गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

सौंदर्य


इथे मेट्रोने प्रवास करताना दरवेळी एक से एक अनुभव येतात. त्यातले काही अगदी न विसरता येण्यासारखे असतात. 


आता परवाच किराणा सामान आणायला इंडियन स्टोअरला निघाले होते. माझ्यासमोरच्या सीटवर एक मूर्तिमंत कि काय म्हणतात ते सौंदर्य बसलेलं होतं. नजर हटतच नव्हती चेहऱ्यावरून. अत्यंत अप्रतिम अशा केशरचनेत बांधलेले केस, रेखीव भुवया आणि बोलके डोळे, चाफेकळी नाक, जबरदस्त फीचर्स होते. चेहऱ्याला हलकासा मेकअप. अगदी मेंटेन्ड बांधा आणि तिला शोभेल असा पोशाख. गळ्यात मोत्याची नाजुकशी माळ, कानात मोती, हातात त्याच मोत्यांचे ब्रेसलेट. मंद अशा अप्रतिम परम्युमचा दरवळत असलेला सुगंध. माझं हे सगळं निरीक्षण चालू असताना तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, ओशाळले ना मी. पण सावरून बसत तिला स्माईल दिली. तिने दिलेली दिलखेचक स्माईल मी विसरूच शकत नाही. तितक्यात त्या सौंदर्यवतीचे स्टेशन आले आणि मला चक्क बाय करून ती निघूनही गेली. 


मनात आलं हिच्या वयाची होईपर्यंत मी जगले तरी खूप झालं.... ८० वर्षांच्या आज्जी होत्या त्या!


ह्या आज्जीना पाहून माझ्या आजी (आईची आई) आणि आजीसासूबाई आठवल्या. दोघीही इतक्या सुंदर आणि सोज्ज्वळ दिसायच्या ना कि बघतच राहावं. 


आजीसासूबाई एकदम उंचापुऱ्या, सडसडीत, गोऱ्यापान. कोणत्याही रंगाचे नऊवार इतकी मस्त दिसायची ना त्यांना. मी लहान असतांना रोज त्या मंदिरात जायच्या तेव्हा त्यांना बघायचे. चापुनचोपुन नेसलेली नऊवार, हातात बांगड्या, कपाळावर कुंकू, छानसा अंबाडा, कधीकधी त्यावर लावलेलं एखादं फुल. 


माझी आजी म्हणजे पुलंच्या भाषेतली सुबक ठेंगणी. ती जेव्हा सकाळी तिची वेणीफणी करायची तेव्हा मला तिला बघायला फार आवडायचं. तिचा तो स्पेशल डबा ज्यात तिची फणी, आरसा, कुंकू, मेण वगैरे असायचं. छान अंबाडा घालून त्यात आकडे वगैरे लावून झालं की कपाळावर मेण लावून अप्रतिम गोल गरगरीत कुंकू रेखायची. तिच्या चेहऱ्यात फार गोडवा होता. 


दोघींच्याही चेहऱ्यावरचे शांत आणि सात्विक भाव जसं कि देव्हाऱ्यातली समईच जणु! 


तशी सौंदर्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलतच असते त्यामुळेच सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यातच असतं म्हणतात हो ना?? पण हे आज्जी लोकांचं सात्विक सौंदर्य बघायला नजर मात्र नातीचीच हवी हं!!



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


२ टिप्पण्या:

राहुल देशमुख म्हणाले...

भारी सात्विक. डोळ्यापुढे तरळून गेल ते सौंदर्य. 🙏

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक म्हणाले...

हो रे आज खूप आठवण आली...

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही