मला जर्मनीमध्ये येऊन साधारण पाच वर्ष झाले आहेत. मागील पाच वर्षात एकही दिवस असा नाही गेला की आम्ही घराबाहेर पडलो नाही. इथे कोणत्याही प्रकारची घरगुती मदत म्हणजेच आपल्याकडे असतात तसे दुधवाला, पेपरवाला, घरातील मदतनीस बायका आणि तत्सम मदत मिळत नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतः करावी लागते. जसं कि दूध आणि जीवनावश्यक वस्तु आणणे, भांडे घासणे, घराची स्वच्छता करणे इत्यादी. घरं लहान असल्यामुळे घरात असलेल्या गोष्टी पण त्याहिशोबाने लहानच असतात. माझ्या घरातला फ्रिज म्हणजे असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे फळे, भाज्या आणि दूध ह्या गोष्टींची साठवण जास्त दिवस करता येत नाही. इतके दिवस फ्रिज फारच लहान आहे ह्याची जाणीव कधी झालीच नाही. जस लागेल तसं सामान आणत होतो. आज जेव्हा दुध आणुन ठेवावं असा विचार केला तेव्हा जाणवलं की फ्रिजमध्ये जागाच नाहीये दूध साठवुन ठेवायला. आता पुरवून पुरवून वापरावं लागणार.
कारण, इथे आजपासून अत्यावश्यक सेवा सोडल्यास सगळं बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. शाळांना ५ आठवड्यासाठी सुट्टया जाहीर केल्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या एकतर बंद आहेत नाहीतर ज्यांना शक्य असेल त्यांनी घरूनच काम करायचे आहे. त्यामुळे सगळ्याच लोकांना अचानक जाग आल्यासारखे सगळे सुपरमार्केट्सवर तुटून पडले आहेत. आम्हाला कसेबसे १ किलो बटाटे, १ किलो कांदे आणि थोडे टमाटे मिळाले. बाकीच्या भाज्या तर गायबच होत्या. फळ सुद्धा मिळाली नाहीत. हॅन्ड सॅनिटायझर तर महिना दीड महिना झाला मिळतच नाहीये. तरी बरं भारतीय किराणा आधीच भरला होता नाहीतर अवघड झालं असतं.
ह्या सगळ्याची सुरुवात जर्मनीमध्ये म्यूनिचजवळच्या स्ट्रानबर्ग नावाच्या छोट्या शहरात जानेवारीमध्ये झाली. तिथल्या एका छोट्या कंपनीत एक चीनमधील स्त्री काही कामासाठी आली होती आणि तिच्यामुळे त्या कंपनीतील बऱ्याच कर्मचाऱ्यांना ह्या #कोरोना विषाणूची लागण झाली होती. तेव्हा इथल्या शासकीय यंत्रणेने तत्परतेने पावलं उचलत हा संसर्गजन्य आजार अजिबात पसरू दिला नव्हता. पण, फेब्रुवारीमध्ये इथे कार्निव्हलनिमित्त एक आठवडा सुट्या होत्या. त्यादरम्यान बरेच लोक प्रवासाला गेले आणि तिथून हा विषाणु पुन्हा जर्मनीमध्ये पसरायला सुरुवात झाली. त्यात युरोपमध्ये इटलीत ह्या विषाणूने घातलेले थैमान बघता जर्मन सरकार कडक पावलं उचलत आहेत. तरीही आजघडीला #कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या सात हजाराच्यावर आहे. ह्यातुन सुखरूप पार पडलेल्या लोकांचा आकडा सध्या तरी जर्मनीमध्ये कमी असला तरी तो लवकरच वाढेल. कारण "social distancing" चा फण्डा सध्यातरी थोड्याफार प्रमाणात का होईना उपयोगी पडतोय.
जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा ज्या देशात आहेत त्या देशानेही या #कोरोना विषाणूचा धसका घेतलाय. मोठमोठ्या महासत्ताना जेरीस आणलंय ह्याने. तिथे आपण तर काय सामान्य माणसं. आज जेव्हा बाहेर पडले तेव्हा रस्त्यांवर दिसणारी तुरळक वाहनं आणि एखाद दुसरा माणुस पाहुन अक्षरशः भीती वाटली. चीन किंवा इटलीचे लोक स्वतःचे लॉकडाऊनचे जे अनुभव सांगत आहेत त्यातली दाहकता जाणवतीये. दहशत काय असते ते कळतंय. नवऱ्याला घराबाहेर पाठवायला जीवावर येतंय. मुलाला तर तंबीच दिलीये कि घराबाहेर पडायचं नाही दोन आठवडे.
हि अशी सगळी परिस्थिती इथे असताना, आपण आपल्या देशात सध्या पायच ठेवू शकत नाही हे ऐकुन तर एकूण भयानक परिस्थितीचा अंदाज आला.
आपला देश ह्या सगळ्या दहशतीच्या परिस्थितीमधे फार सुरुवातीच्या पायरीवर आहे त्यामुळे आपलं सरकार करत असलेल्या उपाययोजनाना लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर आपल्याकडे परिस्थिती नक्कीच आटोक्यात राहील असं वाटतं आहे. ती राहोच आटोक्यात!
ज्या लोकांना घरून काम करणं शक्यच नाहीये त्यांचा विचार केला तर आपण सुखी आहोत असं वाटतं. त्या सगळ्यांना देव लढण्याचं बळ देवो आणि आपल्यासारख्या लोकांना ह्या दहशतीतुन सावरण्याचं आणि तरून जाण्याचं बळ देवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
#माझी_जर्मनी_डायरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा