गुरुवार, १३ मार्च, २०२५

चुकीला माफी नाही

मागच्या आठवड्यात इथे कार्निव्हलची सुट्टी होती आठ दिवस. सोमवारी शाळा सुरु झाल्या. आत्ता ही बातमी वाचली की एका विमानतळावर २१ मुलांना पोलिसांनी शाळेच्या परवानगीशिवाय सुट्टीवर फिरतांना पकडलं आणि त्यांच्या आईवडिलांना १००० युरोचा दंड ठोठावला. सगळी मुलं आईवडिलांसोबत होती. खरंतर अशा बातम्या इथे नवीन नाहीत. बऱ्याच भारतीय लोकांनाही असा दंड भरावा लागला आहे. 

जर्मनीत साधारणपणे प्रत्येक ऋतू बदलला आठ किंवा पंधरा दिवसांची सरकारी सुट्टी शाळांना असते आणि सरकारी सुट्टीला जोडून सुट्टी कधीच मिळत नाही कारण काय तर म्हणे “कायदा” आहे. जर तशी सुट्टी पाहिजे असे तर शाळेकडून रितसर परवानगी पत्र घेऊन फिरावं लागतं. ह्यावर सरकारने असं कारण दिलंय की शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मुलभूत हक्क आहे आणि पालकांनीही गोष्ट कसोशीने पाळलीच पाहिजे. 

सरकारी सुट्टीशिवाय तुमचं मूल घरी असेल तर एकतर ते आजारी असणार किंवा त्याने शाळेकडून एखाद्या कामासाठी परवानगी पत्र घेतलेलं असणार. असं काही नसेल तर मग अवघड असतं. कारण शाळा सुरु असताना एखादं लेकरू उंडारत असेल तर पोलिसांना त्याला जाब विचारायचा अधिकार आहे. 

आम्ही म्युनिकला आलो तेव्हा आम्हाला ह्या गोष्टीची कल्पनाच नव्हती. मी आपलं मनात गणित करून ठेवलं होतं की नाताळच्या सुट्टीला जोडून १५ दिवस सुट्टी घ्यायची आणि भारतात जाऊन यायचं. मला वाटलं पुण्यातल्या सारखं शाळेत रजेचा अर्ज दिला की झालं. मी मुलाच्या हातून अर्ज पाठवला आणि त्याच्या बाईंनी मला सरळ भेटायलाच बोलावलं! मी बुचकळ्यात पडले की रजेचा अर्जच तर दिला त्यात भेटायचं कशाला? मी काय पाप केलं! 

बाईंना भेटले तर त्यांनी मला नियमपत्रिका दाखवून समजावलं की कायद्यानुसार तुम्हाला सुट्टीला जोडून सुट्टी मिळणार नाही. तरी मी यंटमसारखं त्यांच्या मागेच लागले पण बाई कट्टर जर्मन आहेत आणि जर्मन लोकांइतके नियम पाळणारे लोक जगात नाहीयेत ह्याचा मला प्रत्यय आला आणि मी तो विचार तेव्हा सोडला. 

पण असा यंटमपण करायची लहर मला अधूनमधून येतच असते. ह्यावर्षी मुलाची दहावी झालीये तर मला वाटलं नियम जरा शिथील झाला असेल म्हणून मी पुन्हा त्याच्या गुरुजींच्या मागे लागले की त्याला नाताळच्या सुट्टीला जोडून सुट्टी द्या म्हणून. माझ्या सततच्या इमेल्सला वैतागून गुरुजींनी हात टेकले आणि ते मुलाला म्हणाले ”तुझ्या आईला समजव बाळा, मी थकलो आता! त्यांना सरकारी नियम दाखवला तरी त्या ऐकत नाहीत! त्यांना सांग तुम्हाला १००० युरो भरायचे असतील तर खुशाल सुट्टी टाका!”

मग काय लेकानेही घरी येऊन शाळा घेतली माझी आणि ठणकावून सांगितलं की चुकीला माफी नाही बरं आई!! म्हणलं हे बरंय गुरुची विद्या गुरुलाच. 

तरी बरं आमच्यावेळी असा काही नियम नव्हता, नाहीतर  आईवडिलांनी शाळेत घालायच्या ऐवजी दिलं असतं शेतात पाठवून, गुरं वळायला! हाय काय अन नाय काय. 



#माझी_म्युनिक_डायरी

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

वो स्त्री है

तर त्याचं झालं असं की आज लेकाबरोबर त्याचा ट्रेनचा वर्षभराचा पास काढायला गेले होते. चक्क तिथे जास्त गर्दी नव्हती, नाहीतर हे मोठ्ठी रांग असते. तरीही त्या ऑफिसमधे अकरा काउंटर्सच्या समोर लोक होते आणि आतमधे ३-४ लोक त्यांच्या नंबरची वाट बघत घुटमळत होते. आम्हाला वाटलं आपण दारात आहोत, आपल्याकडे टोकन आहे आपण आत जाऊ शकतो कारण आतमधे बसायला खुर्च्या असतात. पण दारातल्या दरबान ताईंनी आम्हाला अडवलं अन म्हणे “आत गर्दी आहे, मी सांगेलं तेव्हाच आत जायचं!“ 

गर्दी!!! अकरा आणि चार पंधरा लोक म्हणजे गर्दी? ह्या लोकांना कुंभमेळ्यातच घेऊन यावं वाटतंय मला. गर्दी काय असते ते कळलं असतं त्यांना आणि पुण्यही मिळालं असतं, त्यांना आणि मलाही! तर अशा प्रकारे त्या ऑफिसमधली २ माणसांची गर्दी बाहेर आली आणि मग आम्हाला ताईंनी आत सोडलं. 

आमचा टोकन नंबर डिस्प्ले झाला आणि त्या काउंटरवर साठीतल्या ताई! त्या म्हणाल्या ओळखपत्र दाखवा आणि माझं धाबं दणाणलं. म्हणलं लेकाचं तिकीट असलं तरी कागज तो मेरेभी दिखाने पडेंगे. कागज आणायची सपशेल विसरले होते मी! बरं आपण पडलो टॅक्सपेयर्स, जगात आपण कुठेच म्हणू शकत नाही “कागज नहीं दिखायेंगे!”

त्यांना म्हणलं “हे बघा कागज तो घरपे है लेकीन मेरे पास डिजिटल कापी है ना! देखो” मनात देवाचा धावा करत होते की ह्या ताई जर्मन नसाव्यात. कारण जर्मन लोकांचं कागदांवर भारी प्रेम. कागदी नोटा, सरकारी पत्रव्यवहार, घरमालकांचा भाडेकरूंशी सवांद इत्यादी इत्यादी सगळं कागदी पाहिजे. मग माझे पारपत्र कसे बरं चालेल डिजिटल? 

पण माझ्या आणि लेकाच्या सुदैवाने ताईंनी माझ्या पासपोर्टची डिजिटल कापी बघून मान्य केलं की ह्याचा कागदी तुकडा ह्या बाईकडे आहे आणि तिने लेकाच्या पासची प्रक्रिया पूर्ण केली आणि आमचा जीव भांड्यात पडला. 

आम्ही दोघे मेट्रोने घराजवळच्या स्टेशनला आलो आणि स्टेशनमधून  वर येऊन बसची वाट बघायला लागलो. इथे जवळच मॉल आहे आणि तिथेच किराणा दुकान पण आहे. मनात विचार आला की आता मॉलच्या इतक्या जवळ आलोय तर कमीत कमी दूध तरी घेऊन जाऊ. म्हणून लेकाला म्हणलं की चल जरा दूध घेऊ आणि तसेच चालत घरी जाऊ. तर त्याने वर्मावरच बोट ठेवलं, म्हणे की तू दूध घ्यायला म्हणून नेतेस आणि दोन तीन पिशव्या भरून सामान खरेदी करतेस. कंटाळा येतो मला! 

आमचा वादविवाद चालू असतांनाच बस आली. लेकरू माझी वाटही न बघता बसमधे जाऊन बसलं. त्याला वाटलं न जाणो आईने दूध आणायला नेलं तर! मग मी ही बसले त्याच्यासोबत बसमधे. म्हटलं ज्युनिअर पुराणिक नाही म्हणाले म्हणून काय झालं, सिनिअर पुराणिक कधीच नाही म्हणणार नाहीत माझ्याबरोबर यायला! 

बस निघणार तितक्यात एक पन्नाशीच्या ताई धापा टाकत आल्या आणि मोठमोठ्या कोकच्या दहा बाटल्या असलेलं पाकीट त्यांनी बसच्या दारात ठेवलं. बसचालकासकट सगळ्या प्रवाशांनी जरा त्रासिक कटाक्ष टाकले कारण ताईंनी ते पाकीट असं काही दारात ठेवलं की बसचे दार ते पाकीट हलवल्याशिवाय लागणारच नाही. ते पाकीट ठेवून ताई “आलेच हं" म्हणून कोणाला काही कळायच्या आत पटकन निघूनही गेल्या!

ताई पुन्हा धापा टाकत आल्या तर एका हातात पुन्हा दहा बारा पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचं पाकीट आणि एका हातात मोठी पिशवी घेऊन आत आल्या आणि बसचालकाला म्हणाल्या ”चला आता!” बसचालकाच्या चेहऱ्यावर भाव “हो तुमच्या घरचीच बस आहे, निघतो हां मॅडम!” 

स्थिरस्थावर झाल्यावर ताईंनी सगळ्यांना जे कारण सांगितलं ते ऐकून बसमधल्या माझ्यासहित सगळ्या बायकांनी मनोमन मान्य केलं की ताई तुमचं बरोबर आहे आणि पुरुषांनी हात टेकले! ताई म्हणाल्या “काही नाही इथे दुकानात फक्त ब्रेड घ्यायला आले होते हो, पण तिथे गेल्यावर इतक्या गोष्टी घ्यायच्या आहेत हे लक्षात आलं त्यामुळे हे एवढं सामान झालंय बघा!!”

चिरंजीवांनी माझ्याकडे मिश्किल कटाक्ष टाकला. तेवढ्यात आमचा स्टॉप आला, तर ताई पण इथेच उतरणार होत्या. लेक स्वतःहून त्यांना म्हणाला “ते पॅकेट्स द्या इकडे, मी मदत करतो तुम्हाला." माझी कॉलर ताठ! त्यांचं सामान घेऊन आम्ही खाली उतरलो तर त्या म्हणाल्या “धन्यवाद लेकरा, माझा मुलगा येतोय मी थांबते इथेच.” तर लेक म्हणतो कसा “अहो आम्ही इथेच राहतो मी घेतो पॅकेट्स. तुम्ही कोणत्या बोल्डिंगमध्ये राहता? मी येतो तुमच्यासोबत.” ताई खुश. 

लेक त्यांना सोडून आला आणि म्हणाला ”आई तुम्ही आईलोक म्हणजे ना! त्यांचा मुलगा आत्ता त्यांना म्हणत होता की आई तू फक्त ब्रेड आणायला गेली होतीस ना? हे काय आहे सगळं?” 

मी फक्त डोळे मिचकावले!! मी काय बोलणार नाही का? क्यूँ की मैं  भी तो एक स्त्री हूँ!!


#माझी_म्युनिक_डायरी 

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

धक्का

तसं पाहायला गेलं तर आयुष्यात अनपेक्षित घटनांमुळे जे धक्के बसले आहेत ते #मॅगी_काकूंमुळेच बसले आहेत. त्यांचा शेजार सोडल्यापासून फार निरस आयुष्य चाललंय. तर ते असो. पण आज जो धक्का बसलाय ना तो फारच जिव्हारी लागलाय. आता काय सांगू! जवळच्या भारतीय किराणा दुकानात सकाळच्या पारी जाऊन भक्तिगीते ऐकायच्या सवयीमुळे बसलाय हा धक्का!

आज जरा भाज्या आणि वाणसामान आणावं म्हणलं. बसमध्ये बसल्यावरच तिथे आज कोणती भक्तिगीतं ऐकायला मिळतील हा विचार मनात घोळत होता. त्याच आनंदात ३-४ स्टॉप कधी गेले ते कळलंच नाही. सरकत्या जिन्याने वर जातांनाच गाणी ऐकू येतात. पण आज काही आवाजच आला नाही. मला वाटलं दुकान बंदच आहे. पण दुकान उघडं होत आणि आत जाऊन पाहते तर काय, दुकानात मोठ्ठा टीव्ही लावलेला आणि त्यावर “कजरारे कजरारे तेरे काले काले नैना” गाणं चालू होतं!

अपेक्षाभंग, घोर अपेक्षाभंग! ये किस लाइनमें आ गये आप? असं वाटायला लागलं! भक्तिगीतांच्या जागी कजरारे बघायचं दुःख पचवून मी दुकानवाल्या दादाकडे बघितलं आणि माझ्या लक्षात आलं ”मालक बदललाय जणू!” बदललेला मालक बघूनही मी त्याला विचारलं “तुम्ही तर सकाळी भक्तिगीतं लावता, आज काय आहे हे?” बिचारा ओशाळून म्हणाला “दीदी आज दुकान जल्दी खोली तो सुबहही लगाये थे!” मी अच्छा म्हणून पटापट सामान घेऊन तिथून पळ काढला. पण तो दादा मला “आगाऊ" म्हणाला असेल हे नक्की. तरी बरं त्यांना हे माहित नाहीये की मी त्यांच्या जर्मन ग्राहकांना तुपाविषयी ज्ञान देते आणि त्यांच्या दुकानातून तूप खरेदी करू नका सांगते. हे कळलं तर धुलाई पक्की! 

मला काय करायच्या आहेत बरं नसत्या चौकश्या! पण अपेक्षाभंगाचं दुःख हो, दुसरं काय! लेक आणि नवरा म्हणतात तसं, माझ्या अशा प्रश्नांनी मी नाही तर ते दोघच कधीतरी मार खातील लोकांचा!! 

धक्क्यावरून आठवलं. सुखद म्हणतात तसा धक्का तीन आठवड्यांपूर्वी म्युनिकहून मुंबईला जातांना लुफ्तान्झाच्या विमानात बसला. विमान निघायच्या आधी मराठी लोकांसाठी शुद्ध मराठीमध्ये एक घोषणा झाली. त्या दादाने इतक्या सुस्पष्ट आणि शुद्ध मराठीत सूचना दिल्या की लगेच त्या आवाजाचा शोध घ्यायला लागले. मला वाटलं वैमानिक किंवा एखादा हवाईसुंदरच (हवाईसुंदरी म्हणतात तसं 😛) बोलतोय! पण त्यांच्यापैकी कोणीही मराठी नव्हतं; सगळे जर्मन. तरीही त्यांनी विमानातल्या नव्वद टक्के प्रवाश्यांसाठी मराठीत सूचनावजा घोषणा लावली हे काय कमी आहे! नाहीतर ते इंडिगोवाले. महाराष्ट्रात मुंबई ते छ. संभाजीनगरच्या विमानात इंग्रजी आणि हिंदीमधे सूचना देतात. त्यांना मराठीचं इतकं वावडं का आहे ते काही कळत नाही.  

