गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

बाल की खाल

परवा युट्युबवर केसांच्या समस्यांवर करायच्या उपायांचे व्हिडीओ बघत होते. युट्युबचा फण्डा तर तुम्हालाच माहितीच आहे, आपण एखाद्या विषयावरचा एक जरी व्हिडीओ पहिला तरी पुढच्या क्षणाला त्याच विषयाच्या व्हिडीओजचा भडीमार होतो आपल्यावर. 

 मी आपला पहिला व्हिडीओ खोबऱ्याच्या तेलाचा पहिला आणि नंतर मला , तीळ म्हणू नका, बदाम म्हणू नका, ऑलिव्ह म्हणू नका, एरंडेल म्हणू नका... 

तेल हो.. तेल आणि त्यांचे व्हिडीओज. असे विविध तेलांचे उपाय रेशमी केसांसाठी सुचवले गेले. 

त्यानंतर .. तेलात काय काय घालू शकता त्यासाठी.. 

आवळा म्हणू नका, माका म्हणू नका, जास्वन्द म्हणू नका, ब्राह्मी म्हणू नका, वडाच्या पारंब्या म्हणू नका, मेथी दाणे म्हणू नका.. 

अश्या पावडरी तेलात घाला म्हणे हो! केस इतके वाढतील की विंचरुन विंचरुन कंटाळा येईल म्हणे!

त्यानंतर अंडं म्हणू नका, दही म्हणू नका, अमकं, ढमकं, तमकं लावा म्हणे हो केसांना! केसांना पोषण मिळेल म्हणे. 

मग ह्यानेही काही फरक पडला नाही तर अजून व्हिडीओ की डोक्याला ... कांदा म्हणु नका, लसूण म्हणु नका, आलं म्हणजे अद्रक(नाहीतर म्हणाल कोण आलं?), कोथिंबीर ह्यांचे रस हो...  रस लावा म्हणे डोक्याला!! कोणी म्हणे ह्यांचे तेलं करून लावा लांबलचक, घनदाट केसांसाठी!

अमका लेप,  ढमका लेप... 

एवढं सगळं पाहिल्यावर मी आता फक्त एकाच व्हिडिओची वाट पाहतेय.... 




कोणीतरी तरी सांगेल की डोक्याला चांगली चर्रर्रर्रर्रर्रर्र करुन बसणारी हिंगाची फोडणी द्या म्हणून! 


सगळ्याच समस्यांमधून मुक्तता मिळेल मग... केसांच्या हो! कसं?


#अरे_कुठे_नेऊन_ठेवलाय_विग_माझा?




सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

मुडदा बशीवला त्या कोरोनाचा

मार्चमधे लॉकडाउन सुरु झाल्यापासुन एकमेकांना बारा महीने अठरा काळ झेलणारे दोन कावलेले जीव, सणावारासाठी वाणसामान आणायला म्हणुन भारतीय दुकानात जायला निघतात. घरातून निघून, मेट्रो स्टेशनपर्यंत, पुन्हा स्टेशनवर ट्रेन येईपर्यंत हे दोन मास्कधारी एकमेकांचे थोबा.. म्हणजे मास्क सुद्धा बघत नाहीत. 

पण ट्रेनमध्ये व्यवस्थित जागा मिळाल्यावर, स्थानापन्न होऊन, तो तिच्याकडे बघत म्हणतो 

“बोल!”

आता हे म्हणजे घरचं झालं थोडं अन व्याह्याने धाडलं घोडं. घरी काय कमी शालजोडीतले संभाषण होते म्हणुन मेट्रोमध्ये पण तेच. पण ती फक्त त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि मास्कमधल्या मास्कमध्ये (तोंडातल्या तोंडात प्रमाणे) काहीतरी पुटपुटते. तिच्या मनात येतं की तिने इतक्या दिवसांत हजार वेळा बोललेला घिसापीटा डायलॉग पुन्हा त्याच्या मास्कधारी चेहऱ्यावर फेकून मारावा 

“तू जा ना यार ऑफिसला!”

पण तिला माहित असतं की ह्या मेल्या कोरोनामुळे ना ऑफिसवाले बोलावणार, ना आपण ह्याला जाऊ देणार. 

तो पुन्हा तिला म्हणतो 

“अगं बोल ना! आत्ता काहीतरी पुटपुलीस.”

शेवटी न रहावुन ती त्याला सांगूनच टाकते 

“मुडदा बशीवला त्या कोरोनाचा! नुसता जीव खाल्लाय, शांतात म्हणुन नाहीये. सतत आपलं सकाळ, दुपार, संध्याकाळ बोल बोल. घरात नुसती किटकिट तुझ्या मिटिंग्जची. एक झाली दुसरी अन मग तिसरी! अरे काय ताप आहे नुसता. किती जोरात बोलता, टीव्ही बंद करा, फोनवर बोलू नका, आत्ताच कुकर का लावलंय माझी मिटिंग आहे ना, तुम्ही दोघे किती जोरजोरात बोलता? असं म्हणून म्हणून कंटाळा आणलाय. घराचं ऑफिस केलंय नुसतं. काही स्वातंत्र्य आहे की नाही? त्यात पोराची शाळा घरूनच. त्याची भूक भूक वेगळीच. कुठे कुठे डोकं लावायचं मी? बरं घरी आहेत म्हणून चार वेगळे पदार्थ केले तर म्हणे मिरे छान लागत होते आज भाजीत..

मिरे नाआआआही धणे 

धअअअणे होते ते...

तरी मी सांगत असते..”

असं सगळं रामायण महाभारत अवसान गाळून ऐकणारा तो हळूच म्हणतो 

“अगं ए आपण ट्रेनमध्ये आहोत!”

ती मास्क घट्ट करून (पदर खोचून प्रमाणे)

“तूच म्हणालास बोल म्हणून!”


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

मी, भाकरी आणि मॅगी काकू!

हि घटनाही बीसीच आहे.. बोले तो बिफोर कोरोना.. 

तर झालं असं कि नुकतंच भारतीय किराणा सामान घेऊन आले होते आणि यावेळी मला चक्क ज्वारीचं पीठ मिळालं होतं त्यामुळे मी "आनंद पोटात माझ्या माईना" म्हणत म्हणत भाकरी करायचा निर्णय घेतला. खरंतर इथे फार जुनं पीठ मिळतं त्यामुळे शक्यतोवर मी थालीपीठच करते कारण नेहमीच "भाकरी करता येईना, पीठ खराब!" असं म्हणायची वेळ येते. पण यावेळी मी ठरवलंच कि ते काही नाही, काहीही करून भाकरीच करायच्या. 

तुम्ही जर महाराष्ट्राचे त्यातल्या त्यात मराठवाड्याचे असाल आणि लहानपणीपासून आज्जी आणि आईच्या हातच्या आणि लग्नानंतर सासूबाईंच्या हातच्या अप्रतिम भाकरी खाल्लेल्या असतील तर तुम्ही जगाच्या पाठीवर अंटार्टिकावर का असेना, ज्वारीच्या भाकरी करणे आणि खाणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क असतो! पीठ जुने आहे वाटले म्हणून जुन्या पिठाच्या भाकरी कश्या करायच्या ह्यासाठी त्या दिवशी दोन चार युट्युबवरचे व्हिडीओज पाहून आणि मीनाक्षी श्रीखंडे काकूंची गोल गरगरीत भाकरीची पोस्ट वाचून मीही भाकरी करायला घेतल्या. 

पण पीठ जुनंच असल्यामुळे भाकरी करता करता मी कधी त्या थापायला आणि त्यानंतर बडवायला लागले ते कळलेच नाही. भाकरी करणे, थापणे आणि बडवणे ह्या तीन अवस्था म्हणजे पीठ ताजे असेल तर तुम्ही भाकरी करता, पीठ २-३ महिन्यापूर्वीच असेल तर तुम्ही भाकरी थापता आणि पीठ वर्षानुवर्षे जून असेल तर तुम्ही भाकरी बडवता. एक भाकरी २-३ वेळा बडवून कशीबशी होत होती! 

मला भाकरी करता येतात बरं पण पीठ जुने असेल तर करायला अवघड जातात इतकंच. नाहीतर तुम्हाला वाटायचं ह्या बाईला येतंच नाहीत कि काय! 

त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे "हे" ऑफिसला आणि "चिरंजीव" शाळेत गेले होते त्यामुळे भाकरी भाजताना स्मोक डिटेक्टर कोकललं तरी मला रागावणारं कोणीही नव्हतं. तरीही स्मोक डिटेक्टर कोकलू नये म्हणून मी दारं खिडक्या उघड्या ठेवल्या. म्हणलं भाकरी बडवतांना पुन्हा ते कोकललं तर ताप नको! पण डोक्याला शॉट होतातच कारण मी मॅगी काकूंचा विचारच केला नाही! सगळ्या भाकरी करून मी हातच धूत होते तोवर बेल वाजली. हात पुसून दारात आले तर दारात कोणीच नाही आणि एकदम मॅगी काकू त्यांच्या घरातून अवतरल्या! 

आधीच भाकरींनी जीव खाल्ला होता आणि आता मॅगी काकूंना बघून "ये मैने क्या कर दिया भगवान!" वाटलं. त्यांना बघून माझ्या मनात हळूहळू भीती दाटून आली. कधी कधी मला दाट शंका येते कि मॅगी काकू वाट पाहूनच असतात; "कधी हिच्या घरातून मला न समजणारा आवाज येतोय आणि कधी जाऊन मी हिची शाळा घेते!" 

काकू: आत्ता मला पुन्हा तुझ्या घरातून काहीतरी आपटण्याचे आवाज आले. 

(अहो मी भाकरी बडवत होते. ज्यांना आपटते ते दोघे नाहीयेत घरात.)

मी: अहो मी एक प्रकारचा भारतीय फ्लॅटब्रेड बनवत होते. 

काकू: कोणता?

आता पुन्हा आली का पंचाईत! मागे "कुंकू" म्हणजे काय ते कसंबस समजावलं, आता भाकरी म्हणजे काय ते समजावून सांगावं लागेल! मला ज्वारीला इंग्रजीतच काय म्हणतात ते आठवेना तिथे जर्मनमध्ये कधी आठवावं? बरं जर्मनमध्ये ज्वारी हा शब्दच असेल कि नाही इथपासून सुरुवात आहे. तरीही मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला कि हे एक प्रकारचं मिल्लेट आहे ज्याचे आम्ही फ्लॅटब्रेड बनवतो. इत्यादी इत्यादी. 

काकू: पण तूझ्या घरातून इतक्या जोरात आवाज का येत होता? 

पुन्हा "बडवणे"ला इंग्रजी आणि जर्मन दोन्ही शब्द आठवेनात! बरं "थापणे"लाही आठवेनात. आता ह्यांना भाकरी अश्याच बडवाव्या किंवा थापाव्या लागतात हे कसं सांगू? 

मी: असा ब्रेड बनवताना पिठाच्या गोळ्याला एका प्लेटमध्ये घेऊन चांगलं हातानेच फ्लॅट करावं लागतं जोरजोरात म्हणून असा आवाज येतो हो! (जमलं एकदाचं काहीतरी सांगायला!) त्यांना म्हंटलं घरात या, मी तुम्हाला तो फ्लॅट ब्रेड दाखवते तर म्हणे जळका वास येतोय; मी नाही येत तुझ्या घरात! हे म्हणजे "घेणं ना देणं अन फुकटचं कंदील लावणं!"

पुन्हा काकू: पण जळका वास का येतोय? तू फ्लॅट ब्रेड सरळ इलेक्ट्रिक स्टोव्हवर भाजले कि काय? (त्यांना मी फारच अडाणी आहे असं सारखं सारखं सुचवायचंच असतं!)

आता पुन्हा पंचाईत! हो म्हंटलं तरी प्रॉब्लेम नाही म्हंटलं तरीही! मी भाकरी सरळ इलेक्ट्रिक स्टोव्हवर भाजतच होते त्यामुळेच जरा धूर झाला आणि जळका वास आला. दारं खिडक्या उघड्या असल्यामुळे तो वासहि मॅगी काकूंना माझ्याघरी घेऊन आला होता. स्वतःला सावरत मी म्हणाले  "नाही हो, चुकून थोडं पीठ इलेक्ट्रिक स्टोव्हवर पडलं ना त्यामुळे वास येतोय!" 

एकदाचं त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह थोडं कमी झालं आणि त्या मला म्हणाल्याच, "फार डिस्टर्ब होतं ग मला अश्या आवाजांनी. बरं कम्प्लेंट तरी किती वेळा करणार ना!"  

बाबो! पुन्हा कम्प्लेंट! "काय उठसूट कम्प्लेंटची धमकी देता हो? काय लावलंय काय? आम्ही म्हणजे तुम्हांला हे वाटलो का? काय रस्त्यावर पडलोय का? आता काय स्वयंपाक करणं सोडू कि काय? तुम्ही देणार का रोज डबा हं? वा! आयडिया चांगली आहे खरं! रोज डबा!"

नाही, ह्यातलं काहीही म्हणाले नाही मी! त्यांना पुन्हा विनंती केली कि "कम्प्लेंट मत किजीये, गरीब कि दुआ मिलेगी!" तेव्हा कुठे त्या मला बाय करून त्यांच्या घरात गेल्या आणि मला गाणं आठवलं "हात जोड इनको सलाम कर प्यारे! नहीं तो ये तो मॅगी काकू खाने नहीं देगी, पिने नहीं देगी, जीने नहीं देगी!"

आणि अश्या रितीने मी, भाकरी आणि मॅगी काकू हा एपिसोड सम्पला! मिलते है ब्रेक के बाद!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

गुरुवार, २३ जुलै, २०२०

स्वावलंबन

आत्ता एका मैत्रिणीने पोस्ट टाकली की काही पुरुषांना बेसिक स्वयंपाक यायला पाहिजे म्हणुन. मी काही ह्यासाठी लिहिलंय कारण माझ्या माहितीतल्या काहींना स्वयंपाकच काय घरातले सगळेच कामं व्यवस्थित येतात. 

त्यावरून आठवलं, इथे म्हणजेच म्युनिकमधल्या शाळेत माझ्या मुलाला सगळे बेसिक लाईफ स्किल्स म्हणजेच बेसिक स्वयंपाक करणे, जेवण झाल्यावर टेबल स्वच्छ करणे, भांडी घासणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शौचालय स्वच्छ ठेवणे इत्यादी शिकवत आहेत. ते मुलांना पाचवीपासून जेव्हा सहलीला घेऊन जातात तेव्हा तिथल्या हॉस्टेलमध्ये मी वर लिहिलेल्या सगळ्या गोष्टी मुलांनाच कराव्या लागतात. शाळेतही पहिलीपासून जेवणाच्या खोलीत गेल्यावर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मुलांना जबाबदारी वाटुन दिलेली असते. टेबल पुसणे, सगळ्यांच्या प्लेट्स उचलून डिशवॉशर मध्ये ठेवणे वगैरे. महत्वाचं म्हणजे पालक ह्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत. 

आमच्या मुलाला हे का करायला लावलं, ते का करायला लावलं? असं जर कोणी म्हणायला लागलं तर शाळा स्पष्ट शब्दात सांगते कि हेच नियम आहेत आणि ते पाळावेच लागतील. पण काही लोक ह्यात मेडिजल ग्राऊंड्सवर अपवाद असतात. त्यासाठी रीतसर डॉक्टरचे प्रमाणपत्र लागते. 

आपल्याकडे किती शाळा हे शिकवतात? ह्या गोष्टी अभ्यासक्रमात असणे फार गरजेचे आहे. मुलगा असो वा मुलगी बेसिक गोष्टी आल्याच पाहिजेत असं मला वाटतं!

ह्या गोष्टींना आपल्याकडे “स्वावलंबन” असा फार ऊत्तम शब्द आहे! कमीत कमी स्वतःच्या गोष्टी स्वतः करताच आल्या पाहिजेत. ह्यात कुठला आलाय मुलगा मुलगी भेद? 

तुम्हाला काय वाटतं?

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

शुक्रवार, २६ जून, २०२०

आँखोकी गुस्ताखीयां

आज डोळ्यांच्या दवाखान्यात जाण्याचा योग्य आला. चाळीशी आलीये असं माझ्या डोळ्यांनी मला ठणकावून सांगितल्यावरच मी अपॉइंटमेंट घ्यायला फोन केला. तर रिस्पेशन ताई म्हणाली दोन महिन्यानंतरची अपॉइंटमेंट आहे. दुखणाऱ्या डोळ्यांकडे पाहून म्हणजे दुखणाऱ्या डोळ्यांचा विचार करून रिस्पेशन ताईला म्हंटलं "जरा आधीची दे ना ग अपॉइंटमेंट" तर म्हणे दीड महिन्यानंतरची आहे, यायचं तर या नाहीतर राहूद्या. इथे असंच आहे. तुम्ही मरायला टेकला असाल तर इमर्जन्सी क्लीनिकला जायचं नाहीतर तारीख पे तारीख चालूच राहणार. एखाद्या दिवशी, एखाद्या दवाखान्यात, एखाद्या टेबलवर सनी पाजी सारखं जोरदार हात मारुन मी म्हणणारच आहे हा डायलॉग. 

मागचा दीड महिना डोळ्यांनी जो असहकार पुकारला तो वाखाणण्याजोगा आहे. टीव्ही म्हणू नका, पुस्तक म्हणू नका, फोनवर फेसबुक, व्हॅट्सऍप म्हणू नका.. काही म्हणजे काही वाचू किंवा बघू देणार नाहीये आम्ही तुला, असंच काहीसं चालू होतं. एक मन वाटलं की तोपर्यंत एखाद्या ऑप्टिशियनकडे जाऊन एखादा चष्मा घेऊन येऊ पण इथल्या ऑप्टिशियन लोकांची तीन चार पानी प्रश्नपत्रिका लगेचच दुखणाऱ्या डोळ्यांसमोर आली आणि मी माझा मनसुबा बदलला. त्या प्रश्नपत्रिकेतली उत्तरं लिहून अजून "आँखोंकी रोशनी वगैरे चली जायेगी" म्हंटलं. कसाबसा दीड महिना काढला. पण चष्म्याचे सोपस्कार आठवून अजून १ दोन महिने कसे काढणार हा यक्ष प्रश्न पडला आहे. 

तर ह्या सगळ्यांत एक BC किस्सा आठवला. BC म्हणजे before corona.. 

साधारण मागच्या नोव्हेंबरची गोष्ट आहे. त्या काळात म्युनिकमध्ये वेगवेगळे रोग मुक्काम ठोकून असतात. त्यातलाच एक म्हणजे सायनसचे इन्फेक्शन. थंडी सुरु होत असते, सुर्प्रकाश कमी होऊन दिवस लहान होत असतो. फार भयानक वातावरण असते. मला जबरदस्त सायनसचे इन्फेक्शन झाले होते पण चिरंजीवांची  डोळ्याच्या दवाखान्यात अपॉइंटमेंट होती. ती चुकली तर पुन्हा एक दोन महिने अपॉइंटमेंट मिळायची मारामार, म्हणून मला खूप त्रास होत असताना त्याला घेऊन गेले. 

मला आधी वाटलं माझे डोळेच आले आहेत. कारण डाव्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं म्हणून रीतसर गॉगल वगैरे लावून मी गेले लेकाला घेऊन. वाटलं चला आपण डोळ्यांच्या दवाखान्यातच जातोय तर लगे आँखो म्हणजे लगे हाथो आपला डोळाही दाखवून घेऊ. भाबडी भारतीय विचारसरणी आपली. तिथे गेल्यावर रिस्पेशन ताईला म्हणाले कि मला पण डॉक्टरला डोळा दाखवायचा आहे, मी लेकासोबतच दाखवला तर चालेल का? 

माझ्या चेहऱ्याकडे डोळेही वर करुन न बघता "नाही" म्हणाली ना ती! मी तिला विनंती केली, म्हणाले " मला खुप त्रास होतोय, सहन होत नाहीये, कृपया मला दाखवु द्या हो." ताई तिच्या मतावर ठाम होती. "नाही म्हणजे नाही". बिना अपॉइंटमेंटचे त्यांच्या जीझसचे पण डोळे तपासणार नाहीत बहुतेक ते. ते आपण नाही म्हणत का स्वर्गातून ब्रह्मदेव जरी आला तरी तसं. 

मी :मला आत्ताचीच अपॉइंटमेंट दे. 
ताई: २ महिन्यानंतरची आहे. 
मी: पण माझा आत्ता डोळा दुखतोय, मैं कहाँ जाऊं? 
ताई: तो मैं क्या करू?

तोवर माझ्या डोळ्याने माझी पार वाट लावली होती. एकतर पाच सहा सिनियर सिटिझन्स आमच्या आधी पासून तिथे बसलेले होते. लेक "मेरा नम्बर कब आयेगा?" म्हणून ताप देत होता. त्यात हि ताई माझं ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी मी तिला विचारलं... 
"इमर्जन्सी क्लीनिकला जाऊ का? मला त्रास सहन होत नाहीये." ह्यावर ताईने जे भन्नाट उत्तर दिलं ते ह्याची देही ह्याची डोळा ऐकून आणि बघुन मला शब्दच सुचले नाहीत. ताईने अगदी साभिनय डोळा हातात पडतोय असं दाखवून मला म्हणाली "तुझा डोळा जर तुझ्या हातात आला असेल तरच तू इमर्जन्सीला जाऊ शकते. नाहीतर तिथेही तुला कोणी घेणार नाही." मी आवक होऊन, गपगुमान वेटिंग एरिया मध्ये येऊन बसले. तर लेक म्हणतो "बघ मी तुला आधीच सांगत असतो तू असे उद्योग करत जाऊ नकोस. इथे अपॉइंटमेंट शिवाय नाही दाखवता येत."

ये सब सुनके, मला जो धक्का बसला तो माझ्या डोळ्याने फारच मनावर घेतला. डोळ्याला वाटलं असेल "हि बाई आता आपल्याला हातात घेईल आणि जाईल इमर्जन्सी क्लिनिकला. उगी कुठे रिस्क घ्या. मी आपला असाच बरा  होतो." त्या दवाखान्यात लेकाचा नम्बर येईपर्यंत, पाणी गाळून गाळून डावा डोळा एकदम राईट झाला ना! 

या चमत्कारामुळे आता मनात येतंय कि त्या डोळ्यांच्या दवाखान्यातच एखादी नोकरी मिळते का बघावी म्हणजे अशी "आँखोंकी गुस्ताखीयां माफ हो जायेगी. क्यों?"


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

शुक्रवार, १२ जून, २०२०

हे घरची माझे विश्व

#जर्मनीतील_लॉकडाऊन_अनुभव 

आम्ही जर्मनीतल्या म्युनिकमध्ये मागील पाच वर्षांपासून राहतो. ह्या पाच वर्षात एकही दिवस असा नाही गेला की आम्ही घराबाहेर पडलो नाही. इथे कोणत्याही प्रकारची घरगुती मदत म्हणजेच आपल्याकडे असतात तसे दुधवाला, पेपरवाला, घरातील मदतनीस बायका आणि तत्सम मदत मिळत नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतः करावी लागते. त्यामुळे दूध आणायच्या निमित्ताने का होईना बाहेर चक्कर होतेच. पण १८ मार्चला जर्मनीमध्ये लॉकडाऊन सुरु झालं आणि बाहेर पडणं एकदमच कमी झालं. अक्षरशः "हे घरची माझे विश्व झालं". थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती माझ्यासारख्या बऱ्याचश्या लोकांची झाली आहे. हो ना?

ह्या सगळ्याची सुरुवात जर्मनीमध्ये म्यूनिकजवळच्या स्ट्रानबर्ग नावाच्या छोट्या शहरात जानेवारीमध्ये झाली. तिथल्या एका छोट्या कंपनीत एक चिनी व्यावसायिक काही कामासाठी आली होती आणि तिच्यामुळे त्या कंपनीतील बऱ्याच कर्मचाऱ्यांना ह्या कोरोना विषाणूची लागण झाली होती. तेव्हा इथल्या शासकीय यंत्रणेने तत्परतेने पावलं उचलत हा संसर्गजन्य आजार अजिबात पसरू दिला नव्हता. पण, फेब्रुवारीमध्ये इथे कार्निव्हलनिमित्त एक आठवडा सुट्या होत्या. त्यात जर्मन लोक प्रचंड प्रवास करतात, त्यांना फिरायची फार आवड आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्कीईंग ह्या लोकांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ह्या कार्निव्हलच्या सुट्टीत बरेच लोक प्रवासाला आणि स्किईंगला ऑस्ट्रिया, इटली मध्ये गेले आणि तिथून हा विषाणु पुन्हा जर्मनीमध्ये घेऊन आले आणि तो इथे पुन्हा पसरायला सुरुवात झाली. तेव्हा युरोपमध्ये इटलीत ह्या विषाणूने घातलेले थैमान बघता जर्मन सरकारनी कडक पावलं उचलायचा निर्णय घेतला कारण इथे मोठ्या प्रमाणावर असेलेले वृद्धआणि १८ मार्चला इथे टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन जाहीर झाले. लॉकडाऊन जाहीर झाल्या झाल्या इथेही काही प्रमाणात पॅनिक बायिंग झालेच. सॅनिटायझर,हँडवॉशचा आणि काही प्रमाणात दूध, फळ, भाज्या तुटवडा निर्माण झालाच. परंतु इथल्या प्रशासनाने लगेचच सुपरमार्केट्सची वेळ वाढवली आणि लोकांना आवाहन केले की "कोणत्याही वस्तूचा तुटवडा भासणार नाही." त्यामुळे काही अंशी पॅनिक बाईन्गला आळा बसला

नवरा संगणक क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्याचे घरून काम सुरु झाले आणि मुलाच्या शाळेतून इमेल आला की आम्ही लवकरच ऑनलाईन शाळा सुरु करू. मी जानेवारीपासून बातम्यांमधून ह्या विषाणूचा मागोवा घेत होते आणि जर्मनीमध्ये जेव्हा लॉकडाऊन जाहीर केलं तेव्हा जरा दहशतीतच होते. नाही म्हटलं तरी पूर्ण युरोपमधल्या बातम्या घाबरवणाऱ्याच होत्या आणि जर्मनीतले झपाट्याने वाढणारे आकडे पाहून मनावर ताण आलाच. नवऱ्याला साधं सामान आणायला पाठवायला जीवावर येत होतं. पण दूध आणणं तर गरजेचंच होत. त्यामुळे आठवड्यातून एकदाच तो किंवा मी बाहेर पडून लागेल तसं सामान आणायला सुरुवात केली. अजूनही आम्ही हेच तत्व पाळतोय

युरोपच्या बातम्या ऐकून भारतात घरचे सगळेच काळजी करत होते पण आम्ही इथली परिस्थिती पाहून त्यांना वेळोवेळी धीर देत होतो. आम्ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट केली ती म्हणजे घरच्यांना सांगितलं की कोणत्याही फॉरवर्ड मेसेजवर किंवा गंभीर बातमीवर लगेच विश्वास ठेऊ नका, आधी आम्हाला फोन करा. कारण काही लोकांनी उगीचच चुकीची माहिती पसरवली होती सुरुवातीला

पहिले पंधरा दिवस आम्ही फक्त आमच्या इमारतीच्या आवारात संध्याकाळी थोडावेळ चक्कर मारत होतो. आमच्या इमारतीच्या खाली फार सुंदर पायवाट आहे, वेगवेगळी झाडे आहेत, छोटीशी बाग पण आहे. त्यात नेमकाच वसंत सुरु झालेला होता, झाडांना नवीन पालवी फुटत होती, वेगवेगळ्या झाडांवर फुले फुललेली होती. त्यामुळे नुसतं खाली चक्कर मारून आलं तरी मनावरचा ताण कमी व्हायचा. पण लेक फार कंटाळला होताशेवटी पंधरा दिवसांनी आम्ही बाहेर चक्कर मारून यायचं ठरवलं आणि काय आश्चर्य, बाहेर लोक बऱ्यापैकी नॉर्मल वाटले. अर्थात इथे सोशल डिस्टंसिंगचे नियम कडकच होते आणि अजूनही आहेतच. पण लोक नियम पाळून, मुलांना बाहेर घेऊन येत होते. हे बघून माझीही भीड चेपली. तेव्हाच मला जाणवलं की मी जितका ताण घेतलाय तसं वातावरण इथे नाहीये. अजिबात घबराटीचं वातावरण नाहीये. ते तेव्हाही नव्हतं आणि आताही नाहीये. लोक शांत आहेत

इथे लोकांना ऊन दिसलं की त्यांची घरं त्यांना उचलु उचलु फेकतात, त्यामुळे इथले लोक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून नदीकिनारी सूर्यस्नानाचा आनंद घेतच होते. जे लोक नियम पाळत नव्हते त्यांना समजवायला पोलिसही तत्परतेने सगळीकडे फिरत होतेच. सुरुवातीला पोलिसांची एक गाडी पूर्ण शहरात फिरत होती, त्यातून संदेश प्रसारित होत होता की महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा वगैरे

फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी होती आणि तिथे पण बरोबर दीड मीटरच्या अंतरावर पट्ट्या लावल्याच होत्या/आहेत. दुकानाच्या आत जाण्यापूर्वी तिथला एखादा कर्मचारी, आपल्याला दिली जाणारी बास्केट व्यवस्थित सॅनिटायझरने स्वच्छ करूनच आपल्या हातात देतो. दुकानाच्या आत मर्यादितच ग्राहक घेतले जात आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, साधारण मेच्या सुरुवातीला पूर्ण जर्मनीत दुकाने, दवाखाने आणि सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत

एकतर इथे आधीच लोकसंख्या कमी आणि त्यात जर्मन लोक नॉर्मलीच प्रचंड सोशल डिस्टंसिंग पाळणारे लोक आहेत त्यामुळे बाहेर पडल्यावर मला फार काही वेगळं वाटलंच नाही. माझी जर्मन शेजारीण तर खुश आहे अगदी, त्यांना हे सगळं फार आवडतंय. म्हणजे सगळीकडे अगदी मोजके लोक, कामापुरतेच दुकान चालू असणे वगैरे.

जर्मन लोकांच्या दोन अगदी जीव की प्राण गोष्टी म्हणजे फुटबॉल आणि बिअर. टाळेबंदी सुरु झाल्यापासून जर्मनीत मोठे कार्यक्रम आणि फ़ुटबॉल मॅचेस पुढील आदेश येईपर्यंत बंद आहेत, त्यामुळे इथल्या फुटबॉल प्रेमींमध्ये निराशा पहायला मिळतीये. खरं सांगायचं झालं तर आम्हालाही फार चुकल्याचुकल्या सारखं वाटतं आहे कारण आमच्या घराच्या जवळच एक मोठं फुटबॉल स्टेडियम आहे आणि दर महिन्यात एखादी तरी मॅच तिथे असते. मॅचमध्ये गोल झाल्यावर त्या स्टेडियम मधुन येणारा मोठ्ठा आवाज आणि मॅच सम्पल्यावर आमच्या आजुबाजूच्या बिअर गार्डन्समध्ये होणारी गर्दी आम्ही फारच मिस करतोय. बिअरबद्दल बोलायचं झालं तर, म्युनिकमध्ये होणारा जगप्रसिद्ध "ऑक्टोबरफेस्ट" हा बिअर फेस्टिव्हल यावर्षी रद्द करण्यात आला आहे कारण ह्या फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी जगभरातून साधारण ६० लाख लोक येतात.  

इथल्या लॉकडाऊनला मी तरी पार्शियल लॉकडाऊन म्हणेन कारण लोकांना घराबाहेर पडायला अजिबात मज्जाव केलेला नव्हता. एका कुटुंबातील सदस्य, मग ते कितीही असोत ते एकत्र कुठेही जाऊ शकत होते, सार्वजनिक वाहतूक चालु होती, महत्वाच्या सगळ्या सेवा चालू होत्या. पण आम्ही फक्त एक केलं ते म्हणजे सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे टाळली. आम्ही जिथे राहतो तिथे सगळी दुकानं जवळच आहेत त्यामुळे बस, ट्राम किंवा मेट्रोचा वापर करायची गरजच नाही पडली

मीडियामध्येही रोज सकाळी रॉबर्ट कॉख इंस्टीट्युटच रोजचे कोरोनाबाधितांचे आकडे प्रसारीत करते. त्यांची व्यवस्थित पत्रकार परिषद रोज असते. बाकी कोणीही अधिकृत आकडे देऊ शकत नाही. लोकांमध्ये घबराट पसरवणारी कोणतीही बातमी मी अजूनपर्यंत तरी वाचली किंवा ऐकली नाही. तसेच जर्मनीने सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती केली असेल तर ती म्हणजे टेस्टिंग. त्यांनी आधी विषाणूसाठी मोठ्या प्रमाणात टेस्ट्स केल्या नंतर ह्या टेस्ट्सबरोबर देशातील सगळ्यात जास्त कोरोनाबाधित असलेल्या भागात अँटीबॉडी टेस्ट्स सुरु केल्या. अँटीबॉडी टेस्ट म्हणजे तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊन गेलाय आणि तुमच्या रक्तात त्याच्याशी लढणाऱ्या अँटीबॉडीज आधीच तयार झाल्या आहेत. ह्या टेस्टमध्ये विषाणूची तपासणी करता तुमच्या शरीराने ह्या विषाणूविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण झालीये कि नाही हे तपासतात. म्हणजेच तुमच्यात कोविड-१९ विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालीये कि नाही हे बघणे. ह्या टेस्ट्स त्यांनी जास्त करून रँडम निरोगी लोकांवर केल्या जेणेकरून त्यांना हे कळलं कि किती टक्के लोकसंख्या इम्यून झालीये

तरीही आजघडीला जर्मनीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या एक लाख सत्तर हजाराच्यावर आहे. पण सगळ्यात जमेची बाजू काही असेल तर ती म्हणजे सध्या ह्यातुन सुखरूप पार पडलेल्या म्हणजेच ह्या संसर्गातून बरे झालेल्या लोकांचा आकडा साधारण दीड लाखाच्या जवळपास आहे आणि मृत्युदर इतर युरोपिअन देशांच्या मानाने खूपच कमी आहे. ह्या ज्या जर्मनीच्या जमेच्या बाजू आहेत त्या इथल्या लोकांच्या काटेकोरपणे कायदे आणि नियम पाळण्याच्या सवयीमुळे आहेत. तसेच इथली शासकीय आणि आरोग्ययंत्रणा फारच भक्कम आहेत आणि लोकांचा स्वतःच्या सरकारवर विश्वास आहे.

इतर देशांप्रमाणे इथल्या अर्थव्यवस्थेवरही ह्या टाळेबंदीचा परिणाम झालाच आहे. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जर्मनीत ह्या विषाणूमुळे होणारे परिणाम लक्षात घेता अर्थव्ययस्थेला चालना देण्यासाठी 750 बिलियन युरोजचं मदतीचं पॅकेज जाहीर केलं. त्यामुळे अनेक कंपन्या, पगारदार लोकांना दिलासा मिळाला आहे. अश्या बिकट परिस्थितीत आपली नोकरी जाते की काय ही सर्वात मोठी चिंता असते. पण काही प्रमाणात का होईना सरकारने जबाबदारी घेतल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.

जेव्हा लॉकडाऊन जाहीर केले त्याच्या आसपासच जर्मनीने देशाच्या सीमा पूर्णपणे बंद केल्या होत्या. पण आता १५ जूनपासून हळूहळू ह्या सीमा उघडल्या जातील. वर्ल्ड वॉर नंतर पहिल्यांदाच अश्या भूतो भविष्यती गोष्टी युरोपमध्ये घडत आहेत. त्यातलीच अजून एक गोष्ट म्हणजे मार्चमध्ये जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्कल, ज्या स्वतः एक वैज्ञानिक आहेत, त्यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदा देशातील लोकांशी टीव्हीवरून थेट संवाद साधला. त्यांनी लोकांना ह्या बिकट परिस्थितीत शिस्त पाळण्याचे आणि एकता ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या म्हणाल्या की "हे कोरोनाचे संकट म्हणजे वर्ल्ड वॉर नंतरचे सगळ्यात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून त्याचा सामना करायचा आहे". चॅन्सलर अँगेला मर्कल ह्यांनी कोरोनाच्या लसीच्या विकासासाठी सुद्धा मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे

तसं म्हणलं तर माझ्या आयुष्यात फार फरक पडला नाहीये, कारण मी पहिल्यापासूनच वर्क फ्रॉम होमच करते, इथे घरातली सगळी कामे आम्ही दोघे मिळूनच करतो, लेकाला आताशा बऱ्याच गोष्टी करायला शिकवतोच आहोत; फरक फक्त एकच आहे की हे दोघे आता सतत घरातच असतात त्यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर गदा आलीये! ;) गमतीचा भाग सोडला तर खरंच इथे आधी जसं होत तसंच आयुष्य थोड्याफार फरकाने चालू आहे, वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की इथल्या मित्रमैत्रिणींना भेटता येत नाहीये. तेही लवकरच भेटता येईल अशी आशा आहे! ह्या सगळ्या "दुःखात सुख" म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडिया, त्यांच्यामुळे जास्त एकटेपणा जाणवला नाही. लेक तर रोज भारतात त्याच्या आजी-आजोबाना,भावांना आणि इथल्या मित्रांना व्हिडीओ कॉल करून गप्पा मारत बसतो. तो आणि त्याचा एक मित्र तर व्हिडीओ कॉल करून एकत्र अभ्यास करत आहेतआम्ही पण घरचे सगळे आठवड्यातून एकदा कॉन्फरन्स कॉलवर गप्पा मारतो

या आठवड्यात सगळी दुकाने आणि मॉल्स उघडले आहेत पण सगळे नियम पाळून आणि पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होणार आहेत. लेक दोन महिन्यांनी शाळेत जाणार म्हणून धाकधूक वाटती आहे जरा, पण आता एक कळून चुकलं आहे की हा विषाणू आपल्यासोबत दीर्घकाळ राहणार आहे त्यामुळे आपण जर सोशल डिस्टंसिंग, वैयक्तिक स्वच्छता आणि मास्कचा वापर ह्या गोष्टी नीट पाळल्या तर कोविड-१९ चा धोका बराच कमी होतो. त्यामुळे "Lets hope for the best!" एवढं सगळं असूनही जर कोरोनाबाधितांची संख्या वाढली तर सरकार पुन्हा लॉकडाऊन करणारच आहे.

लोक म्हणतायेत की आता यापुढे जग दोन कालखंडात विभागलं जाणार, पहिला म्हणजे कोरोना महामारीच्या आधीचा आणि दुसरा म्हणजे त्यानंतरचा. त्यामुळे जग थोड्याफार प्रमाणात बदलेलंच. ते म्हणतात ना "Change is good", असाच विचार करुन आपल्या सगळ्यांना पुढे वाटचाल करावी लागेल. सध्यातरी येईल त्या परिस्थितीचा सामना सकारात्मकतेने करणे, एवढंच आपल्या हातात आहे. त्यामुळे नियम पाळूया आणि कोरोनाला पळवूया!

ज्या लोकांना घरून काम करणेच शक्य नाहीये, जे डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्यविभागातले कर्मचारी लोकांची सेवा करत आहेत, जे सफाई कर्मचारी निगुतीने स्वतःचं काम करत आहेत, जे पोलीस कर्मचारी आणि सरकारी अधिकारी जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत आहेत, जे बँक कर्मचारी रोज जीव मुठीत घेऊन बँकेचे व्यवहार सांभाळत आहेत, ह्या आणि अश्याच अनेक लोकांना मनोमन नमन. अजून एक गोष्ट बघून जीव तुटतो, ती म्हणजे भारतातील हातावर पोट असणारी लोकं पायी स्वतःच्या घरी जात आहेत. त्यांचंही आयुष्य लवकरच सुकर होवो

कधीकधी वाटतं हे एक दुःस्वप्न आहे आणि मला जाग आल्यावर सगळं अगदी पूर्वीसारखं असेल, मला पटकन भारतात जाता येईल आणि सगळ्या जिवलगांना कडकडून मिठी मारता येईल! हे असं सगळं होण्यासाठी, ह्या अतिसंसर्गजन्य विषाणूवर लवकरात लवकर एखादं औषध किंवा लस मिळावी आणि पूर्ण जगावर असलेली कोविड-१९ विषाणूची टांगती तलवार नाहीशी व्हावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक


वाचकांना आवडलेले काही