तुम्हाला सकाळी सकाळी अलार्मच्या आवाजाने जाग येते. तुम्ही मोबाईल चेक करता तर पहाटेचे ४.३० वाजलेले असतात. चिडून तुम्ही ह्या वेळेला अलार्म का वाजतोय म्हणून अर्धवट झोपेत पुन्हा मोबाईल चेक करता तर तुमच्या मोबाईमधला अलार्म वाजतच नसतो. मग तुम्हाला वाटतं कि नवऱ्याचा मोबाईल वाजतोय म्हणून तुम्ही ह्या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन नवऱ्याचा मोबाईल चेक करता. तर त्यातही अलार्म वाजत नसतो.
आता तुम्हाला आजूबाजूच्या परिसराचे भान येते आणि लक्षात येतं की हा जो काय अलार्म वाजतोय तो लोकांच्या घरात वाजतोय म्हणून तुम्ही त्यांना शालजोडीतले शब्द मनातल्या मनात वाहून पुन्हा झोपायचा प्रयत्न करता. पण हा अलार्म टणटण वाजतच राहतो. तुम्ही १० मिनिटांनी चडफडत उठता आणि पहाटेच्या प्रचंड गारठ्यात बाहेरच्या पॅसेजमध्ये जाऊन आवाजाचा कानोसा घेता आणि तुम्हाला साक्षात्कार होतो कि हा स्मोक डिटेक्टरचा आवाज आहे. ह्या विचारासरशी भीतीने अंगावर सरसरून काटा येतो. कोणाच्या घरात आग तर लागली नाहीये ना?
तुम्ही पटकन नवऱ्याला उठवता आणि त्याला परिस्थिती सांगता. मग तुम्ही दोघे पॅसेजमध्ये येऊन नक्की कोणाच्या घरातून स्मोक डिटेक्टरचा आवाज येतो त्याचा अंदाज घेत असताना हळूहळू जळका वास यायला सुरुवात होते. तुम्हाला वाटतं वर राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरातून आवाज येत असेल बहुतेक, कदाचित ती गावाला गेलीये आणि घरात काहीतरी झालं असेल म्हणून तुम्ही इतक्या पहाटे तिला कॉल लावता. त्या स्मोक डिटेक्टरचा आवाज आता वरच्या मजल्यावर अजूनच टणटणत असतो.
मैत्रीण फोन उचलते आणि दार उघडून बाहेर येऊन म्हणते की तिच्या घरात सगळं व्यवस्थित आहे. तुमचा जीव थोडा भांड्याच्या काठावर येतो. मग ती म्हणते कि इथे तिच्या बाजूच्या घरात एक बॅचलर राहतो. मग तुम्हाला सगळ्यांना खात्री होते कि स्मोक डिटेक्टरची टणटण आणि जळका वास त्याच्याच घरातून येतोय. तुम्ही सगळे बऱ्याच वेळा त्याच्या घराची बेल वाजवता पण तो बंधू उठेल तर शपथ.
मग तुमच्या ह्यांच्या लक्षात येतं कि बिल्डिंग मध्ये इंग्लिश समजत असलेला अजून एक बॅचलर आहे त्याला उठवूया. कारण अशा परिस्थितीत नक्की कोणत्या इमर्जन्सी नंबरवर कॉल करावा हे कोणालाच कळत नसत. चक्क बेल वाजवल्यार तो दुसरा बॅचलर फ्लोरिअन दार उघडतो आणि त्याला परिस्थिती सांगितल्यावर लगेच वरच्या मजल्यावर येतो. आणि तुमच्या ह्यांना म्हणतो कि "धन्यवाद तुम्ही मला आगीपासून वाचवलं". त्यामुळे तुमच्या डोक्यात उगीचंच आगीचे विचार यायला लागतात. इतक्या वेळापासून स्मोक डिटेक्टरची टणटण आता तुमच्या डोक्यात घणघणत असते. तुम्ही सगळेच खूप घाबरलेले असता कारण जळका वास वाढत चाललेला असतो. आत नक्की काय झालंय हे कोणालाच कळत नसतं.
मग फ्लोरिअन आणि तुम्ही सगळे त्या बॅचलरच्या घराचं दार जोरजोरात वाजवता तरीही काहीच प्रतिसाद येत नाही. आता सगळ्यांच्या मनावरचा ताण वाढत असतो. शेवटी फ्लोरिअन फायर ब्रिगेडच्या नम्बरवर कॉल करतो आणि तेवढ्यात तो मंद बॅचलर दार उघडून धुरातून बाहेर येतो. त्याच्या घरात सगळा धूर पसरलेला असतो आणि त्याला त्याच काहीही सोयरसुतक नसतं. फ्लोरिअन त्याला जर्मनमध्ये सांगत असतो कि बंधू खिडक्या दारं उघड सगळे; तर ते येडं आजूबाजूला तुम्हा भारतीयांना बघून घराचं दार लावायला लागतं. फ्लोरिअन फायर ब्रिगेडशी बोलतच त्या मंद बॅचलरला विचारतो "Alles gut?" सगळं ठीक आहे ना? धुराच्या आवरणातून बाहेर येत बॅचलर म्हणतो हो सगळं ठीक आहे आणि तुमच्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. रात्री उशिरा काहीतरी खायचं म्हणून मंद बॅचलरने काहीतरी ग्रिलिंगसाठी लावलेलं असतं आणि त्याचा कुंभकर्ण झालेला असतो. त्याचा धूर असतो तो. एकदाची स्मोक डिटेक्टरची टणटण तो बंद करतो.
अरे पण तुमच्या घरात, तुमच्या बोडख्यावर स्मोक डिटेक्टर अर्धा एक तास कोकलतोय, आजूबाजूला प्रचंड धूर पसरलाय, बाहेर लोक बेल बडवतायेत, आणि तुम्ही घोडे विकून झोपले आहात? घोडे विकून कि ... देव जाणे. "कोणती उच्च प्रतीची लावून झोपला होता त्याला विचारावं लागेल?" तुमचे "हे" मराठीत म्हणतात. शेवटी तुम्ही सगळे फ्लोरिअनला त्या मंद बॅचलरसोबत सोडून घरी येता तर पुढच्या पाचच मिनिटांत ७-८ फायर ब्रिगेडचे लोक तुमच्या बिल्डिंगमध्ये हजर असतात. त्यांची प्रोसिजर पूर्ण करून आणि बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर नीट तपासून ते आले तसे शांतपणे निघून जातात.
आणि तुम्हाला मॅगी काकूंची आठवण येते. त्या ऑपरेशनसाठी गेल्या नसत्या तर तुम्ही उठायच्या आधीच फायर ब्रिगेडचे लोक बिल्डिंगमध्ये दाखल झालेले असते कारण मंद बॅचलर त्यांच्या वरच्याच घरात राहतोय. ज्या मॅगी काकू तुमच्या घरातल्या दाराचं कुरकुरणं ऐकु शकतात त्यांच्या तिखट कानांना स्मोक डिटेक्टरचा आवाज सुरु व्हायच्या आधीच गेला असता ना!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
३ टिप्पण्या:
हा हा हा... बॅचलर म्हंजे बॅचलर ... त्याच्या ढूंगा ला खबर नसती झाली.
पण good job. Keep it up 👍😊
एक नंबरचा कुंभकर्ण
हाहाहा.. अगदी खरं आहे!! :)
टिप्पणी पोस्ट करा