बाकी काहीही असो, त्या मराठी घोषणेच्या अनपेक्षित सुखद धक्क्यामुळे तो प्रवास कायम लक्षात राहील. एकंदर काय तर धक्के सुखद असो वा दुःखद लक्षात राहतातच!  


#माझी_म्युनिक_डायरी

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

तुपाख्यान

आज पुन्हा सकाळच्या वेळी जवळच्या भारतीय किराणा दुकानात गेले होते. तिथे ह्यावेळीही भक्तीगीत चालू होतं. जर्मन मॉलमध्ये सकाळी सकाळी ”राम सिया राम सिया राम जय जय राम” ऐकून अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. 

सध्या लेकाला सुट्या असल्यामुळे मी त्याला नेलं नाही असं कसं होईल! तर ते लेकरू त्याच्या मनाविरुद्ध, कसंतरी जीवावर आल्यासारखं पाय ओढत माझ्यासोबत आलं. म्हणलं जरा आटे दालका भाव पता चलेगा बच्चेको, क्यूँ!

भारतीय किराणा दुकानात खरेदी आटपून मी पैसेच देत होते तेव्हाच एक जर्मन ताई दुकानात आल्या आणि त्यांनी दुकानदाराला घी कुठे आहे?” असं विचारलं. त्यांनी “घी" म्हणलं की माझे कान टवकारले. दुकानदाराने त्यांना सांगितलं कुठे ठेवलंय ते. तोवर माझे पैसे देऊन झाले होते. दुकानवाल्या दादाने नेहमीप्रमाणे चहा घेणार का? विचारलं! आता एवढ्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत मसाला चहाला “नाही" तरी कसं म्हणणार! मी चालेल म्हणणार तितक्यात “आईईई! आता कुठे चहा घेते. काहीही तुझं. ते चहा घ्या म्हणाले की लगेच हो म्हणतेस! मला वेळ नाहीये चल लवकर." असे तडफदार शब्द माझ्या कानावर पडले. मग काय, आलो दुकानाबाहेर. 

पण.. “घी" वाल्या ताईंशी बोलायचंच असं मी ठरवलं होतं. म्हणून लेकाला म्हणाले जरा थांब मला त्या ताईंशी तुपाविषयी बोलायचं आहे. हे ऐकून लेकाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. टिनेजर्सला वैताग आणणाऱ्या गोष्टी आईने केल्याच पाहिजेत; हो किनई! “मी तुझ्यासोबत नाहीये, मी चाललो. काहींच्या काही असतं तुझं. कशाला बोलायचंय अनोळखी बाईशी तुला? आणि तुपाचं काय?“ एवढं बोलून मुलगा पसार! लांबच्या लांब जाऊन थांबला. जिथे कोणालाही कळणार नाही की मी त्याची आई आहे, जी लोकांना तुपाविषयी फुकटचे सल्ले देते!

तेवढ्यात जर्मन ताई दुकानाबाहेर आल्या. मी नमस्कार वगैरे म्हणलं आणि लगेच विषयाला हात घातला. 

मी: तुम्ही नेहमी भारतीय दुकानातूनच तूप घेता का? आणि तुपाविषयी तुम्हाला कसं माहित?

ताई: आम्ही मागे केरळमध्ये योगसाधना करायला गेलो होतो तेव्हा तुपाची महती कळली तेव्हापासून रोजच्या आहारात वापरतो. 

मी: खूपच छान. पण एक सुचवू का? हे जे तूप तुम्ही घेता ना ते भारतातल्या माहितीतल्या ब्रँडचं नाहीये. 

ताई: हो का? मग कोणतं घेत जाऊ?

मी: तुम्ही घरी कराल का? अमुक ब्रॅन्डचं बटर फार छान आहे. ते आणा आणि त्याचं तूप कढवा. फार रवाळ आणि छान वासाचं तूप होतं. मी जर्मनीत आल्यापासून तसंच करते. 

ताई: हो घरी केलं आहे मी. पण तुम्ही नक्की कृती सांगाल का म्हणजे मला समजेल. 

मी: (जर्मनमध्ये शब्द आठवून आठवून तूप कढवण्याची कृती सांगणे म्हणजे लै अवघड काम बघा!) 

ताई: (आनंदून) तसं अवघड नाहीये. पण कंटाळा हो कंटाळा. घरी एवढे सगळे सोपस्कार करायचा कंटाळा! पुढच्या वेळी मी नक्की करून बघेन. 

मी: पण अमुक ब्रँडचंच बटर वापर बरं. दुसऱ्या ब्रॅण्डच्या बटरच्या तुपाला वास येतो. 

ताई: नक्की. धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

मीही शुभेच्छा दिल्या आणि लेकाला शोधायला निघाले. मॉलच्या बाहेर थेट बसस्टॉपवरच सापडला! जसं काही आजूबाजूचे लोक ह्यालाच म्हणाले असते की ”वो देखो इसकी तूपवाली माँ लोगोको ग्यान दे रही है!” 

तरी बरं मी त्या ताईला आपण भारतात तूप कसं तयार करतो ते नाही सांगितलं! नाहीतर लेक घरी पोहोचला असता आणि त्या ताईने बोलणं अर्धवट सोडून तिथून पळ काढला असता कदाचित!

पण रामदास स्वामींच्या ह्या उक्तीनुसार वागावं आपण “जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।” 🙏🏼🙏🏼


#माझी_म्युनिक_डायरी

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

गोडमट्टक

इथे थंडी पडायला लागली आणि क्रिसमस जवळ आला की ठिकठिकाणी भाजलेल्या सुकामेव्याच्या टपऱ्या लागायला लागतात. त्यातल्या त्यात भाजके बदाम जास्त असतात. 

आम्ही म्युनिकमध्ये आल्यानंतरच्या पहिल्या क्रिसमसच्या आधी फिरायला निघालो होतो. तेव्हा माझा उत्साह हाडं गोठवणाऱ्या थंडीतही वाखाणण्याजोगा होता (हे वाक्य लिहिल्यावर माझाच स्वतःवरच विश्वास बसत नाहीये)! 

तर, अश्या उत्साहात मी फिरत होते आणि माझ्या नजरेस ही बदामाची टपरी पडली. ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात मी टपरीजवळ गेले आणि अर्थातच आत असलेल्या जर्मन आज्जींनी माझ्याकडे थंड नजरेने पाहिलं. माझ्या उत्साहाची दाणादाण उडवत आज्जींनी प्रश्न विचारला की काय पाहिजे? मी आवाजात ओढूनताणून उत्साह  आणत समोर दिसणारे बदाम पाहिजे असं सांगितलं. 

आज्जींनी मस्तपैकी एका कागदी पुड्यात गरम गरम बदाम दिले. मला एकदम आपल्याकडे हातगाडीवर मिळणारे चणेफुटाणे आठवले. पटकन पैसे देऊन मी एक बदाम तोंडात टाकला आणि हाय रे कर्मा तो बदाम गोडमट्टक होता. मी भस्सकन त्या आज्जींना म्हणाले “अहो हे बदाम तर गोड आहेत”! जर्मन आज्जींनी मी परग्रहवासी असल्यासारखा माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्या त्यांच्या कामाला लागल्या. 

भाजलेले बदाम म्हणजे आपल्याकडे हातगाडीवर मिळणाऱ्या खाऱ्या शेंगदाण्यांसारखेच असणार, हेच डोक्यात ठेऊन बदाम घेतले! बरं पाट्या वाचणे किंवा पुड्यांवरचे नावं वाचणे वगैरे माझ्या  खिजगणणतीतही नव्हतं. पुण्यात राहत असतानाची सवय अन दुसरं काय! त्या टपरीवरच्या पाटीवर शुद्ध जर्मनीमध्ये लिहिलेलं होतं की शर्करावगुंठीत भाजलेले बदाम मिळतील म्हणून. इथल्या लोकांना खूपच आवडतात म्हणे. 

मग काय, पूर्ण क्रिसमस मार्केट फिरत मी एकटीच ते गोडमट्टक बदाम कसेबसे संपवायचा प्रयत्न करत होते. बदाम गोड आहेत म्हणल्याम्हणल्या ज्युनिअर आणि सिनिअर पुराणिकांनी त्यांच्याकडे आणि माझ्याकडेही सपशेल दुर्लक्ष केलं!

अगदी हीच गत पॉपकॉर्न खरेदीला झाली होती पहील्यांदा. पॉपकॉर्नच्या पुड्यावरचं ”गोड पॉपकॉर्न” असं वाचण्याची तसदीही न घेता मी पन्नास सेंटला मोठ्ठा पुडा मिळतोय ह्या आनंदात तो उचलला. घरी येऊन उत्साहात पुडा फोडून पॉपकॉर्न तोंडात टाकला आणि गोडमट्टक पॉपकॉर्न खाऊन वाचाच बसली माझी! पॉपकॉर्न गोड असूच शकत नाही, ह्या जन्मभर बाळगलेल्या गोड गैरसमजाचा गोड पॉपकॉर्नने घात केला. वर, मुलाने शाळा घेतली ती वेगळीच, “आई त्या पुड्यावर स्पष्ट लिहिलंय गोड पोपोकॉर्न म्हणून, तू न वाचताच घेऊन आलीस!“ 

एकदा तर लाल सिमला मिरची घातलेलं आईस्क्रीम बघितलं तेव्हापासून इथले खाण्याचे पदार्थ घेण्याची भीतीच बसलीये. न जाणो गोड वेफर्स बनवले ह्या लोकांनी तर!!


#माझी_म्युनिक_डायरी

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

चालढकल

तुम्हाला वाटत असतं की चला ह्यावर्षी शाळेची सुट्टी दिवाळीत आलीये तर मुलाकडून थोडे कामं करून घेऊ, चांगला तावडीत सापडलाय! पण जेव्हा तुम्ही तुमच्या टीनएजरला कोणतंही काम सांगता तेव्हा तो जास्तीत जास्त चालढकल कशी करता येईल ह्याचा नमुना पेश करतो आणि वर म्हणतो की आई बालमजुरी बेकायदेशीर आहे जर्मनीत! 🙄 

उदाहरणच द्यायचं झालं तर.. तसे बरेच उदाहरणं आहेत पण वानगीदाखल काही... 

(हजार वेळा आवाज देऊनही ऐकून न ऐकलं केल्यावर जेव्हा तुम्ही त्याला ओरडून ”अर्रे" म्हणता तेव्हा)

अर्रे त्या खिडक्यांच्या काचा पुसून घे - काचा चकाचक दिसतायेत एकदम! तरीही पुसायच्या असतील तर मी थोडा वेळ अभ्यास करून मग पुसतो! (वस्तू कितीही खराब झाल्या तरी ह्याला चकाचकच दिसतात.) 

अर्रे तेवढा कचरा टाकून ये - सारखा सारखा काय कचरा टाकावा लागतो? आताच टाकणं गरजेचं आहे का? मी नंतर टाकतो! (लिफ्टने फक्त खाली जावं लागतं कचरा टाकायला तरी...)

अर्रे आज व्हॅक्यूम करून घे बरं घर - आई तू कालच घर झाडलं आहेस ना, मग लगेच आज व्हॅक्यूम कशाला? उद्या करतो! (उद्या कधी उगवत नसतो असं माझे वडील म्हणायचे.)

अर्रे दूध घेऊन ये बरं आज - इतकं दूध कसं काय लागतं आपल्याला? (आता एक गायच विकत घेऊन टाकावी, कसं?)

अर्रे तेवढ्या संपलेल्या तेलाच्या बाटल्या समोरच्या बिनमध्ये टाकून ये - आई इतकं तेल वापरतेस तू? अजून २-४ बाटल्या साचल्या की टाकून येतो, सध्या राहू दे! (जसं काही मीच तेलाच्या बाटल्या रिचवते.)

अर्रे आज चहा टाक बरं - आई रोज चहा पिऊ नये आणि मला जरा प्रोजेक्ट करायचा आहे पुढच्या वेळी करतो हं चहा! (जसं काही मीच  एकटी चहाबाज आहे घरात.) 

अर्रे तेवढा डिशवॉशर लाव रे आज, मला काम आहे - अं, आई! माझा मित्राबरोबर कॉल असतांनाच तुला कामं सांगायची असतात ना! थोड्या वेळानी लावतो! (नशीब असं नाही म्हणाला, किती वेळा स्वैपाक करतेस आई?)

अर्रे वॉशिंगमशीन लाव आणि कपडे वाळत घाल आज - आईईई  प्लिजच आता, मी लायब्ररीत चाललोय अभ्यासाला, उद्या लावतो! 

पण त्याने कितीही नन्नाचा सूर लावला तरी मी सोडते थोडीच, कामं करूनच घेते. अच्छी आदतें मुझेही तो सिखानी है. मग उद्या त्याच्या बायकोने म्हणायला नको की आईने काहीच शिकवलं नाही म्हणून! 🙊 


#माझी_म्युनिक_डायरी 



सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

घासाघीस

आज भारतीय किराणा सामान आणायला म्हणून जरा लवकरच घरातून बाहेर पडले तर बसच अंमळ उशिरा आली! पण बसचालक काकांना बघून आश्चर्याचा धक्काच बसला; काका टरबन घातलेले, दाढी राखलेले शीख होते. त्यांना बघून आपसूकच नमस्ते म्हणाले. त्यांनीही हसून नमस्ते केलं. भारतीय दुकानात गेल्यावर तर आज भारतात गेलोय की काय असं वाटलं! काकांनी सोनू निगमच्या आवाजातला गायत्री मंत्र लावला होता. एकदम दैवी संकेत वगैरे!

मग मी म्हणलं आज भारतीयच बननेका. आज भाज्यांमध्ये घासाघीस करूच, कसं! “ये कोथिंबीर देड यूरोकी एक युरोमें लगाओ भैय्या, मैं हमेशा आपकेही दुकानमें भाज्या लेती हूं ना और हरी मिर्च भी पचास सेंट में दे दो, और जरा कडीपत्ता डालदो ऊसमें, आपका बोहनी का टाईम है!” दुकानवाल्या काकांनाही भारतात असल्यासारखं वाटायला पाहिजे किनई! 

मग त्यांनीही “बोहनीका टाइम बोला आपने इसलिये देता हुं” म्हणून दिलं कमी भावात(इमोशनल हो गये अंकल). पण इथे कोणी कडीपत्ता फुकट देईल तर शपथ! त्याला चांगले साडेचार युरो मोजावे लागतात. 

बिल देऊन निघावं म्हणलं तर काका म्हणाले “चाय लेके ही जाईये अब, मैं बना रहा हूँ”. मी लगेच “हाँ हाँ क्यूँ नहीं क्यूँ नहीं” पण मनात म्हणलं “अब क्या बच्ची की जान लोगे क्या अंकल?” भाज्यांचा भाव कमी केला, आता चहा देताय. खरोखर भारतात आल्यासारखं वाटलं! 


#माझी_म्युनिक_डायरी

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

डिस्को दांडिया

माणसाला (पक्षी: मला) कोणत्या गोष्टीवरून काय आठवेल हे काही सांगता येत नाही. 

तर त्याचं झालं असं की परवा ऑक्टोबर फेस्टला गेलो होतो. तिथली विद्युत रोषणाई पाहुन मला आमच्या छ. संभाजीनगरची नवरात्रातली कर्णपुऱ्याची यात्रा आठवली. लहानपणी तिथे गेल्यावर फार छान वाटायचं! सध्याचं यात्रेचं स्वरूप माहित नाही खरं, कित्येक वर्ष झाली यात्रेला जाऊन. 

कर्णपुऱ्याची जत्रा आठवली त्यावरून संभाजीनगरातले नवरात्र आणि दांडिया आठवले. दांडिया किंवा मराठीत ज्याला टिपऱ्या खेळणे म्हणतात; त्याविषयीची एक मनात खोल दडलेली भीती आठवली!

आम्ही संभाजीनगरात ज्या भागात राहायचो तिथून जवळच एक मंदिर होतं. परंतु ते मंदिर नाल्यापलीकडे असल्यामुळे आम्ही कधी तिथे गेलो नव्हतो. तसे तिथे भजनादी कार्यक्रम चालायचे, त्याचे आवाज अधूनमधून आम्हाला यायचे. पण अचानक एका नवरात्रात तिथल्या लोकांना लाऊडस्पिकर आणि माईकचा शोध लागला आणि तिथूनच आमचं आयुष्य बदललं!

त्या नवरात्रीत तिथे संध्याकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत, फक्त आणि फक्त  “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया" नामक गाणं चालू असायचं. कधीकधी तर वामकुक्षीची वेळ झाली रे झाली की गाणं रिपीट मोडवर सुरु व्हायचं ते संध्याकाळी आरतीपुरतं बंद व्हायचं. त्यांनतर पुन्हा सुरु!

आम्ही १-२ दिवस वाट पाहिली की कधीतरी गाण्यात बदल होईल. “परी हूँ मैं ” किंवा “याद पियाकी आने लगी” वगैरे लागतील. पण छे! पूर्ण नऊ दिवस अहोरात्र फक्त “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया". आमच्या इमारतीतला आबालवृद्धांना कदाचित हे गाणं तोंडपाठ झालं असावं तेव्हा! मला आजही आहे🙄. 

ते वर्ष संपलं. पण हाय रे कर्मा! त्याच्या पूढच्या वर्षीही आमच्यावर त्याच गाण्याचा अत्याचार नवरात्रात चालू होता! अरे ये हो क्या रहा है? असा प्रश्न आम्हा मुलींनाच पडत होता. बाकी इमारतीतील ईतर जनता हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन करत होते ह्याचं उत्तर मला लग्न झाल्यावर मिळालं. काही नाही, उत्तर असं आहे की तिथे आमच्या इमारतीत काम करणाऱ्या मावशी तिकडे राहायच्या आणि त्यांच्या मुली तिथे दांडिया खेळायच्या! कामवाल्या मावशींना कोण दुखावणार! नाही का?

पण आम्हा मुलींना काही चैन पडेना. शेवटी न राहवून आम्ही आमच्या कामवाल्या मावशींच्या मुलीला विचारलंच की बाई तुम्ही सदानकदा हे एकच गाणं का लावता? गाणं बदला ना! तिने जे उत्तर दिलं ते ऐकून आम्ही गडाबडा लोळून हसलो होतो. अर्थात, तिच्यासमोर नाही! ती म्हणाली की “त्यांना सगळ्यांना फक्त ह्या एकाच गाण्यावर दांडिया खेळता येतो! म्हणून ते सगळे दुपारी प्रॅक्टिस दांडियाही ह्याच गाण्यावर खेळतात आणि रात्री मुख्य दांडियाच्या कार्यक्रमालाही ह्याच गाण्यावर दांडिया खेळतात!”

बरं एवढं बोलून ती थांबली नाही तर तिने त्या रात्री दांडीया खेळायचं आमंत्रणही दिलं आम्हाला आणि एवढंच नाही तर रात्री आम्हाला खेचत घेऊनही गेली आणि आम्ही तिथे “ झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया” वर दांडिया खेळतोय 🙄

त्यानंतर नक्कीच अजून १-२ वर्ष फक्त आणि फक्त “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया” एवढं एकच गाणं त्यांच्याकडे नवरात्रात वाजत असायचं! मी तर इतका धसका घेतलाय ह्या गाण्याचा की बास! कोणी नुसतं डिस्को दांडिया म्हणायचं अवकाश की मला एक सणसणीत... असो. 

अरे कुठे नेऊन ठेवलीये फाल्गुनी पाठक आमची!

रविवार, २३ जून, २०२४

अतरंगी

मध्यंतरी विचार करत होते की उगीच कशाला वेगवेगळ्या फेबू गृपात  राहायचं. कल्टी मारुयात. पण मग लक्षात आलं की हे गृप्स म्हणजे अक्षी “मनोरंजन में कमी नहीं होनी चाहिये” असतात. कशाला सोडायचे, नाही का! 

आता हेच बघा ना, आमच्या म्युनिकच्या भारतीय गृपात ही पोस्ट आलीये. जर्मन गायीचं दुध वापरून आणि त्याच दुधाच्या दह्याचं विरजण वापरून केलेलं दही ”इंडियन कर्ड” नावाखाली २ युरोला चक्क दोन चमचे ह्याप्रमाणात विकायला काढलंय! म्हणजे आता ह्यांच्याकडे म्युनिकमधले भारतीय लोक डबे घेऊन, रांग लावून दही घेणार. आता दोन चमचे दही आणायचं म्हणजे घरून डबा न्यावाच लागेल नई का. अरे नक्की “कौन है ये लोग?” काय आत्मविश्वास आहे राव! ते नाही का काही लोक अपेयपान केल्यावर येणाऱ्या तंद्रीत म्हणतात “गाडी आज भाई चालयेगा" तसंच आहे हे! 

ईथल्या दुकानांमध्ये इतकं दूधदुभतं आहे की विचारायची सोय नाही. पन्नास प्रकारचे दुधं, शंभर प्रकारचे दही, चक्का, चीजच्या प्रकारांची लयलूट, आणि अजून बरंच काही! बरं हे सगळं आपल्या खर्चाच्या आवाक्यात आहे. जिथं २ युरोला नक्की लिटरभराच्या वर दही जवळच्या दुकानात मिळतंय तिथं २ युरोला दोन चमचे दही विकताय तुम्ही. अरे थोडी तर लाज वाटू द्या कि लेको! 

म्युनिकमधल्या अश्या लोकांच्या धंद्याच्या कल्पना वाचून होणारं मनोरंजन काही औरच आहे! त्याला तोड नाही. मागे कोणीतरी पॅरासिटॅमॉलच्या गोळ्या ह्या गृपात विकायला काढल्या होत्या. आता ह्या डोक्यावर पडलेल्यांच्या हे लक्षात येत नाही की कोणी ह्यांना रिपोर्ट केलं तर ४ युरो कमवायच्या नादात ह्यांना किती मोठ्या युरोजचा बांबू लागेल! तरी बरं जर्मनीतल्या कडक नियमांमुळे बांबू लागल्याच्या कहाण्याही ह्याच गृपात येतात तेव्हा हे लोक कुठे दही विकायला गेलेले असतात त्यांनाच माहित. 

कोणी विनापरवाना केटरिंग व्यवसाय करतंय तर कोणी जुने फर्निचर अव्वाच्या सव्वा भावात विकतंय. चारपाच वर्षांपूर्वी एका धन्य ताईने प्लॅस्टिकची वापरलेली चहागाळणी ५ युरोला विकायला ठेवली होती. लो करलो बात!!

अश्याच अतरंगी व्यावसायिक कल्पनांसाठी वाचत रहा #माझी_म्युनिक_डायरी






गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

हवामान वगैरे

दोन आठवड्यांपूर्वी इथे वसंत ऋतू होता. छान उबदार ऊन होतं, अधूनमधून एखादी पावसाची सर येत होती. एखादं हलकं जॅकेट घालून बाहेर फेरफटका मारता येत होता. 

मागच्या आठवड्यात अचानक ऊन तापायला लागलं. उन्हाळा सुरु झालाय का काय? असं वाटायला लागलं. लोक चक्क चड्डी बनियनवर फिरायला लागले. आईस्क्रीमची दुकानं, नदीकाठ, वेगवेगळी उद्यानं गर्दीने ओसंडून वाहायला लागले. 

आणि या आठवड्यात तापमान शून्यापर्यंत गेलं आहे. आज चक्क बर्फ पडतोय. थंडीनी जीव चाललाय. वगैरे वगैरे. ते काहीतरी मीम आहे ना “ वक्त बदल गया, जज्बात बदल गए, हालात बदल गए!” तसं झालंय. 

अरे हवामान आहे की राजकारणी लोक? दर आठवड्यात पक्ष बदलत आहेत! जर्मनीत एक म्हण आहे म्हणे, “There is no such thing as bad weather, only bad clothing." अर्थात मला मॅगी काकूंनीच सांगितलं होतं ह्या म्हणीबद्दल. स्वतःच्या देशातल्या अश्या हवामानाचं किती ते कौतुक! 

जर्मन लोकांना भलत्याच गोष्टीचं कौतुक आहे म्हणा! असो. 


#कसं_जगायचं_कुणी_सांगेल_का_मला 


#माझी_म्युनिक_डायरी






वाचकांना आवडलेले काही