गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

डिस्को दांडिया

माणसाला (पक्षी: मला) कोणत्या गोष्टीवरून काय आठवेल हे काही सांगता येत नाही. 

तर त्याचं झालं असं की परवा ऑक्टोबर फेस्टला गेलो होतो. तिथली विद्युत रोषणाई पाहुन मला आमच्या छ. संभाजीनगरची नवरात्रातली कर्णपुऱ्याची यात्रा आठवली. लहानपणी तिथे गेल्यावर फार छान वाटायचं! सध्याचं यात्रेचं स्वरूप माहित नाही खरं, कित्येक वर्ष झाली यात्रेला जाऊन. 

कर्णपुऱ्याची जत्रा आठवली त्यावरून संभाजीनगरातले नवरात्र आणि दांडिया आठवले. दांडिया किंवा मराठीत ज्याला टिपऱ्या खेळणे म्हणतात; त्याविषयीची एक मनात खोल दडलेली भीती आठवली!

आम्ही संभाजीनगरात ज्या भागात राहायचो तिथून जवळच एक मंदिर होतं. परंतु ते मंदिर नाल्यापलीकडे असल्यामुळे आम्ही कधी तिथे गेलो नव्हतो. तसे तिथे भजनादी कार्यक्रम चालायचे, त्याचे आवाज अधूनमधून आम्हाला यायचे. पण अचानक एका नवरात्रात तिथल्या लोकांना लाऊडस्पिकर आणि माईकचा शोध लागला आणि तिथूनच आमचं आयुष्य बदललं!

त्या नवरात्रीत तिथे संध्याकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत, फक्त आणि फक्त  “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया" नामक गाणं चालू असायचं. कधीकधी तर वामकुक्षीची वेळ झाली रे झाली की गाणं रिपीट मोडवर सुरु व्हायचं ते संध्याकाळी आरतीपुरतं बंद व्हायचं. त्यांनतर पुन्हा सुरु!

आम्ही १-२ दिवस वाट पाहिली की कधीतरी गाण्यात बदल होईल. “परी हूँ मैं ” किंवा “याद पियाकी आने लगी” वगैरे लागतील. पण छे! पूर्ण नऊ दिवस अहोरात्र फक्त “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया". आमच्या इमारतीतला आबालवृद्धांना कदाचित हे गाणं तोंडपाठ झालं असावं तेव्हा! मला आजही आहे🙄. 

ते वर्ष संपलं. पण हाय रे कर्मा! त्याच्या पूढच्या वर्षीही आमच्यावर त्याच गाण्याचा अत्याचार नवरात्रात चालू होता! अरे ये हो क्या रहा है? असा प्रश्न आम्हा मुलींनाच पडत होता. बाकी इमारतीतील ईतर जनता हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन करत होते ह्याचं उत्तर मला लग्न झाल्यावर मिळालं. काही नाही, उत्तर असं आहे की तिथे आमच्या इमारतीत काम करणाऱ्या मावशी तिकडे राहायच्या आणि त्यांच्या मुली तिथे दांडिया खेळायच्या! कामवाल्या मावशींना कोण दुखावणार! नाही का?

पण आम्हा मुलींना काही चैन पडेना. शेवटी न राहवून आम्ही आमच्या कामवाल्या मावशींच्या मुलीला विचारलंच की बाई तुम्ही सदानकदा हे एकच गाणं का लावता? गाणं बदला ना! तिने जे उत्तर दिलं ते ऐकून आम्ही गडाबडा लोळून हसलो होतो. अर्थात, तिच्यासमोर नाही! ती म्हणाली की “त्यांना सगळ्यांना फक्त ह्या एकाच गाण्यावर दांडिया खेळता येतो! म्हणून ते सगळे दुपारी प्रॅक्टिस दांडियाही ह्याच गाण्यावर खेळतात आणि रात्री मुख्य दांडियाच्या कार्यक्रमालाही ह्याच गाण्यावर दांडिया खेळतात!”

बरं एवढं बोलून ती थांबली नाही तर तिने त्या रात्री दांडीया खेळायचं आमंत्रणही दिलं आम्हाला आणि एवढंच नाही तर रात्री आम्हाला खेचत घेऊनही गेली आणि आम्ही तिथे “ झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया” वर दांडिया खेळतोय 🙄

त्यानंतर नक्कीच अजून १-२ वर्ष फक्त आणि फक्त “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया” एवढं एकच गाणं त्यांच्याकडे नवरात्रात वाजत असायचं! मी तर इतका धसका घेतलाय ह्या गाण्याचा की बास! कोणी नुसतं डिस्को दांडिया म्हणायचं अवकाश की मला एक सणसणीत... असो. 

अरे कुठे नेऊन ठेवलीये फाल्गुनी पाठक आमची!

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Khup mast!!!!

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही