गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

मी, मॅगी काकु आणि निरोप!

आज लेकाने शाळेत जाताना घराचं दार अंमळ जोरातच लावलं, तर अनावधानाने त्याला म्हणाले “अरे त्या मॅगी काकु रागावतील ना!“ मग लक्षात आलं कि आपल्याला आज ४ महिने होऊन गेले आहेत मॅगी काकुंचा शेजार सोडुन. 

पण खरंच तिकडे होतो तेव्हा, घराचं दार थोडं जरी जोरात लावलं तर हमखास मॅगी काकुंचा आवाज यायचा “अरे दरवाजा हळु लावत चला, मला त्रास होतो!“ काकुंना दुसऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासाची यादी करायला बसले तर दिवस जाईल सगळा. हो किनई?

अरेच्या.. काकुंचा निरोप घेण्याचा किस्सा सांगायचाच राहिला ना! तर, घर सोडायच्या ४-५ दिवस आधी मी त्यांचा दरवाजा वाजवला, मला वाटलं नेहमीप्रमाणे दार उघडणारच नाहीत! पण २ मिनिटांनी का होईना त्यांनी दार उघडलं! 

मी: काय म्हणताय कश्या आहात?

का: मी बरी आहे ग. तु ठीक आहेस ना?

मी: हो हो ठीक आहे. तुम्हाला माहित असावं म्हणुन सांगायला आले कि आम्ही पुढच्या आठवड्यात हे घर सोडतोय. 

का: अरे हो का? भारतात निघाले का तुम्ही?

मी: नाही हो, म्युनिक मधेच दुसरीकडे राहायला चाललोय! तो अमुक भाग नाही का तिथे आहे घर. 

का: (शंकास्पद चेहरा करून!) तिकडे!! मी अजिबातच गेले नाही कधी तिकडे. विचित्र भाग आहे असं ऐकलय!!

मी: (मनातल्या मनात कपाळावर हात मारून, झोपडपट्टी नाही ये ओ ती!) विचित्र वगैरे नाहीये ओ, आपल्यासारखेच लोक राहतात तिकडे आणि आठव्या मजल्यावर घर घेतलंय हो. 

का: कायकी बाई, मला फार काही माहित नाही त्या भागाविषयी!

मी: (अहो तुमचं पुर्ण आयुष्य गेलं ना म्युनिकमध्ये? माहित कसा नाही? हं? टेला ला राहता म्हणुन काय झालं?) बरं बरं. भेटु पुन्हा निघायच्या आधी मग. 

का: (चेहऱ्यावरचे भाव “आता कशाला पुन्हा भेटु? घेतलास ना निरोप!“) अगं तुम्ही गेल्यावर कोण येणार आहे रहायला ईथे? भारतीयच आहेत का? पोरंबाळं किती आहेत त्यांना? 

मी: (घ्या कोणाला कशाचं तर काकुंना भारतीय शेजाऱ्यांचं!!) मला काही कल्पना नाही हो. घरमालकांनी अजुन ठरवलं नाहीये बहुतेक. 

का: मला सांग हं नक्की तुला काही समजलं तर! पुन्हा भारतीयच येतात कि काय कोण जाणे? बाय. 

मी: (तेवढं वाक्य मनात बोलला असतात तर काही बिघडलं असतं का? जा अजुन निरोप घ्यायला!!) बाय. 

म्युनिकमधील जुने जाणते जे लोक आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे मॅगी काकु! त्यांनी त्यांच्या हयातीत महायुद्धानंतर राखेतुन उभा राहिलेला आणि त्यांनतर सतत विकसित होत गेलेला स्वतःचा देश पाहिलाय. परंतु गेल्या काही वर्षात जर्मनीच्या घसरत्या जन्मदरामुळे लाखोंच्या संख्येने येणारे इतर देशीय लोक बघुन, त्यांना वाईट वाटत असेल कदाचित आणि त्यामुळेच मला त्यांच्या  वागण्याचा राग येत नाही कधी.  

घर सोडतांना पुन्हा भेटल्या आवर्जुन!! माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता खरंतर. त्यांची बहीण आलेली होती. मी काकुंना विचारलं ”एक फोटो काढाल का माझ्याबरोबर? आठवण म्हणुन. ” काकु विचारात पडल्या आणि म्हणाल्या “कुठे शेअर तर नाही करणार ना ग तु?” अगा बाबोव .. म्हणलं ह्यांनी माझ्या फेबु आणि ब्लॉगला भेट दिली कि काय? सगळीकडे त्याच आहेत ना!! माझी भंबेरीच उडाली. 

म्हणलं “ नाही नाही, अजिबात नाही करणार कुठेच शेअर! काळजी करू नका." त्यांच्या बहिणीलाच दया आली माझी आणि ती म्हणाली “काय ग मॅगी! ती एवढी म्हणतीये तर काढ ना एक फोटो, घर सोडुन चालली आहे ती!” मग आढेवेढे घेत मॅगी काकु तयार झाल्या फोटो काढायला! फोटो काढल्यावर म्हणाल्या कि “छान शेजार होता बरं तुझा इतकी वर्ष! तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा!“ टचकन पाणीच आलं डोळ्यांत. 

डोळ्यातलं पाणी ओघळंलच असतं पण काकूंचं पुढचं वाक्य ऐकुन ते तिथंच थिजलं!! त्या म्हणाल्या “काही कळलं का तुला? कोण येतंय ग इथे राह्ययला? लहान मुलं वगैरे आहेत का त्यांना?“

हसावं कि रडावं हे न समजुन मी ”काहीच माहित नाही हो. चला मी निघते, या तुम्ही आमच्या घरी तिकडे आलात कि!” एवढं बोलुन त्यांचा निरोप घेतला!!


सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक 


#माझी_म्युनिक_डायरी

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

आता knor काका शोध..अप्रतिम लेख.

टिप्पणी पोस्ट करा

वाचकांना आवडलेले काही