शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

किल्ली

तुम्ही कचरा टाकायला म्हणून २-३ छोट्या पिशव्या एका हातात घेता मग लक्षात येतं कि बाहेर थंडी आहे म्हणून त्या पिशव्या दाराच्या बाहेर ठेऊन पटकन जॅकेट अंगावर चढवता. मग लक्षात येतं कि घराची किल्लीच घेतली नाहीये म्हणून घरात जाऊन किल्ली आणेपर्यंत तुमच्या लक्षात येतं कि मॅगी काकू त्यांच्या घराचं दार उघडत आहेत म्हणून तुम्ही पटकन किल्ली जॅकेटच्या खिशात टाकून, कचऱ्याच्या पिशव्या कश्याबश्या उचलून तिथून चक्क पळ काढता.

कचरा डस्टबिन मध्ये टाकून आजूबाजूच्या झाडांवर फुललेली फुलं आणि नवीनच येऊ घातलेली कोवळी पानं बघत रमतगमत तुम्ही घराकडे निघता. ह्या रमण्यात आणि गमण्यात तुम्ही उगीचच जॅकेटच्या खिशात हात घालता आणि... तुमच्या पायाखालची जमीन सरकते. हाय रे कर्मा तुमच्या खिशात घराची किल्ली नसते. तुम्ही पटकन दुसरा खिसा चेक करता लेकिन किल्ली का कही नामोनिशान नहीं मिलता.

आता तुम्हाला जाणीव होते कि इथेच तर कचरा टाकायला जायचय असं म्हणून तुम्ही मोबाईल आणलेला नाहीये आणि कचरा टाकायला जाताना तशी पर्स घेऊन जायची पद्धत आपल्याकडे अजून तरी रूढ नाहीये त्यामुळे तुमच्याजवळ पर्स नसते आणि ओघानेच एकहि सेंट नसतो. त्यामुळे बाहेर जाऊन ह्यांना फोन करायचा प्रश्न निकालात निघतो. ह्यांचा विचार येताच त्याचा चष्मा डोळ्यांसमोर आय मिन चष्म्याच्या आतले मोठे डोळे दिसतात. आता काय? हा प्रश्न आ वासून तुमच्या समोर उभा असतो. मघाशी बघितलेल्या फुलपानात किल्ल्या दिसायला लागतात. तुमचे पाय अचानक तुम्हाला सांगतात कि बाई थन्डी आहे कारण पायात फक्त स्लीपर असते. किल्ली घरातच राहिल्याच्या विचाराने तुम्हालाही थन्डीची जाणीव होते. 

मग विचार येतो इथून मॅगी काकूंना आवाज देऊ त्या गॅलरीत येतील आणि बिल्डिंगच दार उघडतील; कमीतकमी बिल्डिंगच्या आत तरी जाऊ. पण काकू कदाचित बाहेर गेलेल्या असतात. मग तुम्ही बिल्डिंगच्या खाली येऊन मैत्रिणीच्या घराची बेल वाजवता तर तीही घरात नसते. आता जीवाची नुसती किल्ली किल्ली व्हायला लागते. तरीही तुम्ही एक दोन ओळखीच्या लोकांच्या घरची बेल वाजवता पण पुण्यातल्या सारखं इथेही एक ते चार संचारबंदी असते. कोणीही उत्तर देत नाही. एव्हाना थन्डीनी पाय गारठून गेलेले असतात. दुसरी किल्ली संध्याकाळी ७ पर्यन्त तरी घरी येणार नाहीये हे कळून चुकतं त्यात लेक शाळेतून आल्यावर तो जे काय चार प्रेमाचे शब्द बोलेल तेही डोक्यात येतात. असे लाखो विचार तुमच्या डोक्यात किल्ली करत असतात... म्हणजे डोक्यात कल्ला करत असतात.

तेवढ्यात एक कुरियरवाले काका कोणाचं तरी कुरियर घेऊन येतात आणि तुमच्याकडे विचित्र नजरेने बघतात. त्यांनी ज्या कोणाचं कुरियर आणलंय ते बिल्डिंगचं दार उघडतात आणि तुम्ही पटकन त्यांच्या मागोमाग आत जाता तर कुरियर काका तुम्हाला हटकतातच "इथेच राहता का तुम्ही?" तुम्हीही तोऱ्यात सांगता हो म्हणून. ते निघून गेल्यावर पुन्हा आता काय? हा प्रश्न तुमच्या समोर किल्ली करत असतो.. म्हणजे नाचत असतो.

मग तुम्ही ठरवता कि आपल्या घराच्या मजल्यावरच्या पायऱ्यांवर बसुया आणि मॅगी काकू आल्या कि ह्यांना फोन करू. पण तुम्हाला जाणीव होते कि तुम्हाला ह्यांच्या फोन नंबर मधले २-४ आकडेच आठवत आहेत, पूर्ण नम्बर चक्क पाठ नाहीये. किस जनम का बदला ले रहे हो भगवान? असे विचार पुन्हा डोक्यात किल्ली करत असताना तुम्ही लिफ्टच्या बाहेर येता आणि तुमच्या घराच्या दारात असलेल्या पायपुसण्यावर घराची किल्ली तुमच्याकडे बघून वाकुल्या दाखवत असते. मॅगी काकूंना टाळायच्या गडबडीत किल्ली जॅकेटच्या खिशात न जाता पायपुसण्यार पडलेली असते. तिला प्रेमाने हातात घेऊन, कुलूप उघडून आत आल्यावर तुम्ही आधी जॅकेटच्या खिशात २ युरोचं नाणं ठेवता आणि मग ह्यांचा फोन नम्बर घोटून घोटून पाठ करता.

पण ते काहीही असो मॅगी काकु जवळपास असल्या कि मला पोस्ट लिहायला विषय मिळतोच!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

शनिवार, ३० मार्च, २०१९

किस्सा ए मॅगी काकू #१

हि गंमत आहे मॅगी काकुंची. मॅगी काकु म्हणजे माझी जर्मन शेजारीण. साठ पासष्ट वर्षांच्या असतील पण अजिबात वाटत नाहीत. गोड आहेत दिसायला. एकदम टापटीप. एकटयाच राहतात. रोज सायकलिंग करतात. पण स्वभाव म्हणाल तर अगद चौकस आणि शंकेखोर. आमचा सात वर्षांचा शेजार होता पण मी त्यांना वारंवार बोलवून सुद्धा त्या एकदाही आमच्या घरात आल्या नाहीत, ना त्यांनी मला कधी त्यांच्या घरात बोलावलं! असो. 

तर, हि मजेशीर गोष्ट घडली तेव्हा मी नुकतीच म्युनिकमध्ये रहायला आले होते. जर्मन लोक कसे असतात, त्यांची जीवनशैली कशी असते ह्या सगळ्या बद्दल सुतराम कल्पना नव्हती. माझी आणि काकुंची ओळख होऊनही फार दिवस झाले नव्हते. एक दिवस मी लेकाला शाळेतुन आणायला म्हणुन घराबाहेर आले तर काकु पण कुठेतरी निघाल्या होत्या. कॉरिडॉर मधेच भेट झाली आमची.
  
आमचा नमस्कार चमत्कार झाला आणि काकुंनी एकदम मला एक शाब्दिक बॉम्ब टाकला "तु तुझ्या नवऱ्याच्या मुलाला आणायला चालली आहेस ना?" मला प्रश्न कळायलाच वेळ लागला. मनात म्हणाले, "अरेच्या आता हे काय नवीन? असा प्रश्न आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला". मी बावचळले, काकुना माझी अवस्था कळली बहुतेक त्या म्हणाल्या "इट्स ओके". आता हे युकून तरी मी उत्तर द्यावं कि नाही, पण मला शब्दच सुचले नाही. ते तोंडी परीक्षेत जसं वाटतं ना तसच वाटायला लागल. उत्तर येत असुन वेळेवर काही आठवतच नाही कारण प्रश्नच कळलेला नसतो.

तरी मी काहीतरी बोलायचं म्हणुन बावळट सारखी म्हणाले "अहो तो माझाच मुलगा आहे." त्यावर त्या "ओह अच्छा तुझाच का?" (त्यांना वाटलं तो माझ्या एकटीच मुलगा आहे!). मग लक्षात आलं की उत्तर चुकतय आपलं. मीे ओशाळुन म्हणाले "अहो तसं काही नाही हो. तो आमच्या दोघांचा मुलगा आहे आणि आमच्या लग्नाला १० वर्ष झाले." काकुना धक्का बसला बहुतेक. आता बावचळायची पाळी त्यांची होती. दोन मिनिट शब्दच सुचेना त्याना. जरा सावरून त्या म्हणाल्या "तुला इतका मोठा मुलगा असेल असं तुझ्याकडे पाहुन वाटत नाही." तोपर्यंत आम्ही लिफ्ट मधे आलो होतो. मी लगेच लिफ्ट च्या आरशात पाहीले स्वत:कडे. मनात म्हटले "अग्गोबाई खरच की काय.जुग जुग जियो काकु." 

मी विचार केला आता काकुना खरं काय ते सांगावच लागेल आणि म्हणाले "आम्ही दोघे एकमेकांना लहानपणी पासुन ओळखतो." हे ऐकून काकु अक्षरश: किंचाळल्याच "काय" म्हणुन. मला वाटलं त्याना आधार वगैरे द्यावा लागतो की काय! त्या माझ्याकडे मी परग्रहवासी (मराठीत एलियन) असल्यासारख्या पहात होत्या. म्हणाल्या "मी ऐकले आहे भारतात अजुनही लोकांची लग्न 50-50 वर्ष टिकतात म्हणुन." 

मी आणि त्या एका प्रचंड मोठ्या धकक्यातुन थोडं सावरून आपापल्या मार्गाला लागलो.

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 

मंगळवार, ५ मार्च, २०१९

अलार्म

तुम्हाला सकाळी सकाळी अलार्मच्या आवाजाने जाग येते. तुम्ही मोबाईल चेक करता तर पहाटेचे ४.३० वाजलेले असतात. चिडून तुम्ही ह्या वेळेला अलार्म का वाजतोय म्हणून अर्धवट झोपेत पुन्हा मोबाईल चेक करता तर तुमच्या मोबाईमधला अलार्म वाजतच नसतो. मग तुम्हाला वाटतं कि नवऱ्याचा मोबाईल वाजतोय म्हणून तुम्ही ह्या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन नवऱ्याचा मोबाईल चेक करता. तर त्यातही अलार्म वाजत नसतो.

आता तुम्हाला आजूबाजूच्या परिसराचे भान येते आणि लक्षात येतं की हा जो काय अलार्म वाजतोय तो लोकांच्या घरात वाजतोय म्हणून तुम्ही त्यांना शालजोडीतले शब्द मनातल्या मनात वाहून पुन्हा झोपायचा प्रयत्न करता. पण हा अलार्म टणटण वाजतच राहतो. तुम्ही १० मिनिटांनी चडफडत उठता आणि पहाटेच्या प्रचंड गारठ्यात बाहेरच्या पॅसेजमध्ये जाऊन आवाजाचा कानोसा घेता आणि तुम्हाला साक्षात्कार होतो कि हा स्मोक डिटेक्टरचा आवाज आहे. ह्या विचारासरशी भीतीने अंगावर सरसरून काटा येतो. कोणाच्या घरात आग तर लागली नाहीये ना?

तुम्ही पटकन नवऱ्याला उठवता आणि त्याला परिस्थिती सांगता. मग तुम्ही दोघे पॅसेजमध्ये येऊन नक्की कोणाच्या घरातून स्मोक डिटेक्टरचा आवाज येतो त्याचा अंदाज घेत असताना हळूहळू जळका वास यायला सुरुवात होते. तुम्हाला वाटतं वर राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरातून आवाज येत असेल बहुतेक, कदाचित ती गावाला गेलीये आणि घरात काहीतरी झालं असेल म्हणून तुम्ही इतक्या पहाटे तिला कॉल लावता. त्या स्मोक डिटेक्टरचा आवाज आता वरच्या मजल्यावर अजूनच टणटणत असतो.

मैत्रीण फोन उचलते आणि दार उघडून बाहेर येऊन म्हणते की तिच्या घरात सगळं व्यवस्थित आहे. तुमचा जीव थोडा भांड्याच्या काठावर येतो. मग ती म्हणते कि इथे तिच्या बाजूच्या घरात एक बॅचलर राहतो. मग तुम्हाला सगळ्यांना खात्री होते कि स्मोक डिटेक्टरची टणटण आणि जळका वास त्याच्याच घरातून येतोय. तुम्ही सगळे बऱ्याच वेळा त्याच्या घराची बेल वाजवता पण तो बंधू उठेल तर शपथ.

मग तुमच्या ह्यांच्या लक्षात येतं कि बिल्डिंग मध्ये इंग्लिश समजत असलेला अजून एक बॅचलर आहे त्याला उठवूया. कारण अशा परिस्थितीत नक्की कोणत्या इमर्जन्सी नंबरवर कॉल करावा हे कोणालाच कळत नसत. चक्क बेल वाजवल्यार तो दुसरा बॅचलर फ्लोरिअन दार उघडतो आणि त्याला परिस्थिती सांगितल्यावर लगेच वरच्या मजल्यावर येतो. आणि तुमच्या ह्यांना म्हणतो कि "धन्यवाद तुम्ही मला आगीपासून वाचवलं". त्यामुळे तुमच्या डोक्यात उगीचंच आगीचे विचार यायला लागतात.  इतक्या वेळापासून स्मोक डिटेक्टरची टणटण आता तुमच्या डोक्यात घणघणत असते. तुम्ही सगळेच खूप घाबरलेले असता कारण जळका वास वाढत चाललेला असतो. आत नक्की काय झालंय हे कोणालाच कळत नसतं.

मग फ्लोरिअन आणि तुम्ही सगळे त्या बॅचलरच्या घराचं दार जोरजोरात वाजवता तरीही काहीच प्रतिसाद येत नाही. आता सगळ्यांच्या मनावरचा ताण वाढत असतो. शेवटी फ्लोरिअन फायर ब्रिगेडच्या नम्बरवर कॉल करतो आणि तेवढ्यात तो मंद बॅचलर दार उघडून धुरातून बाहेर येतो. त्याच्या घरात सगळा धूर पसरलेला असतो आणि त्याला त्याच काहीही सोयरसुतक नसतं. फ्लोरिअन त्याला जर्मनमध्ये सांगत असतो कि बंधू खिडक्या दारं उघड सगळे; तर ते येडं आजूबाजूला तुम्हा भारतीयांना बघून घराचं दार लावायला लागतं. फ्लोरिअन फायर ब्रिगेडशी बोलतच त्या मंद बॅचलरला विचारतो "Alles gut?" सगळं ठीक आहे ना? धुराच्या आवरणातून बाहेर येत बॅचलर म्हणतो हो सगळं ठीक आहे आणि तुमच्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. रात्री उशिरा काहीतरी खायचं म्हणून मंद बॅचलरने काहीतरी ग्रिलिंगसाठी लावलेलं असतं आणि त्याचा कुंभकर्ण झालेला असतो. त्याचा धूर असतो तो. एकदाची स्मोक डिटेक्टरची टणटण तो बंद करतो.

अरे पण तुमच्या घरात, तुमच्या बोडख्यावर स्मोक डिटेक्टर अर्धा एक तास कोकलतोय, आजूबाजूला प्रचंड धूर पसरलाय, बाहेर लोक बेल बडवतायेत, आणि तुम्ही घोडे विकून झोपले आहात? घोडे विकून कि ... देव जाणे. "कोणती उच्च प्रतीची लावून झोपला होता त्याला विचारावं लागेल?" तुमचे "हे" मराठीत म्हणतात. शेवटी तुम्ही सगळे फ्लोरिअनला त्या मंद बॅचलरसोबत सोडून घरी येता तर पुढच्या पाचच मिनिटांत ७-८ फायर ब्रिगेडचे लोक तुमच्या बिल्डिंगमध्ये हजर असतात. त्यांची प्रोसिजर पूर्ण करून आणि बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर नीट तपासून ते आले तसे शांतपणे निघून जातात.

आणि तुम्हाला मॅगी काकूंची आठवण येते. त्या ऑपरेशनसाठी गेल्या नसत्या तर तुम्ही उठायच्या आधीच फायर ब्रिगेडचे लोक बिल्डिंगमध्ये दाखल झालेले असते कारण मंद बॅचलर त्यांच्या वरच्याच घरात राहतोय. ज्या मॅगी काकू तुमच्या घरातल्या दाराचं कुरकुरणं ऐकु शकतात त्यांच्या तिखट कानांना स्मोक डिटेक्टरचा आवाज सुरु व्हायच्या आधीच गेला असता ना!

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

आपुलकी

  खुप दिवस झाले मॅगी काकूंची (माझी जर्मन शेजारीण) भेट नाही झाली म्हणून तुम्ही त्यांची आठवण काढत असता आणि "कावळा बसायला आणि फांदी तुटायला" उक्तीप्रमाणे बाहेर जायला म्हणून दार उघडताच मॅगी काकु समोर हजर. काकु अगदी प्रेमाने तुमच्याशी बोलायला लागल्यामुळे तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. तुम्ही मनातच म्हणता "बऱ्या आहात ना काकु?" तर मनकवड्या असल्यासारख्या काकु म्हणतात "अगं बरेच दिवस झाले माझा एक पाय दुखतोय."  ह्यावर तुम्ही औपचारकपणे "हो का? काळजी घ्या हं."  एवढं म्हणून काढता पाय घ्यायचा असफल प्रयत्न करता पण काकुंचा आज गप्पा मारायचा मुड असतो. मग काकू त्यांच्या पायाची कहाणी सांगतात आणि तुम्ही ती शहाण्या मुलीसारखी ऐकून घेता. शेवटी काकू म्हणतात कि त्यांच्या पायाची एक छोटी सर्जरी आहे पुढच्या आठवड्यात. ते ऐकून तुम्हाला त्यांच्याविषयी आपुलकी वाटते म्हणून तुम्ही अगदी प्रेमाने त्यांना म्हणता "काकु तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मला नक्की सांगा हं. मी आहे इथेच." काकू सुद्धा आपुलकीने हो म्हणतात. आणि मग आपुलकीच्या पुढच्या पायरीवर जाऊन तुम्ही त्यांना म्हणता "मी माझा फोन नम्बर देते हं तुम्हाला म्हणजे हॉस्पिटलमधुन तुम्ही मला कधीही कॉल करू शकाल."  तर आपुलकीची ऐशीतैशी करत काकु म्हणतात "अगं नको देऊस फोन नंबर." आणि चक्क तिथून निघून जातात. हा मनावरचा आघात सहन न होऊन तुम्हाला नक्की कुठे जायचं होतं हेच तुम्ही विसरता! माझा पचका करायची एकही संधी मॅगी काकू अजिबात सोडत नाहीत. 

   ह्या छोट्या सर्जरीवरून दोन किस्से आठवले म्यूनिचमधल्या डॉक्टरांचे. 

  माझ्या एका मैत्रिणीला हर्नियाचा खूप त्रास होत होता. इथे आधी प्रायोगिक तत्वावर बरेचसे औषधं देऊन बघतात डॉक्टर लोक. कशानेच कमी नाही झालं तर मग शेवटचा उपाय सर्जरी. डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली. छोटी सर्जरी करावी लागेल म्हणाले. तेव्हा तिची मुलगी वर्ष दीड वर्षाची होती त्यामुळे सर्जरी म्हटलं की अंगावर काटा आला बिचारीच्या. ते हॉस्पिटल मध्ये राहणं, इथे मदतीला घरात कोणी नसणे, नवरा आणि मुलीची खाण्यापिण्याची काळजी इत्यादी गोष्टींमुळे आधीच ती वैतागलेली होती. सर्जरीच्या दिवशी डॉक्टरांनी तिच्याकडून बरेचसे फॉर्म्स भरून घेतले, सगळे नियम समजावून सांगितले आणि सगळ्यात शेवटी कोणत्याही प्रकारची आपुलकी न दाखवता म्हणाले "तुमचा ह्या सर्जरीदरम्यान मृत्युही होऊ शकतो त्यामुळे मन खंबीर करा." भीतीने गाळणच उडाली तिची. अरे ही काय पद्धत झाली का? मृत्यू होऊ शकतो काय? डोक्यावर पडल्यागत का वागतात देव जाणे? नवीनच म्यूनिचमध्ये आलेले तेव्हा ते. तिला वाटलं भारतात जाऊन उपचार घेतले असते तर बरं झालं असतं. पण ते म्हणतात ना एकदा उखळात डोकं घातलं कि एक बसो की दहा. सरतेशेवटी सगळं व्यवस्थित झालं आणि सर्जरीनंतर ती सुखरूप घरी परतली. पण सगळं नीट होईपर्यंत तिच्या डोक्यावर उगीचच टांगती तलवार!

  आमच्या ह्यांच्या एका मित्राची अशीच एक छोटी सर्जरी झाली. तेव्हा त्यांचं कुटुंबही भारतात होतं. एकटेच होते म्यूनिचमध्ये. साधारणपणे कितीही छोटी सर्जरी असेल तरी हॉस्पिटलमध्ये एखादा दिवस तरी रहावं लागतं ही आपली धारणा असते. कारण अनास्थेशियाचा प्रभाव बराच वेळ राहतो ना. असा विचार त्यांनी पण केला आणि मित्रांना दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलला बोलावलं. सर्जरी झाली, अनास्थेशियाचा थोडा प्रभाव कमी होऊन त्यांना जाग आली. तर समोर डॉक्टर उभे आणि म्हणाले "आता तुम्ही घरी जा हॉस्पिटल बंद करायची वेळ झाली." नक्की डॉक्टर काय म्हणाले हे कळायलाच त्यांना १०-१५ सेकंद लागले. अजूनही अनास्थेशियाच्या प्रभावाखाली असल्यामुले त्यांनी "काय?" असं पुन्हा विचारलं. तर डॉक्टर "अहो आमची हॉस्पिटल बंद करायची वेळ झालीये तुम्ही निघा आता."  त्यांना वाटलं "नाही जात घरी जा." असं ओरडून सांगावं, पण ओरडायची शक्तीच नव्हती त्यांच्यात. सर्जरी झाल्यावर आपुलकीने विचारपूस करावी जरा पण काय तर म्हणे घरी जा! पूर्ण शुद्ध पण आली नव्हती त्यांना तरी मनाचा हिय्या करून कसेतरी स्वतःला सावरून निघाले ते तिथून आणि मित्राला फोन केला. पण व्हायचं ते झालंच म्हणजे ट्राममधल्या लोकांना त्यांच्याकडे बघून वेगळाच संशय आला!  

 तर सर्जरी नको पण डॉक्टरांना आवरा म्हणायची वेळ आहे इथे. मॅगी काकुंची सर्जरी व्यवस्थित पार पडो म्हणजे मिळवलं. 

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक  
Featured post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

सहिष्णुता

परवा "उरी" सिनेमा बघितला. हे म्हणजे खरंतर वरातीमागून घोडंच आहे पण तरीही फ़ेसबुकवर सांगावं लागतं ना! नाही नाही घाबरू नका अजिबात. परीक्षण वगैरे लिहीत नाहीये. आधीच सांगून टाकलेलं बरं नाहीतर पुढे वाचणारच नाही कोणी. असो.

तर सिनेमा हॉल एखाद्या चाळीतल्या खोलीत असल्यासारखा छोटासा. जो सुरू होतेही खतम हो गया. ४०-४५ लोक बसतील एवढाच हॉल. ते पाहून चिरंजीव म्हणाले नक्की इथेच आहे ना सिनेमा? तुम्ही पत्ता पहिला होता ना नीट? ते ऐकून आम्हालाही शंका आली पण हळुहळू भारतीय लोक आजूबाजूला जमा व्हायला लागले तेव्हा जरा बरं वाटलं. कारण एकतर रविवारी पहाटे दहा वाजता भर बर्फात आम्ही सिनेमा हॉल शोधत हिंडलो आणि तो जर चुकीचा असेल तर उरीची फ्यूरी व्हायला वेळच लागला नसता. बरेच लोक भारतीय वेळेनुसार आल्यामुळे पहिले १५ मिनिटे समोरच्या स्क्रिनवर विकी कौशलपेक्षा येणाऱ्या लोकांचे डोके बघुन फ्यूरी आलीच शेवटी. पण सहिष्णुतेचे बाळकडूच आपल्याला मिळालेले असल्यामुळे डोके(लोकांचे स्क्रिनवर दिसणारे) कितीही डोक्यात गेले तरी आपण डोकं शांतच ठेवायचं. पण चिरंजीवाचा उरीसाठीचा जोश बघुन फ्युरी आपोआप कमी झाली.

भारतीय लोकांच्या ह्याच सहिष्णूपणाचा एक भारी किस्सा मागच्या आठवड्यात दुसऱ्या एका सिनेमा हॉल मध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या साक्षीने घडला. एकतर तद्दन फिल्मी हिंदी सिनेमा त्यात तो बघायला २५-३० युरो खर्च करून लोक का जात असतील बरं? हा मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न कि ज्या हिरोचं नाव संग्राम भालेराव आहे त्या सिनेमाला "सिम्बा" हे नाव का दिलं असेल? नाही म्हणजे काहीतरी  ताळमेळ असावा ना. असो बापडे आपल्याला काय करायचंय.  मोदी आहेत ना प्रश्न सोडवायला. आणि हो आम्ही पण उरी बघितलंच ना!  उगी कशाला घेणं ना देणं अन फुकटचं कंदिल लावणं!

तर सिम्बा नामक सिनेमाला जर्मन लोकांनी पण हजेरी लावली म्हणे. बिचारे! जगात आत्मविश्वास, अतिआत्मविश्वास असेलेले असंख्य लोक पहिले. पण सिनेमाला आलेल्या एका जर्मन मुलाने भारतीय लोकांच्या सहिष्णूपणावर ठेवलेल्या विश्वासाने भारावून गेले हो मी. त्या मुलाच्या विश्वासासमोर आत्मविश्वास,अतिआत्मविश्वास म्हणजे किस झाड कि पत्ती.

ह्या दादाने एका रो मधले दोन्ही टोकाचे एक एक तिकीट काढले. बरं असे दोन टोकाचे तिकीट काढले तर मित्राबरोबर तरी काढावेत ना जर काही वाईट प्रसंग ओढवला तर मित्र बिचारे मदतीला हजर असतात. पण दादाने गर्लफ्रेंडसोबत असे तिकीट काढले. भारतीय लोकांचा सहिष्णूपणाच कारणीभूत ह्याला अन दुसरं काय? त्याला वाटलं विनंती केली की सरकतील सगळे बाजूच्या सीट्सवर आणि आपल्या भारतीय लोकांनी त्याचा विश्वास सार्थ ठरवला बरं. सगळेजण एका टोकाला सरकले आणि घात झाला ना दादाचा. भारतीय लोक सरकले पण दोन जर्मन तरुणीसुद्धा त्याच रोमध्ये होत्या त्यानी साफ नकार दिला! ह्याबाबतीत म्हणजे फटकळपणा करण्यात जर्मन लोकांचा पुणेकरही हात धरू शकत नाहीत बरं!

दादा त्यांना बापुडवाणा चेहरा करून समजवतोय पण त्या ऐकतील तर शपथ. एक क्षण तर असा आला आता वाटलं रडतंय लेकाचं. तो तरी काय करणार प्रसंगच तसा ओढवला त्याच्यावर. गर्लफ्रेंड बसलेली एका टोकाच्या सीटवर आणि हा हातापाया पडतोय दुसऱ्याच पोरींच्या. त्या जर्मन प्रेमी युगुलाची झालेली ताटातूट पाहून भारतीय सहिष्णू लोक हळहळले बिचारे. त्यांनी फार प्रयत्न केला त्यांना एकत्र आणायचा पण "उसके अपने खूननेही उससे बेईमानी की आखिर". गर्लफ्रेंडने त्याला दिलेले लुक्स तर जन्मात नाही विसरायचा तो. शेवटी स्वतःला सावरुन जी जागा मिळाली तिथे बसला बिचारा. मध्यंतरात त्याची गर्लफ्रेंड जे बाहेर पडली आणि हा तिच्या मागोमाग ते पुन्हा दिसलेच नाही! . 

त्या दादाची गर्लफ्रेंड अजून आहे का सोडून गेली देव जाणे?

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

Let it snow

दोन दिवस झाले बर्फवर्षाव चालूच आहे. कालपासुन जरा जोर वाढला आहे आणि तापमान पण -२ आहे. रात्री आकाशाचा रंग हलका केशरी वाटत होता बर्फ पडत असताना. सगळीकडे कापूस पिंजून ठेवल्यासारखा पांढराशुभ्र बर्फ, खिडकीतून बाहेर पाहिल्यावर दिसणारा मोत्यासारखा बर्फवर्षाव, जाडजूड जॅकेट्स, टोप्या, बूट, हातमोजे  घालून एवढ्या बर्फातही शाळेत जाणारी मुलं, जपून पावलं टाकणारे आजी आजोबा, लगबगीने ऑफिसला जाणारे लोक. इतक्या बर्फातही जनजीवन बऱ्यापैकी सुरळीत चालू असतं.

आत्ताही हे सगळं लिहिताना बाहेर पडणाऱ्या शुभ्र मोत्यांवरून नजर हलत नाहीये.आपल्याकडे श्रावणात पाऊस पडून गेल्यावर निसर्गसौंदर्य बघताना आपसूक मनात "हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे" येऊन जातं. तसं इथे "Since we have no place to go. Let it snow, let it snow, let it snow" म्हणावं वाटतं.




























सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

चष्मेबद्दुर

इथे आल्यापासून सोप्या गोष्टी अवघड आणि अवघड गोष्टी सोप्या वाटायला लागल्या आहेत. म्हणजे भारतात जी कामं पटकन होतात त्या कामांना इथे काही दिवस ते महिने लागतात. उदाहरणच द्यायचे झाले तर डॉक्टरची अपॉइंटमेंट, चष्मा खरेदी इत्यादी आणि ज्या गोष्टी अवघड वाटायच्या जसं कि सिटी बसने गर्दीत प्रवास, टु व्हीलर शिवाय पान न हलणे वैगरे इथे एकदम सोपं आहे; बस, ट्राम, मेट्रोचा प्रवास सोपा आणि सुखकर आहे.

बाकी सगळ्या गोष्टींमध्ये घरात माझा कितीही वरचष्मा असला तरीही चष्मा खरेदी किंवा चष्मा ह्या विषयावर मी घरात चष्मेवाल्यांबरोबर बोलणे किंवा मत प्रदर्शित करणे म्हणजे आ बैल मुझे मार आहे. मला नसलेला चष्मा ह्याला कारणीभूत आहे!  तर चष्मा खरेदी आणि चष्मा दुरुस्ती म्हणजे डोळे दाखवून अवलक्षण आहे इथ! पुण्यातल्या सारखं इथेही बरचसे दुकानदार आणि तिथे काम करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरच लिहिलेलं असतं "इथे अपमान करून मिळेल"!!

चष्मा खरेदी

आपण आपलं दुकानात जातो चष्म्याची आवडलेली फ्रेम घेतो आणि नंबर वाला कागद दुकानदाराला देऊन ३-४ दिवसात किंवा जास्तीत जास्त आठ दिवसात चष्मा आणतो. पण इथे तसं अजिबात नाहीये बरं; कमीत कमी आम्ही ज्या दुकानात गेलो तिथे तरी. आम्ही त्या दुकानात साधारण संध्याकाळी साडेपाच सहाला गेलो. मोठं होतं बऱ्यापैकी. आजूबाजूच्या भिंतीवर लाकडी रॅक्स मध्ये फ्रेम्स ठेवलेल्या होत्या. दुकानात अलीकडे छोटस काउंटर आणि पुढे ७-८ टेबल्स आणि त्याच्याभवती खुर्च्या. एखाद्या कम्पनित मुलाखतीला आलोय कि काय वाटायला लागलं. कारण आम्ही आत गेल्यावर त्यांनी आम्हला एका टेबलाजवळच्या खुर्च्यांवर बसायला सांगितलं आणि आमचा माणुस येईलच म्हणे बोलायला. अरे भाऊ त्यात काय बोलायचं असतं नक्की?


म्हटलं अरे दादा आम्हाला फ्रेम बघायची आहे चष्मा करायला तर म्हणे बसा हो. १० मिनिट वाट बघावी लागली तर ज्युनिअर चष्मेवाल्याने त्याला कसा चष्मा नकोय आणि आपण घरी जाऊ ह्यावर आमची शाळा घेतली. शेवटी एक पोरगेलासा इसम आमच्याशी बोलायला आला आणि म्हणाला तुम्ही फ्रेम पसन्त केली का एखादी? म्हटलं आम्हाला सांगितलंच नव्हतं तर तो आमच्याकडे "कौन है ये लोग? कहासे आते है ये लोग?" वाला लूक देऊन पाहायला लागला. पटकन उठून ज्युनिअर चष्मेवाल्यासाठी आवडेल अशी फ्रेम सिनियर चष्मेवाल्यानी ठरवली. माझा काहीच वरचष्मा नाहीये म्हटलं ना!!

आता फ्रेम घेतल्यावर झालं आता घरी जायचं असं वाटून ज्युनिअर चष्मेवाले खुश झाले. लेकिन पिक्चर अभी बाकी था. मग त्या पोरगेलेश्या इसमाने आम्हाला  पुन्हा त्याच टेबल खुर्च्यांवर नेले. त्याच्याजवळ असलेल्या वेगवेगळ्या उपकरणांनी त्याने आधीची फ्रेम आणि नवीन फ्रेम तपासली. नवीन फ्रेम तीन चार वेळा चिरंजीवांना घालायला लावून कानाच्या मागे नीट बसली आहे का? नाकावर व्यवस्थित आहे का? अँगल नीट आहे का वगैरे चेक केलं. काचा कश्या हव्यात., अश्या घ्या तश्या नका घेऊ वगैरे वगैरे. हे सगळे सोपस्कार करून तो म्हणाला बसा थोडा वेळ मी आलोच. एव्हाना तासभर होऊन गेला होता.

पुन्हा चिरंजीवांनी औरंगाबादलाच चष्मा घेणं कसं योग्य आहे ह्यावर आमची शाळा घेतली. तेवढयात एक आजोबा तिथे आले ज्यांना इंग्लिश बोललं तर चालेल का विचारल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला "नाही" म्हणाले त्याला तोड नव्हती. पुन्हा त्यांनी वेगवेगळे कागदपत्र आमच्याकडून भरून घेतले आणि स्वतः पण भरले. घर खरेदीला गेल्याचा फील आला हो.

दोन तासांनी आम्हाला चष्मा कसा तयार होईल ह्याचा साक्षात्कार झाला. चष्मा कधी मिळेल विचारल्यावर "एक महिन्याने" असं जेव्हा आजोबा म्हणाले तेव्हा चक्क सिनियर चष्मेवाल्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. एकंदर डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायला एक महिना आणि चष्मा मिळायला एक महिना असं मिळून चिरंजीवाचा डोळ्यांचा नम्बर नक्की काय होईल ह्याविषयावर चक्क आम्हा दोघांचं एकमत झालं.

माझ्या सहनशक्तीचा अंत पहिल्या दहा मिनिटातच झाला होता हे वेगळं सांगायला नकोच!

चष्मा दुरुस्ती

तर कसाबसा चष्मा महिन्याभराने मिळाला आणि त्यानंतर चिरंजीवांना तो पंधरा दिवसातच ढिला व्हायला लागला. त्याला म्हटलं चल जाऊ आपण नीट करून आणायला तर मागच्या अनुभवावरून शहाणा होत नाही म्हणाला आणि पुन्हा त्याचं आजकालचे पालुपद त्याच्याजवळ होतेच "मॉल मध्ये गेलं कि तू खूप दुकानांमध्ये जातेस".

मग मनाची तयारी करून आम्ही पुन्हा त्याच दुकानात गेलो. मी गेल्या गेल्या काउंटर मागच्या माणसाला नेहमीप्रमाणे इंग्लिश बोललं तर चालेल का असं विचारल्यावर त्याच "नाही" म्हणजे " आ गये मुह उठाके" वाटलं. मग मी मोडक्यातोडक्या जर्मन मध्ये "चष्मा नीट करून देताल का प्लिज" विचारलं. प्लिज ह्या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे इथे.
तर तो "तुमचा आहे का चष्मा?"
मी "नाही माझ्या मुलाचा आहे."
तो "चष्म्यातला मुलगा कुठंय?"
मी "मुलगा कशाला पाहिजे? चष्मा नीट करून द्या ना प्लिज!"

ह्यावर त्याने चष्मा नीट करायला ज्याचा चष्मा आहे तो माणूस कसा गरजेचा असतो ह्यावर माझी जर्मन भाषेत यथोचित शाळा घेतली आणि चडफडत चष्म्याचे स्क्रू टाईट केले. मग जवळच असलेल्या छोट्या बेसिन मधील दोन प्रकारच्या लिक्विड्स मध्ये दोन वेळा चष्मा बुडवून स्वच्छ करूनच माझ्या जवळ दिला. निघतांना पुढच्या वेळी चष्म्यामधील मुलाला नक्की घेऊन या हि तंबी दिली!

आणि सिनिअर चष्मेवाल्यानी हे सगळं पाहून "औरंगाबादलाच गेल्यावर माझा चष्मा करूयात" असं म्हटल्यामुळे माझ्या डोक्यावरचा मणामणाचा भीतीचा चष्मा उतरला!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 



Featured post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

सौंदर्य


इथे मेट्रोने प्रवास करताना दरवेळी एक से एक अनुभव येतात. त्यातले काही अगदी न विसरता येण्यासारखे असतात. 


आता परवाच किराणा सामान आणायला इंडियन स्टोअरला निघाले होते. माझ्यासमोरच्या सीटवर एक मूर्तिमंत कि काय म्हणतात ते सौंदर्य बसलेलं होतं. नजर हटतच नव्हती चेहऱ्यावरून. अत्यंत अप्रतिम अशा केशरचनेत बांधलेले केस, रेखीव भुवया आणि बोलके डोळे, चाफेकळी नाक, जबरदस्त फीचर्स होते. चेहऱ्याला हलकासा मेकअप. अगदी मेंटेन्ड बांधा आणि तिला शोभेल असा पोशाख. गळ्यात मोत्याची नाजुकशी माळ, कानात मोती, हातात त्याच मोत्यांचे ब्रेसलेट. मंद अशा अप्रतिम परम्युमचा दरवळत असलेला सुगंध. माझं हे सगळं निरीक्षण चालू असताना तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, ओशाळले ना मी. पण सावरून बसत तिला स्माईल दिली. तिने दिलेली दिलखेचक स्माईल मी विसरूच शकत नाही. तितक्यात त्या सौंदर्यवतीचे स्टेशन आले आणि मला चक्क बाय करून ती निघूनही गेली. 


मनात आलं हिच्या वयाची होईपर्यंत मी जगले तरी खूप झालं.... ८० वर्षांच्या आज्जी होत्या त्या!


ह्या आज्जीना पाहून माझ्या आजी (आईची आई) आणि आजीसासूबाई आठवल्या. दोघीही इतक्या सुंदर आणि सोज्ज्वळ दिसायच्या ना कि बघतच राहावं. 


आजीसासूबाई एकदम उंचापुऱ्या, सडसडीत, गोऱ्यापान. कोणत्याही रंगाचे नऊवार इतकी मस्त दिसायची ना त्यांना. मी लहान असतांना रोज त्या मंदिरात जायच्या तेव्हा त्यांना बघायचे. चापुनचोपुन नेसलेली नऊवार, हातात बांगड्या, कपाळावर कुंकू, छानसा अंबाडा, कधीकधी त्यावर लावलेलं एखादं फुल. 


माझी आजी म्हणजे पुलंच्या भाषेतली सुबक ठेंगणी. ती जेव्हा सकाळी तिची वेणीफणी करायची तेव्हा मला तिला बघायला फार आवडायचं. तिचा तो स्पेशल डबा ज्यात तिची फणी, आरसा, कुंकू, मेण वगैरे असायचं. छान अंबाडा घालून त्यात आकडे वगैरे लावून झालं की कपाळावर मेण लावून अप्रतिम गोल गरगरीत कुंकू रेखायची. तिच्या चेहऱ्यात फार गोडवा होता. 


दोघींच्याही चेहऱ्यावरचे शांत आणि सात्विक भाव जसं कि देव्हाऱ्यातली समईच जणु! 


तशी सौंदर्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलतच असते त्यामुळेच सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यातच असतं म्हणतात हो ना?? पण हे आज्जी लोकांचं सात्विक सौंदर्य बघायला नजर मात्र नातीचीच हवी हं!!



सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

आशिर्वाद

                                                          
        त्या दिवशी मोदक करायला घ्यायच्या आधी हात आपसूक फोनकडे गेला. आईला फोन लावला तर वडील म्हणाले ती गणपती मंदिरात गेलीय. मला सांग तुझं काय काम आहे तिच्याकडे. मी म्हट्लं " काही नाही मोदकासाठी किती रवा घ्यायचा ते विचारायचं होतं तिला." तर हसायला लागले आणि म्हणाले कि ती आल्यावर सांगतो तिला फोन करायला.

       दरवर्षी मोदक केलेले असतात तरीही आईला विचारून केल्यावर एक वेगळाच आत्मविश्वास येतो कि अजिबात बिघडणार नाहीत. यथावकाश रवा भिजवला, सारण बनवलं, मोदक केले आणि आईचा फोन आला.

"झाले का ग मोदक? बरोबर घेतलास कि रवा, मोहन घातलस ना?" वगैरे वगैरे.

       तिकडे म्हणजे पुण्यात होते तेव्हा प्रत्येक सणाला सासूबाई सोबत असायच्याच. एखाद्या विद्यार्थिनीप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच केलेली असायची त्यामुळे बिघडण्याचा कधी प्रश्नच आला नाही. पण इथे आल्यापासून सणावाराला आईला नाहीतर सासूबाईंना हमखास फोन होतोच. ४-५ लोकांसाठी पुरण किती घालायचं, पंचामृतामध्ये चिंच गुळाचं प्रमाण किती, एक नाही दहा. एकदा तर मी माझा मावशीला पुरणाला चटका देताना फोन करून हैराण केलं होतं आणि तिनेही तिच्याकडे गौरीजेवणाची गडबड असताना मला सगळ नीट समजावून सांगितलं. खरंतर सगळं प्रमाण माहित असतं, सगळे पदार्थ दरवर्षी बनवलेले असतात पण त्यांना विचारून केल्यावर खरंच आत्मविश्वास येतो.


      लहानपणीपासून वाटायचं कि आशिर्वाद म्हणजे नेमकं काय? आता विचार केला कि वाटतं कि मोदकासाठी आईला फोन केल्यावर तिने दिलेला आत्मविश्वास आणि बिघडणार नाही ह्याची दिलेली शाश्वती, पुरण करताना सासुबाईंनी नीट समजावून सांगितलेलं प्रमाण आणि कृती, शेअर मार्केट मध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट वर वडलांनी दिलेले सल्ले आणि शेअर मार्केट संबंधी नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिलेली प्रेरणा, कार शिकत असताना सासऱ्यांनी दिलेले धडे आणि दिलेलं प्रोत्साहन, नवीनच लिहायला सुरुवात केल्यावर दादाने दिलेली शाबासकी आणि त्याचे "लिहीत रहा" म्हणणे, ह्यालाच मोठ्यांचे आशिर्वाद म्हणत असतील! हो ना?   


PC Google


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक







गाणं

एखादया दिवशी नाही का सारखं सारखं एकच एक गाणं डोक्यात राहतं पण त्याचे बोल आठवत नाहीत किंवा कोणत्या सिनेमा मधलं आहे ते आठवत नाही. अगदी तसंच आज सकाळपासून एक गाणं सारखं मनात येत होतं. कुठे ऐकलं तेही आठवत नव्हतं. पण राहुन राहुन मनात तेच तीन शब्द पिंगा घालत होते. बरं पुढचे बोलही आठवत नव्हते कि त्या गाण्याचा सिनेमा.

सकाळी स्वयंपाक करायला लागल्यापासून ते आत्ता थोड्यावेळापुर्वी चारचा चहा करण्यापर्यंत फक्त तीन शब्द, तेही तालासुरात. विचार करून डोकं बधिर झालं आणि मी त्या गाण्याचा शोध लावायला अधीर झाले पण ते गाणं काही दाद देत नव्हतं. त्या तीन शब्दांनंतरची एखादी ओळ तर आठवावी; पण शपथ. जीव खाल्ला त्या गाण्याने.

मी चार वाजायच्या थोडं आधी चहा टाकला आणि सासूबाईंसोबत टीव्ही पाहत बसले तर अचानक "युरेका" झाला ना! बरोब्बर ४ वाजता टीव्हीवर ते तीन शब्द असलेलं गाणं सुरु झालं एकदाचं! और फिर मुझे समज में आया की अर्रर्रर्र हि तर मराठी मालिका आणि त्याच मालिकेच्या शीर्षक गीतातले तीन शब्द माझ्या डोक्यात (गेलेले) होते सकाळपासून. भारतीय वेळेनुसार इथे सगळ्या मराठी मालिका दिसतात.

ओळखलं का तुम्ही?
.
.
नाही?
.
.
सांगूनच टाकते आता
.
.
"तुझ्यात जीव रंगला!"

आता पुढचं गाणं मला पुर्ण पाठच होईल बहुतेक थोड्या दिवसात!


#मराठी_मालिका


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

गर्दी

मागच्या शनिवारी दुपारी बाहेर निघालो असताना गेटच्या बाहेर पडलो अन समोर हे एवढी मोठी गर्दी. आपल्याकडे गणपतीत असते तशी किंवा दिवाळीच्या खरेदीला असते तशी नाही काही. पण इथल्या हिशोबाने गर्दीच. ती गर्दी बघून इथे नवीनच आल्यावरचा किस्सा आठवला.

इथे नवीनच राहायला आल्यावर असच एके शनिवारी फिरायला बाहेर पडलो होतो आणि तर बाहेरच्या प्रचंड मोठ्या गर्दीने भांबावून गेलो. तसे आमच्या गेटच्या उजव्या बाजूलाच एक छोटा बार आणि रस्ता क्रॉस करून समोरच जरा मोठा बार आहे. ह्या दोन्ही बारच्या समोर मोठमोठे घोळके करून लोक प्रचंड थंडीत भयंकर थंड अशा बिअरचा आस्वाद घेत होते. सगळ्या वयोगटातले लोक दिसत होते. लहान मुले सोबत असेलेले लोक बारमध्ये जाता आमच्या गेटसमोरून पुढे जात होते. बाकी आजोबा, पणजोबा, आज्जी, पणजी, काका, काकु वगैरे प्रकारचे लोक बारसमोर निवांत टाईमपास करत होते. आमच्या घराच्या जवळपास असलेले छोटे छोटे रेस्टारंट्स,बेकऱ्या गर्दीने अगदी फुलून गेले होते.

इथे आल्यावर आमच्या समोरच्या रस्त्यावर इतके लोक मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे माझी वाचाच बसली. सवय नाही हो गर्दी वगैरे बघायची. सगळ्या ट्राम्स, बसेस आणि अंडरग्राउंड ट्रेन्स मधून लोक एका विशिष्ट दिशेला निघाले होते. सगळ्यांच्या पोशाखात एक खास निळ्या रंगातील गोष्ट होती. टीशर्ट, स्कार्फ, किंवा टोपी ह्यातलं काहीतरी त्या खास रंगाचं होत. तशाच प्रकारचे झेंडे सुद्धा होते लोकांच्या हातात. मला काहीच समजेना नक्की काय चाललंय ते. वाटलं नक्कीच कुठल्या तरी नेत्याची सभा आहे.

गर्दी ज्या दिशेला चालली होती आम्ही पण तिकडेच निघालो. हळुहळू प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसायला लागला. नक्की पन्नासेक गाड्या होत्या पोलिसांच्या. शेकडो पोलीस रस्त्यावर फिरत होते. दोन चार ऍम्ब्युलन्स, एक दोन फायरब्रिगेडच्या गाड्या. आता मात्र माझी खात्रीच झाली कि सभाच आहे म्हणून. तसं मी ह्यांना बोलून पण दाखवलं. पण म्हटलं सभा असेल तर सगळीकडे प्रचंड प्रमाणात फ्लेक्स लावलेले हवे होते. सभेच्या जागी नेत्यांचे कटाऊट्स वगैरे. म्हटलं छे! काय हे लोक. एवढी गर्दी खेचण्याचे सामर्थ्य असलेल्या नेत्याचा साधा एक फ्लेक्स नाही. भारतीय मनाला पटतच नव्हतं ना!

आम्ही आपलं गर्दी जाईल तिकडे चाललो होतो. बरं एवढी गर्दी होती पण ना गोंधळ, ना गोंगाट, ना धक्काबुक्की, ना किळसवाणे स्पर्श, ना अरेरावी. असं कुठं असतंय होय? मला वाटलं मी नक्कीच स्वप्न पाहतेय. पुढे गेल्यावर एक मोठ्ठा साक्षात्कार झाला. स्टेडियम आहे हो इथे. फुटबॉलची मॅच होती त्या दिवशी! त्यामुळेच एवढी प्रचंड गर्दी, एवढा पोलीस बंदोबस्त!

फुटबॉल धर्म आहे इथला आणि त्यात १८६० म्युनिच नावाच्या टीमची मॅच म्हणजे काही विचारायलाच नको. कोणत्या टीमसोबत मॅच होती तेही कळलं नाही कारण त्यांचे फॅन्स नसल्यातच जमा. मॅच संपल्यावर १८६० टीम जिंकली किंवा हरली तरीही पोलिसांची गरज पडते इथे. आम्ही अनुभवलं आहे. मॅच सम्पली कि पुन्हा सगळी गर्दी आमच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर बिअरच्या बाटल्या घेऊन फिरत असते. १८६० जिंकली असेल तर उत्साह बघण्यासारखा असतो गर्दीचा. एखादा घोळका मस्त गाणी म्हणतो. कोणीतरी फ्लॅशमॉब सुरु करतात. रात्री उशिरापर्यंत त्यांचं सेलिब्रेशन चालू असतं. एरवी अगदी शिस्तीत वावरणारे लोक त्या गर्दीचा हिस्सा झाले कि ट्राम्सच्या, बसेसच्या समोरच फतकल मारून बसतात नाहीतर रस्त्यावर बाटल्या फोडतात. पोलीस मग समज देऊन लोकांना रस्त्यावरून बाजूला करतात. तोपर्यंत ट्राम किंवा बस जागची हालत नाही त्यामुळे ट्रॅफिक जॅम. स्टेडियम आमच्या घरापासून साधारण एखादा किलोमीटर असेल पण गोल झाला कि तिथल्या जल्लोषाचा आवाज थेट घरात येतो. रात्रीच्या वेळी मॅच असेल तर तिथले फ्लड लाईट्स दिसतात घरातून.

असं काही इथे होत असेल ह्यावर विश्वासच बसत नव्हता. आम्हाला हे सगळं बघून धक्क्यावर धक्के बसत होते. ह्या धक्क्यामुळे आमची अवस्था जाना था जपान पोहोच गये चीन झाली. जायचं होतं एका दुकानात गेलो तिसऱ्याच दुकानात. घरी आलो तर तोच गोंधळ. रात्री उशिरापर्यंत गाणे, गोंगाट चालू होता. जिथे रात्री सात नंतर टाचणी पडली तरी आवाज होऊन शेजारच्या लोकांना त्याही आवाजाचा त्रास होईल असं वाटत होतं तिथे असा गोंधळ बघून जाम मजा वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी ठिकठिकाणी बिअरच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. प्रचंड प्रमाणात सिगरेट्सची थोटकं सगळीकडे विखुरलेले होती.  

पण ही मॅच अधूनमधून असावीच असं वाटत राहतं कारण उत्साहाने गर्दी करणारे लोक आजूबाजूला तेव्हाच दिसतात आणि कसं का होईना आपण माणसातच राहतो ह्याची म्यूनिचमधे खात्री पटते!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

PC Google




वाचकांना आवडलेले काही