शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

पोपट

शनिवारचा जरा गडबडीचा दिवस. रविवारी बाजार बंदमुळे दोन चार दुकानांमध्ये जाऊन सामान आणणे वगैरे कामं दुपारपर्यंत आटपून, तुम्ही जरा वामकुक्षी घेऊया असा विचार करतच असता की तो इमेल येऊन धडकतो. जो वाचुन तुम्हाला कळतं की आज वामकुक्षीच काय रात्रीची झोपही दुरापास्त होणार आहे. काही नाही, एका प्रोजेक्टची डेडलाईन रविवारीच आहे असं लिहिलेलं असतं त्यात त्यामुळे तुम्ही वामकुक्षीला पुढे ढकलून लॅपटॉपला जवळ घेता. 

तुम्ही पटापट एकेक काम लॅपटॉपवेगळं करत असता .. ते नाही का हातावेगळं म्हणतात तसं! तुमचे हे थोड्या वेळाने तुमच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसतात आणि अगदी प्रेमाने विचारतात "टीव्ही लावु का ग?"  तुमच्या मनात येतं "नेकी और पुछ पुछ!"  पण तसं काहीही न दाखवता तुम्ही शांतपणे "हो" म्हणता. तुम्हाला वाटतं आता डेडलाईनच आहे प्रोजेक्टची तर उगी कशाला एखादा डायलॉग मारुन आ बैल मुझे मार करावं, हो किनई? कारण "एक डायलॉग नवरा बायकोको भांडकुदळ बना सकता है." 

टीव्ही चालु होतो. आयपीएल, राजकारण, बातम्या इत्यादी गोष्टींमध्ये फिरुन फिरुन गाडी शेवटी युट्युबवर खानपानाच्या चॅनलवर येते. तुम्ही कामात मग्न असूनही तुमचं अधूनमधून लक्ष टीव्हीकडे असतंच बरं! एव्हाना संध्याकाळ होत आलेली असते आणि तुमच्या डोक्यात संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय करावं?असं डोक्यात येतं म्हणुन तुम्ही ह्यांच्याकडे बघता तर हे "मेरे पिया गये रंगून" म्हणजे हे अगदी मन लावून टीव्हीवर "बटाटेवड्याची कृती" बघत असतात. मग तुम्ही पण त्यांची "मेरे रंग में रंगनेवाली" होऊन अगदी मन लावून "वरुण इनामदारला" बघत असता. तो नाही का हँडसम शेफ! असो. 

तर, ती चवदार बटाट्याची भाजी, त्या भाजीचे वडे करण्यासाठी त्यासाठी बनवलेलं बेसनाचं पीठ, हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेची चटणी. अहाहा! त्यात वरुणची बोलायची स्टाईल. क्या बात है! आता तुमच्या डोक्यात काम सोडून, बस्स बटाटेवडे आणि वरुण! तुम्हाला वाटायला लागतं की हा व्हिडीओ संपला की हे उठून कुकरला बटाटे लावणार आणि पुढच्या एक दीड तासात तुमच्या हातात गरमागरम बटाटेवडे, हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेची चटणी असलेली डिश येणार. भलंमोठं काम आणि आयता बटाटेवडा, और क्या चाहिये? 

वामकुशीला पुढे ढकलल्यामुळे असं गरमागरम बटाटेवड्याचं दिवास्वप्न तुम्ही टीव्हीसमोर बसुन बघायला लागता! कृती संपवून, वरुण तुमचा निरोप घेतो, तुम्ही जड अंतकरणाने त्याला बाय करता आणि तुम्हाला वाटतं की आता तुमचं बटाटेवडा स्वप्न प्रत्यक्षात येणार तोच.... 

हे घड्याळाकडे बघतात आणि तुम्हाला म्हणतात, "अगं साडेसहा होत आलेत, तुला खूपच काम आहे तर मी खिचडी टाकू का?"

हे ऐकुन तुमच्या स्वप्नातल्या हिरवीगार पुदिन्याची आणि लालचुटुक चिंचेच्या चटणीचा पोपट होऊन त्या गरमागरम बटाटेवड्याला घेऊन उडून जातो!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही