जे ऊन पावसाचा खेळ सुरु होतो तो आजतागायत थांबलेला नसतो!! 

आणि तुम्ही ठरवता की रिळं बघून म्यानिफेष्ट करायचं नाही म्हणजे नाही!


#माझी_म्यूनिक_डायरी






रविवार, १३ जुलै, २०२५

उचकी

किस्सा परवाचाच आहे, शाळेतल्या उन्हाळी जत्रेविषयी आधीच इमेल आला होता. त्यामुळे त्या दिवशी दुपारचं जागरण करून कार्यक्रमाला जायचं पक्क ठरवलं होतं. पण आमच्यासारख्या फ्रिलान्सर लोकांचं आयुष्य म्हणजे असं असतं ना की आम्ही असा एखादा कार्यक्रम ठरवला की  त्याच्या आदल्या दिवशी रात्री नेम धरून प्रोजेक्टवाले लोक दबा धरून बसल्यासारखे कामाचा इमेल पाठवतात! त्यामुळे पहाटे उठून, प्रोजेक्टवर हजेरी दाखवून, दुपारची थोडा वेळ सुट्टी काढून जावं लागलं. 

तर मुलाच्या सूचनेबरहुकूम तयार होऊन मी त्याच्या शाळेत निघाले! सूचना - अमुक वेळेला घरातून निघ, तमुक वेळेला पोहोंच, जास्त मेकप करू नको (त्याच्या मुंजीत एकदा मेकप काय केला तेव्हापासून त्याने धसकाच घेतलाय माझ्या मेकपचा. म्हणलं बेट्या थांब थोडे वर्ष, तुझी बायको येऊ दे मग बघते तिचा मेकप! ), इत्यादी. 

बसमध्ये बसले, तसे पधंरा वीस लोक असतील, पण स्मशानशांतता होती बसमधे. तशी इथे अशा शांततेची सवयच आहे म्हणा, पण बस नेमकी रेल्वे क्रॉसिंगला थांबली आणि अक्षरशः टाचणी पडल्यावर आवाज येईल अशी शांतता बसमधे पसरली. बरं, अशा वेळेस आपल्याबरोबर काहीतरी घडलंच पाहिजे, नाही का! मला जोरदार उचकी लागली. उचकीबरोबर ढेकरही येईल असं वाटायला लागलं! आता बसमधले सगळे माझ्याकडेच नजर लावून बसले. चालक काका पण आरशातून बघायला लागले की ”कोण बाई आहे ही!” 

त्यात ती ट्रेन पण उशिराने धावत होती वाटतं, यायचं नाव घेईना! मी मनात देवाचा धावा करायला लागले की उचकी तरी थांबव, ढेकर येऊ देऊ नको, नाहीतर ट्रेन तरी पटकन येउदे. पण आपले धावे देव बाप्पा जरा उशिराच ऐकतात आणि त्यात नवीन गंमत करतात. एकीकडे मी कसनुसा चेहरा करून उचकी थांबवायचा प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे माझा फोन वाजत होता. ये क्या हो रहा है भगवान? 

हाय रे कर्मा! लेकाचा फोन होता. “आई कुठे तू? कार्यक्रम सुरु होतोय, ये ना लवकर!“ मी आपली उचकी देऊ, ढेकर थांबवू, त्याच्याशी बोलू, की बसमधल्या लोकांच्या नजरेचा मारा सहन करू? ह्या पेचात होते. ह्या विचारांमध्ये, उचकी आणि ढेकर दाबत लेकाला सांगितलं कसबसं मी आलेच पाच मिनिटात आणि फोन ठेवला. म्हणजे जर्मन लोकांच्या दृष्टीने जेवढ्या काय असंस्कृत गोष्टी आहेत त्या सगळ्या मी त्या बसच्या १० मिनिटाच्या प्रवासात केल्या होत्या! ते नाही का गच्च भरलेल्या विमानात, अलाहाददायक वातावरणात भस्सकन कोणी तरी लसणाच्या चटणीचा डबा उघडावा आणि सगळ्यांनी त्या माणसाकडे पाहावे, तसं काहीसं. 

त्यात एक मन वाटलं बस थांबलेलीच आहे पातकं खाली उतरून जावं. पण इथे तेही शक्य नाही. बळजबरी बसचं दार उघडायला जावं तर पोलिसमामांचं दर्शन घ्यावं लागायचं. 

शेवटी म्हणलं धरणीमाते घे ग बाई पोटात मला! पण बसमधून ती तरी कशी घेईल ना पोटात? तिने ठरवलं जरी की ही बस फोडून ह्या बाईला घेऊ पोटात तरी माझी सुटका झालीच नसती. आगीतून फुफाट्यात, जगात वर्ल्डफेमस असलेल्या जर्मन ब्युरोक्रसीवाल्यांनी पाताळातही पत्र पाठवून बेजार केलं असतं मला, आमची नुकसान भरपाई द्या म्हणून! आता काय सांगू तुम्हाला जर्मन लोकांचं पत्रप्रेम. 

पण देवाने माझा धावा ऐकला आणि ट्रेन आली, बस सुटली एकदाची. पुढच्याच स्टॉपलाच उतरायचं असल्यामुळे कशीबशी उचकी दाबत मी त्या शांत बसमधून खाली उतरले!

शाळेजवळच्या त्या चौकात कधी नव्हे ते इतक्या गाड्या होत्या की रस्ता ओलांडायला पाच सात मिनिट लागले. त्यात लेकाचे दोनदा फोन, “किती हळू चालतीये, ये ना लवकर!” मनात म्हणलं हा तोच मुलगा आहे ना, जो मला शाळेत येऊ नको म्हणून सांगत होता. पण त्याला बिचाऱ्याला तरी काय माहिती होतं म्हणा की शाळेत येऊन मी त्याला मीम मटेरियल देणार आहे ते!


#माझी_म्युनिक_डायरी

शनिवार, १२ जुलै, २०२५

मिम मटेरियल

तर त्याचं झालं असं की मुलाच्या शाळेत परवा उन्हाळी जत्रा होती, समर फेस्ट हो! म्हणलं ह्यावर्षी काहीही करून हजेरी लावायचीच, यंदा बारावीत आहे ना लेकरू. शाळेच्या कार्यक्रमामध्ये ह्या वर्षीच भाग घेईल. पुढच्या वर्षी तेरावीचा अभ्यास, परीक्षा ह्यातच दंग असेल ना. अरे हो हे सांगायचं राहिलंच की इथे तेरावी पर्यंत शाळाच असते. ज्युनियर कॉलेज, क्लासेस वगैरे भानगडी नसतात. तेरावीच्या परीक्षेनंतर सरळ विद्यापीठात प्रवेश घ्यायचा. 

तर, काल त्या जत्रेत मुलगा आणि त्याचे  ४-५ मित्रमैत्रिणी त्यांच्या  संगीत शिक्षिकेबरोबर एक छोटा सांगीतिक कायर्क्रम सादर करणार होते. त्यामुळे मोठ्या उत्साहात मी पटकन जेवण आटोपून शाळेत निघाले.

लेक शाळेच्या दारात वाट बघत उभाच होता. त्याच्या जर्मन मित्राची आई पण आली होती. आम्ही दोघी, माझं दिव्य जर्मन आणि तिचं दिव्य इंग्रजी अश्या भाषेत गप्पा मारायला लागलो. 

कार्यक्रम शाळेच्या आवारातच होता उन्हाळा असल्यामुळे. ऊन चांगलंच तापलं होतं म्हणून आम्ही दोघी एका झाडाखाली उभ्या राहिलो. बरेच पालकही तिथे होते. पण गर्दीमुळे आम्हाला काही आमची मुलं दिसेनात. झाडाखाली एका बाकावर एक एशियन ताई त्यांच्या मुलाचा कार्यक्रम पहात उभ्या होत्या. तशी आमच्या दोघींच्या डोक्यात एकाच वेळी आयडियाची कल्पना आली! 

मुलांचा कार्यक्रम सुरु होणार असं दिसलं आणि आम्ही दोघी त्या एशियन ताईंना म्हणालो की आता आमच्या लेकरांचा कार्यक्रम आहे आम्हाला उभं राहू द्या की बाकावर! त्या ताई आनंदाने खाली उतरल्या. आम्ही मस्त चपला बिपला काढून बाकावर उभ्या राहिलो. टिनेजर्सच्या आया शोभायाला नको होय! 

आणि आमच्या मुलाचं आमच्याकडे लक्ष गेलं. दोघांनीही मान  “नाही, नाही" करून हलवली, इकडेतिकडे पाहिलं, त्यांच्याकडे कोणी पहात नाहीये ना ते बघितलं, ते आम्हाला अजिबातच ओळखत नाहीत असा भाव चेहऱ्यावर आणला आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले. आम्ही दोघी फक्त एकमेकींकडे  बघून हसलो. आता मुलांचा कार्यक्रम रेकॉर्ड करायचा म्हणल्यावर बाकावर चढावंच लागणार ना!

नंतर दोघेही आमच्याशी बोलले नाहीत ती गोष्ट वेगळी! एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मुलांना लाजवणाऱ्या आया देशोदेशी असतातच, फक्त भारतात नाही काही. 

घरी आल्यावर लेक म्हणाला “आई, सिरियसली? बाकावर उभ्या राहिल्या तुम्ही? ते पण चपला काढून ((चपला काढल्याचा काय संबंध आहे देव जाणे!)  तूच माझ्या मित्राच्या आईला म्हणाली असशील ना आपण बाकावर उभ्या राहू म्हणून (अपनी माँ को बहुत अच्छी तरह पहचानता है बच्चा!). तरी मी म्हणत होतो तू नको येऊ  कार्यक्रमाला म्हणून!. आमचच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, बाकीचे सगळे शिक्षक पण तिथेच होते. काय म्हणत असतील ते? आता घ्या, मिम मटेरियल दिलंय तुम्ही दोघींनी आमच्या मित्रांना!” 

मी म्हटलं “चलो ईस बहाने हम मिम में झळकेंगे!! मला नक्की दाखव हां तुझ्या मित्रांनी तयार केलेलं मिम!” तर लेकाने कपाळावर हात मारला आणि अभ्यासाला बसला! 

हॅशटॅग- आमच्या इथे टिनेजरला एम्बॅरस करायचे क्लासेस घेतले जातील!!


#माझी_म्युनिक_डायरी

मंगळवार, १० जून, २०२५

रांगोळी

आज दारात रांगोळी काढत होते तर समोरच्या जर्मन ताई बाहेरून आल्या आणि म्हणाल्या “फारच सुंदर! हे काय आहे? तू हे आकार कशाने काढतेस आणि का काढतेस?“ मग त्यांना समजावून सांगितलं की आमच्याकडे रोज दारात सडारांगोळी करायची पद्धत आहे पण मी इथे सणावाराला काढते दारात रांगोळी, वगैरे वगैरे. रांगोळी काय असते हे ही सांगितलं. त्या पुन्हा “छानच दिसतेय” म्हणाल्या आणि त्यांच्या घरात गेल्या आणि मला मॅगी काकूंची आठवण आली. त्यांनाही असंच रांगोळीविषयी ज्ञान दिलं होतं मी! तेवढं “ळ” म्हणायला शिकवायचं राहिलंच त्यांना. 

पण माझ्या बाळबोध रांगोळीला जर्मन बायका फारच सुंदर वगैरे म्हणाल्या हे ऐकून भरूनच आलं! माझ्या रांगोळ्या जर भारतात कोणी पाहिल्या तर नाकं मुरडतील. म्हणजे मीच जर पाहिली तिऱ्हाईत म्हणून तर मीच नाक मुरडेल, हाय काय अन नाय काय!

इथे आल्यापासून रांगोळी काढायची सवयच मोडली. आईच्या भाषेत सांगायचं झालं तर पुण्यात असताना कसं का होईना दारापुढे दोन फट्टे ओढले जायचे. म्युनिकला आल्यापासून सणावाराला दारात छोटीशी रांगोळी काढते  रिळं बघून. त्यातल्या काही रांगोळ्या काढल्या की त्या बघून असं वाटतं की लहानपणीसारखं ही पुसून पुन्हा नवीनच काढावी. पण आता आपण लहान नाही आणि तेव्हासारखं सणावाराला रांगोळी काढणे हे एकच काम नाही आपल्याला हे लक्षात येतं आणि मी त्या बाळबोध रांगोळीकडे दुर्लक्ष करून पुढच्या कामाला लागते. 

मागच्या वर्षी आईकडे गेले तेव्हा असंच दारात रांगोळी काढत होते आणि आईने ती चक्क लक्ष देऊन पाहिली आणि मला म्हणाली “बेटा तू गोपद्म उलटे काढलेस ना!” तिला म्हणलं “आईगं, मी चाळीशी पार केल्यावर तुझ्या लक्षात आलं की मी गोपद्म उलटे काढतेय ते!“ तर म्हणे “मी इतके दिवस लक्षच देत नव्हते तू कशी रांगोळी काढतेय ते!” म्हणलं “हे बरंय! मी चिमुरडी असल्यापासून रांगोळी काढतेय अन तुझं लक्षच नव्हतं!“ आईचं हे असं असतं. 

रांगोळी म्हणलं की लहानपणी भावाच्या मुंजीत सगळं सोडून मी घरी पळाले होते ते आठवतं! का? तर मला चार वाजता सडारांगोळी करायची होती म्हणून! दादा मुंजीहून घरी आला की त्याला मस्त वाटेल म्हणून. नवीन फ्रॉक सगळा खराब करून घेतला आणि तेवढ्यात कोणीतरी मला कार्यालयातून शोधायला आलं. अगं फोटो काढायला चल म्हणून. दादाच्या मुंजीतल्या सगळ्या फोटोंमधे मी अवतारात आहे एकदम!

रांगोळी हा विषय माझ्यासाठी खासच आहे. इथे जास्त रांगोळी काढत नाही आणि त्यामुळे सराव राहिला नाही त्याची खंत वाटत राहते. दिवाळीच्या आधी केलेली रंगाची खरेदी, अपार्टमेंटमधे सगळ्यांनी आपापल्या दारात चढाओढीने काढलेल्या रांगोळ्या, प्रत्येक सणाला ठरवून, सराव करू  काढलेली रांगोळी, सगळं डोळ्यांसमोर तरळून जातं! 

पण एक नक्की आहे, बाळबोध का होईना पण रांगोळ्या काढत राहायच्या अधूनमधून हे मात्र पक्क ठरवलं आहे क्यूँ की दिल तो बच्चा है जी!


#माझी_म्युनिक_डायरी

गुरुवार, १३ मार्च, २०२५

चुकीला माफी नाही

मागच्या आठवड्यात इथे कार्निव्हलची सुट्टी होती आठ दिवस. सोमवारी शाळा सुरु झाल्या. आत्ता ही बातमी वाचली की एका विमानतळावर २१ मुलांना पोलिसांनी शाळेच्या परवानगीशिवाय सुट्टीवर फिरतांना पकडलं आणि त्यांच्या आईवडिलांना १००० युरोचा दंड ठोठावला. सगळी मुलं आईवडिलांसोबत होती. खरंतर अशा बातम्या इथे नवीन नाहीत. बऱ्याच भारतीय लोकांनाही असा दंड भरावा लागला आहे. 

जर्मनीत साधारणपणे प्रत्येक ऋतू बदलला आठ किंवा पंधरा दिवसांची सरकारी सुट्टी शाळांना असते आणि सरकारी सुट्टीला जोडून सुट्टी कधीच मिळत नाही कारण काय तर म्हणे “कायदा” आहे. जर तशी सुट्टी पाहिजे असे तर शाळेकडून रितसर परवानगी पत्र घेऊन फिरावं लागतं. ह्यावर सरकारने असं कारण दिलंय की शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मुलभूत हक्क आहे आणि पालकांनीही गोष्ट कसोशीने पाळलीच पाहिजे. 

सरकारी सुट्टीशिवाय तुमचं मूल घरी असेल तर एकतर ते आजारी असणार किंवा त्याने शाळेकडून एखाद्या कामासाठी परवानगी पत्र घेतलेलं असणार. असं काही नसेल तर मग अवघड असतं. कारण शाळा सुरु असताना एखादं लेकरू उंडारत असेल तर पोलिसांना त्याला जाब विचारायचा अधिकार आहे. 

आम्ही म्युनिकला आलो तेव्हा आम्हाला ह्या गोष्टीची कल्पनाच नव्हती. मी आपलं मनात गणित करून ठेवलं होतं की नाताळच्या सुट्टीला जोडून १५ दिवस सुट्टी घ्यायची आणि भारतात जाऊन यायचं. मला वाटलं पुण्यातल्या सारखं शाळेत रजेचा अर्ज दिला की झालं. मी मुलाच्या हातून अर्ज पाठवला आणि त्याच्या बाईंनी मला सरळ भेटायलाच बोलावलं! मी बुचकळ्यात पडले की रजेचा अर्जच तर दिला त्यात भेटायचं कशाला? मी काय पाप केलं! 

बाईंना भेटले तर त्यांनी मला नियमपत्रिका दाखवून समजावलं की कायद्यानुसार तुम्हाला सुट्टीला जोडून सुट्टी मिळणार नाही. तरी मी यंटमसारखं त्यांच्या मागेच लागले पण बाई कट्टर जर्मन आहेत आणि जर्मन लोकांइतके नियम पाळणारे लोक जगात नाहीयेत ह्याचा मला प्रत्यय आला आणि मी तो विचार तेव्हा सोडला. 

पण असा यंटमपण करायची लहर मला अधूनमधून येतच असते. ह्यावर्षी मुलाची दहावी झालीये तर मला वाटलं नियम जरा शिथील झाला असेल म्हणून मी पुन्हा त्याच्या गुरुजींच्या मागे लागले की त्याला नाताळच्या सुट्टीला जोडून सुट्टी द्या म्हणून. माझ्या सततच्या इमेल्सला वैतागून गुरुजींनी हात टेकले आणि ते मुलाला म्हणाले ”तुझ्या आईला समजव बाळा, मी थकलो आता! त्यांना सरकारी नियम दाखवला तरी त्या ऐकत नाहीत! त्यांना सांग तुम्हाला १००० युरो भरायचे असतील तर खुशाल सुट्टी टाका!”

मग काय लेकानेही घरी येऊन शाळा घेतली माझी आणि ठणकावून सांगितलं की चुकीला माफी नाही बरं आई!! म्हणलं हे बरंय गुरुची विद्या गुरुलाच. 

तरी बरं आमच्यावेळी असा काही नियम नव्हता, नाहीतर  आईवडिलांनी शाळेत घालायच्या ऐवजी दिलं असतं शेतात पाठवून, गुरं वळायला! हाय काय अन नाय काय. 



#माझी_म्युनिक_डायरी

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

वो स्त्री है

तर त्याचं झालं असं की आज लेकाबरोबर त्याचा ट्रेनचा वर्षभराचा पास काढायला गेले होते. चक्क तिथे जास्त गर्दी नव्हती, नाहीतर हे मोठ्ठी रांग असते. तरीही त्या ऑफिसमधे अकरा काउंटर्सच्या समोर लोक होते आणि आतमधे ३-४ लोक त्यांच्या नंबरची वाट बघत घुटमळत होते. आम्हाला वाटलं आपण दारात आहोत, आपल्याकडे टोकन आहे आपण आत जाऊ शकतो कारण आतमधे बसायला खुर्च्या असतात. पण दारातल्या दरबान ताईंनी आम्हाला अडवलं अन म्हणे “आत गर्दी आहे, मी सांगेलं तेव्हाच आत जायचं!“ 

गर्दी!!! अकरा आणि चार पंधरा लोक म्हणजे गर्दी? ह्या लोकांना कुंभमेळ्यातच घेऊन यावं वाटतंय मला. गर्दी काय असते ते कळलं असतं त्यांना आणि पुण्यही मिळालं असतं, त्यांना आणि मलाही! तर अशा प्रकारे त्या ऑफिसमधली २ माणसांची गर्दी बाहेर आली आणि मग आम्हाला ताईंनी आत सोडलं. 

आमचा टोकन नंबर डिस्प्ले झाला आणि त्या काउंटरवर साठीतल्या ताई! त्या म्हणाल्या ओळखपत्र दाखवा आणि माझं धाबं दणाणलं. म्हणलं लेकाचं तिकीट असलं तरी कागज तो मेरेभी दिखाने पडेंगे. कागज आणायची सपशेल विसरले होते मी! बरं आपण पडलो टॅक्सपेयर्स, जगात आपण कुठेच म्हणू शकत नाही “कागज नहीं दिखायेंगे!”

त्यांना म्हणलं “हे बघा कागज तो घरपे है लेकीन मेरे पास डिजिटल कापी है ना! देखो” मनात देवाचा धावा करत होते की ह्या ताई जर्मन नसाव्यात. कारण जर्मन लोकांचं कागदांवर भारी प्रेम. कागदी नोटा, सरकारी पत्रव्यवहार, घरमालकांचा भाडेकरूंशी सवांद इत्यादी इत्यादी सगळं कागदी पाहिजे. मग माझे पारपत्र कसे बरं चालेल डिजिटल? 

पण माझ्या आणि लेकाच्या सुदैवाने ताईंनी माझ्या पासपोर्टची डिजिटल कापी बघून मान्य केलं की ह्याचा कागदी तुकडा ह्या बाईकडे आहे आणि तिने लेकाच्या पासची प्रक्रिया पूर्ण केली आणि आमचा जीव भांड्यात पडला. 

