सध्या कमीतकमी खाली इमारतीच्या आवारात तरी जात येतंय आणि तेच खूप ऊर्जा देऊन जातंय. आमच्या ईथे दोन इमारतींमध्ये छान छोटी पायवाट, छोटी मोठी झाडं, लहान मुलांसाठी खेळायला छोटुशीच घसरगुंडी, असं बरचकाही छोट्याशाच जागेत आहे. त्यामुळे खाली थोडा वेळ फेरफटका मारला तरी मस्त वाटतं कधीकधी. आता दिवस मोठा झाल्यामुळे बराच वेळ सूर्यप्रकाश असतो आणि थंडीही बरीच कमी झालीये. त्यात झाडंही नवीन पानाफुलांनी बहरत आहेत. त्यामुळे एकदम छान वाटतंय.
संध्याकाळी खाली आलं की पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीत बसलेले आजी आजोबा दिसतात, त्यांना काय कसे आहात?विचारणं होतं. सगळ्यात खालच्या घरातलं कपल त्यांच्या अंगणातच टेबल खुर्ची टाकून ऊन खात बसलेलं असतं, त्यांनाही हायहॅलो करणं होतं . मॅगी काकू नेहमीप्रमाणे त्यांच्या सायकलवरून गडबडीत कुठेतरी जात असतात किंवा कुठूनतरी येत असतात, त्यांचीही विचारपूस करता येते. एक तास मस्त जातोय.
कधीकाळी आपण मेट्रो, बस, ट्रामने इकडेतिकडे फिरत होतो या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. “हे घरची माझे विश्व” झालंय! थोड्याफार प्रमाणात आपल्या सगळ्यांचं असंच काहीसं आयुष्य चालू आहे सध्या. हो ना? पण सध्या निराश होऊन चालणारच नाहीये त्यामुळे अशाच छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधुया, स्वतःला सतत ऑल इज वेल हेच सांगुया आणि घरातच सुरक्षित राहुया!
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा