सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

मुडदा बशीवला त्या कोरोनाचा

मार्चमधे लॉकडाउन सुरु झाल्यापासुन एकमेकांना बारा महीने अठरा काळ झेलणारे दोन कावलेले जीव, सणावारासाठी वाणसामान आणायला म्हणुन भारतीय दुकानात जायला निघतात. घरातून निघून, मेट्रो स्टेशनपर्यंत, पुन्हा स्टेशनवर ट्रेन येईपर्यंत हे दोन मास्कधारी एकमेकांचे थोबा.. म्हणजे मास्क सुद्धा बघत नाहीत. 

पण ट्रेनमध्ये व्यवस्थित जागा मिळाल्यावर, स्थानापन्न होऊन, तो तिच्याकडे बघत म्हणतो 

“बोल!”

आता हे म्हणजे घरचं झालं थोडं अन व्याह्याने धाडलं घोडं. घरी काय कमी शालजोडीतले संभाषण होते म्हणुन मेट्रोमध्ये पण तेच. पण ती फक्त त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि मास्कमधल्या मास्कमध्ये (तोंडातल्या तोंडात प्रमाणे) काहीतरी पुटपुटते. तिच्या मनात येतं की तिने इतक्या दिवसांत हजार वेळा बोललेला घिसापीटा डायलॉग पुन्हा त्याच्या मास्कधारी चेहऱ्यावर फेकून मारावा 

“तू जा ना यार ऑफिसला!”

पण तिला माहित असतं की ह्या मेल्या कोरोनामुळे ना ऑफिसवाले बोलावणार, ना आपण ह्याला जाऊ देणार. 

तो पुन्हा तिला म्हणतो 

“अगं बोल ना! आत्ता काहीतरी पुटपुलीस.”

शेवटी न रहावुन ती त्याला सांगूनच टाकते 

“मुडदा बशीवला त्या कोरोनाचा! नुसता जीव खाल्लाय, शांतात म्हणुन नाहीये. सतत आपलं सकाळ, दुपार, संध्याकाळ बोल बोल. घरात नुसती किटकिट तुझ्या मिटिंग्जची. एक झाली दुसरी अन मग तिसरी! अरे काय ताप आहे नुसता. किती जोरात बोलता, टीव्ही बंद करा, फोनवर बोलू नका, आत्ताच कुकर का लावलंय माझी मिटिंग आहे ना, तुम्ही दोघे किती जोरजोरात बोलता? असं म्हणून म्हणून कंटाळा आणलाय. घराचं ऑफिस केलंय नुसतं. काही स्वातंत्र्य आहे की नाही? त्यात पोराची शाळा घरूनच. त्याची भूक भूक वेगळीच. कुठे कुठे डोकं लावायचं मी? बरं घरी आहेत म्हणून चार वेगळे पदार्थ केले तर म्हणे मिरे छान लागत होते आज भाजीत..

मिरे नाआआआही धणे 

धअअअणे होते ते...

तरी मी सांगत असते..”

असं सगळं रामायण महाभारत अवसान गाळून ऐकणारा तो हळूच म्हणतो 

“अगं ए आपण ट्रेनमध्ये आहोत!”

ती मास्क घट्ट करून (पदर खोचून प्रमाणे)

“तूच म्हणालास बोल म्हणून!”


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही