शनिवार, २ डिसेंबर, २०२३

बर्फ म्हणजे

बर्फ म्हणजे.... ❄️❄️

त्यात बागडणारी, स्नोबॉल फाईट खेळणारी, स्नोमॅन बनवणारी छोटी छोटी मुलं, हातात हात घालून एकमेकांना सावरत जाणारं वयस्कर जोडपं, सावध पावलं टाकणाऱ्या छत्री घेतलेल्या आज्जी, फोटोज, सेल्फी काढणारे तरुण तरुणी, आम्ही रस्त्याच्या मध्येच उभे राहून फोटो काढतोय म्हणून रागावलेले आजोबा. 

निगुतीने रस्त्यातल्या बर्फ स्वच्छ करणारे आणि वेळोवेळी फुटपाथवर खडेमीठ आणि खडी टाकणारे कर्मचारी, जेणेकरून लोकांचं बर्फावरून चालणं सुकर व्हावं. 

आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर पसरलेली बर्फाची दुलई, निष्पर्ण झाडांच्या फांद्यावर साचून राहिलेला आणि वाऱ्याच्या झोतासरशी खाली पडणारा, पायवाटेवर दगड बनलेला, ढगांमधून हळुवारपणे पडणारा, हातातून अलगद निसटणारा, उदासवाण्या वातावरणात मनाला उभारी देणारा बर्फ.... ❄️❄️


आणि हे सगळं मनात साठवणारी मी ❤️









रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

हिप्पी दादा

त्या दिवशी जुन्या घराजवळच्या फर्निशिंगच्या दुकानात सेल आहे असा मेसेज आला. म्हणलं चला चक्कर टाकून येऊ. यदाकदाचित मॅगी काकू भेटल्या तर तेवढंच बरं वाटेल जरा. 

मी गेले तर बिलिंग ताई सोडल्या तर दुकानात कोणीच दिसलं नाही. त्या दुकानात रांगेने बेड्स मांडलेले असतात आणि त्यावर वेगवेगळ्या किमतीच्या मॅट्रेसेस आणि उश्या ठेवलेल्या असतात. जेणेकरून लोकांना जर मॅट्रेस आणि उशी तपासून घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात. त्याबाबतीत मला गंमतच वाटते खरंतर. लोक चक्क त्या बेडवर झोपून बघतात! 

मी आपली नक्की कोणत्या गोष्टींवर किती टक्के सूट आहे ते बघत होते. उश्यांवरही भरगच्च सूट आहे असं लिहिलं होतं म्हणून मी उशी हातात घेऊन बघत होते. तर बिलिंग ताई आल्या आणि म्हणाल्या “उशीवर डोकं ठेवून झोपून पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल उशी कशी आहे ते." 

आता दुकानात ती उशी कशी आहे ते बघायला त्यावर डोकं ठेवून बघायचं ही कल्पनाच करवत नव्हती मला. म्हणजे बघा हं भारतात आपण कधी गादीवाल्यांकडे जाऊन असं काही म्हणलं तर!! नकोच तो विचार. मी आपली संकोचून त्या ताईंना ”नाही ठीक आहे. मी अशीच बघते उशी." तर ताई लगे आग्रह करू लागल्या की “असं कसं, झोपून बघाच तुम्ही" मी “अहो नाही!” बिलिंग ताई “अहो बघा एकदा!”

आता इतका आग्रह त्या करत आहेत म्हणल्यावर आपल्याला बरं वाटत नाही ना कोणाचं मन मोडायला. म्हणून मग मी दुकानात नक्की कोणी नाहीये ना ह्याची खात्री करून घेतली आणि शूज काढायला लागले, तर लांबून ताई चित्कारल्या “काही गरज नाहीये शूज काढायची, झोपा तश्याच!“ पण एव्हाना मी शूज काढले होते. त्या बेडवर बसले आणि मी त्या उशीवर डोकं ठेवून बघणार तितक्यात एका कोपऱ्यातून आवाज आला 

“अहो इतका काय संकोच करताय, बघा झोपून! आपलंच दुकान समजा!”

मी पटकन उठून आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि मनात म्हणलं “ अरे ये कौन बोला." एक हिप्पी दिसणारा दादा कोपऱ्यातल्या बेडवर निवांत लोळत होता. तो तिथून उठून आला आणि म्हणाला  “अहो झोपा हो काही नाही होत." 

दोन्ही हातात दोन तीन फ्रेंडशिप बँड्स, केसांचा बुचडा बांधलेला, गळ्यात तुळशीमाळेसारखी माळ, डोळ्यावर गॉगल, हातावर, पायावर जिथे तिथे गोंदलेलं (टॅटू हो!), फिक्क्या निळ्या रंगाची बर्म्युडा आणि वर नावाला अघळपघळ बनियन!! ब्रिटिश इंग्रजीत त्याने मला विचारलं ”तुम्ही भारतीय ना? तुमच्या कपाळावरच्या रेड डॉटमुळे मी ओळखलं तुम्हाला!“ मी “हो”. 

हिप्पी दादाने त्यानंतर प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली की विचारायलाच नको. इथे कश्या? काय करता? म्युनिक आवडतं का? घरदार, मूलबाळ इत्यादी इत्यादी. मनात म्हणलं आता काय घरी जेवायला येतो का काय भाऊ? त्याची सरबत्ती सुरु असतानाच मी एक दोन उश्या चांगल्या वाटल्या म्हणून बघत होते. पण दादाचं थांबायचं नाव नाही. 

तो कसा भारतातल्या वेगवेगळ्या भागात फिरला आहे त्याबद्दल माहिती सांगायला सुरुवात त्याने केलीच होती तर त्याची मैत्रीण (गर्लफ्रेंड हो!) दुकानात शिरली. मला वाटलं आता दादाचा तोंडाचा पट्टा नक्कीच बंद होईल. मैत्रीण का “डर” अन दुसरं काय! पण कसचं काय, दादा बोलतच होता. 

मी घेतलेल्या उश्या घेऊन बिलिंग ताईकडे गेले तर दादाही तिथे हजर. तो बोलतोय, त्याची मैत्रीण त्याचं अघळपघळ बनियन नीट करतेय, मी बिलिंग ताईंशी उश्यांवर किती सूट मिळेल ते विचारतेय, बिलिंग ताई माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत आहेत पण दादाची तोंडाची टकळी चालूच! दादा माझ्याशी बोलतोय, मधेच त्याच्या मैत्रिणीशी बोलतोय, त्यात तो मधेच बिलिंग ताईंना काहीतरी विचारतोय!! बिलिंग ताईच्या चेहऱ्यावरचे भाव “अरे ये हो क्या रहा है दुर्योधन!“ (संदर्भ: जाने भी दो यारो).

ह्या गोंधळात त्याची मैत्रीण मात्र त्याचं बनियन इमानेइतबारे सावरत होती आणि तो नक्की कोणाशी आणि काय बोलतोय ह्याचा अंदाज घेत होती. तिचं इंग्रजी कच्चं होतं हो! हिप्पी दादा त्याच्या बनियनसारखाच अघळपघळ होता अगदी. 

इतक्या गोंधळात, इतक्या स्थितप्रज्ञतेने बिल करणाऱ्या जर्मन ताईंना बघून घाबरले ना मी! बिल गंडणार नक्कीच. जर्मन बिलिंगवाल्यांचा दांडगा अनुभव आहे इतक्या वर्षांचा!! 

दादा म्हणाला भेटू पुन्हा असच आणि मी उश्या आणि बिल घेऊन दुकानाबाहेर आले एकदाची. एकदा बिल बघून घेऊ म्हणलं. बिल बघितलं तर ताईंनी एका उशीवर सूट दिली होती पण दुसऱ्या उशीवर सूट द्यायला त्या विसरल्या होत्या. आपली शंका खरी ठरल्याबद्दल हसावं की रडावं तेच कळेना कारण मला पुन्हा दुकानात जावं लागणार होतं. 

मी आत गेले आणि ताईंना ही गोष्ट लक्षात आणून दिली तर बिचाऱ्या ताईंनी माझी इतक्या वेळा माफी मागितली की मला वाटलं आता काय पाया बिया पडतात का काय!! “आता मी तुमचं नवीन बिल बनवते आणि तुमचे जास्तीचे पैसे तुम्हाला परत करते हं. माफ करा जरा गोंधळच झाला माझा!” असं म्हणून ताईने पून्हा बिल बनवायला घेतलं. 

तेवढ्यात कोपऱ्यातल्या बेडवर झोपलेला हिप्पी दादा मला बघून मैत्रिणीसह तिथे आला आणि त्याने पुन्हा तोंडाची टकळी चालू केली. मी आणि बिलिंग ताईने एकमेकींकडे बघून मनातच कपाळावर हात मारून घेतला!!

#माझी_म्युनिक_डायरी

बुधवार, १४ जून, २०२३

किस्सा डॉक्टरका

इथे दरवेळी डॉक्टरकडे गेल्यावर काहीतरी अजब घडतंच. आता परवाचीच गोष्ट बघा ना. डॉक्टर ताईकडे गेलं की ती इतकं हसून स्वागत करते की विचारायची सोय नाही! अगदी आनंदाने तिच्या केबिनमधे न्यायला येते. जसं काही एखाद्या कार्यालाच बोलवलं आहे. त्याहून कहर म्हणजे “हाऊ आर यू? नाईस टू सी यू!” म्हणते. साडीच नेसून जायला पाहिजे होतं खरं, नाहीतरी उन्हाळा सुरु झालाय इथे! 

“अगं ताई मला काहीतरी त्रास होत असेल म्हणूनच आले ना! आणि नाईस टू सी यू काय? आपण काय पार्कात भेटलोय का ग? कमाल आहे बुआ!”

त्यात पुन्हा एका भुकेल्या जीवाचे, रेग्युलर चेकअपच्या नावाखाली इतकं भसाभसा रक्त काढते की जसं काही आपल्याला रक्तदानालाच बोलवलं आहे! अमुक, ढमुक, तमुक टेस्टसाठी वेगवगेळ्या परीक्षानळ्या भरतात. त्यापेक्षा एक बाटली काढूनच घ्यावं ना रक्त, हाय काय अन नाय काय! बरं, एवढं रक्त काढल्यावर उपाशीपोटी माणसाला चक्कर येणारच ना! तर म्हणे तू काही आणलं नाहीस का खायला? 

“अरेवा! हे बरंय! म्हणजे रक्तही आम्हीच द्या आणि खायलाही आम्हीच आणा! एवढं अगत्याने स्वागत केलं तर जरा खानपानाचं पण बघावं ना. आमच्या भारतात पारलेजी देतात बरं खायला, आहात कुठं?” 

रक्त काढताना पून्हा शिळोप्याच्या गप्पा! जर्मनीत करमतं का तुला? लेकरं बाळं किती? तू काय करतेस? आता सुट्टीत भारतात जाणार का? तिकडे मोकाट कुत्रे फार असतात असं ऐकलंय, खरं आहे का? तुला फ्लूचं वॅक्सीन देऊ का?

“अगं जरा दम खा की ताई! किती प्रश्न विचारते आहेस. इथं पोटात कावळे कोकलतायेत आणि तुझा प्रश्नांचा भडीमार.” इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्याला आठवतच नाही की आपल्याला नक्की काय झालंय! 

एवढा पाहुणचार घेऊन आपण प्रिस्क्रिप्शन घेऊन औषधाच्या दुकानात जावं तर आपल्याला जो त्रास आहे त्याचं औषध लिहून द्यायला ताई चक्क विसरलेल्या असतात! इतक्या अघळपघळ गप्पा मारल्यावर दुसरं काय होणार म्हणा! 

पोटातल्या कोकलत असलेल्या कावळ्यांना हाकलत, पुन्हा वर क्लीनिकमध्ये जाऊन, तिथल्या ढिम्म रिसेप्शनिस्टला विनवून, ताईंकडून आपण प्रिस्क्रिप्शन आणावं आणि औषधांच्या दुकानातल्या ताईने म्हणावं की ह्या गोळ्या आत्ता उपलब्ध नाहीयेत!

हे ऐकून आपलं दुखणं आपोआपच बरं व्हावं!!


#माझी_म्युनिक_डायरी

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

सुखद

बऱ्याच दिवसांनी स्वच्छ ऊन पडल्यामुळे आणि पाराही २० अंशाच्यावर गेल्यामुळे तुम्ही चक्कर मारून यावं जरा, असं ठरवता. पण संसारी लोकांना कितीही चकरा माराव्या वाटल्या तरी पर्स/बॅगेत पिशवी ठेवावीच लागते. दुधच संपलंय, फळं आणावी लागतील, आता बाहेर पडतेच आहे तर स्पार्गेल घेऊनच येऊ, इत्यादी गोष्टी काय चुकतात होय. तर ते असो!

अगदी सुखद वातावरणात घराजवळ खरचंच २-४ चकरा मारून तुम्ही बस पकडता. जवळच्या सुपरमार्केट मध्ये अगदी जत्रा असणार हे माहित असल्यामुळे तुम्ही बसने जरा लांबच्या मार्केटचा रस्ता धरता. 

बसमध्ये बसल्यावर अचानक ड्रायव्हर काका स्वतःच्या जागेवरून उठुन बसच्या मागील भागात जातात. नक्की काय झालंय हे बघायला तुमच्या सहीत बसमधील पुढील भागातील प्रवासीही मागे वळून बघतात. एक वृद्ध जोडपं बसायला जागा शोधत असतं. त्यातल्या काकूंच्या हाताला प्लास्टर असतं. 

ड्रायव्हर काका त्या दोघांना बसच्या पुढील भागात घेऊन येतात. तिथे वृद्धांसाठी राखीव जागेवर दोघांना बसवतात. काकूंची आस्थेने चौकशी करतात. कुठे उतरायचं आहे हेही विचारून घेतात. जोडपं बरंच वयस्कर असल्यामुळे त्यांना धीर देतात. 

हे सगळं घडत असताना, बस निघायला उशीर होतोय हे माहित असून, बसमधील एकही प्रवासी कोणत्याही प्रकारची नाराजी दर्शवत नाही. ड्रायव्हर काका शांतपणे बस सुरु करून निघतात. पाचव्या स्टॉपवर वृद्ध जोडप्याला उतरायचं असतं. ड्रायव्हर काका पुन्हा शांतपणे त्यांच्या जागेवरून उठून त्या आजी आजोबांना खाली उतरायला मदत करतात. इथून नीट जाताल ना घरी असंही विचारतात. ते आजी आजोबा त्यांचे आभार मानतात आणि बस पुन्हा सुरु होते. आणि हो, ड्रायव्हर काका स्वतःच साठीचे वगैरे असतात! 

खरोखर सुखद अनुभव! इतक्या दिवसांची तुमच्या मनावरील आणि वातावरणातील मरगळ नाहीशी होते. पण दुकानातून सामान आणायचं आहे ह्या विचारसरशी तुम्हाला आठवतं की तुमचं दुकान तर मागेच राहिलं, आजी आजोबांच्या नादात तुम्ही चक्क २ स्टॉप पुढे गेलेल्या असता!

#माझी_म्युनिक_डायरी 

(फोटो आपला उगीचंच, इथे वसंत सुरु झालाय ना!)





मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

मेट्रो


जर्मनीत, म्युनिकमध्ये पाऊल ठेवल्यापासून सगळ्यांत जास्त कोणत्या गोष्टीने लक्ष वेधून घेतलं असेल तर ते इथल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेने! बस, ट्राम, मेट्रो आणि अंडरग्राउंड मेट्रो अश्या चार प्रकारच्या वाहनांनी मिळुन इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळलेली आहे. 

म्युनिकच्या मध्यवर्ती भागात सुरु होणाऱ्या अंडरग्राउंड मेट्रोचं, जिला इथे यु-बान(U Bahn) असं म्हणतात तिचं जाळं पूर्ण म्युनिकभर पसरलेलं आहे. ८ लाईन्सवर असलेल्या ९६ स्टेशन्सना जोडणारं हे एक साधारण १०४ किलोमीटरचं मोठं नेटवर्क १९७१ मध्ये सुरु झालेलं आहे. सगळ्यांत जास्त भरवश्याची मेट्रो म्हणजे अंडरग्राउंड मेट्रो. कारण तिथं जास्त अपघात वगैरे होत नाहीत, वाहतुकीचा कोणताही अडथळा नसतो त्यामुळे ट्रेन्स वेळेवर असतात. साधारणपणे दर एक ते दीड किलोमीटरवर एक एक स्टेशन आहे ह्या मेट्रोचं आणि काही काही स्टेशन्स इतकी सुंदर आहेत की बास! 

तुमच्या घराजवळ यु बानचं स्टेशन एखाद्या किलोमीटरच्या परिसरात असणारच आणि ते नसलं तर बस स्टॉप किंवा ट्राम स्टॉप किंवा मेट्रोचं(S Bahn) स्टेशन असणारच.

बसेसचे आणि ट्राम्सचे स्टोप्स ५०० ते ८०० मीटरवर आहेत. म्हणजे तुमच्या घराजवळून, ऑफिसजवळून किंवा शाळेजवळून बसमध्ये बसायचं आणि यु बानच्या स्टेशनला उतरायचं. तिथे जमिनीच्या दोन मजले खाली उतरून अंडरग्राउंड ट्रेनमध्ये बसून इप्सित स्थळी जायच्या स्टेशनवर उतरायचं. ते स्थळ जर स्टेशनपासून जरा लांब असेल तर वर तुम्हाला एकतर ट्राम तरी असते किंवा बस तरी. म्हणजे प्रवाश्याला कमीत कमी त्रास कसा होईल ते बघूनच सगळं  बनवलं गेलंय. 

ह्या सगळ्यांत प्रत्येक व्यक्तीचा विचार केलेला आहे. त्यांत अपंग आणि अंध लोक, प्रामधारी माता, वृद्ध लोक इत्यादी सगळ्या प्रकारच्या लोकांना ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सोयीनी वापरता येईल ह्याचा विचार करून ट्रेन्स, स्टेशन्स, बसेस, ट्राम्स डिझाईन केलेलं आहे. हे बघून अचंबित व्हायला होतं. प्रत्येक स्टेशनवर लिफ्ट्स, एस्केलेटर्स आहेतच, अगदीच जिथे लिफ्ट नसेल तिथं एस्केलेटर तरी असतेच. स्वच्छता तर वाखाणण्याजोगी आहे! 

तिकीट दरही माफक आहेत. तुमच्याकडे जर महिन्याचा, आठवड्याचा किंवा दिवसाचा पास असेल तर तो प्रत्येक वाहनात चालतो. म्हणजे तुम्हाला तिकीट काढल्यावर बस, ट्राम, ट्रेन ह्या सगळ्यांतून बिनदिक्कत प्रवास करता येतो.

ह्या व्यवस्थेत संप होत नाही असं नाही, ते होतातच पण फार ताणत नाहीत. 

एकंदर काय तर, जर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था इतकी प्रभावी  असेल तर माणसाचं आयुष्य खरंच किती सोपं होऊ आणि सुखकर शकतं ह्याची प्रचिती म्युनिकला आल्यावर आली!

मॅगी काकुंजवळ राहात होते तेव्हा तर घरापासून २ मिनिटांच्या अंतरावर बस, ट्राम आणि यु बान म्हणजेच अंडरग्राउंड मेट्रोचे स्टॉप होते, मग वाटलं काय तुम्हाला!

ईथल्या इतक्या सोयीस्कर सार्वजनिक वाहतुकीची सवय झाल्यामुळे युरोपातल्या प्रत्येक शहरातल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर ताशेरे ओढायचा हक्क मला आपोआपच मिळालेला आहे असं मी मानते आणि ह्या ठिकाणी पॅरीस नामक शहरातील मेट्रोचा उद्धार करून माझा लेख आवरता घेते. 

#माझी_म्युनिक_डायरी 








मंगळवार, २८ मार्च, २०२३

शिंकेची शंका

त्या फालतू कोरोनाने आपलं आयुष्य बदलून टाकलंय खरं! तसं आता म्युनिकमधल्या मेट्रोमध्ये मास्क अत्यावश्यक नाहीये. त्यामुळे मेट्रोच्या डब्यात एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर बाकी लोक मास्कविना प्रवास करत आहेत. पण मास्क घातलेला नसला तरी ते सावट आहेच थोड्याफार प्रमाणात. 

मघाशी गर्दीने खचाखच भरलेल्या मेट्रोच्या डब्यात आम्ही बसलो होतो तिथून ४-५ रांगा सोडून, लांब बसलेलं कोणीतरी शिंकलं! डब्यात इतकी शांतता असते कि विचारायची सोय नाही. तशी त्या बाप्याची पहिली शिंका कोण्याच्याही खिजगणतीतही नव्हती. 

पण जसजसा तो सटासट शिंका द्यायला लागला तश्या लोकांच्या प्रतिक्रया बदलत गेल्या. त्याच्या दुसऱ्या शिंकेनंतर २-३ डोक्यांनी फोनमधून वर पाहिलं आणि कोण शिंकतय हे बघायचा प्रयत्न केला. 

तिसऱ्या शिंकेनंतर अजून ५-७ लोकांनी नक्की कोण शिंकतय ते बघायचा प्रयत्न केला. चौथ्या शिंकेनंतर बऱ्याच लोकांनी एकमेकांकडे बघून सहेतुक कटाक्ष टाकले की काय बाप्या आहे! पाचव्या शिंकेनंतर माझ्यासारख्या शांतपणे जागेवर बसलेय लोकांनी उठून बघायचा प्रयत्न केला की कोण आहे? पण गर्दीमुळे कोणी दिसलंच नाही!  

सहाव्या शिंकेनंतर मात्र अख्ख्या डब्याचं लक्ष “कौन है बे तू?” म्हणून त्या बाप्याकडे गेलं. एव्हाना तो नक्कीच ओशाळला असेल. सातव्या आणि शेवटच्या शिंकेनंतर मात्र सगळ्या लोकांचा बांध फुटला आणि डब्यात एकच हश्या पिकला! तो बाप्या नक्कीच पुढच्या स्टेशनला उतरून गेला असेल.. लोकलाजेस्तव! हां मात्र तो जर्मन असेल तर नसेल उतरला बरं!

तरी बरं त्याला सातच शिंका आल्या, त्याबरोबर खोकला वगैरे आला नाही, नाहीतर डब्यातल्या काही अतिशहाण्या लोकांनी इमर्जन्सीला फोन करायला कमी केलं नसतं!  

मी त्या बाप्याच्या शिंका मोजल्या म्हणताय. मोजल्या म्हणजे काय? मोजल्याच! मॅगी काकूंची शेजारीण आहे मी पूर्वाश्रमीची त्यामुळे शिंकेची शंका मलाही आलीच ना! 


#माझी_म्युनिक_डायरी

मंगळवार, ७ मार्च, २०२३

कुणाचं काय तर कुणाचं काय

परवा माझा एक मित्र मला विचारत होता की भारतातुन येतांना मी अश्या कुठल्या गोष्टी आणु, ज्या आवश्यक सदरात मोडतात? 

मी आपलं त्याला कुकर, पोळपाट लाटणं, एखादं हलकं मिक्सर आण सांगत होते. कारण इथले मिक्सर म्हणजे निव्वळ टिनपाट, ना इडलीचं पीठ होतं ना बाकी काही. बाकी तिखट, मसाले, हळद इत्यादी गोष्टी ही सांगितल्या आणि आत्ता ही पोस्ट दिसली! 

मित्राला सांगायला लागतंय, पोरा एखादी कार असल तर ती पण घेऊन ये भावा.. 

आता ह्यांच्यांशीही भांडायला लागतंय, चांगली कार होती तिकडे, का नाही आणली म्हणुन! सोशल मीडिया खरंच फार भारी आहे, भांडायला विषय देत राहतो लोकांना. 

मला माहित आहे, टेक्निकली दुसऱ्या देशातून कार जर्मनीत आणणं शक्य आहे. फक्त त्या कारला जर्मन स्टँडर्ड नुसार बनवून घ्यावं लागतं. पण आपलं कसं आहे ना आपण वापरतो फेसबुक आणि तिथं कुणी साधा सरळ प्रश्न विचारला तरी लोक फक्त वाकड्यातच शिरतात असा शिरस्ता आहे ना! म्हणुन हा पोस्टप्रपंच. 

भारतातून इथे येणाऱ्या लोकांना आल्याआल्या जामच आत्मविश्वास असतो. मी यंव करेल मी त्यंव करेल आणि त्याच प्रचंड आत्मविश्वासातूनच अश्या पोस्ट येतात. मागे एका महाभागाने विचारलं होतं की माझ्या भारतातल्या घरात डिशवॉशर, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह पडून आहे, मी इकडे घेऊन येऊ का? असे प्रश्न वाचले की मला माझा अख्खा संसार एका खोलीत बांधून ठेवलेला डोळ्यांसमोर येतो! असो. 

अरे भावा! तू ते सगळं तिकडून आणण्याच्या खर्चाचा विचार केलास का? मग त्या सगळ्या वस्तू जर्मनीत व्यवस्थित चालण्यासाठी कराव्या लागणाऱ्या बदलांचा विचार केला आहेस का? त्या बदलांसाठी लोक मिळतील का? हा विचार केला आहेस का? कौन है ये लोग?

इथे साधं फ्लशचं बटन नीट करायला येणाऱ्या माणसाच्या दहा वेळा हातापाया पडावं लागतं अपॉइंटमेंट साठी (कारण त्याला इंग्लिश येत असतं). एवढं केल्यावर तो कसातरी तुमच्यावर उपकार केल्यासारखं एक वाक्य सांगतो ”मला पुढच्या आठवड्यात पुन्हा आठवण करा!” आपण आठवण करून दिली की तो तुमची दया येऊन तो एक महिन्यानंतरची अपॉइंटमेंट देतो. जे आहे ते असं आहे एकंदर. 

पोस्टकर्तीच्या धाडसाला दाद द्यावी लागतेय ह्या ठिकाणी! जिथे मला माझे दिवाळीचे कुरिअर जर्मन कस्टममधून सोडवायला पन्नास युरो मोजावे लागले होते तिथे ह्या लोकांचे कार, वाशिंग मशीन इत्यादी गोष्टी पाहून माझ्या डोळ्यांसमोर काजवेच चमकले. बाकी चालुद्या म्हणावं!!

आता तिथं त्या ताईला लोक काय सल्ले देतात ते वाचते म्हणजे मग इजारमध्ये कार नहाली!! (म्युनिकमधून वाहणाऱ्या नितळ नदीचे नाव इजार आहे.)

#माझी_म्युनिक_डायरी 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक









सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

भेटीत तुष्टता मोठी

 मागे एकदा एका मित्राने एक किस्सा सांगितला होता. जो ऐकुन आम्ही आश्चर्यचकितच्या पुढे जे काही विशेषण असेल ते झालो होतो. पण त्यानंतर इथे मॅगी काकूंचं वागणं बघितलं आणि तो आणि तत्सम किस्से पटायला लागले. 

त्याचं झालं असं की हा आमचा मित्र आमच्याकडे २-३ दिवस म्युनिक फिरायला आला होता. खरंतर आधी आम्ही राहायचो ते घर जरा लहानच होतं पण आम्हा तिघांना पुरेसं होतं. तो म्हणाला आपण भारतीय लोक किती पटकन इतरांना सामावून घेतो नाहीतर हे जर्मन लोक म्हणजे कहर आहेत. 

तर हा आमचा मित्र आणि त्याचा एक जर्मन मित्र असे दोघे त्या जर्मन मित्राच्या “आईवडिलांच्या” घरी जाणार होते. मुद्दामच अवतरण चिन्हात लिहिलं आहे मी ते. ह्या दोघांना चार वाजताची वेळ दिलेली होती. पण हे वेळेच्या दहा मिनिट आधीच घराच्या जवळ पोहोचले. तर आमच्या मित्राला वाटलं हा जर्मन भाऊ दाराची बेल वाजवेल, पण कसचं काय. तो काही बेल वाजवायला तयार नव्हता. थंडीचे दिवस होते, प्रचंड थंडी होती, म्हणुन आमचा भारतीय भाऊ म्हणाला “वाजव की बेल लेका, थंडीत जीव जाईल आपला!“ तरीही जर्मन भाऊ बेल वाजवायला तयार नव्हता. शेवटी कंटाळून आमच्या भारतीय भावाने बेल वाजवायचा प्रयत्न केला तर जर्मन भाऊ म्हणाले “अरे त्यांनी आपल्याला चार वाजताची वेळ दिली आहे. अजुन चार वाजले नाहीयेत, थांब." 

हे ऐकुन आमच्या भारतीय आणि त्यातल्या त्यात मराठी भावाला चक्कर यायची बाकी राहिली होती. तो जर्मन भाऊला म्हणाला “अरे तुझेच आईवडील आहे ना भावा! मग असा का वागतो आहेस?“ जर्मन दादाचं उत्तर ऐकुन तर आमचा मित्र आयुष्यभरासाठी चक्रावून गेलेला आहे. जर्मन भाऊ म्हणाला “अरे माझेच आईवडील आहेत पण त्यांनी जर सांगितलं आहे चारला या तर मी आधी जाऊन त्यांना त्रास नाही देऊ शकत. मी पाच मिनिट सुद्धा आधी नाही जाऊ शकत!“ हे ऐकुन आमच्या भारतीय भावाने त्या पोराचा नाद सोडला. 

मागे एकदा भारतातून परत आलो तेव्हा विमानतळावर असाच एक भयचकित करणारा प्रसंग पहिला होता. एक मुलगा कदाचित बऱ्याच दिवसांनी म्युनिकला स्वतःच्या घरी परत आला असावा. त्याच्या स्वागताला आई, वडील आणि बहीण आले असावेत. मुलाने खूपच शांतपणे आधी आईची गळाभेट घेतली मग बहिणीची आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला जवळ घेतले. हा सगळा कौटुंबिक सोहळा अगदी शांततेत चालू होता. 

नाहीतर मी, माझ्या जावांच्या, भावजयीच्या घरी, आश्चर्याचा धक्का देण्याच्या नावाखाली, न सांगता, मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन टपकते आणि एवढं करूनही त्या मला आनंदाने मिठीत घेतात!!!!


#माझी_म्युनिक_डायरी 

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

चिया चिया जिया जिया

आज संध्याकाळी बऱ्याच दिवसांनी किराणा सामान आणायला गेले होते. आज शुक्रवार संध्याकाळ म्हणजे तिथे मरणाची गर्दी! हो इथे चक्क गर्दी वगैरे असते कारण जवळपासचे सगळे लोक ह्याच सुपरमार्केट्मधे येतात! 

तर ह्या मोठ्याच्या मोठ्या दुकानात खरेदीसाठी कायम झुंबड उडालेली असते. खरंतर जर्मनीत आल्यापासुन खरेदीसाठी झुंबड उडालेली फार कमी वेळेस दिसते. तर ते असो. 

मी आपली आधी भाज्या, फळं मग बाकीच्या एक एक गोष्टी घेत घेत दुकानाच्या सगळ्यात शेवटच्या भागात पोहोचले. आता फक्त चिया सीड्स घेतल्या कि पटापट वर जाऊन रांगेत लागालंच पाहिजे, कारण तिथे  कमीत कमी २० मिनिटे जाणार हे पक्क माहित होतं. पुन्हा घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता! डोक्यात असे सगळे विचार घेऊन मी त्या सेक्शनला पोहोचले. 

तर एका जोडीने मुसली घेण्यासाठी म्हणुन शॉपिंग ट्रॉलीसकट अख्खाच्या अख्खा सेक्शन स्वतःच व्यापला होता. चिया सीड्स मुसलीच्याच बाजुला ठेवलेली असल्यामुळे, मी आपली ती जोडी आणि त्यांची ट्रॉली हलण्याची वाट बघत उभी राहिले. पण त्या जोडीचा अविर्भाव बघुन जरा शंकाच आली. 

जोडीतल्या ताईंनी मुसलीचं पॅकेट ट्रॉलीत टाकलं आणि ती मधाळ आवाजात, अगदी डोळ्यात डोळे घालून दादाला काहीतरी म्हणाली! दादाने पण एकदम प्रेमळ नजरेने तिच्याकडे बघितलं, हळुच तिची टोपी बाजुला केली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले! तेजामार, मुसलीला बघुनच एवढं प्रेम! घरी जाऊन खातील तेव्हा काय करतील!!

मला वाटलं आता झालं असेल दोघांचं, आता हलतील तिथुन तर त्यांचं प्रेम अजुन उत्कट पायरीवर पोहोचलं! दादाने हलकेच तिच्या गालावर ओठ टेकवले. ती लाजुन चुर, तरीही तिने त्याला पुन्हा मधाळ आवाजात काहीतरी प्रतिसाद दिला! 

बरं त्यांच्या प्रेमात मला एक्सक्युजमी वगैरेही म्हणता येईना. मी एवढी तिथे उभी असुन त्यांना काडीचाही फरक पडला नव्हता तर माझ्या बोलण्याने काय होणार होतं म्हणा! 

म्हणुन मग मी इकडून, तिकडून, कुठून चिया सीड्स दिसत आहेत का ते बघत होते. पण त्यांच्या ट्रॉलीमुळे अवघड होतं. बरं सगळ्यांत बावळटपणा म्हणजे मी आपली यन्टमसारखी त्यांच्या प्रेमाची साक्षीदार असल्यासारखी तिथल्या तिथेच फिरून वेगवेगळ्या बाजुंनी शोधाशोध करत होते, त्यामुळे चिया राहिल्या बाजुला आणि त्यांचं पायऱ्या चढत असलेलं प्रेमच दिसत होतं! 

किराणा दुकानात, मुसलीच्या रॅकच्या बाजुला?? असा विचार मनात चमकुन गेलाच!! 

आता इकडून तिकडे जाणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना माझीच शंका यायला लागली होती बहुतेक, ही बाई काय त्या प्रेमळ जोडप्याकडे बघत उभी आहे! लोकांना काय माहित माझं चिया चिया आणि त्यांचं जिया जिया चाललंय ते! तिथल्या लोकांना नक्कीच वाटलं असेल कि ये औरत हर अँगलसे देख राही है लव्ही डव्ही जोडपेको. शेवटी मी चिया सिड्सचा नाद सोडला आणि चडफडत तिथुन निघाले. 

तसं अश्या प्रकारचे सांस्कृतिक धक्के इथे अधुनमधुन बसतच असतात, फक्त किराणा सामान घ्यायला गेल्यावर असा धक्का कधी बसेल असं वाटलं नव्हतं. 


कुणाचं काय तर कुणाचं काय?

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

रंग दे

आज जर्मन टीव्हीवर एक जाहिरात पहिली आणि भुवयांचे केस उभे राहायचे बाकी राहिले होते!

म्हणलं चला आता मी डोळे मिटायला...

च्यामारी त्यासाठी आपण कशाला डोळे मिटायचे? 

मग म्हणलं चला आता मी फेसबुक सोडायला मोकळी... 

पण मग विचार केला कि लोकांनी भुवया रंगवायचा रंग बनवून, त्याची जाहिरात तयार करून, टीव्हीवर लोकांना दाखवली तर फेसबुकवर होणारं फुकटचं मनोरंजन कशाला सोडायचं? नाही का? 

हो, भुवयांना रंगवायचा रंग निघालाय म्हणे! आणि तो इथे आता सणावाराला लावतील म्हणे. अन मग त्यांचे चेहेरे कसे दिसतील म्हणे? 

पण मग भुवया आणि केसांचा रंग जुळलाच नाही तर? म्हणजे बघा हं, केसांना चुकून वेगळा रंग आणि भुवयांना वेगळा दिला गेला तर? कसं दिसल ते ध्यान? किंवा भुवयांना रंग देता देता तो गालाला लागला तर? करावं तरी काय माणसानं? अरे काय चाललंय काय? 

आता मी हे सगळं लिहिलं कि हे मंद फेबु मला अश्याच भयाण जाहिराती दाखवेल! आज भुवयांच्या रंग, उद्या पापण्यांचा रंग, परवा दाताचा रंग, तेरवा अजुन कशाचा तरी रंग... 

अर्रर्रर्र नकोच ते! फेबु सोडावंच कि काय? फेबुचं म्हणजे कसं आहे ना.. एखाद्या जाहिरातीवर चुकून एखाद दोन सेकंद रेंगाळलं तर जे भडीमार सुरु होतो कि बास. यंटमपणा नुसता. म्हणजे एखाद्याने बघितली चुकून रद्दीची जाहिरात तर त्याला काय सतत रद्दी  दाखवायची? किती तो झेंडुपणा! 

ह्या फेबुपायी एक दिवस ना.... 

एकंदर काय तर भुवया रंगवायचा रंग पाहून असे काहीबाही विचार येत आहेत. ते असो. बाकी अश्याच नवनविन जाहिरातींच्या माहितीसाठी वाचत रहा फेबु माझा! 

#फेबु_नको_पण_जाहिराती_आवरा 


#माझी_म्युनिक_डायरी

वाचकांना आवडलेले काही