मुलाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असलेली ऑगस्टमधली एक निवांत सकाळ. दर २-४ दिवसांनी पोहे खाऊनही, “किती दिवस झाले पोहे केलेच नाही तू, आज नाश्त्याला पोहेच कर” असं त्याने म्हणल्यावर तुम्ही पोह्याची तयारी करायला घेता.
होम ऑफिसवाले त्यांच्या मिटींगमधे व्यग्र असतात आणि चिरंजीव स्नानाला गेलेले असतात. तुम्ही कांदा, बटाटा, मिरच्या, कोथिंबीर चिरून घेता, पोहे स्वच्छ धुवून घेता (पोह्यांची कृती सांगत नाहीये, जरा सब्र किजीये!) आणि कढई हॉटप्लेटवर तापायला ठेवता. खालच्या कपाटातून अर्धा लिटर तेलाची काचेची बाटली काढता आणि कढईत तेल टाकता.
तेलाच्या बाटलीचं झाकण व्यवस्थित लावून ती तुम्ही खालच्या कपाटाचं दार उघडून ठेवतंच असता की ती हातातून सटकून दणकन तुमच्या डाव्या पायाच्या तिसऱ्या बोटावर आपटते! एक जोरदार सणक तुमच्या डोक्यात जाते आणि तुम्हाला चक्कर येते. उन्हाळा असल्यामुळे पायात चप्पल नसते त्यामुळे त्या दणकट बाटलीने तुमच्या पायाच्या बोटाच्या पहिल्या पेराचा बऱ्यापैकी चेंदामेंदा केलेला असतो.
पण हे सगळं कळायची शक्तीच तुमच्यात उरत नाही. एक किंकाळी फोडून तुम्ही तश्याच मटकन खाली बसता. कढईत तेल टाकल्यामुळे सगळीकडे धूर झालेला असतो, स्वयंपाकघरातलं स्मोक डिटेक्टर एव्हाना कोकलायला लागलेलं असतं, पण घरातल्या माणसांना काहीच पत्ता नसतो.
त्यांना तुमची किंकाळी ऐकून वाटतं काहीतरी झालं असेल. नेहमीचं आहे हिचं. पण ते दोघे धुराचा वास आल्यावर आणि स्मोक डिटेक्टरचा आवाज ऐकून भानावर येऊन नक्की काय झालंय ते पाहायला येतात.
तुम्ही शुद्धी बेशुद्धीच्या अवस्थेत फ्रिजला टेकून बसलेल्या असता. स्नानाला गेलेला आणि मिटिंग अर्धवट सोडून आलेला अशी दोन माणसं येऊन “अगं काय झालंय? अशी काय बसलीयेस?“ असं ओरडत पटापट खिडक्या उघडतात, हॉटप्लेट बंद करून कढई बाजूला ठेवतात, स्मोक डिटेक्टरचं थोबाड बंद करतात. मुलगा “आई आई आई" करतोय, “हे” “अगं तू ठीक आहेस ना?” विचारतायेत. तुम्हाला काही सूचतंच नसतं. नुसता सावळा गोंधळ चाललेला असतो.
आपली किंकाळी म्हणजे त्या “लांडगा आला रे आला” गोष्टी सारखी झालीये ह्याची तुम्हाला मनोमन जाणीव होते. हे म्हणजे असं आहे ना की “इथे पारिस्थिती काय्ये? आणि आपले विचार काय्येत?“
कसबसं पाणी पिऊन तुम्ही त्यांना सांगता की तुमच्या पायाच्या बोटावर बाटली पडलीये ते. (डोकं जागेवर नसतानाही तुमच्या डोक्यात विचार येतो की इतक्या विनोदी पद्धतीने आपल्यालाच काहीतरी होऊ शकतं.) ते ऐकून त्या दोघांना विश्वासच बसत नाही की असं काहीतरी होऊ शकतं म्हणून. पुन्हा प्रश्नांच्या फैरी झडतात. बाटली अशी कशी पडली? तुझं लक्ष कुठं होतं? ती खाली कशाला ठेवायची लगे? इत्यादी इत्यादी.
लगोलग तुमची वरात इमर्जन्सी क्लीनिकला निघते. बोट नुसतं ठसठसत असतं आणि तिथले डॉक्टर म्हणतात “काही नाही कदाचित मुकामार असेल किंवा हेअरलाईन फ्रॅक्चर असेल, होईल बरं!” वेदनाशामक गोळी आणि सुजलेल्या पायाला लावायला एक जेल देऊन ते तुमची बोळवण करतात.
एव्हाना तुमचा कडेलोट झालेला असतो. घरी येऊन लंगडत लंगडत तुम्ही लेकाच्या मदतीने आईने दिलेली आंबेहळद शोधता, ती रटरट शिजवता आणि दुखऱ्या भागावर लेप लावता! तेव्हा कुठे जरा आराम पडायला लागतो. आणि फक्त आंबेहळदीने तुम्ही पंधरा दिवसांत पाय आणि बोट एकदम जागेवर आणता! आता “नुसता वेंधळेपणा, वीस वर्ष होत आली लग्नाला तरी पोरीचा बालिशपणा चालूच!” असा डायलॉग कोणीतरी नक्कीच फेकून मारेल ह्याची तुम्हाला जाणीव होते.
पण “लंगडी घालत फिरणारी बाई” ही उपाधी तुम्हाला चिकटते ती परवा परवा बदलते कारण बऱ्यापैकी अशाच सोहळ्यात म्हणजे मुलगा स्नानाला गेल्यावर आणि “हे" बाहेर गेलेले असताना तुम्ही नवीन आणलेल्या धारदार सुरीचे उदघाटन करता आणि जाडाभरडा भोपळा चिरताना बोटात सूरी खुपसून घेता. त्यामुळे “बोटात सूरी खुपसून घेणारी बाई" ही नवीन उपाधी तुम्हाला मिळते!
जवळच्या इमर्जन्सी क्लिनिकवाले छान ओळखायला लागलेत हो मला!!
#माझी_म्यूनिक_डायरी