तुमची ट्रिप बऱ्यापैकी मनाजोगी झालेली असते. तुमच्या मनाजोगी हं! लेकाला सगळीकडचे तेच तेच युरोपिअन आर्किटेक्चर पाहून जाम कंटाळा आलेला असतो. त्यामुळे ट्रिप सम्पवून कधी एकदा घरी जाऊन पडतोय असं त्याला झालेलं असतं आणि तुम्हाला वाटत असत की अजुन एखादा दिवस राहिलो असतो. पण प्रत्येक गोष्ट थोडीच तुमच्या मनासारखी होत असते! नाही का? त्यामुळे परतीच्या वाटेवर निघण्यासाठी एकदाचे तुम्ही बुडापेस्ट स्टेशनला येता.
स्टेशनवर आल्या आल्या समोरच्या बोर्डवरची अक्षरं वाचुन चिरंजीव इतक्या जोरात "काय्य्ये हे" किंचाळतात की त्यामुळे आजुबाजूच्या प्रवाश्यामध्ये "डर का माहौल" होतो. त्या डर के माहौल में तुम्ही ती अक्षर वाचता आणि तुम्हाला कळतं म्युनिकला जाणारी ट्रेन १ तास उशीरा आहे. तुम्ही त्याला समजावून सांगता की अरे १ तास म्हणजे काहीच नाही आम्ही लहान होतो तेव्हा ट्रेन्स कमीत कमी ३-४ तास उशिरा यायच्या, वगैरे वगैरे. पण आजकाल मुलांवर समजवण्याचे काडीचेही परिणाम होत नाहीत.
कसाबसा एक तास होतो आणि ट्रेन बुडापेस्ट स्टेशनहून म्युनिकच्या दिशेने प्रयाण करते. ट्रेन निघाल्या निघाल्या ट्रेनचालक एक तास उशीर झाल्याबद्दल इतक्या मार्दव स्वरात सगळ्या प्रवाश्यांची माफी मागतो ना की बास! ते माफीचे उद्गार ऐकल्या ऐकल्या इकडे चिरंजिवांचे पूर्ण युरोपच्या रेल्वे सिस्टीमवर ताशेरे ओढणे सुरु होते. म्हणून पुन्हा तुम्ही त्याला समजवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करता, पण तुमचेच चिरंजीव ते, कुणाच्या "बा चे ऐकून घेतील तर शपथ!
तुम्हाला एक गहन प्रश्न पडतो की हे लोक रेल्वेच्या डब्यात बोर्ड का लावत असतील? त्यावर लगे ट्रेन ची स्पीड, पुढच्या गावाला पोहोचण्याची वेळ, म्युनिकला पोहोचण्याची अपेक्षित वेळ, इत्यादी गोष्टी. ते पाहून पाहून चिरंजिवांच्या ताशेरे ओढण्याच्या प्रतिभेला फुटणारे धुमारे पाहून, नाही ऐकुन, तुम्हा दोघांच्या मनात विचार चमकून जातो "बरं आहे इथे कोणाला मराठी कळत नाही ते."
कसेकबे चिरंजीव पुस्तक वाचण्यात गुंग होतात आणि तुम्ही सुटकेचा निश्वास टाकणार तोच, ट्रेन हंगेरीची बॉर्डर सोडून ऑस्ट्रियात येते. त्यामुळे त्या गावात ट्रेनचालक बदलतो. नवीन ट्रेनचालक पुन्हा तीच माहिती देतो कि बुडापेस्ट मध्ये झालेल्या टेक्निकल प्रोब्लेममुळे ट्रेनला एक तास उशीर झाला आणि पुन्हा तेव्हढ्याच आर्जवी स्वरात सगळ्या प्रवाश्यांची माफी मागतो. झालं, बटन ऑन केल्यासारखे तुमचे चिरंजीव पण त्यांची टेप सुरु करतात. "असे कसे लेट होऊ शकतात हे लोक? आपल्याला आता किती रात्र होईल घरी पोहोचायला..... on and on... ."
प्रत्येकवेळी तिकीट चेकर आले की तेच, ट्रेनची स्पीड कमी झाली की तेच, प्रत्येक गावाला ट्रेन थांबली की तेच, तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करायला लागले की तेच, काही खाणार का विचारलं कि तेच. अर्रर्रर्र भुणभुण चालूच. ह्यावर एकच काय तो तुमच्या कानांना दिलासा असतो, तो म्हणजे पुन्हा ऑस्ट्रिया सम्पुन जर्मनीच्या बॉर्डरवर ट्रेनचालक बदलल्यावर, तिने अगदी शांत स्वरात तुमची मागितलेली माफी. त्यांचे ते शब्द ऐकून, तुमच्या (भुणभुणीने)दुखऱ्या झालेल्या कानांवर कोणीतरी फुंकर घालतंय असं वाटतं.
हतबल झालेले तुम्ही समोरच्या टेबलवर डोकं ठेवून, डोक्यावर स्टोल घेऊन, कानात बोटं घालून झोपायच्या तयारीत असतानाच पोलीस दत्त म्हणून उभे राहतात. त्यांना तुमचे पासपोर्ट पाहून तुमचं थोबा.. म्हणजे चेहरा बघायचा असतो. तुम्हाला वाटतं आता हे पण माफी मागतील आणि तुमच्या समोरचं तुणतुणं चालू होईल. पण देवकृपेने पोलीस तुमच्या सगळ्यांचे गांजलेले थोबा.. चेहेरे पाहून लगेच दुसऱ्या प्रवाश्यांकडे मोर्चा वळवतात.
कसातरी सहा साडे सहा तासांच्या प्रवासानंतर हा चिरंजीवांची भुणभुण आणि ट्रेनचालकांची माफीचा खेळ सम्पतो. पुन्हा एकदा सगळ्यात शेवटी त्या ट्रेनचालक ताईचे माफीचे शब्द ऐकून तुम्हाला मनाशी खात्रीच पटते की म्युनिक स्टेशनला नक्कीच रेल्वेचे लोक तुमचं हार तुरे देऊन आणि तुमच्या पायावर लोटांगण घालून तुमचं यथोचित स्वागत करणार. एक तास ट्रेन लेट झाली म्हणून इतक्या वेळा माफी मागणारे, त्यावर अजुन अर्धा तासाच्या उशीरावर एवढं तर करूच शकतात, नाही का! पण तुमचा भ्रमनिरास होतो.
म्युनिक स्टेशनवर उतरल्या उतरल्या बंद झालेल्या तुमच्या तुणतुण्याला घेऊन तुम्ही घरी पोहोचता आणि "उद्या सकाळी डब्यासाठी काय भाजी करावी बरं?" ह्या यक्ष प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मग्न होता!!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक