शुक्रवार, २६ जून, २०२०

आँखोकी गुस्ताखीयां

आज डोळ्यांच्या दवाखान्यात जाण्याचा योग्य आला. चाळीशी आलीये असं माझ्या डोळ्यांनी मला ठणकावून सांगितल्यावरच मी अपॉइंटमेंट घ्यायला फोन केला. तर रिस्पेशन ताई म्हणाली दोन महिन्यानंतरची अपॉइंटमेंट आहे. दुखणाऱ्या डोळ्यांकडे पाहून म्हणजे दुखणाऱ्या डोळ्यांचा विचार करून रिस्पेशन ताईला म्हंटलं "जरा आधीची दे ना ग अपॉइंटमेंट" तर म्हणे दीड महिन्यानंतरची आहे, यायचं तर या नाहीतर राहूद्या. इथे असंच आहे. तुम्ही मरायला टेकला असाल तर इमर्जन्सी क्लीनिकला जायचं नाहीतर तारीख पे तारीख चालूच राहणार. एखाद्या दिवशी, एखाद्या दवाखान्यात, एखाद्या टेबलवर सनी पाजी सारखं जोरदार हात मारुन मी म्हणणारच आहे हा डायलॉग. 

मागचा दीड महिना डोळ्यांनी जो असहकार पुकारला तो वाखाणण्याजोगा आहे. टीव्ही म्हणू नका, पुस्तक म्हणू नका, फोनवर फेसबुक, व्हॅट्सऍप म्हणू नका.. काही म्हणजे काही वाचू किंवा बघू देणार नाहीये आम्ही तुला, असंच काहीसं चालू होतं. एक मन वाटलं की तोपर्यंत एखाद्या ऑप्टिशियनकडे जाऊन एखादा चष्मा घेऊन येऊ पण इथल्या ऑप्टिशियन लोकांची तीन चार पानी प्रश्नपत्रिका लगेचच दुखणाऱ्या डोळ्यांसमोर आली आणि मी माझा मनसुबा बदलला. त्या प्रश्नपत्रिकेतली उत्तरं लिहून अजून "आँखोंकी रोशनी वगैरे चली जायेगी" म्हंटलं. कसाबसा दीड महिना काढला. पण चष्म्याचे सोपस्कार आठवून अजून १ दोन महिने कसे काढणार हा यक्ष प्रश्न पडला आहे. 

तर ह्या सगळ्यांत एक BC किस्सा आठवला. BC म्हणजे before corona.. 

साधारण मागच्या नोव्हेंबरची गोष्ट आहे. त्या काळात म्युनिकमध्ये वेगवेगळे रोग मुक्काम ठोकून असतात. त्यातलाच एक म्हणजे सायनसचे इन्फेक्शन. थंडी सुरु होत असते, सुर्प्रकाश कमी होऊन दिवस लहान होत असतो. फार भयानक वातावरण असते. मला जबरदस्त सायनसचे इन्फेक्शन झाले होते पण चिरंजीवांची  डोळ्याच्या दवाखान्यात अपॉइंटमेंट होती. ती चुकली तर पुन्हा एक दोन महिने अपॉइंटमेंट मिळायची मारामार, म्हणून मला खूप त्रास होत असताना त्याला घेऊन गेले. 

मला आधी वाटलं माझे डोळेच आले आहेत. कारण डाव्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं म्हणून रीतसर गॉगल वगैरे लावून मी गेले लेकाला घेऊन. वाटलं चला आपण डोळ्यांच्या दवाखान्यातच जातोय तर लगे आँखो म्हणजे लगे हाथो आपला डोळाही दाखवून घेऊ. भाबडी भारतीय विचारसरणी आपली. तिथे गेल्यावर रिस्पेशन ताईला म्हणाले कि मला पण डॉक्टरला डोळा दाखवायचा आहे, मी लेकासोबतच दाखवला तर चालेल का? 

माझ्या चेहऱ्याकडे डोळेही वर करुन न बघता "नाही" म्हणाली ना ती! मी तिला विनंती केली, म्हणाले " मला खुप त्रास होतोय, सहन होत नाहीये, कृपया मला दाखवु द्या हो." ताई तिच्या मतावर ठाम होती. "नाही म्हणजे नाही". बिना अपॉइंटमेंटचे त्यांच्या जीझसचे पण डोळे तपासणार नाहीत बहुतेक ते. ते आपण नाही म्हणत का स्वर्गातून ब्रह्मदेव जरी आला तरी तसं. 

मी :मला आत्ताचीच अपॉइंटमेंट दे. 
ताई: २ महिन्यानंतरची आहे. 
मी: पण माझा आत्ता डोळा दुखतोय, मैं कहाँ जाऊं? 
ताई: तो मैं क्या करू?

तोवर माझ्या डोळ्याने माझी पार वाट लावली होती. एकतर पाच सहा सिनियर सिटिझन्स आमच्या आधी पासून तिथे बसलेले होते. लेक "मेरा नम्बर कब आयेगा?" म्हणून ताप देत होता. त्यात हि ताई माझं ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी मी तिला विचारलं... 
"इमर्जन्सी क्लीनिकला जाऊ का? मला त्रास सहन होत नाहीये." ह्यावर ताईने जे भन्नाट उत्तर दिलं ते ह्याची देही ह्याची डोळा ऐकून आणि बघुन मला शब्दच सुचले नाहीत. ताईने अगदी साभिनय डोळा हातात पडतोय असं दाखवून मला म्हणाली "तुझा डोळा जर तुझ्या हातात आला असेल तरच तू इमर्जन्सीला जाऊ शकते. नाहीतर तिथेही तुला कोणी घेणार नाही." मी आवक होऊन, गपगुमान वेटिंग एरिया मध्ये येऊन बसले. तर लेक म्हणतो "बघ मी तुला आधीच सांगत असतो तू असे उद्योग करत जाऊ नकोस. इथे अपॉइंटमेंट शिवाय नाही दाखवता येत."

ये सब सुनके, मला जो धक्का बसला तो माझ्या डोळ्याने फारच मनावर घेतला. डोळ्याला वाटलं असेल "हि बाई आता आपल्याला हातात घेईल आणि जाईल इमर्जन्सी क्लिनिकला. उगी कुठे रिस्क घ्या. मी आपला असाच बरा  होतो." त्या दवाखान्यात लेकाचा नम्बर येईपर्यंत, पाणी गाळून गाळून डावा डोळा एकदम राईट झाला ना! 

या चमत्कारामुळे आता मनात येतंय कि त्या डोळ्यांच्या दवाखान्यातच एखादी नोकरी मिळते का बघावी म्हणजे अशी "आँखोंकी गुस्ताखीयां माफ हो जायेगी. क्यों?"


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही