गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

गोडमट्टक

इथे थंडी पडायला लागली आणि क्रिसमस जवळ आला की ठिकठिकाणी भाजलेल्या सुकामेव्याच्या टपऱ्या लागायला लागतात. त्यातल्या त्यात भाजके बदाम जास्त असतात. 

आम्ही म्युनिकमध्ये आल्यानंतरच्या पहिल्या क्रिसमसच्या आधी फिरायला निघालो होतो. तेव्हा माझा उत्साह हाडं गोठवणाऱ्या थंडीतही वाखाणण्याजोगा होता (हे वाक्य लिहिल्यावर माझाच स्वतःवरच विश्वास बसत नाहीये)! 

तर, अश्या उत्साहात मी फिरत होते आणि माझ्या नजरेस ही बदामाची टपरी पडली. ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात मी टपरीजवळ गेले आणि अर्थातच आत असलेल्या जर्मन आज्जींनी माझ्याकडे थंड नजरेने पाहिलं. माझ्या उत्साहाची दाणादाण उडवत आज्जींनी प्रश्न विचारला की काय पाहिजे? मी आवाजात ओढूनताणून उत्साह  आणत समोर दिसणारे बदाम पाहिजे असं सांगितलं. 

आज्जींनी मस्तपैकी एका कागदी पुड्यात गरम गरम बदाम दिले. मला एकदम आपल्याकडे हातगाडीवर मिळणारे चणेफुटाणे आठवले. पटकन पैसे देऊन मी एक बदाम तोंडात टाकला आणि हाय रे कर्मा तो बदाम गोडमट्टक होता. मी भस्सकन त्या आज्जींना म्हणाले “अहो हे बदाम तर गोड आहेत”! जर्मन आज्जींनी मी परग्रहवासी असल्यासारखा माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्या त्यांच्या कामाला लागल्या. 

भाजलेले बदाम म्हणजे आपल्याकडे हातगाडीवर मिळणाऱ्या खाऱ्या शेंगदाण्यांसारखेच असणार, हेच डोक्यात ठेऊन बदाम घेतले! बरं पाट्या वाचणे किंवा पुड्यांवरचे नावं वाचणे वगैरे माझ्या  खिजगणणतीतही नव्हतं. पुण्यात राहत असतानाची सवय अन दुसरं काय! त्या टपरीवरच्या पाटीवर शुद्ध जर्मनीमध्ये लिहिलेलं होतं की शर्करावगुंठीत भाजलेले बदाम मिळतील म्हणून. इथल्या लोकांना खूपच आवडतात म्हणे. 

मग काय, पूर्ण क्रिसमस मार्केट फिरत मी एकटीच ते गोडमट्टक बदाम कसेबसे संपवायचा प्रयत्न करत होते. बदाम गोड आहेत म्हणल्याम्हणल्या ज्युनिअर आणि सिनिअर पुराणिकांनी त्यांच्याकडे आणि माझ्याकडेही सपशेल दुर्लक्ष केलं!

अगदी हीच गत पॉपकॉर्न खरेदीला झाली होती पहील्यांदा. पॉपकॉर्नच्या पुड्यावरचं ”गोड पॉपकॉर्न” असं वाचण्याची तसदीही न घेता मी पन्नास सेंटला मोठ्ठा पुडा मिळतोय ह्या आनंदात तो उचलला. घरी येऊन उत्साहात पुडा फोडून पॉपकॉर्न तोंडात टाकला आणि गोडमट्टक पॉपकॉर्न खाऊन वाचाच बसली माझी! पॉपकॉर्न गोड असूच शकत नाही, ह्या जन्मभर बाळगलेल्या गोड गैरसमजाचा गोड पॉपकॉर्नने घात केला. वर, मुलाने शाळा घेतली ती वेगळीच, “आई त्या पुड्यावर स्पष्ट लिहिलंय गोड पोपोकॉर्न म्हणून, तू न वाचताच घेऊन आलीस!“ 

एकदा तर लाल सिमला मिरची घातलेलं आईस्क्रीम बघितलं तेव्हापासून इथले खाण्याचे पदार्थ घेण्याची भीतीच बसलीये. न जाणो गोड वेफर्स बनवले ह्या लोकांनी तर!!


#माझी_म्युनिक_डायरी

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

चालढकल

तुम्हाला वाटत असतं की चला ह्यावर्षी शाळेची सुट्टी दिवाळीत आलीये तर मुलाकडून थोडे कामं करून घेऊ, चांगला तावडीत सापडलाय! पण जेव्हा तुम्ही तुमच्या टीनएजरला कोणतंही काम सांगता तेव्हा तो जास्तीत जास्त चालढकल कशी करता येईल ह्याचा नमुना पेश करतो आणि वर म्हणतो की आई बालमजुरी बेकायदेशीर आहे जर्मनीत! 🙄 

उदाहरणच द्यायचं झालं तर.. तसे बरेच उदाहरणं आहेत पण वानगीदाखल काही... 

(हजार वेळा आवाज देऊनही ऐकून न ऐकलं केल्यावर जेव्हा तुम्ही त्याला ओरडून ”अर्रे" म्हणता तेव्हा)

अर्रे त्या खिडक्यांच्या काचा पुसून घे - काचा चकाचक दिसतायेत एकदम! तरीही पुसायच्या असतील तर मी थोडा वेळ अभ्यास करून मग पुसतो! (वस्तू कितीही खराब झाल्या तरी ह्याला चकाचकच दिसतात.) 

अर्रे तेवढा कचरा टाकून ये - सारखा सारखा काय कचरा टाकावा लागतो? आताच टाकणं गरजेचं आहे का? मी नंतर टाकतो! (लिफ्टने फक्त खाली जावं लागतं कचरा टाकायला तरी...)

अर्रे आज व्हॅक्यूम करून घे बरं घर - आई तू कालच घर झाडलं आहेस ना, मग लगेच आज व्हॅक्यूम कशाला? उद्या करतो! (उद्या कधी उगवत नसतो असं माझे वडील म्हणायचे.)

अर्रे दूध घेऊन ये बरं आज - इतकं दूध कसं काय लागतं आपल्याला? (आता एक गायच विकत घेऊन टाकावी, कसं?)

अर्रे तेवढ्या संपलेल्या तेलाच्या बाटल्या समोरच्या बिनमध्ये टाकून ये - आई इतकं तेल वापरतेस तू? अजून २-४ बाटल्या साचल्या की टाकून येतो, सध्या राहू दे! (जसं काही मीच तेलाच्या बाटल्या रिचवते.)

अर्रे आज चहा टाक बरं - आई रोज चहा पिऊ नये आणि मला जरा प्रोजेक्ट करायचा आहे पुढच्या वेळी करतो हं चहा! (जसं काही मीच  एकटी चहाबाज आहे घरात.) 

अर्रे तेवढा डिशवॉशर लाव रे आज, मला काम आहे - अं, आई! माझा मित्राबरोबर कॉल असतांनाच तुला कामं सांगायची असतात ना! थोड्या वेळानी लावतो! (नशीब असं नाही म्हणाला, किती वेळा स्वैपाक करतेस आई?)

अर्रे वॉशिंगमशीन लाव आणि कपडे वाळत घाल आज - आईईई  प्लिजच आता, मी लायब्ररीत चाललोय अभ्यासाला, उद्या लावतो! 

पण त्याने कितीही नन्नाचा सूर लावला तरी मी सोडते थोडीच, कामं करूनच घेते. अच्छी आदतें मुझेही तो सिखानी है. मग उद्या त्याच्या बायकोने म्हणायला नको की आईने काहीच शिकवलं नाही म्हणून! 🙊 


#माझी_म्युनिक_डायरी 



सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

घासाघीस

आज भारतीय किराणा सामान आणायला म्हणून जरा लवकरच घरातून बाहेर पडले तर बसच अंमळ उशिरा आली! पण बसचालक काकांना बघून आश्चर्याचा धक्काच बसला; काका टरबन घातलेले, दाढी राखलेले शीख होते. त्यांना बघून आपसूकच नमस्ते म्हणाले. त्यांनीही हसून नमस्ते केलं. भारतीय दुकानात गेल्यावर तर आज भारतात गेलोय की काय असं वाटलं! काकांनी सोनू निगमच्या आवाजातला गायत्री मंत्र लावला होता. एकदम दैवी संकेत वगैरे!

मग मी म्हणलं आज भारतीयच बननेका. आज भाज्यांमध्ये घासाघीस करूच, कसं! “ये कोथिंबीर देड यूरोकी एक युरोमें लगाओ भैय्या, मैं हमेशा आपकेही दुकानमें भाज्या लेती हूं ना और हरी मिर्च भी पचास सेंट में दे दो, और जरा कडीपत्ता डालदो ऊसमें, आपका बोहनी का टाईम है!” दुकानवाल्या काकांनाही भारतात असल्यासारखं वाटायला पाहिजे किनई! 

मग त्यांनीही “बोहनीका टाइम बोला आपने इसलिये देता हुं” म्हणून दिलं कमी भावात(इमोशनल हो गये अंकल). पण इथे कोणी कडीपत्ता फुकट देईल तर शपथ! त्याला चांगले साडेचार युरो मोजावे लागतात. 

बिल देऊन निघावं म्हणलं तर काका म्हणाले “चाय लेके ही जाईये अब, मैं बना रहा हूँ”. मी लगेच “हाँ हाँ क्यूँ नहीं क्यूँ नहीं” पण मनात म्हणलं “अब क्या बच्ची की जान लोगे क्या अंकल?” भाज्यांचा भाव कमी केला, आता चहा देताय. खरोखर भारतात आल्यासारखं वाटलं! 


#माझी_म्युनिक_डायरी

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

डिस्को दांडिया

माणसाला (पक्षी: मला) कोणत्या गोष्टीवरून काय आठवेल हे काही सांगता येत नाही. 

तर त्याचं झालं असं की परवा ऑक्टोबर फेस्टला गेलो होतो. तिथली विद्युत रोषणाई पाहुन मला आमच्या छ. संभाजीनगरची नवरात्रातली कर्णपुऱ्याची यात्रा आठवली. लहानपणी तिथे गेल्यावर फार छान वाटायचं! सध्याचं यात्रेचं स्वरूप माहित नाही खरं, कित्येक वर्ष झाली यात्रेला जाऊन. 

कर्णपुऱ्याची जत्रा आठवली त्यावरून संभाजीनगरातले नवरात्र आणि दांडिया आठवले. दांडिया किंवा मराठीत ज्याला टिपऱ्या खेळणे म्हणतात; त्याविषयीची एक मनात खोल दडलेली भीती आठवली!

आम्ही संभाजीनगरात ज्या भागात राहायचो तिथून जवळच एक मंदिर होतं. परंतु ते मंदिर नाल्यापलीकडे असल्यामुळे आम्ही कधी तिथे गेलो नव्हतो. तसे तिथे भजनादी कार्यक्रम चालायचे, त्याचे आवाज अधूनमधून आम्हाला यायचे. पण अचानक एका नवरात्रात तिथल्या लोकांना लाऊडस्पिकर आणि माईकचा शोध लागला आणि तिथूनच आमचं आयुष्य बदललं!

त्या नवरात्रीत तिथे संध्याकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत, फक्त आणि फक्त  “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया" नामक गाणं चालू असायचं. कधीकधी तर वामकुक्षीची वेळ झाली रे झाली की गाणं रिपीट मोडवर सुरु व्हायचं ते संध्याकाळी आरतीपुरतं बंद व्हायचं. त्यांनतर पुन्हा सुरु!

आम्ही १-२ दिवस वाट पाहिली की कधीतरी गाण्यात बदल होईल. “परी हूँ मैं ” किंवा “याद पियाकी आने लगी” वगैरे लागतील. पण छे! पूर्ण नऊ दिवस अहोरात्र फक्त “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया". आमच्या इमारतीतला आबालवृद्धांना कदाचित हे गाणं तोंडपाठ झालं असावं तेव्हा! मला आजही आहे🙄. 

ते वर्ष संपलं. पण हाय रे कर्मा! त्याच्या पूढच्या वर्षीही आमच्यावर त्याच गाण्याचा अत्याचार नवरात्रात चालू होता! अरे ये हो क्या रहा है? असा प्रश्न आम्हा मुलींनाच पडत होता. बाकी इमारतीतील ईतर जनता हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन करत होते ह्याचं उत्तर मला लग्न झाल्यावर मिळालं. काही नाही, उत्तर असं आहे की तिथे आमच्या इमारतीत काम करणाऱ्या मावशी तिकडे राहायच्या आणि त्यांच्या मुली तिथे दांडिया खेळायच्या! कामवाल्या मावशींना कोण दुखावणार! नाही का?

पण आम्हा मुलींना काही चैन पडेना. शेवटी न राहवून आम्ही आमच्या कामवाल्या मावशींच्या मुलीला विचारलंच की बाई तुम्ही सदानकदा हे एकच गाणं का लावता? गाणं बदला ना! तिने जे उत्तर दिलं ते ऐकून आम्ही गडाबडा लोळून हसलो होतो. अर्थात, तिच्यासमोर नाही! ती म्हणाली की “त्यांना सगळ्यांना फक्त ह्या एकाच गाण्यावर दांडिया खेळता येतो! म्हणून ते सगळे दुपारी प्रॅक्टिस दांडियाही ह्याच गाण्यावर खेळतात आणि रात्री मुख्य दांडियाच्या कार्यक्रमालाही ह्याच गाण्यावर दांडिया खेळतात!”

बरं एवढं बोलून ती थांबली नाही तर तिने त्या रात्री दांडीया खेळायचं आमंत्रणही दिलं आम्हाला आणि एवढंच नाही तर रात्री आम्हाला खेचत घेऊनही गेली आणि आम्ही तिथे “ झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया” वर दांडिया खेळतोय 🙄

त्यानंतर नक्कीच अजून १-२ वर्ष फक्त आणि फक्त “झुमेंगे हम, नाचेंगे हम, गायेंगे हम, डिस्को दांडिया” एवढं एकच गाणं त्यांच्याकडे नवरात्रात वाजत असायचं! मी तर इतका धसका घेतलाय ह्या गाण्याचा की बास! कोणी नुसतं डिस्को दांडिया म्हणायचं अवकाश की मला एक सणसणीत... असो. 

अरे कुठे नेऊन ठेवलीये फाल्गुनी पाठक आमची!

रविवार, २३ जून, २०२४

अतरंगी

मध्यंतरी विचार करत होते की उगीच कशाला वेगवेगळ्या फेबू गृपात  राहायचं. कल्टी मारुयात. पण मग लक्षात आलं की हे गृप्स म्हणजे अक्षी “मनोरंजन में कमी नहीं होनी चाहिये” असतात. कशाला सोडायचे, नाही का! 

आता हेच बघा ना, आमच्या म्युनिकच्या भारतीय गृपात ही पोस्ट आलीये. जर्मन गायीचं दुध वापरून आणि त्याच दुधाच्या दह्याचं विरजण वापरून केलेलं दही ”इंडियन कर्ड” नावाखाली २ युरोला चक्क दोन चमचे ह्याप्रमाणात विकायला काढलंय! म्हणजे आता ह्यांच्याकडे म्युनिकमधले भारतीय लोक डबे घेऊन, रांग लावून दही घेणार. आता दोन चमचे दही आणायचं म्हणजे घरून डबा न्यावाच लागेल नई का. अरे नक्की “कौन है ये लोग?” काय आत्मविश्वास आहे राव! ते नाही का काही लोक अपेयपान केल्यावर येणाऱ्या तंद्रीत म्हणतात “गाडी आज भाई चालयेगा" तसंच आहे हे! 

ईथल्या दुकानांमध्ये इतकं दूधदुभतं आहे की विचारायची सोय नाही. पन्नास प्रकारचे दुधं, शंभर प्रकारचे दही, चक्का, चीजच्या प्रकारांची लयलूट, आणि अजून बरंच काही! बरं हे सगळं आपल्या खर्चाच्या आवाक्यात आहे. जिथं २ युरोला नक्की लिटरभराच्या वर दही जवळच्या दुकानात मिळतंय तिथं २ युरोला दोन चमचे दही विकताय तुम्ही. अरे थोडी तर लाज वाटू द्या कि लेको! 

म्युनिकमधल्या अश्या लोकांच्या धंद्याच्या कल्पना वाचून होणारं मनोरंजन काही औरच आहे! त्याला तोड नाही. मागे कोणीतरी पॅरासिटॅमॉलच्या गोळ्या ह्या गृपात विकायला काढल्या होत्या. आता ह्या डोक्यावर पडलेल्यांच्या हे लक्षात येत नाही की कोणी ह्यांना रिपोर्ट केलं तर ४ युरो कमवायच्या नादात ह्यांना किती मोठ्या युरोजचा बांबू लागेल! तरी बरं जर्मनीतल्या कडक नियमांमुळे बांबू लागल्याच्या कहाण्याही ह्याच गृपात येतात तेव्हा हे लोक कुठे दही विकायला गेलेले असतात त्यांनाच माहित. 

कोणी विनापरवाना केटरिंग व्यवसाय करतंय तर कोणी जुने फर्निचर अव्वाच्या सव्वा भावात विकतंय. चारपाच वर्षांपूर्वी एका धन्य ताईने प्लॅस्टिकची वापरलेली चहागाळणी ५ युरोला विकायला ठेवली होती. लो करलो बात!!

अश्याच अतरंगी व्यावसायिक कल्पनांसाठी वाचत रहा #माझी_म्युनिक_डायरी






गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

हवामान वगैरे

दोन आठवड्यांपूर्वी इथे वसंत ऋतू होता. छान उबदार ऊन होतं, अधूनमधून एखादी पावसाची सर येत होती. एखादं हलकं जॅकेट घालून बाहेर फेरफटका मारता येत होता. 

मागच्या आठवड्यात अचानक ऊन तापायला लागलं. उन्हाळा सुरु झालाय का काय? असं वाटायला लागलं. लोक चक्क चड्डी बनियनवर फिरायला लागले. आईस्क्रीमची दुकानं, नदीकाठ, वेगवेगळी उद्यानं गर्दीने ओसंडून वाहायला लागले. 

आणि या आठवड्यात तापमान शून्यापर्यंत गेलं आहे. आज चक्क बर्फ पडतोय. थंडीनी जीव चाललाय. वगैरे वगैरे. ते काहीतरी मीम आहे ना “ वक्त बदल गया, जज्बात बदल गए, हालात बदल गए!” तसं झालंय. 

अरे हवामान आहे की राजकारणी लोक? दर आठवड्यात पक्ष बदलत आहेत! जर्मनीत एक म्हण आहे म्हणे, “There is no such thing as bad weather, only bad clothing." अर्थात मला मॅगी काकूंनीच सांगितलं होतं ह्या म्हणीबद्दल. स्वतःच्या देशातल्या अश्या हवामानाचं किती ते कौतुक! 

जर्मन लोकांना भलत्याच गोष्टीचं कौतुक आहे म्हणा! असो. 


#कसं_जगायचं_कुणी_सांगेल_का_मला 


#माझी_म्युनिक_डायरी






सोमवार, ११ मार्च, २०२४

आम्ही, सुजाण(?) नागरिक आणि पोलिसमामा

तर त्याचं झालं असं की काल आम्ही आमच्या एका सुहृदांसोबत म्युनिकजवळील एका छोट्या गावात त्यांनी घेतलेलं घर बघायला गेलो होतो. 

घराचं बांधकाम आता शेवटच्या टप्प्यात आलंय. रविवार असल्यामुळे कोणी कामगारही काम करत नसतील म्हणून आम्ही दोन्ही कुटुंब निवांत दुपारी तिथे पोहोचलो. आमचे सुहृद अगदी आनंदाने एक एक खोली दाखवत होते. कुठे काय असेल, फर्निचर कसं करणार, कोणती खोली कशी सजवणार हे सगळं सांगत असताना त्या पती पत्नीचा उत्साह ओसंडून वाहत होता. 

आम्ही चौघे निवांत घराविषयी चर्चा करण्यात व्यग्र होतो पण आमची चर्चा संपतच नाहीये हे बघून, आमचे दोन टिनेजर्स आणि छोटी, चर्चेला कंटाळून घराबाहेर जाऊन उभे राहिले. 

आम्ही अगदी जोरदार चर्चा करत होतो,  स्वयंपाकघरात काय कुठे ठेवलं तर किती जागा अडेल वगैरे. तर मैत्रीण म्हणाली की मी टेप आणली आहे आपण माप घेऊन बघूया. मैत्रिणीच्या ह्यांनी स्वयंपाकघराचं माप घ्यायला सुरुवात केली तेवढयात माझं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं तर मला पोलिसांची गाडी दिसली. मनात म्हणलं एवढ्या शांत भागात पोलीस कशाला आले असतील बरं? मी मनातला विचार झटकून पुन्हा चर्चेत सहभागी झाले. 

आणि बाहेरून आवाज यायला लागले “हॅलो, कोणी आहे का घरात?“ अर्थात ते जर्मनमध्ये बोलत होते. आवाज ऐकून आम्ही सगळेच चपापलो आणि दारात येऊन बघतो तर काय, दोन धिप्पाड पोलीस! आम्ही सगळे बुचकळ्यात पडलो ना! 

त्या दोघांनी प्रश्नाच्या फैरी झाडायला सुरुवात केली, तेही जर्मनमध्ये. पोलीस, त्यातल्या त्यात अत्यंत धिप्पाड पोलीस, अन वरून फाडफाड जर्मनमध्ये प्रश्नावर प्रश्न विचारत होते. आमची जरा तंतरलीच. तरीही त्यांच्या बोलण्यातला एक प्रश्न कसाबसा कळला आणि तो ऐकून हसावं की रडावं तेच कळेना, म्हणे “ही घरफोडी आहे का?“ अरे भावा, तू कधी खरंच एखादा चोर चोरी करत असेल तर त्याला जाऊन असं विचारशील का?

बरं ते जाऊदे, आम्ही कुठल्या अंगाने अट्टल चोर दिसतोय जे सहकुटुंब हसत हसत, जोरदार चर्चा करत स्वतःच्या घरात घरफोडी करतोय! 

मग मला पोलिसच्या गाडीचा उलगडा झाला. पोलीस चक्क आमची चौकशी करायला आले होते! कोणत्या तरी  सुजाण(?) नागरिकाने म्हणे त्यांना फोन करून कळवलं होतं की इथे कोणीतरी घरफोडी करत आहे आणि म्हणून ते तत्परतेने आले होते. आमच्या सुहृदांनी त्यांना व्यवस्थित समजावलं की हे त्यांचंच घर आहे, त्याचा पुरावाही दिला. ते बघून त्यांनाही हसू आलं आणि ते आल्या पावली निघून गेले. 

बरं नेमकं झालं असं की लोकांच्या शंकेलाही वाव होता की २ पोरसवदा तरुण बाहेर उभे आहेत लक्ष द्यायला आणि घरात २-४ लोक काहीतरी उद्योग करत आहेत. पण म्हणून तीन गाड्या आणायच्या? बहुत नाइन्साफी है. हो, तीन गाड्या आल्या होत्या पोलिसांच्या! धन्य ते सुजाण नागरीक आणि धन्य ते पोलीस. 

आम्ही बाहेर येऊन बघितलं तर “तो” सुजाण सायकलस्वार लांब उभा राहून आमच्याकडे संशयित कटाक्ष टाकत होता. आम्हाला वाटलं त्या बेण्याला “अबे रुक” म्हणून तिथंच धरावं आणि बुकलून काढावं! पोलिसांना बोलवतो म्हणजे काय रे हं! 

नंतर हसून हसून आम्हा सगळ्यांची पुरेवाट झाली कारण पोलिसांनी बाहेर पोरांचीही चौकशी केली होतो, त्यांना त्यांचे आयकार्ड्स दाखवायला लावले. विजा दाखवा म्हणाले तर मुलं म्हणाले की आमचे आईवडील आत आहेत त्यांच्याकडे आमचे विजा आहेत. आम्ही काय विजा सोबत घेऊन फिरतो का काय पोलिसमामा?

एकंदर काय तर आम्ही स्वतःच्याच घरात घरफोडी करतोय ह्या आरोपातून आमची निर्दोष सुटका झाली! 


#माझी_म्युनिक_डायरी

वाचकांना आवडलेले काही