आम्ही दोघे मेट्रोने घराजवळच्या स्टेशनला आलो आणि स्टेशनमधून  वर येऊन बसची वाट बघायला लागलो. इथे जवळच मॉल आहे आणि तिथेच किराणा दुकान पण आहे. मनात विचार आला की आता मॉलच्या इतक्या जवळ आलोय तर कमीत कमी दूध तरी घेऊन जाऊ. म्हणून लेकाला म्हणलं की चल जरा दूध घेऊ आणि तसेच चालत घरी जाऊ. तर त्याने वर्मावरच बोट ठेवलं, म्हणे की तू दूध घ्यायला म्हणून नेतेस आणि दोन तीन पिशव्या भरून सामान खरेदी करतेस. कंटाळा येतो मला! 

आमचा वादविवाद चालू असतांनाच बस आली. लेकरू माझी वाटही न बघता बसमधे जाऊन बसलं. त्याला वाटलं न जाणो आईने दूध आणायला नेलं तर! मग मी ही बसले त्याच्यासोबत बसमधे. म्हटलं ज्युनिअर पुराणिक नाही म्हणाले म्हणून काय झालं, सिनिअर पुराणिक कधीच नाही म्हणणार नाहीत माझ्याबरोबर यायला! 

बस निघणार तितक्यात एक पन्नाशीच्या ताई धापा टाकत आल्या आणि मोठमोठ्या कोकच्या दहा बाटल्या असलेलं पाकीट त्यांनी बसच्या दारात ठेवलं. बसचालकासकट सगळ्या प्रवाशांनी जरा त्रासिक कटाक्ष टाकले कारण ताईंनी ते पाकीट असं काही दारात ठेवलं की बसचे दार ते पाकीट हलवल्याशिवाय लागणारच नाही. ते पाकीट ठेवून ताई “आलेच हं" म्हणून कोणाला काही कळायच्या आत पटकन निघूनही गेल्या!

ताई पुन्हा धापा टाकत आल्या तर एका हातात पुन्हा दहा बारा पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचं पाकीट आणि एका हातात मोठी पिशवी घेऊन आत आल्या आणि बसचालकाला म्हणाल्या ”चला आता!” बसचालकाच्या चेहऱ्यावर भाव “हो तुमच्या घरचीच बस आहे, निघतो हां मॅडम!” 

स्थिरस्थावर झाल्यावर ताईंनी सगळ्यांना जे कारण सांगितलं ते ऐकून बसमधल्या माझ्यासहित सगळ्या बायकांनी मनोमन मान्य केलं की ताई तुमचं बरोबर आहे आणि पुरुषांनी हात टेकले! ताई म्हणाल्या “काही नाही इथे दुकानात फक्त ब्रेड घ्यायला आले होते हो, पण तिथे गेल्यावर इतक्या गोष्टी घ्यायच्या आहेत हे लक्षात आलं त्यामुळे हे एवढं सामान झालंय बघा!!”

चिरंजीवांनी माझ्याकडे मिश्किल कटाक्ष टाकला. तेवढ्यात आमचा स्टॉप आला, तर ताई पण इथेच उतरणार होत्या. लेक स्वतःहून त्यांना म्हणाला “ते पॅकेट्स द्या इकडे, मी मदत करतो तुम्हाला." माझी कॉलर ताठ! त्यांचं सामान घेऊन आम्ही खाली उतरलो तर त्या म्हणाल्या “धन्यवाद लेकरा, माझा मुलगा येतोय मी थांबते इथेच.” तर लेक म्हणतो कसा “अहो आम्ही इथेच राहतो मी घेतो पॅकेट्स. तुम्ही कोणत्या बोल्डिंगमध्ये राहता? मी येतो तुमच्यासोबत.” ताई खुश. 

लेक त्यांना सोडून आला आणि म्हणाला ”आई तुम्ही आईलोक म्हणजे ना! त्यांचा मुलगा आत्ता त्यांना म्हणत होता की आई तू फक्त ब्रेड आणायला गेली होतीस ना? हे काय आहे सगळं?” 

मी फक्त डोळे मिचकावले!! मी काय बोलणार नाही का? क्यूँ की मैं  भी तो एक स्त्री हूँ!!


#माझी_म्युनिक_डायरी 

वाचकांना आवडलेले काही