आज जरा घराबाहेर पडले होते. म्हणलं सारखं सारखं ह्यांनाच सामान आणायला पाठवणं बरं नव्हे. आपणही बाहेर पडावं आणि आसपासच्या लोकांचं लॉकडाऊन कसं चालु आहे ते एकदा ह्याची देही ह्याची डोळा बघावं म्हणजे लिहायलाही विषय मिळतो. कसं?
तर आज बाहेर पडल्यावर असं जाणवलं की ईथल्या लोकांची एक कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मागील कितीतरी दिवसांत बाहेर पडल्यावर ती कला आत्मसात केलेली माणसं नजरेस पडतच नाहीयेत. नाहीतर अक्षरशः कोपऱ्यावर कोपऱ्यावर हे नमुने दिसतातच.
बाकी ह्या जर्मन लोकांमध्ये सुसंस्कृतपणा अगदी ठासुन भरलेला असतो बरं, पण जेव्हा ह्यांना ही कला जोपासायची वेळ येते तेव्हा ते कोणाच्या बापाला जुमानत नाहीत.
असा कलाकार व्यक्ती आपल्यापासून कितीही लांब असला तरी त्याच्या आवाजावरून आपण त्याला लग्गेच ओळखतो. काय तो फर्राटेदार आवाज, काय ते चार चार वेळा जोरदार “फर्रर्रर्र फर्रर्रर्रर्र“ करून टीश्यूज कचरापेटीत टाकणे, जसं काही एखादा फलंदाज चेंडू सीमेपार मारतोय!
आलं असेलच तुमच्या लक्षात, हो हो बरोबर... सर्दी झाल्यावर जोरदार नाक शिंकरण्याच्या अद्भुत कलेविषयी बोलतेय मी. कधीकधी ट्रेनमध्ये असताना जर असे सर्दी झालेले कलाकार आजुबाजुला असतील तर नक्की पाच ते सात मिनिट ही लोकं “फर्रर्रर्र फर्रर्रर्र” करत असतात. एक बरोबर आहे की सर्दी मोकळी होते पण इतक्या वेळा आणि इतक्या जोरजोरात कशाला? बाकीच्यांनी ह्यांची कलाकारी सहन करायची!
बरं एकच टिश्यु वापरावा ना, पण नाही, जितक्या वेळा फर्रर्रर्र करायचं तितके टिश्यु. खरं हे लोक एवढे टॉयलेट पेपर आणि टिश्यु पेपर वापरतात, असं वाटतं की पृथ्वीवरचे सगळे झाडं ह्यांच्या डॅश डॅश ला आणि शेंबडालाच लागतील.
हे पाश्चात्य लोक जगाला बोंबलू बोंबलू सांगतात की एन्व्हायरमेंट वाचवा आणि स्वतः प्रचंड प्रमाणात प्लास्टिक आणि टिश्यूजचा वापर करतात. असो. विषय भरकटतोय! तर विषय होता नाक शिंकरणे!
आज रस्त्यात एक जर्मन काकू अक्षरशः तोंड लपवून लपवून, अगदी घाबरत हळूहळू नाक पुसत होत्या. दयाच आली त्यांची! कारण आजकाल साधं खाकरलं तरी लोक आपण कुठेतरी दरोडा टाकुन आलोय की काय असे बघतात, त्या तर नाक पुसत होत्या. नशीब कोणी पोलिसांना नाही बोलावलं. त्या काकु सुखात असुदे म्हणजे मिळवलं.
काय राव? ह्या लॉकडाऊनमुळे काहीच्या काही सुचतंय आणि आठवतंय! “हे भगवान, जल्दीसे ऊठा ले रे बाबा ईस कोरोनाको!”
सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक
#माझी_जर्मनी_डायरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा