शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

कौन है ये लोग?

 म्युनिकमधल्या कुटुंबांचा आणि खरेदी विक्रीचा अश्या दोन वेगळ्या समूहात (गृप्स) तुम्ही टेलेग्राम नामक ऍपवर सामिल होता. सामिल झाल्या झाल्या नोटिफिकेशन्सचा जीव घ्यायला तुम्ही अजिबात विसरत नाही. फुकटची टिणटिण! 

मग टाळेबंदी (लॉकडाऊन) सुरु होते आणि काय आश्चर्य! एवढा नोटिफिकेशन्सचा जीव घेऊनही तुम्हाला दिवसाला २-४ टिणटिण दिसायला आणि ऐकायला येतात! 

अमुक तमुक जॉईन्ड टेलेग्राम! टिणटिण

अमुक ढमुक जॉईन्ड टेलेग्राम! टिणटिण

तमुक तमुक जॉईन्ड टेलेग्राम! टिणटिण

अरे ये हो क्या रहा है? कुठं नेऊन ठेवलंय व्हॅट्सऍप माझं!

तुमच्या संपर्कयादीतील (कॉन्टॅक्ट्स) कोणती व्यक्ती कधी टेलेग्रामवर आली ह्याची इथंभूत माहिती एकेका टीणटीणने तुम्हाला मिळत असते! काही नोटिफिकेशन बघुन कळतं की अरेच्या ही/हा/हे चक्क आपल्या सम्पर्कयादीत आहेत? बरं ह्या नोटिफिकेशनचा जीवही घेता येत नसतो!

त्यात एक दिवस एक नवटेलेग्रामवासी मैत्रीण चुकून “सीक्रेट कॉन्व्हर्सेशन” सुरु करते आणि नेमकं चिरंजीव तेव्हा गेम खेळत असतात आणि ते नोटिफिकेशन बघून तुमचं डोकं खातात! 

ह्या सगळ्या प्रकाराला वैतागुन तुम्ही टेलेग्रामचाच जीव घ्यायचा असं ठरवता! तोच तुमच्या फोनमध्ये एक अगम्य नोटीफिकेशन येऊन धडकतं जे पाहुन तुम्हांला एकदम “याचसाठी केला होता अट्टहास!” “क्या मैं सपना देख रही हूँ?” सारखं काहीबाही सुचतं! कारण ते नोटीफिकेशन म्हणजे 

“सासूबाई जॉईन्ड टेलेग्राम” असं असतं! 

ते वाचून पूर्वी लोकांना तार आल्यावर वाटायचं तसंच काहीसं तुम्हाला वाटतं! तुम्ही लगेचच ऑफिसबंदमुळे घराचं ऑफिस केलेल्या आणि मिटिंग मध्ये व्यग्र असलेल्या ह्यांना अगदी मिटिंग मध्ये म्यूट करायला लावून तुम्ही सांगता “अरे सासूबाई जॉईन्ड टेलेग्राम” असं नोटीफिकेश आलंय मला! 

त्यांची प्रतिक्रीया ऐकून तुम्हांला “कौन है ये लोग? काहांसे आते है ये लोग?“ हा डायलॉग लिहिणाऱ्याचं फार कौतुक वाटतं कारण हे म्हणतात “टेलेग्राम म्हणजे? आणि हे सांगायला तू मला म्यूट करायला लावलंस!” 

२०२० मध्ये, लॉकडाऊनमधे,“टेलेग्राम म्हणजे काय?“ असं विचारणाऱ्या माणसावर तुम्ही फक्त एक कटाक्ष टाकता आणि मनात म्हणता “मुझे पता है ये लोग, मेरे घरमें ही है ये लोग!” 

पुढे जास्त विचार न करता सासूबाईंना टेलेग्रामवर मेसेज करायला घेता! मेसेज करायला म्हणुन विवक्षित ठिकाणी गेल्यावर तुमची अवस्था DCH मधल्या आकाश सारखी होते, तो बोलत असतो शालिनीशी आणि त्याचं थोडं लक्ष विचलित झाल्यावर शालिनीच्या जागी रोहीत अवतरतो! कारण जिथे सासूबाईंचा फोटो दिसायला पाहीजे तिथे उत्तरभारतीय नवविवाहित तरुणीचा फोटो दिसतो!

तुम्ही अगदी आकाश सारखंच ”अरे! तुम कौन हो?” असं त्या तरुणीला मेसेज करणार ईतक्यात टेलेग्राम म्हणजे काय हे माहीत नसलेला माणुस मिटिंग संपवून म्हणतो “एकदा नंबर चेक करून घे, आईचा जुना नंबर असायचा आणि तु वेंधळ्यासारखी दुसऱ्याच कोणाला तरी मेसेज करायचीस!”

ह्या पॉईंटच्या मुद्द्यामुळे तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की आपण आईंचा जुना नंबर डिलीटच केला नाहीये! टेलेग्रामवर दिसणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये तोच नंबर दिसतो आणि तुम्ही सासूबाईंचा जुना नंबर डिलीट करता!

आणि वाद घालायला नवीन विषय मिळाल्यामुळे तुम्ही लगेच तुमचा मोर्चा ह्यांच्याकडे वळवता आणि म्हणता “तुला टेलेग्राम म्हणजे काय हे खरंच माहीत नाहीये?“


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

मी, दिवाळी आणि मॅगी काकू

तर झालं असं की, दिवाळीच्या दिवशी दुपारी मी दारात रांगोळी काढत होते आणि तेव्हढ्यात मॅगी काकू बाहेरून आल्या! नेहमीप्रमाणे काय कशी आहेस वगैरे बोलणं झाल्यावर त्यांनी मोर्चा रांगोळीकडे वळवला! 

मला म्हणाल्या, “मी मागचे २-३ दिवस तुझ्या दारात हे सिम्बॉल्स बघतेय, काय आहे नक्की? आणि तू का काढलेस?“ मला वाटलं आता रांगोळीची पण त्यांना काही अडचण आहे की काय! जरा जपूनच मी म्हणाले “सध्या आमच्याकडे दिवाळी आहे ना म्हणून आम्ही हि एक प्रकारच्या सॅण्डने दारात वेगवेगळे डिझाइन्स  काढतो, हिला रांगोळी म्हणतात!” काकूंनी रांगोळी म्हणायचा फार प्रयत्न केला, पण छे बुआ, जमेल तर शपथ! म्हणाल्या “जाऊदे मला म्हणता येत नाही! पण ही तू हाताने काढलीस का? फार सुंदर!” हे ऐकून मी स्वप्न वगैरे तर पहात नाहीये ना ह्याची मनोमन खात्री करून घेतली!

मग त्यांनी विचारलं “दिवाळी म्हणजे काय?” गेले कित्येक वर्षांची  कुठल्या तरी परदेशी माणसाला दिवाळी काय असते हे सांगायची माझी ईच्छा आज पूर्ण होणार ह्या विचारानेच मला फराळाने चढलं नसेल त्यापेक्षा जरा मोठ्या मूठभर मांस चढलं! मी अगदी साग्रसंगीत त्यांना समजावून सांगितलं दिवाळीविषयी आणि मुख्य म्हणजे काकू सुद्धा मन लावून ऐकत होत्या! 

त्यांचा आनंदी चेहरा पाहुन ठरवलंच की यावर्षी त्यांना घरात नेऊन एक बेसनाचा लाडू खाऊच घालू! हाय काय अन नाय काय! दरवर्षी काय नाही म्हणतात! 

 खरंतर इतके वर्षात दरवर्षी दिवाळीत मॅगी काकूंची भेट होतेच. दरवेळी भेटल्या की मी अगत्याने त्यांना घरात या म्हणते पण फारच मानभावी आहेत त्या, मूड नाही म्हणतात! 

मी पुन्हा त्यांना घरात या म्हंटले पण इतकं दिवाळीचं आणि फराळाचं महत्व सांगूनही काकूंनी नवीन बहाणा सांगितला, “अगं मला लगेच बाहेर जायचं आहे ग! पुढच्यावेळी येते हं नक्की!” त्यांच्या उत्तराने माझा चेहरा खर्रकन उतरला! त्यांच्या लक्षात आलं बहुतेक म्हणून अगदी हसून म्हणाल्या “आम्ही जसं मेरी क्रिसमस म्हणतो तसं मी तुला तुझ्या फेस्टिव्हल साठी कसं विश करू?”

मनात म्हंटल “दिवाळी आणि रांगोळी मधलं ळ म्हणूनच दाखवा आता, एवढं दरवर्षी दिवाळीत घरात बोलवते तर येत नाही ना तुम्ही!” पण मग विचार केला खाली पिली दिवाळीमें कायको पंगा लेनेका! नाहीका?

मी म्हणाले “ शुभ दीपावली म्हणा!“ काकूंनी कसबसं शुभ दिपावली म्हणलं आणि पटकन घरात निघून गेल्या! कदाचित त्यांनाही “ळ” ची भीती वाटली असेल! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

लोणी

आज जरा कुठे थोडे लोण्याचे पॅकेट्स आणायला गेले दुकानात तर बिलिंग काकु अश्या काही टकामका बघायला लागल्या की विचारूच नका! असं कुठं असतंय होय? काकूंचे डोळेच बोलत होते-

“कौन है ये लोग इतने बटर लेने वाले?”

“काय बाई आहे! इतके बटर.. हं म्हणूनच गोलगोल दिसतेय!“

“कमाल आहे, कशी खात असेल ही बाई इतके बटर!“ 

“इतके बटर नेतेय तर हिला ब्रेड किती लागतील!“ 

“माझ्या अख्ख्या बिलिंग करिअरमध्ये इतके बटर नेणारी पहिल्यांदाच पहिली!” इत्यादी इत्यादी... 

मीही माझ्या डोळ्यांतून सांगायचा प्रयत्न केला 

“अहो काय सांगु काकु तुम्हांला! आता दिवाळी तोंडावर आलीये, फराळाचं करायचं आहे. पुन्हा तुमच्या इथली थंडी मी म्हणतेय त्यामुळे थंडीचा खाऊ करायचा आहे. त्यात घरातलं तूपही संपत आलंय तेही करावंच लागेल किनई! इतकं तूप करायला लोणी लागणार ना!“

त्यांना माझ्या डोळ्यातलं $&@$ काही कळलं नाही आणि त्या तश्याच अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे आणि मी घेतलेल्या १०-१५ लोण्याच्या पॅकेट्सकडे बघत बसल्या! म्हणुन मी आपलं गपगुमान त्या पॅकेट्सचे पैसे देऊन तिथुन काढता पाय घेतला. न जाणो भुसकून मॅगी काकू ह्याच दुकानात आल्या तर बिलिंग काकू आणि मॅगी काकू मिळुन माझी आरतीच करतील! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

पोपट

शनिवारचा जरा गडबडीचा दिवस. रविवारी बाजार बंदमुळे दोन चार दुकानांमध्ये जाऊन सामान आणणे वगैरे कामं दुपारपर्यंत आटपून, तुम्ही जरा वामकुक्षी घेऊया असा विचार करतच असता की तो इमेल येऊन धडकतो. जो वाचुन तुम्हाला कळतं की आज वामकुक्षीच काय रात्रीची झोपही दुरापास्त होणार आहे. काही नाही, एका प्रोजेक्टची डेडलाईन रविवारीच आहे असं लिहिलेलं असतं त्यात त्यामुळे तुम्ही वामकुक्षीला पुढे ढकलून लॅपटॉपला जवळ घेता. 

तुम्ही पटापट एकेक काम लॅपटॉपवेगळं करत असता .. ते नाही का हातावेगळं म्हणतात तसं! तुमचे हे थोड्या वेळाने तुमच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसतात आणि अगदी प्रेमाने विचारतात "टीव्ही लावु का ग?"  तुमच्या मनात येतं "नेकी और पुछ पुछ!"  पण तसं काहीही न दाखवता तुम्ही शांतपणे "हो" म्हणता. तुम्हाला वाटतं आता डेडलाईनच आहे प्रोजेक्टची तर उगी कशाला एखादा डायलॉग मारुन आ बैल मुझे मार करावं, हो किनई? कारण "एक डायलॉग नवरा बायकोको भांडकुदळ बना सकता है." 

टीव्ही चालु होतो. आयपीएल, राजकारण, बातम्या इत्यादी गोष्टींमध्ये फिरुन फिरुन गाडी शेवटी युट्युबवर खानपानाच्या चॅनलवर येते. तुम्ही कामात मग्न असूनही तुमचं अधूनमधून लक्ष टीव्हीकडे असतंच बरं! एव्हाना संध्याकाळ होत आलेली असते आणि तुमच्या डोक्यात संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय करावं?असं डोक्यात येतं म्हणुन तुम्ही ह्यांच्याकडे बघता तर हे "मेरे पिया गये रंगून" म्हणजे हे अगदी मन लावून टीव्हीवर "बटाटेवड्याची कृती" बघत असतात. मग तुम्ही पण त्यांची "मेरे रंग में रंगनेवाली" होऊन अगदी मन लावून "वरुण इनामदारला" बघत असता. तो नाही का हँडसम शेफ! असो. 

तर, ती चवदार बटाट्याची भाजी, त्या भाजीचे वडे करण्यासाठी त्यासाठी बनवलेलं बेसनाचं पीठ, हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेची चटणी. अहाहा! त्यात वरुणची बोलायची स्टाईल. क्या बात है! आता तुमच्या डोक्यात काम सोडून, बस्स बटाटेवडे आणि वरुण! तुम्हाला वाटायला लागतं की हा व्हिडीओ संपला की हे उठून कुकरला बटाटे लावणार आणि पुढच्या एक दीड तासात तुमच्या हातात गरमागरम बटाटेवडे, हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेची चटणी असलेली डिश येणार. भलंमोठं काम आणि आयता बटाटेवडा, और क्या चाहिये? 

वामकुशीला पुढे ढकलल्यामुळे असं गरमागरम बटाटेवड्याचं दिवास्वप्न तुम्ही टीव्हीसमोर बसुन बघायला लागता! कृती संपवून, वरुण तुमचा निरोप घेतो, तुम्ही जड अंतकरणाने त्याला बाय करता आणि तुम्हाला वाटतं की आता तुमचं बटाटेवडा स्वप्न प्रत्यक्षात येणार तोच.... 

हे घड्याळाकडे बघतात आणि तुम्हाला म्हणतात, "अगं साडेसहा होत आलेत, तुला खूपच काम आहे तर मी खिचडी टाकू का?"

हे ऐकुन तुमच्या स्वप्नातल्या हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेच्या चटणीचा पोपट होऊन त्या गरमागरम बटाटेवड्याला घेऊन उडून जातो!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

झबले_टोपडे

जेव्हा अख्ख्या होल मेट्रोच्या डब्यात काळे, पांढरे आणि ग्रे शेड्सच्या झबले, टोपडे आणि मास्कमध्ये ... म्हणजे जॅकेट्स, टोप्यांमध्ये तुमचे जॅकेट, टोपी रंगीबेरंगी आणि मास्क चक्क कोयरीच्या डिझाईनचा आणि रंगीत असेल तो समझ लेना भारतीय हो तुम!

कधीकधी वाटतं की इथले लोक फक्त दोनच रंगात जगतात, काळा आणि पांढरा! उन्हाळ्यात तरी जरा रंग दिसतात लोकांच्या कपड्यांमध्ये पण शरद ऋतू सुरु झाला की आधीच उदास असलेल्या वातावरणात ही लोकं त्यापेक्षा उदास कपडे घालतात! मग ट्रेनमध्ये आपल्यासारखे भारतीय लोक म्हणजे “बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना” दिसतात. आजूबाजूचे लोकही “कौन है ये लोग” वाला लूक देतात आपल्याला.  

यावर्षी शरद ऋतूमधेच इथे इतकी थंडी पडलीये ना! नाकातोंडातून वाफा बाहेर पडतायेत आणि लगेच झबले, टोपडे आणि मोजे घालावे लागत आहेत. जॅकेट आणि टोपीचं नाव झबलं आणि टोपडं ठेवलय मी. 

घराबाहेर पडणं म्हणजे वैताग असतो नुसता! इतका जामानिमा करून जाणं म्हणजे एक मोठं काम वाटतं. त्यात आता मास्कची भर पडलीये. मला लेकाचं कौतुकच वाटतं; जेव्हा तो शाळेत जातांना टोपी, मास्क आणि चष्म्याची व्यवस्थीत सांगड घालतो, तेही सकाळी ट्रेन पकडायच्या गडबडीत!

मी आज टोपी आणि मास्कची सांगड घालायचा अयशस्वी प्रयोग करत होते ट्रेनमध्ये तर मला पाहुन एक आज्जी इतक्या वैतागल्या की चिडुन जर्मनीमध्ये म्हणाल्या “अगं ए मुली, ती टोपी काढुनच टाक ना एकदाची!” मला मॅगी काकूंची इतकी आठवण आली म्हणुन सांगु, त्या असत्या तर अश्याच रागावल्या असत्या नई! मी सांगितलं आज्जीना की मला थंडी वाजते हो तर पुन्हा त्यांनी ”कहांसे आते है ये लोग” वाला लूक दिला कारण ३ डिग्री सेल्सिअसमध्ये इथले आजी आजोबा सुद्धा टोपडे घालत नाहीत! पुढे आज्जी मला निरुत्तर करत म्हणाल्याच “तरीच तू बर्फात घालायचं झबलं घातलं आहेस!” 

ईथे प्रत्येक थंडीत घालायचे झबले, टोपडे वेगवेगळे असतात. आपलं म्हणजे थंडी पडली की एक दणकट झबलं अंगावर चढवायचं की झालं काम! आपल्याला पावसाची थंडी, उन्हातली थंडी आणि बर्फातली थंडी असं काही म्हणजे काही कळत नसतं त्यामुळे सगळ्या थंड्या सारख्याच! 

एक मात्र आहे बरं, अशात मला रोजचा हवामानाचा अंदाज आणि त्यानुसार खेटरं कोणते घालावेत ह्याचं तंत्र अवगत झालंय! कसं काय विचारताय, मॅगी काकूंमुळे हो! घराबाहेर पडायच्या आधी त्यांच्या दरवाज्याच्या बाहेर त्यांनी ठेवलेले त्यांचे पादत्राणं बघून घ्यायचे आणि निर्धास्त व्हायचं! त्यांनी पावसात घालायचे बुट्स बाहेर ठेवलेत त्या दिवशी काय बिशाद त्या पावसाची न पडण्याची!

रोजचे त्यांचे पादत्राणे बघूनच जीव इतका हैराण झालाय की त्यांचे झबले, टोपडे बघायच्या फंदातच पडत नाही मी, उगी हार्टवर प्रेशर वगैरे यायचं! 


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

बाल की खाल

परवा युट्युबवर केसांच्या समस्यांवर करायच्या उपायांचे व्हिडीओ बघत होते. युट्युबचा फण्डा तर तुम्हालाच माहितीच आहे, आपण एखाद्या विषयावरचा एक जरी व्हिडीओ पहिला तरी पुढच्या क्षणाला त्याच विषयाच्या व्हिडीओजचा भडीमार होतो आपल्यावर. 

 मी आपला पहिला व्हिडीओ खोबऱ्याच्या तेलाचा पहिला आणि नंतर मला , तीळ म्हणू नका, बदाम म्हणू नका, ऑलिव्ह म्हणू नका, एरंडेल म्हणू नका... 

तेल हो.. तेल आणि त्यांचे व्हिडीओज. असे विविध तेलांचे उपाय रेशमी केसांसाठी सुचवले गेले. 

त्यानंतर .. तेलात काय काय घालू शकता त्यासाठी.. 

आवळा म्हणू नका, माका म्हणू नका, जास्वन्द म्हणू नका, ब्राह्मी म्हणू नका, वडाच्या पारंब्या म्हणू नका, मेथी दाणे म्हणू नका.. 

अश्या पावडरी तेलात घाला म्हणे हो! केस इतके वाढतील की विंचरुन विंचरुन कंटाळा येईल म्हणे!

त्यानंतर अंडं म्हणू नका, दही म्हणू नका, अमकं, ढमकं, तमकं लावा म्हणे हो केसांना! केसांना पोषण मिळेल म्हणे. 

मग ह्यानेही काही फरक पडला नाही तर अजून व्हिडीओ की डोक्याला ... कांदा म्हणु नका, लसूण म्हणु नका, आलं म्हणजे अद्रक(नाहीतर म्हणाल कोण आलं?), कोथिंबीर ह्यांचे रस हो...  रस लावा म्हणे डोक्याला!! कोणी म्हणे ह्यांचे तेलं करून लावा लांबलचक, घनदाट केसांसाठी!

अमका लेप,  ढमका लेप... 

एवढं सगळं पाहिल्यावर मी आता फक्त एकाच व्हिडिओची वाट पाहतेय.... 




कोणीतरी तरी सांगेल की डोक्याला चांगली चर्रर्रर्रर्रर्रर्र करुन बसणारी हिंगाची फोडणी द्या म्हणून! 


सगळ्याच समस्यांमधून मुक्तता मिळेल मग... केसांच्या हो! कसं?


#अरे_कुठे_नेऊन_ठेवलाय_विग_माझा?




सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

मुडदा बशीवला त्या कोरोनाचा

मार्चमधे लॉकडाउन सुरु झाल्यापासुन एकमेकांना बारा महीने अठरा काळ झेलणारे दोन कावलेले जीव, सणावारासाठी वाणसामान आणायला म्हणुन भारतीय दुकानात जायला निघतात. घरातून निघून, मेट्रो स्टेशनपर्यंत, पुन्हा स्टेशनवर ट्रेन येईपर्यंत हे दोन मास्कधारी एकमेकांचे थोबा.. म्हणजे मास्क सुद्धा बघत नाहीत. 

पण ट्रेनमध्ये व्यवस्थित जागा मिळाल्यावर, स्थानापन्न होऊन, तो तिच्याकडे बघत म्हणतो 

“बोल!”

आता हे म्हणजे घरचं झालं थोडं अन व्याह्याने धाडलं घोडं. घरी काय कमी शालजोडीतले संभाषण होते म्हणुन मेट्रोमध्ये पण तेच. पण ती फक्त त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि मास्कमधल्या मास्कमध्ये (तोंडातल्या तोंडात प्रमाणे) काहीतरी पुटपुटते. तिच्या मनात येतं की तिने इतक्या दिवसांत हजार वेळा बोललेला घिसापीटा डायलॉग पुन्हा त्याच्या मास्कधारी चेहऱ्यावर फेकून मारावा 

“तू जा ना यार ऑफिसला!”

पण तिला माहित असतं की ह्या मेल्या कोरोनामुळे ना ऑफिसवाले बोलावणार, ना आपण ह्याला जाऊ देणार. 

तो पुन्हा तिला म्हणतो 

“अगं बोल ना! आत्ता काहीतरी पुटपुलीस.”

शेवटी न रहावुन ती त्याला सांगूनच टाकते 

“मुडदा बशीवला त्या कोरोनाचा! नुसता जीव खाल्लाय, शांतात म्हणुन नाहीये. सतत आपलं सकाळ, दुपार, संध्याकाळ बोल बोल. घरात नुसती किटकिट तुझ्या मिटिंग्जची. एक झाली दुसरी अन मग तिसरी! अरे काय ताप आहे नुसता. किती जोरात बोलता, टीव्ही बंद करा, फोनवर बोलू नका, आत्ताच कुकर का लावलंय माझी मिटिंग आहे ना, तुम्ही दोघे किती जोरजोरात बोलता? असं म्हणून म्हणून कंटाळा आणलाय. घराचं ऑफिस केलंय नुसतं. काही स्वातंत्र्य आहे की नाही? त्यात पोराची शाळा घरूनच. त्याची भूक भूक वेगळीच. कुठे कुठे डोकं लावायचं मी? बरं घरी आहेत म्हणून चार वेगळे पदार्थ केले तर म्हणे मिरे छान लागत होते आज भाजीत..

मिरे नाआआआही धणे 

धअअअणे होते ते...

तरी मी सांगत असते..”

असं सगळं रामायण महाभारत अवसान गाळून ऐकणारा तो हळूच म्हणतो 

“अगं ए आपण ट्रेनमध्ये आहोत!”

ती मास्क घट्ट करून (पदर खोचून प्रमाणे)

“तूच म्हणालास बोल म्हणून!”


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

मी, भाकरी आणि मॅगी काकू!

हि घटनाही बीसीच आहे.. बोले तो बिफोर कोरोना.. 

तर झालं असं कि नुकतंच भारतीय किराणा सामान घेऊन आले होते आणि यावेळी मला चक्क ज्वारीचं पीठ मिळालं होतं त्यामुळे मी "आनंद पोटात माझ्या माईना" म्हणत म्हणत भाकरी करायचा निर्णय घेतला. खरंतर इथे फार जुनं पीठ मिळतं त्यामुळे शक्यतोवर मी थालीपीठच करते कारण नेहमीच "भाकरी करता येईना, पीठ खराब!" असं म्हणायची वेळ येते. पण यावेळी मी ठरवलंच कि ते काही नाही, काहीही करून भाकरीच करायच्या. 

तुम्ही जर महाराष्ट्राचे त्यातल्या त्यात मराठवाड्याचे असाल आणि लहानपणीपासून आज्जी आणि आईच्या हातच्या आणि लग्नानंतर सासूबाईंच्या हातच्या अप्रतिम भाकरी खाल्लेल्या असतील तर तुम्ही जगाच्या पाठीवर अंटार्टिकावर का असेना, ज्वारीच्या भाकरी करणे आणि खाणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क असतो! पीठ जुने आहे वाटले म्हणून जुन्या पिठाच्या भाकरी कश्या करायच्या ह्यासाठी त्या दिवशी दोन चार युट्युबवरचे व्हिडीओज पाहून आणि मीनाक्षी श्रीखंडे काकूंची गोल गरगरीत भाकरीची पोस्ट वाचून मीही भाकरी करायला घेतल्या. 

पण पीठ जुनंच असल्यामुळे भाकरी करता करता मी कधी त्या थापायला आणि त्यानंतर बडवायला लागले ते कळलेच नाही. भाकरी करणे, थापणे आणि बडवणे ह्या तीन अवस्था म्हणजे पीठ ताजे असेल तर तुम्ही भाकरी करता, पीठ २-३ महिन्यापूर्वीच असेल तर तुम्ही भाकरी थापता आणि पीठ वर्षानुवर्षे जून असेल तर तुम्ही भाकरी बडवता. एक भाकरी २-३ वेळा बडवून कशीबशी होत होती! 

मला भाकरी करता येतात बरं पण पीठ जुने असेल तर करायला अवघड जातात इतकंच. नाहीतर तुम्हाला वाटायचं ह्या बाईला येतंच नाहीत कि काय! 

त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे "हे" ऑफिसला आणि "चिरंजीव" शाळेत गेले होते त्यामुळे भाकरी भाजताना स्मोक डिटेक्टर कोकललं तरी मला रागावणारं कोणीही नव्हतं. तरीही स्मोक डिटेक्टर कोकलू नये म्हणून मी दारं खिडक्या उघड्या ठेवल्या. म्हणलं भाकरी बडवतांना पुन्हा ते कोकललं तर ताप नको! पण डोक्याला शॉट होतातच कारण मी मॅगी काकूंचा विचारच केला नाही! सगळ्या भाकरी करून मी हातच धूत होते तोवर बेल वाजली. हात पुसून दारात आले तर दारात कोणीच नाही आणि एकदम मॅगी काकू त्यांच्या घरातून अवतरल्या! 

आधीच भाकरींनी जीव खाल्ला होता आणि आता मॅगी काकूंना बघून "ये मैने क्या कर दिया भगवान!" वाटलं. त्यांना बघून माझ्या मनात हळूहळू भीती दाटून आली. कधी कधी मला दाट शंका येते कि मॅगी काकू वाट पाहूनच असतात; "कधी हिच्या घरातून मला न समजणारा आवाज येतोय आणि कधी जाऊन मी हिची शाळा घेते!" 

काकू: आत्ता मला पुन्हा तुझ्या घरातून काहीतरी आपटण्याचे आवाज आले. 

(अहो मी भाकरी बडवत होते. ज्यांना आपटते ते दोघे नाहीयेत घरात.)

मी: अहो मी एक प्रकारचा भारतीय फ्लॅटब्रेड बनवत होते. 

काकू: कोणता?

आता पुन्हा आली का पंचाईत! मागे "कुंकू" म्हणजे काय ते कसंबस समजावलं, आता भाकरी म्हणजे काय ते समजावून सांगावं लागेल! मला ज्वारीला इंग्रजीतच काय म्हणतात ते आठवेना तिथे जर्मनमध्ये कधी आठवावं? बरं जर्मनमध्ये ज्वारी हा शब्दच असेल कि नाही इथपासून सुरुवात आहे. तरीही मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला कि हे एक प्रकारचं मिल्लेट आहे ज्याचे आम्ही फ्लॅटब्रेड बनवतो. इत्यादी इत्यादी. 

काकू: पण तूझ्या घरातून इतक्या जोरात आवाज का येत होता? 

पुन्हा "बडवणे"ला इंग्रजी आणि जर्मन दोन्ही शब्द आठवेनात! बरं "थापणे"लाही आठवेनात. आता ह्यांना भाकरी अश्याच बडवाव्या किंवा थापाव्या लागतात हे कसं सांगू? 

मी: असा ब्रेड बनवताना पिठाच्या गोळ्याला एका प्लेटमध्ये घेऊन चांगलं हातानेच फ्लॅट करावं लागतं जोरजोरात म्हणून असा आवाज येतो हो! (जमलं एकदाचं काहीतरी सांगायला!) त्यांना म्हंटलं घरात या, मी तुम्हाला तो फ्लॅट ब्रेड दाखवते तर म्हणे जळका वास येतोय; मी नाही येत तुझ्या घरात! हे म्हणजे "घेणं ना देणं अन फुकटचं कंदील लावणं!"

पुन्हा काकू: पण जळका वास का येतोय? तू फ्लॅट ब्रेड सरळ इलेक्ट्रिक स्टोव्हवर भाजले कि काय? (त्यांना मी फारच अडाणी आहे असं सारखं सारखं सुचवायचंच असतं!)

आता पुन्हा पंचाईत! हो म्हंटलं तरी प्रॉब्लेम नाही म्हंटलं तरीही! मी भाकरी सरळ इलेक्ट्रिक स्टोव्हवर भाजतच होते त्यामुळेच जरा धूर झाला आणि जळका वास आला. दारं खिडक्या उघड्या असल्यामुळे तो वासहि मॅगी काकूंना माझ्याघरी घेऊन आला होता. स्वतःला सावरत मी म्हणाले  "नाही हो, चुकून थोडं पीठ इलेक्ट्रिक स्टोव्हवर पडलं ना त्यामुळे वास येतोय!" 

एकदाचं त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह थोडं कमी झालं आणि त्या मला म्हणाल्याच, "फार डिस्टर्ब होतं ग मला अश्या आवाजांनी. बरं कम्प्लेंट तरी किती वेळा करणार ना!"  

बाबो! पुन्हा कम्प्लेंट! "काय उठसूट कम्प्लेंटची धमकी देता हो? काय लावलंय काय? आम्ही म्हणजे तुम्हांला हे वाटलो का? काय रस्त्यावर पडलोय का? आता काय स्वयंपाक करणं सोडू कि काय? तुम्ही देणार का रोज डबा हं? वा! आयडिया चांगली आहे खरं! रोज डबा!"

नाही, ह्यातलं काहीही म्हणाले नाही मी! त्यांना पुन्हा विनंती केली कि "कम्प्लेंट मत किजीये, गरीब कि दुआ मिलेगी!" तेव्हा कुठे त्या मला बाय करून त्यांच्या घरात गेल्या आणि मला गाणं आठवलं "हात जोड इनको सलाम कर प्यारे! नहीं तो ये तो मॅगी काकू खाने नहीं देगी, पिने नहीं देगी, जीने नहीं देगी!"

आणि अश्या रितीने मी, भाकरी आणि मॅगी काकू हा एपिसोड सम्पला! मिलते है ब्रेक के बाद!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

गुरुवार, २३ जुलै, २०२०

स्वावलंबन

आत्ता एका मैत्रिणीने पोस्ट टाकली की काही पुरुषांना बेसिक स्वयंपाक यायला पाहिजे म्हणुन. मी काही ह्यासाठी लिहिलंय कारण माझ्या माहितीतल्या काहींना स्वयंपाकच काय घरातले सगळेच कामं व्यवस्थित येतात. 

त्यावरून आठवलं, इथे म्हणजेच म्युनिकमधल्या शाळेत माझ्या मुलाला सगळे बेसिक लाईफ स्किल्स म्हणजेच बेसिक स्वयंपाक करणे, जेवण झाल्यावर टेबल स्वच्छ करणे, भांडी घासणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शौचालय स्वच्छ ठेवणे इत्यादी शिकवत आहेत. ते मुलांना पाचवीपासून जेव्हा सहलीला घेऊन जातात तेव्हा तिथल्या हॉस्टेलमध्ये मी वर लिहिलेल्या सगळ्या गोष्टी मुलांनाच कराव्या लागतात. शाळेतही पहिलीपासून जेवणाच्या खोलीत गेल्यावर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मुलांना जबाबदारी वाटुन दिलेली असते. टेबल पुसणे, सगळ्यांच्या प्लेट्स उचलून डिशवॉशर मध्ये ठेवणे वगैरे. महत्वाचं म्हणजे पालक ह्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत. 

आमच्या मुलाला हे का करायला लावलं, ते का करायला लावलं? असं जर कोणी म्हणायला लागलं तर शाळा स्पष्ट शब्दात सांगते कि हेच नियम आहेत आणि ते पाळावेच लागतील. पण काही लोक ह्यात मेडिजल ग्राऊंड्सवर अपवाद असतात. त्यासाठी रीतसर डॉक्टरचे प्रमाणपत्र लागते. 

आपल्याकडे किती शाळा हे शिकवतात? ह्या गोष्टी अभ्यासक्रमात असणे फार गरजेचे आहे. मुलगा असो वा मुलगी बेसिक गोष्टी आल्याच पाहिजेत असं मला वाटतं!

ह्या गोष्टींना आपल्याकडे “स्वावलंबन” असा फार ऊत्तम शब्द आहे! कमीत कमी स्वतःच्या गोष्टी स्वतः करताच आल्या पाहिजेत. ह्यात कुठला आलाय मुलगा मुलगी भेद? 

तुम्हाला काय वाटतं?

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शुक्रवार, २६ जून, २०२०

आँखोकी गुस्ताखीयां

आज डोळ्यांच्या दवाखान्यात जाण्याचा योग्य आला. चाळीशी आलीये असं माझ्या डोळ्यांनी मला ठणकावून सांगितल्यावरच मी अपॉइंटमेंट घ्यायला फोन केला. तर रिस्पेशन ताई म्हणाली दोन महिन्यानंतरची अपॉइंटमेंट आहे. दुखणाऱ्या डोळ्यांकडे पाहून म्हणजे दुखणाऱ्या डोळ्यांचा विचार करून रिस्पेशन ताईला म्हंटलं "जरा आधीची दे ना ग अपॉइंटमेंट" तर म्हणे दीड महिन्यानंतरची आहे, यायचं तर या नाहीतर राहूद्या. इथे असंच आहे. तुम्ही मरायला टेकला असाल तर इमर्जन्सी क्लीनिकला जायचं नाहीतर तारीख पे तारीख चालूच राहणार. एखाद्या दिवशी, एखाद्या दवाखान्यात, एखाद्या टेबलवर सनी पाजी सारखं जोरदार हात मारुन मी म्हणणारच आहे हा डायलॉग. 

मागचा दीड महिना डोळ्यांनी जो असहकार पुकारला तो वाखाणण्याजोगा आहे. टीव्ही म्हणू नका, पुस्तक म्हणू नका, फोनवर फेसबुक, व्हॅट्सऍप म्हणू नका.. काही म्हणजे काही वाचू किंवा बघू देणार नाहीये आम्ही तुला, असंच काहीसं चालू होतं. एक मन वाटलं की तोपर्यंत एखाद्या ऑप्टिशियनकडे जाऊन एखादा चष्मा घेऊन येऊ पण इथल्या ऑप्टिशियन लोकांची तीन चार पानी प्रश्नपत्रिका लगेचच दुखणाऱ्या डोळ्यांसमोर आली आणि मी माझा मनसुबा बदलला. त्या प्रश्नपत्रिकेतली उत्तरं लिहून अजून "आँखोंकी रोशनी वगैरे चली जायेगी" म्हंटलं. कसाबसा दीड महिना काढला. पण चष्म्याचे सोपस्कार आठवून अजून १ दोन महिने कसे काढणार हा यक्ष प्रश्न पडला आहे. 

तर ह्या सगळ्यांत एक BC किस्सा आठवला. BC म्हणजे before corona.. 

साधारण मागच्या नोव्हेंबरची गोष्ट आहे. त्या काळात म्युनिकमध्ये वेगवेगळे रोग मुक्काम ठोकून असतात. त्यातलाच एक म्हणजे सायनसचे इन्फेक्शन. थंडी सुरु होत असते, सुर्प्रकाश कमी होऊन दिवस लहान होत असतो. फार भयानक वातावरण असते. मला जबरदस्त सायनसचे इन्फेक्शन झाले होते पण चिरंजीवांची  डोळ्याच्या दवाखान्यात अपॉइंटमेंट होती. ती चुकली तर पुन्हा एक दोन महिने अपॉइंटमेंट मिळायची मारामार, म्हणून मला खूप त्रास होत असताना त्याला घेऊन गेले. 

मला आधी वाटलं माझे डोळेच आले आहेत. कारण डाव्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं म्हणून रीतसर गॉगल वगैरे लावून मी गेले लेकाला घेऊन. वाटलं चला आपण डोळ्यांच्या दवाखान्यातच जातोय तर लगे आँखो म्हणजे लगे हाथो आपला डोळाही दाखवून घेऊ. भाबडी भारतीय विचारसरणी आपली. तिथे गेल्यावर रिस्पेशन ताईला म्हणाले कि मला पण डॉक्टरला डोळा दाखवायचा आहे, मी लेकासोबतच दाखवला तर चालेल का? 

माझ्या चेहऱ्याकडे डोळेही वर करुन न बघता "नाही" म्हणाली ना ती! मी तिला विनंती केली, म्हणाले " मला खुप त्रास होतोय, सहन होत नाहीये, कृपया मला दाखवु द्या हो." ताई तिच्या मतावर ठाम होती. "नाही म्हणजे नाही". बिना अपॉइंटमेंटचे त्यांच्या जीझसचे पण डोळे तपासणार नाहीत बहुतेक ते. ते आपण नाही म्हणत का स्वर्गातून ब्रह्मदेव जरी आला तरी तसं. 

मी :मला आत्ताचीच अपॉइंटमेंट दे. 
ताई: २ महिन्यानंतरची आहे. 
मी: पण माझा आत्ता डोळा दुखतोय, मैं कहाँ जाऊं? 
ताई: तो मैं क्या करू?

तोवर माझ्या डोळ्याने माझी पार वाट लावली होती. एकतर पाच सहा सिनियर सिटिझन्स आमच्या आधी पासून तिथे बसलेले होते. लेक "मेरा नम्बर कब आयेगा?" म्हणून ताप देत होता. त्यात हि ताई माझं ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी मी तिला विचारलं... 
"इमर्जन्सी क्लीनिकला जाऊ का? मला त्रास सहन होत नाहीये." ह्यावर ताईने जे भन्नाट उत्तर दिलं ते ह्याची देही ह्याची डोळा ऐकून आणि बघुन मला शब्दच सुचले नाहीत. ताईने अगदी साभिनय डोळा हातात पडतोय असं दाखवून मला म्हणाली "तुझा डोळा जर तुझ्या हातात आला असेल तरच तू इमर्जन्सीला जाऊ शकते. नाहीतर तिथेही तुला कोणी घेणार नाही." मी आवक होऊन, गपगुमान वेटिंग एरिया मध्ये येऊन बसले. तर लेक म्हणतो "बघ मी तुला आधीच सांगत असतो तू असे उद्योग करत जाऊ नकोस. इथे अपॉइंटमेंट शिवाय नाही दाखवता येत."

ये सब सुनके, मला जो धक्का बसला तो माझ्या डोळ्याने फारच मनावर घेतला. डोळ्याला वाटलं असेल "हि बाई आता आपल्याला हातात घेईल आणि जाईल इमर्जन्सी क्लिनिकला. उगी कुठे रिस्क घ्या. मी आपला असाच बरा  होतो." त्या दवाखान्यात लेकाचा नम्बर येईपर्यंत, पाणी गाळून गाळून डावा डोळा एकदम राईट झाला ना! 

या चमत्कारामुळे आता मनात येतंय कि त्या डोळ्यांच्या दवाखान्यातच एखादी नोकरी मिळते का बघावी म्हणजे अशी "आँखोंकी गुस्ताखीयां माफ हो जायेगी. क्यों?"


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

वाचकांना आवडलेले काही