तर त्याचं झालं असं की मुलाच्या शाळेत परवा उन्हाळी जत्रा होती, समर फेस्ट हो! म्हणलं ह्यावर्षी काहीही करून हजेरी लावायचीच, यंदा बारावीत आहे ना लेकरू. शाळेच्या कार्यक्रमामध्ये ह्या वर्षीच भाग घेईल. पुढच्या वर्षी तेरावीचा अभ्यास, परीक्षा ह्यातच दंग असेल ना. अरे हो हे सांगायचं राहिलंच की इथे तेरावी पर्यंत शाळाच असते. ज्युनियर कॉलेज, क्लासेस वगैरे भानगडी नसतात. तेरावीच्या परीक्षेनंतर सरळ विद्यापीठात प्रवेश घ्यायचा.
तर, काल त्या जत्रेत मुलगा आणि त्याचे ४-५ मित्रमैत्रिणी त्यांच्या संगीत शिक्षिकेबरोबर एक छोटा सांगीतिक कायर्क्रम सादर करणार होते. त्यामुळे मोठ्या उत्साहात मी पटकन जेवण आटोपून शाळेत निघाले.
लेक शाळेच्या दारात वाट बघत उभाच होता. त्याच्या जर्मन मित्राची आई पण आली होती. आम्ही दोघी, माझं दिव्य जर्मन आणि तिचं दिव्य इंग्रजी अश्या भाषेत गप्पा मारायला लागलो.
कार्यक्रम शाळेच्या आवारातच होता उन्हाळा असल्यामुळे. ऊन चांगलंच तापलं होतं म्हणून आम्ही दोघी एका झाडाखाली उभ्या राहिलो. बरेच पालकही तिथे होते. पण गर्दीमुळे आम्हाला काही आमची मुलं दिसेनात. झाडाखाली एका बाकावर एक एशियन ताई त्यांच्या मुलाचा कार्यक्रम पहात उभ्या होत्या. तशी आमच्या दोघींच्या डोक्यात एकाच वेळी आयडियाची कल्पना आली!
मुलांचा कार्यक्रम सुरु होणार असं दिसलं आणि आम्ही दोघी त्या एशियन ताईंना म्हणालो की आता आमच्या लेकरांचा कार्यक्रम आहे आम्हाला उभं राहू द्या की बाकावर! त्या ताई आनंदाने खाली उतरल्या. आम्ही मस्त चपला बिपला काढून बाकावर उभ्या राहिलो. टिनेजर्सच्या आया शोभायाला नको होय!
आणि आमच्या मुलाचं आमच्याकडे लक्ष गेलं. दोघांनीही मान “नाही, नाही" करून हलवली, इकडेतिकडे पाहिलं, त्यांच्याकडे कोणी पहात नाहीये ना ते बघितलं, ते आम्हाला अजिबातच ओळखत नाहीत असा भाव चेहऱ्यावर आणला आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले. आम्ही दोघी फक्त एकमेकींकडे बघून हसलो. आता मुलांचा कार्यक्रम रेकॉर्ड करायचा म्हणल्यावर बाकावर चढावंच लागणार ना!
नंतर दोघेही आमच्याशी बोलले नाहीत ती गोष्ट वेगळी! एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मुलांना लाजवणाऱ्या आया देशोदेशी असतातच, फक्त भारतात नाही काही.
घरी आल्यावर लेक म्हणाला “आई, सिरियसली? बाकावर उभ्या राहिल्या तुम्ही? ते पण चपला काढून ((चपला काढल्याचा काय संबंध आहे देव जाणे!) तूच माझ्या मित्राच्या आईला म्हणाली असशील ना आपण बाकावर उभ्या राहू म्हणून (अपनी माँ को बहुत अच्छी तरह पहचानता है बच्चा!). तरी मी म्हणत होतो तू नको येऊ कार्यक्रमाला म्हणून!. आमचच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, बाकीचे सगळे शिक्षक पण तिथेच होते. काय म्हणत असतील ते? आता घ्या, मिम मटेरियल दिलंय तुम्ही दोघींनी आमच्या मित्रांना!”
मी म्हटलं “चलो ईस बहाने हम मिम में झळकेंगे!! मला नक्की दाखव हां तुझ्या मित्रांनी तयार केलेलं मिम!” तर लेकाने कपाळावर हात मारला आणि अभ्यासाला बसला!
हॅशटॅग- आमच्या इथे टिनेजरला एम्बॅरस करायचे क्लासेस घेतले जातील!!
#माझी_म्युनिक_डायरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा