मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

फिलिंग भारतात असल्यावानी...

महत्वाच्या कामासाठी घरातून निघायलाच उशीर होणे. 
म्यूनिचमध्ये आल्यापासून पहिल्यांदाच चक्क ट्रॅफिक जॅम मध्ये बस अडकणे आणि कर्मधर्मसंयोगाने तुम्ही त्याच बसमध्ये असणे. पंधरा मिनिटांच्या प्रवासाला एक-सव्वा तास लागणे. 
बसमधील प्रामधारी लेकराने ट्रॅफिक जॅमला कंटाळुन पुर्ण प्रवासभर रडका सूर आळवूण समस्त बसवासियांचे मनोरंजन करणे. बसवासियांनी आणि  बसचालकाने वेगवेगळे लूक देऊनही प्रामधारी लेकराची आई स्थितप्रज्ञ असणे.
त्या प्रामधारी लेकराच्या माऊलीची सहनशक्ती पाहुन तुमच्या सहनशक्तीविषयी (लेकासाठी असलेली) तुम्हाला प्रचंड कॉम्प्लेक्स येणे.
कसंतरी ट्रॅफिक जॅममधुन बाहेर पडून, स्टॉपवर उतरून, बावळटसारखं सायकल ट्रॅकवरच उभं राहुन भारतीय दूतावासाचा पत्ता शोधणे आणि मागुन आलेल्या सायकलवाल्याने "काय अडाणी बाई आहे" असा लुक देणे. 
बरोबर वेळेवर इंटरनेट आणि गुगल मॅप्स लोड व्हायला उशीर झाल्याने पत्ता शोधत चारीही दिशांना भटकणे आणि गुगल मॅप्स लोड झाल्यावर तुमच्या लक्षात येणे की तुम्ही बरोबर उलट्या दिशेला अर्धा किलोमीटर पुढे गेलेले आहात. म्हणून पुन्हा आल्या पावली परत जाणे. 
भारतीय दूतावासासमोरील तिरंगा पाहून मन भरून येणे. 
कामाची वेळ संपायच्या फक्त वीस मिनिटे आधी ऑफिसला पोहचणे आणि तिथला अधिकारी फॉर्म घेण्याच्या खिडकीत नसणे. तुमच्या आधी आलेल्या बऱ्याच लोकांनी टोकन मशीन मधुन वचावचा(एकाच वेळी फर्रर्रर्रर्र करून ३-४ टोकन) टोकन घेणे आणि त्यातले एक टोकन जवळ ठेऊन बाकीचे कचऱ्यात टाकणे. कचऱ्याचा डबा वेगवेगळ्या कागदपत्रांनी आणि टोकन्सनी भरून वाहणे, इतस्ततः कागदी कचरा सांडलेला असणे. 
एक महाभाग तुमच्या बाजुलाच येऊन बसणे ज्यांना फॉर्म कसा भरायचा हे माहित नसणे. त्यांनी प्रत्येक वाक्याचा तुम्हाला अर्थ विचारणे आणि सांगितल्यावर,  वाक्यागणिक म्हणणे "ये सही तो है ना? नही तो मुझे फिरसे नया फॉर्म भरना पडेगा." 
.  
पाच मिनिटांनी अधिकाऱ्याचे आगमन होणे आणि तुमच्या आधी अख्ख एक कुटुंब (हम दो हमारे दो) पासपोर्ट रिन्यू करायला असणे. त्या अधिकाऱ्याची आणि कुटुंबप्रमुखाची आधी इंग्लिशमध्ये सुरुवात होऊन नंतर राष्ट्रभाषेमध्ये शाब्दिक बाचाबाची होणे. 

अ: This form is not properly filled. 
कुप्र : Its okay, I will fill that now. You please check other forms. 
अ: What is this? Birth place की जगह birth date लिखा है आपने. बच्चे के नाम के जगह अपना नाम लिखा है. ये फोटो किस साईज के है? ५ बाय ५ के चाहिये. आपके वाईफकी सिग्नेचरकी जगह आपने अपने सिग्नेचर किये है. 
कुप्र: सर एकही फॉर्म मी गलती हुई है आप अड्जस्ट कर लिजिए ना. 
अ: एक फॉर्म में नही सभी फॉर्म में गलत है. आप लोग ऐसे कुछ भी फॉर्म भरके लेके आते हो और हमें गलिया देते हो कि पासपोर्ट गलत छपवाया. आप कल आईये. 
कुप्र: सर प्लिज देखिये ना कुछ अड्जस्ट होता है तो. बच्चे लेकर इतनी ठंडमें फिरसे आना पडेगा. 
अ: नही भाई, टाईम खतम हो गया, आप कल आईये. 
अशा प्रेमळ संवादानंतर, तुमचा टोकन नंबर स्क्रीनवर झळकणे आणि वैतागलेल्या अधिकाऱ्याने तुमचा फॉर्म नीट न पाहताच, हे नाहीये ते नाहीये उद्या या असे राष्ट्रभाषेतच सांगणे. तरीही दिल चाहता है मधील सैफ सारखे तुम्ही मध्ये मध्ये काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणे आणि तो फसणे. जसं की -

अ: ये क्या है? यहाँ सिग्नेचर क्यु नहीं है?
मी: लेकीन ये तो... 
लगेच अ: ये विजा पुराना है 
मी: आप ठिकसे.. 
लगेच अ: कार्ड की कॉपी नही है
मी: मगर हमें तो... 
लगेच अ: मॅडम टाईम खतम हो गया, आप कल आईये. 

आणि खिडकी बंद होणे. 
"आ बैल मुझे मार" या उक्तीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नवऱ्याला स्वतःच फोन लावुन वरील अनुभवाचे कथन करणे आणि त्याच्या शिव्या खाणे. 
मी तेच म्हटलं, खुप दिवसांपासून फार चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं मला. आज कळालं मी काय मिस करत होते ते!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                                          #rajashrismunichdiaries

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

धडा

आजच WA वर "vitamin N" असा काहीतरी व्हिडीओ पाहिला. मुलांना "नाही" ऐकायची सवय लावा वगैरे वगैरे; कुठलेतरी फॉरेनचे काका सांगत होते म्हटल्यावर आपल्याकडचे लोक आवर्जुन शेअर करणार. आमच्यासारखे पालक मुलांनी काही मागायच्या आतच नाही म्हणून मोकळे होतात आणि बरेचसे भारतीय पालक मुलांना फक्त नाहीच ऐकवतात हे त्या काकांना माहित नसावं बहुधा.

तर हे "नाही" म्हणण्यावरून इथे आल्यानंतरची पहिली मॉल व्हिजिट आठवली. लेक तसा लहान होता तेव्हा आणि भारतीय विचारसारणीचाही होता (आता जर्मन रुलबुक घेऊन फिरतो आणि आम्हा दोघांना शिकवत राहतो ती गोष्ट वेगळी). इथे शनिवारीच काय असेल नसेल ती खरेदी करावी लागते; रविवारी एकही मॉल अथवा दुकान उघडं नसतं. सुट्टी म्हणजे सुट्टी. शनिवारी आम्ही आपले मॉल फिरायच्या उद्देशाने बाहेर पडलो. तर लेकाने ट्रेनमध्येच भुणभुण सुरु केली. " मग तिथे तु मला काय घेऊन देणार ते सांग तरच मी येतो." मी म्हटलं " तु चल तर मग बघु ". पण त्याने तिथे जाईपर्यंत भुणभुण चालुच ठेवली. शेवटी मी रागावलेच त्याला. मग जरा शांत बसला. पण आम्हा मायलेकाचा हा प्रेमळ संवाद ऐकून ट्रेनमधील जनता भारावून गेली.

त्या मॉलमध्ये स्टेशनवरून आत जायचा रस्ता एका मोठ्या दुकानातून जातो. आणि बरोबर तिथेच त्यांचं खेळण्यांचे सेक्शन आहे. झालं, आम्ही आत शिरलो कि लेकाला खेळण्यांचे सेक्शन दिसलं आणि तो तिकडेच धावला. हेच घ्यायचं, तेच घ्यायचं, नाहीतर मी पुढे येतच नाही, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीला "नाही" एवढंच म्हणत होतो. त्याला जरा समजावलं की सध्या तु इथून चल आपण जाताना बघु. कसंतरी निघाला तो तिथुन. पण पुढे मी ज्या ज्या दुकानात जात होते त्या प्रत्येक दुकानात त्याने अक्षरशः जीव नकोस केला.

शेवटी माझ्या सहनशक्तीच अंत झालाच आणि मी जरा जोरात त्याला रागावले आणि थोडा हात उगारल्यासारखं केलं (माझं नशीब जरा बरं असावं त्या दिवशी म्हणून मी त्याला धपाटा नाही घातला पाठीत, नाहीतर..). त्याने लगेच रडायला सुरुवात केली म्हणुन आम्ही एका ठिकाणी बसलो आणि त्याला शांत करायला लागलो तर आम्हाला दिसलं की एक पोलीस मामा आमच्याकडेच पाहत आहेत. आम्हा दोघांची जाम टरकली. म्हंटल कोणी कंप्लेंट केली की काय आमची. इकडच्या लोकांचं काही सांगता येत नाही. इथले कायदे पण भारी आहेत. "मुलांना मारायचं नाही" हा कायदा आहे. त्यासाठीही तुम्हाला शिक्षा होते. रस्त्यावर जर एखादे आजोबा/आजी चुकून चालताना पडले किंवा कोणाचा तरी ऍक्सीडेन्ट झालाय आणि तुम्ही तिथे असाल आणि तुम्ही त्यांना मदत केली नाही तर तुम्हाला कायद्याने शिक्षा होते.

आम्ही आपलं घाबरलेल्या अवस्थेत कसंतरी लेकाला समजावलं आणि तिथून पोबारा केला. स्टेशनवर पोहोचलो तर नेमकी ट्रेन आताच गेलेली आणि पुढची ट्रेन यायला १० मिनिट. तिथे बसलो तर पोलीस मामा तिथे आले. त्यांची संशयित नजर आमच्यावर रोखलेली आणि त्यात लेकाची भुणभुण सुरूच. त्यात पुन्हा नवऱ्याचं अजून तिसरच, "तरी मी तुला सांगत असतो, त्याच्यावर चिडत जाऊ नकोस, तू ऐकशील तर शपथ." आता जर का लेक सतत तुमच्या कानाशीच "आई, आई" करत असेल तर आणि पूर्ण मॉलभर तुमच्या जॅकेटला (ओढणी नसल्यामुळे) पकडून मागमागे भुणभुणत हिंडत असेल तर कितीवेळ पेशन्स टिकणार, नाही का?

मी आपला मनात देवाचा धावा करत होते "देवा पोलीस मामाला इथून घेऊन जा रे बाबा". पण कर्माची फळं इथेच भोगावी लागतात म्हणे त्यामुळे देवही धावला नाही. आणि पोलीस मामाच आले धावून.. म्हणजे ते न राहवून आले जरा आमची विचारपुस करायला. त्यांनी सरळ लेकालाच जर्मन मधून प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण पुन्हा माझं नशीब आडवं आलं, लेकाला तेव्हा जर्मनचा ज पण येत नव्हता.. हुश्श.. नाहीतर आईच्या पापांचा पाढा वाचला असता त्याने जर्मनमध्ये. असो.

पोलीस मामाना इंग्लिश फार चांगली येत नसल्यामुळे कसबसं तोडकंमोडकं "Is everything okay?" असं लेकाला त्यांनी विचारलं. आणि आमच्या सुपूत्रांनी त्या वेळी अक्षरशः आमच्यावर उपकार केले आणि म्हणाले " yeah fine." आम्ही कानात प्राण आणुन ह्याच उत्तराची वाट पाहत होतो दोघे, कारण जर लेक नाही म्हणाला असता तर पुढे काय झाले असते ते पोलिस मामाच जाणे. इथे मुलांना आधी विचारतात, आईबापाला नाही. मुलांनी आईबाप चांगले आहेत हे एकदा अप्रूव्ह केलं की "कोई माईका लाल आईबापको बुरा नाही बोल सकता!!" लेकाच्या उत्तराने समाधान होऊन पोलिसमामा शेवटी त्यांच्या वाटेने निघुन गेले आणि आम्ही "वसुदेव व देवकी" होता होता वाचलो.

तर इथे मी फार मोठा धडा शिकले कि मुलांचा कितीही राग आला तरी पब्लिक प्लेसमध्ये हसत हसत मराठीत रागवायचं किंवा मुलगा आणि त्याचे बाबा हे आपल्याबरोबर नाहीतच असं समजायचं, जमतं ते!! आई मुलांना रागावणार नाही, असं कधी होत असत का??


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #rajashrismunichdiaries

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

निर्णय

  एखाद्या माणसाच्या आयुष्यात कधीकधी खुप निर्णायक क्षण येतात जिथे त्याच्या समोर दोन पर्याय असतात आणि त्यातला एक निवडणं त्या क्षणी अत्यंत महत्वाचं असतं. अगदी जीवन मरणाचा प्रश्नच म्हणू या ना, त्या माणसासाठी तरी अशीच परिस्थिती असते त्या वेळी. तो, ज्याने त्या निर्णायक क्षणापर्यंत खुप कष्ट घेतलेले असतात, त्या एका गोष्टीसाठी वाट पाहिलेली असते. आणि एका हताश वेळी, ती गोष्ट त्याच्यासमोर येते पण अजून एक पर्याय घेऊन, जिथुन पुढे त्याला दोन रस्ते दिसत असतात. रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. पण तरीही एक पर्याय निवडणं ही त्या क्षणाची फार मोठी परीक्षा असते. तशा या परीक्षा थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात आणि स्वतःच्या परीने माणुस ती परीक्षा पास अथवा नापास होत असतो.

 तर, त्याच्याही आयुष्यात ही परीक्षेची वेळ आली. तो, एक उच्चशिक्षित मध्यमवर्गीय तरुण, ज्याला आईवडिलांनी खूप कष्टाने शिकवलं पण नोकरी मिळवण्यासाठी त्याला फार कष्ट पडले आणि त्याच दरम्यान तो निर्णायक क्षण त्याच्या आयुष्यात आला. नोकरी मिळत नसल्याने खूपच हताश झाला होता तो, तेव्हाच वडिलांच्या एका स्नेह्यांनी त्याच्या गावी एका कंपनीमध्ये त्याच्यासाठी शब्द टाकला. २ दिवसांनी त्या कंपनीमध्ये त्याची मुलाखत ठरली. त्या वेळी तो पुण्यात एका कोर्ससाठी रहात होता. कोर्स पूर्ण करुन नोकरीसाठी अर्ज करणे चालुच होतं त्याचं पण कुठूनही प्रतिसाद येत नव्हता. तेवढ्यात त्याला वडिलांनी गावी ये म्हणून सांगितलं.

  त्याला वाटलं आलेली संधी सोडू नये म्हणून तो लगेच गावी जायला निघाला तरी त्याच्या मनात रुखरुख होतीच की ज्या क्षेत्रात पाहिजे तिथला जॉब नाहीये हा पण वडिलांच्या शब्दाखातर त्याने गावाला जाण्याची बस पकडली. बस मध्ये त्याच्या डोक्यात निरनिराळे विचार पिंगा घालत होते तेवढ्यात त्याला पुण्यातील कोर्स केलेल्या इन्स्टिट्युट मधुन फोन आला कि २ दिवसांनी सकाळी १० वाजता अशाअशा कंपनीत तुमची मुलाखत आहे वेळेवर हजर रहा. दोन्ही मुलाखती एकाच वेळेला पण दोन वेगवेगळ्या गावांना आणि दोन वेगवेगळ्या क्षेत्रात.

 हाच तो खूप मोठी परीक्षा पहाणारा क्षण! मनाची खुप घालमेल, एकीकडे वडिलांनी दिलेला शब्द तर दुसरीकडे मनाजोगतं क्षेत्र. पण तरीही दोन्हीही ठिकाणी यश त्यालाच खेचून आणावं लागणार होतं. पण त्याचा हा निर्णय त्याच्या आयुष्यावर दुरगामी परिणाम करणार होता. गावी जाऊन आई वडिलांशी शांतपणे चर्चा करून त्याने शेवटी पुण्याच्या कम्पनीची मुलाखत द्यायचा निर्णय घेतला आणि लगेच २ तासांनी तो पुण्याला रवानाही झाला.

 मुलाखत यशस्वी ठरली आणि ती नोकरी त्याला मिळाली. खरंतर ती एक छोटी कम्पनी होती आणि पगारही मनाजोगता नव्हता. पण त्या कामाच्या अनुभवावर पुढे थोड्याच दिवसात एका मल्टिनॅशनल कंपनीत त्याला मस्त जॉब मिळाला आणि त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे!

 आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर असे निर्णय घ्यायची वेळ येते आणि समोर दोन पर्याय असतात. पण असे निर्णय सगळ्यांचेच बरोबर ठरतात का हो? त्यावेळी निवडलेला रस्ता चुकला तर? ज्यांची ह्या प्रश्नांची उत्तरं "नाही" अशी आहेत त्या लोकांना होणाऱ्या यातना फार भयंकर असतात. पुन्हा कधी ते त्या चुकलेल्या निर्णयातुन सावरू शकत नाहीत असं मला वाटतं! त्याच चुकलेल्या निर्णयाने आयुष्याची वाताहत केली तर त्याने निवडलेल्या पर्यायलाच "नशीब" असं म्हणत असतील का?


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                     #nirnay     
    

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

जादु संगीताची

   तुम्ही प्रचंड उद्विग्न अवस्थेत असता, वेगवेगळे विचार डोक्यात अक्षरशः थैमान घालत असतात आणि लेक पटकन जवळ येऊन म्हणतो " आई मी तुला एक खूप भारी गाणं सांगतो, तु ऐक, बघ तुला एकदम Happy वाटेल". खरंतर कोणतेही गाणं वगैरे ऐकण्याच्या मनःस्थितीत तुम्ही अजिबात नसता, पण लेकाचे आर्जवं पण डावलायची इच्छा होत नाही. म्हणून मग विमनस्क अवस्थेत तुम्ही youtube ला Pharrell Williams चे  - Happy song लावता. आणि काय आश्चर्य गाणं ऐकता ऐकता तुम्हाला खरंच आनंदी वाटायला लागतं. मस्त नाचावं वगैरे वाटायला लागतं. त्यानंतर लेकानी सुचवलेले वेगवेगळे गाणे ऐकुन खूप छान वाटतं. सगळं उद्विग्नतेचं मळभ दूर निघून जातं!! संगीतात जादू असते म्हणतात ते काही खोटे नाही. भाषा जरी समजत नसली तरी भावना संगीतातूनच पोहोचतात. कारण इंग्लिश किंवा जर्मन गाण्यातले सगळेच शब्द पटकन समजत नाहीत तरीही हि गाणी ऐकावीशी वाटतात. आपल्याकडे तर प्रचंड खजिना आहे गाण्यांचा. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींशी रिलेट होणारे असंख्य गाणे आहेत.

  गाण्याविषयी लिहितेय म्हणुन एक मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट आठवली. मी लहान म्हणजे साधारण ४-५ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी रेडिओ कम टेपरेकॉर्डर घेतला होता. माझ्या वडिलांना मोहम्मद रफी प्रचंड आवडतात. त्यावेळी ते जास्त रफीचेच गाणे ऐकायचे. रफीचे सगळे फेमस गाणे त्यावेळी माझ्या  कानावरून वारंवार जात होते. तेव्हा किशोर कुमार अजून फेमस व्हायचे होते. मोठं झाल्यावर जेव्हा जेव्हा रफी
ची गाणी ऐकली तेव्हा जाणवलं कि मला प्रत्येक गाण्याचा शब्द न शब्द पाठ आहे. तसा अजूनही बऱ्यापैकी पाठ आहे. "एहसान तेरा होगा मुझपर", "तारीफ करू क्या उसकी", दिवाना हुआ बादल", "लाखों है निगाह में" हे आणि असे बरेच गाणे. इतकं भारी वाटलं ना! त्यानंतर किशोरला ऐकायची गोडी लागली आणि अभ्यास सोडून वारंवार ऐकलेली गाणीच डोक्यात बसायला लागली.

  तीच गत "अंदाज अपना अपना" सिनेमाची. कॉलेजमध्ये असताना आम्ही मैत्रिणींनी अक्षरशः पारायणं केली होती ह्या सिनेमाची. तेव्हा एका मैत्रिणीकडे VCR होता. तिच्याकडे अभ्यासाला जाऊन आम्ही सिनेमा बघत बसायचो. आम्हा सगळ्यांना प्रत्येक डायलॉग पाठ आहे सिनेमाचा. आमिर आणि सलमान तेव्हा बरे दिसायचे एकंदर. पण सिनेमा भारी जमलाय हा. आता पुन्हा एकदा त्याच सगळ्या मैत्रिणींसोबत बघायचा आहे एकदा. आणि तीच मजा अनुभवायची आहे, बघु कधी योग येतो ते!

  लिहीत होते इंग्लिश गाण्याविषयी आणि पोहोचले हिंदी सिनेमावर ह्यालाच म्हणतात " फिर भी दिल है हिंदुस्थानी"!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                  

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

Winter is coming..

  आता उद्या सकाळी उठलं कि घरातलं अनालॉग घड्याळ मोबाईल मधील घड्याळाच्या एक तास पुढे असेल आणि तेव्हाच जाणीव होईल कि डेलाईट सेविंग टाईम संपलाय. सगळी घड्याळं एक तास मागे होतात. विचित्रच वाटतं काहीतरी. बॉडीक्लॉक अड्जस्ट होतच नाही पटकन. रोजच्यासारखं सकाळी सहाला उठायची सवय असल्यामुळे पाचलाच जाग येईल. चित्रविचित्र वेळांना भूक लागेल. चित्रविचीत्र म्हणजे स्वयंपाकही झालेला नसताना भूक लागेल.

  हळूहळू दिवस इतका लहान होत जाईल की ५ वाजता सूर्य मावळेल आणि सकाळी ८ ला उजाडेल. संध्याकाळी  ६ वाजता मिट्ट काळोख होतो. त्यात सतत आभाळ, प्रचंड थंडी, डिसेंबर पर्यंत पाऊस त्याच्यासोबत धुकं आणि त्यानंतर बर्फ पडत राहील. दिवसभर आभाळ असल्यामुळे सूर्यदर्शन फार कमी वेळेला होतं. इतकं उदास वातावरण असतं कि बास! सूर्यप्रकाश असला तरी जास्तीत जास्त ४ तास असतो आणि थंडी इतकी असते कि सूर्य दिसला काय किंवा न दिसला काय काही फरक पडत नाही.

   सगळ्या झाडांची पाने गळून ते ओकेबोके दिसतील. त्यामुळे तर अजून उदास वाटेल. त्यात इथले लोक उदास रंगाचेच कपडे घालतात आणि उदासच वाटतात. आपल्या भारतीयांसारखे रंगीबेरंगी लोक फार कमी किंवा नाहीतच. गच्च भरलेल्या ट्रेन्स मधेही काडीचाही आवाज नसतो लोकांचा. कमाल आहे बुआ! आम्ही दोन भारतीय मैत्रिणी ट्रेनमध्ये गप्पा मारत असलो तर आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भावच फार बोलके असतात. असो.

   नोव्हेंबर ते मार्च असच वातावरण. डिसेंबर-जानेवारी मध्ये थंडी तर जीव घेते अगदी! मागच्या वर्षी सगळ्यात कमी -२० डिग्री तापमान गेले होते. इतक्या कमी तापमानात आपण जगू शकतो याची अनुभुती आली. बर्फ पडायला लागला कि मस्त वाटायला लागतं पण. मऊशार, कापसासारखा स्वच्छ पांढरा. लहानपणी म्हातारीला पकडायला धावायचो तसं बर्फ हातावर झेलायला फार मस्त वाटतं! बर्फ फार जिव्हाळ्याचा विषय आहे इथल्या लोकांसाठी. आपल्याकडे कसं पाऊस कमी झाला एखाद्या वर्षी तर सगळ्यांच्या जीवाला घोर लागतो तसाच काहीसं. एखाद्या वर्षी बर्फवर्षाव कमी झाला तर इथल्या लोकांना वाईट वाटतं.

 तर असा हा युरोपिअन हिवाळा.. नकोसा वाटत असला तरी हवाहवासा!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                            #munichdiaries

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

सहज सुचलेले

  • मस्त गुलाबी थंडी...

          त्यात थोडाथोडा पाऊस...
          हिलस्टेशनवर असल्यासारखं मेट्रोचं स्टेशन...
          ट्रेन वीस मिनिट लेट...
          अशा मस्त वातावरणात...
          एखादा....
         .
         .
         .
         .
         .
         .
         .
         .
         गरमगरम अमृततुल्य चहा आणि झणझणीत वडापाव मिळाला तर...
         बस ईतनासा ख्याब है!

  • मी - (अतिउत्साही स्वरात) अरे आज दुपारी मी योगामॅटचं उदघाटन केलं बरं!!
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    तो - (मोबाईल मधुन शांतपणे डोकं वर काढुन) अरे वा! वामकुक्षी घेतली वाटतं..
    सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक #munichdiaries



सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

पडु आजारी..मौज न वाटे भारी..

म्युनिचला आल्यापासून आलेल्या अनुभवांवरून मी आता मनाशी खालील गोष्टींची पक्की खूणगाठ बांधलीये

- आजारी पडायचं असेल तर फक्त सोमवार ते शुक्रवार १२ च्या आत; कारण शुक्रवारी दुपारपासून ते सोमवारी सकाळपर्यंत फक्त मरणासन्न लोकांना तात्काळ ट्रीटमेंट मिळते. आणि बाकी आपल्यासारख्या लोकांना तापात फणफणत शासकीय दवाखान्यात ३-४ तास वाट पाहावी लागते.
- पुढील आठवड्यात आपण आजारी पडणार हे समजण्याची कोणती तरी व्यवस्था करणे किंवा "गट फीलिंग (अंतरात्म्याचा आवाज वगैरे)" साठी ध्यानधारणा करणे; कारण आपण नेहमी जात असतो त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट नेहमीच पुढील आठवड्याची मिळते इथे.
- येनकेनप्रकारे तुम्ही लकीली वीकडेज मध्ये आजारी पडलात तर बिना अपॉइंटमेंट क्लीनिक मध्ये गेल्यामुळे सगळ्यात शेवटी तुमचा नंबर लागतो आणि रिसेप्शनिस्ट विचारतेच "अपॉइंटमेंट का नाही घेतली?"  तेव्हा खरंच म्हणावं वाटतं "उठाले रे बाबा"! असो.
- साधे सर्दीपडसे किंवा ताप कोणत्याही औषधाविना आणि डॉक्टरविना पूर्णपणे बरे होऊ शकतात यावर माझी पूर्ण श्रद्धा बसलीये कारण तसेही इथे सर्दीपडशाला वाफ घेणे आणि संत्र्याचे, अननसाचे ज्युस पिणे हे उपाय डॉक्टर सांगतात. आणि घसा खराब होऊन ताप असेल तर पॅरासिटामोल देऊन पुन्हा २ दिवसांनी या असे सांगतात. दोन दिवसांनी जेव्हा तापाने तुमची पूर्ण वाट लागते तेव्हा ब्लड, युरीन चेक करूनच तुम्हाला अँटिबायोटिक्स देतात, नसता नाही देत. अँटिबायोटिक्सचा वापर फारच कमी आहे(हि गोष्ट वाखाणण्याजोगी आहे) आणि प्रिस्क्रिप्शन शिवाय एकही औषध मिळत नाही. 
- स्त्रियांना प्रेग्नन्सी सोडून कोणताही दुसरा प्रॉब्लेम असेल तर त्यांना स्त्रीरोगतज्ञाची अपॉइंटमेंट ४-५ महिन्यानंतरची मिळते आणि फारच तातडीची परिस्थिती असेल तर शासकीय दवाखान्यात ३-४ तास वाट पाहावी आणि जे काय होतं आहे ते जर्मन मध्ये पाठ करून ठेवावे. जर्मन भाषा येत नाही म्हटले कि इथल्या ९०% लोकांच्या डोक्यात तिडीक जाते आणि ते आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतात.
- मेडिकल इन्शुरन्स कार्ड नसेल तर आजारी पडायचा आणि दवाखान्यात पाऊल टाकायचा कोणताही हक्क तुम्हाला नाहीये. म्हणजे आपल्यासारख्या फॉरेनर्सला तरी!
- नवीन पेशन्टला कोणत्याही क्लीनिकची अपॉइंटमेंट कमीतकमी ३ महिन्यांनंतरची मिळते त्यामुळे कोणताही आजार नसताना सगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टर्सकडे उगीचच अपॉइंटमेंट घेऊन ठेवाव्यात न जाणो कधी काय बिघडेल तुमचं.
- तुम्ही शाकाहारी का आहेत ह्याविषयीचे विचार डॉक्टरच्या मनावर ठसवणे तुम्हाला जमलेच पाहिजे.
- सहनशक्ती तर वाढलीच आहे आता रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे म्हणजे असे कोणतेही प्रकार करायची वेळच येणार नाही.
- आई म्हणते तसे "शरीर रक्षितो धर्म:" हे सूत्र पालन करायचे. कारण दोन वेळा माझे दुखणे आपोआप बरे झाले कारण मला अपॉइंटमेंट पटकन मिळालीच नाही आणि ज्या दिवशीची अपॉइंटमेंट होती त्या दिवशी मी ठणठणीत बरी होते. 

एकंदर काय तर आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात तसे मी इथे शहाण्या माणसाने दवाखान्याची पायरी चढू नये असं म्हणेन!!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                  #munichdiaries 

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

व्यसन.... सीरीजचे

आज सकाळपासून मन सैरभैर झालाय नुसतं. एक अनामिक हुरहूर लागली आहे. आता पुढच्या रविवारपासून काय? राहून राहून हा प्रश्न डोक्यात येतोय.. 
असं कसं करू शकतात ते. आता थेट पुढच्या वर्षी म्हणे. का 2019? नकोच तो विचार.. फार त्रास होतो.. पुढच्या वर्षी तरी लवकर या म्हणावं.. 
असं वाटतं आहे कि ते FB आणि WA वर येणारे मेसेजेस फॉरवर्ड आणि शेअर करावेत.. ते नसतात का "इस फोटो को एक मिनिट के अंदर लाईक या शेअर किजीये आपकी मनोकामना पुरी हो जाएगी", किंवा "इस मेसेज को १० लोगोकों भेजा तो आपके सारे काम १० मिनिट मी पुरे हो जाएंगे". असे काहीबाही उपाय डोक्यात येत आहेत. असो. 
आता तर हद्दच झाली.. इतकं व्यसनाधीन (मराठीत ऍडिक्ट) असल्यासारखं वागू नये माणसाने.. कोणी पाणी म्हंटलं तर "डॅनी", फोन म्हंटलं तर "जॉन" ऐकू येतंय, लेक डायनोसॉर म्हणाला तर मला "ड्रॅगन" वाटले. उगीचच वाटतंय कि नवरा "वाईट वॉकर्स " विषयी बोलतोय आणि मीही तावातावाने त्या "सिंहासन तलवारी (Throne)" वर कोण बसेल यावर चर्चा करतेय. तर तो माझ्याकडे "तु बरी आहेस ना?" नजरेने पाहतोय आज. पुढच्या सिजनला स्कायचं subscription घेतो कि नाही देव जाणे... 
काही नाही आपलं ते Game of Thrones च्या सीजन 7 चा आज last episode आहे... म्हटलं हा सीजन संपलाय त्या दुःखाला वाट मोकळी करून द्यावी... इतकंच...


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                                                                #GOTdiaries

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

ऑक्टोबर फेस्ट

   म्यूनिच मधील ऑक्टोबर फेस्ट जगातील सर्वात मोठा लोकोत्सव आहे. बऱ्याच परदेशी लोकांना ऑक्टोबर फेस्ट जर्मनीची संस्कृती वाटतो. वास्तविक, ऑक्टोबर फेस्ट बायर्नची संस्कृती प्रतिबिंबित करतो, संपूर्ण जर्मनीची नाही. स्थानिक लोक या उत्सवाला "Wisen " म्हणतात. बायर्न हे एक जर्मनी मधील राज्य आहे.
    ह्या उत्सवाचा इतिहास पार १८१० मध्ये आहे. म्यूनिचमधील पहिला ऑक्टोबर फेस्ट १२ ऑक्टोबर १८१० रोजी तेव्हाचा राजकुमार प्रिन्स लुडविग (नंतर तो राजा लुडविग बनला) आणि सॅक्सनी-हिल्डबर्गहौसेनची राजकुमारी थेरेसे यांच्या लग्नात साजरा करण्यात आला. त्यावेळी हा उत्सव घोड्यांच्या शर्यतीसह संपुष्टात आला आणि पुढील वर्षी ही शर्यत पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. एका शेती विषयक शो व्यतिरिक्त , बियर स्टॉल, आनंदोत्सव आणि इतर करमणुकीच्या गोष्टीचा येणाऱ्या वर्षांमध्ये या महोत्सवात समावेश होत गेला. आता घोड्यांची शर्यत बंद झालीये पण ऑक्टोबर फेस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
    तुम्हाला असं वाटेल की नाव तर ऑक्टोबर फेस्ट आहे आणि सप्टेंबर मध्ये कसा? तर हवामान हे मुख्य कारण. सप्टेंबर सहसा थोडा उबदार असतो. त्यामुळे साधारण १६-१७ सप्टेंबरला सुरु होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो किंवा ३ ऑक्टोबरला संपतो. ३ ऑक्टोबर हा जर्मन री-युनिफिकेशन डे असतो. मागच्या वर्षी साधारण ५ ते ७ लाख लोकांनी या उत्सवाला भेट दिली.
    मुख्यतः ऑक्टोबर फेस्ट हा बियर फेस्टिवल आहे असं म्हणूयात. म्युनिच मधल्या ब्रुअरीज मध्ये बनलेली खास बियरच इथे सर्व्ह केली जाते. फक्त म्युनिच मधलीच बियर बरंका. दुसऱ्या कोणत्याच शहरातील नाही. फक्त ६ म्यूनिच ब्रुअरीजला - Augustiner, Hacker-Pschorr, Hofbräu, Löwenbräu, Paulaner, आणि Spaten - या उत्सवामध्ये बियर सर्व्ह करण्याची परवानगी आहे. १४ मोठे आणि अनेक लहान बियर टेन्ट्स आणि बियर गार्डन्स एकाच वेळी ९८००० पर्यटकांना सामावून घेतात. बियरच्या मगला "Maß" म्हणतात. साधारण एक लिटरचा मग ९ ते १० युरो दरम्यान पडतो. बियर मेड्स आणि वेटर्स एका वेळी १० बियरने भरलेले मग सर्व्ह करतात.
    ह्या फेस्ट दरम्यान सरासरी ६० लाख लिटर बिअर फस्त होते. २०१३ मध्ये साधारण ७७ लाख लिटर बिअर ह्या फेस्टमध्ये संपली होत असे विकिपिडीया सांगतोय. हा आकडा वाचून माझे तर डोळेच पांढरे झाले आणि खाण्यासाठी लागणाऱ्या गायी, बैल, डुकरे, मेंढ्या आणि कोंबड्यांची शिरगणती केली तर अक्षरशः भोवळ येईल. असो.
    ३१ हेक्टर वर पसरलेल्या मोठ्या मैदानावर (जे फक्त ह्या फेस्ट साठी आहे) वेगवेगळ्या फन राईड्स, बिअर कंपनीजचे मोठमोठे टेन्ट्स (ह्यात फक्त १८ वर्षांवरील लोकांना प्रवेश असतो), शेकडो खाण्याचे स्टॉल्स , वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स, मस्त सजलेला परिसर असतो. लहानपणी आनंदनगरीला गेल्याचं आठवतं मला पण ती खूपच छोट्या जागेत असायची. हा फेस्ट म्हणजे भव्यदिव्य आहे.
    ह्या उत्सवाची सुरुवात साधारण १६-१७ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता दिमाखदार मिरवणुकीने होते. त्यात मुख्यतः ब्रुअरीजचे ब्रासबँड पथके असतात. मिरवणूक एकदम शिस्तीत जाते. प्रत्येक ब्रुअरीचे मानाप्रमाणे मिरवणूकीत स्थान असते. सगळ्यात आधी त्याचं बॅनर त्यानंतर ब्रासबँड, मग येतो घोड्यांचा रथ ज्यामध्ये बिअरचे ड्रम्स असतात आणि त्यानंतर एका ट्र्कमध्ये त्या ब्रुअरीचे लोक. असा सगळा लवाजमा असतो.
   स्त्रिया "Drindle" ड्रेस आणि पुरुष "Lederhose" असा खास पारंपरिक बव्हेरिअन पोशाख परिधान करतात. म्यूनिचचे महापौर मिरवणुकीच्या प्रारंभी असतात आणि तेच पहिला बिअर ड्रमचा नळ उघडून ह्या उत्सवाचे उदघाटन करतात. आजूबाजूचे लोक "O'zapft is (It's tapped)" अशी घोषणा करतात आणि एका महाबियर उत्सवाला सुरुवात होते. प्रथम बियरचा मान बवेरियाच्या मंत्री अध्यक्षांना मिळतो.त्यानंतर फेस्ट सामान्य लोकांसाठी खुला होतो.
   तर असा हा फेस्ट याची देही याची डोळा बघता आला आणि कळलं की दारूचाही म्हणजे बियरचाही उत्सव आणि मिरवणूक वगैरे होऊ शकतो. कोणाचं काय तर कोणाचं काय. पुन्हा मी तेच म्हणेन की " जावे त्यांच्या देशा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!" हो ना?

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक           #munichdiaries

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

थांबला तो संपला

   मागील आठवड्यातील मुंबईची घटना वाचून मन विषण्ण झालं अगदी. त्या सगळ्या निरपराध लोकांची काहीही चूक नसताना त्याना हकनाक जीव गमवावा लागला. त्यांच्या आप्तस्वकीयांना ह्या दुःखाशी लढण्याचे बळ मिळो.  

   मुंबई!  ह्या शहराबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात सुप्त आकर्षण असतंच बहुतेक. म्हणूनच मायानगरी म्हणत असतील कदाचित. बॉलीवूड, क्रिकेट, स्टॉक मार्केट,लोकल,पाऊस,आणि अजुनही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे मुंबई सतत चर्चेत असते. लोकल वरून माझ्या आयुष्यातले दोन खूपच थरारक (माझ्यासाठी तरी) अनुभव आठवले. 


  मी ग्रॅजुएशनला असतानाची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये असताना आपण स्वतःला फारच पराक्रमी समजत असतो. ओव्हरकॉन्फिडन्स कशाशी खातात हेही चांगलच माहिती असतं. प्रत्येक गोष्टीत आपल्यालाच कसं कळतं आणि आपलंच कसं बरोबर आहे हेच वाटत असतं. पार आकाशाला गवसणी घालायची असते. हो ना! पण लग्न झाल्यावर आकाशाला गवसणी घालायला निघालेलं आपलं विमान बरोबर जमिनीवर येतं. 

   
   तर तेव्हा माझा दादा बोरिवलीला रहात होता. मी आणि आई माझ्या सुट्यांमध्ये पहिल्यांदाच मुंबईला गेलो. मुंबईमध्ये फिरायचं म्हटल्यावर लोकलमध्ये जाणं अनिवार्य आहे. दादा आणि वहिनी दोघेही जॉब करत असल्यामुळे मी आणि आईच सगळीकडे फिरत होतो. त्यादिवशी खरेदीला दादरला जायचा ठरवलं आम्ही. दादाने गर्दीच्या वेळा टाळून जा असं सांगून ठेवलं होतं. आम्ही दोघी दुपारी जेवण करून निघालो. तेव्हा फारशी गर्दी नव्हती लोकलला. दादरला शॉपिंग केलं आणि बरच फिरलो. त्यामुळे वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि जेव्हा परत जाण्यासाठी दादर स्टेशनला आलो तेव्हा तिथली गर्दी पाहुन घाबरायलाच झालं. गर्दीमुळे एक लोकल आम्ही सोडून दिली, पुढच्या लोकलमध्ये जाऊ असा विचार केला. पण कशाचं काय गर्दी तशीच.मग धीर करून पुढच्या लोकलमधल्या लेडीज डब्यात मी चढले. चढले म्हणजे गर्दीनेच मला चढवले. तशी मी दाराजवळच होते, मागे वळून पाहिलं तर आई दिसलीच नाही मला. एकदम पोटात गोळा आला, मला वाटलं आई चढताना पडली कि काय. गर्दीतून बाहेर डोकवायचा प्रयत्न केला तर बाहेरही आई कुठे दिसत नव्हती. एव्हाना लोकल हळुहळु निघत होती. लोकलने वेग घ्यायला सुरुवात केली आणि मी मागचापुढचा कोणताही विचार न करता बाहेर उडी मारली. लोकल वेग घेत असल्यामुळे मी जोरात प्लॅटफॉर्मवर पडले. आजुबाजूचे लोक धावत आले. आई पण तिथेच होती. तिला गर्दीमुळे चढताच आलं नव्हतं. खूप लागलं होतं पण आई सुरक्षित असल्याचं पाहुन बरं वाटलं. पण तिथले लोक खूपच रागवले मला. साहजिकच आहे, प्लॅटफॉर्मवर न पडता मी लोकलखाली गेले असते तर!! बापरे विचार करूनच जीवाचा थरकाप उडतो. नशीब बलवत्तर म्हणून ह्या मंदपणे केलेल्या चुकीतून वाचले मी. घरी गेल्यावर दादा वहिनीचे पण बोलणे खाल्ले. दादा म्हणाला उद्यापासून एकटीच फिर आता लोकलने म्हणजे जरा अक्कल येईल. नंतरही बरेच दिवस ह्या विषयावर सगळ्यांनी खूपच बोलुबोलू घेतलं मला. आणि मीही गपगुमान ऐकून घेतलं. 

  ह्या भयानक अनुभवाच्या २ वर्षानंतरची गोष्ट आहे. तेव्हा दादा US ला गेलेला होता. माझ्या एका मैत्रिणीची मावशी मुंबईत असते. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी जीवाची मुंबई करायला औरंगाबादहून प्रस्थान केलं. गर्दीच्या वेळा टाळूनच आम्ही फिरत होतो आणि बरोबर मैत्रिणीचे मावस भाऊ होते त्यामुळे फार त्रास झाला नाही कुठे. पण एकदा संध्याकाळी थोडा उशीरच झाला दादरला. तिथून आम्हाला विरार ट्रेन पकडायची होती. काय प्रचंड गर्दी असते त्या ट्रेनला. आधीच मला असलेल्या गर्दीच्या अनुभवाने मी थोडी घाबरलेलीच होते. मला लोकलमध्ये जायचीच इच्छा होत नव्हती पण दुसरा पर्यायही नव्हता. आम्ही सगळे ७-८ जणं होतो. एक ट्रेन आली. आम्ही सगळे आत जायचा प्रयत्न करत होतो. माझ्या मागच्या अनुभवामुळे मी भीत होते आणि त्यामुळे मी जरा मागे पडले तोवर सगळे आत गेले. मला जागाच मिळेना. त्यात आजुबाजूचे काही फालतू लोक गर्दीचा फायदा घेऊन गलिच्छ स्पर्श करत होते म्हणून मी थांबायचं ठरवलं. मला सोडून सगळेजण आत चढले आणि ट्रेन सुरु झाली. माझी एक जिवलग मैत्रीण लोकलच्या दाराजवळच होती आणि तिने मागे वळून पहिले. तिला मी प्लॅटफॉर्मवर एकटीच राहिले हे कळलं आणि लोकल वेग घेत असतानाच त्या पठ्ठीने कोणताही विचार न करता माझ्यासाठी लोकलमधून ऊडी मारली. माझा काळजात चर्रर्र झालं. खरंच आमच्या दोघींचं नशीब चांगलं म्हणून तीही प्लॅटफॉर्मवरच पडली. दुसरा विचार स्वप्नातही करू शकत नाही मी. तिलाही खूप लागलं. आजूबाजूचे लोक खूप रागवले आम्हाला. पण आम्ही मात्र एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होतो. काहीच सुचत नव्हतं. मी तिला म्हणाले अगं मी आले असते ग पुढच्या ट्रेननी. तर ती म्हणते तुला एकटी कशी सोडून जाऊ गं इथे. बाकी सगळे पुढे निघून गेलेले, तेव्हा काही मोबाइल पण नव्हता आमच्याकडे. आम्ही आपल्या बावळटसारख्या तिथेच थाम्बलो कारण काही सुचतच नव्हतं. मग मैत्रिणीचा मावसभाऊ पुढच्या स्टेशनला उतरून आम्हाला घ्यायला आला. त्याने शांतपणे आम्हाला लेडीज डब्यात चढवलं आणि आम्ही एकदाच्या घरी पोहोचलो. माझ्या मैत्रिणीचा पराक्रम ऐकून पुन्हा आम्ही खूप बोलणे खाल्ले. पण मैत्री खरंच काय असते ना! आयुष्य समृद्ध करणारी गोष्ट.


   मुंबईत राहून दोन गोष्टी चांगल्याच कळाल्या, एक म्हणजे  "थांबला तो संपला" आणि दुसरी आपल्या प्रिय गब्बरसिंगने सांगितलेली " जो डर गया समझो वो मर गया."


ता. क. : हे वाचून मुंबईचे लोक मला वेड्यात काढतील हे माहित असूनही लिहायचं धाडस केलं!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक                   #mumbaidiaries


वाचकांना आवडलेले काही